साथ

Primary tabs

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in लेखमाला
8 Mar 2017 - 6:32 am

.

आज सकाळपासूनच मधुराची खूप धावपळ चालली होती. कसेबसे घरचे सगळे काम आटपून ती ऑफिसला निघाली. आज पटवर्धन फूड कंपनीबरोबर तिची महत्त्वाची मीटिंग होती. काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मधुरा तशी खूपच साधी, सरळ, अत्यंत हुशार, शिस्तबद्ध, स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी होती. एम.बी.ए. करून ती सामंत ब्रदर्समध्ये मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर अनेक वर्षे काम करत होती. अतिशय मेहनती आणि कर्तबगार अशी ही मधुरा लगबगीने ऑफिसला पोहोचली, तोच ऑफिसच्या मुख्य दरवाज़ात तिला एक चेहरा ओळखीचा दिसला. खातरी करण्यासाठी ती पुढे सरसावली, पण तितक्यात तिला सौ. बेंद्रे भेटल्या आणि मग बोलता बोलता ती त्यांच्यासोबत आपल्या केबिनमध्ये निघून गेली. तिची खूपच घाई सुरू होती. एकीकडे मीटिंगचा अजेंडा वाचत होती, तर दुसरीकडे पटापट सगळे प्रॉजेक्ट डीटेल्स गोळा करत होती. ऑफिसच्या प्यूनला बोलावून कॉन्फरन्स रूममध्ये पाण्याच्या बाटल्या, ग्लासेस नीट ठेवल्याचे विचारले. कॉफी आणि काही फिंगर फूडची ऑर्डर सांगून ती कॉन्फरन्स रूममध्ये गेली. थोड्या वेळातच पटवर्धन फूड कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर आणि काही क्लायंट्स आले. मिटिंगला सुरुवात झाली, बरीच सखोल चर्चा झाल्यावर पटवर्धन कंपनीच्या मॅनेजरने काही मसाल्यांचे सँपल्स घेऊन एका माणसाला आत बोलावले. त्याने ती सर्व सँपल्स मधुराला दिली. ते घेण्यासाठी मधुराने वर बघितले तर... तो चेहरा.... तो बघताच मधुराच्या पायाखालची जमीन सरकली. हाच तो चेहरा, जो मघाशी आपण ओझरता बघितला होता. एका क्षणात सर्व आठवणी ताज्या झाल्या, सर्व ज़खमा ओल्या झाल्या. तिला दरदरून घाम फुटला. काय करावे काहीच सुचत नव्हते. डोळ्यांसमोर अंधार येत होता. तिथे टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास तिने उचलला व पाणी पिऊन थोडे शांत राहण्याचा प्रयत्न केला. कशीबशी तिने मीटिंग आटोपती घेतली आणि ती आपल्या केबिनमध्ये निघून गेली. संपूर्ण दिवस ऑफिसच्या कामात तिचे लक्ष लागलेच नाही. आख्खा दिवस बेचैनी जाणवत होती. मनात विचारांचे काहूर माजले होते. घरी आली, तेव्हा ती मानसिकदृष्ट्या पार थकून गेली होती. डोक्यात असंख्य प्रश्न होते, पण मन मोकळे करायला कोणीच नव्हते. घरी आली तोच अनघा धावत आली आणि म्हणाली, "आई, तू चहा घेणार ना?? मी बनवतेय..." मधुराने फक्त "हम्म" केले आणि फ्रेश होण्याकरता आत निघून गेली. चहा पिऊन जरा तरतरी आली, पण विचारांनी तिला घेरले होते. इकडे अनघा तिच्या कॉलेजमध्ये घडलेल्या घटना सांगत होती, पण मधुराच कशातचे लक्ष नव्हते.. बस्स! सारखा हाच विचार की तो आज आपल्याला एकोणीस वर्षांनंतर दिसला, तेही अशा अवस्थेत.... काहीच समजत नव्हते.....उमजत नव्हते.

*****************************************************************************

मानस धर्माधिकारी!! एक उंचापुरा, तडफदार, ध्येयवेडा, हसरा, देखणा तरुण. मानस आणि मधुरा दोघेही एकाच कंपनीमध्ये नोकरी करत. अगदी हसत खेळत काम करायचे. त्यातून मैत्री झाली, आणि मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात. तरुण रक्त, काहीतरी करायची धमक, प्रबळ इच्छा, नावलौकिक कमावणे असे दोघांनाही वाटे. दोघेही अगदी करिअरिस्ट आणि तेवढेच मानी. लग्न झाल्यावरही दोघे सुखाने नांदत होते. नव्याची नवलाई संपली, पण प्रेम मात्र अतोनात होते एकमेकांवर. लग्नानंतर थोड्याच महिन्यांनी अनघाने कंपनी बदलली आणि चा॑गल्या, भरगच्च पगाराची, चांगल्या हुद्द्याची नोकरी पत्करली. त्यातच मधुराला दिवस गेले होते. घरातील वातावरण अगदी आनंदी होते. मानस मधुराची खूप काळजी घ्यायचा. तिला काय हवे-नको ते बघायचा. दोघांचे मस्त चालले होते. अचानक एके दिवशी मानसच्या कंपनीमध्ये एक मोठे फ्रॉड झाले आणि मानसवर त्याचे सगळे बालंट आले. त्यामुळे त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले. हा अपमान मानस सहन करू शकला नाही. केस करेन, मानहानीचा दावा ठोकेन असे बॉसला सांगून दिमाखात निघाला होता. मधुराची अवघडलेली परिस्थिती आणि मानसचे मानसिक टेन्शन यामुळे घरात नाही म्हटले तरी तणाव वाढतच होता. मानसची मन:स्थिती जाणून मधुरा त्याला खूप सांभाळून घेई. त्याला लागेल ती मदत ती करत असे. बिचारी मधुरा पाच महिन्यांचा गर्भ घेऊन मानसची केस कोणीतरी लढावी म्हणून अथक प्रयत्न करत होती. दोन-तीन वकिलांशी बोलत होती, त्यांचे मार्गदर्शन घेत होती, त्यांच्या कचेर्‍यांमध्ये खेपा घालत होती आणि इकडे मानसचा आत्मविश्वास दिवसेंदिवस ढासळत होता. त्याच्या स्वाभिमान दुखावला गेला होता. कुठेतरी ठसठसत होते त्याला. सतत टेन्शनमध्ये असल्यामुळे चेहराही ओढल्यासारखा दिसत होता. सुरुवातीला मी बघेन, मला कशाला कुणाची मदत लागतेय, माझा मी समर्थ आहे या अ‍ॅटिट्यूडपायी तो आणखीनच कमकुवत होऊ लागला, खचू लागला. आपल्याला काही करता येत नाहीये, प्रयत्न कमी पडताहेत या तणावाखाली त्याने दारूचे व्यसन स्वत:ला लावून घेतले. उठता-बसता तो आता नशेचा आधार घेत होता, संपूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता.

या व्यसनामुळे त्या दोघांमध्ये सकाळ-संध्याकाळ वाद होऊ लागले. मधुराची नोकरी, तिचा पगार, तिच्या पगारामुळे चालणारे घर हे सर्व मानसला खटकू लागले, त्यामुळे तो अधिकच दारू पिऊ लागला. तुच्या पैशांवर तो कसा अवलंबून नाही हे सतत टोमणे मारून, वाद उकरून तिला ऐकवत असे. मधुरा जमेल तसे, जमेल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करत असे. पण तिला त्याचे हे पिणे अजिबात पसंत नव्हते आणि म्हणूनच कित्येक दिवस तिने त्याच्याशी अबोलाही धरला होता. असेच एके दिवशी दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला आणि मानस भावनेच्या भरात मागचा-पुढचा विचार न करता घर सोडून, मधुराला सोडून निघून गेला. मधुराने त्याला खूप शोधायचा प्रयत्न केला. पण तिची परिस्थिती तिला साथ देत नव्हती. तिला सासरहून काही विशेष आधार मिळाला नव्हता. तसा तिला आधार नको होता, हवी होती ती मदत, आपल्या नवर्‍याला शोधण्यासाठी. पण तीसुद्धा म्हणावी तितकी नाही मिळाली. माहेरी परतणारी ती नव्हती, म्हणूनच तिने अनघाचा जन्म झाल्यानंतर मुंबई सोडून पुण्याला राहण्याचा निर्णय घेतला.

तिथेही तिने खूप शोधले मानसला, पण तिला यश आले नाही. ज्या माणसाने आपल्या पत्नीची, होणार्‍या बाळाची पर्वा केली नाही, जी स्वप्न त्या दोघांनी एकेकाळी एकत्र बघितली, ती पूर्ण तर सोडा, साधे तिला त्यासाठी साथही दिली नाही, सगळ्या जबाबदार्‍या झटकून, मनमानी करून घर सोडून निघून गेला. आपली पत्नी आपल्यासाठी धडपडतेय, न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतेय हे त्याला कधीच पचले नाही. साध्या गोष्टीचाही वेगळा अर्थ काढून वाद घालायचा मानस. अशा माणसाची तिला आता अधिक चीड येऊ लागली आणि तिने ठरवले की अनघा आणि ती हेच तिचे विश्व. आता आणि त्यात दुसरा-तिसरा कोणीच असा नकोय. पुन्हा मागे वळून बघायचे नाही.

खूप काबाडकष्ट करून, रात्रंदिवस एक करून मधुराने अनघासाठी खूप केले. तिला कधीच वडिलांची उणीव भासू दिली नाही. अनघा जवळ असल्यामुळे तिला फारसा एकटेपणा जाणवायचा नाही, पण कधी कधी मानसची आठवण यायची. शेवटी प्रेम केले होते तिने त्याच्यावर! मानसची आठवण आली की ती त्याचे विचार मनातून पुसून टाकायची. आज एकोणीस वर्षांनंतर मानस अचानक तिला ऑफिसमध्ये दिसला आणि तिला सर्व, मुद्दामहून विसरलेले आठवू लागले. मानससारखा हुशार माणूस दारूच्या आहारी गेल्यावर माणसाचे आयुष्य कसे मातीमोल होते, हे तिला दिसत होते. कोणे एके काळी मॅनेजर म्हणून रुबाबात असणारा मानस आज एक सेल्समन म्हणून काम करत आहे.... नाही, ही नोकरी खालच्या दर्जाची नव्हे, पण मानसचे एकूणच रूप बघता डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. खंगलेले शरीर, खप्पड झालेली गालफडे, डोळे तांबरलेले आणि मान खाली घालून उभे राहणे. अत्यंत दयनीय परिस्थिती कशी होऊ शकते कोणाची..? पण म्हणतात ना, केलेल्या कर्माची फळे.

*****************************************************************************

मधुरा आज सकाळी ऑफिसला आली, तेव्हा मानस समोरच उभा होता. ती येताच त्याने तिची माफी मागण्याचा प्रयत्न केला, खूप विनवण्या केल्या, पण मधुराला काही एक ऐकून घ्यायचे नव्हते. कुठल्याच प्रकारचे संभाषण तिला होऊ द्यायचे नव्हते. एकतर ती जागाही योग्य नव्हती आणि मधुराची मानसिक तयारीही नव्हती.

घर सोडून गेल्यावर मानस मुंबई सोडून दिल्लीला गेला आणि तिकडे त्याच्या आयुष्याची खरी वाताहत झाली. नोकरीसाठी दारोदार खूप पायपीट केली, पण अपयशच पदरी पडले. दारूचे वाढते व्यसन त्याला काम करू देईना आणि जगण्यासाठी हात-पाय मारणे त्याला स्वस्थ बसू देईना. मिळेल ती कामे करून तो पोट भरत होता. अगदी रस्त्यावर आला होता. पाच-सहा वर्षांनी तो मुंबईत परतला, पण इथेही कुठल्याच नातेवाइकाने त्याला उभे केले नाही. एका हॉटेलमध्ये काउंटरवर काम करून दिवस काढत होता. काम कुठलेही असो, त्यात प्रामाणिकपणा होताच. कोण्या एका शेठने "पुण्यात माझ्या हॉटेलमध्ये काम करतोस का?" म्हणून विचारले आणि त्याची रवानगी पुण्याला झाली. तेव्हापासून तोही पुण्यातच राहत होता. हळूहळू त्याचे काम पाहून त्याच्या शेठने त्याला पटवर्धन फूड कंपनीमध्ये सेल्समन म्हणून कामाला लावून दिले. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी दारू हेच त्याचे जीवन झाले होते आणि त्यात काल मधुराला इतक्या वर्षांनी बघून आशेचा एक किरण दिसला. "मधुरा, मला माफ कर तरी कसे म्हणू? मी तुझा गुन्हेगार आहे, मला माहीत आहे.... माझी चूक अक्षम्य आहे. पण तू मोठ्या मनाची आहेस. मला जवळ कर. मी हरलो ह्या आयुष्याशी झगडताना. मी हरलो..... माझे स्वत:चे असे काहीच उरले नाही. सोन्यासारखी बायको असताना तिचा विचार केला नाही.... आपल्या होणार्‍या बाळाचा विचार केला नाही.. जेव्हा तुला माझी खरी गरज होती, तेव्हा स्वतःच्या स्वार्थापोटी मी निघून गेलो तुला सोडून. जबाबदारीतून हात वर केले आणि तुला सोडून निघून गेलो. मला माफ कर ....मला माफ.." मानस अगदी मधुरच्या पाया पडला, पण मधुरा मात्र आपल्या मनाशी, विचारांशी पक्की होती. माफ करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्या माणसाने तिची साथ अर्ध्यावर सोडली, तिच्या मुलीला बघितलेसुद्धा नाही, आज तो त्या मुलीवर हक्क मागतोय... आपले बाळ म्हणतोय.... त्याला आपल्या मुलीचे नावदेखील माहीत नाही, त्याला ती तिच्या आणि तिच्या मुलीच्या विश्वात कस येऊ देईल??

मधुराने त्याला खडसावून सांगितले, "माझा-तुझा काहीही संबंध उरला नाही. तुझ्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात घालते, इतकेच एका दोर्‍याचे नाते आहे, त्यात कुठलीही भावना, आदर नाही." ते मंगळसूत्र घालणे खरे तर तिला मान्य नव्हतेच, पण या कोत्या आणि बुरसटलेल्या विचारांचा समाज तिला एकटीला राहणे किती कठीण करत होता, हे तिचे तिला माहीत. ज्या वेळी अनघाला, त्या तान्हीला आईची गरज होती, तेव्हा मधुराला घराबाहेर पडावे लागले नोकरीनिमित्त. त्यातूनही ती वेळात वेळ काढून आपल्या मुलीबरोबर रमत असे. आणि बाप म्हणून मानसने काय केले?? इतक्या वर्षांत एकदाही वाटले नाही त्याला की आपली बायको, बाळ कुठे आहे हे बघावे, आणि आज आपण केलेल्या गुन्ह्याची सोयीस्करपणे माफी मागून काय साध्य करायचे होते मानसला??

"नाही, नाही" मधुर म्हणाली, "हे कदापि शक्य नाही. तू आता आमच्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाहीस. आणि का यावे? परत सोडून जायला??... काय चुकले होते मानस माझे?? पत्नीची जी काही कर्तव्ये होती, तीच पार पडत होते ना? घर चालवले, कारण तू दारूच्या आहारी गेला होतास. पण नाही, तिथे तुझा अहंकार दुखावला गेला. मी कधीही तुला ही जाणीव करून दिली नाही की मी श्रेष्ठ, माझा पगार जास्त, मी तूला पोसतेय वगैरे. जे काही करत होते, ते आपले घर वाचवण्यासाठी, संसार वाचवण्यासाठी... पण नाही. तू चुकीचा अर्थ काढून आम्हाला सोडून निघून गेलास आणि आता तुझे आमच्या आयुष्यात परत येणे शक्य नाही. तू इथून निघून जा. मला तुझे तोंडदेखील बघायची इच्छा नाही."

**************************************************************************

गेल्या कित्येक महिन्यांपासून तुला गलितगात्र बघतेय. एकेका दिवसागणिक धीर खचत जातोय. थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांनी येऊन सांगितलेय - आता फक्त काही तास, फार तर एखाददिवस मोजा. मधुराचा धीर खचत चालला होता. पाय गळून गेले होते आणि डोक्याला मुंग्या आल्या होत्या. आयुष्यात आपल्याला असे काही अनुभवायला मिळेल असे वाटलेदेखील नव्हते. आजपर्यंत प्रत्येक अडथळे आले, त्यांना धीटपणे सामोरी गेली होती मधुरा. पण हे सत्य झेलण्याची मानसिक तयारी अजिबात नव्हती. दारूच्या आहारी गेल्यामुळे मानसचे लिव्हर जवळपास निकामी झाले होते, किडनीही फेल झाली होती. त्याची तब्येत ढासळली होती. उंचापुरा मानस आता अगदी पोखरलेला दिसत होता. खंगून शरीराची अवस्था सांगाड्याप्रमाणे झाली होती. गेला दीड महिना मधुरा रोज हॉस्पिटलला येत असे मानसची तब्येत कशी आहे हे बघण्यासाठी, त्याच्यावर औषोधोपचार नीट होताहेत ना, त्याची सेवा करण्यासाठी. ह्याचा अर्थ तिने त्याला माफ केले असे नाही, पण एक पत्नीधर्म म्हणून, कधीतरी एका बंधनात बांधलो गेल्यामुळे, एक माणुसकी म्हणून. तो आजपर्यंत तिच्याशी वाईट वागत आला होता, पण म्हणून त्याचे असे काही व्हावे असे तिला कधीच वाटले नाही.

त्याच्या शेवटच्या क्षणी तिला त्याची साथ द्यायची होती, जरी आयुष्यभर त्याने दिली नाही.... म्हणून एक पत्नी म्हणून, आई म्हणून तिला त्याच्या ह्या प्रवासात त्याला आधार द्यावासा वाटत होता. त्याच्या वेदना तिला जाणवत नव्हत्या, पण त्यातली आर्तता मात्र ती समजू शकत होती. आज त्याला मृत्यूशी झुंजताना ती बघत होती, डोळे भरून बघत होती. आयुष्यात त्याचे नसणे ह्याचा अनुभव किंवा सवय तिला आता अंगवळणी पडली होती. पण आता त्याचे या जगात नसणे हे मात्र तिचे दुर्दैव. त्याच्या भावानाशून्य, निस्तेज नज़रेत ती बघत होती आणि मनोमन त्याच्याशी संवाद साधत होती... तुझ्या निरोपाची वेळ जवळ आली आहे, अश्रू जुमानत नाहीत आणि माझा जीव तुला वाचवण्यासाठी घुटमळतोय... पण आता फार उशीर झाला आहे. खूप काही बोलावेसे वाटते. मानस, खूप प्रेम होते तुझ्यावर, आहेही.... पण तू त्या भावना कधीच समजू शकला नाहीस. मैत्रीण, पत्नी म्हणून मी तुझ्यासाठी वाट्टेल ते करत होते, तू सुखात राहावा म्हणून, पण तू ते कधीच समजू शकला नाहीस. एकच इच्छा की ह्या शेवटच्या प्रवासात तुला कुठलाच त्रास न होवो. माझे दु:ख आता मला कुरवाळत बसायचे नाही, कारण जगण्याची उमेद नव्हती, तेव्हा जगले मी; कारण आपल्या पदरात एक बाळ होते आणि आज त्या बाळासाठी.. अनघासाठी मला जगावे लागेल. तुला माफही केले असते, पण आता ते शक्य नाही. एकोणीस वर्षांचा काळ हा खूप मोठा असतो, म्हणून याक्षणी मी तुझी साथ नाही सोडणार. ह्याच अनंताच्या पाऊलवाटेवर कधीतरी तुझ्या सोबतीला येणारी तुझी न होऊ शकलेली पत्नी....

अश्रू वाहतच होते, मन कासावीस झाले होते... एक उष्ण, मऊ स्पर्श मधुराला जाणवला. तिने मागे वळून बघितले, तर अनघा! अनघा तिला धीर देत म्हणाली, "आई, बाबा कोण, कसे होते / असतात ह्याची तू मला कधीच जाणीव होऊन दिली नाहीस. माझ्यासाठी आईही तूच आणि बाबाही. माझ्यासाठी तू जे काही केलेस, ते कदाचित बाबांनीही केले नसते. मला तुझा अभिमान आहे, एक स्त्री असण्याचा अभिमान आहे. तुझ्या ह्या कठीण परिस्थितीत मी तुझ्यासोबत आहे. तुला नक्की साथ देईन."

मधुराला हुंदका आवरला गेला नाही आणि ती अनघाच्या कुशीत लहान मुलाप्रमाणे आवेगाने रडू लागली. तिच्या मनात साचलेल्या अनेक आठवणींना तिने अश्रूंद्वारे वाट मोकळी करून दिली होती... तिची अनघा आता मोठी झाली होती!

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

9 Mar 2017 - 7:42 am | कविता१९७८

खुपच सुन्दर कथा

सुरेख जमलीय कथा. लेखनशैली खूप आवडली.

विनिता००२'s picture

9 Mar 2017 - 3:40 pm | विनिता००२

सुरेख !!

>> लग्नानंतर थोड्याच महिन्यांनी अनघाने कंपनी बदलली आणि चा॑गल्या, भरगच्च पगाराची, चांगल्या हुद्द्याची नोकरी >> इथे मधुरा हवेय का?

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 4:36 pm | प्रीत-मोहर

मस्त कथा सान!!

नूतन सावंत's picture

9 Mar 2017 - 4:45 pm | नूतन सावंत

सुरेख आहे कथा आणि कथेचा बाजही.

छान आहे कथा, मधुराचा कणखरपणा भावला .

स्नेहांकिता's picture

10 Mar 2017 - 12:07 pm | स्नेहांकिता

भावव्याकूळ कथा !
सानिका, कथालेखनाचा श्रीगणेशा मस्त !

पैसा's picture

10 Mar 2017 - 12:24 pm | पैसा

कथा आवडली. अनेकदा मुलगी आई होते..

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2017 - 12:48 pm | मराठी कथालेखक

कथा टिपीकल वाटली..पुरुषाला अहंकारी, व्यसनी आणि बेजबाबदार आणि स्त्रीला जबाबदार , मेहनती , स्वाभिमानी ई रंगवणं हा एक ट्रेंड झाला आहे असं वाटतं.

पण लेखनशैली चांगली आहे.

पण म्हणतात ना, केलेल्या कर्माची मुक्ताफळे.

, यात 'मुक्ताफळे' हा शब्द योग्य नाही असे वाटते.

पुढील लेखनास शुभेच्छा.

सविता००१'s picture

11 Mar 2017 - 12:44 pm | सविता००१

सानू, मस्त सुरुवात

रेवती's picture

13 Mar 2017 - 3:59 am | रेवती

कथा आवडली.

अजया's picture

14 Mar 2017 - 8:27 pm | अजया

छान आहे कथा.

इडली डोसा's picture

14 Mar 2017 - 10:46 pm | इडली डोसा

अजून कथा येऊ देत आता.

रुपी's picture

14 Apr 2017 - 5:16 am | रुपी

हेच म्हणते.

पियुशा's picture

15 Mar 2017 - 11:12 am | पियुशा

आवडली कथा पु.ले.शु. :)