बरेच दिवस मूगडाळ हलवा खायची इच्छा होत होती .
पण घरातली मुगाची डाळ संपली होती आणि नेमकी तेव्हाच मित्राला 'भारतीय वाण्याकडून मसूर आण' सांगितल्यावर त्याने अख्ख्या मसूराच्या जागी (उसळ करायला. हो, फार छान लागते) चुकून ढीगभर मसुरीची डाळ आणून गळ्यात मारली.
मग तिची विल्हेवाट लावायला 'मूग मसूर भाई भाई' म्हणत मसूरडाळीचा हलवा करायचे ठरवले.
श्रीमती तरला दलाल यांच्या मूगडाळ हलव्याच्या पाककृतीतल्या डाळ भिजवणे, वाटणे आणि त्यापायी सत्राशेसाठ भांडी खराब करणे वगैरे गोष्टींना फाटा देऊन साधी सोपी कृती अमलात आणली
साहित्य
एक वाटी मुगाची डाळ
एक वाटी साखर
एक वाटी तूप
एक वाटी चिकाटी/सहनशीलता (पेशन्स)
अर्धा वाटी दूध
शंभर ग्राम बदाम
सात आठ वेलच्या (पूड करून)
अर्धे जायफळ (किसून. मूळ कृतीत केशर सांगितले आहे. पण ते घरी नव्हते. नसायचेच)
टीप: चित्रात तूप आणि साखर वर नोंदवलेल्या प्रमाणापेक्षा कमी घेतलेले दाखवले आहे. पण हलवा बनवायला लागल्यावर तो माझा भाबडेपणा होता हे लक्षात आले. तदुपरांत, प्रसरणशील कमरेला 'नक्की कार्डीओ करेन पुढच्या आठवड्यात' वगैरे (भोळी) वचने दिली आणि झक्कत अख्खी एक-एक वाटी तूप आणि साखर घातली.
कृती
मूळ कृतीत सांगितल्याप्रमाणे डाळ तीन-तीन तास भिजवायला वेळ नसल्याने, अगदी थोड्या पाण्यासह डाळ कुकर मध्ये घेतली आणि अतिशय कमी आचेवर शिटीसकट गरम करायला ठेवली
पाणी कमी असणे महत्वाचे आहे कारण हलवा बनवताना ह्याच पाण्याचे बाष्पीभवन करायचे आहे.
एक शिटी होईल ना होईल इतपत वाफ देऊन गॅस बंद केला. साधारण दहाएक मिनिटे.
डाळ छान खुलून पिवळी, फडफडीत झाली.
थोडी कच्ची राहिली तरी हरकत नाही.
नंतर त्याच कुकर मध्ये तूप घेऊन डाळ परतायला सुरवात केली.
ह्याच वेळी वाटीभर चिकाटी गरजेची आहे. कारण हे वेळखाऊ आणि मेहनतीचे काम आहे.
पण कठीण मुळीच नाही.
डाळ भांड्याच्या बुडाशी चिकटणार नाहीशी झाल्यावर दूध घातले, जे पटकन मिसळून गेले.
पुढे त्यात वेलचीची पूड आणि किसलेले जायफळ घातले आणि सरतेशेवटी साखर घातली
साखर आधी घालू नये कारण ती जळण्याचा संभव आहे.
मग डाळ परतत ठेवली नि हवा तसा रंग आणि ढवळायचा कंटाळा आल्यावर गॅस बंद केला.
हलवा भांड्याला चिकटेनासा झाला पाहिजे.
फोडलेल्या (चिरलेल्या नव्हे) बदामांनी सजवून पेश है - मसूर दाल हलवा
दिसायला पुरणासारखा 'वेष बावळा' असला तरी चवीला अगदी मुगाच्या डाळीच्या हलव्यासारखाच!
दोन खवय्ये/ चार आम आदमींना सहज पुरेल.
ता. क:
बदाम फोडायची सोपी कृती -
एक दणकट मग घ्या.
नाजूक वा पाहुणे आल्यावर काढायचा असतो त्यापैकी कप नको.
'जुम्मा चुम्मा दे दे' मध्ये अमिताभने धरला होता तसा मजबूत हवा.
बशीत/ कापफळ्यावर (चॉपिंग बोर्ड) बदाम पसरून ठेवा.
मग मग आडवा (त्याचे तोंड समोर होईल असा) धरून एका बदामावर मोहर (निळ्या शाईचा स्टॅम्प) उमटवायला वापरतो तितुका जोर लावून फटका मारा.
जास्त जोर नको मग,बदाम,बशी ह्या पैकी काहीही तुटेल.
उचितजोर फटका मारलात कि बदाम तुटून त्याचे छोटे तुकडे होतील.
मग काय, मग उचला आणि सुरु व्हा - एक बदाम, एक फटका
शंभरेक ग्राम बदामांना पंधराएक फटके पुरेत.
सजावटीसाठी बदाम तुकडे एका मिनिटाच्या आत तयार!
प्रतिक्रिया
14 Feb 2017 - 2:36 am | राघवेंद्र
छान आहे !!!
14 Feb 2017 - 3:11 am | रेवती
पहिल्यांदाच पाहतिये ही पाकृ.
14 Feb 2017 - 8:05 am | अत्रुप्त आत्मा
दर्दी पाक क्रुती
14 Feb 2017 - 8:09 am | सूड
एक तो घोडा बोलो नै तो चतुर बोलो, ये मुंग मसूर, मुंग मसूर क्या हय?
14 Feb 2017 - 9:26 pm | आषाढ_दर्द_गाणे
लिहिता लेख भूलचूकीने,
रुसला हतमलचा एकदाच मूड।
होती ना तीन चित्रे, नि उल्लेख छप्पन्न,
तरी मजवर उगी बरसले श्री. सूड।।
हतमल = HTML
चित्रे, उल्लेख = मसुरीची/चे
15 Feb 2017 - 6:49 pm | सूड
अंगत पंगत वरच्या सुरंगा दातार यांची प्रतिक्रिया वाचल्यासारखं वाटलं.
16 Feb 2017 - 4:12 am | आषाढ_दर्द_गाणे
16 Feb 2017 - 2:27 pm | सूड
अंगत्पंगत नामक पेज आहे चेपुवर, मराठी रेसिपीजचं. त्यातली एक व्यक्ती अशा कविता पाडत असते.
21 Feb 2017 - 4:05 pm | Nitin Palkar
हलवा करू तेव्हा करू, पाकृ पेक्षा कविता अधिक छान वाटतेय. हलव्यामध्ये टाकलेल्या बदामांकारता मी वापरत असलेली पद्धत, (पण त्याकरता चिकाटी अजून अर्धी वाटी लागेल) बदाम अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा, सोलून घ्या आणि काप करा. बदामाची चव अधिक चांगली लागते. एक वाटी डाळीला शंभर ग्राम बदाम अंमळ जास्त वाटतात.
14 Feb 2017 - 8:27 am | कैवल्यसिंह
पाककृती मस्तय... पण साहित्यामधे मुगाची डाळ लिहीली आहे.. व साहित्याच्या फोटूमधे तर मसुर डाळ दिसतेय.. नक्की कोणती डाळ?
तसही मला जास्त गोड पदार्थ आवडत नाहीत.. स्पायसी पदार्थ भरपूर आवडतात..
14 Feb 2017 - 9:24 am | पैसा
पाकृ एकदम ढिंच्याक लिहिता, पण मधेच हिट्विकेट होता. साहित्यात मूगडाळ कशी काय आली अचानक! बरं हा खाल्ल्यावर मूगडाळीचा हलवा खाऊन होते तशीच समाधिस्त अवस्था होते का?
14 Feb 2017 - 9:24 pm | आषाढ_दर्द_गाणे
अगदी.
ह्यावेळी अतिशहाणपणा अंगचट आला.
ते मुगाची लिहिलेय तिथे खरे तर मुगाची मसुरीची असे लिहायचे होते.
रिव्हर्स स्वीप मारताना हिटविकेट!
तरी नशीब फोटो नीट दिसतायत ह्या वेळी.
समाधीचे माहित नाही, पण निद्रादेवी नक्की प्रसन्न होते!
तूप, साखर आणि जायफळ एकत्र खाल्ल्यावर अजून काय होणार म्हणा...
14 Feb 2017 - 11:29 am | पिंगू
आषाढ, थंडी गेली आणि हलवा आता आला होय.. बाकी, साहित्य यादी मध्ये मसूर डाळच टाका.. (एक वाटी मुगाची डाळ)
14 Feb 2017 - 12:55 pm | तुषार काळभोर
.
..
.
.
...
.
....
..
...
15 Feb 2017 - 6:26 pm | नूतन सावंत
मसूर डाळ खुश झाली असेल कुणी मला गोड पदार्थात वापरलं म्हणून,पण पाककृती करून पहिली पाहिजे,शिजवून झाल्यवरची कृती मावेत केली तर सोपी होईल पाककृती.
16 Feb 2017 - 4:06 am | आषाढ_दर्द_गाणे
म्हणजे मावा वापरायचा असे म्हणताय का?
तो कुठून मिळणार इथे?
असो.
तुम्ही पाकृ केलीत तर कशी झाली ते कळवा
16 Feb 2017 - 10:08 am | पिंगू
मायक्रोवेव्ह रे. मावा नाय..
12 Mar 2017 - 11:40 pm | बॅटमॅन
आयला जबरीच! कभी करके देखता हूँ.
19 Mar 2017 - 3:29 pm | स्वाती दिनेश
दिसतो आहे हलवा. करून बघायला हवा.
स्वाती