रायलिंग पठारावरुन दिसणारा लिंगाणा (उंची २९६९ फ़ूट)
खिंडीतून माथ्यापर्यंतची उंची अंदाजे ७५० ते ८०० फ़ूट
१६ वर्षांपुर्वी २००१ मध्ये चक्रम हायकर्स संस्थेच्या आपटेकाकांसोबत सिंहगड- राजगड- तोरणा- रायगड असा ट्रेक केला, त्यावेळी मोहरीतून बोराट्याच्या नाळेने उतरलो होतो. नाळेत आदल्या वर्षीच बोल्डर पडल्यामुळे वाट थोडी साहसी झाली होती. त्या पडलेल्या शिळेवरून उतरून खाली आल्यावर लिंगाण्याचं प्रथम घडलेलं दर्शन भेदक होतं. इथूनच उजवीकडे रायलिंगचा कडा व लिंगाणा यांच्या खिंडीत जाण्यासाठी रायलिंगाच्या कड्याला लगटून जाणारी अरुंद वाट आहे. ती ओलांडून पुढे खिंडीत पोहोचायला होतं. आम्ही थोडं खाली उतरुन डावीकडे लिंगाणामाचीत बबन कडूकडे गेलो होतो. वरील गुहेकडे जाणारा त्यावेळचा मार्गदेखील दरड कोसळल्यामुळे बंद झाला होता. वस्तीही उठली होती. बबन हा वस्तीचा शेवटचा शिलेदार होता. काका म्हणालेही होते की वेळ मिळाल्यास वरील गुहेपर्यंत जाऊन येऊया पण वेळ नव्हता. लिंगाण्याचं ते अजस्त्र शिवलिंग मनात मात्र तेव्हा कायमचं ठसलेलं.
बोराटा नाळ
साडेतीन वर्षांपूर्वी २०१३ च्या चक्रम हायकर्सच्याच सह्यांकन मोहिमेवेळी सिंगापूर नाळेतून उतरतांना पुन्हा हे शिवलिंग सामोरं आलं. याचा माथा कधी गाठायला मिळणार हा प्रश्न पुन्हा बळावला.
नोव्हेंबर २०१६ मध्ये नासिकच्या वैनतेय संस्थेची लिंगाणा मोहिम ठरली. वैनतेय संस्थेची पहिलीच लिंगाणा मोहिम असल्याने तिला प्रतिसादही दांडगा मिळाला. मला त्यावेळी जाता आलं नाही म्हणून प्रचंड खट्टू व्हायला झालं पण मोहिमनेता दयानंद कोळीने शेवटी सुखद निरोप दिला की, डिसेंबरात दुसरी बॅच ठरवतोय. पहिली बॅच कोकणातल्या पाने गांवातून चढली होती. दुसरी बॅच घाटमाथ्यावरील मोहरी गांवातून बोराटा नाळेमार्गे लिंगाणा चढाई करणार होती. या सगळ्या मार्गांचा सगळा आराखडा, स्थानिक संपर्क वगैरे महत्त्वाच्या गोष्टींसाठी नेहमीप्रमाणे पुण्याच्या ओंकारची चांगली मदत झाली. सह्याद्रीत सध्या भटकणाऱ्या कुणालाही ओंकार ओक हे नांव माहित नसेल तर त्या व्यक्तीचा कडेलोट करावा. सह्याद्रीत अडकलेल्यांना मदत असो वा जेवण निवाऱ्याची सोय असो.. योग्य नियम पाळून भटकणाऱ्यांसाठी ओंकारकडे स्वत:चं आजोळ असल्याप्रमाणे त्या ठिकाणाची माहिती व संपर्कयंत्रणा तयार असते.
दयानंदाकडे माझं नांव नोंदवून ठेवलं. आणि शेवटी १७ डिसें., २०१६ रोजी लिंगाण्याचा मुहूर्त ठरला.
दोन दिवस आधी दयाचा फोन आला की तुला आधीची तयारी करायच्या चमूबरोबर जायचे आहे. आदल्या दिवशी जाऊन बबनच्या मदतीने माथ्यापर्यंत दोर लावून ठेवायची जबाबदारी होती. दयाला म्हटलं 'अरे ते टेक्निकल लोकांचं काम आहे. मी जाऊन कांय करु?' त्यावर 'तू त्यांच्यासोबत जातोयस. बाकी माहित नाही' असं उत्तर आल्यावर मुकाट्याने होकार दिला व बरेच दिवस सुप्तावस्थेत राहिलेली सॅक भरायला घेतली.
निघायच्या दिवशी योगेश जोशीचा फोन आला. त्याच्या कारने जायचं होतं. आदल्या दिवशीच त्याने मोहिमेला लागणारी सगळी साधने, दोर वगैरे घेऊन ठेवलं होतं. चांगली शरीरक्षमता, हिमालय व सह्याद्रीत भरपूर भटकलेला योगेश लिंगाण्याच्या आधीच्या मोहिमेलाही आतासारखाच आधीच्या चमूत होता. सोबत भाऊसाहेब कानमहाले व अपूर्व हे दोघे निष्णात प्रस्तरारोहक होते. पैकी भाऊसाहेब म्हणजे अनुभवी, उत्तम निर्णयक्षमता असलेला, प्रसंग यथोचित हाताळणारा व याआधी लिंगाणा चढाई केलेला जुना डोंगरभिडू तर अपूर्व हा दयानंदमास्तरांच्या तालमीत तयार झालेला नवाकोरा, सळसळता पण शांत डोक्याचा प्रस्तरारोहक. याने आधीच्या मोहिमेत बबनसोबत दोर लावलेला असल्याने लिंगाणा चढाईचा अनुभव याच्या गाठीशी होता. यांत मीच कांय तो लिंगाणामाथ्यासाठी नवखा होतो.
दुपारी कारने एकेकाला घेत नासिक सोडलं. पुण्यात ओंकारने मला भेटून पुढे जा अशी आज्ञा केली होती. वाहतुकगर्दीमुळे पुण्यात पोहोचेपर्यंत अंधार पडला. ओंकारही त्याच्या कामातून वेळ काढून आम्हांला भेटला पण त्याने आम्हांला थांबवून एक फार महत्त्वाचे काम केले होते ते म्हणजे नसरापूर ते मोहरीतील शिवाजी पोटेच्या ठिकाणापर्यंत, रस्त्यावरील सर्व खुणा टाकून बनवलेला नकाशा, ज्याच्या आधारे आम्ही अचूकपणे रात्री साडेअकरा वाजता नसरापूर- वेल्हामार्गे मोहरीत मुक्कामी पोहोचलो. शिवाजी व बाळू मोरे आमची वाटच पहात थांबले होते. जास्त वेळ न काढता, त्यांना आमच्या दुसऱ्या दिवशीच्या पॅकलंचची तयारी करायला सांगितली व लगेच स्लिपिंग बॅगमधे शिरुन झोपाधिन झालो.
पहाटे घड्याळाच्या गजराने व बाळूच्या खुडबूडीने जाग आली. बाळूने नाश्त्याला कांदेपोहे बनवले होते. बाकी लोकांचा चहा झाला तेव्हा मी सहज दुधाबद्दल चौकशी केली. या परिसरातली मंडळी गवळी असल्याने दुधदुभते चांगल्यापैकी आहे आणि दुधही चांगले. लिटरभर दुध गरम करुन आणेपर्यंत थोडा वेळ गेला. तोवर सगळ्या साधनांचे बोजे नेण्यासाठी गांवातल्याच तिघांना बोलावून ठेवले होते. शिवाजीच्या या ठिकाणापासून बोराटा नाळ गाठायला अर्धा तास व ती उतरून पुढे खिंडीत पोहोचायला साधारण पाऊण तास लागतो. अर्धी नाळ उतरल्यावर उजवीकडे रायलिंग कड्याला लगटून जाणार्या वाटेने खिंडीत जाता येतं. त्या वळशाआधीच तो बोल्डर जपून उतरावा लागतो. सराईतांना दोराची गरज नाही.
बोल्डर
खिंडीत उतरलो की उजवीकडे उतरणारी वाट लिंगाणामाचीकडे व पुढे पाने गांवात जाते. आता समोर उभी असते तो अजस्त्र लिंगाणा चढाईसाठी असलेली एकमेव पूर्व दिशेकडील धार.
काल बबनला पुण्यातूनच फोन करुन सकाळी सात वाजता यायला सांगितले होते. तो साडेआठांस आला. बाकी बोजे आणणार्या तिघांना परत पाठवले होते. खिंडीतून लिंगाण्याच्या साधारण मध्यावर असलेल्या पूर्वेकडील मुक्कामाच्या गुहेपर्यंतची चढाई तीन टप्प्यांत होते. या सुरुवातीच्या टप्प्यांत खडक व ढासळलेली माती आहे. मात्र चढायला व्यवस्थित खोबण्या आहेत. हल्लीच SCI (Safe Climbing Initiative) संस्थेने योग्य जागी नव्या चांगल्या प्रतीच्या मेखा ठोकलेल्या आहेत, त्यामुळे दोर लावायला अडचण येत नाही. गुहेच्या टप्प्यावर येईपर्यंत दंड, खांदे चांगलेच भरुन आले होते. कारण प्रत्येक टप्प्यावर सामानाचे बोजे अधिक आमच्या सॅक्स वर खेचल्या होत्या. इथे वर आल्यावरही साहस पाठ सोडत नव्हतं.
सुरुवातीचा टप्पा.
वर आल्यावर समोर जाणारी वाट वर जाणार्या टप्प्याकडे जाते. तिथेच पुढे कडा उजवीकडे ठेवत गेलं की कड्यात खोदलेली पाण्याची तीन खांबटाकी लागतात. चारजण बसू शकतील एवढी गुहाही कड्यात आहे. हीच वाट पुढे अधिक साहसी होत लिंगाण्याच्या पश्चिम टोकाकडे जाते. गुहेत मुक्काम करायचा झाल्यास या टाक्यातील पाणी चांगले आहे. पण डाव्या बाजूला सरळ खाली झेपावणारा हजारेक फुटाचा कडा असल्याने जपून जायला हवे.
लिंगाण्याला सुरुवातीच्या चढाया लिंगाणामाचीवरुन पश्चिमेकडून होत असत. लिंगाण्याचे दुर्गावशेष त्याच बाजूस जास्त आहेत. लिंगाण्याच्या दुर्गदेवता जननी व सोमजाई यांचं मूळ ठाणंही वरच्या टप्प्यावर व नंतर लिंगाणामाचीवरच होतं. आता त्या खाली गांवात नेल्या आहेत. सतराएक वर्षांपूर्वी मोठी दरड कोसळल्यामुळे माचीवरील जुनी वस्ती खाली हलवण्यात आली. त्या बाजूने आता फार कमी लोक चढाई करतात. पायर्या ढासळलेली वाट, पाण्याची टाकी, खिडक्या असलेली मुक्कामाची गुहा, शिवलिंग, भग्न बांधकाम, दिवा लावण्याची जागा, रायगडास इशारा देण्याची जागा वगैरे गोष्टी त्या बाजूने पहाता येतात.
वर आल्यावर उजव्या बाजुला कड्यातच खोदलेली छोटी जागा आहे. इथे बसून दुपारचे जेवण उरकले तेव्हा एक वाजला होता. तिथून पुढे पन्नासेक फुटांवर असलेल्या गुहेत जाण्यासाठीही सरळपणे वाट नाही. डावीकडे पुढे आलेली शिळा व उजवीकडे सगळंच खोल खोल अशी वाटेची सुरुवात. मग सरळ सुरक्षेसाठी तिथून थेट गुहेपर्यंत आडवा दोर लावला.
बबन बसलेला गुहेचा टप्पा. मागे बोराटा नाळ.
जेवणं झाल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाला की, आपल्यालाही आताच माथा गाठायचा आहे कारण उद्या दयानंदसोबत १९ जणांची बॅच असणार. आपली त्यांच्यात भर नको. आपल्याला बिले द्यायला दिवसभर उभं रहायचं आहे. एकदम पटलं. सॅक्स गुहेत नीट लावून लगेच निघालो. आता हा चौथा टप्पा मात्र पूर्ण खडकांत व संपूर्ण चढाईत उंच असलेला ७० फुटांचा आहे. दोर, बबनच प्रथम चढून लावत चालला होत. त्याला मदतीला अपूर्व त्याच्यामागे होताच. त्यानंतर लगेच येणारा ५ वा उभा टप्पा चढायला थोडा ट्रिकी आहे. मध्येच थोडी चिमणी पद्धत वापरुन मी चढलो. या पुढील टप्पे तुलनेने सोपे आहेत पण आता वर चढतांना माथा अरुंद होतोय व दोन्ही बाजूंचं खोल खोल आणखी मेगा होत चाललंय हे जाणवायला लागतं. पुढील टप्पा थोडा चढल्यावर एकदम खोदीव पायर्या लागतात. पुढचा आणखी एक छोटा टप्पा चढला की माथ्याकडे जाणारी अरुंद वाट दिसते. या वाटेवरुन माथ्याकडे चालत जाणं हा एक अपूर्व अनुभव आहे. द रॉयल समिट...
गुहेनंतरचा मोठा कातळटप्पा.
माथ्यावर येतांच समोर दिसणारा दुर्गेश्वर रायगड, उजवीकडे कोकणदिवा, घाटमाथ्यावरुन सरसरत कोकणात उतरणार्या बोचेघळ- निसणी- गायनाळ या घाटवाटा. मागे रायलिंग पठार व बोराटा नाळ, उजवीकडे सिंगापूर- फडताड नाळ या घाटवाटा असा राजेशाही आसमंत न्याहाळत, बबनला माहिती विचारत होतो.
'लिंगाणा कितीदा चढला असशील रे...!'
'शेकडो वेळा असेल.... फिक्स नाय सांगता यायाचा'
'तरी वर्षातून कितीदा?'
'तीस- पस्तीस वेळा तरी असंल'
मग दहाबारा वर्षांपूर्वी अरुण सावंतांनी घेतलेलं रायलिंग ते लिंगाणा व्हॅलीक्रॉसिंग, लोकांचे बरेवाईट अनुभव, अपघात झालेल्यांना, चुकलेल्यांना केलेली मदत वगैरे गोष्टींवर तो बोलत होता पण एक डोळा मावळतीकडे कलणार्या सूर्याकडे ठेवून..! कारण अंधार व्हायच्या आत त्याला घराकडे पोहोचायला हवं होतं. मग सगळेच झपझप रॅपलिंग करत खाली आलो. उद्या येणार्यात चमूसाठी माथ्यापर्यंत दोर लागला होता.
बबनने निघतांनाही आवर्जून काही सूचना दिल्या त्यापैकी महत्त्वाची म्हणजे, स्वयंपाकाला चूल पेटवाल, ती या धोंड्यांमागेच पेटवा. किटाळं/ ठिणग्या इकडेतिकडे उडणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्या. अख्ख्या गडावरलं गवत सुकलेलं आहे. वणवा पेटला तर लावलेले दोरही जळून जातील....! आता आम्ही अधिकच काळजीवाहक झालो. गुहेत भितींवर भरपूर बोल्ट्स ठोकलेले आहेत, ते सॅक्स वगैरे अडकवायला कामाला येतात. कारण साधारण सहा ते सात जण आरामात झोपू शकतील एवढीच गुहेत जागा आहे. वाळलेल्या गवताच्या मदतीनेच चूल पेटवून, पनीर माखनवाला, मेथीमसाला, खिचडी आणि शिवाजीकडून आणलेल्या पोळ्या असा दांडगा बेत हाणून लिंगाणा समिट साजरं झालं. पौर्णिमेच्या जवळची रात्र असल्याने चंद्रप्रकाशात बाहेर पॅचजवळ येऊन बोलत बसलो. इथे फोनला रेंज मिळत असल्याने फोनाफोनीही झाली. शेवटी भाऊसाहेबने, आपल्याला सात वाजता पॅचकडे दिवसभरासाठी तयार होऊन बसावं लागणार आहे तेव्हा लवकर झोपलेलं बरं...! असा हुकूम सोडल्याने गुहेत येऊन झोपलो. पाठ टेकल्याबरोब्बर सगळेच झोपेच्या अधिन झालो. स्वप्नांतही लिंगाणा धिंगाणा घालत होता.
रायलिंग डोंगर
लिंगाण्यावरील खोदीव पायर्यांवरुन हा किल्ला जुना असला पाहिजे पण इतिहासात फारशी नोंद नाही. जावळीच्या मोर्यांचा पराभव केल्यावर हा किल्ला महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला असावा. शिवकालांत या दुर्गाचा वापर तुरुंग म्हणून करत असावेत. पेशवेकालांत या किल्ल्यावर असलेल्या अधिकार्यांची नांवे व जुजबी माहिती मिळते. १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला ताब्यात घेतला. या सुळकादुर्गाच्या माथ्यावर कुणी गेल्याचे इतिहास किंवा दंतकथेतही स्पष्ट उल्लेख नाहीत.
परंतू २५ डिसेंबर १९७८ रोजी मुंबईच्या हॉलिडे हायकर्सच्या १४ जणांनी लिंगाण्याच्या माथ्यावर पाऊल ठेवून इतिहास घडवला. श्री. तु वि जाधव, हिरा पंडीत, अनिल पटवर्धन, संतोष गुजर, अजित गोखले, विवेक गोर्हेय, एस के मूर्ती, विलास जोशी, नंदू भावे, शाम जांबोटकर, श्रीकांत फणसळकर, विनय दवे, संदीप तळपदे व किरण समर्थ हे ते साहसवीर!
३० डिसेंबर १९७९. संतोष गुजर या प्रस्तरारोहकाचा लिंगाणा एकट्याने चढाई करुन परततांना खाली पडून मृत्यू झाला. खिडक्या असलेल्या गुहेजवळ यांच्या नांवाची स्मृतीशिळा लावलेली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर लिंगाणा चढाईच्या मोहिमा काही काळ थंडावल्या होत्या.
१९८० च्या सुमारास खिंडीतून गुहेपर्यंतच्या मार्गाची प्रथम चढाई यशवंत साधलेंच्या चमूने (BOBP, पुणे) केली व नविन मार्ग गिर्यारोहकांना खुला झाला.
१९८१ मध्ये पुणे व्हेंचरर्स संस्थेने लिंगाणा सर केला व आरोहकांची पावले पुन्हा लिंगाण्याकडे वळू लागली.
१० एप्रिल १९८३ रोजी मुंबईच्या गिरीविराज हायकर्सच्या श्री. किरण अडफडकर, सुनील लोकरे व संजय लोकरे यांनी कृत्रिम साधनांशिवाय केवळ ७० मिनिटात लिंगाणा माथा गाठण्याचा पराक्रम केला.
२००६ मध्ये अरुण सावंत व अनेक मान्यवर गिर्यारोकांनी एकत्र येत लिंगाणा ते रायलिंग पठार अशी व्हॅली क्रॉसिंग मोहिम यशस्वी केली.
२०१३ मध्ये दिलिप झुंजारराव व त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पल्लवी वर्तक हिने लिंगाणा सोलो कृत्रिम साधनांशिवाय सर केला.
गुहेतून दिसणारा रायलिंगाचा डोंगर.
पहाटे गजर झाला तरी सगळे तसेच आळसावून पडून राहिलेलो तेवढ्यात एकदम जवळून जोरात हाक ऐकू आली तसे सारे ताडदिशी उठले. म्हटलं हे आले की कांय खिंडीत! नंतर लक्षात आलं की समोरच्या रायलिंग पठारावर ज्ञानेश्वर उभा राहून हाका मारीत होता. तो रायलिंग पठारावरुन मोहिमेचे छायाचित्रण करणार होता. आम्ही भराभरा आवरुन मॅगी बनवली व खाऊन निघालो. गुहेच्या टप्प्यावरुन बोराटा नाळ उतरुन येणारी मंडळी दिसत होती. थोड्या वेळाने लक्षात आलं की आणखीही एक मोठा ग्रुप वर चढण्यासाठी आला आहे. बोंबला आता! लिंगाण्यावर चढाईचा हा एकच मार्ग असल्याने, संख्या वाढली तर चढाई व उतराई दोन्हींचा वेळ वाढतो. दयानंदासोबत संजय खत्री हा वैनतेय संस्थेचा आणखी एक जुना अनुभवी प्रस्तरारोहक होता. त्याने सरळ घाई व वाद न करता दुसर्या मंडळींना चढाई करु द्या म्हणून शहाणपणाचा सल्ला दिला. सुदैवाने ती इंदापूर बारामतीकडची मालोजीराव भोसले प्रतिष्ठानची सगळी मंडळी खणखणीत असल्याने आमचा तसा कमी वेळ वाया गेला. म्हणजे संध्याकाळ होणार होती ती रात्र झाली वाईंड अप करायला!
आता सगळ्यांना वर घ्यायचं म्हणून योगेश खालच्या टप्प्यात गेला. मी मधल्या टप्प्यांत राहिलो. दोन जण वर येईपर्यंत तेवढ्यात बबनही आला झपाझप वर, आणि आमची गुहेपर्यंत गेलेली मंडळी पुढे चढवायच्या कामाला लागलासुद्धा! प्रत्येकाकडे हार्नेस, डिसेंडर, कॅरॅबिनर, हेल्मेट, ग्लोव्हज दिलेले होते. पॅकलंचदेखील दिले होते. ज्या पॅचवर आपल्याकडे थोडा वेळ आहे असे वाटले की, त्याने तिथेच जेऊन घ्यावे अशा सूचना होत्या त्यामुळे वेगळी जेवणाची सुट्टी न होता मोहिम सुरु राहिली. गुहेच्या टप्प्यावर आम्ही आधीच पिण्याचे पाणी टाक्यांतून कॅनमध्ये भरुन ठेवले होते. त्यामुळे पाण्यासाठी टाक्यांकडे त्या अवघड वाटेने जाण्याचीही कुणावर वेळ आली नाही.
याच वाटेने माथ्याकडे यायचंय.. मागे बोराटा नाळ.
सुरक्षितपणे माथ्यावर गेल्यावर ग्रुपमधीलच समीर बोंदार्डे यांनी ड्रोन आणला होता, त्याच्या सहाय्याने चित्रण केलं. तोवर दुसरा ग्रुप गुहेच्या टप्प्यावर उतरलाही होता. एकेक करुन सगळे खाली आल्यावर भाऊसाहेब, अपूर्व व दयानंद या तिघांनी वाईंड अप केलं तोवर अंधार पडला होता. खिंडीत आधी जाऊन पोहोचलेल्या मंडळींची एकेक झोप झाली होती. ग्रुपमधील सगळ्यांत लहान असलेल्या दयानंदच्या सातवीतल्या मुलीनेही लिंगाणा माथा व्यवस्थित गाठला होता. साधने गोळा करुन नीट बांधून सगळे निघालो. बोराटा नाळेतल्या वळसा असलेल्या ठिकाणी व बोल्डरवर सुरक्षिततेसाठी दोर लावला होता. बोराटा नाळेत पुण्याच्या रॉ अॅडव्हेंचरचा साताठ जणांचा चमू भेटला. ते रात्रीच गुहेत चढणार होते. त्यांना शुभेच्छा देऊन बोराटा नाळ चढून आलो तेव्हा चंद्र बर्यापैकी वर आला होता. घाटमाथ्यावरील गारवा सुखावत होता. शिवाजीकडे जेवण तयार होतेच. आम्हांला उशीर झाल्याने तोही काळजीत पडला होता. वांग्याची भाजी, पोळी, कढी, खिचडी असा भक्कम बेत ओरपून सगळी मंडळी लगेच परतीच्या प्रवासाला लागली. आमच्यातल्या अपूर्वला महत्त्वाचे काम आसल्याने तोही त्यांच्या बसमध्ये सामिल झाला. आता आम्ही तिघांनी रात्री ड्राईव्ह करीत जाण्याऐवजी पहाटे निघून दुपारपर्यंत नासिकला पोहोचायचं ठरवलं.
सकाळी सामुदायिक कार्यक्रमाला गेलेलो असतांना समोर दूरवर उठावलेलं लिंगाण्याचंं टोक पहात सहज भाऊसाहेबाला म्हटलं की तू रायलिंगावरुन लिंगाणादर्शन केलं नसशील तर जाऊया कां? कारण मी व योगेशने याआधी सह्यांकनवेळी व त्याआधीही रायलिंग टोकावरुन लिंगाणा पाहिला होता. काल ते दुसरे लोक आले नसते तर, सुर्यास्तापूर्वी आमच्या सगळ्या लोकांनाही रायलिंगवर नेण्याचा आमचा विचार झाला होता. भाऊसाहेब अशा प्रश्नाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. शिवाजीने गांवातल्याच दोघां छोट्यांना आमच्यासोबत पाठवलं व येतांना दुसर्या वाटेने म्हणजे जवळजवळ रायलिंगास प्रदक्षिणा घालत येणार्या वाटेने घेऊन यायला सांगितलं. रायलिंग टोकावर अर्ध्या तासात पोहोचलो तेव्हा काल बोराटा नाळेत भेटलेला ग्रुप गुहेच्या वरचा टप्पा चढूनही गेले होते. त्यांची चढाई टोकावरून स्पष्ट दिसत होती. रायगडावरुन येणारा भरारता राजवारा घेत थोडा वेळ थांबल्यावर निघालो. आवरुन मोहरीतून निघालो तोवर सकाळ कलली होती. परततांनाही एकलदर्याजवळ गाडी थांबवून रायलिंगामागचं लिंगाण्याचं टोक आम्हांला आग्या- फडताड नाळेचं आमंत्रण देत होतं. गेले दोन दिवस गुंतून असलेल्या या लिंगाण्याच्या कातळचुंबकातून बाहेर पडायची वेळ झाली होती.
-हेमंत पोखरणकर
माहिती स्त्रोतः
* गिरीदुर्ग आम्हां सगे सोयरे- श्री. तु. वि. जाधव
* साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची- श्री. प्र. के. घाणेकर
* श्री. राजेश गाडगीळ
प्रतिक्रिया
11 Feb 2017 - 12:02 am | एस
लिंगाण्याचा कातळचुंबक! खरं आहे अगदी!
11 Feb 2017 - 5:19 am | कंजूस
भारीच आहे.
11 Feb 2017 - 5:59 am | यशोधरा
सुरेख वर्णन!
11 Feb 2017 - 8:05 am | सानझरी
भन्नाट!!!
11 Feb 2017 - 10:45 am | प्रचेतस
जबरदस्त लिहिलंयस.
ऋषीकेशकडून लिंगाणा मोहिमेचा ड्रोन व्हिडियो पाहिलाच होता. छायाचित्रं मात्र अजून हवी होती.
11 Feb 2017 - 11:11 am | अनिरुद्ध.वैद्य
बस नाम ही काफी है! मस्त लेख!
11 Feb 2017 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट गिर्यारोहण, मस्तं वर्णन आणि चित्रे.
मोहिमेचा ड्रोन व्हिडियो पण टाका ना इथे, जमल्यास.
11 Feb 2017 - 6:39 pm | संजय पाटिल
असेच म्हणतो..
20 Feb 2017 - 1:14 pm | पेशवा राजे
ड्रोन व्हिडीओ (समीर बोदर्डे यांच्या युट्युब चॅनेल वरून साभार)
11 Feb 2017 - 8:53 pm | पैसा
हे असलं कशाला करता रे एकेक! साष्टांग नमस्कार तुम्हाला सगळ्यांना!!
12 Feb 2017 - 1:01 pm | अभिजीत अवलिया
लिस्टीत टाकून ठेवलाय लिंगाणा. एकदातरी सर केलाच पाहिजे.
12 Feb 2017 - 3:35 pm | अजया
अफाट आहे तो दूर्ग आणि चढण्याची आस असणारे गिर्यारोहक पण!
12 Feb 2017 - 4:28 pm | इरसाल कार्टं
मी ट्रेकिंग करतो पण परिसरात रॅपलिंग करणार कोणीही नाहीये. यासाठी ट्रेनिंग लागते का? साहित्यही लागत असेल ना?
मला काहीही माहिती नाही.
13 Feb 2017 - 12:19 pm | सूड
__/\__
13 Feb 2017 - 12:37 pm | स्वीट टॉकर
'स्वप्नांतही लिंगाणा धिंगाणा घालत होता.' मस्त लिहिलं आहे!
सुळक्याच्या फोटोनीच आमच्यासारख्यांना धडकी भरते! तो सोलो सर करणार्यांना साष्टांग नमस्कार! त्यात एक मुलगी देखील आहे ह्याचं फारच कौतुक वाटतं!
13 Feb 2017 - 5:38 pm | sagarpdy
__/\__
14 Feb 2017 - 1:34 am | हेम
सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद!
लेखात आणखी काही फोटो टाकले आहेत.
14 Feb 2017 - 3:39 am | आषाढ_दर्द_गाणे
मजा आली
15 Feb 2017 - 5:36 pm | वेल्लाभट
अर्र् कहर आहे बा हे !
कधी जमेल कोण जाणे
16 Feb 2017 - 1:41 pm | सिरुसेरि
मस्त आठवण
20 Feb 2017 - 9:59 am | दिपस्वराज
स्वप्नांतही लिंगाणा धिंगाणा घालत होता......_/\_