दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

विरंगुळ्यातून व्यवसायाकडे

Primary tabs

मूनशाईन's picture
मूनशाईन in लेखमाला
8 Mar 2017 - 6:53 am

.

लहानपणी घरी एखादे नवीन उपकरण घेतले की त्याचा मोठा रिकामा बॉक्स रिकामा व्हायची मी वाटच बघायचे. बागेमध्ये जाईच्या वेलाखाली बॉक्स उपडा ठेवून त्याचे छोटे घर करायचे. आम्ही दोघी मैत्रिणी दिवसभर तिथे रमायचो. एकदा वर्तमानपत्रातल्या नव्या इमारतीच्या जाहिरातीने आमचे फार लक्ष वेधले. दुसऱ्या दिवशी आमच्या कार्डबोर्डच्या घराबाहेर आम्ही ऑफिस थाटले. माझी मैत्रीण बिल्डर आणि मी तिची आर्किटेक्ट. बाबा घरी आल्यावर रोज त्यांना आमच्या ऑफिसमध्ये येऊन, एक घर बांधायचं असे बळजबरी म्हणायला लागे. कदाचित यामुळे, मोठेपणी आर्किटेक्ट व्हायचे या विचाराने तेव्हाच माझ्या डोक्यात घर केले. हळूहळू वाटचाल सुरू झाली. नशिबाने साथ दिली, तसे जेजेमधून स्थापत्यशास्त्राचे संस्कार मिळाले.

लग्नानंतर पुढील शिक्षण घ्यायचे प्रयत्न केले, मात्र घराजवळील विद्यापीठात प्रवेश न मिळाल्याने पुढील वर्षी बघू असे म्हणत थांबले. आता हातात भरपूर रिकामा वेळ असल्याने हळूहळू ओरिगामी, पेन्सिल रेखाटने, भिंतीवर चित्रे, मेंदी अशा लहानपणी उन्हाळी शिबिरांधून शिकलेल्या हस्तकला जाग्या होऊ पाहत होत्या. यातूनच एकदा ते पायरोग्राफीचे पेन हातात पडले आणि तिकडून एक वेगळीच वाट सुरू झाली.

लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते, मोठे होऊन तुम्ही डॉक्टर बनू शकता, अभियंते बनू शकता. आपल्यातले काही जण आपल्या स्वप्नांच्या वाटेवर हरवून जातात, तर काही व्यावहारिक निर्णय घेऊन, खाऊन पिऊन सुखी असे करिअर निवडतात. काही जण आवडते शिक्षण घेऊनदेखील त्यात आणखी सखोल अभ्यास करतात, तर काही जण नव्या संधी आपल्याश्या करतात. वेळ, जागा, कौटुंबिक जबाबदारी, किंवा स्वेच्छेने घेतलेल्या काही निर्णयामुळे कधीतरी यात खंड पडतो. अशा वेळी किंवा कधी नोकरीतून विरंगुळा मिळावा म्हणून आपण आपल्या आवडत्या हस्तकलांकडे वळतो. लपलेल्या कला नव्याने सापडतात, निरनिराळे छंद आनंदाने जोपासले जातात. काही जणी पुढचे पाऊल टाकून या छंदाचे व्ययसायात रूपांतर करतात.

चित्रकार (illustrator)
माझी मैत्रीण 'सायली भगली' लहानपणापासूनच चित्रांमध्ये रमणारी. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आता व्हिज्युअल डिझायनर आहे. नोकरीतून वेळ काढून कधी आपले विश्व, रोजच्या घडामोडी तर कधी जुन्या आठवणी आपल्या चित्रांमध्ये रेखाटते. गाडीवरून पडल्यापासून चहाप्रेमापर्यंत आकर्षक चित्रे आणि सोबत खुसखुशीत वर्णने यांचा एकदम चटकदार मेळ घालते. प्रथम हाताने कागदावर आणि नंतर आपल्या शिक्षणाच्या सोबतीने, तंत्रज्ञान कल्पकतेने वापरून तिची रेखाटने एकमेवाद्वितीय असतात. प्रत्येकाची कहाणी, त्यांचा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यास सानुकूल रंगदार, वाखाणण्याजोगी कोस्टर्स, फ्रीजवरची शोभेची चुंबके, भिंतीवरती मुरल्स बनवते. डिझाईन करून प्रिंट करेपर्यंत सगळे सांभाळून दुसर्‍यांना अक्षरशः हेवा वाटाव्या अशा लग्नपत्रिका, शुभेच्छा पत्रे अगदी संग्रही ठेवण्यासारखीअसतात.

...
(सर्व फोटो 'सायली भगली'कडून साभार)

डेकोपेज (Decoupage)
वर्तमानपत्रातली, मासिकातली एखादी महत्त्वाची बातमी पुढे कधीतरी उपयोगास येईल म्हणून आपण ती कात्रणे संग्रही ठेवतो. तसेच काही आवडलेली चित्रे, फोटोदेखील ठेवायची आवड असते. आता या संग्रहाचे जर एका सुंदर कलेत रूपांतर झाले तर? डेकोपेज म्हणजे विषयास साजेशा रंगांची, नक्षीची, फुलाफुलांची तर कधी नुसती सुंदर हस्ताक्षर असलेली कात्रणे सफाईने एकमेकांवर डिंकाने चिकटवतात. सहसा सपाट पृष्ठभागावर डिंकाने कागद चिकटवून त्यावर परत त्यानेच किंवा वार्निशचे थर देऊन चकाकी आणतात. घरातील जुन्या रया गेलेल्या वस्तू, पेट्या-पेटारे, कपाट, लाकडी तबके, अशा कित्येक गोष्टींचा जणू कायापालटच होतो. शिवाय वेगवेगळी माध्यमे - उदा., रंग, कापड, लेस, खोटी फुले, मणी, खडे चिकटव़ल्यास वस्तू आणखीनच खुलून दिसते. प्राथमिक गुंतवणूक खूपच कमी, पण आवडीने जोपासण्यासारखी ही कला आहे. शिवाय व्यवसायात रूपांतर करून गृहसजावटीस साजेशा वस्तू बनवता येतात. या अंकात आपण ही कला शिकणारसुद्धा आहोत.

...
(सर्व फोटो 'सिद्धी जागुष्टे'कडून साभार)

काचेवर आम्लकोरण (Glass Etching)
ही काचेच्या गुळगुळीत पृष्ठभागावर नक्षीकाम करायची एक सुंदर आणि मोहक पद्धत आहे. आपल्यातील कल्पकतेला एका नव्या माध्यमात मांडून, शिवाय घरात्तील काचवस्तूस शोभिवंत बनवता येते. Etching म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काचेच्या खिडक्या, दारे, पुरस्कार येतात. हे मोठ्या प्रमाणावर करणारे व्यवसाय असताना आपण घरच्या घरी काय करणार? घरातील जुने काचेचे टेबल, पेले, तबक, फूलदाण्या, शोभेच्या वस्तू यांवर आपल्या आवडत्या नक्षीचे तयार किंवा घरी केलेले स्टेन्सिल चिकटवायचे. शक्यतो मध्ये हवा सापडणार नाही याकडे लक्ष द्यायचे. हातमोजे आणि डोळ्यावर सुरक्षा चश्मा घालून स्टेन्सिलवर etching द्रव्य लावायचे. दिलेल्या सूचनांप्रमाणे वेळ लावून नंतर साबणाने काच धुवून टाकायची. झाले. आपली आवडती नक्षी, नामाक्षरे, तर कधी फक्त पाहिजे तेवढा भाग धुरकट करू शकतो. शिवाय थोड्या भागात डेकोपेज आणि थोड्या भागात etching अशी मिश्र माध्यमेदेखील वापरू शकतो. आपल्या घरात, कोणासाठी भेट आणि बाजारातील आवश्यकतेनुसार काम करून इतर कलांप्रमाणेच सुरवात केली, तर पुढे याचे या सोप्या कलेचे गृहोद्योगात रूपांतर होईल.

..
(चित्र स्त्रोत http://www.etsy.com/shop/mountainglassetching)

ओरिगामी
लहानपणी उन्हाळी शिबिरातून किंवा निव्वळ आनंद म्हणून शिकलेली ओरिगामी विरंगुळा म्हणूनच राहून जाते. पण वेळात वेळ काढून जपलेली ही कला फक्त कंदील आणि प्रदर्शन एवढ्यापुरतीच न राहता यातून आणखी भरपूर काही साध्य करता येते. लग्नसमारंभ, वाढदिवस, तत्सम कार्यक्रमासाठी सजावट करणारे set designing सारखे व्यवसाय असतात. शोभीकरणासाठी खरी फुले, कापडे, दिवे, मण्यांची तोरणे हल्ली बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना याच गोष्टी ओरिगामीने केल्या तर? त्यासाठी वर्तमानपत्र वापरून तसे किंवा त्यावर रंग मारून, तर कधी खास रंगाचा, चमकणारा, विशेष कागद वापरून याच सर्व गोष्टी बनवता येतात. शिवाय गृहसजावट, किंवा कुठेही इंटेरियर डिझायनिंगसाठी झुंबर, भिंतीवर शोभेसाठी ओरिगामी वस्तूंना मागणी असते. सध्या ओरिगामी घड्या हुबेहूब प्रतिकृतीचे कापडाच्या उश्यादेखील बनवतात. मुंबईला व्हीटीला चिमणलाल हे फक्त कागदी उत्पादने मिळणारे चिमुकले पण मस्त दुकान आहे. रंगीबेरंगी, नक्षीकाम असलेल्या स्वतः बनवलेल्या कागदांपासून ग्रीटिंग कार्ड, पाकिटे, फोटोसाठी चौकटी, छोटे मोठे ओरिगामी बॉक्स, कागदी शोभेच्या पिशव्या तेथे मिळतात.

...
(चित्र स्त्रोत https://www.etsy.com/listing/192916926/100-blue-shades-wedding-petals-ta...
http://cdn.homesthetics.net/wp-content/uploads/2014/10/21-Extraordinary-...
https://www.etsy.com/listing/192916926/100-blue-shades-wedding-petals-ta... http://designmag.fr/bricolage/lampe-origami.html)

जलांतर्गत सुशोभीकरण (Aquascaping)
मासे आणि बागकाम आवडणार्‍यांसाठी हा मस्त छंद आहे. पाण्यातली जणू बागच. घरी मासे पाळायचे म्हणजे नुसते दुकानातून टँक आणून, वाळू दगड टाकले आणि मासे सोडले की झाले असे नाही. जल वनस्पती, मासे, तसेच खडक, दगड, गुहा बनवणे, किंवा प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर वाहत आलेले लाकूड सगळे घेऊन आकर्षकरित्या आरास केली जाते. टँकची रचना करताना सममिती, आकार, पुढेमागे दिसणाऱ्या गोष्टी, केंद्रबिंदू, देखाव्याची शैली लक्षात घ्यायला लागते. माशांचे वर्तन, त्यांचे प्रजननचक्र, जलतरण सवयी यानुसार माशांचा योग्य वर्ग निवडणे हा एक नाजूक निर्णय आहे. मासे सामान्यतः कळपाने राहणारे, रंगीबेरंगी, तेजस्वी रंगाचे निवडले जातात. 'नैसर्गिक वातावरण बदल करणे,' ही काही सोपी गोष्ट नाही. रोपांची नियमित छाटणी आणि पाणी बदलणे, प्रकाश, कार्बन डाय ऑक्साइड, आणि पाण्याची पोषकता यांचा योग्य समतोल राखणे यावर अॅक्वास्केपिंग अवलंबून आहे. जीवशास्त्राचे मूलभूत नियम पाळून निष्ठेने देखरेख ठेवणे हेदेखील तेवढेच गरजेचे आहे, कारण पूर्ण वाढलेल्या aquascapesला कित्येक महिने लागू शकतात. घर, ऑफिस, हॉटेल, विमानतळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी अशा टँक्सना व्यावसायिक स्तरावर मागणी असते.

..
(चित्र स्त्रोत http://www.projectaquarium.com)

Food stylist
बऱ्याच वेळा प्रत्यक्षात पदार्थ चवीला किती रुचकर आहे त्यापेक्षा त्याचे सादरीकरण अधिक महत्त्वाचे असते. पाहणाऱ्यास भूक नसतानादेखील मोह व्हावा, पोटात कावळ्यांनी जणू दंगलच करावी. जाहिराती, मासिकांसाठी फोटो, नव्या हॉटेलचे मार्केटिंग तर कधी मेजवानीसाठी पदार्थाची आकर्षक मांडणी फूड स्टाइलिस्ट करतात. उत्तम पाककला येणाऱ्या किंवा शिकलेल्यांसाठी आपली कल्पकता मांडायचे हे व्यासपीठ आहे. पदार्थाचा प्रकार, त्याची खासियत, त्यामागील इतिहास तो पदार्थ सजवताना माहिती करून घ्यायला लागतो. पदार्थ सव्‍‌र्ह करताना गार्निशिंगने आणखी खुलवता येतो. त्यास साजेसे भांडे, टेबलावरील चादर, शोभा आणणाऱ्या वस्तू, फळे-फुले वगैरे. यासारख्या गोष्टी निवडून त्यांची मांडणी करण्यात येते. फोटो कसा घ्यायचा आहे त्याप्रमाणे, प्रकाशयोजनेप्रमाणे आकर्षकरित्या ही मांडणी केली जाते. फूड स्टाइलिस्टला फूड फोटोग्राफीसुद्धा येत असल्यास त्याचा अधिक फायदा होतो. पदार्थ बनवून, सजावट करून त्याचा फोटो निघेपर्यंत बराच वेळ लागतो. एवढा वेळ पदार्थ ताजा दिसण्यास तर कधी पदार्थ आकर्षित दिसण्यासाठी काही युक्त्या वापरतात. उदा., वाफ दाखवण्यासाठी त्यामागे झाकले जाईल असा स्टीमर ठेवला जातो. सोड्यातील किंवा कॉफीवरील बुडबुडे दाखवण्यासाठी साबण वापरला जातो. खाद्यक्षेत्रास मरण नाही, त्यामुळे ही आगळीवेगळी कला जोपासून त्यात करिअरच्या संधी दिवसेंदिवस वाढतच जातील.

...
(चित्र स्त्रोत http://www.productionparadise.com/spotlight/food-and-drink-photography-6... http://www.anjaliramaswamy.com/anjali-ramaswamy-food-styling-portfolio-f... https://media.licdn.com/mpr/mpr/shrinknp_800_800/AAEAAQAAAAAAAAlrAAAAJDQ...)

प्रतिष्ठापन कला (Installation Artist)
याचे वर्णन करणे जरा कठीण आहे. एका छोट्या किंवा मोठ्या जागी, कलादालनामध्ये, आत/बाहेर दोन्हीकडे स्थापत्य, सुशोभीकरण या दरम्यान कुठेतरी बसणारा कलाविष्कार. कधी जागेस खुलवणारी, तर कधी आपल्या भावना नि:शब्दपणे मांडणारी, कधी मनोरंजनासाठी तर कधी लोकहितासाठी. मूर्तिकार, धातुकलाकार, दिवे, वाळूमध्ये, बर्फात, मुरल्स...... व्याख्या करता तेणार नाही अशी अमर्यादित कला. बघणाऱ्याशी संवाद साधणारे installation हे तात्पुरते किंवा कायमचे असू शकते. कलाकाराची अफाट कल्पकता दर्शवण्यासाठी दिलेले हे व्यासपीठ. वाळूमध्ये साकारलेला गणपती, काळाघोडा उत्सवात मांडलेल्या प्रतिकृती, सार्वजनिक जागी, रस्ते, रंगवलेल्या भिंती, अगदी मुंबईतले 'लव मुंबई' असे कित्येक installations आपण पाहिले आहेत. कलादालनात हजारो दिव्यांचे, मोठाल्या कागदांचे, मूर्तींचे प्रदर्शन, निरनिराळे देखावेदेखील भारावून टाकणारे असतात.

...
(चित्र स्त्रोत http://www.mumbaieastwest.in/events-in-mumbai/love-mumbai-the-symbol-of-... https://www.flickr.com/photos/humayunnapeerzaada/2254445540/ http://www.phoenixnewtimes.com/arts/canal-convergence-2017-in-scottsdale...)

एखादी विशिष्ट कला येत नसेल, तरी 'DIY- DO IT YOURSELF' हस्तकौशल्याच्या कित्येक गोष्टी आपण विरंगुळा म्हणून करत असतो. विणकाम, भरतकाम, दागिने, मणी बनवणे, चित्रकला, क्विलिंग, शिल्पकला, मातीकाम, कापडावर चित्रे काढणे, बांबूच्या वस्तू बनवणे इ. पर्यटनास गेल्यावर तेथील हस्तव्यवसायाच्या वस्तू आपण आवर्जून खरेदी करतो. तसेच घरच्या घरी वर सांगितलेल्या डेकोपेज, aquascaping, ओरिगामी, GLASS ETCHING, आणि माझ्या पायरोग्राफीसारख्या अनेक कला जोपासून फक्त वेळ दवडण्याकरिता नव्हे, तर स्वतंत्रपणे व्यवसायात रूपांतर करू शकतो. वेगळेपणा, प्रयोगशीलता आणि नावीन्य यांची सांगड घालून साकारलेले प्रत्येक काम हे एकमात्र बनून त्याचे मोल वाढते.

...
(चित्र स्त्रोत https://www.etsy.com/listing/249677902/gypsy-hanging-lantern-bohemian-st... http://mamabee.com/wp-content/uploads/2014/09/015-588x1024.jpg http://www.cuded.com/2016/06/35-diy-ideas-of-painted-rocks/)

आनंदनिर्मितीच्या हेतूने कला जोपासली जाते, पण उदरनिर्वाहाचे साधन करण्यासाठी त्याचे वेगळेपण समर्थपणे दाखवता आले पाहिजे. आपण जालावर, प्रदर्शन किंवा पत्रके करून, कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून विक्री करण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याचे आकर्षक फोटो असणे आवश्यक आहे. आपला उद्देश आणि ती कलाकुसर कल्पकतेने फोटोत हेरून मार्केटिंगसाठी उपयोगास येते. 'जणू एक भेट प्राप्त होत आहे,' अशा मोहक पॅकेजिंगने आपण जास्त ग्राहक वेधू शकतो. साधा लोगो, हस्ताक्षरासारखे फॉन्ट, काळजी घ्यायची माहिती किंवा कधी फक्त हलकाफुलक्या चारोळ्या छापून त्याचे लेबल बनवून वस्तूला लावल्यामुळे एक वेगळीच स्वतःची ओळख निर्माण करता येते.

इंटरनेटमुळे जगभरातील लक्षावधी लोक एकमेकांशी आज जोडले गेले आहेत. फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर आपले कलादालन उघडून नवनवीन कलाकारांची ओळख होते. तसेच youtubeवर कामाचे व्हिडिओ बनवून आपली कला इतरांना शिकवता येते. सुटसुटीत, साधी, आपली कला उठून दिसणारी, शिवाय वस्तू करतानाचे अनुभव, तिचे वैशिष्ट्य ब्लॉगिंगमधून वेबसाइटवर लिहिता येते. बघणाऱ्याला आपले विचार, आपली मेहनत यातून जवळून अनुभवता येते. यशस्वी व्यवसायासाठी, आपण तेवढ्याच विशेष वेबसाइटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. पिनटरेस्ट, etsy, behance अशा अनेक माध्यमांतून जगाच्या कानाकोपर्‍यात आपली कला पोहोचते. संपर्क वाढतो, तशी प्रसिद्धी वाढते. इतरांशी सहयोग करून, कधी एकत्र नवनवीन कलाकृती साकारता येतात. त्यातून दोघांचेही ग्राहक वाढायला मदत होते. टीकाटिपण्या मिळून आपल्या कामाचा दर्जा वाढवता येतो. बाजारातल्या ट्रेंडचा अभ्यास करून मागणीनुसार व्यवसायाची दिशा ठरवता येते. यात अवघड असे काही नाही; शिक्षण, आवड, चिकाटी आणि मार्केटिंग यांची सांगड घालून यशस्वी व्यवसायातून कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करू शकतो.
चला तर मग, आवडीच्या वाटा निवडून विरंगुळ्याचे व्यवसायात रूपातंर करू या!

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Mar 2017 - 9:49 am | पैसा

क्लास!! यातले काय काय आपल्याला करता येईल डोक्यात विचार सुरू झाले लगेच!

निवेदिता-ताई's picture

9 Mar 2017 - 9:59 am | निवेदिता-ताई

अप्रतिम

निर्मितीतला आनंद देणारे कलात्मक व्यवसाय! काय सुंदर आहे एकेक .
लव्ह यु सायली भगली!
ती झोका घेणारी अनाहिता सायलीचीच!

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 11:27 am | सविता००१

अप्रतिम व्यवसाय आहेत सगळे.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 12:09 pm | प्रीत-मोहर

वल्लाह!! काय सुंदर असहे एकेक. मला काहीही जमत नाही मी तुमच्याकडून करून घेणारे.

सायली भगली झोक्यावरच्या अनाहिते साठी धन्यवाद. मला ती मीच वाटले. आनंदी , खुश, confident. Love u girl.

संदीप डांगे's picture

9 Mar 2017 - 12:14 pm | संदीप डांगे

मस्त! भारी ओळख करून दिलीय!

कलेशी निगडित असे अनेक छोटे छोटे व्यवसाय करता येतात. पण कलेसोबत व्यावसायिकता आणि चिकाटी समप्रमाणात हवी...

मूनशाईन's picture

17 Mar 2017 - 11:34 am | मूनशाईन

नक्कीच, सहमत आहे.

मोनू's picture

9 Mar 2017 - 3:17 pm | मोनू

खूपच छान लेख...अत्यंत ऊपयुक्त...डेकोपेज हा प्रकार खूप आवडला मला.

मूनशाईन's picture

17 Mar 2017 - 11:32 am | मूनशाईन

आपण अंकात थोडक्यात, डेकोपेज शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तसा लेख अंकात आहे. नक्की वाच आणि करून बघ.

पद्मावति's picture

9 Mar 2017 - 3:48 pm | पद्मावति

सुन्दर लेख.

बरखा's picture

9 Mar 2017 - 4:35 pm | बरखा

खुप छान माहीती मिळाली या लेखातुन.

अरे वा! छान माहिती. मी काय काय करू शकीन असे वाटले.

सुचेता's picture

10 Mar 2017 - 12:47 pm | सुचेता

काय सुंदर आहे सगळेच प्रकार, मस्त, परत परत पहात रहावेत असे

सुचेता's picture

10 Mar 2017 - 12:49 pm | सुचेता

लहाणपणी असेच काय काय जमवत रहायचे, अगदि आत्ताआत्तापर्यंत जापून ठेवलेले सगळे डोळ्यापुढे तरंगुन गेले

चला, तुम्हाला परत जमवाजमवीला एक बहाणा मिळाला बघा. ;)

पलाश's picture

10 Mar 2017 - 2:10 pm | पलाश

सुंदर लेख. फार आवडला.

Maharani's picture

11 Mar 2017 - 5:39 pm | Maharani

खुपच छान माहिती..

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 9:42 pm | जव्हेरगंज

काय जबरा फोटो आहेत!!

व्वा!!!

कलाकारांबद्दल प्रचंड आदर आहे. एक से एक कलाकृती!

त्रिवेणी's picture

17 Mar 2017 - 11:07 am | त्रिवेणी

खुप मस्त माहिती. माझ्यासाठी तर हे सगळे प्रकार नवीन आहेत.ग्लास इचिंगचे साहित्य मिळाले तर करुन बघेन.

मूनशाईन's picture

17 Mar 2017 - 11:20 am | मूनशाईन

नक्की करून बघा.
कदाचित पुढील लेख, "चला, ग्लास इचिंग शिकू या" हा तुमचाच असेल आणि आम्हाला त्यातून शिकता येईल. :)

पूर्वाविवेक's picture

17 Mar 2017 - 3:14 pm | पूर्वाविवेक

अहाहा ! किती सुरेख. खुप मस्त माहिती.

जागु's picture

17 Mar 2017 - 3:48 pm | जागु

खुपच छान.

पिशी अबोली's picture

17 Mar 2017 - 11:33 pm | पिशी अबोली

माहिती तर सुंदरच, फोटो त्याहून सुरेख.

लेख आवडला.

पिशी अबोली's picture

17 Mar 2017 - 11:33 pm | पिशी अबोली

माहिती तर सुंदरच, फोटो त्याहून सुरेख.

लेख आवडला.

जुइ's picture

23 Mar 2017 - 11:54 pm | जुइ

अनोख्या करियर विषयांची माहिती आवडली.

काय सुंदर फोटो आहेत! छान माहिती.

मीही काहीतरी करु म्हणून कितीतरी मासिकांतली चित्रे जपून ठेवली आहेत, डेकोपेजबद्दल वाचून काही जमतं का बघते.

अर्धवटराव's picture

8 Apr 2017 - 6:01 am | अर्धवटराव

सकाळच्या कोवळ्या उन्हात चिमण्यांची चिवचिव ऐकावी तसं गोड वाटलं :)