जिता असल्याचा दाखला
लय जुनी नाही, आता आताचीच गोष्ट हाय, २०४७ सालातली. देशाले स्वातंत्र भेटून शंभर वर्षे झाले. या शंभर वर्षात जमाना बदलला. आजकाल जेथ तेथ अंगूठा लावा लागते. बँकेतून पैसे काढाचे हाय - लावा अंगूठा, मत टाकाच हाय - लावा अंगूठा, कंट्रोलच सामान उचलाच हाय - लावा अंगूठा. मोठाला साहेब असू द्या नाहीतर गावातला पोट्टाबाट्टा असू द्या, अंगूठा लावण्यापासून कोणी सुटला नाही. बंदे अंगूठाछाप झालेत. माणसाहून अंगूठ्याचच महत्त्व वाढलं, म्हणूनच तर अंगूठ्याले लय जपा लागते. जमानाच तसा खराब हाय. रस्त्यान जाता जाता कोण कोठ कसा अंगूठा लावून घेइन सांगता येत नाही. शाम्याबी अंगूठ्याले लइ जपत होता. बारावी पास होतवरी अंगूठा तोंडातच ठेवत होता. मंग त्यान अंगूठ्याले मोजा शिवून घेतला. ते चांगल दिसत नव्हतं, म्हणून मंग त्यान पँटाले अंगूठ्याच्या मापाचा चोर खिसा शिवला. कोठबी जाच असल का अंगूठा चोरखिशात ठेवून जातो. पण शाम्याचा उलटाच घोटाळा झाला, अंगूठा हाय पण माणूस मेला. म्हणजे कस बँकेच कारड हाय पण बँकच बंद पडली. आता आली का नाही पंचाइत!
इलेक्सनची लाइन लागली होती, अंगूठे आले तरी लाइन तर रायतेच. शाम्या आन त्याची बायको शेवंता दोघबी लाइनमंधी आपला नंबर याची वाट पाहात होते. शाम्याचा नंबर आला त्यान अंगूठा लावला. तेथ बसलेल्या पोरान मंग कांपुटरमंधी पाहून सांगतलं,
"तुमचे नाव नाही लीस्टमधे. तुमच वोटींग येथच हाय ना?”
"आजंतीवाले बंदे येथच रायतेन गा.”
"पण तुमच नाव नाही.”
"शेवंतीच पाहा बर" शेवतीन अंगूठा लावला, लीस्टमंधी तिच नाव होत.
"बाप्पा! हीच नाव हाय आन माय नाही, असकसं गा? येकाच घरात रायतो न आम्ही.”
"Person is expired. तुम्ही मेला आहात"
"आबे भोकना हाय काबे? येथ कोण उभ हाय. मायं भूत? "
"फालतूमंधी शिव्या नाही द्याच्या सांगून ठेवतो. ”
"अरे देवा, म्या का भुताची बायको हाय?”
"तू चूप व. अस कस जित्या माणसाले मारुन रायले जी तुम्ही?”
असाच गोंधळ काही वेळ चालू होता तसे लाइन मंधी उभे असलेले मांगचे लोक बोंबलाले लागले. पोरान श्याम्याले शेवटच सांगतलं,
"लीस्टमधी तुमच नाव नाही तेंव्हा मत टाकता येनार नाही. पाहीजे तर साहेबांना जाउन भेटा.”
"भेटतो जाउन, रायतो का.”
'मले का भेव हाय का? अंगूठा तर हाय ना मायापाशी. असे कसे हे जित्या माणसाले मारु शकते? मी सोडनार नाही यायले, मी वरपर्यंत जाइन.' येकटाच अशी बडबड करीत शाम्या साहेबाच्या कॅबीनमधे धसला आन तावातावात बोलाले लागला. साहेबाले काही समजल नाही. साहेबान शांतपणे सांगतल
"अंगूठा लावा.” शाम्याले लइ राग आलता. इथ जिता माणूस यायन मारुन टाकला ते पाहाच सोडून हे अंगूठाच लावाले सांगते. त्यान रागारागातच मशीनवर अंगूठा ठेवला.
"शाम सोनवणे, आजंती, ता हिंगणघाट, जि. वर्धा. कोणती आजंती तुमची?”
"हे जामच्या फाट्यापासची.”
"अरे वा आपण गाववालं. आमच गाव समुद्रपूर तालुक्यात, जवळच. बोला काय काम हाय?”
"साहेब मी मत टाकाले आलतो, अंगूठा लावला तर तो पोरगा म्हणतो तुमच नाव लीस्टमंधी नाही. काहून तर म्हणे मी मेलो कान. असा कसा मरीन जी मी?” साहेबान पुन्हा कांपुटरमंधी काही बटना दाबल्या.
“त्याच म्हणन बरोबर हाय. मांग दोन महीन्याआधी बरेलीत रेल्वे उलटली त्याच्यात तू मेला. मेलेल्या माणसाच नाव कस राहीन गा इलेक्सनच्या लीस्टमंधी?”
"कोठ आल जी हे बरेली? तेथ रेल्वे उलटली. काहीतरी घोटाळा हाय साहेब.”
“रेल्वे उलटली याच्यात काय घोटाळ हाय गा?”
"अशी कशी रेल्वे उलटते जी? तुम्ही जेथ तेथ अंगूठे लावून घेता ना."
"अंगूठे लावाचा आन रेल्वे उलटाचा का संबंध? उलटली असन रेल्वे, मेले असन काही माणसं. त्याच्यात तुयबी नाव होत.”
"मारक्यात नाव असल्यावाणीच सांगून रायले तुम्ही. अजी म्या त्या गावाच नावच नाही आयकल कधी, तर मी कायले मराले जाइन तेथ.”
"तू खरच मेला अस कोण म्हणते बे, पण मरनाऱ्याच्या लीस्टमधी तुय नाव हाय. आपल्या गावचा म्हणून तुले सांगतो. आजकाल का झाल हे दहावी नापास पोट्टे रायते ना हे मनरेगात काम कराले येते. आता त्यायले का खंतीच्या कामाले पाठवनार हाय? अशी काही घटना घडली का त्यायले लावते कामाले. टीकाटावरुन नंबरं घ्याचे आन मरणाऱ्याची लीस्टं बनवाची. तुल तर माहीत हाय हा परत्येकाचा नंबर केवढा मोठा रायते. होते गडबड कधी कधी. होते एखादा आकडा इकडचा तिकड. चालाचच...”
"मेलेल्या माणसाचाबी अंगूठा काहून लावून नाही घेत, म्हणजे अशी गडबड तरी होनार नाही.”
"आयडीया चांगली आहे पण आता काही फायदा हाय का? जे व्हाच ते होउन गेल. तू मेला आन तुय प्रेत बेवारस म्हणून जाळून टाकल. फक्त तुले हे सार आज समजल.”
"कशी पंचाइत केली जी मायी या रेल्वेवाल्यायन. ”
"तुले इस्वास हाय ना तू जिवंत हाय ते?”
"इश्वास? मी तर जिताच हाय न जी.”
"झाल तर मग. भिखूबाबा काय सांगते आयुष्यात काही मिळावाच असन तर इस्वास पायजे. जातो का नाही बाबाच्या मठात? जात जा अधूनमधून, डोक शांत रायते. जवळ हाय गावापासून. तू आता एक काम कर रेल्वेत जा त्यायले सांग तुमची चूक झाली. दुरुस्ती करुन द्या.”
शेवंती मत टाकून आली. शाम्याने का घडल ते सार तिले समजावून सांगतल. काहीतरी भलताच घोटाळा झाला हे तिच्या ध्यानात आल.
"शेवंते, खर सांग, तुले का वाटते म्या जिता हाय का मेला?”
"माया सांगण्यान का होनार हाय? सरकारले पटल पायजे. आता फुड कस कराच जी? बारीक सारीक कामं मी करुन घेइन. पण युरीया उचलाचा हाय, कापूस इकाचा हाय, सिलेंडर हाय तेथ तुम्हीच लागन जी. तुम्हाले मरुन जमनार नाही लवकर जितं व्हाच लागल.”
"ते जाउ दे. तुले का वाटते ते सांग. म्या जिता हाय का मेला?”
शेवंती नुसती हासली. शाम्या मात्र रागान लाल झाला. आपल्या बायकोलेबी आपल्यावर इस्वास नाही. शाम्यान ठरवलं, उद्याच्या उद्या नागपूरच्या स्टेशनावर जाच आन दुरुस्ती करुन आणाची. हे अस भूतावाणी नाही जगाच. दुसरे दिवशी सकाळी आंघोळबिंघोळ करुन शाम्या मारुतीच्या देवळात गेला.
'मारुतीराया तुले तर मालूम हाय म्या भूत नाही. भूत असतो तर येथ देवळात आलो असतो का? देवा मले परत येकदा जिता कर, येथ देवळासमोर अकरा लोटांगण घालीन.'
मारुतीरायाले नवस बोलून शाम्यान फटफटीले टांग मारली आणि शिद्दा नागपुरच्या स्टेशनात पोहचला. नागपुरच स्टेशन म्हणजे काय मॉलच हाय. हिंगणघाटात मॉल नाही अस थोडी हाय, पण हा मॉल लय मोठा हाय जी. जे लोखंडी पुलापासून सुरु होते ते दुसर टोक दिसतच नाही. त्या मॉलसमोर गणपतीची टेकडीबी आता लहानशी वाटते. शाम्यान फटफटीवरुनच गणपतीबाप्पाले नमस्कार केला आन मॉलच्या भवताल एक परदक्षणा मारली. फटफटी कुठ उभी कराची तेच समजत नव्हत तर का करनार. अंदर धसाचा रस्ता दिसालेच धा मिनिटं गेले. शाम्या फटफटी उभी करुन वर आला. नुसती दुकानच दुकान, त्या दुकानायच्या मधी हे प्लॅटफार्मच्या प्लॅटफार्म आन वरवर जानारे जिने. गाड्या तर येकदम चकाचक हिंगणघाटासारख्या पॅसेंजर नाही. आपली ढकलगाडी काझीपेठ पॅसेंजर अजूनही लेटच चालते लेकाची. ह्या अशा दुकानाच्या गर्दीत त्या रेल्वेच्याच मॉलमंधी रेल्वेचच हापिस सापडत नव्हत. मोठ्या मुष्कीलीन हापिस सापडल. शाम्या हापिसाच्या खिडकीसमोर जाउन उभा रायला.
“Yes sir how can I help you?”
"अ मले"
“Oh Marathi, just minute.” अस म्हणून त्यान य़ेक यंत्र काढल आन दोघाच्या मधे ठेवल. हेडफोन्सची येक जोडी शाम्याले देली येक सोता घातली. त्याच्यात कान दोघानबी आपल्याआपल्या भाषेत बोलाच, समोरचा त्याले समजते त्या भाषेत आयकतो.
"बोला"
"तुमच्या कांपुटरमंधी काहीतरी गडबड हाय. जित्या माणसाले मारुन टाकल.”
"त्यात गडबड कसली? जिवंत माणूसच मरत असतो.”
"तस नाही. रेल्वेची चूक झाली.”
"रेल्वे चुकत नाही.”
"असकसं, तुमची रेल्वे म्हणते शाम सोनवणे मेला.”
"म्हणजे तो मेला.”
"हे कागदपत्र पाहा कोण्याच्या नावान आहे.”
"ही कागदपत्र शाम सोनवणे यांची आहेत आणि तो मेला आहे. ”
"पण म्या जिता हाय. हेच तर चुकल.”
"शाम सोनवणे मेलेला आहे आणि तुम्ही जिवंत आहात यात रेल्वेचे काय चुकले?”
"कारण म्याच शाम सोनवणे हाय."
" शाम सोनवणे मेला असूनही तुम्ही जिवंत आहात ही तुमची चूक की रेल्वेची?”
"तुम्ही नुसती गोष्ट फिरवून रायले. अजी जो मेला तो कोणी दुसराच होता, शाम सोनवणे नव्हता.”
"काही पुरावा?”
"कोण कोण टिकिटा काढल्या ते पाहा."
"टिकीटाचा रेकार्ड महीन्याभराच्या वर ठेवत नाही. तुम्हीच शाम सोनवणे आहात आणि जिवंत आहात असा दाखला घेउन या.”
असा दाखला कुठुन आणाचा हे टेंशनच होत. इकड गावात भलतच टेंशन चालू झालत. त्या दिवशी सारा तमाशा इलेक्सनच्या लाइनीतच झालता. तवा गावावले होतेच लाइनमंधी. त्यायनबी आय़कल का झाल ते. हळूहळू बंद्या गावात बोंब झाली शामराव सोनवणे मेला आन त्याच भूत गावात फिरुन रायल. शेवंती तर तरासून गेलती. रोजच्या रोज बाया तिच्याकड याले लागल्या, 'कस झाल, का झाल' अशी इचारपूस करु लागल्या. भूत घरात होत तर तिले काही संशय आला का बा. कोणी सटवाइले नारळ फोडाले सांगत होता, कोणी मांत्रिकाचा पत्ता देत होत, कोणी कोणाच्या आंगात देवी येते त्याचा पत्ता देत होता. गावात नुसत्या भूताच्या चर्चा चालल्या होत्या. जो तो कोण कवा कस भूत पायल त्या गोष्टी सांगत होता. बाया शाम्या दिसला का त्याच्याकडे भलताच संशय़ घेउन पाहत होत्या. आंगणात पोरबाळ खेळत असन तर लगेच उचलून अंदर नेत होत्या. आता तर शाम्याले सोताचा इस्वास रायला नव्हता, तो रोज आरशात चेहरा दिसतो का कवटी ते तपासत होता, पाय शिद्दे हाय का उलटे ते पाहत होता, मारुतीच्या देवळात जाउन चिमटे काढत होता. कहर तर तवा झाला जवा त्याचा जानी दुश्मन रव्यान त्याले फोन केला. मांग बरबडीच्या वावरातल्या आंब्यावरुन रव्याचा आन शाम्याचा झगडा झालता. मारक्यावर गोष्ट गेलती तवापासून दोघात बोलन बंदच होत.
"काबे शाम्या तू मेला म्हणते. मेल्यावर दुश्मनी रायते काबे? खबर तर दयाची होती. खांदा द्याले नाही तर तेरवीच्या परसादाले तर बोलवाच होत. पाय आता तुया आत्मा रायलान अडकून.” रव्याले तर मोकाच पायजे होता. शाम्याचा टाळक सणकल. कसही करुन हा बट्टा मिटवाचा अस त्यान ठरवल. दोघातिघाले इचारल तवा माहीती भेटली का वर्धेले 'एक खिडकी हापिस' हाय. सारे दाखले य़ेकाच ठिकाणी भेटते.
दुसऱ्या दिवशी शाम्यान मारुतीरायाले नारळ फोडला आन नवस बोलला 'देवा हा बट्टा पुसु दे. या हनुमान जयंतीले बंद्या गावाले जेवण देतो.' अस मारुतीरायाले इनवून शाम्या एक खिडकी हापिसात पोहचला. हापिस लइ चकाचक होत. जिकड तिकड काचा लागल्या होत्या. थंडगार एसी होता. शाम्यान अंगूठा टेकवला तस कांपुटरवर लिहून आल. 'कैलासवासी शाम सोनवणे', कैलासवासी असला तरी शाम्याले टोकन मात्र भेटल. टोकन घेउन शाम्या सोफ्यात जाउन बसला. बराबर बारा मिनिटान शाम्याचा नंबर आला आन शाम्या आपल्या नंबरच्या खिडकीसमोर जाउन बसला.
"बोला काय हवे आहे आपल्याला?”
"मी जिता हाय असा दाखला पायजे.”
"जन्माचा दाखला.”
"तो हाय पण मरणाचाबी दाखला बनला.”
"अरे हो तुमचे डेथ सर्टीफिकेट रेडी आहे प्रिंट देउ का?..... तुम्ही मेलात तर मग इथे कसे?”
"तेच सांगतो न जी मी. तुम्ही मले 'शाम सोनवणे जिता हाय' असा दाखला द्या.”
"जन्माचा दाखला असतो नाहीतर मरणाचा. मधल्या काळात माणूस जिवंत आहे असा दाखला मात्र नसतो. तसेही तुम्ही मेले आहात, तुम्हाला जिवंत कसे करता येइल?” शाम्यान इकड तिकड पायल आन हळू आवाजात इचारल.
"साहेब जमवा काहीतरी. काय जो खर्च होइल ते पाहून घेउ. वरुन वावरात पार्टीबी करु. कोंबडगिंबड कापू.”
"डोक फिरल का तुझ? विमा भेटत नसेन तर मरणाची तारीख इकडे तिकडे करता येते पण मेलेला माणूस जिवंत नाही करता येत. उद्या चौकशी झाली तर केवढ्याल पडेल. मेडीकलचा मामला आहे राजा, डॉक्टरचाच दाखला पायजे. तू सरकारी दवाखान्यातून सिव्हील सर्जनचा दाखला घेउन ये.”
आता सिव्हील सर्जनले भेटाच म्हणजे लय लफडे रायते. तेथ तर दाखले मागनाऱ्याची लाइन लागली रायते. तवा त्याची भेटाची येळ ठरवा लागते. नशीबान सरपंच्याची त्याच्या पीयेची ओळख निंघाली आन पियेन मग भेट ठरवून देली. दोनची येळ होती तरी शाम्या दाहा वाजल्यापासूनच तेथ जाऊन बसला. डाक्टरसाहेब मात्र पाच वाजता आले. शाम्या अंदर गेला आन तसाच उभा राहीला. शाम्याच अर्ज पियेन फाइल मंधी ठेवला होता. डॉक्टरसाहेबान फाइल वाचली आन इचारल
"हे काय आहे? मरुन जिवंत झालात असा दाखला हवाय.”
"साहेब नस्ती आफत झाली हाय. कोणतरी नजरचुकीन मी मेलो अस करुन टाकल. तवा जसा तुम्ही कोणी आजारातून बरा झाला असा दाखला देता तसा मले मेलेला माणूस जिवंत झाला असा दाखला द्या.”
"वेडा समजतो मला? मी डॉक्टर आहे. मेलेला माणूस जिवंत झाला असा दाखला दिला तर माझ्या डॉक्टरकीच दिवाळं निघेल.”
"साहेब मायी लय पंचाइत झाली जी, जो मेला तो कोणी भलताच होता आन त्यायन शाम सोनवणेच्या म्हणजे माया नंबरची एंट्री करुन मलेच मारुन टाकला. सारे व्यवहार बंद झाले साहेब, गावात तोंड दाखवाले जागा राहीली नाही गावातल्या बायाबी मायाकड भूत समजून पायते.”
"हूं, इंटरेस्टींग. हे पाहा मी तुम्ही जिवंत आहात असे लिहून देउ शकतो परंतु तुम्हीच शाम सोनवणे आहात हे कसे ठरविनार.”
"मी पायजेन तर पाच साक्षीदार आणून उभे करतो.”
"साक्षीदार आणून काम भागनार नाही. काहीतरी ठोस पुरावा पाहीजे. तुम्ही शाम सोनवणे म्हणून जिवंत असताना कधी डिनए टेस्ट वगेरे केली होती का?”
"कणची टेस्टं? शुगरची टेस्टं का?”
डाक्टर हासला आन शाम्याले भायेर जाले सांगतल. आता ह्या टेस्टची नवीनच भानगड पैदा झालती. दर दिवसाले काहीतरी नवीन पैदा होत होत पण जित्या माणसाचा जिता असल्याचा दाखला काही भेटत नव्हता. ज्या टेस्टंच नावच कधी आय़कल नव्हत अशी काही टेस्टं कराचा सवालच नव्हता न जी. तुम्हीच सांगा, कोण कायले कराले जाइल अशी टेस्टं? कोणाले मालूम रायते का आस काही होनार हाय ते? शाम्या मारूतीच्या देवळाच्या जोत्यावर जाउन बसला. मारुतीले नमस्कार केला आन सांगतल 'देवा कोणची का टेस्टं ते सापडू दे मी गाववाल्यायले जेवणासंग धोतराच पानबी देइन.'
गावात कोणाले काही माहीत असत तर कोणतरी कधीतरी तस सांगतल असत. तवा आता शयरातल्याच नातेवाइकाले नाहीतर दोस्ताले इचाराव लागनार होत. कोणाले इचाराच्या आधी मोबाइलले येकदा इचारुन पाहू बा म्हणून त्याने फोनलेच सांगतल 'डिनए टेस्ट'. पायता पायता मोबाइलन धडाधडा माहीती देली. शाम्याले सार समजल नाही पण येवढ मात्र समजल हे अशी टेस्ट त्यानच का त्याच्या खानदानात कधी कोणी केली नव्हती. तवा आता आपण काही शाम सोनवणे म्हणून जिते होउ शकत नाही अशी त्याची खातरी झाली. आपल नशीब खोट या नाराजीतच तो घरी आला आन न जेवता तसाच आंथरुणावर पडून रायला. कामं आटपून शेवंतीबी आली.
"काहून जी का झाल? पोट बराबर नाही का?” शाम्या काही बोलला नाही तसाच वर आटाळ्याकड पाहत पडला रायला.
"तुम्ही तुमच्या त्या दाखल्याच्या कामात गुतला होता म्हणून तुमाले सांगतल नाही. म्या सपनीले घेउन डाक्टरकड गेलती आज. सोनोग्राफी कराची होती. लइ टणाटण उड्या मारत होत बाळ. बापावर गेलय येकदम.”
शाम्याच काही लक्ष नव्हत. तो वर पाहातच पडला होता. आता शेवंतीलेबी बोलाच जिवावर आलत. ते चुपचाप कपड्याच्या घड्या कराले लागली. अचानक काहीतरी आठवल्यासारख शाम्या टणकन उडी मारुन बसला.
"शेवंते, मले येक सांग, हे बाळ मायच हाय ना.”
"मंजी का म्हणाच का तुमाले?”
"किती महीने झाले?”
"पाच साडेपाच"
"त्या डॉक्टरले याचा बाप म्हणून जिता असलेल्या शाम सोनवणेचच नाव देलत ना आपण?”
"असे काहून इचारुन रायले जी तुम्ही?”
"तुले नाही समजाच.”
अस म्हणून त्यान बाळाचे ठोके आयकू येते का ते पाहाले तिच्या पोटावर कान टेकवले, पोटावरुन हात फिरवला, पोटाची पपी घेतली. आपल्या नवऱ्याले अस का झाल म्हणून शेवंती त्याच्याकड पाहात होती आन शाम्या शेवंतीच्या पोटात वाढून रायलेल्या बाळात त्याचा जिता असल्याचा दाखला शोधत होता.
--मित्रहो
http://mitraho.wordpress.com/
(अर्थातच हा सारा कल्पनाविलास)
प्रतिक्रिया
23 Feb 2017 - 8:22 am | पैसा
लै भारी! खास मित्रहो इस्टाईल!
23 Feb 2017 - 8:41 am | स्रुजा
हाहाहा... भारी आवडला कल्पनाविलास
23 Feb 2017 - 10:42 am | प्रीत-मोहर
=))
खूप आवडलं.
(वर्हाडीचा बाज कधी येईल मला या विचारात) प्रीमो
23 Feb 2017 - 11:38 am | कैलासवासी सोन्याबापु
एकच नंबर न हो देवा! निरानाम माहोल हाय हे. बिचाऱ्या शाम्याच्या जिनगानीतनी फालतूच माजोन झालं गड्या, बाकी टाइम म्हावरे पयते पर मानसं तेच राह्यते हा संदेश बेज्य आवल्डला गड्या आपुनले.
23 Feb 2017 - 4:27 pm | अभिजीत अवलिया
23 Feb 2017 - 9:06 pm | इशा१२३
मस्त!
24 Feb 2017 - 12:41 am | इडली डोसा
मस्त गोष्ट.
24 Feb 2017 - 7:35 am | एस
डार्क कॉमेडी आवडली.
24 Feb 2017 - 7:39 am | पैसा
कथा पहिल्यांदा वाचली तेव्हा हेच मनात आलं होतं!
24 Feb 2017 - 8:26 am | मितान
भन्नाट !!! मजा आली !!!
24 Feb 2017 - 4:13 pm | चिगो
येक नंबर माहोल पिटला भाऊ तुमी.. मस्त शालजोडीतले हाणले हायेत..
25 Feb 2017 - 11:20 am | रातराणी
क ह र !! काय एकसे बढकर एक कथा लिहल्यात सर्वांनी!
25 Feb 2017 - 8:02 pm | बबन ताम्बे
आवडली कथा .
26 Feb 2017 - 8:43 pm | पिशी अबोली
लैच वाढीव!
27 Feb 2017 - 11:58 pm | भिंगरी
लईचं भारी!
28 Feb 2017 - 7:29 am | मित्रहो
सर्वांना ही वऱ्हाडी कथा आवडली छान वाटले. प्रतिसादाबद्दल सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.
बापूसाहेब बरोबर ओळखलत. काळ बदलतो, नवीन तंत्रज्ञान येत, वागण्या बोलण्याच्या नवीन पद्धती येतात परंतु माणसाच्या मूळ प्रवृत्तीत, वागणुकीत फारसा फरक पडत नाही. हा विचार घेउनच कथा लिहिली होती.
पैसाताइ, एसभाउ डार्क कॉमेडी अस काही डोळ्यासमोर ठेवून लिहिल नव्हत तर वरील विचार घेउन लिहील होत. तो विचार हा माणसाच्या केविलवाण्या परिस्थितीबद्दल आहे त्यामुळे ती डार्क कॉमेडी झाली असेल कदाचित.
आता विचार केला तर जाणवते मी परिस्थितीमुळे हतबल, विवश मनुष्य आणि त्याची ससेहोलपट यावरच जास्त लिहिले आहे. काही वेगळा प्रयत्न सुद्धा पुढे नक्की करु.