समतेच्या वाटेवर.. प्रीती करमरकर

Primary tabs

कवितानागेश's picture
कवितानागेश in लेखमाला
8 Mar 2017 - 6:09 am

.

आपल्या मध्यमवर्गीयांच्या करियरच्या कल्पना काय असतात? सरकारी नोकरी, बँकेत नोकरी, शिक्षकाची नोकरी किंवा अशीच एखादी साधी १० ते ५ नोकरी. कुणी जरा हुशार असेल, तर इंजीनिअरिंग, मेडिकल, सीए, फार तर आर्किटेक्चर असे काहीतरी करून 'सेटल' व्हायचे आणि मग काही काळाने सहज मनाला बरे वाटावे, म्हणून रोटरी किंवा लायन्स वगैरे माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टी सोशल वर्क म्हणून करायच्या. जास्तीत जास्त मध्यमवर्गीयांचे आयुष्य याच पाठडीतून निवांतपणे जाते. पण या कल्पनांना छेद देऊन पूर्णवेळ सामाजिक कार्यामध्ये राहणाऱ्या व्यक्ती फार कमी. त्यातून स्त्रिया तर नाहीच. तसेही सोशल वर्क म्हणजे गरीब मुलांना वह्या वाटणे यापलीकडे काही असते हे आपल्याला माहीत नसते. खरोखर 'आपला समाज ' म्हणून नक्की किती कशी कुठली माणसे आहेत, ही गोष्ट आपल्याला फारशी माहीत नसते. आदिवासी तर आपल्याला फक्त हिंदी सिनेमातले रंगीत पिसे लावलेले विचित्र कपडे घालणारे माहीत असतात!

पण आपल्यातलेच काही जण असेही आहेत की जे आपल्या लोकांबद्दल वाटणाऱ्या कळकळीतून काम करतायत. दुर्गम भागात फिरूनही काम करतायत. ज्या भागात एखादा दिवस ट्रेकिंगला जाऊन आपण पाठ थोपटून घेतो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वर्षे जाऊन लोकांमध्ये मिसळतात. मागासलेल्या वर्गाचा विकास करणे हे सरकारचे काम आहे, त्यासाठी सरकार टीव्हीवर जाहिराती करते अशी आपली विकासाबद्दलची सोपी कल्पना असते. पण ज्यांना सरकारी योजनांची खरोखर गरज आहे, अशा लोकांपर्यंत त्या पोहोचवून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हेदेखील एक मोठे आव्हानात्मक काम असू शकते, याची आपल्याला जाणीव नसते. अगदी सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजातही स्त्रियांनादेखील कायदा आणि हक्क याची माहिती नसते. अशामुळे समाज गांजलेला आणि दुःखी राहतो. सहाजिकच मागासलेला राहतो. इथे जाणीवजागृतीसाठी नक्कीच एखाद्या संस्थेची, व्यक्तीची गरज असते. अशा प्रकारचे काम करणाऱ्या 'नारी समता मंच'च्या कार्यवाह प्रीती करमरकर यांच्याशी झालेल्या गप्पा इथे वाचकांसाठी देत आहे.
*************
प्रश्नः तुम्ही सामाजिक कार्यात कधीपासून आहात?

प्रीतीताई: जवळपास २० वर्षे मी या क्षेत्रात आहे. सुरुवातीला तीन-चार वर्षे नारी समता मंचातर्फे भीमाशंकरच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात फिरून काम केले आहे. या भागातल्या स्त्रियांचे आयुष्य फारच कष्टाचे आहे. सरकारी विकास योजनांचीही कितीतरी जणांना माहिती नसते. एकंदरीतच उपजीविकेसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांना त्यांच्या नागरिकत्वाच्या हक्कांची जाणीव करून देणे, मुख्य प्रवाहात आणणे यासाठी त्यांच्यात जाऊन काम केले आहे.

नंतर यशदा, बाएफ अशा मोठ्या संस्थांतून काम केले. बाएफमधल्या नऊ वर्षांच्या काळात भारतभर जवळपास १६ राज्यांत काही वर्षे फिरून काम केले आहे. महाराष्ट्र, आंध्र, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल, ओरिसा, छत्तीसगढ अशा राज्यांमधल्या आदिवासी भागांतूनही गेले आहे. परदेशी जाण्याच्याही संधी मिळाल्या.

.

प्रश्नः तुम्ही अशा आदिवासी लोकांमधून फिरताना त्यांच्याशी कसा संवाद साधता? भाषेचा अडसर येत नाही का?

प्रीतीताई: फारसा आला नाही. महाराष्ट्राबाहेर - विशेषत: पश्चिम/उत्तर/पूर्व भारतात बऱ्याच ठिकाणी हिंदीतूनच लोकांशी बोलता आले. कारण त्यांची स्वत:ची बोलीभाषा वेगळी असली, तरी उपजीविकेसाठी ते तिथल्याच इतर वर्गांवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना हिंदीही समजते.

प्रश्नः तुम्ही इतकी वर्षे सतत प्रवास करून काम करताय. घरच्यांची प्रतिक्रिया काय असते याबद्दल?

प्रीतीताई: आईवडलांकडून कायमच पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. पूर्वी नातेवाईक विचारायचे, "अशी किती दिवस प्रवास करत राहणार?" हल्ली सगळ्यांना सवय झाली. लग्नानंतरही नवऱ्याकडून पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. In fact घरच्या जबाबदाऱ्या, ज्या बाईने घेणे अपेक्षित असते - विशेषत: स्वयंपाकपाणी, हे त्याने सहज अंगावर घेतले.

प्रश्नः पण इतक्या दूरच्या आणि गैरसोयीच जास्त असलेल्या प्रदेशात, तेही सतत अनोळखी लोकांमध्ये काम करताना अडचणी आल्या असतील ना?

प्रीतीताई: नक्कीच. स्त्री म्हणूनही ज्या ज्या अडचणी येऊ शकतात त्या आल्याच. But you have to come over it!

प्रश्नः सध्याच्या कामाबद्दल काय सांगाल?

प्रीतीताई: सध्या मुळशी तालुक्यातल्या कातकरी वस्त्यांमध्ये प्रकल्प सुरू आहेत. हे लोक मुख्यत: शेतमजुरी, वीटभट्टी या व्यवसायात रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपला की कामासाठी भटकणे पदरी येते. थोडीफार मासेमारी करूनही उदरनिर्वाह करतात. त्यांच्यापुढचे सर्वात महत्त्वाचे challenge होते, ते आपण कातकरीच आहोत हे सिद्ध करणे. कारण सरकारी दप्तरात फक्त रायगड जिल्ह्यातल्या कातकऱ्यांची नोंद आहे. मधल्या काळात मजुरीसाठी इतर ठिकाणीही जे कातकरी विस्थापित झाले आहेत, त्यांची कुठेच नोंदपूस नाही. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे इतरही कुठल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. त्यामुळे जातीचा दाखला मिळवण्यापासून सुरुवात. आपल्याकडे सामाजिक उतरंड अजूनही फार पक्की आहे. त्यातून कातकरी ही आदिवासी जमात आधीच परिघाबाहेर राहणारी. त्यामुळे ते मुख्य प्रवाहापासून दूरच राहतात. त्यांना त्यांच्या नागरिकत्वाची जाणीव करून देणे हेच सगळ्यात महत्त्वाचे काम ठरते. उपजीविकेचा प्रश्नही सतत भेडसावत असल्याने स्त्रियांचे जगणे तर फार जास्त कष्टाचे होऊन जाते. शिवाय दारू पिण्याचे प्रमाणही खूप आहे. त्याचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मी इतक्या वर्षांत जख्ख म्हातारा कातकरी माणूस पाहिला नाही. आणि तिशीतली बाईदेखील पन्नाशीची वाटते. यांचे एकंदरीत आयुर्मान आणि आरोग्याचे प्रश्न हादेखील एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो.

प्रश्नः कातकरींच्या समाजजीवनाबद्दल काय सांगता येईल?

प्रीतीताई: मुळात, कात बनवण्याच्या त्यांच्या कामावरून त्यांना कातकरी हे नाव पडलेय. पण बहुतांश लोक ते काम पार विसरून गेलेत. तो व्यवसाय आता संघटित स्वरूपात आहे. ब्रिटिशांच्या काळात जंगले ही सरकारी मालकीची झाल्यानंतर कातकरी आदिवासींच्या मूळ व्यवसायावर गदा येऊन त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू झाला. आता बरेचसे लोक वीटभट्टीवर काम करतात किंवा इतर काही मजुरी करतात. विशेष म्हणजे त्यांच्यात स्त्री-पुरुष समतेचे प्रमाण बरे आहे. मजुरी असो वा मासेमारी, नवरा-बायको एकत्रच काम करतात. घरातही मुलगा आणि मुलगी यात भेद नसतो. मुलीचा जन्म झाला तरी आनंदाने स्वीकार होतो. याशिवाय एखाद्या नवरा-बायकोचे एकमेकांशी जमत नसेल, तर काडीमोड सहजासहजी होते. त्यातही कुणी काही वावगे समजत नाही. मात्र लग्न बर्‍याच लहान वयात होते. त्यासाठी त्यांचे प्रबोधन सुरू आहे आणि लग्नाचे वय वर खेचण्यात बऱ्यापैकी यश मिळत आहे.

यांच्यात काम करण्यासाठी आम्ही आमचा फोकस मुख्यत: लहान मुलांवर ठेवला आहे. त्यांच्यासाठी 'खेळघर प्रकल्प' राबवला जातो. २००५पासून हा प्रकल्प सुरू आहे. त्यातून मुलांचा बाहेरच्या जगाशी संपर्क येतो. त्यांच्या कुपोषणाच्या प्रश्नावरही त्यातून काम करता येते. शिवाय त्यांच्या पुढच्या शिक्षणाचा मार्ग यातून सापडतो. एक गोष्ट म्हणजे या खेळघरात येणाऱ्या मुलांमध्ये मुलींचीही संख्या भरपूर आहे. ही फार महत्त्वाची बाब आहे.

..

प्रश्नः तुम्ही खैरलांजी प्रकरणात investigator म्हणून काम केले आहे. त्याबद्दल काय सांगाल?

प्रीतीताई: अजूनही आपल्या समाजात जातींमधली उतरंड खूपच पक्की आहे आणि वरच्या समजल्या जाणाऱ्या जाती त्यांच्या एक पायरी खाली समजल्या जाणाऱ्या जातीचाही द्वेष करतात आणि स्त्रिया नेहमीच vulnerable असल्याने कुठल्याही द्वेषाचा पहिला आणि सोपा बळी स्त्रीच ठरते. कुठेही पाहिले, तरी पुरुषांच्या इतर कुठल्याही कारणाने निर्माण झालेल्या वैमनस्याची बळीही स्त्री ठरते. म्हणजे एक प्रकारे स्त्रीला कुठूनतरी मालकीची वस्तू मानत आहेत हाच विचार जिकडे तिकडे पक्का दिसतो. नारी समता मंचाची स्थापना आणि मुख्य फोकस यावरच आधारित आहे, की स्त्री आणि पुरुष यांना दोघांनाही समान वागणूक मिळावी. सर्व स्तरांवर, सर्व ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, घरात आणि समाजातही.

प्रश्नः पण ही समता आणण्यासाठी नक्की काय करता येईल?

प्रीतीताई: आमची शिबिरे आणि प्रकल्प सुरू असतातच. शिवाय आता कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छ्ळ प्रतिबंधक कायदा आला आहे, पण भिडेखातर या गोष्टी उघड न झाल्याने त्याला आळा बसत नव्हता, ते आता होणार नाही. निदान तक्रार नोंदवण्याचा मार्गतरी मोकळा झालाय. या कायद्याबद्दलची माहिती द्यायला आम्ही जी शिबिरे घेतो, त्यातच या समतेच्या मुद्द्याला आम्हाला हात घालता येतो. त्या निमित्ताने पुरुषांच्या प्रबोधनाची संधी मिळते. शिवाय नारी समता मंचाचे पुरुषांसाठी काउन्सिलरही आहेत. कारण एकंदरीत समाजव्यवस्थेत पुरुषवर्गाकडूनही अफाट अपेक्षा केल्या जातात. त्यात लहानपणापासूनच त्यांचा भावनिक कोंडमारा होतो. त्यांना एखाद्या दु:खद प्रसंगात मोकळेपणाने रडतादेखील येत नाही. पुरुष म्हणजे कुणीतरी भयंकर बलशाही असायला हवा, त्याने त्याच्या स्त्रीचे रक्षण करायला हवे आणि स्त्री ही त्याच्या मालकीची वस्तू आहे, अशा प्रकारच्या असमानतेवर आधारित अनैसर्गिक विचारांचा माणसांवर फार मोठा पगडा आहे. त्यातून समतेकडे आणण्यासाठी समुपदेशन आवश्यकच होते.

.

प्रश्नः तुम्ही म्हणताय ती विचारसरणी समाजात खरोखरच खूप खोलवर रुजली आहे. कुठल्याही फालतू कारणावरून झालेल्या भांडणातही आईबहिणीवरून लोक घाण शिव्या देतात. ही एक प्रकारे त्या स्त्रियांच्या बाबतीत झालेली हिंसाच असते.

प्रीतीताई: होय. आम्ही मुलांबरोबर काम करतो, तेव्हा शिव्या आणि लैंगिक अवयव आणि व्यवहार याबद्दल वापरले जाणारे शब्द या विषयांचीही चर्चा होते. तेव्हा तर लक्षात येते की बऱ्याच शिव्यांचे अर्थ माहीत नसतानाही त्या वापरल्या जातात! अर्थ जाणूनही वापरल्या जातातच! त्याशिवाय लैंगिक बाबतीत जे शब्द वापरले जातात, ते बहुतेक slang म्हणता येतील असेच असतात. नक्की शास्त्रीय शब्द व शास्त्रीय माहिती फार कमी मुलांमध्ये दिसते.

प्रश्नः नवीन आलेल्या कायद्याची आणखी काय माहिती देता येईल.

प्रीतीताई: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३मध्ये अस्तित्वात आला. त्या आधी १९९७मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेले विशाखा आदेश होते. त्या वेळेपासून नारी समता मंचाच्या माध्यमातून मी या मुद्द्यावर काम करते आहे. हा एक सामाजिक कायदा आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळासारखी घटना घडत असेल, तर तो त्या दोहोंमधील प्रश्न असे आता म्हणता येणार नाही, कारण हा कामाच्या ठिकाणाचा प्रश्न आहे, हे कायद्याने स्वीकारायला लावले आहे. लैंगिक छळाबाबतचे कार्यालयीन धोरण अंतर्गत समितीची नेमणूक आदी जबाबदार्‍या कायद्याने व्यवस्थापनावर टाकल्या आहेत. लैंगिक छळाला प्रतिबंध हा कायद्याचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. हे या कायद्यानुसार 'ऑफिशियली' करता येईल.

अशा समित्यांच्या प्रशिक्षणाची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ठिकाणी या कायद्याचे पालन होणे बंधनकारक आहे. कामाच्या ठिकाणी लिंगभाव संवेदनशीलतेचे कार्यक्रम घेण्यातून स्त्री-पुरुष कर्मचार्‍यांत परस्पर आदराची, विश्वासाची भावना निर्माण होईल आणि या कायद्यामुळे हे ‘ऑफिशिअली’ करता येईल. गरज आहे ती व्यवस्थापनांच्या इच्छाशक्तीची. स्त्री-प्रश्नावर काम करणार्‍या आमच्यासारख्या अनेक संस्था मदतीला तयार आहेतच.
याबद्दल अलीकडे दै.सकाळमध्ये छापून आलेल्या लेखाचा हा दुवा.

प्रश्नः तुमच्या या कामात नवीन पिढीतली मुले कितपत आहेत? कुणाला आवड असल्यास करियर म्हणून समाजसेवेकडे बघता येईल का? लठ्ठ पगार मिळण्याची अपेक्षा ठेवता येणार नाही याचा अंदाज आहे. पण तरीही NGOमध्ये काम करताना पगार पुरेसा आणि वेळेवर मिळणे होऊ शकते का?

प्रीतीताई: नक्कीच. मी स्वत: सुरुवातीची काही वर्षे अगदी कमी पैशावर आणि अनुभवासाठी म्हणून काम केलेय. पण आता तशी परिस्थिती नाही. कॉलेजमधली मुलेही लहान-मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करायला येतात आणि फ्रेशर्स काम करायला येतात. तेव्हा त्यांना सुरुवातीपासूनच पगार नीट मिळतो. आपण काही NGOSची मान्यता रद्द झाल्याचे वाचतो, ऐकतो. तिथे lack of discipline and efficiency ही मुख्य कारणे आहेत. तुम्ही efficiently काम करत असाल, तर sponsors आपणहून तुमच्याकडे येतात. शिवाय आता प्रायव्हेट कंपन्यांनाही त्यांच्या फायद्यातला काही टक्के भाग सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचा नियम आहे. त्यामुळे आता NGOS कडे पुरेसा पैसा येऊ शकतो.

****************

प्रीतीताईंशी बोलल्यावर बरीच माहिती तर मिळालीच, त्याहीपेक्षा जाणवला तो त्यांच्या विचारातला ठामपणा. समतेबद्दल बोलता येते, पण ती समता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या काही भीती आपणच झुगारून द्याव्या लागतात! प्रवासांमधल्या असोत व दुर्गम भागातल्या असोत वा लोकांच्या वागण्यातल्या असोत, कुठल्याही अडचणींचा बाऊ न करता त्या मनापासून काम करत आहेत. अडचणींबद्दल विचारल्यावर सहज आलेले उत्तर - "you have to come over it!" हे त्यांच्या कामातून स्पष्टच दिसतेय!

त्यांना पुढच्या यशासाठी खूप शुभेच्छा!

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Mar 2017 - 11:53 pm | पैसा

ओळख अतिशय आवडली!

काय काम करतात लोक. आवडली मुलाखत. मार्मिक प्रश्न अगदी.

इडली डोसा's picture

10 Mar 2017 - 4:15 am | इडली डोसा

नऊ वर्षांच्या काळात भारतभर जवळपास १६ राज्यांत काही वर्षे फिरून काम केले आहे. महाराष्ट्र, आंध्र, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल, ओरिसा, छत्तीसगढ अशा राज्यांमधल्या आदिवासी भागांतूनही गेले आहे.

हे खरचं अवघड काम आहे .

प्रीतीताईंनी करत असलेल्या कामासाठी त्यांना अभिवादन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

अत्रे's picture

10 Mar 2017 - 7:30 am | अत्रे

छान लेख.

मला पडलेले काही प्रश्न -

विशेष म्हणजे त्यांच्यात स्त्री-पुरुष समतेचे प्रमाण बरे आहे. मजुरी असो वा मासेमारी, नवरा-बायको एकत्रच काम करतात. घरातही मुलगा आणि मुलगी यात भेद नसतो. मुलीचा जन्म झाला तरी आनंदाने स्वीकार होतो. याशिवाय एखाद्या नवरा-बायकोचे एकमेकांशी जमत नसेल, तर काडीमोड सहजासहजी होते

हे सरप्रायझिंग आहे! म्हणजे समाज जसा प्रगत होत गेला तशी स्त्री-पुरुष समानता कमी होत गेली का?

कुठल्याही फालतू कारणावरून झालेल्या भांडणातही आईबहिणीवरून लोक घाण शिव्या देतात. ही एक प्रकारे त्या स्त्रियांच्या बाबतीत झालेली हिंसाच असते.

यावर उपाय काय? समजा बाप-भावावरून (सुद्धा) शिव्या दिल्या तर ती समानता म्हणता येईल का? का लोकांनी फक्त "सौम्य" (गाढव, नालायक इ.) शिव्याच द्याव्यात?

प्रीत-मोहर's picture

10 Mar 2017 - 3:43 pm | प्रीत-मोहर

You have to come over it !! >> हे फार आवडल

सुरेख घेतलीस ग मुलाखत ताई

वरुण मोहिते's picture

10 Mar 2017 - 4:15 pm | वरुण मोहिते

ओळख !!

अरिंजय's picture

11 Mar 2017 - 7:51 am | अरिंजय
सविता००१'s picture

11 Mar 2017 - 11:40 am | सविता००१

खूप आवडली

मुलाखत आवडली. प्रीतीताईंना कामासाठी शुभेच्छा.

शलभ's picture

21 Mar 2017 - 12:04 am | शलभ

+1
___/\___

पद्मावति's picture

21 Mar 2017 - 12:40 am | पद्मावति

+१
मुलाखत आवडली.

पूर्वाविवेक's picture

21 Mar 2017 - 2:56 pm | पूर्वाविवेक

मुलाखत अतिशय आवडली.