चला, डेकोपेज शिकू या!

Primary tabs

मूनशाईन's picture
मूनशाईन in लेखमाला
8 Mar 2017 - 6:32 am

.

डेकोपेज म्हणजे हस्तकौशल्याच्या दुनियेतली एक अभिनव कला. चित्र काढता येत नसेल, तरी सौंदर्याची, रंगसंगतीची जाण असलेल्यांना सहज जमू शकेल अशी कला. जणू एखाद्या कुशल चित्रकाराने रेखाटलेले चित्र वाटावे ते प्रत्यक्षात एक साधे कागदाचे कात्रण असते. वॉर्निश, रेझिनसारखी लकाकी एका साध्या डिंकाच्या थरांनी येते. एकाहून जास्त हस्तकौशल्याच्या आणि कल्पक दृष्टीच्या बळावर साकारलेली रम्य अशी कलाकारी. कोणत्याही जागेचे सुशोभीकरण करताना एकमेकास पूरक गोष्टी आणि त्यात एक केंद्रबिंदू यावर भर असतो. ACCENT FURNITURE म्हणून एखादी वस्तू घेण्यासाठी आपण सगळा बाजार पालथा घालतो, कित्येक वेबसाइट्स धुंडाळतो. पण हीच वस्तू स्वस्तात, सहज आणि घरच्या घरी बनवायचे सुख काही औरच.

डेकोपेजचे मूळ सायबेरियात शेकडो वर्षे जुन्या संस्कृतीपासून ज्ञात आहे. आशियात १२व्या शतकातील सुरुवातीच्या काळात हे कौशल्य चीन, जपानमध्ये आढळले. पण स्मरणीय राहिले ते १८व्या शतकातील युरोपातले सुप्रसिद्ध ओरिएंटल काम. युरोपात आशियातील कोरीव लाखकामाची आयातीस एवढी तुफान मागणी होती की व्हेनिसमधल्या काही चलाख कलाकारांनी चित्रे, नक्षी आणि कोरीवकामाची छापील कात्रणे चिकटवून, त्यावर वॉर्निश मारून अशा लाखकामाची हुबेहूब नक्कल करायला सुरुवात केली. पारंपरिक लाखकामासारखी चकाकी येण्यासाठी वॉर्निशचे कित्येक थर एकमेकांवर दिले जायचे. 'lacca povera' - गरिबांचा लेप असे त्या वेळी याचे नाव पडले. १९व्या शतकात इंग्लंडमध्ये झाडे, वेली, फुलांचे ठसे मारून शोभेच्या कामासाठी हीच पद्धत वापरली गेली. व्हिक्टोरिअन लोकांनी फर्निचर, पडदे, दिव्यांवरदेखील हेच तंत्र वापरण्यास सुरुवात केली. कोरीव नक्षीकाम करणारे कलाकार पुढे स्वतःच त्यांच्या कामाचे ठसे डेकोपेज कलाकारांना द्यायला लागले. 'डेकोपेज' (अर्थात कापणे) शब्द विसाव्या शतकातील फ्रेंच शब्द 'decouper'पासून तयार झालेला. पुढे अमेरिकेत १९६०मध्ये बॉक्सेस, पेट्या, तबके, टोपल्या, पडद्यांच्या सुशोभीकारणासाठी डेकोपेज लोकप्रिय झाले.

तसे बघितले तर, डेकोपेजमध्ये वापरले गेलेले ठसे, चित्रे आकाराने एकदम लहान असल्याने हे फार वेळखाऊ आणि किचकट काम होते. मात्र आपण साधी आणि बाहेर दुकानात सहज मिळणारी सामग्री वापरून सुरुवात करणार आहोत. स्वस्त, फिनिश न केलेले लाकडी बॉक्सेस, जुने फर्निचर किंवा जाड पुठ्याच्या (MDF) वस्तू वापरून सुरुवात करू शकतो. आता आपली जुनी जमवलेली, फुले, पाने, वेली, प्राणी-पक्षी, फोटो, कॅलिग्राफी, आवडलेली कात्रणे आपल्याला लागणार आहेत. एखादे पोस्टर, वॉलपेपर, नक्षीकाम असलेले टिश्यू कागद, भेटवस्तू गुंडाळायचे रंगीबेरंगी कागद, मासिकातली कात्रणेदेखील आपण वापरू शकतो. क्राफ्टच्या दुकानात अगदी डेकोपेजसाठी खास कागद विक्रीला उपलब्ध असतात. घरच्या घरी प्रिंटरवर आपल्याला आवडेल ते छापून तो कागददेखील वापरता येतो. तर चला, सुरुवात करू या.

दागिन्याच्या बॉक्ससाठी लागणारे साहित्य.
.

लाकडाचा किंवा पुठ्ठ्याचा (MDF) ज्वेलरी बॉक्स.
आपल्या आवडत्या नक्षीचा, चित्राचा कागद किंवा हातबनावटीचा कागद चालेल.
Modge-Podge/ डेकोपेज डिंक
बोथट आडवे कुंचले
अ‍ॅक्रिलिक रंग
रंगफळी
स्पंज ब्रश
लाकडासाठी वॉर्निश
सुरक्षितपणे कागद कापण्यासाठी रबर mat (पर्यायी)
घासायला सँडपेपर
पाण्यासाठी वाटी
पुसायला फडके
पेन्सिल, पट्टी, कातरी किंवा पेपर कटर
रंगीत मार्कर

..१) सर्वप्रथम आपण लाकडाचा बॉक्स पृष्ठभाग गुळगुळीत होईपर्यंत घासून घेऊ. साध्या कापडाने पुसून स्वच्छ धूळमुक्त करून घ्या. बॉक्स (सर्व बाजूंनी + झाकण) मोजून घेऊन लक्षात राहण्यासाठी माप लिहून ठेवा.
डेकोपेज करण्याआधी आपण बॉक्स रंगवणार आहोत. कागदानुसार किंवा पसंतीच्या रंगाने बॉक्स रंगवून घ्या. पूर्ण कोरडा होईपर्यंत हात लागणार नाही अशा जागी किमान २४ तास ठेवा. आवडत असल्यास प्राचीन दिसण्यासाठी पिवळसर शाईने कडेला अलगद रंगवून घ्या.

..२) आता इथून डेकोपेज करायला सुरुवात होणार आहे. आपण निवडलेला कागद घ्या. कागद कापताना कातरी किंवा ब्लेड एकदम धारदार असल्यास डिझाईन तंतोतंत कापायला मदत होते. पेन्सिल आणि पट्टीने आपण आधी मोजलेल्या आकाराच्या कागदावर खुणा करा. कातरीच्या साहाय्याने किंवा कटरने आता कागद कापायचा आहे. लक्षात ठेवा, कागदाचा आकार आपण खुणा केल्या त्यापेक्षा किंचित मोठा असला पाहिजे.

3) बोथट, .. आडव्या कुंचल्याने Modge-Podge/डेकोपेज डिंक बॉक्सच्या पृष्ठभागावर एकसारखा पसरवून घ्या. कडेने थोडा डिंक बाहेर आल्यास पुसून घ्या. आता अगदी हलक्या हाताने, मापाचे तयार कात्रण बॉक्सच्या पृष्ठभागावर चिकटवायचे आहे. मध्यातून बाहेरच्या बाजूला, असे अलगद फडक्याने दाबून चिकटवा, म्हणजे एकसारखे चिकटायला मदत होते. सुरकुत्या येत नाहीत, शिवाय हात खराब असतील तर कागदावर डाग लागणार नाही. थोडे इकडेतिकडे झाले तरी हरकत नाही.

..४) यावर विषयानुसार इतर कात्रणे/स्टिकर्स असतील तर तीदेखील लावून घ्या. जसे इथे आपण Hello स्टिकर लावले आहे. कडेने अतिरिक्त बाहेर आलेला कागद सँडपेपरने घासला की वेगळा होईल. आता बॉक्स ३०-४० मिनिटे वाळू द्या. इतर पृष्ठभाग याच पद्धतीने तयार करून घ्या. प्रत्येक बाजू पूर्ण वाळू द्या, नाहीतर कागद वाकडा होईल आणि फाकून सुटू शकतो. सँडपेपरने घासलेल्या भागात खालचा रंग, लाकूड दिसायला लागेल. कात्रणांच्या रंगसंगतीनुसार रंगीत मार्करने किंवा परत शाई स्पंजमध्ये घेऊन अलगद कडा रंगवा.

.५) आता फडक्याने बॉक्सच्या सगळ्या बाजू एकदा स्वच्छ पुसून घ्या. Modge-Podge/ डेकोपेज डिंक परत एकदा संपूर्ण बॉक्सवर लावायचा आहे. स्वच्छ ब्रशने हलकेच, एका दिशेने डिंक लावा, नाहीतर बुडबुडे येतील. ६०-९० मिनिटे वाळू द्या. कात्रणाच्या खाली चिकटवायला आणि वरचा थर त्यांचे जतन करण्यासाठी आपण परत डिंक लावला.

६) बॉक्स पूर्ण वाळला की आपल्याला त्यावर sealing agent उदा., पोलीयुरेथीनचा, अ‍ॅक्रिलिक स्प्रे, किंवा वॉर्निशचा थर द्यायचा आहे. बारीक आणि एकसारखा थर बसला पाहिजे. वॉटरप्रूफिंग, उष्णतेपासून सांभाळण्यासाठी आणि टिकण्यासाठी याचा उपयोग होतो. ही पद्धत एकदम जुनी पण राजस दिसते. पण ज्यांना शॉर्टकट मारायचा आहे, त्यांनी Modge-Podge/ डेकोपेज डिंकाचा थर दिल्यानंतर थांबले तरी चालेल. सजावटीसाठी बाजारात चमकी असलेले डेकोपेज डिंकसुद्धा मिळतात. विषयास पूरक आणि बॉक्सचे सौंदर्य खुलवण्यासाठी लेस, खोटी फुले, मणी, खडे, लेझरकट तयार स्टिकर्सवर चिकटवून कलाकुसर करता येते. .

मागे मी ‘पायरोग्राफी’बद्दल लिहिले होते, तेव्हा सगळ्यांचा घवघवीत प्रतिसाद आला होता. तेव्हा डोक्यात विचार आला की या आगळ्यावेगळ्या डेकोपेजबद्दल सगळ्यांना सांगायचे. माझी मैत्रीण सिद्धी, डेकोपेज करून प्रत्येकाच्या आवडीनुसार, त्यांचा दृष्टीकोन लक्षात घेऊन विषयास साजेशा वस्तू बनवते. वरील फोटो खास तिच्याकडून मागवले आहेत. तिला विचारून आणि जालावरून अभ्यासून ही एक निराळी कला सगळ्यांसमोर आणते आहे. लाकूड, धातू, काच, मणी, दगड, पुठ्ठ्याच्या अशा अनेक वस्तूंवर सहज करता येणारी, पटकन शिकता येणारी, आणि कल्पकतेला चालना देणारी ही कला. एका निवांत दिवशी, वाफाळता चहा आणि बेकरीतले गरमागरम पॅटिस खाऊन डेकोपेज दिवस होऊन जाऊ द्या.
.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2017 - 7:07 pm | प्रीत-मोहर

लवली!! तु आणि तुझ्या मैत्रिणी भारीच कलाकार आहात ग. नोट करून ठेवतेय एकेक ;)

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 11:54 am | सविता००१

पायरोग्राफी ही तुझ्यामुळेच कळली होती आणि आता हे. भन्नाटच. आता मी पण करते काहीतरी यात. नक्कीच. खूप आवडलं हे.

उल्का's picture

10 Mar 2017 - 11:22 am | उल्का

सुंदर कला!

पैसा's picture

10 Mar 2017 - 11:35 am | पैसा

मस्त आहे हे!

पद्मावति's picture

10 Mar 2017 - 12:15 pm | पद्मावति

वाह मस्त!!!

इडली डोसा's picture

10 Mar 2017 - 12:15 pm | इडली डोसा

मी घरच्या घरी करुन बघणार नक्की

रुपी's picture

13 Apr 2017 - 3:04 am | रुपी

मस्त!
खरंच, तू आणि तुझ्या मैत्रिणीही ग्रेट आहेत.

फार छान समजावलं आहे, करुन बघेन. समजा मला एखाद्या वस्तूवर थोड्याच भागावर एखादे चित्र लावायचे असेल तर तसे करता येईल का?

मूनशाईन's picture

17 Apr 2017 - 9:03 am | मूनशाईन

होय लावता येईल. आधी वस्तू वाटल्यास रंगवून घे आणि वर चित्र लावता येईल. कधी कधी एखाद्या वस्तूचे पॉलिश निघते किंवा डाग पडतो. त्या ठिकाणी किंवा पूर्ण वस्तूवर डेकोपेज करून लूक बदलता येतो.

रुपी's picture

18 Apr 2017 - 5:35 am | रुपी

अच्छा. धन्यवाद. :)