मुंबईची सुपरगर्ल - अनिता मोकाशी

Primary tabs

रुपी's picture
रुपी in लेखमाला
8 Mar 2017 - 6:41 am

1

अटकेपार झेंडा लावणार्‍या मराठ्यांची परंपरा आजचीही मराठी पिढी राखत आहे. काळाबरोबर पुढे जाऊन, परदेशांत वास्तव्यास जाणारे तरुण-तरुणी बरेच असतात. पण अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण करणे कमी जणांना जमते. नव्या देशात, नव्या जागेत स्वतःची ओळख निर्माण केली आहे ती "आमची मुंबई"ची मुलगी अनिता मोकाशी हिने! तुमच्या-आमच्यासारख्याच सामान्य कुटुंबात वाढलेल्या अनिताने अमिरिकेतल्या बे-एरियामध्ये आणि एकूणच पाककला-विश्वात असामान्य वाटावी अशीच वाटचाल केली आहे. तिच्याबद्दल, तिच्या स्वयंपाक-प्रयोगांबद्दल तिच्याबरोबर मारलेल्या गप्पांमधून आणखी जाणून घेता आले.

1

प्रश्नः नमस्कार अनिता! तुझ्या व्यापांतून वेळ काढून तू आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल खूप धन्यवाद!
स्त्रियांच्या रोजच्या आयुष्यात इतर गोष्टींबरोबरच "स्वयंपाक" हा सर्वांच्या दैनंदिन जेवणात महत्त्वाचा विषय असतो. काहींसाठी ते कर्तव्य असतं आणि काहींसाठी फार जिव्हाळ्याचीही गोष्ट असते. नवीन पाककृती शोधणार्‍या मुलींनी तुझ्या ब्लॉगला प्रत्येकीनी केव्हा ना केव्हा भेट दिलेलीच असते. त्यामुळे तुझी मुलाखत आम्हांला घेता येत आहे, ही आमच्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे. तुझ्या ब्लॉगबद्दल, वाटचालीबद्दल तर आपण बोलणार आहोतच. पण सर्वात आधी आम्हांला तुझ्याबद्दल माहिती सांगशील का?

अनिता: माझा जन्म आणि शिक्षण मुंबईत झालं, मी शिवाजी पार्कला राहायचे. मी बी. कॉम. आणि 'मास्टर्स इन मार्केटिंग' केलं. तेव्हा घरी मला कधी स्वयंपाक करावा लागला नाही. कारण माझ्या घरी आई आणि वहिनी होत्या. आईने मला कधीच 'आज जेवण बनव, किंवा चपात्या कर, भाजी बनव' असं सांगितलं नाही. त्यामुळे मला स्वयंपाकाची बिलकुलच सवय नव्हती. पहिल्यांदा मी जेवण बनवलं ते २०१० मध्ये लग्न होऊन अमेरिकेत आल्यावरच. इथे आल्यावर पहिल्या वर्षी मला सर्वात कशाची उणीव जाणवली असेल तर ती आईच्या हातच्या जेवणाची. थोडे दिवस बाहेर खाल्लं, कधी नवर्‍याने जेवण बनवलं. पण त्यानंतर मला पुरणपोळी किंवा कोंबडीवडे असे पदार्थ जरी इथे मिळत असले तरी "ती" चव मात्र मिळत नव्हती. त्यामुळे स्वयंपाक करायला शिकण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये, हे माझ्या लक्ष्यात आलं. मग मी आईला रोज फोन करुन तिला विचारायचे, की "तुझ्यासारखी भरलेली वांगी बनवायची आहेत, तर काय करु?" आणि लिहून घ्यायचे.

पण एक गोष्ट होती, की माझ्या घरी आधीपासूनच जेवणाला फार महत्त्व होतं, त्यामुळे मला "चवी"ची फार जाण होती. त्यामुळे मी बनवलेली कुठलीही डिश बिघडणार नाही याची दक्षता मी घ्यायचे, कुठल्याही पाककृतीसाठी असं कधी झालं नाही की मला ४-५ वेळा प्रयत्न करावा लागला. तर चव मला समजत होती, पण कृती माहीत नसायची. तर आधी आईच्या, आणि मग तरला दलाल, संजीव कपूर यांच्या पाककृती बघूनच मी स्वयंपाक करायला लागले. शिवाय, पहिल्या वर्षी H4 वर असल्यामुळे मी नोकरी करत नव्हते, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. म्हणून मी रोज स्वयंपाक, काही नवीन प्रयोग करु शकायचे. एकदा असं झालं, की माझ्याकडे आलेल्या मित्रमंडळींना जेवण फार आवडलं, आणि त्यांनी कृती विचारली. तेव्हा मी आईला विचारुन वहीत लिहून ठेवलेलं त्यांना दाखवलं. मग त्यांनी सुचवलं, की "तू एखादा ब्लॉग का सुरु करत नाहीस?" तेव्हा मी ब्लॉग कसा सुरु करायचा असतो वगैरे शोधाशोध केली. तेव्हा मी IT मध्ये नव्हते, त्यामुळे त्याही बाबतीत मी थोडी मागे होते. नंतर मला IT मध्ये बिजनेस अ‍ॅनालिस्ट म्हणून नोकरी लागली. मग माझा ब्लॉग मी आणखी आकर्षक बनवला. त्याआधी ब्लॉगबद्दल मी फक्त इंटरनेटवरुन शिकले होते. मग मी प्रत्येक डिश जी बनवायचे ती ब्लॉगवर टाकायला लागले.

प्रश्नः . तुझा ब्लॉग cravecookclick.com - हे नाव ठरवण्यामागे खास असा काही विचार होता का? यातला "क्लिक" हा आधीपासून "क्लिक झालेला होता, की नंतर केव्हातरी हेही महत्त्वाचं आहे असं वाटलं?

अनिता: नाही. हाच तो क्रम होता. (हसून) मला जे खावंसं वाटत होतं, ते मी "कूक" करायचे. त्यानंतर ते कूक झालं की मी ते छान प्रेझेंटेबल असं बनवायचे. त्यानंतर मग मला फोटोग्राफी सुचली, की त्या डिशेसचे फोटोज चांगले असले पाहिजेत. मी चांगले फोटो काढण्यासाठी प्रयत्न करु लागले. मला त्या रेसिपीज सुंदर दिसाव्यात असं वाटायचं. मग मी फोटोग्राफी शिकले, तीही मी स्वतःहून ऑनलाइन शिकले. आणि मग एकदा मी पदार्थांचे फोटो काढायला शिकल्यावर मी पोर्ट्रेट्स, लँडस्केप्स असे फोटोग्राफीतले बाकी भागही शिकले. बरीच ट्युटोरियल्स ऑनलाइन असतात, मी त्यातूनच सगळं शिकले.

प्रश्नः या प्रेझेंटेशनमध्ये तुझ्यावर आईचा काही प्रभाव होता, की तुला स्वतःलाच कधीतरी असं जाणवलं की हेही महत्त्वाचं आहे?

अनिता: मला वाटतं, या बाबतीत मी इंटरनेटवरुन बरंच प्रभावित झाले. मुंबईमध्ये माझ्या घरी जास्त भर हा जास्त पदार्थ बनवण्यावर असायचा. तिकडे कसं दिसायला पाहिजे याकडे कुणी फार लक्ष देत नाही. अर्थात, ताटात भाजी कुठे असली पाहिजे किंवा भात कुठे असला पाहिजे याकडे लक्ष दिलं जायचं. पण रंगसंगती, पार्श्वभूमी यावर कुणी फार भर देत नाही, कुणी फार महत्त्व देत नाही. त्यामुळे मी ते जेव्हा मी स्वतः बर्‍याच फूड ब्लॉगर्सना फॉलो करायला लागले, त्यांचं काम पाहायला लागले, तेव्हा शिकायला लागले.

प्रश्नः मी तुझे काही फोटो पाहिलेत, आणि त्यावरुन असं लक्ष्यात येतं की तू त्यासाठी बरीच मेहनत घेतेस. कॅमेरा, लेन्स कोणते आहेत या गोष्टीकडेही लक्ष दिलं असशील. पण ज्या मुली नुकतीच सुरुवात करत आहेत, किंवा ज्यांना लगेच कॅमेरा, लेन्स यांत गुंतवणूक करायची नाहीये, साधा मोबाईल कॅमेरा किंवा "पॉइंट अँड शूट" कॅमेरा वापरत आहेत, त्यांच्यासाठी तू काही टिप्स देऊ शकतेस का की त्यातूनही छान फोटोग्राफी कशी करता येईल?

अनिता: खरं तर मी सहा वर्षांपूर्वी जेव्हा फोटो काढायला सुरुवात केली तेव्हा फोन-कॅमेरा फार पॉवरफुल नसायचा. आत्ताचे आय-फोन किंवा सॅमसंग फोनचे जे कॅमेरे आहेत, ते इतके चांगले आहेत की, त्याने काढलेला फोटो इतका सुंदर येतो, की मला वाटतं मी तो फोनमधलाच फोटो वापरू का? त्यामुळे कॅमेर्‍यापेक्षा तुमची कल्पकता की तुम्ही एखादी डिश कशी सादर करत आहात, तुमची रंगसंगती कशी आहे, तुमचे "प्रॉप्स" बरोबर आहेत का हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला एखादा फोटो ब्लो-अप करुन, प्रिंट करुन लावायचा आहे, त्यावेळी DSLR कॅमेरा वापरावा. पण जर तुम्ही फोटो तुमच्या ब्लॉगवर टाकण्याच्या उद्देशाने काढत असाल तर तुम्ही कोणत्या कॅमेर्‍याने काढताय त्याने फरक नाही पडत. तुम्ही फोननेही फोटो काढू शकता. आजकाल इतके अ‍ॅप्स असतात की त्याने एडिटिंग करु शकता. तुमचा ब्लॉगही तुम्ही फोनवरही लिहू शकता. मी बर्‍याच लोकांकडून असं ऐकते की ब्लॉग म्हणजे खूप काम आहे, फोटो काढा, एडिट करा, लिहा; पण आता असे अ‍ॅप्स आहेत की तुम्हाला लॅपटॉप उघडायचीही गरज नाही.

प्रश्नः बरोबर. आणखी एक मुद्दा मला विचारावासा वाटतो, की आपण बर्‍याचदा लहानपणीपासून स्वयंपाक केला नसला तरी बघत आलेलो असतो, की आई कशी स्वयंपाक करत आहेत. यात बर्‍याचदा प्रमाण अंदाजाने घेतलेलं असतं, मोजूनमापून असं फार कमी वेळा असतं. तू जेव्हा पाककृती ब्लॉगवर टाकतेस तेव्हा कसं करतेस?
अनिता: खरं आहे. मी जेव्हा माझ्या आईला फोन करुन विचारायचे तेव्हा तिला कधीच माहीत नसायचं की किती टेबलस्पून किंवा किती ग्रॅम, ती म्हणायची अंदाजाने. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही स्वयंपाक किंवा ब्लॉग सुरु करता तेव्हा तुम्हाला हे माहीत असणं फार गरजेचं आहे, की काय चांगलं किंवा काय कमी-जास्त पडलं की पदार्थ चांगला बनणार नाही. उदा. गरम मसाला तुम्ही जास्त टाकलात तर पदार्थ चुकणार, किंवा मीठ जास्त पडलं तर नक्कीच चुकणार. काही गोष्टी तुम्ही कमी-जास्त करु शकता. पण ज्यांची चव फार उग्र आहे त्याबाबतीत काळजी घ्यावी लागते. त्यात थोडासा अंदाज असावा, किंवा करुन करुन समजायला हवं. पण तुम्हाला सुरुवातीपासूनच चांगलं बनवायचं असेल तर तुम्हाला काय घातल्याने चवीत काय बदल होतो हे थोडं माहीत असायला हवं. मीही सुरुवातीला अंदाजानेच घालायचे. पण नंतर ब्लॉगवर लिहायला लागले तेव्हा स्वतःच मोजमाप घेऊन लिहू लागले.

प्रश्नः थोडक्यात असं म्हणता येईल की इथे आल्यावर कालांतराने हळूहळू तुझी स्वयंपाकाची आवड वाढत गेली?
अनिता: हो. कालांतराने वाढत गेली असं म्हणता येईल. माझी आवड ही जास्त गरजेतून निर्माण झाली.

प्रश्नः तुला अजूनही त्यातून आनंद मिळतो, की 'आता फार वर्षे झाली मी हे करत आहे, आणि मला आता कूकींगपासून ब्रेक घ्यायचाय' असं कधी वाटलं का?
अनिता: नाही. जर मला अगदी रोज असं जेवण बनवायला आवडत नाही, किंवा मला रोज कुणी स्वयंपाक करायला सांगितला तर मी जरा वैतागते. पण मला प्रयोग करुन बघायला आवडतं. मी कुठे नवीन काही पाहिलं तर मला बनवून बघावंसं वाटतं. म्हणजे मला एकच पदार्थ एकाच पद्धतीने बनवायला नाही आवडत. आधी आईकडे मी वर्षानुवर्षे एकाच चवीची भाजी खात आले आहे, पण मला आता असं वाटतं की एकाच चवीची भाजी नेहमी खाऊ नये. आज एका पद्धतीने बनवलं, तर उद्या दुसर्‍या पद्धतीने बनवून बघायचंय. मला एकसारखंच पुन्हा पुन्हा बनवायला नाही आवडत.

प्रश्नः तुझ्या ब्लॉगशी निगडीत अजून एक गोष्ट म्हणजे, cravecookclick चे meet-ups पण होतात ना? हे किती वेळा, किंवा कुठल्या खास प्रसंगी होतात का? याचा उद्देश काय, आणि या मीट-अप्समध्ये नक्की काय-काय होतं?
अनिता: असं झालं, की मी जेव्हा सहा वर्षांपूर्वी इथे बे-एरियामध्ये आले, तेव्हा माझे स्वतःचे असे मित्र-मैत्रिणी नव्हते. जे होते, ते माझ्या नवर्‍याचे होते, आणि ते खूप चांगले होते. ते फार मनमिळाऊ होते आणि त्यांनी लवकर मला सामावून घेतलं. ते माझेही स्नेही झाले.

पण नंतर मला लक्ष्यात आलं, की जेव्हा तुम्ही नवीन देशात येता, तेव्हा तुम्हाला तुमच्या परिस्थितीला ओळखणारे लोक, किंवा स्वतःचे असे मित्र बनवू शकता. त्यासाठी मला एक नेटवर्क बनवायचं होतं. ज्या मुलींना स्वयंपाकाचीही आवड आहे, सणवार साजरे करायला आवडतात, ज्यांच्यात भारतीय असल्याचा, एकमेकांना मदत करण्याचा समान धागा आहे. मला इथे आल्यावर सणवार साजरे करायला जास्त आवडायला लागलं. इथे येऊन बरेच लोक बर्‍याच गोष्टी शिकतात. जशी मी कूकींग शिकले, फोटोग्राफी शिकले, तसे बरेच जण काहीतरी कला शिकतात, ज्वेलरी, पॉटरी, कपकेक्स बनवतात. फूडीज आहेत जे बाकी बाबतीतही इतके प्रतिभावान आहेत, काही पूर्णवेळ नोकरीही करतात, नोकरी सांभाळून बाकी आवडीनिवडी जोपासतात. त्यांनी हे बाकी लोकांनाही दाखवलं तर त्यांनाही प्रेरणा मिळेल, तेही हे शिकतील. तर माझी कल्पना अशी होती की असे जे लोक आहेत त्यांना एकत्र बोलवायचं आणि त्यातल्या एखाद्या सदस्याला काहीतरी सादर करायला सांगायचं. मग ते झुंबा असो, की कपकेक्स आइसिंग. आमचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, साडीचा, फिटनेसचा, शोभेच्या वस्तूंचा, फूडचा. अशा प्रत्येक ग्रुपमधून मी कुणाला तरी काहीतरी सादर करु शकाल का हे सुचवते. मध्ये आम्ही गणपतीमध्ये महाराष्ट्रीयन जेवणाची थीम ठेवली होती, त्यात काही केटरर्स आले. जेव्हा इथे लोक नवीन आलेले असतात, काहींना जॉब नसतात, ज्यांना छोट्या-मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचाय त्यांना त्यांचे काम दाखवायला एक प्लॅटफॉर्म मिळतो. शिवाय, बाकीचे सभासद काहीतरी नवीन शिकतात.

आता मागच्या २ वर्षांत आम्ही २०-२५ वेळा भेटलो असू. त्यात काही एकमेकांच्या जवळच्या मैत्रिणी झाल्यात. त्या एकमेकींना हळदीकुंकू, गणपती, वाढदिवस अशा प्रसंगी बोलावतात. आता हे अशा स्त्रियांचं छान नेटवर्क झालंय - ज्यांना एकमेकींबरोबर शिकायला, शिकवायला, भेटायला आवडतं.

प्रश्नः खरंच छानच कल्पना आहे तुझी ही. हे मीट-अप्स कोण आयोजित करतं? तूच करतेस की बाकी सभासदही करतात?

अनिता: सुरुवातीला मीच केले, कारण एक "पुश" असला पाहिजे. तर माझा असा भर होता, की एक फूड थीम, एक attire थीम असली पाहिजे आणि एक डेमो असला पाहिजे. मला याचं स्वरुप किटी पार्टीसारखं नको होतं - की बायका आल्या, गप्पा मारल्या आणि निघून गेल्या. माझी कल्पना होती, की लोकांनी काहीतरी नवीन शिकावं आणि राबवावं. गप्पा मारण्यात काही गैर नाही, पण काहीतरी उद्देश असावा असं मला वाटतं. आता बाकी सदस्यांनीही पुढाकार घेऊन आणखी भेटी आयोजित केल्या, गरबा, दुर्गापूजा अश्या निमित्ताने. थोडक्यात, माझं प्राधान्य या भेटींमागे एक उद्दिष्ट असावं याला असतं.

प्रश्नः अनिता, तुझे फोटो पाहून हेही लक्ष्यात येतं, की तू साडी नेसणं किंवा एकूणच सजणं या सर्व गोष्टीही मनापासून एंजॉय करतेस. तर ते तू आधीपासून करायचीस, की या मीट-अप्समधून जास्त आवडायला लागलं?

अनिता: नाही, ती आवड मला आधीपासूनच होती. पण इथे आल्यापासून मला असं वाटायला लागलं, की मी त्याकडे जास्त लक्ष द्यायला लागले. रंगसंगती, अ‍ॅक्सेसरीज अशा गोष्टींकडे. शिवाय आता ब्लॉगवर पोस्ट करताना त्याबद्दल एक भावनिक जवळीक असते. मध्ये आम्ही नववारी नेसून Bay2Breakers race मध्ये पळालो. सगळ्या ड्रेस-अप्सना एक "मेमरी" द्यायचा मी एक प्रयत्न करते, आणि ते मी ब्लॉगवर पोस्ट करते. त्यामुळे दहा वर्षांनी जरी मी ते वाचलं, तर अमुक साडी मी का नेसले होते, कधी नेसले होते ते मला कळेल.

प्रश्नः तू तुझ्या ब्लॉगवर रेस्टॉरंट्सचे, फूड इव्हेंट्सचेही फोटोज, रिव्ह्यूज टाकतेस, तिथल्या डेकॉरचे फोटो टाकतेस. हे तू केव्हा सुरु केलंस?

अनिता: हे मी ब्लॉग सुरु केला तेव्हापासूनच पोस्ट करत होते. माझे सुरुवातीचे पोस्ट्स पाहिले तर त्यातही ते दिसेल. खरं तर ब्लॉग सुरु करण्यामागे माझा उद्देश माझे अनुभव शेअर करणे हा होता. समजा, मी एखाद्या चांगल्या जागी गेलीये तर मला लिहायला आवडतं, की तुम्हीही या जागी जाऊन बघा. एखादी नवीन वस्तू घेतली, कला शिकले, कुठे फिरायला गेले, अशा काहीही आवडीनिवडी असोत, मला वाटतं की त्या शेअर कराव्यात. मी ते फक्त स्वयंपाकापर्यंतच मर्यादित ठेवलं नाहीये. छोटे-मोठे आनंदाचे क्षण मला शेअर करायचेत. इथे बरेच फूडीज आहेत, त्यामुळे कुठे जेवण कसं आहे, सर्व्हीस कशी आहे हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे सर्व मी पोस्ट करते.

प्रश्नः मध्ये तू The Living Foodz Dilli Haat Cook-Off शेफ रणवीर ब्रार सोबत co-judge केला होतास. ती संधी तुला कशी मिळाली, आणि तो अनुभव कसा होता?

अनिता: त्यांची जी कमिटी होती, त्यांनी माझा ब्लॉग पाहिला होता, माझं काम पाहिलं होतं. त्यांनी मला परीक्षक म्हणून येणार का विचारल्यावर मी खूप आनंदी होते की इतक्या प्रसिद्ध शेफबरोबर ही संधी मिळणार आहे. हा अनुभवही खूप छान होता. इतके मोठे शेफही किती विनयशील असतात, हे पहायला मिळालं. आणि, पाककृतीतल्या बारकाव्यांकडे ते किती बारकाइने लक्ष देतात हे समजलं. म्हणजे हे सर्व फूड आर्ट, फ्यूजनला महत्त्व देतात हे आपल्याला माहीत असतं. पण, सर्वात ते चवीला महत्त्व देतात. तुम्ही कुठलीही डिश बनवा, कितीही सुंदर दिसणारी असो, पण ती चवीला चांगली असणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे. तर ते खूप छान अनुभवायला मिळालं, की असे विश्वविख्यात शेफ परीक्षक म्हणून कशाला महत्त्व देतात, यातून मलाही बरंच शिकायला मिळालं.

प्रश्नः हे सर्व झालं फूडबद्दल. जे "फूडी" आहेत, त्यांच्यासाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो आरोग्य. तू मॅरेथॉन पळालीस, किंवा ट्रेकींग करतेस - याला कशी सुरुवात झाली? तू आधीपासूनच स्पोर्ट्समध्ये होतीस?

अनिता: नाही, खरं तर मी कधीच फार खेळत वगैरे नव्हते. बर्‍याच भारतीय घरांमध्ये असतं तसं आरोग्याला दुय्यम महत्त्व होतं. 'खाऊन-पिऊन मस्त राहा' असंच माझ्या घरी होतं, फार तर मी शिवाजी पार्कला फिरायला गेले असेन. इथे आल्यावर मला लक्ष्यात आलं की, मी फार जास्त स्वयंपाक करत आहे - क्रीम, बटर, चीज, किंवा बेक करताना चॉकलेट असं बरंच आहारात जातंय आणि हे सर्व आपोआप जिरणार नाही. माझा नवरा मॅरेथॉन पळायचा आणि आमचे जवळचे काही मित्रही यात फार सहभागी होतात. त्यांना बघून मी फार प्रभावित व्हायचे, पण बरेच दिवस मी स्वतः सहभागी होत नव्हते. नंतर एकदा मी हे आव्हान समजून घेतलं आणि जमतंय का करुन पाहू असा विचार केला. मग मी "टीम आशा" बरोबर ट्रेनिंग करायला सुरुवात केली. "टीम आशा" भारतातल्या उपेक्षित मुलांसाठी निधी जमा करते. तर मी एका चांगल्या कार्यासाठी पळणार होते, आणि ते मला ट्रेनिंगही देणार होते. तो खूप छान अनुभव होता. शिवाय मला माझ्यातही जास्त उत्साह आल्याचं लक्ष्यात आलं. आधी मला वाटायचं की मी कशी पळायला जाणार आणि घरी येऊन मग केव्हा स्वयंपाक करणार? पण उलट माझ्यात जास्त जोम असायचा, कधी १५ मैल पळून आल्यावर मी मीट-अप्सला जायचे. त्यामुळे मी सर्वांनाच खाण्याबरोबर व्यायामालाही तेवढंच महत्त्व द्यावं हे सांगीन.

प्रश्नःआता मॅरेथॉननंतरही तू नियमितपणे व्यायाम करतेस का?

अनिता: हो, आमचा एक ग्रुप आहे. त्यात आम्ही आठवड्यातून तीन वेळा "zumba dance" करतो. अजूनही मी त्या क्लासेसना जाते.

प्रश्नः नोकरी, मीट-अप्स, ब्लॉग, फिरणे या सर्व गोष्टी कश्या साध्य करतेस? टाइम-मॅनेजमेंट ही तारेवरची कसरतच असते, तू हे सर्व कसं जमवतेस?

अनिता: . मी बर्‍याच गोष्टींचं नियोजन करुन ठेवते, माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. मला माहीत असतं, की पुढच्या महिन्यात मला काय काय करायचंय. शिवाय हे लिहून ठेवणंही महत्त्वाचं आहे, की अमुक महिन्यात हे मीट-अप आहे, अमुक महिन्यात कोणता सण आहे. समजा, काही दिवसांत गुढीपाडवा येत आहे, तर मला माझ्या ब्लॉगवर काय टाकायचंय. शिवाय पूर्णवेळ नोकरी आहे, तर हे सर्व मला त्या वेळा सांभाळून करावं लागतं. त्यामुळे घरी आल्यावर जेवण बनवून उरलेला वेळ वाया जाऊ न देण्याचा मी प्रयत्न करते - मग ते ब्लॉग लिहिणं असो, की एखादी गोष्ट प्लॅन करणं असो. यात महत्त्वाचं हे आहे, की तुम्ही कुठलीही गोष्ट शेवटच्या क्षणासाठी नाही ठेऊ शकत. तुम्हाला उद्या काहीतरी करायचंय आणि त्याचा आज प्लॅन करताय असं नाही जमत. तर आधीपासून प्लॅन करणं आणि लिहून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे.

प्रश्नः आपण सगळेच कधीतरी थकतो, कंटाळतो. एखाद्या दिवशी तूही कंटाळली आहेस, जेवायचं आहे पण बाहेरही खायचं नाहीये, अश्या वेळी तुझं "कम्फर्ट फूड" काय असतं?

अनिता: मला वरण-भात खूप आवडतो. आणि माझ्या नवर्‍यालाही तो छान बनवता येतो. त्यामुळे माझं कम्फर्ट फूड म्हणजे वरण भात. मी स्वतः तो बनवून छानपैकी खाते, किंवा त्याला बनवायला सांगते, तर तूप-वरण-भात हे माझ्यासाठी सर्वांत छान जेवण असतं.

प्रश्नः अनिता, वेगवेगळ्या मेडियामध्ये उल्लेख, प्रशंसा हे सगळं आता तुझ्या वाट्याला येतं. याबद्दल तुझ्या नवर्‍याला, बाकी घरच्यांना कसं वाटतं? खास करुन आईला, की तू आधी स्वयंपाकही नाही करायचीस आणि आता इतके जण तुला ओळखतात?

अनिता: (हसत) त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो! नवर्‍याने हा माझा पूर्ण प्रवास पाहिला आहे, तो यात नेहमीच माझ्याबरोबर होता, त्यामुळे त्याला फारसा नाही. आणि आधी जी ओढाताण व्हायची, चढ-उतार हे सर्व त्याने पाहिलंय आणि तोच यात बर्‍याचदा "गिनी-पिग" होता. पण जे भारतात होते, त्यांना हे माहीत नसायचं. त्यांना ब्लॉग-पोस्ट दिसायचे, फोटो दिसायचे, पण त्याच्यामागे इतकी मेहनत असायची. तर त्यांना असं वाटायचं की अचानक हे सगळं करायला मला कसं सुचलं? अर्थातच त्यांना या सगळ्या गोष्टींच खूप कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. भारतातल्या मैत्रिणींना कौतुक वाटतं. त्यांना माझा प्रवास जाणून घ्यायचा असतो. भारतात आपल्या आया अजूनही फार इंटरनेट वापरत नाहीत, त्यामुळे आईला याचं खूप कौतुक वाटतं. पण आता कुठे काही फोटो आला, उल्लेख असला की मी आईला व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवते. कुठल्याही आईसारखाच तिलाही खूप अभिमान वाटतो, ती ते फोटो नातेवाईकांना दाखवते, त्यांना सांगते.

प्रश्नः तू आम्हाला इतका वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप आभार. जाता-जाता आमच्या वाचकांसाठी काही सांगशील का?

अनिता: मला असं वाटतं की जेव्हा इथे कुणी नवीन येतात, तेव्हा नवीन देशात येऊन सर्व सुरु करणं अवघड असतं. भारतासारख्या गजबजलेल्या देशातून तुम्ही अमेरिकेसारख्या कमी लोकसंख्येच्या देशात येता तेव्हा ते जास्त जाणवतं. बे एरियामध्ये तरी भारतीय बरेच आहेत त्यामुळे घरापासून लांब आल्याचं तेवढं वाईट वाटत नाही. पण दुसर्‍या काही जागी, जिथे लोक कमी असतात तेव्हा काही जण जरा खिन्न होतात, त्यांना उदास वाटतं. त्यांना मला हे सांगायचंय की, तुमच्याकडे जो काही वेळ आहे, तो 'इथे किती उदासवाणं आहे' असा विचार करण्यात घालवू नका, किंवा इथे कुठे आलो असा विचार करु नका. त्याऐवजी तो वेळ काही शिकण्यात सत्कारणी लावा. या देशात ती खूप जमेची बाजू आहे, की तुम्ही केव्हाही काहीही शिकू शकता, ६० वर्षांचे असाल तरी कॉलेजमध्ये जाऊ शकता, करिअरसाठी, छंदासाठी नवीन काही शिकू शकता. त्यामुळे एकलकोंडे, उदास होऊन बसू नका. तो वेळ काहीतरी चांगलं करण्यासाठी द्या. मीही यातून गेले होते, आणि तो वेळ मी हे नवीन काही शिकण्यात घालवला तर आळशीपणात घालवला असता. तर रिकामे बसू नका, स्वतःला व्यस्त ठेवा, लोकांना भेटा. म्हणून मला हे मीट-अप्स खूप आनंद मिळवून देतात की कुठेतरी मी काहींना संधी देत आहे की त्या बाकीच्यांना भेटू शकतात, बोलू शकतात. तर तुमच्या आवडीचा ग्रुप शोधा, लोकांना भेटा, एकटे राहू नका. तुमच्या आवडीचं काही करुन त्यातून आनंद घ्या!

(फोटो - अनिता मोकाशीकडून साभार)

1

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2017 - 3:28 am | सानिकास्वप्निल

मी अनिताची फॅन आहे आणि तिची ही मुलाखत वाचताना मला खूप खूप आनंद होतोय.
रूपी अगदी सुरेख घेतलियेस मुलाखत :)
अनिताबद्दल इतकी माहिती जणून छान वाटले.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 8:35 am | प्रीत-मोहर

स्वयंपाकात ढ असणार्या माझ्या सारखीला अनिताने पण अशी सुरवात केली होती हे वाचून थोडा दिलासा वाटला ;)

पैसा's picture

9 Mar 2017 - 5:58 pm | पैसा

खूप छान ओळख!

ही मुलाखतही आवडली गं रुपी. या मुलींचे कौतुक वाटते.

इडली डोसा's picture

10 Mar 2017 - 4:32 am | इडली डोसा

मी सर्वांनाच खाण्याबरोबर व्यायामालाही तेवढंच महत्त्व द्यावं हे सांगीन.

हा खूप मोलाचा सल्ला आहे.

खरीखुरी सुपरगर्ल आहे अनिता.
रुपी, बेस्ट झालीये मुलाखत.

सुचेता's picture

10 Mar 2017 - 6:14 pm | सुचेता

एकुणच ब्लॉग बद्दल , अनिताबद्दल इतकी माहिती जणून छान वाटले.

पियुशा's picture

11 Mar 2017 - 11:44 am | पियुशा

सुरेख मुलाखत !!!

सर्वांना धन्यवाद. अनिता इतकी लहान असूनही तिच्याकडून फार शिकण्यासारखे आहे हे मला या गप्पा मारताना जाणवले. शेवटी तिने दिलेला सल्ला खरंच खूप मोलाचा आहे.

ही मुलाखत मी घेऊ शकले त्याचेही श्रेय सानिकालाच!