*/
आपल्या आजूबाजूला तीन प्रकारची माणसं असतात. पहिल्या प्रकारची म्हणजे आमटे कुटुंबीयांसारखी, लोकसेवेला आयुष्य अर्पण केलेली. दुसरी म्हणजे कलाकार मंडळी, शिक्षण कशातही असलं तरी शेवटी आपल्या छंदासाठी आयुष्य ओवाळून टाकणारी आणि तिसरे म्हणजे आपण स्वतः.. साधीसुधी नोकरदार माणसं.. पोटापाण्यासाठी इमानदारीत नोकरी-धंदा करणारी..
आश्चर्य वाटेल, पण माधव आणि स्मिता कर्हाडे तिन्ही प्रकारात फिट्ट बसतात!
अमेरिकेत स्वतःचा स्टार्टअप सांभाळून, ‘रंगमंच - ए थिएटर विथ कॉझ’ ह्या संस्थेमार्फत केवळ वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीसाठी निधी उभा करणारं हे दांपत्य मिपाकर आहे, ही विशेष अभिमानाची गोष्ट!
'गोष्ट तशी छोटी..' ह्या उपक्रमासाठी त्यांची मुलाखत घेणं ही आमच्यासाठीच पर्वणी होती. माधवरावांशी मारलेल्या २-३ तासांच्या गप्पांना कसंतरी एका लेखात बसवण्याचा प्रयत्न केला आहे.
नमस्कार माधव, 'रंगमंच'ची सुरुवात झाली कशी? हे तुमच्या छंदाला दिलेलं मूर्त स्वरूप की सामाजिक जाणिवेची व्यापक अभिव्यक्ती?
'रंगमंच'ची सुरुवात हा खरं तर अपघातच होता. आमच्याकडे दुसरा पर्यायच नसल्याने खरं तर रंगमंचची स्थापना झाली. २०१५मध्ये 'नाम' ह्या संस्थेने लोकांना मदतीचं आवाहन केलं होतं. त्यासाठी 'गीतरामायण - नृत्यनाटिका' कार्यक्रम करावा आणि त्यातून जमा झालेला निधी 'नाम'ला द्यावा, असा प्रस्ताव आम्ही मांडला. पण ह्या नृत्यनाटिकेचा खर्चच सुमारे ८-९ हजार डॉलर्स असल्याने, कोणत्याही संस्थेने तो करण्याची तयारी दाखवली नाही. म्हणून मग आम्हीच एक संस्था सुरू करायचं ठरवलं. 'रंगमंच' ह्या नावाने आपणच एक संस्था काढावी आणि त्याद्वारे वेगवेगळे कार्यक्रम करून जमा झालेला निधी एखाद्या चांगल्या कार्याला द्यावा, ह्या हेतूने 'रंगमंच - ए थिएटर विथ कॉझ' ह्या संथेची स्थापना झाली. 'It takes a community to raise a community' ही संकल्पना घेऊनच या संस्थेची निर्मिती झाली. आपण एखादं चांगलं नाटक बघतो, सिनेमा बघतो, गाण्याचा किंवा नृत्याचा एखादा चांगला कार्यक्रम बघतो आणि दोन घटका आपली करमणूक करून घेतो, दोन घटका आपल्या चेहऱ्यावर हसू असतं. जर याच पैशातून दोन क्षणाकरता का होईना, कोणा गरजवंताच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आलं तर ते जास्त मोलाचं असेल, त्यातून जास्त मोठं समाधान मिळू शकतं असं आम्हाला वाटतं... म्हणूनच 'रंगमंच - ए थिएटर विथ कॉझ' हा प्रकल्प उभा राहिला.
सामाजिक जाणिवेतून इतक्या लोकांनी एकत्र येऊन, कोणत्याही मोबदल्याविना काम करणं फार मोठी गोष्ट आहे! मग शेवटी 'गीतरामायण'चं संपूर्ण आयोजन रंगमंचनेच केलं का?
हो. पण रंगमच ही संस्था तेव्हा अत्यंत नवीन होती. म्हणूनच रंगमंचचे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक असतील, ह्याची आम्ही पहिल्या क्षणापासून काळजी घेतली होती. त्यामुळेच नृत्यनाटिकेची निर्मिती, तिकीट विक्री रंगमंचच्या नावाने झालेली असली, तरी देणगीचे चेक्स मात्र आम्ही 'बी.एम.एम.'च्या नावानेच घेतले, जे पुढे एकत्रित करून बी.एम.एम.ने 'नाम'ला सुपुर्द केले. ह्या सगळ्यात बी.एम.एम.चं खूपच सहकार्य मिळालं.
रंगमंचच्या पहिल्या प्रयोगालाच कसा प्रतिसाद मिळाला?
९ एप्रिल २०१६ला 'गीतरामायण'चा पहिला प्रयोग झाला. शो तर हाऊसफुल्ल झाला होताच. पण प्रयोगाच्या वेळीसुद्धा इतके लोक आले होते की शेवटी आमच्या स्वयंसेवकांनी स्वतःची तिकिटं लोकांना दिली आणि स्वतः विंगेत उभं राहून प्रयोग पाहिला! आमच्या पहिल्याच प्रयोगाला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला होता. जूनमध्ये लगेच आमचा दुसरा प्रयोगही झाला. तोवर आमच्या पहिल्या प्रयोगाची बरीच चर्चा झालेली असल्याने दुसरा शोसुद्धा हाऊसफुल्ल! ह्या दोन प्रयोगांमधूनच आम्ही नामसाठी ३६०००$चा निधी उभा केला. साधारणतः १००० लोकांनी हा कार्यक्रम बघितला आणि आता हाच कार्यक्रम BMM कॉन्व्हेंशनमध्ये ४ ते ५ हजार लोकांसमोर येत्या जुलैमध्ये होणार आहे.
क्या बात है! तुम्ही वापरलेल्या वेगवेगळ्या इफेक्टमुळे ही नृत्यनाटिका फार गाजली ना?
हो! बरंच डोकं लावलं होतं आम्ही ह्यात. बरीच कल्पकता वापरून नेपथ्य केलं होतं. काही ट्रिक सीन्स केले होते. उदा., 'सेतु बांधा रे सागरी' ह्या गाण्यासाठी शेकडो माकडं समुद्रात सेतू बांधत आहेत असं दाखवायचं होतं. आता एवढी माकडं स्टेजवर दाखवणार कशी? पुलंच्या 'गुळाचा गणपती' ह्या चित्रपटात एक सीन आहे, ज्यात एका पुढार्याच्या भाषणाला प्रचंड गर्दी होते असं दाखवलेलं आहे. त्यासाठी पुलंनी ज्या सभागृहात हे भाषण होत आहे असे दाखवायचं होतं, त्याच्या बाहेर सेटवरच्या सर्वांच्या चपला आणून ठेवल्या आणि त्यावरून कॅमेरा फिरवून गर्दी झाली आहे असा भास निर्माण केला. ह्याच धर्तीवर मी समुद्रावर जाऊन १५-२० मिनिटं समुद्राचं शूटिंग केलं आणि त्यावर माकडं सुपरइम्पोझ करून खूप माकडं आहेत असा भास निर्माण केला. त्यामुळे प्रत्यक्षात ८-१० माकडं स्टेजवर होती, पण पडद्यावर खूप माकडं आहेत असं वाटत होतं.
ह्या नाटकात कांचनमृगाचं काम करणार्या मुलीला अचानक प्रयोगाच्या दिवशीच परदेशी जायचं होतं. आपण इतके महिने केलेली प्रॅक्टिस वाया जाणार, म्हणून ती अगदी रडवेली झाली होती. तिचं काम वाया जाऊ नये, म्हणून मग अगदी शेवटच्या क्षणी आम्ही एक आयडिया केली. तिला घेऊन एका जंगलात जाऊन तिचे सीन्स शूट केले आणि नाटकात पडद्यावर हा व्हिडिओ सुरू करून त्यापुढे सीता ह्या हरणामागे जात आहे, असं दाखवलं. कुणाच्याही हे लक्षात आलं नाही की हा ऐन वेळेस केलेला बदल आहे. आणि तो सीन इतका छान झाला की आम्ही पुढच्या प्रयोगालाही तो वापरला. फक्त ह्या वेळेस कांचनमृग फिरत फिरत जंगलात जातं, तेव्हा स्टेजवरून ती मुलगी विंगेत जाते आणि पडद्यावर जंगलात फिरणारं हरीण दिसतं. जेव्हा सीता त्याच्या जवळ येते, तेव्हा पुन्हा विंगेतून खर्या हरणाची एंट्री होते!
मानलं बुवा तुमच्या कल्पकतेला! तुम्ही नेपथ्य आणि वेषभूषा खूप बारकाईने करता, हे तुमच्या नाटकांमधून दिसतं.
खरं तर मराठी नाटकांमध्ये नेपथ्य हे प्रेक्षकानेच 'समजून घ्यायचं' असतं. आपली नाटकं सतत फिरतीवर असल्याने, त्यांना सेट्ससुद्धा पोर्टेबल ठेवावे लागतात. अमेरिकेत नाटक महिना महिना एकाच प्रेक्षागृहात राहत असल्याने, नाटकात फारच भव्य सेट्स असतात. अगदी तीन तीन मजली. एका नाटकात तर हेलिकॉप्टर कोसळताना दाखवायचं होतं, तर खरंच लाकडापासून एक हॅलिकॉप्टर बनवून ते स्टेजवर उडवत आणलं होतं. नाटकात स्टेजवर लहान स्फोट वगैरेही होतात. कोणती स्फोटकं वापरायची, त्याने किती अंतरावर वस्तू उडून पडतील, ह्याची गणितं करून हे सर्व केलं जातं. अगदी कोल्ड फायरचाही वापर होतो, ज्यात आग तर दिसते, पण तिला काही धग नसते. ह्या सर्वाला 'पायरो टेक्निक' म्हणतात. आम्हीसुद्धा आमच्या प्रयोगांमध्ये शक्य तितक्या अशा सीन्सचा वापर करतो आणि दर वेळेस काहीतरी नवा सरप्राइझ एलिमेंट असावा असा प्रयत्न करतो. मला आता खरं तर राम अग्निबाण सोडतो तेव्हा खरंच आग लागलेला बाण सोडता येईल का, हे पाहायचं आहे, पण त्यासाठी ह्या टेक्निकचं लायसन्स असणारा माणूस कायम स्टेजवर लागतो. शिवाय हे लायसन्स मिळवणं सोपं कामही नाही. त्याला स्टेजही तसं असावं लागतं. पण तरी आमचे प्रयत्न चालू आहेत. सध्या तरी मागच्या पडद्याचा वापर करूनच इफेक्ट देणं चालू आहे.
तुम्हाला सागतो, मला एक तेलगू माणूस भेटला होता. त्याने भारतात 'कुचिपुडी' गाव दत्तक घेतलं आहे. त्यासाठी तो इथे नाटकचे प्रयोग करतो आणि ते पैसे गावाच्या विकासासाठी वापरतो. त्याने त्याच्या एका नाटकात स्टेजवर आख्खा रथ आणला होता.. चार घोड्यांसकट!!! आपली मराठी नाटकं जिथे संपतात ना, तिथून ही नाटकं सुरू होतात. कमालीचं डिटेलिंग असतं. तुम्हाला असं वाटतच नाही की हे जे तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे, ते खोटं आहे. आम्हाला कार्यक्रमाचा दर्जा अत्युच्च ठेवायचा असला तरी खर्च कमी ठेवणंही आवश्यक आहे. म्हणून आम्हाला इतके 'चोचले' खरं तर शक्य नाहीत! त्यापेक्षा ते पैसे देणगीत गेलेले चांगले. पण कुणी माणूस पैसे खर्च करून तुमचा शो बघायला येत आहे, तर त्याला तसं समाधानही मिळायला हवं. त्यासाठीच आमच्या पुढच्या 'घाशीराम कोतवाल' ह्या नाटकासाठीसुद्धा आम्ही शनिवार वाड्याची १२ फुटी प्रतिकृती उभी करत आहोत, ज्यात मुख्य दरवाजा, बाजूला दोन बुरुज आणि वर दोन तोफा असतील. होम डेपोमधून लाकूड आणण्यापासून सगळं काम आम्हीच करतोय.
पण इतकं डिटेलिंग करायचं म्हटलं, तरी परदेश तो परदेश. तुळशीबागेत किंवा दादर मार्केटमध्ये मिळणार्या वस्तूंची तोड तिथे नाही. ऐन वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करताना, तुबा आणि दामाशिवाय जुळवाजुळव करताना काही मजेशीर किस्से घडले असतील ना?
नाटकासाठी लागणार्या अनेक गोष्टी भारतातुन मागवाव्या लागतातच. काही मात्र आम्ही इथेच बनवतो. उदा., मुकुट वगैरे भारतातूनच आणावे लागले. पण फुलांच्या माळांसारख्या वस्तू आम्ही इथेच बनवल्या. जटायूच्या सीनसाठी मोठे सोनेरी पंख किंवा कांचनमृग मात्र खूप मेहनतीने तयार केले होते.
अर्थात ह्यात खूप गमतीजमतीही असतात. उदा., लॅम्प्सच्या वायरींपासून धनुष्यबाण बनवले होते. सांगा बरं, राम-लक्ष्मणाचे भाते कसे बनवले असतील? सिंगल माल्टच्या खोक्यांपासून! अगदी मस्त गोल खोकी असतात ह्या बाटल्यांची. त्याच्यापासूनच मग आम्ही भाते बनवले! आताही कधी सिंगल माल्ट आणल्यावर बायको ओरडली की 'भात्यांसाठी!' असं माझं उत्तर तयार असतं!
हे चांगलंय! गीतरामायणापासून भरधाव सुटलेली ही रंगमंचची गाडी नंतर एका नृत्यप्रधान कार्यक्रमावर थांबली. 'बावन्नखणी ते मृगनयनी' हा तुमचा अभिनव कार्यक्रम, ही संकल्पना नक्की काय आहे?
सेवा फाउंडेशन ह्यांना भारतात मुलींसाठी टॉयलेट्स बांधायची आहेत, जेणेकरून ह्या कारणामुळे मुलींनी शाळा सोडू नये. त्यासाठी त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही एखादा कार्यक्रम कराल का? तेव्हा ह्या नृत्याच्या कार्यक्रमाची कल्पना तयार झाली. एखादी स्त्री वेश्या असो वा घरंदाज, तिच्या भावना सारख्याच असतात. त्या व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल कदाचित. 'न जाओ सैय्यां..' , 'नका सोडून जाऊ रंगमहाल..' , 'आज जाने की जिद ना करो..' आणि 'अभी ना जाओ छोडकर..' ह्या सगळ्यांमधला भाव एकच आहे. साधारण ह्याच कन्सेप्टवर हा कार्यक्रम आहे. ह्यात भरतनाट्यम, कुचिपुडी ते अमीर खुसरोची गझलपर्यंत सर्व काही आहे. ह्या कार्यक्रमासाठी आम्ही अभिजीत राणे ह्यांनी संगीतबद्ध केलेली 'वेणीत केवडा' ही एक अत्यंत सुंदर बैठकीची लावणीसुद्धा घेतलेली आहे. बावनखणीचा पहिला प्रयोग नोव्हेंबरमध्ये झाला आणि त्यातून आम्ही सेवा फाउंडेशनला ५०००$चा निधी उभा करून देऊ शकलो.
इतक्या प्रकारची नृत्यं सादर करायची, म्हणजे तितके नृत्यनिपुण लोक हवेत. गीतरामायणातही भरपूर पात्रं होती. खासकरून तरुण मुलांचा सहभाग तर अत्यावश्यक आहे.
मराठी मंडळांना हमखास सतावणारा प्रश्न म्हणजे दुसर्या पिढीतील भारतीय - अमेरिकन्स यांचा सहभाग! नवीन येणारे भारतीय उत्सुकतेने सांस्कृतिक चळवळीत सामील होतात, पण दुसरी पिढी मात्र आलिप्त असते. तुमचासुद्धा अनुभव असाच आहे का?
सुदैवाने आम्हाला कधीच हा प्रश्न पडला नाही. बे एरियामध्ये भारतीयत्व जास्त टिकून आहे, असं माझं मत आहे. त्यामुळे आमच्या नाटकांमध्ये काम करण्यासाठी लहान मुलं तर होतीच, त्याचबरोबर तरुणसुद्धा मागे नाहीत. माझा मोठा मुलगा आता कामात व्यग्र असला, तरी पूर्वी तोसुद्धा नाटकांमध्ये काम करायचा. आमच्या गीतरामायणात काम करणारा हनुमान हा एक कॉलेजवयीन तरुण मुलगा आहे. तो आमच्या 'बावन्नखणी ते मृगनयनी' ह्या कार्यक्रमातही अगदी झगमगीत कपडे घालून, ओठ रंगवून 'नाच्या'चं काम करतो. आणि नुसतं तेवढंच नाही, तर जोरदार टाळ्याही घेतो. आम्हालाच आधी वाटलं की त्याला लाज वगैरे वाटेल. पण त्याला तसं विचारलं तर म्हणला "इट्स आर्ट!"
फारच चांगली गोष्ट आहे ही तर. प्रेक्षकांचाही तुडवडा नसेल बे एरियात. तिथे प्रचंड प्रमाणात भारतीय राहतात, सांस्कृतिक कार्यक्रमांची जी बेसिक गरज - प्रेक्षकवर्ग, ती लीलया सुटत असेल आता..
नाही, हा मात्र गैरसमज आहे. बे एरियात भारतीय भरपूर असले, तरी अनेकदा प्रेक्षकांअभावी कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. किंवा अत्यंत कमी उपस्थितीत कार्यक्रम झाले आहेत. आम्हाला प्रेक्षक मिळवण्यासाठी भरपूर जाहिरात करावी लागते. सोशल मीडिया तर आहेच. त्याशिवाय गीतरामायणाच्या वेळी इथल्या लोकल रेडिओ स्टेशनवर माझी मुलाखत झाली होती. तसंच मी नाना पाटेकरांची फोनवर मुलाखत घेऊन, ती त्या स्टेशनवर प्रक्षेपित केली होती. कार्यक्रमांसाठी आम्ही स्पॉन्सरही शोधत असतोच. इथल्या टीव्ही चॅलन्सना व्हिडिओ पार्टनर म्हणून घेणं, त्यांचा लोगो इमेल्समध्ये लावणं, कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे बॅनर्स लावणं अशाही गोष्टी कराव्या लागतातच. बावन्नखणी.. साठी आम्ही ड्रोनमधून व्हिडिओ शूट करुन एक जाहिरात बनवली होती. तिलाही खूप प्रतिसाद मिळाला होता.
मग अशी परिस्थिती असताना रंगमंचने अवघ्या ३ प्रयोगांमधून ४० हजार डॉलर्स जमवले आहेत, ही तर फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल..
तुम्हाला असं वाटतं, पण खरंच हा आकडा फार मोठा नाहीये. इथल्या अमराठी लोकांचे जेव्हा कार्यक्रम होतात, तेव्हा ह्यापेक्षा खूपच जास्त निधी जमा होतो. तुम्हाला दोन उदाहरणं देतो. आमच्या गीतरामायणाच्या कार्यक्रमाच्या आदल्याच आठवड्यात चेन्नईच्या पुरासाठी तामिळ लोकांनी एक ऑर्केस्ट्रा केला होता. त्याला सुंदर पिचाई आला होता. आल्या आल्याच त्याने १०००००$ची देणगी जाहीर केली. ह्याशिवाय त्या लोकांनी 'सुंदर पिचाईसोबत १००$ला एक सेल्फी' अशी स्कीम ठेवली, आणि १००-१५० लोकांनी ती काढून घेतलीसुद्धा! एका साध्या ऑर्केस्ट्रामधून त्यांनी जवळपास ०.५ मिलियन डॉलर्स जमा केले असतील. आणि इथे आम्ही ९० जण घेऊन अत्यंत दर्जेदार शो देत आहोत, तेव्हा कुठे एवढा निधी जमतोय.
शीख समाजावर होणार्या हल्ल्यांच्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, म्हणुन इथे मागच्या वर्षी त्यांच्या मंडळाने काही कार्यक्रम करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांच्या कमिटीची पाऊण तासाची मीटिंग झाली. किती निधी जमा व्हावा? कमिटी मेंबर्सनी स्वतः देणगी देऊन आणि आपल्या मित्रांकडून फोनवर देणगी मिळवून अवघ्या ४५ मिनिटात ७५००००$चा निधी उभा केला! दुर्दैवाने हे मराठी समाजात होऊ शकत नाही. तुम्ही आत्ता १० लोकांना कॉल करून रंगमंचसाठी १००$ देणगी मागितली, तर किती लोक देतील? त्यामुळे हे अमराठी समाजाचे आकडे ऐकले की आम्हाला आम्ही खरंच काही मोठी गोष्ट करतोय असं वाटत नाही.
पण तरीही.. ४० हजार डॉलर्स म्हणजे आजच्या घडीला जवळपास २५ लाखांवर निधी आहे. तोही केवळ एका वर्षात जमा केलेला. ही रक्कमही काही कमी नाही. स्वतःचा व्यवसाय सांभाळून इतकं मोठं काम करणं फार दगदगीचं होत असेल ना?
हो, दगदग तर होतेच. माझा स्वतःचा स्टार्टअप आहे. त्याचं काम, नाटकासाठीच्या मीटिंग्ज आणि तालमी ह्यात अजिबातच वेळ मिळत नाही. मी निव्वळ ४-५ तासांच्या झोपेवर काम करतो. अर्थात ह्या सगळ्यात माझी पत्नी स्मिता हिची साथ आहे, म्हणून हे सगळं जमतंय. स्मिता स्वतः होमिओपथिक डॉक्टर आहे. पण अमेरिकेत त्याला फारसा वाव नसल्याने तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.एस केलं. तेव्हा आम्हाला दीड वर्षाचा मुलगा होता. पण ते सांभाळून आम्ही रात्री जागून अभ्यास करायचो. मीसुद्धा पीएच.डी. केली. स्मिताच्याच कल्पनेतून हा स्टार्टअप सुरू झाला. आताही प्रॉडक्ट मॅनेजमेंटचा सगळा भाग तीच बघते. शिवाय रंगमंचच्या सगळ्याच कार्यात तिची साथ आहेच. त्याशिवाय हे शक्यच नसतं झालं.
त्याचबरोबर आम्हाला मिळालेले काही खूप चांगले लोक. हेमालिका गोंधळेकर, श्रद्धा जोगळेकर, मनोज ताम्हनकर, सतीश तारे, त्यांचा मुलगा आशिष तारे, प्रतिमा शाह, उर्मिला केसकर (खरं सांगायचं तर संपूर्ण केसकर कुटुंब), अनिता कांत, भूषण केरूर अशी बे एरियातील असंख्य मंडळी हातातली कामं टाकून धावत येतात. रंगमंच हे एक कुटुंबच झालंय.
मग तुम्हाला तुमच्या कामासाठी स्वयंसेवकांची गरज लागत असेलच. मिपाकर तुम्हाला कशी मदत करु शकतात?
रंगमच ही एक भारतीय संस्था आहे.आणि ती जगभरातल्या कोणत्याही चांगल्या उपक्रमाला मदत करते. कुणाकडे एखादा चांगला कार्यक्रम असेल, जो सादर करुन निधी जमा करण्याची तुमची इच्छा असेल, तर रंगमंच तुम्हाला नक्की मदत करेल. फक्त कार्यक्रमाचा दर्जा उत्तमच हवा. त्यासाठी मिपाकर आपलं लेखनही देऊ शकतात. मिपावरच्याच तात्या अभ्यंकर, आदिजोशी ह्यांच्या स्किटचा वापर आम्ही केला होताच. तुम्हीसुद्धा आपलं लेखन देऊ शकता. तुम्ही अमेरिकेत, बे एरियात असाल तर स्वयंसेवक म्हणूनही तुमची मदत होऊ शकते.
भारतातही रंगमंचची एक शाखा सुरू करावी, अशी आमची इच्छा आहे. अर्थात त्यासाठी अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करणारे लोक भेटले, तरच हे करणं शक्य आहे. कारण सगळाच मामला हौशी.. आम्ही स्वतः कामाचा कोणताही मोबदला घेत नाही अथवा स्टेजवर जात नाही. कामाचं श्रेयही 'रंगमंच'ला मिळतं, 'माधव आणि स्मिता कर्हाडे' ह्यांना नाही. कारण ह्यातून आम्हाला केवळ आनंद वाटायचा आहे आणि जिथे गरज आहे तिथे मदत पुरवायची आहे. पण हे करताना सर्व कामात पारदर्शकता हवी. पैसा आणि हेतू ह्या दोन्ही गोष्टींवर शंका निर्माण होता कामा नये. त्यामुळे अशाच पद्धतीने काम करणारे लोक मिळणं आवश्यक आहे.
पण ह्या व्यतिरिक्त अनेक लहानसहान बाबतीत तुमची मदत आम्हाला होऊ शकते. उदा., काही सामान घेऊन पोस्ट करायचं असतं किंवा लेखकाची परवानगी मिळवायची असते किंवा एखादी बंदिश हवी असते. अशा बारीकसारीक कामात सतत कुणाची तरी मदत हवी असते. तिथेही मिपाकर आम्हाला मदत करू शकतात. माझ्या एका मैत्रिणीने नाटकात लागणार्या सर्व साड्या शिवून दिल्या होत्या. त्याचे पैसे तिने घेतलेच नाहीत. हीच माझी देणगी असं म्हणाली. कुणी आपल्या हातात असणार्या कौशल्यातूनही अशी मदत करू शकतं!
आणि मिपाकर नक्कीच मदत करतीलही. तुम्ही फक्त एक हाक मारा! आपल्या माणसाने परदेशात एवढं मोठं काम उभं करणं हीच आमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा तर आहेतच. रंगमंचला उत्तरोत्तर असंच यश मिळो ही शुभकामना! आणि इतक्या कामातूनही तुम्ही आम्हाला वेळ दिलात, ह्यासाठी मनापासून आभार!
चांगलं काम करायला घेतलं की चांगली माणसं भेटत जातात. तुमच्या शुभेच्छांमुळेच रंगमंचचं कार्य चालू आहे. असाच लोभ असू द्यावा. धन्यवाद!
प्रतिक्रिया
19 Jan 2017 - 10:14 am | यशोधरा
माधव आणि स्मिता कर्हाडे ह्यांना अनेक शुभेच्छा! मुलाखत आवडली.
सेवा फाउंडेशनची माहिती दिली आहे त्याखालचा फोटो दिसत नाहीये.
19 Jan 2017 - 11:40 am | पैसा
माधव (नाटक्या) आणि स्मिता कर्हाडे यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! तुमचा हा उपक्रम असाच सदोदित बहरू दे!
19 Jan 2017 - 12:28 pm | पद्मावति
खूप छान मुलाखत. उत्तम काम.
माधव आणि स्मिता यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
19 Jan 2017 - 12:46 pm | सिरुसेरि
छान मुलाखत. तेथील मराठी लोकांनी या उपक्रमाला अधिकाधिक अर्थपुर्ण प्रतिसाद दिला पाहिजे .
19 Jan 2017 - 12:56 pm | खेडूत
अभिनंदन आणि शुभेच्छा..!
मुलाखत आवडलीच. खूप मोठे काम करतायत मंडळी. शक्य असेल ती सर्व मदत करायला आवडेलच.
19 Jan 2017 - 2:11 pm | सूड
अभिनंदन आणि शुभेच्छा!!
19 Jan 2017 - 2:24 pm | वेल्लाभट
अतिशय वाखाणण्याजोगं कार्य! मनापासून अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!
19 Jan 2017 - 2:41 pm | मंजूताई
मस्त झालीये मुलाखत! अभिनंदन व शुभेच्छा!
19 Jan 2017 - 2:49 pm | मोदक
झक्कास मुलाखत. कांही लागले तर हक्काने हाक मारा हो.
बादवे -
आताही कधी सिंगल माल्ट आणल्यावर बायको ओरडली की 'भात्यांसाठी!' असं माझं उत्तर तयार असतं!
ह्या ह्या ह्या..!!
19 Jan 2017 - 3:49 pm | सामान्य वाचक
अभिनंदन आणि शुभेच्छा
मिपाकर प्रत्येक क्षेत्रात हजर असतात एकंदरीत, ते हि वरच्या नंबरांवर
19 Jan 2017 - 3:59 pm | मोदक
मध्ये एकच फोटो दिसत नाहीये.
19 Jan 2017 - 4:55 pm | रेवती
मुलाखत आवडली. नाटक्याजी व स्मिताचे अभिनंदन.
19 Jan 2017 - 7:49 pm | विशाखा राऊत
मुलाखत आवडली :)
19 Jan 2017 - 8:40 pm | इशा१२३
मुलाखत छान झालिये.उत्तम काम .
19 Jan 2017 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपल्या माणसाने परदेशात एवढं मोठं काम उभं करणं हीच आमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे.
+१,००,०००
'रंगमंच'च्या वर्धिष्णू भविष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !
20 Jan 2017 - 9:39 am | बाजीप्रभू
आवडली मुलाखत!!
कऱ्हाडे कुटुंबीयांचा अभिमान वाटला. मराठी माणसांचा चिक्कूपणा माहित असूनही इच्छाशक्ती राखून अहात याचं विशेष कौतुक.
खूप खूप शुभेच्छा.
20 Jan 2017 - 7:59 pm | यशोधरा
मराठी माणसांचा चिक्कूपणा माहित असूनही >> आँ? नाटकासाठी? मराठी माणूस आणि चिक्कू?
20 Jan 2017 - 3:13 pm | सविता००१
मस्त मुलाखत. कर्हाडे कुटुंबियांचे अभिनंदन
21 Jan 2017 - 6:27 am | चतुरंग
नाटक्याशेठ आणि स्मिता यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 'रंगमंच'च्या माध्यमातून त्यांनी सुरु केलेली ही चळवळ अशीच वाढती राहो आणि अधिकाधिक लोकांना सामिल करुन घेत जावो अशा शुभेच्छा व्यक्त करतो! __/\__
(नाटक्याशेठचा आणि स्मिताताईंचा आपलेपणाने वेढून टाकणारा स्नेह मी अनुभवला आहे. खरोखर मनापासून माणूसप्रेमी असे हे दांपत्य आपल्या मैत्रीत आहे याचा अभिमान वाटतो!)
-रंगा
30 Mar 2017 - 9:48 pm | नाटक्या
रन्गाशेट धन्यवाद!!!
21 Jan 2017 - 10:00 am | यशोधरा
मदतीला तय्यार आहे!
28 Jan 2017 - 2:47 am | रुपी
छान मुलाखत! फोटो मस्त आहेत. आणि कल्पकता वापरुन केलेले प्रयोगही मस्त.
फक्त प्रश्नांसाठी वापरलेल्या फाँट आणि प्रत्येक अक्षरानंतरच्या स्पेसमुळे वाचाय्ला अवघड वाटत आहे.
27 Mar 2017 - 9:02 pm | पिलीयन रायडर
नाटक्या ह्यांच्याशी फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांनी एका हेलिकॉप्टर सीन बद्दल सांगितले होते ज्याचा मुलाखतीमध्येही उल्लेख आहे.
परवा द लायन किंगला केले होते तेव्हा त्यांनी प्ले बिल दिले. त्यात Miss Saigon मधल्या हेलिकॉप्टर लॅडींग सीन बद्दल एक लेख होता! तुमच्या ह्या मुलाखतीचीच आठवण झाली.
खरंच इथल्या नाटकांमधले नेपथ्य हे काही तरी अद्भुतच आहे. एकाच थिएटर मध्ये २००६ पासुन हे नाटक चालु असल्याने की काय, पण स्टेजवर अक्षरशः पिक्चरच्या तोडीस तोड इफेक्ट्स आणले होते. खास करुन स्टेजवर येऊन मोठा सुळका उभा रहाणे, मुफासाचे वरुन खाली कोसळणे, सिंबा स्टॅम्पेड मध्ये अडकणे हे केवळ लाजवाब! लाईट इफेक्ट्स अप्रतिम!
तुमच्या नाटकांचे काही व्हिडीओ तुम्ही दिले होते ते पाहुन फार आश्चर्य वाटलं होतं. पण आता ब्रॉडवे शो पाहुन तुमची कमाल वाटतेय की तुम्ही पोर्टेबल पण तरीही अगदी खरे वाटेल असे नेपथ्य करण्यासाठी प्रचंड कष्ट घेताय. तुमच्या नाटकांची ड्रेपरी सुद्धा अत्यंत देखणी आहे. इतके सर्व सामान जमवणे, तयार करणे आणि ते सांभाळणे हे एक मोठेच जिकीरीचे काम असणार. त्यातही तुम्ही सतत नवीन काय करता येईल, प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्यासाठी अजुन कोणते इफेक्ट्स आणता येतील ह्याचा विचार करताय.. _/\_ एका पैचाही फायदा न मिळवता तुम्ही हे जे काम करत आहात, ते खरंच मोठे आहे.
ह्या निमित्ताने आपली ओळख झाली हे खरेच आमचे भाग्य!
आपल्याला शक्य असेल तर गीत रामायणातल्या सीन्सचे व्हीडिओ मिपाकरांसोबत शेअर करावेत ही विनंती.
अवांतर - माधवरावांनी संगितलेला हाच तो सीन
27 Mar 2017 - 11:48 pm | नाटक्या
पिराताई,
धन्यवाद!! _/\_
गीत रामायणाचा आणखी एक प्रयोग सॅन होजे येथे जून १७ ला होणार आहे आणि त्याच प्रमाणे BMM convention २०१७ मध्ये देखील हा कार्यक्रम ४००० लोकांसमोर मुख्य रंगमंचावर होणार आहे. त्यात लेझर टेक्निक्स वापरून आणखी काही नवीन प्रयोग करणार आहोत. या मुळे सध्यातरी याचे व्हिडीओ मी शेअर करत नाही.. पण १० जुलै नंतर नक्की!!!
- नाटक्या
27 Mar 2017 - 11:54 pm | स्रुजा
अरे वा ! कॅनडाला यायचा पण नक्की विचार करा. हे सगळे अफाट प्रयत्न आणि इतकं कमिटमेंट कौतुकाची गोष्ट आहे फार...