हरनी
नख्खी नख्खीतुन बोंड
कापसाचं फुललं
पराटीच्या वावरातं
जसं चांदनं सांडलं
हे बावरली हरनी
कोनं ऊभी वावरातं
टाके चान्नी वानी बोंड
पाठीवरं खंदाळीतं
बोंडा बोंडाच्या मंधात
गोलं मुखळा खुलला
आजूबाजूनं चांदन्या
मंदी चंद्र उजीळला
मोठ मोठाल्या डोयानं
कायं ईकळे पायते
जीवघेनी ते नजरं
घोरं जीवाले लावते
ठुलं बांधूनं गाठोळं
तुया येचल्या बोंडाचं
सांगं कुठीसा ठेवलं
बोंड माया हुर्दयाचं?
-ऊद्धव गावंडे
प्रतिक्रिया
22 Feb 2017 - 7:39 am | प्राची अश्विनी
सुरेख!
22 Feb 2017 - 8:44 am | पैसा
काय सुरेख उपमा आहेत एकाहून एकेक!!
22 Feb 2017 - 10:05 am | खेडूत
छान कविता उद्धवजी!
22 Feb 2017 - 10:27 am | कैलासवासी सोन्याबापु
आय हाय हाय उद्ववभाऊ, एकदम भरेल पऱ्हाटी डोया म्हावरे आली हो देवा. ते टच भरेल बोण्ड , टचाटच वऱ्हाडी गर्मीन फुटून रुई भाईर येल पऱ्हाटी, रुई आल्यानंतर करेल शीतादाईची पूजा, सालदाराच्या मेहनतीले सलाम करत त्याले केलेला कापडाचा मान, सालदारनीची साडीचोयी , सर्वे काई खपकन डोया म्हावरे आले अन काय सांगा राज्येहो डोयेच वल्ले झाले ना!!. आता सायची कास्तकारी सुटली, अंगाले लागेल मातीचा वास सुटला अन आपुन सोतालेच परके झालो, काडाचा महिमा व्हय राज्येहो.
इतरांसाठी
शीतादाईची पूजा म्हणजे अस्सल वऱ्हाडी उन्हामुळे जेव्हा कापसाची हिरवी बोण्ड सुकून टचकन फुटतात तेव्हा बाहेर आलेल्या पहिल्या रुईची (कापसाची) पूजा असते. उन्हा तान्हात खपलेल्या शेतीवरच्या (वावरातल्या) गडी (सालदार) माणसाला पांढरे कापड, तांदूळ , दही असे सगळे पांढरे सामान देऊन केलेला मान ह्या पूजेचा अविभाज्य भाग असतो , ह्या प्रसंगी त्याच्या बायकोला (सालदारनी) हिरवे लुगडे चोळी अन सौभाग्याच्या खुणा ओटीत घालतो जमीनदार. ह्या सोबतच दहीभात, पांढरे तीळ वगैरे वापरून नुकत्या 'डिलिव्हरी' झालेल्या (बोण्ड फुटून कापूस बाहेर दिसु लागलेल्या) पऱ्हाटी (कापसाच्या) झाडाची पूजा करण्यात येते, त्याला पांढरा साफा गुंडाळला जातो, अन कायम असेच कपाशीचे पीक यावे म्हणून प्रार्थना केली जाते.
हा आहे आमचा विदर्भ , आमचे वऱ्हाड :), च्यायला आता अंगाचा मातीचा वास तुटला अन सगळेच सुटले, पण कुठेतरी माझ्या वऱ्हाड प्रांताच्या हृदयात कुठलातरी एक कास्तकार ह्या येत्या मार्च मध्ये असली पूजा नक्की करेल अन देवाला पुढल्या हंगामाकरता पांढऱ्या सोन्याचे दान मागेलच, हे नक्की आहे :) .
24 Feb 2017 - 4:32 pm | चिगो
ह्ये कविता वाचली, आन् थे 'दोन घडे-तीन शेर' अशी घडे-शेर आन् मणाच्या मापात केलेली कापसाची मोजणी आठवली, भाऊ.. लहानपणी कापसाच्या कोंडीत मारलेल्या धपापा उड्या, आन् मंग कराकरा खाजवणारं आंग, समदं डोळ्यापुढून फिरुन गेलं..
22 Feb 2017 - 12:06 pm | सस्नेह
व्वा ! क्या बात !
22 Feb 2017 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
22 Feb 2017 - 3:09 pm | प्रीत-मोहर
खूप मस्त लिहिलय उध्धवजी!!
22 Feb 2017 - 3:26 pm | वेल्लाभट
सुंदर !
22 Feb 2017 - 3:53 pm | एस
हृद्य!
22 Feb 2017 - 4:29 pm | जव्हेरगंज
तुमच्या इतर.कवितांसारखी अस्सल नाही वाटली.
22 Feb 2017 - 4:49 pm | वरुण मोहिते
आवडली !!!
22 Feb 2017 - 5:01 pm | नूतन सावंत
डोळ्यासमोर आल कापसाचं शेत.एकदा अकोल्याला पाहिलं होतं.
कविता आवडली.
22 Feb 2017 - 5:53 pm | बबन ताम्बे
खूप आवडली.
22 Feb 2017 - 6:47 pm | अॅस्ट्रोनाट विनय
छान. लयीत म्हणता येईल अशी गेय कविता
22 Feb 2017 - 9:14 pm | पिलीयन रायडर
फार आवडली!
साधी.. सहज...
22 Feb 2017 - 10:12 pm | रेवती
कविता आवडली.
22 Feb 2017 - 10:26 pm | नीलमोहर
गोड कविता, आवडली
22 Feb 2017 - 10:59 pm | सूड
आवडलीच!!
23 Feb 2017 - 7:32 pm | मितान
कविता आवडली !
24 Feb 2017 - 1:33 am | सचु कुळकर्णी
गावंडे पाटिल
मस्त अन जब्राट झालय.
आमचि उपमा का सांजा काय म्हंतेत ते पटत नाय लोकाइले पन हे तुमचि काय कविता व्हय का लेख व्हय ह्यान आम्हाले आमच्या प्राचार्यांचि आठवण करुन देल्लि. कोन ? लय फाटत जाय ह्या माणसासमोर सार्या कॉलेज ची.
बातच वळखाल !
झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते
आवडल.
* इथे परिचय नसताना लेखक महाशयांना थेट गावंडे पाटिल संबोधलो ह्यात कुठलिहि जातियता नसुन वर्हाडि सहजपणा आहे.
25 Feb 2017 - 5:59 am | रुपी
वा! सुंदर!
25 Feb 2017 - 11:10 am | रातराणी
खूप सुंदर !!
26 Feb 2017 - 8:07 pm | मित्रहो
कविता वाचताना विठ्ठल वाघांच्या कवितेसारखी लय वाटत होती.
कापसाचे शेत डोळ्यासमोर उभे राहले.
26 Feb 2017 - 8:26 pm | पिशी अबोली
आवडली!
1 Mar 2017 - 10:23 pm | ऊध्दव गावंडे
धन्यवाद मित्रांनो!