वज्रासारखी कणखर, सामान्यांमधील असामान्य स्वाती

Primary tabs

सविता००१'s picture
सविता००१ in लेखमाला
8 Mar 2017 - 6:29 am

.

आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी कुणीतरी खासम खास व्यक्ती मला हवी होती. अहो, का म्हणून काय विचारताय? इथे अनाहितावर हा धुरळा उठलेला. कोण काय करतंय, कोण काय लिहितंय असा. आणि आम्हाला आपलं कुण्णी कुण्णी म्हणून सापडेचना. लिहायचं तरी काय हो? आणि अचानकच एक दिवस लायटिंग झाली ना डोक्यात. मस्त प्रकाशच प्रकाश. अगदी आजि सोनियाचा दिनु म्हणत उठलेच. अहो, एक मैत्रीण सापडली ना मला. हे म्हणजे काखेत कळसा अन गावाला वळसा झालं हो. पण देर आये, दुरुस्त आये म्हणत ताबडतोब तुळशीबागेत कूच केलं. (नाय वो, शॉपिंग नाय. ही मैत्रीण तिथेच राहते) (नेहमीचंच मनातल्या मनात - कित्ती मज्जाय ना.. तुळशीबागेत घर.) हं.. तर ते जाऊ दे. म्हटलं, आज आपल्या मित्रमंडळींना हिचीच ओळख करून देऊ.

1

तर... या माझ्या मैत्रिणीचं नाव आहे स्वाती उदय ओतारी. राहते कुठे ते तर आलंच वर. अत्यंत गुणी मुलगी. आणि अंगी कलागुण तर ठासून भरूनच त्या परमेश्वराने तिला पाठवलंय, याबद्दल तर माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

स्वाती एक सर्वसामान्य घरातली मुलगी. आजही ११ जणांच्या एकत्र कुटुंबात रहाणारी. घरचा व्यवसाय सोनार कामाचा. त्यामुळे अगदी बारीक कलाकुसरीची आवड आणि वडिलांना दागिने घडविण्यातही ती मदत करायची. शाळेत असल्यापासूनच स्वातीची चित्रकला भन्नाट. त्यामुळे त्या अनुषंगाने येणारे पेंटिंग, कलाकुसर वगैरे प्रकारात अगदी हातखंडाच तिचा. तिलाही हे अगदी लौकर कळलं. त्यामुळे १२वी नंतर पुढे न शिकता ती सरळ चित्रकला, पेंटिंग्ज, म्युरल्स, वाळू वापरून पेंटिंग्ज, सिरॅमिक आणि टेराकोटा वापरून शोभेच्या विविध भेटवस्तू बनवू लागली. आणि तेसुद्धा यातलं काहीही शिक्षण न घेता. सगळं काही बघून बघून. १९९३ साली एम-सील या कंपनीची वर्तमानपत्रात होतकरू कलाकारांसाठी एक जाहिरात आली होती. आपापल्या वस्तू घेऊन नेहरू मेमोरिअल सेंटरला मांडायचं आवाहन होतं त्यात. बरं, इतक्या वस्तू करायच्या तर रंग, इतर माल यावर खर्च करायला हवाच. पण स्वातीला तिची आई सोडल्यास घरून या गोष्टीसाठी अजिबात पाठिंबा नव्हता. आपल्या मुलीने हे असलं काही करावं हेच मुळी तिच्या बाबांना पटत नव्हतं. मग भांडवलासाठी आई आणि मामा या दोघांची मदत घेऊन स्वाती तिच्या वस्तू घेऊन नेहरू मेमोरिअल सेंटरला गेली. काहीही अनुभव नसताना. कसा प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा नसताना. पण तिला प्रतिसादच एवढा छान मिळाला की तिच्या सार्‍या वस्तू पहिल्याच दिवशी संपल्या. मग ज्या लोकांना तिने या वस्तू विकल्या, त्यांना विनंती करून, त्यांचे नाव, पत्ते लिहून घेऊन तिने या वस्तू पुढचे २ दिवस प्रदर्शनात ठेवण्यासाठी वापरल्या आणि ते तीन दिवस रातोरात घरी येऊन, वस्तू करून, वाळवून दुसऱ्या दिवशी प्रदर्शनात आणल्या. ते प्रदर्शन झाल्यावर तिने या वस्तू ग्राहकांच्या पत्त्यावर पोहोचत्या केल्या.

याच प्रदर्शनात प्रसिद्ध उद्योगपती श्री. नीलकंठ कल्याणी व त्यांच्या पत्नीशी तिची भेट झाली. त्यांनी तिच्याकडून अनेक वस्तूही खरेदी केल्या. तिचा फोन नंबर मागितला. पण तेव्हा स्वातीच्या घरी फोन नव्हता. तेव्हा तिने एका शेजारच्या दुकानदाराचा नंबर त्यांना दिला. तर थोड्या दिवसांनी खरंच श्री. नीलकंठ कल्याणी यांनी स्वातीला त्या नंबरवर फोन केला, शिवाय तिच्या छोट्याशा घरात खरेदीसाठीही येऊन गेले. स्वाती अन तिच्या आईसाठी हा फार मोठा अनुभव होता. यानंतर मात्र स्वातीला मागे वळून पाहायला लागलंच नाही. तिच्या प्रदर्शनांचा सिलसिला चालूच राहिला. उत्तम प्रतिसादामुळे तिलाही हुरूप आला. टिळक स्मारक मंदिरात आणि बालगंधर्व कलादालनात तिची प्रदर्शनं भरली. त्यानंतर २००८ साली मॉरिशस सरकारने ज्या भारतीय कलाकारांना आमंत्रित केलं, त्यात स्वातीचाही समावेश होता. तिथेही तिच्या वस्तूंची चांगलीच विक्री झाली आणि अनेक मंत्री,अधिकारी लोकांशीही वागण्या-बोलण्याचा अनुभव तिला मिळाला. त्याच वर्षी ‘स्टार स्पोर्ट्स’च्या व्यवस्थापनाला फुटबॉल, टेनिस आणि क्रिकेटच्या चेंडूंच्या प्रतिकृती वाटतील अशा मेणबत्त्या त्यांच्या लोगोसकट बनवून हव्या होत्या. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणच्या कलाकारांना सँपल्स बनवायला सांगितलं होतं. पण व्यवस्थापनाला पसंत पडतील अशा वस्तू पूर्ण भारतात फक्त स्वातीनेच बनवून दाखवल्या आणि ते काम लीलया फत्ते करून दाखवलं.

आता तिच्याकडे कॉर्पोरेट कंपन्यांच्या मागण्याही येऊ लागल्या. वर्षारंभी, दिवाळीसाठी भेटवस्तू तयार करणं, दूरदर्शनच्या वाहिन्यांसाठी, एच.डी,एफ.सी, एल.आय.सी, आयसीआयसीआय बँक यांच्यासाठी ट्रॉफी, भेटवस्तू तयार करणं असं काम तिला मिळू लागलं. २०१३ साली ‘जागतिक मराठी मंचा’ने मराठी कलाकारांना आपल्या वस्तूंच्या प्रदर्शनासाठी बँकॉक, थायलंड पट्टाया इथे आमंत्रित केलं होतं. तिथेही स्वाती जाऊन आली. यशस्वीपणे. ही वाटचाल तिची अशीच चालू आहे. अगदी दिवसागणिक वृद्धिंगत होत आहे.

स्वातीने केलेल्या काही भेटवस्तू :

1

स्वातीने केलेली काही म्युरल्स आणि ट्रॉफीज् :

1

या म्युरल्समध्ये प्रसिद्ध लेखक शिवाजीराव सावंत यांच्या घरातलंही एक म्यूरल आपल्याला दिसतं. त्यात सावंतांच्या कन्येने शिवाजीराव सावंतांचा गांधीटोपी घातलेला एकमेव फोटो स्वातीला देऊन ते म्यूरल खास त्यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ तयार करून घेतलेलं आहे, जे त्यांच्या घरी आजही आहे.

पुण्यातही स्वाती राहते त्या भागातल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सक्रिय कार्यकर्ती आहे. त्यांच्यातर्फे केल्या जाणार्‍या प्रत्येक उपक्रमात तिचा सहभाग असतोच असतो. वर्षातून एकदा दिवाळीच्या सुमारास सर्वसाधारणपणे ३०-४० अनाथ मुलींना तुळशीबागेत सर्व दुकानांमध्ये मनसोक्त मोफत खरेदीचा आनंददायी उपक्रम स्वातीच्या कल्पनेतून राबवला जातो. त्याशिवाय संरक्षण दलातील, पोलीस, अग्निशमन दलातील लोकांना राखीबंधनाचा उपक्रमही स्वाती आणि तिचे सहकारी राबवतात.

तिच्या वेगवेगळ्या उपक्रमांची ही काही छायाचित्रं :

1

पण मग तिचं असामान्यत्व हेच आहे का? तर नाही. स्वाती आज देव-देवतांच्या मूर्तींना वज्रलेपन करून त्यांचं मूळ रूप परत आणून देणारी संपूर्ण भारतातली एकमेव महिला कलाकार आहे. आणि हे ही काम ती कुठलं शिक्षण घेऊन नाही तर आपली कल्पकता वापरून करते.

पुण्यात ओतारी समाजाच्या कालिकादेवीचं एक मंदिर आहे. तिथे स्वाती गेली असता तिच्या असं लक्षात आलं की नथ घालून, सतत पंचामृती पूजा करून आणि हवामानातल्या बदलांमुळे त्या सुबक मूर्तीचं नाक तुटलंय. मंदिराचे पुजारी ओळखीचे असल्याने तिने हे काम करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्या पुजार्‍यांना तिच्या कलागुणांविषयी पूर्ण खातरी होती. त्यामुळेच त्यांनी तिला संमती दिली आणि स्वातीचं जगच पालटलं.

खरं तर आपल्या देशात प्रत्येक गावात, शहरात हजारोंनी देवालयं आहेत. तरीही मूर्तींना पुनरुज्जीवन देणारे अगदीच कमी. त्यातही सगळे पुरुषच. पण असंख्य अडचणींना – मुख्यत्वे घरातल्या विरोधाला ती पुरून उरली आहे. आपला व्यवसाय चालूच ठेवून ती पूर्ण शक्तीनिशी या व्यवसायात उतरली आहे. मुळातच तिच्या अंगी कला असल्याने याही कलेविषयी तिला फार प्रेम आहे.

अर्थातच हे करताना तिला घरातल्या आणि बाहेरच्या लोकांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. ‘हे काम मुलींचं नाही, शक्ती किती वापरावी लागते, तुला काय जमणार?’ अशा अनेक शेलक्या शब्दांमध्ये स्वातीची संभावना झाली. पण यात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ती तिची आईच. आता याच दोघी मिळून हे सारं काम पाहतात. अर्थात एक व्यवसाय म्हणून या कामाकडे पाहता येत नाही, कारण प्राप्तीचं प्रमाण फार नाही. आणि सतत या प्रकारची काममही नसतात. त्यामुळे एक प्रचंड मानसिक समाधान मिळवून देणारं काम आणि ईश्वरेच्छा असंच ती याकडे पाहते.

स्वाती म्हणते, "वाटतं तेवढं हे काम सोपं नाही, अवघड तर आहेच, पण देव-देवतांचं काम म्हणून खूप पथ्यं पाळावी लागतात. या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना झालेली असल्याने त्या जागेवरून हलवता येत नाहीत, आपल्यालाच काम करताना हवं तसं वाकावं, झुकावं लागतं. फार जोर लावूनही चालत नाही कारण मूर्ती देवाची असते. तिचा सन्मान, पावित्र्य राखतानाच आपल्या हातून ती आणखी बिघडता कामा नये हेसुद्धा पाहावं लागतं. शेंदूर खरवडून टाकता येत नाहीच. तेही काम जपून करायला लागतं. जोवर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नसते, तोवर त्या मूर्तीचा कारागीर तिला घडवताना पायातही पकडू शकतो. पण नंतर आमच्यासारख्या कारागीरांसाठी ही सुविधा नसते. त्या मूर्तीवर संस्कार करताना कुठलंही हत्यार वापरून चालत नाही. शिवाय हे काम सुरू होण्याअगोदर मुहूर्त पाहून पूजाअर्चा आणि होमहवन केलं जातं. आमच्या हातावर विडा-सुपारी देऊन मग कामाला सुरुवात होते. शिवाय कामासाठी किती वेळ लागणार त्यानुसार नंतरचा मुहूर्तही ठरवलेला असतो. तेव्हाही होमहवन होऊन मगच मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुलं केलं जातं. त्यामुळे या दोन पूजांमध्येच आम्हाला आमचं काम करायला लागतं. साधारण सकाळी लवकर सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत हे काम चालतं. शिवाय त्या वेळी दर्शनाला मंदिर खुलं नसतं, पण लोकांना फार उत्सुकता असते. कधी कधी कौतुकाचा भाग संपून त्या गर्दीचा त्रासच खूप होतो. पण लोकांच्याही भावना समजून घ्यायला लागतात. त्यामुळे आणि मुळात आवडच असल्याने हे काम मी करते.

स्वाती हे काम दोन प्रकारे करते. एक तर त्या मूर्तीची झीज झालेली असते तिथे वज्रलेप देते आणि काही ठिकाणी वर्षानुवर्षांचे शेंदराचे थर साचल्यामुळे मूर्तीचं मूळ रूपच दिसत नसतं. त्यामुळे मूर्तीवरचा शेंदूर हळुवार हातांनी काढून त्या मूर्तीला तिचं मूळ सौष्ठव प्राप्त करून द्यायला लागतं.

आपल्याकडे एकूणच हवामानातला बदल, पंचामृत अभिषेक, हळद, कुंकू यामुळे मूर्तींची झीज होऊन मूर्तीचे अवयव खडबडीत होतात. अशा वेळी त्या मूर्तीला वज्रलेप करतात. त्याच्याही दोन पद्धती आहेत. एक आपली पारंपरिक आणि दुसरी आधुनिक. आधुनिक पद्धतीत रसायनांचा वापर करतात आणि त्यासाठी लागणारा मालही तसा स्वस्त असतो त्या मुळे तिचा खर्च हा तुलनेने बराच कमी असतो. त्याउलट पारंपरिक पद्धातीत राळ व अनेक वनस्पतिजन्य पदार्थ एका विशिष्ट प्रमाणात महिनाभर भिजवून ठेवून नंतर ते घोटून एकजीव करावे लागतात. हा लेप ओला असतानाच मूर्तीला नखं बसवणं, काही बारीक नक्षीकाम करणं असं करावं लागतं आणि हे काम बरंच खर्चीक असतं. कोणत्या प्रकारे काम करायचं ते मंदिराचे विश्वस्त ठरवतात. काही वेळा हे काम ३-४ दिवसांत, तर काही वेळा ८-१० दिवसांत पूर्ण होतं. परगावचं काम स्वातीने घेतलं तर हे सगळं सामान तिला घरूनच घेऊन जायला लागतं. या कामासाठी वापरलेले कपडे हे फक्त याच कामासाठी वापरले जातात. ते कपडे ती आणि तिची आई इतर कुठल्याही कामासाठी वापरत नाहीत. हातापायात मोजे घालून, डोळ्यांवर चश्मा चढवून हे काम करायला लागतं. तरीही शेंदूर काढताना त्याच्या कपच्या उडून त्याने कित्येक वेळा जखमा होतात, नखांमध्ये शेंदूर जातो, अंगाला खूप खाज येते, आग आग होते, अ‍ॅलर्जी आल्यासारखं होतं. डोळ्यांमधून पाणी वाहतं. पण प्रसंगी औषधं घेऊनही ती हे काम करते. काम संपल्यावर हे कपडे विसर्जित केले जातात, तसंच राहिलेला मालही विसर्जितच करावा लागतो. त्यामुळे त्याचा अंदाज अगदी बरोबरच असायला लागतो.

1

स्वातीने याबाबत काही अनुभवही सांगितले. प्रत्येक ठिकाणी सगळ्या सोयी असतीलच असंही नाही. कालीकामातेच्या मूर्तीचं काम तिने केल्यानंतर लगेच तिला खेड-शिवापूरच्या अतिशय पुरातन विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचं काम मिळालं. या मूर्ती पार भंग पावल्या होत्या. पण हे काम करण्यासाठी तिला अतिशय कष्ट पडले, कारण त्या मंदिरात वीजच नव्हती. बॅटरीच्या उजेडात तिनं हे काम पूर्ण केलं. यशस्वीरित्या. ह्या कामात प्रचंड एकाग्रता लागते आणि म्हणूनच तिथे हे काम चालू असताना कुणालाही उपस्थित राहू देत नाहीत. स्वातीचा हा अगदी सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे आपण हे अशा कामांचे फोटो काढून ठेवायला हवेत हेही तिला माहीत नव्हतं. पण अनुभवाने आता मात्र ती हे करते. या कामासाठी तिने तिच्याच कल्पनेतून हवी तशी लाकडी हत्यारं बनवून घेतली आहेत. मूर्तींच्या संस्करणापूर्वी या हत्यारांचीही ती पूजा करते.

महाडच्या चवदार तळ्यापाशी असलेला गणपती, पुण्यातल्या ओमकारेश्वर मंदिरातल्या शनी, मारुती आणि गणपती, जनवाडी भागातील मारुती, चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरातील गणेश या मूर्तींवर तिने संस्करण केलं आहे. याबाबत स्वातीची एक आठवण अशीही आहे की ओमकारेश्वर मंदिरातल्या कामाच्या वेळी नेमक्या मूळ मूर्ती आहेत तरी कशा हे पाहण्याची उत्सुकता असलेले मोघे गुरुजी तिचं काम होईतो अस्वस्थपणे दिवसभर मंदिराबाहेर येरझार्‍या घालत होते. आपलं काम कसं होणार आहे याची गुरुजींना इतकी उत्सुकता होती की त्यामुळेही तिचा त्या कामातला आनंद आणखीनच वाढला.

तुळशीबागेच्या मोठ्या गणपतीच्या मागे एक अगदी छोटंसं पेशवेकालीन गणेश मंदिर आहे. ते तिथे आहे हेही फारसं कुणाला माहीत नाहीये. स्वाती तिथेच राहत असल्याने या गणेशमूर्तीचा शेंदूर काढण्याचं काम तिनं स्वखर्चाने केलंय. या मूर्तीची दोन बोटं तुटलेल्या अवस्थेत होती. तीही तिने पूर्ववत केली. हे काम चालू असताना कुठल्यातरी वार्ताहराला याचा सुगावा लागला, त्याविषयी वर्तमानपत्रात छापून आलं आणि तिथे एकदमच दर्शनासाठी गर्दी झाली. पण आता या प्रकाराचीही तिला सवय झाली आहे.

महाडच्या देवालयातल्या स्वातीच्या कामाविषयी ऐकून एक आजोबा तिचं काम पाहायला आले होते. एवढीशी मुलगी हे काम करतेय म्हटल्यावर त्यांना अगदी भरून आलं आणि त्यांनी स्वातीच्या हातावर २० रुपये ठेवले आणि म्हणाले, "हे घे तुला खाऊसाठी." हे खरं बक्षीस असंच स्वाती मानते. त्याचप्रमाणे एक ओळखपाळख नसलेल्या आजीही जोवर तिचं काम चालू होतं तोवर रोज तिच्यासाठी सरबत घेऊन येत असत.

पुण्यातल्या एका कुटुंबाकडे स्वत: पेशव्यांनी दिलेली लक्ष्मीची एक सुरेख मूर्ती आहे. जवळपास ३०० वर्षे जुनी. तिची पूजाअर्चा नियमित केल्याने तिच्यावरचं नक्षीकामही दिसेनासं झालं होतं. तेही काम स्वातीने करून दिलंय.

आता अलीकडे इतिहासाचे अभ्यासक श्री. मंदार लवाटे हे स्वातीचं काम चालू असताना तिथं येतात आणि त्या मूर्तीचा व मंदिराचा ज्ञात इतिहासही स्वातीला आणि तिच्या आईला सांगतात. त्यामुळे आपलं काम किती मोलाचं आहे याचं आता तिला भान आलं आहे.
अगदी थोड्या दिवसांपूर्वी मंडई भागातील म्हसोबा मंदिरामध्ये म्हसोबा मूर्तीवरचा शेंदूर तिनं काढला. तो जवळपास १५० किलो झाला. लेखात त्याचे फोटोही दिलेत मी. म्हणजे मूळ मूर्ती केवढी आणि तिच्यावरचे लेप किती... हा शेंदूरसुद्धा आधी ती विसर्जित करायची. पण काही लोकांच्या मागणीवरून आता ती इच्छुक लोकांना हा लेप किंवा शेंदूर प्रसाद म्हणून देते.

स्वातीच्या या कार्याबद्दल तिला अनेक पुरस्कार मिळालेत त्यात जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठान तर्फे कर्तृत्ववान महिला पुरस्कार, सुखकर्ता प्रतिष्ठान तर्फे कलाउपासक पुरस्कार, सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते डी. एस. के विश्व उद्योगिनी पुरस्कार, मानसी स्त्री शक्ती पुरस्कार, पुणे युवा भूषण पुरस्कार, सकाळ तनिष्का पुरस्कार असे अनेक पुरस्कार आहेत. खूप सत्कारही झालेत तिचे. झी २४ तासनेही तिची दाखल घेतली आहे. पण यामागे काही ईश्वरी संकेत आहे असं ती मानते आणि म्हणून अहंकार तिच्या वाट्यालाही शिवला नाहीये .

स्वातीने मिळविलेल्या काही पारितोषकांची छायाचित्रं :

1

1

आयुष्यात प्रचंड कष्ट करून पुढे आलेल्या स्वातीने अगदी घरापासूनच प्रखर विरोधाला तोंड दिलंय, खूप त्रास सहन केलाय. स्त्रियांना सतत कमी लेखण्याच्या वृत्तीचा तिला वेळोवेळी अनुभव आलाय. पण सतत काहीतरी नावीन्याची आस घेतलेल्या स्वातीने प्रसंगी भरपूर अवहेलनाही सोसून स्वत: सगळं शिकून, स्वत: उभं राहून - खरं तर बंडखोरी करून हे खणखणीत यश मिळवलं आहे. आज अनेक लोक, अनेक कंपन्या त्यांना हव्या तशा वस्तू स्वातीकडून तयार करून घेऊन निर्यातही करतात. पण आज स्वातीकडे एवढं आर्थिक बळ नाही की ती स्वत:चा एखादा कारखाना काढू शकेल. पण तरीही ती खूप आशावादी आहे. आज नाही तर उद्या, नक्कीच ती हे सगळं करेल आणि त्यामुळेच तिची ही वाट दिवसेंदिवस अधिकाधिक यशदायी होवो अशी तिला शुभेच्छा.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

8 Mar 2017 - 4:31 pm | मनिमौ

अगदी नेटकी ओळख. स्वाती ला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

पियुशा's picture

8 Mar 2017 - 4:55 pm | पियुशा

किती गुणी कलाकार आहे ही , सव्या भाई १० / १० तुला मुलाखती साठी :)

दिव्य चक्षु..'s picture

8 Mar 2017 - 5:37 pm | दिव्य चक्षु..

एका वेगळ्या विषयाची माहिती.

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 8:44 pm | पद्मावति

अत्यंत गुणी कलाकाराची
खूप छान ओळख.

सस्नेह's picture

9 Mar 2017 - 3:08 pm | सस्नेह

छान परिचय !
व्हिडीओ नीट दिसत नाही.

संदीप डांगे's picture

9 Mar 2017 - 3:31 pm | संदीप डांगे

खूप छान!

मंजूताई's picture

9 Mar 2017 - 3:43 pm | मंजूताई

मुलाखत !

पलाश's picture

9 Mar 2017 - 3:54 pm | पलाश

मुलाखत आवडली.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 3:55 pm | प्रीत-मोहर

त्या विषयातलं शिक्षण न घेता इतकी कलाकारी ही ईश्वरी देणच आहे.

सव्या सुंदर झालीय ग मुलाखत!!

कौशी's picture

9 Mar 2017 - 10:25 pm | कौशी

एक वेगळीच ओळ्ख...

KanchanKarai's picture

10 Mar 2017 - 8:11 am | KanchanKarai

किती गुणी आहेत स्वातीताई! त्यांनी इथवर केलेली वाटचाल सोपी नाही, हे दर दिसतंच आहे पण त्यांनी ते मनमोकळेपणे सांगितलं हे फार आवडलं. त्यामुळे इतर स्त्रियांनाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये खंबीर राहण्याची प्रेरणा मिळते. एवढं जबाबदारीचं काम स्वातीताईंसारखी एक स्त्री हाताळते हे पाहून स्वत:च्या स्त्री असण्याचा अभिमान वाटतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणखी एका कर्तृत्ववान महिलेची ओळख करून दिल्याबद्दल, सविता तुझे आणि मिपाचेही आभार.

पैसा's picture

10 Mar 2017 - 8:51 am | पैसा

अफाट कर्तृत्व आहे हे!

फारच सुरेख जमलीये ओळख.

गामा पैलवान's picture

10 Mar 2017 - 7:56 pm | गामा पैलवान

हातात कला आणि हृदयात भाव आहे. आता चिंता कसली! उर्वरित कार्य तडीस न्यावयास श्री समर्थ आहेतंच. स्वातीताईंना विनम्र अभिवादन.
-गा.पै.

इशा१२३'s picture

11 Mar 2017 - 3:50 pm | इशा१२३

गुणी कलाकाराची छान ओळख .मुलाखत छान झालिये सविता.

स्वाती ओतारी यांच्या कामाची माहिती आवडली. असे काम असू शकते ही कल्पना कधी केली नव्हती.

पूर्वाविवेक's picture

15 Mar 2017 - 12:07 pm | पूर्वाविवेक

मुलाखत आवडली.

निशाचर's picture

15 Mar 2017 - 5:02 pm | निशाचर

मुलाखत आवडली.
स्वाती ओतारी यांना शुभेच्छा!

नूतन सावंत's picture

15 Mar 2017 - 6:15 pm | नूतन सावंत

अतिशय वेगळे काम ,परमेश्वराच्या मूर्ती घडवताना अगर चित्रे रेखाटताना पर्मेस्वराची मर्जी बहाल असल्याशिवाय काम पूर्णत्वाला जात नाही असे मानले जाते.हळदकुंकू,शेंदूर यांच्या पुतांमध्ये गुद्मरणाऱ्या परमेश्वराला मोकळा श्वास घेऊ देणाऱ्या आणि मुल्रू देणारऱ्या स्वातीताईवर परमेश्वर खुश असणारच.
सविता तू ओळखही सविस्तर आणि छान करून दिली आहेस.

नूतन सावंत's picture

15 Mar 2017 - 6:17 pm | नूतन सावंत

पुटांमध्ये असे वाचावे .

पुष्करिणी's picture

16 Mar 2017 - 5:01 pm | पुष्करिणी

अमेझिंग, खूप नाजूक, कलाकुसर, नाविन्य, अवघड आणि धडाडीच काम.

स्वातीताईंना खूप खूप शुभेच्छा, त्यांच्या दुकानाला भेट द्यायला आवडेल (मिपावर जाहीरात करता येत नाही हे माहित आहे पण खरच मला त्यांचं दुकान बघायला आवडेल )

उल्का's picture

16 Mar 2017 - 5:16 pm | उल्का

कौतुकास्पद आहे.
सविता, तू लिहिलंस देखील छान!

चिनार's picture

17 Mar 2017 - 12:32 pm | चिनार

गुणी कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !!
स्वाती ताईंना सादर प्रणाम !

वेगळेच काम. मुलाखत खूप आवडली. एवढी छान ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.