तीन हटके रेसिपी (सांजा, अंडाकरी आणि सोयाबीनची भजी)

वसंत वडाळकर_मालेगांव's picture
वसंत वडाळकर_मालेगांव in पाककृती
13 Feb 2017 - 12:01 pm

नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळा सांजा आणि वेगळी अंडाकरी तसेच सोयाबीनची भजी यांची रेसिपी आज मी तुम्हाला सांगतो.

रेसिपी १ - अफलातून सांजा

आपण सांजा (जाड कणिक किंवा रवा भाजून केलेला उपमा) किंवा उक्कड पेंडी (बारीक कणिक भाजून केलेला उपमा) करतांना प्रथम रवा किंवा कणिक भाजून घेतो. त्यानंतर काजलेले रवा किंवा कणिक बाजूला काढून कढईत प्रथम तेल किंवा फोडणीसाठी मोहरी किंवा जीरे वापरतो.

त्यानंतर मिरची, कांदा आणि टमाटे टाकून व्यवस्थित शिजवून घेतो. मग तिखट, मीठ, मसाला टाकून शेवटी पाणी टाकतो. पाणी उकळल्यावर त्यामध्ये भाजलेला रवा किंवा कणिक टाकून शिजवून घेतो.

ही झाली नेहमीची पद्धत! पण मी आपणाला एक नवीन पद्धत सांगतो आहे. त्यानुसार आपण एकदा करून पहा, आपणाला नक्की आवडेल आणि खायला सुंदर आणि स्वादिष्ट लागेल!

1. एका पातेल्यात दोन कप पाणी घ्या. त्यामध्ये तेल, जिरे आणि ठेचलेले लसूण, कांदा, टमाटे तसेच तिखट, मीठ, मसाला टाका.

2. ते पाणी उकळू द्या. तोपर्यंत रवा किंवा कणिक भाजत राहा.

3. पाणी उकळू लागले की ते भाजलेल्या रवा किंवा कणिकेवर टाका आणि शिजू द्या.

अशा पद्धतीने केलेला रवा किंवा उक्कड पेंडी खूप स्वादिष्ट लागते. जेव्हा हे पदार्थ घरी मी बनवतो तेव्हा हीच पद्धत वापरतो.

याचप्रमाणे वरील उकळत्या पाण्यात भाजीच्या फोडी टाकून भाजी शिजवता येते. त्यामुळे फोडणी जळत नाही आणि जळका वास सुद्धा लागत नाही.

------
रेसिपी २ - हटके अंडाकरी

साहित्य:
अर्धी वाटी ओले खोबरे, दोन कांदे;
लसूण, आले आणि कोथिंबीर यांची पेस्ट;
तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला;
आवश्यकतेनुसार तेल
आणि चार अंडी

कृती:
१. प्रथम ओले खोबरे व कांदे भाजून त्याची पेस्ट करावी. कढई मध्ये तेल टाकून जीऱ्याची फोडणी द्यावी.
२. ओले खोबरे व कांदे पेस्ट त्यात टाकून तेल सुटेपर्यंतशिजू द्यावे.
३. मग आले, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट टाकावी.
४. त्यात तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला हे आवश्यकतेनुसार टाकावे.
५. मग तीन कप पाणी टाकावे.
६. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चार अंडी फोडून "कच्ची" टाकावी.
७. दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्यावे.

यात हटके काय आहे?
आपण नेहेमी करतो त्या अंडाकरी मध्ये अंडी आपण आधी उकडून घेतो.
मात्र येथे वापरलेल्या पद्धतीनुसार पनीर करतांना ज्याप्रमाणे दुध फाटते त्याप्रमाणे यात अंडी फाटतात.
ही अंडाकरी भातासोबत आणि भाकरीसोबत चांगली लागते.

रेसिपी ३ - सोयाबीन वड्यांची भजी

आपण नेहमी कांदा, गिलके, बटाटे यांची भजी करतो. याचप्रमाणे सोयाबीन ची सुद्धा भजी बनवता येतात व ती दिसायलाही एकसारखी आणि गोल दिसतात.

साहित्य:
१) सोयाबीन वड्या १५ ते २०
२) बेसन पीठ
३) तिखट, मीठ, हळद आवश्यकतेनुसार
४) तेल

कृती:
१) प्रथम सोयाबीन वड्यागरम पाण्यात दोन तास भिजत ठेवा आणि त्यानंतर वड्यातील पाणी काढून टाका
२) मग बेसन पीठ घेऊन त्यात चवीनुसार व आवश्यकतेनुसार हळद व तिखट मिसळा. मग त्यात पाणी टाकून सोयाबीन वड्यांना लागेल असे पीठ भिजवा.
३) भिजलेल्या पिठात सोयाबीन वड्या टाकून गरम केलेल्या तेलात टाळून घ्या
४) हे सोयाबीन चे भाजे फार चवदार व खुसखुशीत लागतात.
५) ही भजी हिरव्या मिरचीच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खावीत. चवदार लागतात!

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

13 Feb 2017 - 1:06 pm | संजय पाटिल

अंडाकरीची ही पद्धत माहित होती. बाकिच्या दोन पहिल्यांदाच वाचल्या. फोटु हवे होते.

सस्नेह's picture

13 Feb 2017 - 1:09 pm | सस्नेह

कल्पक पाकृ.

कैवल्यसिंह's picture

13 Feb 2017 - 3:46 pm | कैवल्यसिंह

मस्तच.. अशी अंडाकरी आम्ही नेहमीच करतो त्यामुळे हि पद्धत माहित आहे.. पण उपमा/सांजा व सोयाबीन वड्यांची भजी ह्या दोन्ही जरा वेगळ्या व जरा हटके पद्धती आहेत.. करुन बघन्यात येतील..

तेजस आठवले's picture

13 Feb 2017 - 5:53 pm | तेजस आठवले

सोयाबीन वड्या नक्की कश्या प्रकारे खाव्यात ? एकूणच ते प्रकरण काही समजत नाही.
एका ठिकाणी वाचले आहे कि कुकर ला २ शिट्ट्या काढून पाणी काढून टाकावे, तर अजून एका ठिकाणी वाचले कि पाण्यात १५ मिनिटे उकळून घ्यायच्या आणि दाबून पाणी काढून टाकायचे आणि मग वापराव्यात.
वरती आपण लिहिले आहे कि २ तास गरम पाण्यात भिजवावे.
नेहमी खाणारे काही मार्गदर्शन करू शकतील का ? एकूणच त्या वड्यांचा स्पंज सारखा पोत आणि रबरासारखा चिवटपणा बघून ते खावेसे वाटत नाहीत. ते खाल्लेले पचतात कि स्पंज तसाच बाहेर ? :)
आणि त्यामध्ये खरंच उच्च प्रतीची प्रथिने असतात का ? का उगीचच हाइप आहे ?

संदीप डांगे's picture

13 Feb 2017 - 6:43 pm | संदीप डांगे

मला तर एकूण सोयाबीन ह्या प्रकाराबद्दलच शंका आहे. तेल आणि वड्याही.. हे आरोग्यास उपायकारक आहे की हानिकारक ह्याबद्दल डॉक्टरांमध्येही एकमत नाही. आमच्या घरात सोयाबीन तेल आणणे गेली पाच वर्षे बंद केलं आहे. महाग असले तरी मराठी जेवणाकरता शेंगदाना तेल उत्तम. अथवा सूर्यफूल..

स्मिता.'s picture

13 Feb 2017 - 9:57 pm | स्मिता.

माझ्या आजीची हॄदयविकाराच्या झटक्यानंतर रुबी हॉस्पिटलात शस्त्रक्रिया झाली होती. तिथे पथ्य-पाण्याबद्दल बोलतांना जेव्हा डॉक्टरांना विचारले की भाज्या वगैरे बनवायला सोयाबीन तेल वापरावे का तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मते सोयाबीनचे तेल हे आरोग्यास उपायकारक नसून हानिकारक आहे. डॉक्टरांनी आजीला अगदी प्रमाणात वापरून शेंगदाणा तेलाच्याच भाज्या खाण्याचा सल्ला दिला.

तेजस आठवले's picture

13 Feb 2017 - 10:10 pm | तेजस आठवले

+१
मला पण असेच वाटते. तसेच राईस ब्रान तेलाचे पण. कोणाला तरी काहीतरी मार्केट मध्ये खपवण्यासाठी केलेल्या ह्या मार्केटिंग गिमिक वाटतात. शेंगदाण्याचे तेल सर्वात उत्तम.

Nitin Palkar's picture

20 Feb 2017 - 2:57 pm | Nitin Palkar

हा स्पंज कम रबर सहज पचतो. उच्च प्रथिने या बाबत काही माहिती नाही. गरम मसाला घालून केलेली सुकी अथवा लिप्ती भाजी चविष्ट लागते.

पैसा's picture

13 Feb 2017 - 6:36 pm | पैसा

अंडाकरी माहीत आहे. मॅगीसारखा उकडलेला सांजा आणि सोयाबीन भजी हे नवीन प्रकार आहेत. करून बघायला पाहिजेत.

सूड's picture

13 Feb 2017 - 9:38 pm | सूड

फोटो??

अरे वा! आमच्याकडे उपमा असाच करतात - छान होतो. बाकी दोन माहिती नव्हत्या. अंडाकरी नक्की करुन बघेन ! पुढच्या वेळी फोटो नक्की टाका

आषाढ_दर्द_गाणे's picture

14 Feb 2017 - 2:12 am | आषाढ_दर्द_गाणे

तोन्पासु, पाककृतीकरता धन्यवाद!

सोयाबीन ची भाजी अथवा भात चांगला लागतो! दोन तास एवढा वेळ भिजवावे लागत नाही, गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून, पाणी दाबून काढून टाकावे, वरील अंडाकरीच्या मसाल्यात घालून सुध्दा भाजी छान होईल.

सविता००१'s picture

6 Mar 2017 - 4:08 pm | सविता००१

आम्ही असा फक्त उपमा करतो. आता सांजा पण करून पाहीन.
सोयाबीन्ची भजी पहिल्यांदाच ऐक्ली. मी फक्त त्या भाजीसाठी नाहितर बिर्याणीत वापरते. आता हे पण करीन.मस्त कल्पना आहेत.
पण सोया चंक्स इतका वेळ भिजवून नाही ठेवायला लागत हो. अर्धा तास बास झाला. तिखट पदार्थ असेल तर किंचित मीठ घालून उकळलेल्या पाण्यात २० मि. ठेवून पाणी काढून टाका आणि वापरा. जर गोड पदार्थ असेल तर मीठ नाही घालायचं.