*/
Stories are the creative conversion of life itself into a more powerful, clearer, more meaningful experience. They are the currency of human contact.
- Robert McKee
असं म्हणतात की रोटी, कपडा, मकान या तीन मूलभूत गरजांसोबत मनुष्यप्राण्याची आणखी चौथी एक मूलभूत गरज आहे, ती म्हणजे गोष्टी सांगणे, गप्पा मारणे. गोष्टी सांगणे, ऐकणे, वाचणे न आवडणारा मनुष्यच नव्हे. का आवडत असेल मनुष्यप्राण्याला हा उपद्व्याप? थोडा विचार केला तर असं लक्षात येईल की ह्या गोष्टींमधून आपण शिकत असतो, आपल्या ज्ञानात भर पडत असते. मनुष्याला सुरुवातीपासून स्वतःला खूप वेगाने विकसित करण्याची असलेली भूक बघता हे गोष्टीवेल्हाळ असणे गरजेपोटीच आले असावे असे वाटते. कसली गरज? गरज ज्ञानाचीच, हजारो लोक हजारो प्रकारचे अनुभव घेत असतात, ते त्यांच्यापर्यंतच राहिले तर ज्ञान पसरणार कसे? ज्ञान पसरले नाही, तर माणसाने इतर जीवांवर जो विजय मिळवला तो कसा मिळवला असता? अनेक समस्यांवर मात करत आज माणूस इथवर पोहोचलाय तो त्याच बळावर. गोष्टी सांगण्याच्या. म्हणजेच आपल्याला मिळालेली माहिती रंजक करून सांगण्याच्या बळावर मानववंशाने अपार प्रगती साध्य केली. बघा, निस्त्या गप्पा हाणत आपण कायच्या काय करून बसलोय!
'कोणत्या प्राण्यापासून आपण आपली सुटका कशी केली', 'अमुक एका ठिकाणी कोणतं जनावर खायला चांगलंय', 'कोणत्या ओढ्याचं पाणी सुरक्षित आणि उत्तम आहे', ह्या आणि अशाच अनेक माहितीच्या कणांना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कामी येते ती गोष्ट. स्लाइड ट्वेन्टी टू : 'आज वाघाच्या तावडीतून सुटलो', स्लाइड फिफ्टी फोर : 'करड्या पंखाची बटेर खायला चांगली', स्लाइड हंड्रेड अँड एटी नाइन : 'सूर्य उगवतो त्या दिशेचा ओढा उत्तम', अशा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती पसरलीच असती, यावर आजच्या 'कॉर्पोरेट मीटिंग्स अटेंड' केलेल्या लोकांना प्रचंड विश्वास बसेल.... हे हे हे, नाहीच बसणार. माहित्येय! तेच बहुधा आदिमानवालाही आदीच ठावं आसंल... मग त्यानं पाल्हाळ लावत सुरुवात केली असावी, "रं बाब्या... आइक तर... त्या दुपारी, मी असा पांदीपांदीनं, राखाड्या सशाचा माग काढत चाललेलू.... आणि मंग, अचानक काय झालं माहित्ये?" अशी सुरुवात झाली तरच कान टवकारले जातात, येणारी माहिती नीट साठवली जाते. होना? वही तो!
तर म्हाराजा, गोष्टीचा जन्म असा हुतो! कशासाठी तर 'मला काय माहीत ते तुमच्यापतूर पोचवायला'. मग ह्यात जाहिरात का मागं र्हायील... आरं भल्या माणसा, माहितीचं, ज्ञानाचं गोष्टीत रूपांतर करून सांगणं हीच जाहिरातकला आहे!
मित्रांनो, 'गोष्ट तशी छोटी' ह्या उपक्रमात आज आपण जाहिरातींतल्या गोष्टींबद्दल बोलू या. हो, हो, त्याच जाहिराती, ज्या लागल्या की रिमोटवर आपली बोटे वळवळू लागतात. अहो, जाहिरातीची गोष्ट खरेच खूप छोटी असते. पण त्यात अर्थ खोल असतात. अगदी तीस सेकंद ते नव्वद सेकंदाच्या तुटपुंज्या वेळेत मनावर परिणाम करणारी, दखल घ्यायला भाग पाडणारी, वर्षानुवर्षे लक्षात राहून जाणारी ती एक जाहिरात असते, ती जाहिरात असते एक छोटीशी गोष्ट. मूर्ती लहान पण कीर्ती महान. गोष्ट तशी छोटी जाहिरातपटांची.
एखाद्या ब्रॅण्डची गरज असते स्वतःची खास अशी एक ओळख बनवणे, ती ओळख आवश्यक असते त्याच्या ग्राहकांसाठी की तो ब्रॅण्ड नेमकं कशाचे प्रतिनिधित्व करतोय, कशाचे प्रतीक आहे. जाहिरातींमधून सांगितल्या जाणार्या गोष्टी हेच काम स्मरणीय पद्धतीने, ग्राहकांच्या मनात उतरून करत जातात.
वस्तुनिष्ठ माहिती आणि निर्जीव आकडे यांपेक्षा कथा-कहाण्या स्मरणात राहण्याची शक्यता बावीस पट जास्त आहे. हे फक्त माहिती किंवा आकडे साठवणार्या बुद्धीशीच नव्हे, तर भावभावनांच्या आधारे जोडल्या जाण्याशीही संबंधित आहे. जर एखादा ब्रॅण्ड आपल्या दाव्यांप्रमाणे प्रामाणिक राहून सेवा देत असेल, तर ग्राहक त्यावर विश्वास ठेवून निष्ठावान ग्राहक बनतात. ह्याद्वारे एक चक्र पूर्ण होऊन ब्रॅण्ड आणि ग्राहक एका मजबूत नात्यांत गुंफले जातात. बहुतांश वेळा कायमच्या.
कहाण्यांमुळे एक छोटीशी संकल्पना, मूळ विचार एका वेगळ्याच उंचीला जाऊन पोहोचतो. ग्राहकांना अमूर्त अशा संकल्पनेचे मूर्त स्वरूप दिसते ते ह्या कथांमधूनच. ह्याचद्वारे भावनिक पातळीवर ग्राहक जोडले जाणे घडते. जाहिरात-कथा ब्रॅण्ड आणि उत्पादन-सेवांमध्ये ग्राहकांचे कुतूहल जागृत करतात.
खरे तर जाहिरात ह्या विषयावर बोलण्यासारखे भरपूर आहे, अनेक पैलू आहेत. अनेक विषयही आहेत. आपल्यासमोर सादर होणारी ३० सेकंदांची जाहिरात खूप आकडेवारी, संशोधन, माहितीचा फाफटपसारा, अनेक मते, उत्पादनाचे वैशिष्ट्य, फायदे, न वापरल्यास होणारे नुकसान, काय काय अन् काय काय पोटात घेऊन आलेली असते. पण हळूच आपल्या मनात शिरते ती फक्त तिची छोटुकली गोष्ट घेऊन.
घरातून चिडून रागावून निघून आलेल्या ह्या छोटुकल्याचा छोटुकला राग आज करोडो लोकांच्या नॉस्टॅल्जियाचा भाग होऊन राहिलेला आहे.
.
.
तर अशा विषयाशी संबंध असलेल्या पर्फेक्ट कहाण्या कशा काय बनवतात बॉ हे लोक्स, अशा प्रश्न तुम्हाला पडत असेल नै? लै मजेदार आहे हे कथा बनत जाणं. हां पण मी फकस्त कहाण्या असलेल्या जाहिरातींबद्दल बोलतोय बरं का, ह्ये ध्यानात आसुंद्यात!
सर्वात आधी विचार सुरू होतो तो समस्येवर! समस्याच नसेल तर समाधान कशाला हवं? तर उत्पादकाची समस्या काहीही असू शकते. उत्पादन नवीन आहे, उत्पादन जुने आहे, फारशी माहिती नाही, नेमके का वापरायचे ते माहीत नाही, प्रतिस्पर्धी उत्पादन जास्त खपतेय, आपले फार महाग वाटतेय, आपले फारच स्वस्त बोलेतो चीप वाटतेय, डिमांडीच नैय्ये यार! ज्यांच्यासाठी बनवले, त्या टार्गेट कस्टमरबेसला अपील होत नाहीये, एक ना एक, भारंभार समस्या. यावर एकच उपाय. एक छोटीशी जाहिरात.
उत्पादन काय, विषय काय, टार्गेट कस्टमर कोण आहे, डेमोग्राफिक्स काय आहे, त्यांचे राहणीमान, विचारशैली, शिक्षण, भवताल, मानसिकता, ध्येय, ट्रिगर पॉइन्ट्स या सर्वांचा चांगला आकडेवारीसह अभ्यास करून एक रूपरेषा ठरवली जाते. संभाव्य ग्राहकाच्या मनोविश्वात उतरू शकेल असा एखादा विषय निवडून त्याभोवती कथा रचली जाते. मग कथेच्या अनुषंगाने स्क्रीनप्ले - पटकथा तयार होते. पटकथेचा आधार घेऊन चित्र-कथा (स्टोरीबोर्ड) तयार होते. स्टोरीबोर्ड म्हणजे लिहिलेल्या कथेचे कॉमिक-स्टाइलने चित्रण. त्याने कॅमेरा अॅन्गल, पात्रे, नेपथ्य, पेहराव, केशभूषा, वेषभूषा यांची प्राथमिक मांडणी होते. कथेच्या मागणीनुसार कलाकारांच्या ऑडिशन्स होतात. संगीतकार नेमले जातात, त्यात लागल्यास एखादे दोन ओळींचे गीतही लिहून घेतले जाते. ऑडिशन्स हा जाहिरातपटांचा अविभाज्य घटक. सतत नवनवे चेहरे ही ह्या क्षेत्राची मूलभूत गरज आहे. अन्यथा पांढराफटक चेहरा घेऊन आलेली यामी गौतमी ....... बघा तुम्हालाही फेअर-अन-लवलीच आठवली ना!..... तर यामी गौतमी अॅक्टिवाची जाहिरात करत असेल, तरी खरी जाहिरात फेअर-अन-लवलीचीच होईल! त्यामुळेच टॉप-मॉडेल्स, चित्रपटातले स्टार नट, नट्या सोडल्या तर एकच चेहरा अनेक जाहिरातीत दिसत नाही. खरे तर जाहिरातीत काम करणार्या कलाकारांचे कौतुक वाटायला पाहिजे. अगदी मिलिसेकंदाच्या वेळेत भन्नाट मुद्रा करणे, संवादांचे अचूक टायमिंग व टोन साधणे, ज्याची जाहिरात करतोय त्याला सुसंगत अशी देहबोली असणे ह्या गुणविशेषासह असणारे खास कलाकार अनेक वर्षे जाहिरात जगात तळ ठोकून असलेले दिसतीत. सतत नवीन चेहर्यांच्या शोधात असलेल्या क्षेत्राला ह्या लोकांचीही सतत गरज पडतेच.
म्हटले तर फक्त तीस सेकंद कालावधीच्या गोष्टीला खर्च काय तो असणार? पण नाही, चाराण्याच्या कोंबडीला बाराण्याचा मसाला असतो. एका जाहिरातीचा खर्च हा काही कोटी रुपयातही जाऊ शकतो. अर्थात हा खर्च किती असावा ह्यावर सर्वस्वी जाहिरात एजन्सी आणि जाहिरातदार (उत्पादन-सेवा देणार्या कंपनीचा प्रतिनिधी) ह्यांच्या बोर्डरूम मीटिंगमधे ठरते. अगदी कमी बजेट असलेल्या जाहिरातींनीही मैदान गाजवले आहे व कोट रुपये खर्चलेल्या जाहिरातींनी खर्चही वसूल केला नाही अशी उदाहरणे खूप आहेत.
अगदी कमी वेळात कथा मांडायची असल्याने खूपसे तपशील गाळले जातात. जसे चित्रपटांचे असते तसेच जाहिरातपटांचेही. मूळ सिनेमा तीन तासांपेक्षा जास्तच असतो, संकलक-एडिटर काटून-छाटून त्याला अडीच तासांत बसवतो. तसेच जाहिरातपटांचेही. मूळ कथा सहसा तीन मिनिटांपेक्षा जास्त असू शकते. पण कमीत कमी दीड मिनिटांची असतेच. पुढे ती तीस सेकंदात बसवली जाते. त्याहीपुढे जाऊन ती अगदी दहा सेकंदातही बसवण्याचा आदेश येऊ शकतो. त्यामागे व्यावसायिक गणिते आणि चॅनेलचे दर, टीआरपी, सीझन अशा एक वा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. रिमोटवर आपली बोटे वळवळण्याचे कारण अशा सतत मारा होणार्या अनेक अर्थहीन छोट्या काट-छाट जाहिरातीही असतात. पण ह्याच्या नादात चांगल्या, पुन्हा पुन्हा पाहत राहाव्या अशा काही जाहिरातीही निसटतातच.
पुन्हा पुन्हा पाहाव्यात, आठवाव्यात अशा जाहिराती म्हणजे उत्तम कलेचा नमुना असतात.
खूपच भावनाप्रधान क्षणावर येऊन संपणारी, टायटनची ही एक जाहिरात. इटालियन सेटिंग्स, नायक-नायिकांचे कॅरेक्टर-बिल्डिंग, वावर, इत्यादी बाबींचा खुबीने वापर करत ही जाहिरात लाखो लग्नोत्सुक मुलामुलींच्या मनात अलगद शिरते. हिर्याच्या अंगठीइतके मौल्यवान टायटन घड्याळ, आपल्या आयुष्याची वेळ तिच्या हातावर गुंफून टाकणारा नायक, क्षणाचाही विचार न करता होकार देणारी नायिका. म्हटले तर ह्या एका छोट्याशा गोष्टीत कितीतरी अर्थ दडलेले आहेत... अपवर्डली मोबाईल कस्टमरच्या भावनांना हळुवार हात घालणारी अचूक जाहिरात...
.
.
इंपीरियल ब्लूच्या 'मेन विल बी मेन' ह्या मालिकेतल्या नितांतसुंदर जाहिरातपटांतली ही सर्वोत्तम मानावी अशीच. अगदी छोटीशी एका ओळीची कथा, दोनच पात्रे, अगदी मोजके संवाद, पण परिणाम कहर! दोघांच्याही सहज अभिनयाने अगदी कमाल केली आहे. म्हटली तर ही एक दारूच्या ब्रॅण्डची जाहिरात आहे, पण कथेची निवड, ती मांडण्याची पद्धत, पात्रांची योजना, त्यांचा एकमेकांसोबत स्वतःच्या सुप्त हेतूने प्रेरित संवाद, आणि एका शब्दावर अचानक बसणारा धक्का! लै ग्वाड! हे सर्व इम्पिरियल ब्लूच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत छुपा संदेश अलगद पोहोचवते.
.
.
तनिष्क ज्वेलरी ब्रॅण्डची ही एक जाहिरात त्यातल्या वेगळ्या विषयाच्या, विचाराच्या मांडणीबद्दल खूप गाजली होती. ब्रॅण्ड पोझिशनिंगसाठी ह्या जाहिरातीचा तनिष्कला खूप उपयोग झाला.
.
.
ब्रिजस्टोन टायरची ही एक अतिशय गाजलेली जाहिरात. वेगळीच कथा आणि भन्नाट दिग्दर्शनाचा उत्तम नमुना. कारुण्य आणि विनोद ह्यात कथा गुफूंन अंतिम क्षणावर आपल्या उत्पादनाच्या उपयुक्ततेबद्दल, दर्जाबद्दल दमदार दावा करणारी.
.
.
ह्या ब्रिजस्टोनच्या जाहिरातींसारख्या फार थोड्या जाहिराती असतात, ज्यांच्या कथा व उत्पादन सुयोग्य पद्धतीने मिसळून सादर होतात. अन्यथा फक्त कहाण्या लक्षात राहतात, पण त्या कोणत्या उत्पादन-सेवेबद्दल होत्या ते आठवत नाही. अशा जाहिरातींच्या कल्पकतेबद्दल त्यांचे कौतुक तर भरमसाठ होते, बक्षिसेही मिळतात, पण उत्पादनाचा सेल काही होत नाही.
मोठमोठ्या लांबीच्या चित्रपटातूनही कधीकधी लेखक-दिग्दर्शकांना काय नक्की मांडायचे ते समजत नाही, तिथे अगदी मिनिटभरात पुनर्जन्माची कथा मांडून त्याला अतिशय सुसंगत अशा उत्पादनाची जोड देऊन ही जाहिरात प्रेक्षकांच्या मनात घर करते.
.
.
टाटा स्कायच्या 'पूछनेमें क्या जाता है' ह्या मालिकेल्या जाहिराती काही खास कथा घेऊन येतात.
फेविकॉल ब्रॅण्डने अनेकोनेक सुंदर जाहिराती दिल्या आहेत. त्यात ही बहुधा सर्वाधिक गाजलेली असावी.
विदेशी भूमीवरच्या काही जाहिराती.
Sainsbury's चॉकोलेटची ही जाहिरात.
.
.
कोकच्या हॅप्पीनेस फॅक्टरी मालिकेतल्या अॅनिमेटेड जाहिरातकथा अद्भुतरम्य अशा फॅन्टसीलँडची सफर घडवून आणतात. ह्याद्वारे साखरमिश्रित कार्बोनेटेड पाणी असे रटाळ डिस्क्रिप्शन असलेली पेयाची बाटली जणू स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेले देवांचे पेय बनून जाते.... गोष्टीची करामत!
.
.
ह्या छोट्या छोट्या कथांमधून काही उत्पादक आपल्या उत्पादनांना सामाजिक समस्यांशी, जनजागृतीशी जोडून सुंदर संदेश, तर देतातच सोबत आपलं ब्रॅण्ड पोझिशनिंग अधिक उत्तम करून घेतात.
.
.
.
.
फक्त उत्पादन विकायलाच नाही, तर जनहितार्थ प्रसारित केल्या जाणार्या जनजागृतीच्या, सामाजिक संदेशांच्या अनेक जाहिरातींना मजबूत कथा असतात.
अगदी निःशब्द करणारी शब्दांशिवाय सांगितलेली ही व्यथा..... हिला कथा तरी कशी म्हणावी?
.
.
रक्तदानावर अचानक विचारात पाडणारी ही जाहिरातकथा. नेहमी रक्तदान केल्यास पुढे काय होईल ह्याचे फायदे सांगणार्या जाहिरातींपेक्षा वेगळी...
.
.
.
खरे तर हजारो उत्पादन सेवांवर हजारो जाहिराती दर वर्षी बनत असतात. त्यातल्या फार थोड्या कायम लक्षात राहतील अशा बनतात. परत परत खास बघाव्या वाटाव्यात अशाही फार थोड्या असतात. तरी अशा मेमोरेबल जाहिरातींची संख्याही शेकड्यात आहे. एका लेखामध्ये अनेक विषय हाताळणे शक्य नाही, तसेच सर्व पैलूंवर बोलणेही शक्य नाही. त्यासाठी हा लेख चालू ठेवणार आहे.... जिथे जसे जे काही उत्तम सापडेल ते प्रतिसादांमध्ये नोंदवत जाईन... तुम्हीही तुम्हाला आवडलेल्या, स्मरणात राहिलेल्या जाहिराती इथे द्या, तुमचीही मते मांडा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चर्चेतून अधिक खुलवत नेऊ या हा विषय.... सर्वांच्या सोबतीने...
धन्यवाद!
प्रतिक्रिया
22 Jan 2017 - 12:42 pm | मार्मिक गोडसे
लेखात स्वतः बनवलेल्या एखाद्या जाहिरातीचा अनुभव दिला असता तर वाचायला आवडले असते.
ब्रिजस्टोन टायर, चाईल्ड अॅबूज आणि रक्तदानाच्या जाहिराती , ग्रेटच!
22 Jan 2017 - 12:46 pm | यशोधरा
जाहिरात विश्वामधे होणार्या कामाच्या पद्धतीविषयी अधिक विस्ताराने वाचायला आवडले असते.
उदा: प्रॉडक्ट कसा निवडला जातो, मार्केटींग स्ट्रॅटेजी कशा ठरवल्या जातात, टारगेट ऑडियन्स कसा ठरवतात वगैरे.
ही ओळखही आवडली. पुढे मागे विस्ताराने लिहायचं मनावर घ्या, ही विनंती.
22 Jan 2017 - 1:06 pm | पैसा
जलेबी अविस्मरणीय. मला स्वतः बाई असल्याने असेल पण लहान मुलांच्या जाहिराती अपिलींग वाटतात. बर्याच जाहिरातीत अर्धवस्त्रांकित ललनांचे काय काम ते समजत नाही. माझ्याच फियाट गाडीच्या लेखात कोणीतरी गाडीसोबत नटी असलेला १९७०-८०च्या दशकातला जाहिरातीचा फोटो टाकला होता. तेव्हा गाडीच्या जाहिरातीत बाई कशाला असेच वाटून गेले होते! इतकी वर्षे झाली त्यात काहीच बदल झाला असे वाटत नाही.
डांगे बुवांचा दीर्घ अनुभव लक्षात घेता या विषयावर एक मालिका लिहा अशी विनंती.
22 Jan 2017 - 1:29 pm | पियुशा
वा !! मस्त झालाय लेख :)
मला ती छोटु सरदार्ची " कि करे पपा पेत्रोल कह्तम हि नही होन्दा आठवली "
22 Jan 2017 - 1:40 pm | पद्मावति
वाह, मस्तं लेख.
उदाहरणे दिल्यामुळे अजुनच रंजक झालाय. आवडला.
22 Jan 2017 - 2:10 pm | सविता००१
मस्त झालाय लेख. अजुन वाचायल आवडेल याविषयी.
बाकी मी मूळ प्रोग्रॅम पेक्षा जाहिराती मास्त मन लावून पहाते. आवडतातच त्या. त्यामागचा व्याप फारच मोठ असणार हो.. लिहा लिहा
22 Jan 2017 - 7:20 pm | बाजीप्रभू
खूप छान डांगे अण्णा!!
वाचतांना मनाशी ठरवत होतो कि काही "थाई" जाहिराती उदाहरणादाखल प्रतिसादात देईन.. आणि बघतो तर पुढच्या स्क्रोलवर तुम्ही माझ्या मनात असलेली नेमकी तीच थाई जाहिरात पेस्ट केलेली दिसली. थाई मंडळी हि खूप भावना प्रधान असतात आणि इथल्या जाहिरातीहि साजेश्या असतात. त्यापाहून अगदी हमसून हमसून रडणारे ऑफिसर्स पाहिलेत मी. एनीवे,
सिम्पली ग्रेट, रोचक... इतका कि गाडी रस्त्याच्या बाजूला लावून सगळा लेख, लिंका वाचून काढल्या.
पुढल्या सिरीजसाठी शुभेच्छा!!
22 Jan 2017 - 7:50 pm | ट्रेड मार्क
मस्त झाला आहे, काही जाहिराती खरच छान असतात.
22 Jan 2017 - 9:00 pm | वरुण मोहिते
अजूनही काही वाचायला आवडेल पुढे .
22 Jan 2017 - 9:30 pm | कैलासवासी सोन्याबापु
मस्त लिहिलंय, तुमचे रोजचे काम आहे पण आम्हाला एकदम जत्रेत हरवल्यागत झाले इतके सगळे बारकावे वाचून. अजून लिहा, ह्याची एक सिरीज करून टाका झकास एकदम.
ही आमच्या मनाजवळ असलेली जाहिरात अडनिड्या वयात पहिल्यांदा ही जाहिरात पाहिली, हिच्यामुळे "बायकिंग" करायचेच असे मनात ठरवले अन माफक केलेही आजवर.
बाकी,
हे वाचून पहिले कोणी डोळ्यासमोर उभे राहिले असेल तर ते म्हणजे आपला मराठमोळा निखील रत्नपारखी. त्याच्यात जबरदस्त कला आहे. काही जाहिराती पाहून मात्र हसावे का रडावे तेच कळत नाही उदा " सस्ता नाय सबसे अच्छा" हे अतिशय विचित्र फिरंगी अक्सेंट मध्ये सांगणाऱ्या एका म्हाताऱ्याची सिमेंटची जाहिरात.
23 Jan 2017 - 8:45 pm | मोदक
हिरो सोबत ही आपली आवडती अॅड. बजाजच्या गाड्या आवडल्या नाहीत कधी, पण ही अॅड लैच भारी आहे.
22 Jan 2017 - 9:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
संपूर्णतः कृष्णधवल रंगसंगतीत एक्झिक्युट केलेली आमच्यालेखी सर्वोत्कृष्ट जाहिरात
ही दुसरी
परत एक एयरटेलची जाहिरात, अतिशय गोड अन रोमांटीक संगीतासह, साखरपुडा आटपुन पुन्हा पोस्टिंगवर जाताना मी हा व्हीडीओ माझ्या मिसेसला पाठवल्याचे आठवते अजूनही मला लख्ख :)
22 Jan 2017 - 9:58 pm | कपिलमुनी
पहिला भाग छान ;)
स्वानुभवातून उलगडलेली मेकींग प्रोसेस वाचायला आवडेल
23 Jan 2017 - 12:19 am | सामान्य वाचक
काही जाहिरातींचे संगीत किंवा शब्द catchy असतात
आठवा
झुळझुळ पाणी खेळवा रानी, आणायचं कुणी सांगतो राणी
काहींचे चित्रीकरण
Boys dont cry
पण एकंदरीत हा खूप गहन नि ट्रिकी विषय आहे
टार्गेट ऑडियन्स आणि मार्केट बरेचदा खूप डायनॅमिक असते
2+2 हा फॉर्म्युला लागू पडत नाही
23 Jan 2017 - 8:34 am | प्रचेतस
लेख थोडा त्रोटक वाटला.
ह्या विषयावर अजून लिहावं असा आग्रह.
युट्युबच्या एम्बेडेड व्हिडीयोजमुळे हा लेख मोबाईलवर लोड होताना खूप वेळ घेतोय.
23 Jan 2017 - 10:53 am | लॉरी टांगटूंगकर
मस्त लेख अण्णा! पुभाप्र.
23 Jan 2017 - 7:47 pm | सिरुसेरि
छान माहिती .. छान जाहिराती . थाई जाहिरात +१०० .
23 Jan 2017 - 8:02 pm | मोदक
झक्कास लेख, आवडला.
जाहिरातींचा लेख असल्याने अमुलचा उल्लेख शोधत होतो. अॅलेक पदमसी, भरत दाभोळकर, सिल्वेस्टर डिकुन्हा यांनी या क्षेत्रात जबरदस्त काम केले आहे. प्रल्हाद कक्कर यांचेही नांव आहेच पण पेप्सी वगळता फारशा अॅड खास शोधून बघितल्या गेल्या नाहीत.
डांगे आण्णांच्या सूचनेनुसार जाहिरातींचे कांही व्हिडीओ चिकटवत आहे.
24 Jan 2017 - 12:52 am | सौन्दर्य
फारच सुंदर विषय आणि मांडणी देखील मस्तच. पूर्वी सिनेमा बघायला थीएटरमध्ये मी चित्रपट सुरु व्हायच्या बराच आधी जात असे का तर सिनेमाच्या आधी दाखवल्या जाणार्या जाहिराती पहायला मिळाव्यात म्हणून. त्या मोठ्या पडद्यावर रंगीत जाहिराती अक्षरशः वेड लावीत.
अनेक कायमच्या लक्षात राहतील अश्या जाहिरातीपैकी 'सोनी एरिक्सन' च्या मोबाईलची जाहिरात कायमची लक्षात राहिली.
https://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=&cad=rja&u...
24 Jan 2017 - 11:27 am | टवाळ कार्टा
लईच भारी इशय.... याड वार बद्दल पण लिवा
24 Jan 2017 - 3:23 pm | इशा१२३
मस्त लेख!अनेक जाहिराती आठवल्या.लेखात दिलेल्या जाहिरातीहि मस्त. छोट्या मुलाची धाराचि जाहिरात तर पूर्वीपासून खासच.
24 Jan 2017 - 8:26 pm | राघवेंद्र
डांगे अण्णा लेख आवडला !!!
26 Jan 2017 - 12:53 am | संदीप चित्रे
एक से बढकर एक जाहिराती बघायला मिळाल्या ह्या धाग्याच्या निमित्ताने!
धन्यवाद
27 Jan 2017 - 3:54 am | धनंजय
या जाहिरातींमध्ये थोडक्या शब्दांमध्ये कथा सांगायची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मजा आली.
27 Jan 2017 - 4:35 am | पिलीयन रायडर
खरं तर डांगेअण्णांसोबत लय लंबा प्लान होता. नुसत्या लेखावर भागवलंय!!
जाहिरातींबद्दल लिहावं तर तुम्हीच! पण खरं तर अजुन खुप वाचायला आवडेल. तुम्ही लेखमालाच केली पाहिजेत स्वतंत्र..
27 Jan 2017 - 5:37 am | मदनबाण
स्वतंत्र लेख मालेची वाट पाहतोय...
आमच्या शेजारी याच क्षेत्रात काम करणारे गॄहस्थ रहायचे... त्यांचे स्केचिंग एकदा पाहिले होते आणि थक्क झालो होतो !
लहानपणी अंघोळीली गेलो असताना आईची माझ्या नावाने पाणी जाईल लवकर बाहेर ये ! अशी अनेकदा ओरड असे ! त्यानंतर टिव्हीवर अशीच काहीशी जाहिरात आली. मला नेहमी संशय वाटायचा कि ही ओरड या शेजारच्यांच्या कानावर पडुन त्यांनीच ही जाहिरात बनवली असावी !;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran
27 Jan 2017 - 6:15 am | मदनबाण
या जाहिरातीतील स्नॅप हे गाणे मला त्यावेळीही आवडायचे आणि आजही ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran
27 Jan 2017 - 7:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
रोचक धागा आणि माहिती. रच्याकने
कुछ खास है झिंदगी मे वाल्या अॅडबद्दल नक्की लिहा. कॅडबरीवाले त्यांच्या झैराती लैचं डोक्यालिटी लाउन करतात हा अनुभव.
27 Jan 2017 - 4:18 pm | balasaheb
खुप सुन्दर
27 Jan 2017 - 4:18 pm | balasaheb
खुप सुन्दर
27 Jan 2017 - 6:09 pm | सौंदाळा
मस्त लेख
जाहिरात म्हटले की फेविकॉलच्या जाहिराती आठवल्याच पाहिजेत.
पकडे रहना...छोडना नही...;)
28 Jan 2017 - 5:54 pm | पूर्वाविवेक
चांगला लेख पण जाहिरात क्षेत्राची विस्तृत माहिती वाचायला आवडली असती.
28 Jan 2017 - 9:33 pm | उपयोजक
जी ई अर्थात जनरल इलेक्ट्रीक या कंपनीची एकत्रित उत्पादने दाखवणारी एक लांबलचक जाहिरात ज्यात tion शेवट असणारे बरेच शब्द होते.ती जाहिरात कोणती?
31 Jan 2017 - 3:22 pm | फेदरवेट साहेब
सादर जाहिरात चक्क एका पानमसाल्याची आहे ! (रजनीगंधा) पण मला आवडते. शब्द संगीत अन प्रकाशचित्रण योजना तुफान आवडलेली आहे. 'कुछ कर ऐसा दुनिया बनाना आहे तेरे जैसा' ही कॅचलाईन तर लैच भारी. काही वाक्य विशेषतः 'जलता नही हु मै तुझसे, ये तो मेरे अंदर की आग है, जिसे तू जलाये रखता है' हे वाक्य अन त्यावेळचे संगीत प्रचंड आवडले आहे.
31 Jan 2017 - 7:30 pm | सुबोध खरे
लेख छान आहे पण अजून विस्तारित असता तर आवडले असते. अर्थात हा या मालिकेतील पहिला लेख असेल तर जास्त आवडेल.
बाकी जाहिरातीबद्दल असलेले वाक्प्रचार
पंधरावी विद्या आणि पासष्टावी कला --जाहिरात कला
You can fool all the people some of the time,
and some of the people all the time,
but you cannot fool all the people all the time.
Abraham Lincoln
but you can fool all the people all the time provided you have a huge advertisement budget.