र.धों.

Primary tabs

पुष्करिणी's picture
पुष्करिणी in लेखमाला
8 Mar 2017 - 6:34 am

.

'The story is lady-oriented, their fantasy above life. There are contentious sexual scenes, abusive words, and a bit sensitive touch about one particular section of society' --- 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची कारणं, भारतीय सेंसॉर बोर्ड, फेब्रु. २०१७.

या पार्श्वभूमीवर जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी तथाकथित अश्लीलतेविरुद्ध लढा देणार्‍या, स्त्री-पुरुष समानतेचा खंदा पुरस्कर्ता असणार्‍या रघुनाथ कर्व्यांच्या कामाचं महत्त्व फार फार उठून दिसतं. आज महिला दिनाच्या मुहूर्तावर त्यांच्याबद्दल थोडंसं..

ऋषितुल्य अण्णा आणि त्यांची पहिली पत्नी यांचा मुलगा रघुनाथ. घरातच स्त्री-शिक्षण, स्त्री-स्वावलंबन अशा सामाजिक सुधारणांचा वारसा मिळाला असला, तरी वडिलांच्या मृदू, शांत स्वभावाच्या अगदी उलट रोखठोक स्वभाव आणि थोडा तिरसटपणा असल्याने रघुनाथ कर्व्यांच्या आयुष्यात आणि नंतरही त्यांच्या कामाबद्दल उपेक्षितपणाच आला. आजही 'संततिनियमन' हे त्यांचं कार्य नजरेत येत असलं, तरी स्त्री-पुरूष समानता हा त्याचा पाया आहे. कर्वे लिहितात - 'स्त्री ही मनुष्यच असल्याने स्त्रियांचं सुख हे पुरुषाच्या सुखाइतकंच महत्त्वाचं आहे.'

.
* त्यांची आणि पत्नीची वेषभूषा काळाच्या मानाने किती आधुनिक आहे..(आंजावरून - लोकसत्ता साभार )

त्यांचा जन्म १८८२ सालचा मुरूडचा. १८९९ला मॅट्रिकला पहिले, पण आदल्या वर्षी इतिहास आणि भूगोलात नापास. पुढे मॅट्रिक झाल्यावर फर्ग्युसन कॉलेजमध्ये १९०४पर्यंत वसतिगृहात राहिले. वसतिगृहात राहायच्या काळात त्यांच्याबरोबर / सिनिअर असणार्‍या इतर विद्यार्थ्यांची जीवनशैली जवळून पाहिली गेली; म्हणजे काही सिनिअर विद्यार्थी मनाविरुद्ध लग्न झालेले होते, काहींचे असलेले विवाहबाह्य / विवाहपूर्व असुरक्षित शारीरिक संबंध, त्यातून होणारी संतती / गुप्तरोग. वसतिगृहातल्या ह्या काळाचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला आणि कामशास्त्र, संततिनियमन आदी गोष्टींचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचं तिथेच ठरवलं. बी.ए. - गणित आणि पुढे शिष्यवृत्ती न मिळाल्याने एम.ए. अर्धवट करून त्यांनी पुणं सोडलं. पुढं त्यांनी वडिलांसारखंच अध्यापनात जायचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने १९०५मध्ये मुंबईला गेले.

त्यांनी ज्या विषयांचा अभ्यास करायचा ठरवला, बहुतेक या विषयांवर त्या वेळी फ्रेंच भाषेत इंग्लिशपेक्षा जास्त माहिती उपलब्ध असावी असं वाटतं, कारण मुंबईमध्ये गेल्यावर त्यांनी फ्रेंच भाषा शिकून घेतली. १९०८पासून सरकारी कॉलेजात गणित विषय शिकवायला आणि पॅरिसला जाण्यासाठी पैसे साठवायला सुरुवात केली. दरम्यान १९११मध्ये मालतीबाईंशी प्रेमविवाह झाला. १९१९मध्ये उच्चशिक्षणासाठी रजा घेऊन ते पॅरिसला गेले आणि एक वर्षाने परत आले. पण जेव्हा परत आले, तेव्हा त्यांच्या जागेवर त्यांच्यापेक्षा शिक्षणाने/ अनुभवाने कनिष्ठ व्यक्तीला प्रोफेसर म्हणून ठेवल्याने त्यांनी रीतसर राजिनामा दिला.

नोकरी नाही, फार शिकवण्याही हाती नसताना १९२१मध्ये संततिनियमनाचा प्रसार, प्रचार, लागणारी साधनं आणि गुप्तरोगांवरील औषधं पुरवायला आपल्या राहत्या घरातून चालू केलं, हेच भारतातलं संततिनियमनाचं काम करणारं पहिलं-वहिलं केंद्र. १९२३ साली 'संततिनियमन' आणि 'गुप्तरोगांपासून बचाव' ही दोन पुस्तकं इंग्लिशमध्ये लिहून प्रसिद्ध केली.

घर आणि समाजकार्य पत्नीच्या पगारावर चालू होतं. पैशांच्या गरजेपोटी नैरोबीत नोकरीचा अयशस्वी शोध, नंतर इराणी कंपनीत पी.ए.ची नोकरी, रिझन नावाच्या एका इंग्लिश नियतकालिकात संपादक म्हणून काम असं करत करत हा प्रसार चालूच राहिला.

या दरम्यान मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये गणित शिकवण्यासाठी त्यांची नेमणूक झाली. या कॉलेजात शिकवत असताना किर्लोस्कर मासिकासाठी लिहिलेल्या 'अमर्याद संतती' या लेखामुळे ही नोकरीही हातची गेली. झालं असं - मासिक किर्लोस्करवाडीत प्रकाशित होत असे, म्हणजे औंध संस्थानात; हा लेख वाचून काही लोकांनी बाळासाहेब पंतप्रतिनिधींकडे 'आपल्या संस्थानतल्या मासिकांत असले लेख कसे चालतात? हे योग्य नाही आणि ते बंद करा' अशी मागणी केली आणि कर्वे शिकवत असलेल्या कॉलेजच्या प्राचार्यांकडे 'असल्या नसत्या उठाठेवी करणारा माणूस तुम्ही प्रोफेसर म्हणून कसा ठेवता?' अशी धमकीवजा विचारणा केली. हे एक कॅथॉलिक धार्मिक कॉलेज असल्यामुळे 'संततिनियमन' ही त्यांच्यासाठी धर्मबुडवी संकल्पना होती आणि गुप्तरोग म्हणजे देवाने पापी लोकांना दिलेली शिक्षा असा समज होता. धर्म बुडवणारं हे काम ताबडतोब थांबवा असं कॉलेजने कर्व्यांना सांगितल्यावर, 'तुम्हांला गणित शिकवायला हवे तितके लोक मिळतील, पण संततिनियमनचा प्रचार आणि प्रसार करायला कोणीच तयार नाही आणि हे महत्त्वाचं असल्याने मला ते करायला हवं' असं म्हणून तीही नोकरी सोडली.

या विषयावर बरेच लेख ते इतर नियतकालिकं, वृत्तपत्रं इ.साठी लिहीत असले, तरी फक्त संततिनियमनच नव्हे, तर इतरही बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीचं लेखन समाजासमोर आणण्याची गरज आहे असं वाटल्याने त्यांनी १५ जुलै १९२७ला 'समाजस्वास्थ्य' नावाचं मासिक चालू केलं. मासिकाच्या ध्येय-धोरणाविषयी कर्वे लिहितात - 'व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची आणि संबंधित उपचारांची चर्चा करणे हा मुख्य उद्देश आहे; विशेषकरून ज्या विषयासंबंधी लेख प्रसिद्ध करायला इतर लाजतात किंवा घाबरतात आणि त्यामुळे वाचकाची इच्छा असूनही महत्त्वाची माहिती मिळण्यास अडचण येते, ती दूर करायचा आम्ही प्रयत्न करू.'
आणि एकाहाती अगदी शब्दशः मरेपर्यंत चालवलं. पैशांअभावी लहान आकार, कमी पृष्ठसंख्या, अगदी साधा कागद, साधी छपाई आणि इतर लेखकांना द्यायला मानधन नाही म्हणून लेखक, लिपिक, वर्गणीदारांचा हिशेब ठेवणं, पत्ते लिहून पोस्ट करणं अशी सगळी कामं कर्वे स्वतःच करत. या मासिकांत स्त्री-शिक्षण, संततिनियमन, घटस्फोट, अंधश्रद्धा, बुरसटलेल्या रूढी, फ्रेंच भाषेतल्या साहित्याचा अनुवाद, आहारशास्त्र, लैंगिक शिक्षणाचं महत्त्व असे बरेच विषय असत. 'शारदेची पत्रं' या सदराखाली टोपणनावानं कर्वे या मासिकांत राजकारण, मानसशास्त्र, विज्ञान, शिक्षण, करंट अफेअर्स इ. विविध विषयावर लेखन करत, वाचकांशी संवाद साधत.

.
* विक्रीसाठी ठेवलेली विविध विषयांवरील पुस्तकं (आंजावरून साभार )

अत्यंत परखड आणि रोखठोक स्वभाव असल्याने कोर्टकचेर्‍या, अटक, दंड हेही चालू असायचं. 'व्यभिचाराचा प्रश्न' या १९३१ साली लिहिलेल्या लेखात महाभारतातल्या श्रीकृष्ण, कुंती, द्रौपदी,अर्जुन, हिडंबा यांचा उल्लेख उदाहरण म्हणून, १९३४ साली गुजराथी पुरवणीत वाचकांच्या पत्राला दिलेल्या उत्तरामुळे अटक, खटला, दंड (या खटल्यात कर्व्यांचे वकील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते) आणि १९३८ साली 'कामकला' या पुस्तकाची फक्त जाहिरात केली म्हणून कर्व्यांना अश्लीलतेच्या कलमाखाली अटक, खटले, मानहानी आणि दंडही झाले, वरच्या कोर्टातली अपिलंसुद्धा धुडकावून लावण्यात आली.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते फक्त संस्कृती रक्षक, अपुरा पैसा अशा गोष्टींशी लढत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कर्व्यांना सरकारक्डून उत्तेजनाची अपेक्षा होती. पण परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडलीच. त्या काळी मेडिकलच्या अभ्यासक्रमातच संततिनियमन हा विषय नव्हता. बर्‍याच डॉक्टरांनी कर्व्यांकडून याबद्दलची माहिती घेतली. पण १९४७नंतर 'डॉक्टरकीच्या अभ्यासक्रमात ही माहिती नाही, पण डॉक्टरव्यतिरिक्त इतरांनी लोकांना ही माहिती देणे इष्ट नाही' अशी गाइड लाइन आली. पहिल्या आरोग्यमंत्री राणी अमृत कौर यांनी परदेशातून मागवण्यात येणार्‍या साधनांवर निर्बंध घातले आणि संततिनियमनाची साधनं बनविण्याआधी सरकारी परवाना बंधनकारक तर केलाच, तसंच असा परवाना मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकृत डिग्रीची अट घातली.

संततिनियमनाला 'छोटं कुटुंब-सुखी कुटुंब' असा समाजाभिमुख पवित्रा न घेता त्याचा woman empowerment आणि it is right of a woman to experience, have pleasure.. असा direct, on the face प्रचार केला. त्यांच्या समकालीन असणार्‍या आणि समान क्षेत्रात काम करणार्‍या Marie Stopes (UK) आणि Margaret Sanger (US) यांच्या तुलनेत कर्व्यांना खूपच उपेक्षा सहन करावी लागली. UKमध्ये आज largest reproductive health charity ही Marie Stopesच्या नावे आहे. इतकी माहिती आजही कर्व्याच्या कामाबद्दल सहजासहजी मिळत नाही.

.
(आंजावरून साभार )

आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, पदरमोड करून १९२७ ते १९४४ अशा दीर्घकाळात पत्नीच्या आजारपणात तिची देखभाल करत, कमालीच्या ध्येयवादी वृत्तीमुळे अत्यंत कमी मोबदल्यात संततिनियमनाची माहिती, साधनं लोकांना पुरवणं, समाजस्वास्थ्यचे अंक त्याही परिस्थितीत नियमित काढणं, कोर्ट-कचेर्‍यांना तोंड देणं, प्रसंगी मानहानी सहन करणं अशा अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत त्यांनी आपलं काम अहोरात्र चालू ठेवलं. १४ ऑक्टोबर १९५३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. अगदी एकही पैसा शिलकीत न ठेवता ते गेले.

आज २०१७मध्येसुद्धा आपण अश्लील, काय निषिद्ध, लैंगिक शिक्षण मुलांना द्यायचं की नाही, संस्कृती रक्षण, 'उसकी ना में ही उसकी हां होती है' , बायकांनी काय खावं/प्यावं/बघावं/वाचावं इथेच आहोत. एक समाज म्हणून आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

त्यांच्या निरनिराळ्या लेखांतील काही परिच्छेद - (जसे मलाआठवले तसे )

'प्रौढ विवाह, घटस्फोट, विधवा विवाह या गोष्टी गैर नाहीत. पण विवाह हेच उपजीविकेचं असल्यासारखं स्त्रियांनी आपल्या पायांवर उभं राहण्यापेक्षा नेहमी परावलंबीच राहणे उत्तम अशी व्यवस्था जगातल्या सर्व संस्कृती करतात. नुसते हक्क हवेत असा आरडाओरडा नको, तर स्त्रीशिक्षण आणि संततिनियमन या स्त्रीस्वातंत्र्याच्या किल्ल्या आत्मसात केल्या पाहिजेत.'

'जर आपल्याकडे एकपत्नीव्रताबद्दल रामाची प्रशंसा केली, याचाच अर्थ हे दुर्मीळ आहे आणि काही पौराणिक स्त्रियांची पातिव्रत्याबद्दल ख्याती आहे, म्हणजेच सामान्यतः इतर स्त्रिया पतिव्रता नाहीत., पण स्त्रियांना रूढीमुळे पातिव्रत्याचं ढोंग करणम भाग असतं. पती हा परमेश्वर आहे असं बायकांना शिकवलं तर विवाह अयशस्वी झाला तरी बोभाटा होत नाही.'

लैंगिक शिक्षणाचं महत्व अधोरेखित करताना ते म्हणतात - 'नैसर्गिक प्रवृत्तींना बांध घालणं अवघड आहे आणि ते केवळ नैतिक भाषणानं साध्य होणार नाही. काय करावं / काय करू नये यापेक्षा काय केल्यास काय होण्याचा संभ आहे ते सांगावं.'
'स्त्री-पुरुष नातं हे दोघांच्या परस्पर संमतीने आणि एकमेकांच्या भावनांचा, आवडीनिवडीचा आणि सोयीचा विचार केला तरच सुख देऊ शकतं, हे विवाहापूर्वी मनावर बिंबवलं गेलं पाहिजे आणि हे घरी करण्याऐवजी प्रशिक्षित संस्थेतर्फे दिलं जावं.'

'हिंदुस्थानात लोकसंख्येचा प्रश्न नाही असं राजकारणी म्हणतात, रिकाम्या पडलेल्या जमिनीवर लागवड केली की भरपूर अन्नपुरवठा होईल; परंतु उद्या उत्पादन होणार्‍या अन्नावर आज जगता येत नाही. हा नवीन देश नव्हे, हा प्राचीन देश आहे आणि इथे प्रसंगी विश्वामित्रालाही कुत्र्याची तंगडी चोरून खावी लागली आहे.'

संदर्भ -
निवडक शारदेची पत्रे - लेखक र.धों. कर्वे, संपादक - अनंत देशमुख
समाजस्वास्थ्यकार - अनंत देशमुख
असंग्रहित र.धों. कर्वे - 'समाजस्वास्थ्य' व्यतिरिक्त इतरत्र लिहिलेले लेख, संकलन - अनंत देशमुख
समाजस्वास्थमधील निवडक लेख - लेखक र.धों. कर्वे, संकलन - अनंत देशमुख
र.धों. कर्वे - व्यक्तीत्व आणि कर्तृत्व - लेखक - अनंत देशमुख

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

8 Mar 2017 - 4:02 pm | पिशी अबोली

छान लेख. यांच्या कार्याबद्दल खरंच खूप कमी माहिती मिळते. अतिशय औचित्यपूर्ण लेख आहे.

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2017 - 5:40 pm | प्राची अश्विनी

+11

पलाश's picture

8 Mar 2017 - 7:12 pm | पलाश

लेख अावडला.

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 8:41 pm | पद्मावति

सुंदर, कसदार लेख. खूप आवडला पुष्करिणी.

शैलेन्द्र's picture

8 Mar 2017 - 10:41 pm | शैलेन्द्र

सुरेख ...

इशा१२३'s picture

9 Mar 2017 - 9:51 am | इशा१२३

रंधो कर्वे काळाच्या पुढे होते . स्त्री मुक्ती ,स्त्री- शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता.कुटुंबनियोजनाचा आदर्श समाजाला घालुन देण्यासाठी त्यांनी स्वतः मालतीबाइंच्या संमतीने एकहि मूल नसताना शस्त्रक्रिया करुन घेतली होती.अतिशय धाडसी असे कृत्य करुन समाजाला दिशा दाखवली.
लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व त्याकाळात समाजाला सांगणार्या रंधो वरचा लेख समयोचित.

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 11:35 am | सविता००१

छान लेख. अतिशय आवडला

वरुण मोहिते's picture

9 Mar 2017 - 11:59 am | वरुण मोहिते

लोक फार कमी असतात . र. धो . त्यातील एक

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 12:35 pm | प्रीत-मोहर

वरच्या सगळ्या प्रतिक्रियांना मम म्हणते.

समयोचित लेख आहे पुष्के.

मराठी कथालेखक's picture

9 Mar 2017 - 12:36 pm | मराठी कथालेखक

अमोल पालेकर यांनी र धों च्या जीवनावर ध्यासपर्व हा चित्रपट बनवला आहे. किशोर कदम यांनी रधोंचे पात्र रंगवले आहे.

पुष्करिणी's picture

20 Mar 2017 - 8:01 pm | पुष्करिणी

लेख लिहिण्यापूर्वी मी हा चित्रपट खूप शोधला पण कुठेही मिळाला नाही, 'आपलीमराठी.कॉम' वर सुद्धा नाही मिळाला, २०१० चा आहे, बघायची खूप इच्छा आहे.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2017 - 12:45 pm | पूर्वाविवेक

छान लेख. अतिशय आवडला.
खरंच काळाच्या पुढे असणारा हा माणूस होता.

गिरकी's picture

9 Mar 2017 - 5:13 pm | गिरकी

मुजरा !!

जव्हेरगंज's picture

9 Mar 2017 - 6:59 pm | जव्हेरगंज

उत्तम लेख!

रेवती's picture

10 Mar 2017 - 2:37 am | रेवती

माहितीपूर्ण लेख आवडला. छायाचित्रात त्यांच्या पत्नीची वेषभूषा व आत्मविश्वास दोन्ही गोष्टी त्या काळात स्त्रीयांच्या चेहर्‍यावर दिसत नसत. पूर्वीचे फोटो पाहिले असता मुलाबाळांनी वेढलेले महिलांचे फोटो व चेहर्‍यावर अवकळा असे. १९११ साली हा प्रेमविवाह होता हे वाचून आश्चर्य वाटले. खूप छान. विक्रीसाठी ठेवलेल्या पुस्तकांची नावे इतकी सरळसोट आहेत हे पाहून हसू आले.

पुष्करिणी's picture

20 Mar 2017 - 8:03 pm | पुष्करिणी

प्रेमविवाह आणि तोही वडिलांच्या वसतीगृहात रहाणार्‍या मुलीशी :),

हो, फोटो एकदम मस्त आहे.

सुचेता's picture

10 Mar 2017 - 12:54 pm | सुचेता

काळाच्या पुढे असणार्या थोर व्यक्ती बद्दल छान माहिती

मनिमौ's picture

10 Mar 2017 - 1:54 pm | मनिमौ

सर्व जण काळाच्या पुढचा विचार करणारे होते. र धों च कार्य त्यांच्या ह्यातीत कधीच गौरविले गेले नाही याची खंत वाटते

पैसा's picture

10 Mar 2017 - 2:11 pm | पैसा

_/\_ अप्रतिम लेख!

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2017 - 11:04 pm | स्वाती दिनेश

माहितीपूर्ण लेख आवडला. 'ध्यासपर्व 'ची आठवण झाली,
स्वाती

हा माहितीपूर्ण लेख वाचून खूप चांगले वाटले. त्यांचा त्याकाळी प्रेमविवाह होता ही बाब त्यांची पत्नी आणि ते यांच्या मोकळ्या आणि मनस्वी स्वभावाची साक्ष देते.
असेही वाटले की अरे या माणसांना आज तरी आपल्या समाजात खर्‍या अर्थाने जागा आहे का?
आपल्या कामाच्या स्वरूपामुळे आयुष्य उपेक्षेतच जाणार आहे हे ठाऊक असूनही समाजाच्या भल्यासाठी पायातले दगड व्हायला तयार होणारी अशी माणसे बघितली की आपलीच कोठेतरी लाज वाटायला लागते....
लेखाबद्दल धन्यवाद पुष्करिणी!
('ध्यासपर्व' बघायला हवा..)

मितान's picture

11 Mar 2017 - 1:39 am | मितान

उत्तम माहितीपूर्ण लेख !!!

अजया's picture

11 Mar 2017 - 9:14 am | अजया

_/\_
काय अफाट व्यक्तिमत्त्व होऊन गेली आहेत या कर्वे घराण्यात.
उत्तम लेख.

नूतन सावंत's picture

11 Mar 2017 - 11:26 am | नूतन सावंत

अभ्यासपूर्ण लेख आवडला.

अभिजीत अवलिया's picture

12 Mar 2017 - 5:58 pm | अभिजीत अवलिया

अतिशय आवडला लेख.

पुष्करिणी's picture

20 Mar 2017 - 8:05 pm | पुष्करिणी

सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसाद कर्त्यांचे आभार आणि धन्यवाद

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2017 - 3:54 am | नगरीनिरंजन

भारतीय समाज किती मूर्ख आहे ह्याचे ढळढळीत उदाहरण द्यायचे झाले तर हे देता येईल. ह्या माणसाचे ऐकले असते तर भारत आज एक विकसित देश असू शकला असता.
भरमसाठ लोकसंख्या झालेली असतानाही आणि आणखी एक हरितक्रांती होणार नाही हे माहित असतानाही कित्येक लोक अजूनही दोन किंवा अधिक पोरं पैदा करत आहेत.
अशी माणसं भारतात जन्माला आली हे त्यांचं दुर्दैव!

रुपी's picture

8 Apr 2017 - 5:08 am | रुपी

छान माहितीपूर्ण लेख!

एमी's picture

28 Jun 2017 - 3:27 am | एमी

लेख आवडला.

त्यांच्या निरनिराळ्या लेखांतील काही परिच्छेद - (जसे मलाआठवले तसे) >> तुमच्या शब्दात लिहिलेत का त्यांचे विचार?

पत्नीची वेषभूषा काळाच्या मानाने किती आधुनिक आहे. >> पत्नीची वेषभूषा मलातरी आधुनिक वाटली नाही. चूभूद्याघ्या.

===

पण विवाह हेच उपजीविकेचं असल्यासारखं स्त्रियांनी आपल्या पायांवर उभं राहण्यापेक्षा नेहमी परावलंबीच राहणे उत्तम अशी व्यवस्था जगातल्या सर्व संस्कृती करतात. नुसते हक्क हवेत असा आरडाओरडा नको, तर स्त्रीशिक्षण आणि संततिनियमन या स्त्रीस्वातंत्र्याच्या किल्ल्या आत्मसात केल्या पाहिजेत. >> महान _/\_
पॉंपेशनल होमेमेकर ना प्रतिष्ठा मिळवी म्हणवून झगडानारे स्वघोषित स्त्रीवादी पुरोगामी अजूनही दिसतातच की ...

जर आपल्याकडे एकपत्नीव्रताबद्दल रामाची प्रशंसा केली, याचाच अर्थ हे दुर्मीळ आहे आणि काही पौराणिक स्त्रियांची पातिव्रत्याबद्दल ख्याती आहे, म्हणजेच सामान्यतः इतर स्त्रिया पतिव्रता नाहीत., पण स्त्रियांना रूढीमुळे पातिव्रत्याचं ढोंग करणम भाग असतं. पती हा परमेश्वर आहे असं बायकांना शिकवलं तर विवाह अयशस्वी झाला तरी बोभाटा होत नाही. >> हम्म

नैसर्गिक प्रवृत्तींना बांध घालणं अवघड आहे आणि ते केवळ नैतिक भाषणानं साध्य होणार नाही. काय करावं / काय करू नये यापेक्षा काय केल्यास काय होण्याचा संभ आहे ते सांगावं. >> हम्म

स्त्री-पुरुष नातं हे दोघांच्या परस्पर संमतीने आणि एकमेकांच्या भावनांचा, आवडीनिवडीचा आणि सोयीचा विचार केला तरच सुख देऊ शकतं, हे विवाहापूर्वी मनावर बिंबवलं गेलं पाहिजे आणि हे घरी करण्याऐवजी प्रशिक्षित संस्थेतर्फे दिलं जावं. >> संमती?? हम्म!!!

'ध्यासपर्व' हा खरोखरच नितांतसुंदर असा एक चित्रपट आहे. कुठे मिळाल्यास आवर्जून पहा. र. धों. आणि मालतीबाई यांच्या जीवनकार्यास विनम्र अभिवादन!

सिरुसेरि's picture

28 Jun 2017 - 10:41 am | सिरुसेरि

र. धों. यांच्या जीवनावर आधारीत "द्रष्टा" हि मालिका पुर्वी सह्याद्रीवर लागायची .

दीपा माने's picture

29 Dec 2017 - 8:46 am | दीपा माने

कै. रं.धो. कर्व्यांसारख्या विभुतींमुळेच समाज मानसिकता पुढे सरकत जाते.
रत्नाची पारख फक्त रत्नपारखीच करू शकतो म्हणूनच त्यांचे वकिलपत्र महामानव कै. डाॅ. बाबासो. आंबेडकरांनी घेतले होते.
ह्या दोन्ही विभुतींना माझे विनम्र अभिवादन.

सुबोध खरे's picture

30 Dec 2017 - 10:38 pm | सुबोध खरे

उत्तम लेख
र. धों. यांच्या जीवनकार्यास विनम्र अभिवादन!