फॅशनची दुनिया -अमला काळे

Primary tabs

स्वप्नांची राणी's picture
स्वप्नांची राणी in लेखमाला
8 Mar 2017 - 6:26 am

.

दोह्याच्या सोशल सर्किटमध्ये उंच, देखण्या अमलाचा सहज वावर डोळ्यात भरण्यासारखा असतो. प्रत्येक वेळी ती वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस तितक्याच आत्मविश्वासाने कॅरी करताना दिसायची. 'किती सुंदर आहे ही, एखाद्या मॉडेलसारखीच!!' असाच विचार नेहमी मनात यायचा आणि कळलं की अमला खरंच त्या ग्लॅमर विश्वामधलीच आहे. फॅशनच्या जगात मराठी नावं तशी अपवादानेच दिसतात. मग अमलाचा हा प्रवास कसा होता, हे तिलाच विचारायचं ठरवलं. तिच्याशी माझी फारच तुटपुंजी ओळख होती आणि ती इतक्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अॅक्टिव्ह दिसायची की तिला या मुलाखतीसाठी वेळ तरी काढता येईल का, अशी एक शंका होती. पण तिला निरोप पाठवला आणि त्याच तत्परतेने तिचं उत्तरही आलं. तिच्याशी ग्लॅमरच्या चकाचक दुनियेबद्दल बोलायचं म्हणून तसे प्रश्नही काढून ठेवले.

आणि अमला जे काही बोलली, त्याने मी स्तिमित झाले. मला माहीत असलेली फॅशनेबल अमला म्हणजे जणू हिमनगाचं फक्त दिसणारं एक टोक होतं!!

.

प्रश्नः अमला, मराठी मुलगी आणि फॅशन शोज, मॉडेलिंगचं हे ग्लॅमरस जग. आपल्याला मुख्यतः पेज थ्री किंवा फॅशन अशा सिनेमांमधूनच ह्या क्षेत्राची बरी-वाईट ओळख झालेली असते. मग तू कशी काय वळलीस इकडे? तुझ्या घरात अशी काही पार्श्वभूमी होती का?

अमला: नाही गं. कसलीही पार्श्वभूमी नव्हती. मी या फील्डमध्ये आले याचं संपूर्ण श्रेय माझ्या बाबांना. माझी आई ख्रिश्चन आणि वडील मराठी. आईला मराठी संस्कृती आवडायची आणि ती पूर्णपणे आत्मसात करण्याकडेच तिचा कल होता. पण डॅड मात्र अगदी मॉडर्न विचारांचे होते. आईने मला स्वयंपाकघरात काही शिकवायचा प्रयत्न केला तरी ते विरोध करायचे. घरकामही शिकले मी, पण ओढा मात्र गाडी उडवणं, भटकंतीकडेच होता. मी अगदी टॉमबॉइश होते आणि डॅडचा मला पूर्ण पाठिंबा होता. त्यातून त्यांच्या जॉबमुळे त्यांना बर्‍याचदा परदेशी जावं लागायचं. मग तर मी अक्षरशः उंडारायचेच! संपूर्ण स्वातंत्र्य!! पण कुठेतरी त्यांच्या अनुपस्थितीमुळेच माझ्यात एक जबाबदारीची जाणीवही आली. एकदा असेच ते परत आले असताना त्यांनीच ठरवलं की माझा पोर्टफोलिओ करायचा. खरं सांगते, या फील्डमध्ये त्यांनीच मला आणलं आणि त्यांच्याचमुळे मी इथून बाहेरही पडले. मला अजिबात इच्छा नव्हती पोर्टफोलियोला जायची. तो मेकप मला मुळीच आवडला नाही आणि मी रडायलाच लागले. अवघी पंधरा वर्षांचीच तर होते. त्यांनी मग मला कॅडबरी दिली आणि कसंबसं बाबापुता करत तो अत्यंत बाळबोध पोर्टफोलिओ पार पडला. मग अॅड एजन्सीजमध्ये माझे फॉर्म्स भरून पाठवणं हेही डॅडनीच केलं आणि चक्क मला बर्‍याच ठिकाणांहून कॉल्सही येऊ लागले. रेनॉल्ड्स ही माझी पहिली असाईनमेंट होती. त्यानंतर क्रॅकजॅकची अॅडही मी केली. एका कॉलेजच्या इव्हेंटसाठी मी पहिला रॅम्पवॉक केला. माझं काम वाढत होतं. पण तरीही या सगळ्या ठिकाणी माझे डॅडच मला घेऊन जात. ते नसताना एकटीने जायची मला परवानगी नव्हती.

प्रश्नः पण असं का? ही कुठेतरी मराठी मध्यमवर्गीय मानसिकताच डोकावत होती का त्यांच्यात?

अमला: अगदी अगदी! मला त्याच सुमारास एका सिरियलमधे मुख्य भूमिका ऑफर झाली. पण पूर्ण शूटिंग रात्रीच्याच शिफ्टमढ्ये होणार होतं. डॅड बाहेरगावी, त्यामुळे आई आणि भावाला माझ्यासोबत यावं लागायचं. सगळ्यांच्या वेळा काही जमेनात. मग डॅडनी मला काम करण्यावरच बंदी घातली. आता कुठे मला हे काम आवडू लागलं होतं, तोच ते निव्वळ वडिलांच्या हट्टामुळे सोडून द्यावं लागलं. मला काहीही करून स्वतंत्र व्हायचं होतं. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि एका ठिकाणी रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करू लागले. एअर होस्टेस बनावं असा विचार करून मी ते कोर्सेसही सुरू केले. पण परत डॅडचा अगम्य विरोध. झालं... इतकी उत्साही, तरुण मुलगी मी. माझा जगण्यातला रसच जणू संपला! डॅडनी माझ्यासाठी बघितलेल्या पहिल्याच मुलाला फोटोही न बघता होकार देऊन मी मोकळी झाले. शारजा, युनायटेड अरब एमीरेट्समध्ये राहणारा राजेश सुदैवाने अगदी उमद्या मनाचा, विचारांचा मुलगा निघाला. मीसुद्धा तिथे परत एक नवीन नोकरीही सुरू केली.

प्रश्नः इथूनच तू दुसरी इनिंग्ज खेळायला सज्ज झालीस का?

अमला: इनिंग्ज म्हणण्यापेक्षा कलाटणीच म्हण ना!! नियती माझ्याशी कसे खेळ खेळत होती बघ. हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला जाणं म्हणजे काय, हे माझ्या आयुष्यात मला परत परत अनुभवायला मिळालंय. लग्न होऊन जरा कुठे मोकळा श्वास घेतेय, तोच बाळाची चाहूल आणि आमचं हे बाळ प्रचंड घाईतच होतं, कारण साडेपाच महिन्यातच त्याचा जन्म झाला. अपुर्‍या दिवसांचा, अवघ्या साडेपाचशे ग्रॅम वजनाचा जीव. स्वतःहून श्वासही घेऊ शकत नव्हता. तो आहे हेही मला पहिले काही दिवस समजलं नव्हतं. पण त्याला पाहिलं आणि मी सरळ बॅग्ज भरून त्याच्याच सोबत हॉस्पिटलमध्येच घर थाटलं! पाच-सहा महिन्यांत बाळाचं वजन वाढलं, पण माझ्या लक्षात आलं की बाळ एकदाही रडला नव्हता आणि तो माझ्याकडे पाहतही नव्हता. त्याचं पूर्ण चेकप झाल्यावर डॉक्टरांनी मला हादरवून टाकणारी बातमी सांगितली... माझं बाळ पूर्णपणे अंध होतं आणि हे कायम अंधत्व होतं, कुठल्याही उपचारांपलीकडचं! हा जबर धक्का होता. डिनायल ते अॅक्सेप्टन्सच्या सगळ्या आवर्तनातून गेले मी. पण सावरणं भाग होतं. कारण आता आव्हानं आणखीनच कठीण झाली होती. एक वर्षं बाळ ऑक्सिजनवरच होतं. मग आम्ही त्याला घरी घेऊन गेलो. मी स्वतःला बाळाशी बांधूनच घेतलं. तीन वर्षांचा झाल्यावर परत एकदा मोठ्या आशेने त्याला शंकरा नेत्रालयला दाखवलं... पण उपयोग शून्य होता. बाळ अंधच राहणार होता. त्याच सुमारास मी आमच्या दुसर्‍या बाळाची आई झाले होते आणि हे बाळ नॉर्मल होतं, हा आमच्यासाठी खूपच मोठा दिलासा होता!!

आम्हाला कळलं की दोहा, कतार इथे अंध मुलांच्या शिक्षणाची सोय होती. अल नूर ही शाळा. संचयच्या शिक्षणासाठी आम्ही दोह्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्याला इतरही अनेक प्रॉब्लेम्स होते, हे हळूहळू लक्षात येत होतं. तो नीट चालू शकत नव्हता. त्याला बोलता येण्यासाठी स्पीच थेरपीची गरज होती. नॉर्मल मुलांच्या शाळेत तो शिकू शकत नव्हता. मग मीच त्याची शिक्षिका झाले. त्याची शाळा, त्याच्यासाठी हॉस्पिटलच्या फेर्‍या.... सगळी जबाबदारी उचलली मी.

प्रश्नः किती धावपळ होत असेल तुझी. या सगळ्यातून तू परत ग्लॅमरच्या जगात कशी परतलीस? या सगळ्यासाठी वेळ कसा मॅनेज करायचीस? कारण मॉडेलिंग करायचं म्हणजे फिटनेस हवाच. सडपातळ राहणं, त्वचेची, केसांची सातत्याने जपणूक... कसं काय सांभाळलस हे?

अमला: धावपळ तर खरीच गं. माझं आयुष्य म्हणजे घड्याळाच्या काट्यांवर सतत धावणारं मशीन झालं होतं. पण माझ्या मनाला, शरीराला रिलॅक्सेशनची खरंच खूप खूप गरज होती आणि तेव्हाच इंडियन वूमन्स असोसिएशनमध्ये अनिता दीदींशी माझी ओळख झाली. दोह्याच्या इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात त्यांचं नाव होतं. त्यांनीच मला परत या फील्डमध्ये आणलं.

मला दोह्यातला माझा पहिला शो मिळाला तो हबीबचा आणि मग मला दर दोन महीन्यांनी असे बरेच रँपवॉक शोज मिळाले. त्यात मर्सिडीझ-बेंझ, दोहा फिएस्टा हे उल्लेखनीय होते. यात यशस्वी झाल्यावर मला चक्क बर्‍यापैकी पैसाही मिळू लागला. त्या वेळी जवळपास १०००० रु/तास इतके देत होते. दोन-तीन तासांचं काम आणि फॅमिली टाइमही भरपूर मिळत होता मला. खूश होते मी. खरं सांगू, माझ्या नवर्‍याचाही प्रचंड सपोर्ट होता मला. कमाई होते, पण खर्चही भरपूर असतो इथे टिकून राहण्यासाठी. ब्यूटी पार्लर, जीम या सगळ्यांत पदरचाही पैसा बराच खर्च होतो.

प्रश्नः ब्यूटी पार्लर आणि मेकपचा उल्लेख केलास तू म्हणून विचारते, आपण टीव्हीवर, मासिकांमध्ये जे फोटो पाहतो, ते कितपत खरे असतात? इथे मेकपचा रोल किती असतो? हे फक्त तरुणाईचंच क्षेत्र आहे का? तसंच वयाच्या किती वर्षांपर्यंत मॉडेलला कामं मिळू शकतात?

अमला: खरं सांगू? हे आभासी जग आहे. इथे सगळा खेळ मेकपचाच असतो. रॅम्पवर तुमचं दिसणं आणि खर्‍या आयुष्यात तुम्ही जसे दिसता याचा कित्येकदा ताळमेळ नसतो. फिटनेस तर असावाच लागतो आणि प्रमाणबद्धताही राखावीच लागते. एकदा एका फॅशन शोमध्ये डिझायनरनी आणलेले कपडे त्या मुलीला नीट बसेनात, घट्ट होत होते, तर "तुमची मॉडेल जाड झालीय.." या कारणावरून त्यांनी मला तो शो करायला मनाई केली. ती मुलगी माझ्या एजन्सीची होती. त्यामुळे अशा अचानक रद्द झालेल्या कराराचा मलाच मोठा फटका बसला. आधी मलाही असंच वाटायचं की हे तरुण मुलांचं क्षेत्र आहे. पण असं नाहीये. वय कितीही असो, तुम्ही स्वतःला किती फिट ठेवलंय यावरच बर्‍याचशा गोष्टी अवलंबून असतात.

प्रश्नः एक मॉडेल आणि नंतर स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी हा प्रवास कसा घडला? आणि जेंव्हा तू स्वतःच मॉडेल को-ऑर्डिनेटर झालीस, तेव्हा या क्षेत्रातल्या काही अपप्रवॄतींना तू आळा घालू शकलीस का?

अमला: नक्कीच! माझी स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्यासाठी जे कारण घडलं ना, तेच सांगते. या फील्डमध्ये भरपूर पैसा मिळू शकतो. पण जेव्हा तुम्ही पैसे घेऊन इतरांसाठी फॅशन शोज करता, तेव्हा स्वतःला पूर्णपणे त्या डिझायनर्सच्या हवाली करणं अपेक्षित असतं. दर फेरीनंतर फार कमी वेळात कपडे, मेकप, दागिने भराभर बदलायचे असतात. तिथे कपडे बदलण्यासाठी आडोसाही नसतो. तुम्ही फक्त उभं राहा आणि त्यांना त्यांचं काम करू द्या. तर हे करताना कुठेतरी माझं भारतीय मन, लाज आडवी येत होती. खूप प्रोफेशनल वागणूक मला जमत नव्हती. त्यामुळे बरेचसे शोज मी व्हॉलंटीयरली केले. एका मॉडेलच्या मनाचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त निर्धास्त वातावरणात काम करता यावं, या हेतूनेच मी माझी स्वतःची एजन्सी उघडली आणि मग मी फॅशन शोला माझा ग्रूप घेऊन जाऊ लागले. आता निरनिराळ्या डिझायनर्सना आम्ही बोलावू लागलो. मी हे शोज को-ऑर्डिनेट करू लागले. शोजसाठी कोरिओग्राफीही करू लागले.

एकदा मी कोरिओग्राफ करत असलेल्या कतारी ब्रायडल शोमध्ये एक पेचप्रसंग उद्भवला.. ती मॉडेल वधूच्या साजशॄंगारात इतकी खुलून दिसत होती!! ती रॅम्पवर पोचताच तिथे हजर असलेल्या एका स्त्री दर्शकांनी तिच्यावर नोटांची बरसात करायला सुरुवात केली आणि पाठोपाठ इतरांनीही. त्यांना शो आवडला ह्याची ती पोचपावतीच होती. पण रॅम्पच्या आणि मुख्य म्हणजे माझ्या नैतिकतेत ते बसत नव्हतं. मी त्यावर आक्षेप घेतला आणि माझ्या मुलींसकट तो शो सोडून निघून गेले. या जगातलं जे काही मला पटणारं नव्हतं ते माझ्या सहकार्‍यांनाही सहन करावं लागू नये, यासाठी मी नेहेमीच आग्रही होते. मुलींना वेगळी चेंजिंग रूम असावी हे मी कटाक्षाने पाहायचे.

.

प्रश्नः अतिशय तरुण, निसरड्या वयात मुली या क्षेत्रात येतात. या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या मुलींसाठी काही टिप्स देशील? काय करावं, काय करू नये, कसं वागावं, राहावं? इथले छुपे धोके, प्रवृत्ती?

अमला: या फील्डमध्ये येऊ इच्छिणार्‍यांना मला हेच सांगायचंय - तुम्हाला इथे तुमचे १००% द्यायला हवेत. तुम्हाला किती यशस्वी व्हायचंय हे तुम्ही ठरवता. पैसा कमावायचाय, नाव मिळवायचंय तर तिथे तुमची संस्कृती, लाज आडवी येता कामा नये. तसं होत असेल तर इथे टिकून राहणं कठीण आहे. कित्येकदा तसे कपडे घालणं आणि परत त्यात दिलखुलास वावरणं ही तारेवरची कसरत असते. मी हे घालणार नाही, ते घालणार नाही ही निवड मॉडेलला करता येत नाही. मेकपमुळे चेहरा इतका बदलून टाकला जातो की कित्येकदा त्यामुळे तुमचा आत्मविश्वासच गमावतो आणि मग तो चेहर्‍यावर अवघडलेपणाच्या स्वरूपात दिसू लागतो. मॉडेलच्या शरीरावर एक ग्रॅमही जास्तीचं चढलेलं बाळसं चालत नाही. लगेच जाड अशी संभावना होते.

स्मोकिंग केल्यामुळे वजन वेगाने कमी करता येतं, हा असाच इथला एक अपसमज. त्यामुळे स्मोकिंग करणार्‍यांची संख्या इथे प्रचंड आहे. जिम वगैरे मेहनत करून वजन आटोक्यात ठेवणं खूप त्रासदायक असतं. स्मोकिंगचा सोप्पा मार्ग निवडला जातो आणि मुली एका दुष्टचक्रात अडकतात. अतिशय मोहमयी पण निसरडी दुनिया आहे ही खरीच.

प्रश्नः कतारसारख्या देशात मॉडेलिंग करियरला किती स्कोप आहे?

अमला: मी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा इथे फारच कमी व्यावसायिक संस्था होत्या. पण आता मात्र हे चित्र बदललंय. बर्‍याच आंतरराष्ट्रीय, नावाजलेल्या संस्था आता इथे कार्यरत आहेत. त्यांचे शोजही अतिशय प्रोफेशनल वातावरणात केले जातात आणि अर्थातच पैसाही भरपूर खेळतोय! माझ्या संस्थेसारख्या छोटा जीव असणार्‍या संस्था आता या स्पर्धेत टिकू शकणं कठीण आहे. त्यामुळेच एका काळानंतर मी या क्षेत्रातून वेगळं व्हायचा निर्णय घेतला.

प्रश्नः या तुझ्या वेगळ्या प्रवासात तुझ्या कुटुंबीयांचा तुला कसा पाठिंबा मिळाला? तुझं सतत घराबाहेर असणं हे त्यांनी कसं सांभाळून घेतलं?

अमला: माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलाय. माझ्या डॅडनी मला खूप लाडावून ठेवलं होतं, पण राजेशने मला जबाबदारी उचलणं आणि ती पार पाडणम हेही शिकवलं. संचय खरं म्हणजे एक स्पेशल चाइल्ड आहे, पण तोही इतका समजूतदार आहे ना!! अर्थात मी त्याला कधीही जगाच्या नजरेआड ठेवलं नाही. अगदी फॅशन शोजला जातानाही त्याला घेऊनच जायचे. त्याचा फायदा असा झाला की शाळेतून मिळणार्‍या ठरावीक शिक्षणापेक्षाही खूप काही प्रॅक्टिकल शिक्षण त्याला मिळालं. अगदी माझ्या दुसर्‍या नॉर्मल मुलाच्या, शांतनूच्या शाळेत मी संचयला घेऊन जायचे, तेव्हा मुलं हसायची. पण शांतनूचं वागणं इतकं प्रगल्भ होतं की त्याने कधीही संचयच्या असण्याची लाज बाळगली नाही. आता त्याच्या शाळेत संचयही सगळ्यांचा लाडका झालाय!! आणि एका व्यक्तीच्या सपोर्टशिवाय मला हा प्रवास झेपला नसता, त्या म्हणजे माझ्या सासूबाई. त्यांच्या मुलाशी त्यांच्या असलेल्या नात्यापेक्षाही आम्हां दोघींचं नातं जास्त सुदृढ आहे.

प्रश्नः अमला, मॉडेलिंगनंतर एकदम डॉग रेस्क्यूमध्ये कशी शिरलीस तू? काय घडलं असं? राजेश म्हणत होता की तू म्हणे गेली साडेतीन वर्षं दोह्याच्या बाहेरही गेली नाहीयेस, अगदी भारतात घरीसुद्धा नाही. काही दिवस तर तुझ्या घरात एकाच वेळी सहा कुत्रे होते म्हणे! ही तुझी नवीन बाळं तुला इतकी गुंतवून ठेवतात?

अमला: एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाहीये हं यात!! खरंच खूप खूप गुंतलेय मी या माझ्या बाळांमध्ये!! आणि सहा नाही, नऊ जण होते घरात...मी जेव्हा मॉडेलिंगच्या फील्डमध्ये प्रचंड बिझी झाले, तेव्हा शांतनूला घरात पेट डॉग हवा होता. त्याने मला इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की मला निदान एक डॉगी तरी आणून दे, म्हणजे मी त्याच्याशी खेळत बसीन आणि मी एक गोष्टीवर ठाम होते की कुत्रा आणायचा घरात तर तो कुठलंतरी महागाचं ब्रीड असलेला विकतचा नाही. आपण कुत्रा दत्तक घेऊ.

मला एकदा कळलं की एका घरात नऊ अनाथ पिल्लं आहेत. तुला ऐकवणार नाही, पण त्या पिल्लांच्या जन्मदात्यांना कोणीतरी पिकप ट्रकला बांधून कॄरपणे मारून टाकलं होतं.. आम्ही तिकडे गेलो आणि तिथेही भारतीय मानसिकता दाखवत मुलगी नक्को असं म्हणत मुलगाच उचलला. मला लाज वाटते की मी असा विचार केला होता त्या क्षणी.... (अमला अतिशय प्रांजळपणे सांगून टाकते...)

सात दिवसांनी त्याला व्हेटकडे नेलं, तेव्हा कळलं की तो 'तो' नसून 'ती'च आहे!! पण तोपर्यंत इतका लळा लावला होता तिने की तिला बदलण्याचा प्रश्नच नव्हता. ती मोठी झाली, पण त्या काळात मी एका जवळच्या लग्नालाही गेले नाही. कारण ते माझं बाळ होतं आणि त्याला कुठेतरी बोर्डिंगमध्ये ठेवून जाणं मला शक्यच नव्हतं. एकदा असंच फिरायला गेलो असताना मला दुसरी एक छकुली सापडली. मी ताबडतोब तिच्या प्रेमात!! आणि तीसुद्धा घरातलीच एक सदस्य झाली.

भयंकर चटचटत्या उन्हाळ्याचे दिवस आले आणि असे रस्त्यावर सोडून दिलेले बरेच कुत्रे दिसू लागले.

लोक कसे इतकं क्रूर वागू शकतात गं? कतारमध्ये अनिवासींची संख्याच खूप जास्त आहे. इथे १४० देशांचे लोक राहतात. उन्हाळ्यात जेव्हा शाळांना सुट्टी लागते, तेव्हा सगळे जण मायदेशी भेट देऊन येतात. पण कुत्रा बाहेर घेऊन जाणं हे कटकटीचं आणि खर्चाचंही काम असतं. पेट पासपोर्ट काढावा लागतो. बरेचसे देश तुमच्या पाळीव प्राण्यांना सहजी स्वीकारत नाहीत. उदाहरणार्थ, फिलिपाइन्स देशात तुमचा कुत्रा घेऊन जाणं अतिशय सोप्पं आहे. फार कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही. पण तेच भारतात कुत्रा घेऊन जाणं प्रचंड कटकटीचं. इतकी कागदपत्रं, इतक्या रेड टेप्स... पदोपदी अडवणूक.

(खरं म्हणजे अमला भारतात जाऊ शकली नाहीये याचं हेसुद्धा एक मोठ्ठं कारण आहे. पण म्हणून तुमच्या कुटुंबाचा एक भाग असलेल्या प्राण्याला असं रस्त्यावर अक्षरशः टाकून जायचं? कसं करवतं हे?)

लोक असे वागतात. इथला उन्हाळा किती क्रूर आहे ...असे सोडून दिलेले कुत्रे इथे जगू शकत नाहीत. अन्नावाचून, पाण्यावाचून तडफडतात. क्वचित कधीतरी गाडीखालीही येतात. मला हे पाहवेना. मी बर्‍याच जणांना घरी आणलं. पण मलाही मर्यादा होतीच. मग मी आधी ज्यांना परवडू शकत होतं, अशा माझ्या मैत्रिणींनाच आवाहन केलं. डॉग लव्हर्स असा एक ग्रूपच बनवला. असे कुत्रे पकडणं, त्यांना पशुवैद्यकाकडे नेणं, तिथे त्यांचं लसीकरण आणि त्यांना चिप बसवणं अशी कामं सुरू केली.

प्रश्नः पण यासाठी तर बराच खर्च येत असेल? मग ह्या खर्चाचा ताळमेळ कसा बसवला?

अमला: अगं, मी वेळप्रसंगी अक्षरशः भीक मागितलीय फंडिंगसाठी. अगदी २० रियाल शक्य असतील तर तितकेही द्या. त्यातही डॉग फूड येतं, पट्टा येतो. ह्या कुत्रांचं लसीकरण झालं की आम्ही त्यांना जागोजागी तयार केलेल्या श्वाननिवासांमध्ये नेऊन सोडतो. तिथे एक सुरक्षारक्षक असतो. तो त्यांना अन्न-पाणी आणि त्यांच्यावर देखरेख इ. कामं करतो.

कित्येकदा अपघात झालेले कुत्रे मिळतात. मग त्यांचा शस्त्रक्रियेचाही खर्च येतो. एकदा असाच एक वाईट अवस्थेतला कुत्रा सापडला होता. तब्बल सहा ठिकाणी फ्रॅक्चर्स होती त्याला. शस्त्रक्रियेचा खर्च प्रचंड होताच. पण तरीही वाचण्याची शक्यता खूपच कमी होती. मग अशा वेळी त्यांना त्या वेदनांमधून कायमचीच मुक्ती द्यायचा हृदयद्रावक पण कर्तव्यकठोर निर्णयही घ्यावा लागतो. मी मांडीवर घेऊनच बसले होते त्याला. आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय हेच निदान त्या शेवटच्या क्षणी तरी लक्षात राहावं त्याच्या!!

कुत्र्यांच्या विणीचा व्यवसाय करणार्‍यांनाही माझा विरोध असतो. कारण जर पिल्लांना कोणी दत्तक घेतलं नाही, तर त्यांचा शेवट अखेर रस्त्यावरच होतो. आम्हाला जेव्हा कुत्रे सापडतात, तेव्हा त्यांना शेल्टरमधे सोडण्यापूर्वी त्यांचं निर्बिजीकरण करण्याकडे आमचा कटाक्ष असतो. हल्ली आम्ही ही निर्बिजीकरणाची मोहीमच हाती घेतलीय. अगणित कुत्र्यांचं निर्बिजीकरण केलंय. पण हे काम तितकंच प्रचंड आहे याचीही मला जाणीव आहे.

कुत्र्यांची काळजी घेणारी घरं शोधून त्यांना असं आपलं घर मिळवून देणं हेही आमची संस्था करते. या देशात आणि परदेशातही अशा कित्येक कुत्र्यांचं यशस्वी पुनर्वसन करतोय आम्ही. इतक्यातच अपघातात सापडलेल्या आणि मग बर्‍या झालेल्या कुत्र्याला, 'सर्वायवर' असं नाव ठेवलंय आम्ही, त्याला तुर्कस्थानला पाठविण्यात यशस्वी ठरलोय.

ह्या कामात मला मदत करणारेही नागरीक विविध देशांमधले श्वानप्रेमी आहेत. इथले कतारी नागरिकही आमच्या संस्थेच्या कामात सक्रिय सहभाग घेत असतात. कतारमधल्या कंपन्यांनी नुकतीच खूप मोठ्ठी नोकरीकपात केली. या कारणामुळेही आमचं काम खूपच वाढलंय. आणि आता परत उन्हाळा येइल. परत बरेच कुत्रे दुर्दैवाने रस्त्यावर येतील.

.

अमला खूप खूप बोलली. एका लाडावलेल्या मुलीपासून एका फॅशन मॉडेलपर्यंत तिचा प्रवास सोप्पा नव्हताच. प्रसंगी कितीतरी अडचणींमधून मार्ग काढत ती आज या टप्प्यावर येऊन पोहोचलीय. ती एक मॉडेल आहे, एक यशस्वी बिझनेस वूमन आहे, एका प्राणिप्रेमी संस्थेची सर्वेसर्वा आहे, पण सगळ्यात आधी ती एक भावुक आई आहे. तिला भेटण्यापूर्वी 'फॅशन मॉडेल' ही तिची एकच ओळख मला माहीत होती... पण मला भेटलेली अमला काळे खरं म्हणजे एक 'रोल मॉडेल' आहे!!

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

8 Mar 2017 - 9:27 pm | पिशी अबोली

वेगळीच आहे खरी ही दुनिया..

इशा१२३'s picture

8 Mar 2017 - 10:32 pm | इशा१२३

एका वेगळ्या जगात ठसा उमटवणारी अमला आवडली.

संजय क्षीरसागर's picture

9 Mar 2017 - 12:03 am | संजय क्षीरसागर

या युवतीचा जीवनपट कमालीचा वेधक आहे.

खुपच छान .धडाडिची अमला आवडली.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 8:08 am | प्रीत-मोहर

रोलरकोस्टर राईड पार करून स्वतःचा ठसा उमटवणार्या अमलाला hatsoff!!

अजया's picture

9 Mar 2017 - 8:41 am | अजया

हॅट्स आॅफ अमला !

पियुशा's picture

9 Mar 2017 - 12:58 pm | पियुशा

हॅट्स आॅफ अमला ! + १०००००००

स्नेहांकिता's picture

9 Mar 2017 - 1:13 pm | स्नेहांकिता

अगदी विलक्षण आहे अमलाची जीवनकथा ! आणि जिद्दही !!

मनिमौ's picture

10 Mar 2017 - 12:45 pm | मनिमौ

अमला विषयी अजून वाचायला आवडेल. फारच वेगळी रोल मॉडेल आहे

पैसा's picture

10 Mar 2017 - 1:49 pm | पैसा

मनानेही फारच देखणी आहे अमला!

पूर्वाविवेक's picture

10 Mar 2017 - 3:12 pm | पूर्वाविवेक

खूप छान मुलाखत.
चैतन्यमयी अमला आवडली.

नूतन सावंत's picture

10 Mar 2017 - 5:39 pm | नूतन सावंत

अमलाला सल्लाम.मुक्या प्राण्याविषयी जागरूक आत्मीयता दाखवणारी अमला खरंच खूप ग्रेट आहे.नाहीतर आम्ही पाहतो ना,भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ खाणारे ,पाळीव कुत्र्यांना रस्त्यवर विधी करायला नेणारे लोक.
वस्तुस्थितीच्या पाळण्यात जिद्दीने आंदोळणारी एक अमला हजारोजणींसाठी स्फुर्तीदायक आहे.
स्वर,तूही तिला बोलते केले आहेस.तू लिहिती हो.पुलेशु.

खूप आवडली मुलाखत. अमला चा प्रवास थक्क करणारा आहे. सौंदर्याबरोबरच दुर्दम्य इच्छाशक्ती पण दिसते. अमला ला पुढील वातचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
स्वराताई खूप सुरेख शब्दबद्ध केले आहेस तू. वेगळ्या क्षेत्रातील महिलेची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप आभार.

अतिशय सुंदर आणि धडाडीची अमला खुप आवडली.

सौन्दर्यवती, यशस्वी उद्योजिका, हिरकणीसारखी आई, सामाजिक बांधिलकी जपणारी मनस्वी स्त्री अशी गोड अमला!!
स्वरा, उत्तम मुलखत.

सुचेता's picture

16 Mar 2017 - 10:40 pm | सुचेता

अमला आवडली.

अमलाचा प्रवास व तिचं कार्य आवडलं.

इडली डोसा's picture

18 Mar 2017 - 12:46 pm | इडली डोसा

किती अडचणिंवर मात करत तिने सर्वच आघाड्यांवर एक आदर्श वस्तुपाठ घालुन दिला आहे. या मुलाखती साठी तुझेही आभार स्व.रा. _/\_

बबिता पोरे's picture

18 Mar 2017 - 11:19 pm | बबिता पोरे

सुंंदर लेख..!!!

फारच थक्क करणारा प्रवास आहे अमलाचा. छान मुलाखत.