सायकलिंगच्या छंदातून समाजप्रबोधन करणार्‍या आनंदयात्री

Primary tabs

सविता००१'s picture
सविता००१ in लेखमाला
8 Mar 2017 - 6:20 am

.

पुणे शहरातल्या सायकलिंगचा छंद जोपासणार्‍या बर्‍याच लोकांना शीला परळीकर हे नाव ऐकून तरी माहीत असेल. आद्य मिपाकर सायकलपटू मोदक याच्याकडून त्यांचा फोन नंबरही अनायासे मिळाला, म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने या वेळी त्यांचीच मुलाखत घ्यायचं ठरवलं. कारणही तसंच होतं. दहावीनंतर सायकल सोडून देऊन आता सतत स्वयंचलित दुचाक्यांवर बुंगाट जाणार्‍या आमच्या पिढीसमोर वयाच्या ६७ व्या वर्षीही आपला सायकलिंगचा छंद यशस्वीपणे जोपासणार्‍या शीला परळीकर आहेत तरी कशा, ही उत्सुकता फार वाढली होती. थोडंसं धडधडत होतं, अजिबात ओळख नाहीये आपली, तर मुलाखत देतील का? वगैरे. पण हे असले सगळे प्रश्न मागे सारून सरळ लावला फोन. आणि चक्क अगदी मनापासून माझं स्वागत करून "कधीही या. देईन की मुलाखत" असं मस्तपैकी सांगूनही टाकलं त्यांनी. झालं!!! आता आली का माझी पंचाईत! कधीही मुलाखत वगैरे न घेतलेली मी सरळ स्वत:ला सुधीर गाडगीळ समजून धडकलेच त्यांच्या घरी. त्यांना पाहिलं, तर एक अतिशय प्रसन्न आणि प्रचंड अ‍ॅक्टिव्ह व्यक्तिमत्त्व आपल्याला भेटलंय, याची खातरीच पटली. तिकडे बोलण्यापेक्षा त्यांच्या ऑफिसमध्ये निवांत बोलता येईल असा त्या म्हणाल्या. मग आम्ही तिकडे जाण्यासाठी बाहेर आलो, पाहते तो मी गाडी स्टँडवरून काढेपर्यंत या स्कूटी घेऊन तय्यार. माझा तिथेच मस्त आ वासलेला अजूनी तसाच आहे. मी आपलं शीलाताईना सर्वसाधारणपणे मिसळपाव, अनाहिता, येण्याचा उद्देश असं परत थोडसं सांगितलं आणि मग मुलाखत नाही, पण ज्या मनमुराद गप्पा झाल्या की बस... दिल खूश हो गया. तर मित्रमंडळींनो, तुमच्यासाठी ही मुलाखत/गप्पा सादर करतेय. त्यांच्याच सांगण्यावरून त्यांना मीही शीलाताई असंच संबोधलं आहे.

---------------------------------------------------------------------------------------
प्रश्नः शीलाताई, तुमच्या कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगाल का काही?

शीलाताई: हो. मी वकील आहे. आमचं कुटुंबच वकिलांचं. यजमान, मुलगा, मुलगी, जावई हे सगळे आम्ही वकीलच आहोत आणि स्वत:चा वकिली व्यवसायच आहे. फक्त माझी सून शास्त्रज्ञ आहे.

प्रश्नः शीलाताई, सायकलिंगला सुरुवात कशी आणि कधी केलीत तुम्ही?

शीलाताई: अगं, सुरुवात काय? ती येतच होती. पहिल्यापासून शाळा-कॉलेजला असताना, एवढंच काय, नोकरी लागल्यावरही मी सायकलवरूनच ये-जा करायचे. त्या वेळी इतकी वाहनं नव्हतीच. आणि पीएमटीची अवस्था आजच्यासारखीच तेव्हाही. त्यामुळे सायकलच. आता छंदाबद्दल विचारशील, तर मी मुळात निसर्गप्रेमी आणि समाजसेवेची आवड असलेली आहे. त्यामुळे पुण्यातल्या निसर्ग सेवक या संस्थेशी मी संलग्न आहे. त्यांच्यातर्फे निसर्ग संवर्धनासाठी मी बरीच कामं केली आहेत. दै. सकाळतर्फे पूर्वी महिन्यातून एकदा सायकल फेरी आयोजित केली जायची. तिथे मीही जाऊ लागले. आणि तिथेच मला जुगल राठी, डॉ. सारडा, डॉ. शिरीष पटवर्धन यांच्यासारखे सायकलिंग हा छंद म्हणून जोपासणारे लोक मिळाले. त्यांनी एकदा मला तुम्हीही चला आमच्याबरोबर असं सुचवलं आणि मलाही ती कल्पना आवडली. तिथून मग ही सायकलिंगची आवड मी छंद म्हणून जोपासू लागले. शिवाय आता मी गेल्या ७ वर्षांपासून कोर्टात जात नाही. आता आमचं ऑफिस सांभाळते. त्यामुळे मला या गोष्टीसाठी वेळ देता यायला लागला.

प्रश्नः आतापर्यंत कुठे कुठे सायकल वरून गेला आहात आपण?

शीलाताई: महाराष्ट्रात म्हणाल, तर फक्त पुणे-नागपूर असे गेलो होतो एकदा. पण बाकी सारं सायकलिंग हे मध्य प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, बिहार, कलकत्ता, केरळ, कोचीन, गोवा आणि गुजरात अशाच खूप ठिकाणी झालं.

प्रश्नः कशा पद्धतीने या सफरींच नियोजन केलं जायचं? कोण करायचं?

शीलाताई: आमच्या या सायकल प्रतिष्ठानच्या ग्रूप मधलेच काही उत्साही लोक. यात प्रामुख्याने डॉक्टर्स खूप आहेत आणि इतरही. हे सारे लोक सामाजिक बांधिलकी मानणारे आहेत. आम्हाला जाण्यायेण्याचाच काय तो खर्च असायचा. बहुतेक रोटरी क्लबचे मेंबर्स आधी आम्ही जिथे जाणार त्या भागाची रेकी करून यायचे. स्पॉन्सरर्सही बहुधा तेच असायचे. त्यामुळे जाऊ तिथे पत्रकार परिषद, शहरातल्या नामवंतांची उपस्थिती हेही नेहमीच असायचं. मध्य प्रदेशच्या दौर्‍यावर असताना एकदा आपल्या लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनही आम्हाला भेटायला आल्या होत्या. काही ठिकाणच्या महापौरही आमच्याबरोबर काही अंतरापर्यंत सायकल वरून यायचे. त्यामुळेही खूप हुरूप यायचा.

फक्त सायकलिंग हे आमच्या सफरींचं उद्दिष्ट कधीच नव्हत. हे डॉक्टर्स आणि आम्ही अगदी रिमोट, पोहोचायला अवघड अशा ठिकाणीही आरोग्यासाठी सायकलिंग असा विषय घेऊन त्याचा प्रचार व प्रसार करायचो. 'पर्यावरण वाचवा, प्रदूषण टाळा’, ‘एक थेंब तेलाचा, लाख लाख मोलाचा’ अशा घोषणाही आम्ही देत असू. पोहोचलो, की त्या ठिकाणी संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेऊन त्यात आम्ही या सफरीदरम्यान काय काय करणार आहोत याची सविस्तर माहिती दिली जायची. या अंतर्गत हृदयाच्या आरोग्यासंबंधी, दम्याबद्दल, अंगातील चरबी जाण्यासाठीचे उपाय असेही सांगितले जायचे. तिथे आम्हाला जमतील तशी इतर कामं आम्ही करीत असू.

प्रश्नः इतर कामं म्हणजे?

शीलाताई: इतर म्हणजे पर्यावरण कसं संतुलित ठेवता येईल याविषयी समाजप्रबोधन. त्यासाठी एक तर आम्ही सायकल वरून प्रवास करत असल्याने त्याचा उपयोग होई. सायकलमुळे इंधन बचत, शिवाय प्रदूषण नाहीच. इतक्या लांबून आम्ही सायकलवर येऊन हे सांगतोय याचा नक्कीच लोकांवर प्रभाव पडायचा. याशिवाय हे कॅम्प्स एखाद्या खेड्यात अगदी आतल्या बाजूला असायचे. तिथे काहीही वाहन जायचं नाही. त्यामुळेही सायकल असण्याचा फायदा लोकांच्या लक्षात यायचा. एकूणच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं, अशा पद्धतीचे हे कॅम्प्स असंत /असतात. त्याविषयीचे फलक, साहित्य, पॅम्प्लेट्स हे सगळ आम्ही इथून पुण्यातूनच घेऊन जायचो. हे सगळं दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात अगदी सविस्तर छापून यायचं. हे सारं पाहून त्या त्या राज्यात सायकलिंगचे क्लब तयार झाले. आणि त्यामुळे अधिकाधिक सायकल सफरी करून याविषयी लोकांना माहिती करून देणं हे अगदी जोमात सुरू झालं आमच्याकडून.

प्रश्नः या दरम्यानचे काही अनुभव सांगा ना..

शीलाताई: गुजरातच्या सायकल सफरीच्या वेळी सगळेच फार सुरेख अनुभव होते. तोच दौरा मला सगळ्यात जास्त आवडला. आम्ही पोरबंदर, साबरमती वगैरे ठिकाणी हिंडलो. एकूणच या सफरीत निसर्गसौंदर्य, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. त्यामुळे देश-विदेशातील वेगवेगळे पक्षी एकत्र पाहायला मिळणं हा एक खूप आनंददायी अनुभव होता. त्यामुळे ती सफर मी खूप एन्जॉय केली. तिथले रस्तेही अतिशय सुरेख होते. त्यामुळे सायकलिंग करताना अति दमणूक वगैरे प्रकार नाही झाले फार.

त्यापेक्षा भुवनेश्वर ते कलकत्ता या ठिकाणाचे अनुभव जास्त सुन्न करून गेले. कारण तिकडे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ते ही कल्पनाच अजून रुजली नाहीये. राजकारण्यांच्या अनास्थेमुळे या ठिकाणी जाणंच दुरापास्त होतं. बिहारमध्ये एका गावात (नाव नाही आठवलं त्यांना) रस्ताच नाही, पण समुद्रकिनारी असते तशी फक्त रेती होती. तिथे सायकलिंग शक्यच नाही, तेव्हा सगळ्यांनी हातात सायकली घेऊन ४-५ कि.मी.चा टप्पा चालत पार केला.

प्रश्नः सायकलिंग करताना रुटीन कस असायचं तुमचं?

शीलाताई: रोज सर्वसाधारणपणे १०० ते १२५ किलोमीटर चालवायची, या पद्धतीनेच हे दौरे आखलेले असायचे. सकाळी ४ वाजता उठून आवरून, चालू करायचं सायकलिंग. मध्ये चहा, नाश्ता, जेवण यासाठी व्यवस्थित थांबायचं आणि ४ वाजता त्या दिवसासाठी थांबायचं, असा सर्वसाधारणपणे कार्यक्रम असायचा.

प्रश्नः मग इतकी सायकल चालवण्यासाठी तुम्ही सराव किती/कसा आणि कुठे करायचा?

शीलाताई: सराव म्हणजे दररोज ३५-४० कि,मी, तर व्हायचंच. पण अशी कुठे जाण्याची योजना ठरवली की मग आम्ही रोज १००-१२५ कि.मी. चालवतोच. निदान महिनाभर आधी तरी हा सराव चालू करतोच. ते आवश्यकही आहे. मग कधी घरापासून ते रांजणगाव आणि परत असं १०० कि.मी. जायचं. कधी पानशेतच्या पुढे जायचं आणि परत यायचं, कधी चांदणी चौकातून ताम्हिणी घाटातून जाऊन यायचं, तर कधी कात्रजकडे. रोज वेगळे मार्ग निवडतो आणि जातो, त्यामुळे रोज रोज तोच तो रस्ता असा कंटाळा येत नाही आणि वेगवेगळ्या मार्गांवरून सायकल चालवायचा सरावही होतो.

प्रश्नः सायकल, शरीर या दोन्हीचीही काळजी कशी घ्यायचात/घेता?

शीलाताई: अगं, त्या मानाने आमचं सगळं आखीवरेखीव काम असतं. आमच्याबरोबर मेकॅनिक्स असतात, दुरुस्तीला लागणारी सगळी हत्यारं असतात. सफरीच्या आधी तेच लोक पूर्ण सायकल तपासतात, आवश्यक त्या दुरुस्त्या वगैरे सारं करतात आणि नंतरच आम्ही जातो. शिवाय आमच्याबरोबर एक व्हॅन असते. त्यात जास्तीच्या ५-६ सायकलीही असतात. आणि आता अशा सगळ्या सायकली गिअरच्या असतात. माझ्याकडे आधी फक्त ५ गिअरची सायकल होती. आता आम्हा सार्‍यांकडे २१ गिअरच्या सायकली आहेत. त्यामुळे तेवढा प्रॉब्लेम नाही येत. सायकल मेन्टेन करावीच लागते. त्यामुळे ते करतेच. डॉक्टर्स तर ग्रूपमध्येच आहेत. त्यामुळे चुकून माकून काही झालंच, तर वैद्यकीय मदत मिळायला काहीही अडचण येत नाही. अगदी डेंटिस्टपासून सगळे लोक आमच्याकडे आहेत. शिवाय सायकल आम्ही कायम हायवेवरून जास्तकरून चालवली. शिवाय आम्ही कसे जाणार, कुठे राहणार, तिथले संपर्क क्रमांक, आमच्या ग्रूपमधल्या लोकांचे संपर्क क्रमांक सगळ्यांकडे दिले जातात. याची कॉपी घरीही असते. त्यामुळे कुणालाही उगीच मानसिक त्रास होत नाही. आता आमची वयं वाढलीत. त्यामुळे वयोमानानुसार ज्यांना कुणाला जे आजार असतील, त्यानुसार आपापली औषधोपचारांची काळजी जो तो घेतो.
सायकल चालवून अगदी व्यवस्थित व्यायाम होतो, त्यामुळे शरीराची अशी वेगळी काळजी घेत नाही. आणि खरं सांगू का, आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो की छान ठणठणीत राहतो. आम्हाला कुणालाच या कुठल्या सफरीदरम्यान असा आजारपणाचा त्रास नाही झाला. सफरींसाठी स्पॉन्सरर्स कायम उत्तम मिळाले. त्यामुळे उत्तम ठिकाणीच राहिलो. साधं ठिकाणही होत एखाद्या वेळी, पण तेही व्यवस्थित होतं. एकदाच एक मैत्रीण सायकलवरून पडून तिचा पाय मोडला होता. पण तेही एकदाच. तेव्हाही डॉक्टर्स बरोबर असल्याने त्वरित मदत मिळाली.

प्रश्नः सायकलिंगच्या कुठल्या स्पर्धेत कधी भाग घेतलात का?

शीलाताई: नाही गं. नंबर वगैरे मिळवण्यासाठी मी कधीच सायकलिंग केलं नाही. केलं ते मला आवडतं म्हणून. सायकलिंगचे फायदेच इतके आहेत की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्पर्धेत वगैरे नाही उतरले मी.

प्रश्नः तुम्ही सायकल चालवायचात तेव्हा लोकांचा, विशेषत: स्त्रियांचा दृष्टीकोन कसा असायचा? कारण घर-संसार सांभाळून इतकं प्रत्येकीला जमेलच असं नाही. मग त्यांची प्रतिक्रिया कशी असायची?

शीलाताई:कायम उत्तमच प्रतिक्रिया मिळाल्या. कुठेही नाराजी नाही. ज्या बायकांना आवडलं, त्यांनी आपोआप सायकलिंगला सुरुवात केली. हेच तर हवं होतं ना.... कारण मला याबरोबरच समाजसेवेचीही आवड आहे. तीही या निमित्ताने पूर्ण होते ना..

प्रश्नः या व्यतिरिक्त आपण काय करता? आणखी कसली आवड आहे?

शीलाताई: रुबी हॉलच्या सुप्रसिद्ध स्रीरोगतज्ञ डॉ. शिरीन वेंकट यांनी १४ जानेवारी ते ६ मे २००६ दरम्यान ‘सुप्रभा गंगायात्रा’ अशा नावाने एक पदयात्रा काढली होते. त्यात मी सामील झाले होते. गंगासागर ते गोमुख अशी २,५०० किलोमीटरची ही यात्रा आम्ही १०८ दिवसांमध्ये पूर्ण केली. रोज २० ते २५ कि.मी. चालायचं, असा संकल्प होता त्यात. इंडियन मेडिकल असोसिएशनने ही योजना स्पॉन्सर केली होती. सुप्रभा म्हणजे सुलभ-प्रसूती-भारत. यामध्ये एकूणच स्वच्छता, आरोग्य तपासणी, स्त्रियांचं/मुलींचं आरोग्यविषयक प्रबोधन, लैंगिक शिक्षण याबाबत खूप काम केलं. तेव्हाच आपल्या देशात एकूणच आरोग्याविषयी किती अनास्था आहे हे कळून आलं. बिहार वगैरे ठिकाणी तर आणखीनच वाईट परिस्थिती. एखाद्या बाईला बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हटलं, तर आजही तिला हातगाडीवर घालून नेतात. मध्ये ती आणि तिचं बाळ यांचं काय होईल ते तो ईश्वरच जाणे. राजकारणी लोक तर तिथे फिरकतही नाहीत. तिथे मुलगी होणं म्हणजेच आधी त्रास. मग तिला जन्मल्याबरोबर प्रचंड अफू देऊन मारून टाकणं किंवा दुधाच्या परातीत बुड्वून मारणं असल्या अघोरी प्रथा अजूनही तिथे आहेतच. असं केलं की पाप लागत नाही म्हणे. अशा खुळचट कल्पनांचा फार त्रास होतो आणि तिथले लोक हे चूक आहे हे समजण्यापलीकडचे असतात. तिथे हे असे कॅम्प्स घेणं आणि यशस्वी करणं ही आमची कसोटी होती. पण सगळे एकत्रित १५-२० जण मिळून हे काम करायचो त्यामुळे आवडायचं खूप. अजूनही आवडतं.

मी निसर्गसंवर्धनासाठी काम करते. आमच्याच संस्थेतर्फे. एकत्र काम करण्यावर माझा जास्त विश्वास आहे. मग ते टेकडीवर वृक्षारोपण असो, की दुर्मीळ जातीच्या पक्ष्यांसाठी काही करायचं असो, मी ते करते. याशिवाय पुण्यात सायकल ट्रॅक्स व्हावेत, परदेशाप्रमाणे सायकलसाठी स्वतंत्र सिग्नल यंत्रणा असावी, यासाठी पुणे महानगरपालिका आणि अनेक आमदार-खासदार-नगरसेवक यांच्याशी बातचीत चालू असते. काय आहे, आणखी ५-६ वर्षांनी पुण्यातही श्वास घ्यायला त्रासच होणार आहे. इतकी वाहने झालीत, त्यांचं प्रदूषण किती भयानक आहे, त्यामुळे सायकल हा एकाच पर्याय उरतोय लोकांकडे. नुसते फ्लाय ओव्हर बांधून काय होणार? मी लाख म्हणते मुलांनी सायकलवरून शाळेत जावं. पण असल्या वाहनांच्या भयाण आणि बेशिस्त गर्दीत कुठले आईबाप मुलांना पाठवणार? आपली पीएमटी जर उत्तम असेल, तर इतकी वाहनं रस्त्यावर येणार नाहीत. पण ते इथल्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाहीये. त्याकरताही आम्ही सतत भांडत असतो. पाहू कसं आणि कधी यश येतं ते. याबाबत तर रस्त्यांवर उभं राहून कित्येक सर्व्हे आम्ही करून ते महानगरपालिकेला सादर करत आहोत/केलेही आहेत. आता ते कधी अन काय निर्णय घेतात याची वाट पाहतोय.

आमच्या भागात एक पर्यावरणप्रेमी महिला उद्योजक राहतात. त्या प्लास्टिकच्या कचर्‍यापासून इंधन बनवतात. त्यामुळे नुसता आमच्याच घरातला नाही, तर सोसायटी मधील इतरांनाही त्यांच्याकडचा प्लास्टिक कचरा मी माझ्याकडे द्यायला सांगते आणि त्या उद्योजक महिलेला देते. त्यामुळे आमचाही परिसर प्लास्टिकमुक्त राहायला बरीच मदत होते.

माझ्या घरी दर गुरुवारी सायंकाळी आम्ही एक कट्टा भरवतो. त्यात खूप मातब्बर लोक - उदा. डॉ. नरेंद्र दाभोळकर, अनिल अवचट इ. बोलायला येऊन गेले आहेत. अर्थात विना मोबदला. अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य माझ्याकडे येऊन त्याबद्दल बोलू शकतो. मग त्या बाबतीत आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करतो.

याशिवाय मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंही काम करते. अगदी सक्रिय राहून.

प्रश्नः मग सध्या सायकलिंगला दूरच्या सफरींवर जाता का तुम्ही?

शीलाताई: नाही. गेली दोन वर्ष मी दूरच्या सफरींवर जात नाही. वाढत्या वयानुरूप प्रत्येकानेच ही काळजी घ्यावी असा वाटतं मला. उगीच धडपडून आपल्या घरच्यांना त्रास द्यायचा हे नाही पटत मला. त्यामुळे आता सध्या मी निसर्गसेवक संस्था आणि समाजसेवा यात जास्त वेळ असते. पण अजूनही जवळच्या अंतरासाठी आम्ही सारे सायकलच वापरतो. शिवाय दर शनिवार-रविवार २५-३० कि.मी. सायकल चालवायचीच हा एक शिरस्ता पाडून घेतला आहे. तो कटाक्षाने पाळतेच.

प्रश्नः हल्लीच्या मुलींना/स्त्रियांना, ज्या व्यायाम करतच नाहीत त्यांना काय सांगाल?

शीलाताई: व्यायाम केला नाहीत, तर वाट लागेल आरोग्याची हे लक्षात घेऊन आता तरी व्यायामाची वाट धरा असंच सांगेन. मला विचाराल तर मी सायकलिंगचच उदाहरण देईन. सुरू करा ना. रोज वेगळा रस्ता, वेगळा निसर्ग अनुभवा. त्यातून सुंदर आरोग्य लाभलं तर बाकीचं काय वाटेल ते करू शकालच ना.

प्रश्नः घरच्यांचा सहभाग कसा असतो या तुमच्या कार्यक्रमांमध्ये?

शीलाताई: अगदी उत्कृष्ट. सगळे या सगळ्या उपक्रमांमध्ये मनापासून, समरसून भाग घेतात. आणि सायकलिंगचं म्हणशील, तर आता माझी छोटी नातवंडं - इ. दुसरी आणि चौथी - माझ्याबरोबर घरापासून (प्रभात रोड) ते पाषाण सर्कलपर्यंत सायकल चालवत येतात. "आजी, आम्हीपण तुझ्यासारखेच सायकल चालवणार" असं म्हणतात. तेच समाधान फार मोठं आहे मला.

खूप आनंद झाला शीलाताई तुम्हाला भेटून. धन्यवाद!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शीलाताई परळीकर:

1

मित्रमंडळींनो, मी खरं तर शीलाताईंकडे गेले होते एका ज्येष्ठ सायकलपटू महिलेची मुलाखत घ्यायला. आणि एका चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचाच शोध लागला हो मला. सायकलिंग हे त्यांचं पहिलं प्रेम आहे. पण नुसतंच फिरणं आणि वेगवेगळे प्रदेश पाहणं इतक्यापुरतंच ते प्रेम मर्यादित न ठेवता आपलं सामाजिक भान कायम शाबूत ठेवून आपल्या छंदाच्या माध्यमातूनच आपली ही आवडही त्यांनी नुसतीच जोपासली नाही, तर छान फुलवली आहे. आणि जिकडेतिकडे फोटो आणि फोटो काढत बसून नैसर्गिक सौंदर्याकडे आपलं जे काही दुर्लक्ष होतं, त्याबद्दलही शीलाताईंना खूप वाईट वाटतं. इतका सुरेख निसर्ग पाहायचं सोडून फोटो कसले काढायचे? हा त्यांचा प्रश्न खरंच अगदी पटला. हल्ली आपण बर्‍याच वेळेला असेच वागतो, नाही का? त्यामुळेच की काय, शीलाताईंनी हे फोटो, वर्तमान पत्रातले लेख काही काही जपून ठेवलं नाहीये. आणि म्हणून ते मलाही नाही मिळाले. त्यांचा हा जो एकुलता एक फोटो मी घेतला, तोही त्यांनी "अगं, आपण या निसर्गापुढे काही बघणेबल नसतो गं.. हवाच आहे का? घे मग आता असाच..." असं म्हणून दिलाय. .

आज ५५-६०व्या वर्षीही सुरकुतलेल्या आठ्यांचं जाळं कायम चेहर्‍यावर वागवत सतत दुसर्‍यावर करवादणार्‍या कितीतरी व्यक्ती आपण आपल्या आसपास पाहतो. पण ६७व्या वर्षीही छान हसतमुख, खूप उद्योगांमध्ये रमणार्‍या या शीलाताईंचं मला खरच खूप कौतुक वाटलं. आपणही असंच असायला हवं म्हातारपणी, असं काहीसं ठरवून आलेय मी घरी.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

दिव्य चक्षु..'s picture

8 Mar 2017 - 5:40 pm | दिव्य चक्षु..

प्रेरणादायी मुलाखत

खूपच प्रेरणादायी आहे मुलाखत. निदान ही मुलाखत वाचून तरी बर्‍याच अनहिता सायकलिंग सुरु करतील..

निवेदिता-ताई's picture

9 Mar 2017 - 9:48 am | निवेदिता-ताई

खर आहे, तोच विचार चालु आहे

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 5:14 pm | प्रीत-मोहर

सायकलिंग च माहित नाही. पण व्यायाम अनियमित आहे तो नियमित नक्की करीन.

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2017 - 3:56 am | सानिकास्वप्निल

सुंदर झालिये मुलाखत सव्या.

शीलाताई परळीकर यांना सलाम!! एक उत्स्फुर्त, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व __/\__

उत्तम झाली आहे मुलाखत. सायकलिंगसारखा छन्द जोपासून शिलाताईंनी दिलेला पर्यावरण संवर्धनाचा आणि शारीरिक कणखरतेचा संदेश तर इतरांनी बोध घेण्यासारखाच.

आपणही असंच असायला हवं म्हातारपणी, असं काहीसं ठरवून आलेय मी घरी.

+१११११

शीलताईंच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित झालेय ! मी नक्की भेटणार त्यांना !!
'सुप्रभा' बद्दल कुतूहल वाढलंय. अजूनही अशा यात्रा होतात का ?
असे शांतपणे गाजावाजा न करता काम करणारे लोक बघितले की स्वतःच्या खुजेपणाची जास्तच जाणीव होते नाही !!!

सानझरी's picture

9 Mar 2017 - 2:24 pm | सानझरी

प्रेरणादायी मुलाखत!!

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 5:17 pm | प्रीत-मोहर

खरच उत्साह आणि प्रेरणावर्धक आहे हे. असच परवा मिलिंद सोमणांच्या आईंबद्दल वाचलं. त्याही पळतात. आणि त्यांनी पळणं रिटायरमेंटनंतर सुरु केलं. त्या आधी अर्थात फिटनेस ठेवायच्याच. या सगळ्या जणींकडुन प्रेरणा घेतेय. नवरा सगळ्यात जास्त आनंदी होईल मी नियमित व्यायाम केला तर

पद्मावति's picture

9 Mar 2017 - 5:17 pm | पद्मावति

अत्यन्त प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व __/\__

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2017 - 5:22 pm | पूर्वाविवेक

सवि, एका उमद्या मनाच्या निस्पृहपणे काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीस याबद्दल तुझे खूप आभार.
किती सहज लिहिलं आहेस.

वेल्लाभट's picture

9 Mar 2017 - 7:03 pm | वेल्लाभट

काय म्हणावं या जिद्दीला, आत्मविश्वासाला ?
बुलंद.
वाह. अशा एक से एक भारी व्यक्तींची ओळख करून देत सअसल्याबद्दल महिला विशेषांकाच्या संपूर्ण चमूचे शतशः आभार

शीलताईंच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित झालेय ! मी नक्की भेटणार त्यांना !!
'सुप्रभा' बद्दल कुतूहल वाढलंय. अजूनही अशा यात्रा होतात का ?
असे शांतपणे गाजावाजा न करता काम करणारे लोक बघितले की स्वतःच्या खुजेपणाची जास्तच जाणीव होते नाही !!! खरंच ग !

सस्नेह's picture

10 Mar 2017 - 12:24 pm | सस्नेह

६७व्या वर्षी २५-३० किमी सायकलिंग ?
धन्य !

सविता००१'s picture

11 Mar 2017 - 11:32 am | सविता००१

एक मस्त बातमी तुम्हां सगळ्यांबरोबर शेअर करतेय.

कालच मला शीलाताईंचा फोन आला होता. त्यांना मी मुलाखतीची लिंक पाठवली होती आणि त्याबरोबरच बाकीचेही सुंदर लेख जरूर वाचा असं सांगितलं होतं. त्यामुळे अंक आणि ही मुलाखत दोन्ही खूप खूप आवडल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलंय.

दुसरं म्हणजे त्यांनी ही लिंक त्यांच्या संपर्कातल्या बयाच जणांना पाठवली होती. त्यामुळे त्यांच्या वयोगटातले बरेच सदस्य आता मिसळपाव.कॉम काय आहे असं शीला ताईंना विचारून वाचताहेत. :) जय मिपाबाबा.

त्यांच्या कित्येक नातेवाईकांनाही त्या इतकं सारं करतात हे ही मुलाखत वाचून कळलं असं हसून सांगत होत्या.

@ मितान, मंजू - सुप्रभा पदयात्रा सध्या होत नाहीयेत. कारण शीलाताईंच्या म्हणण्यानुसार या पदयात्रा महाराष्ट्राबाहेर केल्या होत्या. पण आता परवाच उघडकीला आलेलं म्हैसाळ सारखं प्रकरण पाहता महाराष्ट्रातही मुलींच्या बाबत वेगळी परिस्थिती नाहीये. त्यामुळे हे मी त्यांना विचारल्या विचारल्या म्हणाल्या- अगं कुणी आहे का यात रस असलेलं? आपण जाउया की परत डॉ. शिरीन कडे. तिला सांगू आणि काढूया एक पदयात्रा महाराष्ट्रातही. आहे काय एवढं त्यात? मी येइन तुमच्याबरोबर.

पहा आता लोकहो- केवढ्या उत्साही आहेत त्या.. खरंच सलाम. आणि अशा व्यक्तीची मुलाखत मला घ्यायला मिळाली म्हणून अक्षरशः अत्यानंदाने नि:शब्द झालेय.

पैसा's picture

11 Mar 2017 - 1:00 pm | पैसा

नतमस्तक आहे! यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल!

मोदक's picture

11 Mar 2017 - 1:12 pm | मोदक

झक्कास मुलाखत..

मी एकदा सेनापती बापट रोडवरून सायकलने जात असताना शीलाताईं दिसल्या आणि अक्षरशः हैराण झालो. त्या एकदम उत्साहाने आणि आरामात सायकल चालवत होत्या. त्यावेळी अगदी जुजबी बोलणे झाले पण मी आठवणीने नांव विचारून घेतले होते.

यथावकाश इंडो सायकलिस्ट क्लबच्या अधिकार्‍यांकडून यांचा नंबर मिळवला आणि महिला अंकात यांची मुलाखत हवीच म्हणून सविताकडे नंबर सोपवला.

सविता मॅडम... एकदम भारी मुलाखत झाली आहे. नंतरही संपर्कात आहेस हे वाचून आणखी चांगले वाटले. यातून नवीन एखादे काम उभे राहणार असेल तर जरूर सांग.

वकील,निसर्गप्रेमी,समाजसेवा, सायकलिंग, भटकंती,कॅम्पस काय काय करतात या बापरे तेही या वयात! ! ग्रेटच!!
धन्यवाद सविता! छान ओळख करुन दिलीस.

रुपी's picture

18 Apr 2017 - 2:14 am | रुपी

+१

दशानन's picture

19 Apr 2017 - 8:12 pm | दशानन

चरणतीर्थ घ्याव्या अशा व्यक्ती अजून ही आपल्या समाजात आहेत हे पाहून अतिशय आनन्द झाला.

मार्गी's picture

19 Apr 2017 - 8:27 pm | मार्गी

वा, प्रेरणादायी!

तेजस आठवले's picture

21 Apr 2017 - 4:59 pm | तेजस आठवले

चांगली मुलाखत. त्यांच्या जिद्दीला शुभेच्छा.

आणखी ५-६ वर्षांनी पुण्यातही श्वास घ्यायला त्रासच होणार आहे. इतकी वाहने झालीत, त्यांचं प्रदूषण किती भयानक आहे, त्यामुळे सायकल हा एकाच पर्याय उरतोय लोकांकडे. नुसते फ्लाय ओव्हर बांधून काय होणार? मी लाख म्हणते मुलांनी सायकलवरून शाळेत जावं. पण असल्या वाहनांच्या भयाण आणि बेशिस्त गर्दीत कुठले आईबाप मुलांना पाठवणार? आपली पीएमटी जर उत्तम असेल, तर इतकी वाहनं रस्त्यावर येणार नाहीत. पण ते इथल्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाहीये.

हे मात्र खरं आहे. एक मात्र कळत नाही, हे असे का? इतक्या वर्षांपासून हा प्रश्न जाणून बुजून सोडवला जात नाहीये हे खूप दुर्दैवी आहे.