पाकातले चिरोटे
साहित्यः
२ वाट्या मैदा.
पाव चमचा मीठ
४ टे.स्पून कडकडीत तेल
२ टे.स्पून डालडा
तळण्यासाठी तूप किंवा रिफाइंड तेल
पाकासाठी २ वाट्या साखर
केशर / केशरी रंग (ऐच्छिक)
कृती:
१.मैदा चाळून मीठ व तेलाचे मोहन घालून मऊ भिजवावा. भिजवताना १टे.स्पून दही घालावे.
२.परातीत डालडा घेऊन हलके होईपर्यंत फेटावे, पांढरेशुभ्र झाले कि कोमट करावे.
३.मैद्याचे १० गोळे करून, तांदुळाची पिठी वापरून त्याच्या पोळ्या कराव्यात. ओल्या फडक्याखाली झाकून ठेवाव्यात.
४.मैद्याची एक पोळी घेऊन त्यावर फेटलेला डालडा कडेपर्यंत हाताने लावावा.त्यावर दुसरी पोळी ठेऊन त्यावर डालडा लावावा. असे पाच पोळ्यांवर लावावे. ही चळत व्यवस्थित दाबून तिची गुंडाळी करावी .
५.गुंडाळीचा कडेचा थोडा भाग कापून, एक सारखे अंगठ्याएवढे भाग कापावेत.
६.पोळपाटावर चौकोनी चिरोटे लाटावेत.
७.कढईत भरपूर तूप/तेल घेऊन मध्यम आचेवर दोन्ही बाजुनी गुलाबी रंगावर तळावेत.
८.चिरोटे तळून झाल्यावर चाळणीत उभे लावावेत म्हणजे तूप निथळेल.असे उरलेल्या पोळ्यांचे चिरोटे करावेत.
९.पाकाकरता जाड बुडाच्या भांड्यात २ वाट्या साखर, अर्धी वाटी पाणी व केशर घालून पक्का पाक करावा.
१०.गॅस मंद ठेऊनच एक एक चिरोटा त्यात बुडवून चाळणीत उभा निथळत ठेवावा. म्हणजे जास्तीचा पाक निघून जाऊन चिरोटे खुटखुटीत होतात.
वरील मैद्यात २० चिरोटे होतात.
टीपः आदल्या दिवशी चिरोटे करून हवाबंद डब्यात ठेवावे. म्हणजे तेल्/तूप निघून जाते.
प्रतिक्रिया
3 Oct 2008 - 2:00 am | खादाड_बोका
आमच्या घरी जेव्हाही गुलाबजामुन यायचे, तेव्हा माझी आई ऊरलेल्या पाकाचे , पाकातले चिरोटे करायची. पण ती पाकामध्ये थोडा लिंबाचा रस टाकायची.
त्यामुळे आम्ही बाबांना नेहेमी गोड आणायचे म्हंटल की, गुलाबजामचा हट्ट करायचो...कारण माहीत होते की डबल मेजवानी मिळेल. आणि हलवायाल्या सुद्धा "भैया, थोडा पाक ज्यादा डालो" असा हट्ट करायचो....... =P~ =P~
मला तर स्वप्नातही भुक लागते....
3 Oct 2008 - 2:20 am | स्वाती राजेश
पाकात थोडा लिंबू पिळतात कारण पाक गार झाला कि त्याची परत साखर होत नाही...पाक आहे तसाच राहतो.
चवही छान येते.....
सुधारस असा करतात , त्यात थोड्या केळाच्या फोडी घालून
सुधारस पुरी हा पदार्थ पुर्वी श्रीमंतपुजनादिवशी बनवत असत......मस्त आठवण!!!!!!!!!!!
3 Oct 2008 - 6:14 am | मीनल
डालड्या ऐवजी काय वापरता येईल?
इथे मोठ्ठा २ कि.च डबा मिळतो.उरलेल्याच मग काय करणार?
मीनल.
3 Oct 2008 - 6:42 am | ईश्वरी
स्वाती, मस्त ग...छान आहे रेसिपी. मी यापूर्वी कधी केले नव्हते चिरोटे. आता करून बघीन.
डालड्याऐवजी बटर वापरलं तर...?
ईश्वरी
7 Oct 2008 - 9:35 pm | स्वाती दिनेश
बटरपेक्षा मार्गारिन वापरा,डालड्याला पर्याय.
स्वाती,चिरोटे खासच..
स्वाती
3 Oct 2008 - 7:03 am | रेवती
एक से बढकर एक पदार्थांचा धडाका सुरू आहे अगदी!
माझा आवडता पदार्थ.
रेवती
3 Oct 2008 - 7:34 am | विसोबा खेचर
मिपाच्या अन्नपूर्णादेवी,
आपण गेले काही दिस मिपावर लिहीत नव्हतात तेच बरं होतं! ह्या अश्या चिरोट्याच्या वगैरे पाकृ टाकून का जीव जळवताय? :)
आपला,
(चिरोटेप्रेमी) तात्या.
4 Oct 2008 - 11:55 am | अरुणा वसिष्ठ
मला ही पाककृति नवीन आहे पण खूप आवडली.
मात्र एक शंका - जिज्ञासा- आहे.
५.गुंडाळीचा कडेचा थोडा भाग कापून, एक सारखे अंगठ्याएवढे भाग कापावेत.
हे जर मला समजले नाही. काप कसे करायचे. बाकरवडीला करतो तसे?
आणि लाटायचे कसे? गोल भागाकडून की चपट्या भागाकडून?
कृपया मार्गदार्शन करावे.