मराठी दिवस २०२०

बदलते मातृविश्व

Primary tabs

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in लेखमाला
8 Mar 2017 - 6:51 am

.

ऑक्टोबर महिना नुकताच सुरू झाला होता. वातावरण गरम होतं. दुपारी झोप झाल्यावर निवांतपणे आपल्या बेडरूममध्ये एसी लावून शरयू पुस्तक वाचत बसली होती. कितीतरी वर्षांनी अशी शांततेत ती माहेरी आली होती. एरवी ऑफिस, सुट्ट्या, बाहेरच्या ट्रिप्स या सगळ्यात सतत येऊन-जाऊन असली, तरीही असा वेळ मिळाला नव्हता. तेवढ्यात आजीने हाक मारली, "शरू, ४ वाजले, चहा करू की मस्त लिंबू सरबत, की मग नारळ पाणी घेऊन येऊ खाली कोपऱ्यावर जाऊन?" शरयू नुसतीच हसली. आपली आजी आता पणजी होणार या एकाच गोष्टीने गुडघेदुखी वगैरे विसरून नातीसाठी काय करू नि काय नको अशा उत्साहात आहे, हे तिला रोज नव्याने जाणवायचं. शरयूने मग आजीला लिंबू सरबत करायला सांगितलं आणि एकीकडे ४ वर्षांपूर्वीचं सगळं तिला आठवू लागलं.

लग्नानंतर पहिल्या वर्षभरात जेव्हा जेव्हा ती माहेरी यायची, तेव्हा प्रत्येक वेळी आजीला वाटायचं की काहीतरी गोड बातमी असावी. तसं तर लग्न जमल्यापासूनच आणि लग्नानंतर लगेच अशा अनेक काकू-मावशी-आज्या-काका यांच्याकडून "नातवंड कधी?" या प्रश्नांची तिला सवय झाली होती. कधी ती काहीही उत्तर देऊन वेळ मारून न्यायची, तर कधी थोडं ठसक्यात "आमचं आम्ही बघू" म्हणून सांगायची. या आधीच्या पिढीत प्रत्येकाला सतत लग्न झालं की लगेच पाळणा हलला पाहिजे या विचारांचं तिला आणि परागला बरेचदा हसू यायचं, तर कधी कधी राग यायचा, चिडचिड व्हायची. मुलांबद्दल ते दोघंही लग्नापूर्वी बोलले होते आणि त्याचबरोबर त्यांची स्वप्न, करिअर, आर्थिक सेटलमेंट या सगळ्या गोष्टी एकेक पुढे जातील आणि एका जिवाची जबाबदारी घ्यायला आपण दोघे समर्थ असू, तेव्हा हा निर्णय घ्यायचा यावर त्यांचं एकमत होतं. शरयू स्वतंत्र विचारांची, नवीन काळातली मुलगी. एकदा मूल झालं की करिअरमध्ये काही दिवसांचा ब्रेक येणार हे अध्याहृत होतं. शिवाय तिला तिचे काही छंद होते - गिटार शिकायचं होतं, अभ्यासाच्या नादात जे जमलं नाही ते आता स्वतः कमवत असताना करावंसं वाटत होतं आणि तशी तिने सुरुवातसुद्धा केली होती.

परागलाही भटकायची आवड होती. हातात पैसा होता, उत्साह होता. कधी ते दोघंच, तर कधी स्वतंत्र, कधी मित्रांसोबत अशी त्यांची भटकंती सतत चालू असायची. शिवाय एकीकडे आणखी आर्थिक स्थैर्य हवं म्हणून पैसे कमवायचे, त्यासाठी रगडून काम करायची तयारी होती. आणि त्यामुळे मुलांची आवड असली तरीही त्यांना घाई नव्हती. शरयूच्या आजीला मात्र आपण जाण्यापूर्वी पतवंड बघायला मिळावं असं सतत वाटायचं. त्यात शरयूचं वाढणारं वय बघता तिला सतत काळजी वाटायची. शरयूचं आजीशी तसं गूळपीठ होतं. दोघींच्या विचारात कित्येक बाबतीत तफावत असली, तरीही नात्याची वीण घट्ट होती, त्यामुळे शरयूही आजीला बरेचदा शांततेत समजावून सांगायची. त्यांची यामागची सगळी विचारसरणी बघता आजीला कधी कौतुक वाटायचं की एवढ्या तरुण वयात ही समज आहे, तर कधीकधी 'कसं होणार या मुलांचं..?' असा काळजीयुक्त रागही यायचा. तिच्या बहिणीच्या नातीला शरयूएवढीच आणखी दोन मुलं आहेत हे आठवलं की मग तर अजूनच जास्त वाटायचं तिला. शेवटी तिच्या देवाकडे बघून "तू काय ते नीट करशीलच" असं म्हणून ती शांत व्हायची.

आजी सरबत घेऊन आली आणि तिची तंद्री दूर झाली. सरबताचा ग्लास देता देताच आजीने "खायला काय करू?"ची विचारणा केली. "खायला मीच बनवते काहीतरी, तोवर आईबाबासुद्धा येतील घरी. तू बस निवांत" असं शरयूने म्हटल्यावर आजीला काही ते पटलं नाही. पण "हालचाल हवी हे डॉक्टरांनी सांगितलंय" असं सांगून शरयूने आजीला गप्प केलं. तेवढ्यात फोन वाजला, म्हणून आजी फोनवर आणि शरयू खायला बनवण्यात गुंग झाली.

आईबाबा थोड्या वेळाने आले. तिच्या आईलाही आता बाळाचे वेध लागले होते. त्यात दिवसभर नोकरीमुळे शरयूसोबत राहता येत नाही याची सतत एक बोच होती. पण शरयूच आईला समजावयाची की मी आणि आजी मजेत असतो दिवसभर. शरयूने केलेला उपमा खाता खाता आई म्हणाली, "अगं, आज ऑफिसमधल्या तारे बाईंशी बोलत होते, तेव्हा आम्हाला ना बोलता बोलता एकदम आठवलं, तू ज्या दिवशी आम्हाला ही गोड बातमी दिलीस, तेव्हा अगदी खातरीने सांगितलं होतंस घरी टेस्ट करून, डॉक्टरांकडे न जातासुद्धा. अर्थात तू म्हणालेलीस की सगळं कन्फर्म होऊ देत म्हणून, पण तरीही प्रेग्नन्सीची टेस्ट घरीच होऊ शकते हे वेगळं वाटलं होतं. आता टीव्हीवर जाहिराती येतात या सगळ्याच्या. खरं तर त्यावरूनच विषय निघाला आमचा. आणि अगं, नंतरसुद्धा तू सांगायचीस की आज डॉक्टरांकडे हे दिसलं स्क्रीनवर, ते दिसलं तर सगळं नवलच वाटायचं. मग इंटरनेटवर काय काय बघून आम्हाला सांगायचीस की बाळ आता एवढं मोठं असेल, काय करत असेल वगैरे...... स्वप्नवत सगळं."

"आता प्रत्यक्ष बाळंतपणात आणखी काय नवीन अनुभव येतील, काय काय असेल अजून नवीन ते बघायचं आता". आजी हसत म्हणाली. ही अजूनही दिवसभर काहीतरी त्या लॅपटॉपवर, मोबाइलवर करत बसते, मलाही दाखवते एकेक गमती. काय त्या बाळांचे व्हिडिओ वगैरे, पण ते छान वाटतं हं बघायला. परवा त्या तिच्या एका मैत्रिणीचे फोटो पाहिले. नवरा तिच्या वाढलेल्या पोटावर हात ठेवून, बाळाचे बूट हातात घेऊन वगैरे, मलाच लाज वाटली आणि ही मस्त wow, लव्हली वगैरे म्हणत होती. यांचं सगळं वेगळंच असतं. परवा म्हणे डॉक्टरांनी सांगितलंय की बाळाला पाणी द्यायचं नाही अजिबात. आणि गरज पडली तर पावडरचं दूध द्यायचं. आणखीही असंच काय काय सांगत असते. हे आमच्या वेळी असलं काही नव्हतं आणि आमचीसुद्धा मुलं उत्तमच वाढली. काही त्रास म्हणून वेगळा झाला नाही...." आजीची आता कॅसेट चालू झाली. तेवढ्यात "अगं आजी, विज्ञान, तंत्रज्ञान पुढे गेलंय. सतत या सगळ्या गोष्टींवर रिसर्च करत आहेत, त्यातून मिळणारी माहिती इंटरनेटमुळे सगळीकडे उपलब्ध आहे, आणि डॉक्टरही तेच सांगत आहेत. शेवटी त्यांचं ऐकायला हवं" म्हणून शरयूने बोलायला सुरुवात केली.

'आता डॉक्टरांचं नाव लावूनच काही गोष्टी यांच्या पचनी पाडाव्या लागणार' असं मनातल्या मनात म्हणत ती पुढे म्हणाली, "तुम्हाला सांगू का, माझी एक मैत्रीण आहे ना ती रिया, ती कधीपासून अमेरिकेत आहे. तिला मुलगी झाली तेव्हा आम्ही काय काय गप्पा मारायचो, तेव्हा तीसुद्धा काय काय नवीन सांगायची. त्यातलं काही स्वप्नवत वाटायचं, तर काही अविश्वसनीय, शिवाय असं वाटायचं की केवढं आयुष्य बदलतं आहे हिचं, जळी-स्थळी हिला सतत काय काय सुचायचं बाळाचं आणि बाळ झाल्यावरसुद्धा मग ती जागरणं, तरीही सगळ्यात आनंदी राहणं हे सगळं बघून वाटायचं की आपलं असंच होईल का? जमेल का? पण आता प्रत्यक्ष अनुभवताना काही गोष्टी अगदी सोप्या वाटत आहेत, तर काही अगदीच कठीण. तिने तर तिकडे एकटीने, म्हणजे त्या दोघांनीच केलं सगळं. तिच्या आईला जायला उशीर झालेला त्यांच्या तब्येतीमुळे, पण जमवलं त्यांनी. आणखी एक मैत्रीण आहे, तिला सगळी तयारी स्वतः करावी लागली. आई-बाबा गेलेले तिचे, पण दुकानात जाणं, काय घ्यायचं काय नाही ते समजून घेणं, शिवाय गरज पडल्यास सांगायला कुणी नाही, त्यामुळे ते घर सांभाळायचे. पण बाकी घरात किराणा भरण्यापासून तर एकूण एक तयारी त्या दोघांनी आधीपासून केली होती. त्या मानाने मला मग सुख वाटतं इथे माहेरी आले ते. बाकी कशाची चिंता करावी लागत नाही. त्यामुळे तुम्ही सगळे सोबत असताना जमेल आम्हालासुद्धा. पण अर्थात तिकडे स्वच्छता खूप, डॉक्टरांकडून फसवणूक कमी, लोकांचे फुकटचे सल्लेसुद्धा कमी. त्यामुळे दोन्हीकडे फायदे-तोटे आहेतच."

शरयू पुढे म्हणाली, "तिकडे मुलगा की मुलगी हे आधीच माहीत करून घेता येतं, आणि सगळी तयारीसुद्धा आधीच करून ठेवावी लागते. शिवाय आईबाबांच्या व्हिसाचं काम आधी करावं लागतं. आपल्यापेक्षा तिकडे तयारी जास्त करावी लागते. पण नवऱ्याने १०० टक्के मदत करणं आणि सगळी मुलीच्या आईवडिलांवर जबाबदारी अशी मानसिकता नाही. प्रेग्नन्सी, बाळंतपण या सगळ्याबद्दल शिक्षण देणारे क्लासेस तिकडे असतात. शिवाय आपल्याकडच्यासारखी घरकामात मदत करणारी माणसं नाहीत तिकडे जास्त. त्यामुळे सगळा भार नवीन आईबाबांवर येतो. अगं आजी, एवढंच नाही, रिया ३ महिन्यांत परत जॉईनसुद्धा झाली होती नोकरीत. पण हल्ली ब्रेस्ट पंप्स मिळतात उत्तम, त्यामुळे ती दूध काढून ते घरी कुणीतरी द्यायचं बाळाला. त्याच्या पद्धती आहेत, ज्यामुळे ते होता फ्रीझ करता येतं. नोकरीवाल्या कित्येक जणींना त्याचा आधार आहे फार तिकडे. सतत संशोधन होत राहतं, त्यातून आता इंटरनेटमुळे सगळी माहिती मिळते त्याचाही फायदा होतो."

"हे सगळं जे तू म्हणतेस ना, ते चांगलं आहे गं, पण कधीकधी वाटतं की आपल्याकडची परिस्थिती काही बाबतीत किती वेगळी आहे. मला ना आधी वाटायचं की तुम्ही फार उशीर केलात वगैरे, पण अनेक जणांची खायची भ्रांत आणि मुलं होत राहतात, वाढत राहतात, काहीही माहिती नसते, त्याची काही जाणीवही नसते. शिवाय पैसे कमी, त्यामुळे प्रत्येक जण या सगळ्या सोयींचा उपयोग करून शकेलच असं नाही. गरीब लोकांचं नाही, अगदी मध्यमवर्गीय असले तरीही इतका सहज पैसा खर्च करणं सोपं नाही. इतर जबाबदाऱ्या असतात आणि अडकून जातात त्यात अनेक जण. काय करणार... हां, या तुझ्या अमेरिका पुराणावरून आठवलं की मागच्या वेळी फोनवर तुझी आत्या म्हणत होती, की आता तिचा प्रणव तिकडे अमेरिकेत आहे, त्यालाही मुलं होतील तेव्हा ती जाईल तिकडे, आणि तोपर्यंत काय काय नवीन येईल ते कुणास ठाऊक." आजी म्हणाली. "अगं आजी, चार महिन्यांपूर्वी लग्न झालंय त्याचं, तर लगेच आत्या निघालीसुद्धा बाळंतपणाला. तुम्हाला काय ती घाई, त्यांचं त्यांना ठरवू दे ना, मुलं किती आणि कधी हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असावा." आजी म्हणाली, "आम्हाला हसतेस खरी, पण तुझंही हेच होईल बघ या वयात. त्या बाळाच्या आगमनापुरवी एवढी तयारी करताय, काय काय सतत खरेदी करता, वाचता, त्याच्या पोटात असतानाच्या दिवसांबद्दल डायरीत लिहून ठेवता, मग प्रत्यक्ष आल्यावर काय काय कराल! तुमचंही तसंच होईल. काळ कितीही पुढे गेला, तरी जसं आईपण बदलत नाही, तसंच नातवंड-पतवंडाची आसही तशीच राहते." "बरं बाई" असं म्हणत शरयू उठली आणि जरा बाहेर चक्कर मारून येते म्हणून बाहेर पडली.

दिवसभर मग या अशा दोन पिढ्या - ज्यात ३०-४० वर्षांचं अंतर आहे आणि मग मधली आईबाबांची पिढी, यांच्यात 'आमच्या वेळी असं आणि आता असं' विषय चालूच राहायचे. खरं तर पराग आणि तिला दोघांनाही वाटायचं की बाळंतपण माहेरी करण्यापेक्षा आईबाबांनी, किंवा आई आणि आजीने त्यांच्याकडे जावं. पण परागला नेमकं काम भरपूर होतं, मग शरयूची काळजी नको म्हणून तो तयार झाला माहेरी पाठवायला. शिवाय आईलाही त्यामुळे तिची नोकरी सोयीची होती. त्या घरात रोजचं रुटीन लागलेलं होतं. अनेकदा तिला परागची आठवण आली, तरीही तीसुद्धा हा निवांतपणा मनसोक्त अनुभवत होती.

एक दिवस अशाच गप्पा चालू असताना शरयू म्हणाली, "आजी, आता सगळ्यांच्या दृष्टीने सोयीचं जावं म्हणून मी आले इथे, आणि मला एकदम मस्तही वाटतंय. पण एकूणच हे सगळं बाळंतपण प्रकरण माहेरच्या लोकांनीच करावं, या काय गं पद्धती? बरं ,पैसे खर्च करणार ते, कष्ट, जागरणं काढणार ते आणि मग नाव सासरच्या लोकांचं, प्रथा-पद्धती त्यांच्या, हे सर्व आणि अजूनही चालू आहे. सगळ्यांच्या सामोपचाराने हे व्हायला हवं. माहेरच हवं किंवा सासरच हवं असं प्रथांच्या नावाखाली लादायला नको. गरीब किंवा वयस्कर थकलेले असतील आई-बाबा मुलीचे, तर काय?" शरयू अगदी तावातावाने बोलत होती. पण तेवढ्याच शांतपणे आजी म्हणाली, "बघ, असा विचार कर - आता तुम्ही दोघेच राहता, तुमचं आयुष्य सतत कुणाशी तरी बांधील नाही, तुम्हाला हवं तेव्हा माहेरी येऊ शकता, फोनवर मन मोकळं करू शकता. पण आमच्या काळात असं नव्हतं. माहेरी जायचं यात अनेक कामांपासून सुटका, आईशी चार घटका निवांत गप्पा असं बरंच काय काय त्यासोबत मिळायचं आणि ते आवश्यक वाटायचं. बाळंतपणात सासूला कामं कशी सांगणार? त्यात संकोच वाटायचा. आधीच हळव्या झालेल्या मनाला आई जवळ असणं याचा आधार असायचा आणि अजूनही माझ्या मते, तुझं घर की आईचं घर ही गोष्ट वगळता तुला आई हवीच आहे सोबत. ते आईचं सोबत असणं नेमकं कुठल्या शब्दात सांगणार बयो?" शरयूने आजीकडे पाहिलं, मूकपणे संमती दिली.

शिवाय आणखी एक मुद्दाही आहे बाळा यात. आमच्या वेळी बऱ्याच ठिकाणी मुलगा होईपर्यंत बाळंतपणं चालूच राहायची. त्यात कुणाला काही विशेष वाटायचं नाही. मुलगा झाला, तरीसुद्धा नंतर ४-५ मुलंसुद्धा असायची. मग ही सगळी बाळंतपणं व्हायची सासरी. खरं तर रोजच्या आयुष्यात अधूनमधून मुलं होणार, असं आयुष्य होतं आधीच्या काळात. आता हे गर्भलिंग निदान आलं, लोकांना मुलींना गर्भात मारणं सोपं वाटू लागलं आणि डॉक्टरांना पैसा मिळू लागला, तरीही अर्थातच हल्ली मुलगा वंशाचा दिवा हे पूर्वीपेक्षा कमी आहे." आजी असं म्हणाल्यावर शरयू जरा तावातावाने म्हणाली, "अगं, अगदी असं नाही म्हणता येणार. माझ्या सुशिक्षित मैत्रिणीही आहेत मुलगाच हवा असा हट्ट धरणाऱ्या. आताच्या काळातल्या स्वतःला मॉडर्न समजणाऱ्या या मुली, शिवाय कित्येकांच्या सासरच्या लोकांचे वेगळे हट्ट, गरोदरपणापासून ते पुढे बाळांच्या संगोपनापर्यंत सगळीकडे अधिकार गाजवणारे लोक आहेत काहींच्या घरचे."

आजी म्हणाली, "अगदी मान्य आहे शरयू बाळा, पण काही जणी आता नवऱ्याशी बोलू शकतात याबाबत, आणि काहीतरी चुकतंय ही भावना हळूहळू जास्त रुजेल, काही जणी समंजसपणे तर काही जणी भांडून बंड करतील. पण आमच्या वेळी 'आम्ही आई बाबा आहोत, तर आम्ही म्हणू तसं मूल वाढेल' हेही हिमतीने घरात सांगायची मुभा नव्हती. मोठे म्हणतील तसं करायचं हे मनावर बिंबवलेलं होतं आणि त्यांना विरोध करणं सहजी शक्य नव्हतं.

आमच्या वेळी घरातच किती बायका असायच्या. मुलं कशी सांभाळली गेली हे कळलंसुद्धा नाही. शिवाय प्रत्येक बाबतीत सायन्स काय म्हणतं, डॉक्टर काय म्हणतात हे महत्त्वाचं वाटायचं नाही. घरात सासूबाई म्हणाल्या की अमुक द्या तर द्यायचं, एवढंच माहीत होतं. कित्येकदा तो सूचनांचा भडिमार नको वाटायचा, पण त्यातली काही माहिती पण नसायची, आणि मोठ्यांनी सांगितलेलं ऐकायचं हे डोक्यात पक्कं होतं. अजूनही त्रास आहेच, तो मान्य आहे मला, पण तरीही मला का कुणास ठाऊक वाटतं की काही प्रमाणात सुधारली आहे परिस्थिती."

शरयूला पूर्ण पटलं नसलं, तरीही काही मुद्द्यात तथ्य आहे आजीच्या, असं वाटलं खरं. ती म्हणाली, "आजी, खरं सांगू का? जेव्हा आता आपण मुलगा मुलगी समान म्हणतो, तेव्हा मुलगीच हवी असाही अट्टाहास नको. माझ्यासाठी माझं बाळ तब्येतीने उत्तम असणं महत्त्वाचं. शेवटी ते माझं बाळ आहे, त्याचा रंग, रूप या गोष्टींचा माझ्या त्याच्यावरच्या प्रेमाशी काही संबंध नको ना? पण आजही माझ्याच मैत्रिणी आहेत अशा. मुलगा झाला म्हणून बदललेले सासरचे लोक आहेत एका मैत्रिणीकडे आणि शिवाय आपण हे सगळं बोलतो हे एका ठरावीक लोकांपर्यंत मर्यादित आहे. खूप उच्चवर्गीय लोक आणि अगदीच गरीब यांच्याकडे आणखीनच वेगळे प्रकार आहेत. त्यांच्याकडे टीव्ही येण्याव्यतिरिक्त बाळंतपण, मुलांचं संगोपन यात काही फरकच पडत नाही असं वाटतं. त्रास होतो." "हेही खरंच. आपल्याच मावशीकडे तिच्या खेड्यात कसे अनेक पेशंट्स येतात, ते आपण ऐकतोच. कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी समजून घेणारे फार कमी आहेत." आई म्हणाली.

दुसऱ्या दिवशी शरयूला डॉक्टरांकडे जायचं होतं. पराग ऑफिसमधून लवकर निघून तिला घ्यायला येणार होता. जाताना हात धरून शरयूला पराग अगदी जपत घेऊन जातोय, हे आजी बघतच राहिली. नंतर आई-बाबा घरी आल्यावर "आमच्या वेळी हे असं कुणी चारचौघांसमोर त्यात आजीआजोबांसमोर तर शक्यच नव्हतं" हे बोलल्याशिवाय तिला काही राहवलं नाही. क्षणभर आजोबांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि "आज हे दोघे आले की दृष्ट काढायची आठवण दे गं मला" असं शरयूच्या आईला सांगत ती तिच्या आवडत्या मालिका बघायला गेली.

डॉक्टरांकडे जाऊन मग शरयू आणि पराग बाहेरच जेवायला जाणार होते. सगळं व्यवस्थित आहे हे त्यांनी फोन करून सांगितलं आणि सगळे निवांत झाले. रात्री घरी येताना दोघे बरंच काय काय घेऊन आले - बाळासाठी कपडे, वेगेवेगळी क्रीम्स, डायपर, खेळणी वगैरे घेऊन अगदी खुशीत दोघं घरात आले, पण ते सगळं बघून आजी जरा नाराज झाली. आजीचं म्हणणं की तुमचा उत्साह समजतो मला, पण आपण बाळ घरात येण्यापूर्वी काही नवीन खरेदी करत नाही. मग शरयू आणि पराग दोघेही आजीला समजावून सांगू लागले. आजीला फार काही पटलं नाही, पण आई मात्र त्यांच्या बाजूने होती. शरयूच्या वेळी तिलाही खूप हौस होती, त्यात ती स्वतःही विणकाम करायची. पण घरच्यांच्या आग्रहापायी तिने आधी काही केलं नाही. मग मुलांची जागरणं करताना जमेल तसं केलं. त्यामुळे तिला मनोमन छान वाटलं. मग तीच आजीला म्हणाली, "असं बघा आई, आता आधुनिक वैद्यकशास्त्राने किती सोयी दिल्या आहेत. पूर्वीच्या काही एकतर ५-६ बाळंतपणं नेहमीचीच. त्यात गरिबी जास्त, मूल दगावलं वगैरे तर... काय अशा अनेक कारणांनी आधीपासून तयारी करायची नाही, असं म्हणायचे. आता काळ बदलला आहे. बरंच सुरक्षित झालं आहे सगळं. भीती असतेच थोडी, ती तर काळ कितीही पुढे गेला तरी असेलच. पण आपल्या बाळाचा चेहराही हल्ली बऱ्यापैकी दिसतो म्हणे त्या सोनोग्राफीत. अगदी खूप तयारी नसली, तरीही ती दोघे आई-बाबा म्हणून पुढाकाराने करत आहेत सोबत, यातच सगळं आलं. हां, पण तुमचे ते मोबाईल वगैरे जरा लांब ठेवा बरं बाळापासून. ते एवढ्या लहान बाळासोबतचे फोटो काढताना थोडी काळजी घ्या."

"अहो आई, हल्ली मुलं जन्माला आली की लगेच त्यांचे ईमेल अकाउंट्स काढले जातात, आणि १८व्या वाढदिवशी मग त्यांना त्यांचे पासवर्ड देतात, त्यात मुलांच्या आठवणी लिहून त्यांना पाठवतात. मुलांच्या वाढदिवसाचं प्लॅनिंगसुद्धा जन्माआधीपासून करतात. शिवाय खास फोटोशूटसुद्धा करतात बाळ पोटात असताना. प्रत्येकाचे वैयक्तिक चॉईस असतात हे. आपल्याला जे पटतं तेवढं करायचं, जे पटत नाही ते सोडून द्यायचं." पराग म्हणाला. आई म्हणाली, "तुमचे ते बेबी अल्बम, प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायला खास वेगळी बेबी डायरी, कॅलेंडर, बाळ जन्माला आल्यापासून त्याच्या प्रत्येक हालचालीचे फोटो, व्हिडिओ हे सगळं किती छान आहे. आमची मुलं मोठी होताना आम्ही कधी कुठली पुस्तकं वाचली नाही की काही प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली नाही. पण तुम्हाला हे करायला मिळतंय तर जरूर करा. एका ठरावीक प्रमाणात या सगळ्याचा उपयोग करून घेतला तर मला हे वाईट वाटत नाही. तुम्ही मुली नोकरी आणि लहान मुलं सांभाळणं यासाठी कमी तडजोडी करता का? तुम्हालाही हे सगळं भावनिक पातळीवर कठीण जातं, पण करताच मुलांसाठी. आम्हीही केल्याच नोकऱ्या, पण आमच्या वेळी इतकं लांब नसायचं ऑफिस. शिवाय वेळाही तशा सोयीच्या आणि मर्यादित. घरात माणसं जास्त, त्यामुळे मुलांना सांभाळायला तेवढा प्रश्न यायचा नाही. आता कित्येक ठिकाणी शेजारीसुद्धा नसतात ओळखीचे, तरीही तुम्ही निभावून नेता हे दिवस. सुपरवूमन होऊन करता, आणि काही प्रमाणात नवऱ्यांची मदतही होते. स्वयंपाक उत्तम जमणारे आणि न लाजता स्वयंपाकघरात काम करणारे नवरे वाढत चाललेत. त्यामुळे जमेल तेवढं एन्जॉय करून घ्या. नंतर आयुष्यभर या आठवणी पुरतात आपल्याला. मी कितीतरी कपडे शिवले होते हाताने. अजूनही ठेवलेत त्यातले काही. नुसते हातात घेतले तर एवढे उबदार वाटतात." ऐकता ऐकता शरयूचे डोळे भरून आले. आपल्या आईचा, आजीचा जीव कशाकशात अडकला असतो असं ती नेहमी थट्टेवारी म्हणायची, त्यातलं गांभीर्य तिला एकदम मनापासून जाणवलं होतं. आपल्या बाळाच्या प्रत्येक वस्तूत तिचाही असाच जीव गुंतत चालला होता.

योगायोगाने शरयूच्या वेगवेगळ्या ग्रूप्समधल्या चार मैत्रिणीसुद्धा प्रेग्नेंट होत्या. प्रेग्नन्सीतले प्रॉब्लेम्स, सगळ्यांची डेव्हलपमेंट हे सगळं त्या whatsapp ग्रूपवर बोलायच्या, जेव्हा शरयू हे सगळे अपडेट्स आई-आजीला सांगायची, तेव्हा त्या दोघी कुतूहलाने ऐकायच्या. त्या सगळ्या जणींनी मिळून दवाखान्यात न्यायची तयारी करायची, नंतर बाळ आल्यावर काय काय करावं लागतं, कुणाचे डॉक्टर काय म्हणतात असे अनेक विषय त्यांच्यात रंगायचे आणि त्याप्रमाणे त्या तयारीही करत होत्या. त्यांच्यात सगळ्यात पहिली जिची डिलिव्हरी झाली, तिच्याकडून तर त्यांना सतत नवीन माहिती मिळायची. "अगं, ती बाळाकडे बघते की तुम्हाला अपडेट्स देते सारखी फक्त? आणि झोप कशी काढते, आराम कशी करते?" असे मग आईला आणि आजीला प्रश्न पडायचे. मग त्यांच्यातल्या अमेरिकेत राहणाऱ्या मैत्रिणीचं तिच्या मैत्रिणींनी डोहाळजेवण केलं, ज्याला केक आणला होता आणि शिवाय काहींनी त्यासाठी ऑनलाईन हजेरी लावली, हे ऐकून आई आठवणीत रमली. "माझ्या माहेरी आणि सासरी सगळीकडे अगदी जोरात उत्साहाने झालं होतं डोहाळजेवण. माझ्या एका मैत्रिणीला अजिबात आवडायचे नाहीत हे प्रकार, पण तिच्या सासरचे कधी एरवी कधी काही करायचे नाही, या निमित्ताने साडी वगैरे घेतील, तिच्यासाठी हौसेने कार्यक्रम ठरवत होते म्हणून तिनी होकार दिला होता. पण आजकाल फुगे, केक वगैरे आम्हाला थेरं वाटतात आणि ती फुलं काय, धनुष्यबाण काय.. कॉमेडी, असं तुम्हा मुलींना वाटतं." सगळी गंमतच आहे.

अशाच एक दिवस शेजारच्या काकू दुपारी येऊन गप्पा मारत होत्या. शरयूची तयारी बघून आणि त्याबद्दल ऐकून त्या म्हणाल्या, "एरवी अवखळ आणि एवढ्या करिअर करिअर करणाऱ्या तुम्ही मुली, पण किती मनापासून सगळं करत आहात. शिवाय आता बाळाच्या बाबाचा इतका जास्त सहभाग किती सुखावणारा आहे. फक्त कर्तव्य म्हणून नाही, तर मनापासून आणि हौसेने करतोय गं परागसुद्धा. माझी भाचीसुद्धा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ऑफिसमध्ये काम करत होती. कितीतरी दिवस तर स्वतः गाडी चालवत जायची, फोर व्हीलर चालवायला प्रॉब्लेम नाही असं डॉक्टरनेच सांगितलं आहे गं, असं सांगून आपल्या आईलाच धीर द्यायची. कौतुक वाटतं काही बाबतीत तुम्हा मुलींचं. पण अज्ञानात सुख म्हणतात ना, तसं आहे आमचं. आता तुम्हाला माहिती जास्त, शंका जास्त आणि मग काळजी जास्त." "काहो काकू, लाडू वगैरे खाईल ना ही, नाहीतर डाएट काढतील मध्ये." काकू आजीला म्हणाल्या. "असं काही करू नकोस हं शरयू, नीट खाऊन पिऊन राहा. नंतर नोकरी सुरू झाली की बाळाचं करायचं, घर सांभाळायचं, नोकरी करायची हे सगळं आहेच."

"तरी बरंय, आता गाड्या असतात जायला-यायला. मुंबईत लोकलने किती सहज प्रवास करतात बायका अगदी नवव्या महिन्यापर्यंत. माझी आजी सांगायची की बैलगाडीतून गावात नेतानाच ती बाळंत झाली होती. आता कळा येतानाचा त्राससुद्धा औषधांनी खूप कमी होतो. शिवाय आता डायपर आलेत, त्याने त्रास वाचेल तुमचा. आधी बाळंतिणीची खोली वेगळी, आता तसंही अनेक घरात लहानपणापासून वेगळ्या खोल्या असतात. आणि घरात येणारे-जाणारेही कमी. आणि आता घरात बाथरूम असतात, सारखं सारखं बाहेर जायचा त्रास नाही. त्या बाळांच्या दुकानात गेलं की मला अजूनही, मुलं मोठी झाली तरी नुसती खरेदी करावी वाटते. सगळं किती गोड असतं. कधीकधी ना, थोडा हेवासुद्धा वाटतो तुमचा, की हे सगळं अत्याधुनिक अनुभवायला मिळतं आहे. पण चांगलं आहे. आता आणखी दहा वर्षांनी काय परिस्थिती असेल ते दिसेलच."

आपण खरंच नशीबवान आहोत की आपल्याला काही गोष्टी सहज मिळत आहेत हे शरयूला जाणवत होतं. पण त्याच वेळी तिला वाटलं, 'हे सगळं असलं आणि मी उत्साहाने तयारी करत असले, तरी टेन्शन आहेच. बाळ कसं असेल, हे खाल्लं तर चालेल का, त्याने त्रास होईल का, लवकर डिलिव्हरी झाली तर काय, नोकरी करायला जमेल का... असं सारखं वाटत राहतंच. कितीतरी माहिती वाचली, व्हिडिओ पाहिले, पुस्तकं वाचली, पण आई म्हणून चिंता आहेच. रात्रीसुद्धा कधी झोप आली नाही, तर मग विचार चालू राहतात' शरयू तिच्या विचारात गुंग झाली. 'आपण लाख तयारी करू, ऐन वेळी काही ना काही राहतंच आणि बाळांना नेमकं तेच लागतं, आपण ज्याचा विचार केलेला नसतो तेच होतं. मज्जा असते सगळी' असं तिच्या मैत्रिणीने तिला म्हटल्याचं तिला आठवलं. आजी आणि काकूंच्या गप्पा एकीकडे चालू होत्या.

पुढच्या २-३ दिवसात हळूहळू शरयूला जाणवायला लागलं की आता लवकरच डिलिव्हरी होईल. डॉक्टरांकडे त्यांनी सगळं व्यवस्थित आहे, पण येत्या आठवड्यात सतत चेक करत राहू असं सांगितलं आणि शरयूचं घर अजूनच उत्साहात आलं. रोज रात्री झोपताना आता उद्या काय असं सगळ्यांना वाटायचं. एक दिवस दुपारी शरयूला जास्त त्रास होऊ लागला, लगेच पराग आला आणि दवाखान्यात गेले. शरयूच्या मनात असंख्य विचार होते आणि एकीकडे वेदना सहन होत नव्हत्या. काय होईल, कसं होईल, सगळं नीट होईल ना, असे प्रश्न आणि बाळाचं आगमन झाल्यावर नेमकं काय वाटेल याची उत्सुकता, आनंद सगळ्या भावना दाटून येत होत्या. घरातले सगळेच तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. सगळं पार पडून त्यांची लेक जेव्हा शरयूच्या हातात आली, तेव्हा तिच्या आणि परागच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

शरयू आणि पराग, आणि त्यांची लेक यांच्याकडे बघून आई, बाबा, आजी समाधानी दिसत होते. त्यांचे विलक्षण आनंदी चेहरे, परागचं सतत दिमतीला असणं आणि खूप काळजी घेणं हे सगळं तेवढ्याच समाधानाने शरयू बघत होती. त्या सगळ्यापुढे आणि बाळाचा चेहरा बघून बाकी कुठलाही त्रास तिला कमी वाटत होता. आजीच्या मांडीवर झोपलेल्या बाळाकडे बघून शरयू प्रेग्नन्सी टेस्टपासून ते आजपर्यंत सगळा प्रवास आठवत होती. तिला आधीही अनेक वेळा या जुन्या पिढीतल्या बायकांचं कौतुक वाटायचं. एवढ्या मुलांना यांनी कसं वाढवलं, तेही कितीतरी कष्ट सोसून आणि अगदी बेताच्या परिस्थितीत, हे विशेष वाटायचं. पण आता हे सगळं अनुभवल्यानंतर तर तिला ते जास्तच जाणवत होतं. अद्ययावत सुखसोयी असणाऱ्या दवाखान्यात तिच्या दिमतीला सगळे हजर होते. तरीही असं कर, हेच खा, ते खाऊ नकोस यासारख्या सूचना तिला नको वाटत होत्या. मन एवढं सैरभैर का झालंय, मध्येच वाटणारा अतीव आनंद, समाधान आणि मध्येच होणारा त्रास, भेटायला येणाऱ्यांची गर्दी, न झालेली झोप या सगळ्यातून होणारी चिडचिड हे सगळं तिला अजून थकवणारं होतं. त्या इवल्याशा बाळाला जवळ घेताना वाटलेली काळजी, गेल्या २ दिवसात त्याला समजून घेताना, झोपवताना पडलेले अनेक प्रश्न बघता आता यापुढे आपल्यासाठी हे खरं आव्हान असेल हे तिला जाणवत होतं. एरवी उशिरापर्यंत लोळणारी ती, बाळाच्या रडण्याचा आवाज येताक्षणी जागी होते आहे याचं तिलासुद्धा आशचर्य वाटत होतं. आजवर वाचलेलं, पाहिलेलं सगळं आणि आता प्रत्यक्षात बाळाला सांभाळणं यात बराच फरक आहे हेही कळत होतं.

तिच्यात आणि आई, आजीत झालेल्या या वर्षानुवर्षांच्या बदलाबद्दलच्या चर्चा, गप्पा, वाद सगळं आठवत होतं. शरयूच्या मनात अनेक विचार येत होते - प्रत्येक पिढीत जसे शिक्षण, नोकऱ्या, आर्थिक स्तर, सामाजिक स्तर यात बदल होत जातात, तसेच गरोदरपण आणि बाळंतपण यातही होणारच. काही बाबतीत या जुन्या बायकांचा हेवा वाटतो, तर काही बाबतीत राग येतो, चिडचिड होते. कालानुरूप अनेक गोष्टी बदलतील अशा, पण बाळाचा चेहरा बघताना मला जे वाटलं, तेच आईला वाटलं असेल आणि तेच आजीला. शब्दात व्यक्त न होणाऱ्या या भावना, जगाच्या पाठीवर कुठेही अशाच असतील.' "आई झाल्यावर कळेल तुला" असं तिची आई जे म्हणायची, ते तिला आता कळत होतं. खरं तर ही आता सुरुवात होती. हळूहळू बाळ मोठं होऊन मग रांगेल, आपल्या पायांवर उभं राहून चालायला लागेल, तिचे वाढदिवस येतील, मग शाळेत जाईल आणि मोठी होईल, प्रत्येक वेळी नवे अनुभव येत राहतील. आपण दोघांनी मिळून जी स्वप्नं बघितली, त्या सगळ्यात आता या बाळाची सोबत असेल हे सगळं सुखावणारं होतं. आता या आईपणाच्या जॉबपासून सुटका नाही हे कळत होतं. आणि बाळाचं हसणं, मग त्याची एकेक प्रगती हे सगळं बघताना होणारा आनंदही तेवढाच खरा. तो कुठल्याच पिढीत कधीच बदलणार नाही' अशा विचारांच्या तंद्रीत बाळाकडे बघून आनंदाने तिचे डोळे भरून येत होते आणि बाळाचा चेहरा आठवत, लेकीसोबतच्या स्वप्नात ती रममाण झाली होती. वर्षानुवर्षात बदललेलं मातृविश्वही तेवढंच अचल, अबाधित राहिलेलं आईपणाचं भावनिक विश्व हे सगळं तिला अद्भुत वाटत होतं. लेकीच्या जन्माने बदललेलं त्या दोघांचं विश्व अनुभवण्याचा नवीन प्रवास चालू झाला होता.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

स्मिता श्रीपाद's picture

8 Mar 2017 - 6:53 pm | स्मिता श्रीपाद

सुन्दर लिहिलय
बर्याच गोष्टी रीलेट करता आल्या :-)

रुपी's picture

15 Apr 2017 - 12:44 am | रुपी

+१

स्नेहांकिता's picture

9 Mar 2017 - 1:29 pm | स्नेहांकिता

छान विचार !

पद्मावति's picture

9 Mar 2017 - 2:15 pm | पद्मावति

सुन्दर लिहिलेय.

वेल्लाभट's picture

9 Mar 2017 - 2:24 pm | वेल्लाभट

सुरेख लिहिलंय

विनिता००२'s picture

9 Mar 2017 - 3:18 pm | विनिता००२

मस्त लिहिलेय :)
पिढीनुसार फरक पडणार हे नक्की !!

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 4:32 pm | प्रीत-मोहर

सुंदरच झालय लिखाण

स्नेहानिकेत's picture

9 Mar 2017 - 11:21 pm | स्नेहानिकेत

सुंदर लेख!!!!

सविता००१'s picture

10 Mar 2017 - 3:18 am | सविता००१

खूप छान लेख आहे ग !!! आवडला.

मनिमौ's picture

10 Mar 2017 - 1:24 pm | मनिमौ

मस्त

अजया's picture

10 Mar 2017 - 4:18 pm | अजया

लेख आवडला.

उत्तरा's picture

10 Mar 2017 - 4:29 pm | उत्तरा

सुंदर लेख..

पैसा's picture

10 Mar 2017 - 4:45 pm | पैसा

कथा-गप्पा या फॉर्मॅटमधे लिहायची कल्पना आवडली.

पूर्वाविवेक's picture

11 Mar 2017 - 12:44 pm | पूर्वाविवेक

मस्तच! गरोदरपण आणि बाळंतपण याबाबतीतले सगळे बदल तू अगदी कल्पकतेने कथेत गुंफले आहेस, त्यामुळे वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. खरतर मला तर असं वाटतंय की हि कथेपेक्षा पटकथा बनली आहे. यावर एखादी शॉर्टफिल्म सुद्धा बनवता येईल.

आता तुम्ही दोघेच राहता, तुमचं आयुष्य सतत कुणाशी तरी बांधील नाही, तुम्हाला हवं तेव्हा माहेरी येऊ शकता, फोनवर मन मोकळं करू शकता. पण आमच्या काळात असं नव्हतं. माहेरी जायचं यात अनेक कामांपासून सुटका, आईशी चार घटका निवांत गप्पा असं बरंच काय काय त्यासोबत मिळायचं आणि ते आवश्यक वाटायचं. बाळंतपणात सासूला कामं कशी सांगणार? त्यात संकोच वाटायचा. आधीच हळव्या झालेल्या मनाला आई जवळ असणं याचा आधार असायचा आणि अजूनही माझ्या मते, तुझं घर की आईचं घर ही गोष्ट वगळता तुला आई हवीच आहे सोबत. ते आईचं सोबत असणं नेमकं कुठल्या शब्दात सांगणार बयो?

कितीही काळ बदलला तरीही हे असंच राहणार आहे.

मंजूताई's picture

11 Mar 2017 - 1:31 pm | मंजूताई

कथा/गप्पा!

समजुतदारपणे समतोल साधणारी विषयाची मांडणी फार आवडली.

रेवती's picture

12 Mar 2017 - 11:32 pm | रेवती

लेखन आवडलं.

इडली डोसा's picture

14 Mar 2017 - 1:55 am | इडली डोसा

पिढीनुसार होत जाणारे विचार आणि सोयींमधले फरक छान टिपले आहेस.