सदर पाककृती काही कारणास्तव उडालेली, ती पुनः प्रकाशित करीत आहे
साहित्य
३ कप सोललेला ताजा हरभरा
३ मध्यम आकाराचे कांदे
१ लसूण गड्डा, सोलून
१ इंच आलं
६ ते ८ हिरव्या मिरच्या
१० ते १५ कढीपत्त्याची पाने
१/२ कप किसलेले ओले खोबरे
१/२ कप घट्ट दही
१/२ कप बेसन
१ मूठ कोथिंबीर चिरून
१ चमचा जिरं
३ चमचे तेल
मीठ, चवीनुसार
तेल किंवा तूप कबाब भाजताना
हिवाळा आला कि रस्त्यावर हमखास दिसतात ते हिरव्यागार हरभऱ्याच्या गड्डया! हि पाककृती सुद्धा रणजित राय ह्यांच्या "तंदूर:- दि ग्रेट इंडियन बार्बेक्यू" पुस्तकातून घेतलेली आहे.
कृती
मिक्सर मधून, कांदे, आलं, लसूण, कढीपत्त्ता, मिरच्या आणि कोथिंबीर बारीक करून घ्या. पाणी शक्यतो वापरू नका. एका पॅन मध्ये ३ चमचे तेल टाकून ते गरम झालं कि त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं कि हे मिश्रण त्यात घालून चांगलं परतून घ्या, साधारण ४ ते ५ मिनिटे.
आता पॅन मध्ये हरभरा घालून ढवळून घ्या. चवीनुसार मीठ घालून, झाकण ठेवून, मंद आचेवर साधारण १५ ते २० मिनिटे हरभरा शिजू द्या (हरभरा बोटाने चेपता यायला पाहिजे). अधून मधून मिश्रण हलवत राहा. हरभरा शिजत आला, कि मग त्यात दही, किसलेले खोबरे घालून मिश्रण अजून ५ ते १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. मिश्रण कोरडे व्हायला पाहिजे. आता हे मिश्रण थंड करायला बाजूला ठेवा.
मिश्रण थंड झाली कि त्यात बेसन घालून ते नीट मिसळून घ्या. हे मिश्रण मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या, किंवा पावभाजी प्रमाणे मॅश करून घ्या. कबाब च्या सळ्यांना तेल लावून घ्या. एक थंड पाण्याची छोटी वाटी जवळ ठेवा.हाताला पाणी लावून, आपल्याला मिश्रण सीक कबाब प्रमाणे सळ्यांनवर लांबट थापून घ्यायचे आहे. हे कबाब, तंदूर, ओव्हन किंवा बार्बेक्यू वर साधारण ५ ते ६ मिनिटे भाजून घ्या. बाहेर काढून वरून तुपाचा/तेलाचा ब्रश लावून पुन्हा २ ते ३ मिनिटे भाजून घ्या.
पुदिन्याच्या चटणी बरोबर गरम गरम खायला घ्या!
टीप
हरभऱ्या ऐवजी, ताजे मटारचे दाणे, किंवा स्वीट कॉर्न सुद्धा वापरून बघू शकता. बेसन वापरताना एखाद दोन चमचे कॉर्नफ्लावर घातलं तर कबाब कुरकुरीत होतील. सीक कबाब करायचे नसतील तर मिश्रणाच्या छोट्या टिक्क्या थापून, त्या शॅलो फ्राय करून घ्या.
प्रतिक्रिया
10 Jan 2017 - 5:43 pm | माझीही शॅम्पेन
अप्रतिम पा कृ डोळ्याचं पारणे फेडले गेले तो पा सु
तद्दन फालतू धाग्यांना TRP मिळते आणि इतके सुदंर धागे मोकळे राहतात
10 Jan 2017 - 11:29 pm | कौशी
खुप सुंदर फोटो...तोपासु.
10 Jan 2017 - 11:29 pm | कौशी
खुप सुंदर फोटो...तोपासु.
11 Jan 2017 - 12:16 am | कैवल्यसिंह
मस्त फोटो... झक्कास पाकृ.. तों-पा-सु... कबाब बरोबर जी हिरवी चटणी आहे त्याची पाकृ देता का? मसत दिसतीये चटनी सुद्धा..
11 Jan 2017 - 5:00 pm | अत्रुप्त आत्मा
दू दू दू दू
14 Jan 2017 - 10:53 am | पैसा
अतिशय सुरेख! मी प्रतिक्रिया द्यायला हा धागा शोधत बसले होते. मधे ६/७ दिवसाचा डेटा सेव्ह झाला नाही त्यात गेली होती का?
14 Jan 2017 - 5:29 pm | केडी
हो, म्हणून परत टाकाली.....