दिवाळी म्हटली कि फराळाची तयारी अगोदर पासूनच सुरु होते. भाजाणीच्या पिठापासून ते अनारशाच्या पिठापर्यंत.
माझी आई अनारशाचे पिठ घरीच तयार करत असे. तिची रेसिपे इथे देत आहे.
साहित्यः
१ किलो जाडा, जुना तांदुळ
१ किलो पिवळा गुळ कोल्हापुरी
वेलदोडा, जायफळ पावडर
२ टे.स्पून साजुक तूप
पाव किलो खसखस
कृती:
१. तांदुळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ दिवस भिजवून ठेवावेत, पाणी दररोज बदलावे.
२.पाणी निथळून, कॉटनच्या कापडावर सावलीत वाळत टाकावेत. दमट असतानाच मिक्सवर किंवा खलबत्त्यात कुटावेत. चाळणीने पिठ चाळावे.
३.गुळ किसणीने किसावा किंवा बारीक करावा. वरील चाळलेल्या पिठात मिसळावा. साजुक तुपाचे मोहन घालून वेलदोडे, जायफळची पावडर घालून हलकेच मळून ठेवावे.
पीठ डब्यात ७ ते ८ दिवस ठेवावे. स्टीलच्या डब्यात ठेऊ नये पीठ काळे पडते. अल्युमिनिअम च्या किंवा कल्हई केलेल्या पितळेच्याभांड्यात ठेवावे.
४.जेवढे अनारसे करायचे आहेत, तेवढे पीठ घेऊन मळावे व त्याचे पेढ्याएवढे चपटे गोळे करावेत.
५.पोळपाटावर प्लॅस्टीलची पिशवी घेऊन त्यावर खसखस टाकावी. पिठाचा वरील एक गोळा घेऊन बोटाने हलकेच दाब देऊन अनारसा खसखशीवर फिरवर गोल थापावा.
६.कढईमधे तूप गरम करावे. आच मध्यम करून हलक्या हाताने थापलेला अनारसा उचलून खसखशीची बाजू वर येइल असा कढईत टाकावा.
७.झार्याने त्यावर तूप घालत अनारसा मंद आचेवर तळावा. अनारसा उलटवू नये. सोनेरी रंगावर तळावा.
८.अनारसा तळल्यावर ,तूप निथळण्यासाठी चाळणीमधे उभा ठेवावा. म्हणजे सर्व तूप निथळेल. अशा रीतीने उरलेले अनारसे करावेत.
९.निथळून पुर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरावेत, किंवा खाऊन संपवावेत.
टीपः अनारसे करताना पिठ कोरडे वाटल्यास तुपाच्या हाताने मळूनच मऊ करावे.
अनारसा फार पातळ थापू नये. कडकडीत होतो. फार जाड पण थापू नये मधे कच्चा राहतो.
प्रतिक्रिया
3 Oct 2008 - 12:22 am | प्राजु
७-८ दिवस फ्रिज मध्ये ठेवायचं का? की बाहेर?? बाहेर ठेवल्यास ते खराब नाही का होत??
बाकी, आनरसे हा विकपॉइंट आहे गं स्वाती ताई..
मस्त रेसिपी... यावेळी करेन नक्की.
धन्यवाद..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Oct 2008 - 12:29 am | विसोबा खेचर
वा! या अनारश्यांच्या पाकृमुळे दिवाळी जवळ आली असे वाटू लागले आहे! :)
असो, मिपाच्या अन्नपूर्णेच्या मिपावर पुनरागमनाबद्दल खूप आनंद वाटला.. :)
तात्या.
3 Oct 2008 - 12:30 am | स्वाती राजेश
पीठ बाहेरच ठेवायचे. त्यामुळे पीठ फुगते..फ्रीजमधे ठेवलेस तर नाही फुगणार..
3 Oct 2008 - 12:46 am | प्राजु
धन्यवाद स्वातिताई.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Oct 2008 - 12:58 am | ब्रिटिश टिंग्या
अनारसे माझाही वीक पॉईंट आहे!
पाककृती मस्त!
अर्थात मला स्वत:ला बनवता येणार नाही म्हणा! ;)
त्यापेक्षा तुम्हालाच भेटतो.....अनारसे तयार ठेवा :)
- टिंग्या
3 Oct 2008 - 1:30 am | चकली
बहुतेकवेळा पीठ बाहेरून आणून अनारसे केले जातात, घरच्या पीठाची कृती लिहल्याबद्द्ल धन्यवाद!
अनारसे कधी ’हसतात’ कधी नाही ’हसत’! मला ही असाच अनुभव आहे. हमखास अनारसे जमावेत म्हणून काय करावे ते लिहशील का.
मी एकदा पीठ साधरण तू लिहले आहेस तसेच बनवले, आणि अनारसे तळायले घेतले, ’हसले’/फ़सले. त्याच पीठाचे २ तासानी ’ultimate' अनारसे झाले. असे आणखीनही आहेत अनुभव..पण मी नक्की काय वेगळे करते ते कळत नाही.
तुमचा काय अनुभव?
चकली
http://chakali.blogspot.com
3 Oct 2008 - 1:52 am | स्वाती राजेश
मला सुद्धा करताना काही अनुभव आले ते असे..
पहिल्यांदा माझे सुद्धा फसले तेव्हा आई म्हणाली .....कदाचित तेल कमी तापले असेल....
तांदुळ जर नवा असेल तर अनारसे विरघळतात्....तांदुळ नेहमी जुनाच वापरायचा...
एकदा खुपच काळपट झाले ...........तेव्हा मी पीठ स्टीलच्या डब्यात ठेवले होते...
काही वेळा गुळ पण चांगल्या प्रतिचा नसतो...
21 Oct 2008 - 12:01 am | सुलभा
अजुन दीवाली पाककॄतीची वाट पहात आहे ....... खास करुन सान्जोरी व चकल्या ( बिना भाजणीच्या) ..........कारण कॅनडा मधे भाजणी नाहि मीळ्त......... आभारी आहे......