" गोष्ट तशी.. " ची व्याप्ती इतकी प्रचंड होती की तिला मुपृमध्ये बसवताना धांदल उडणार हे सरळ होतं. अशा वेळी सरळ तज्ज्ञांकडे गोष्टी सोपवून आपण हरी - हरी करणे हा मार्ग स्वीकारणे इष्ट. त्यात ही तज्ज्ञ एस भाऊ आणि वेल्ला सारखे असतील तर जॅकपॉटच हो ! एस भाऊंनी लेख दिल्यावर आम्ही त्यांच्याकडे मुपृसाठी लकडा लावला. त्यांनी आधीच या उपक्रमाला " आपला" मानलेला असल्याने एक स्केच करून पाठवलं देखील. एक कॅलिडोस्कोप आणि त्यातून पलीकडचं बघणारा एक लहान मुलगा... "अहो प्रेक्षक सुद्धा महत्त्वाचा, गोष्ट आणि प्रेक्षक एकमेकांशिवाय अधुरे" म्हणत त्यांनी स्केच मध्ये बांधलेली "गोष्ट..." ची थीम उलगडायला सुरुवात केली आणि आम्ही दोघी थक्क झालो ! एक साधं स्केच ज्यात सुलेखन लाल हिरवा आणि निळा रंग घेऊन केलं होतं. या तीन रंगांतून पूर्ण स्पेक्ट्रम तयार होतो.. हेच ते तीन शिलेदार जे अख्खी रंगीबेरंगी दुनिया आपल्या शिरावर पेलतात. दृकश्राव्य माध्यमाचा प्रवास ही असाच ... तो लीलया त्यांनी त्या चित्रात पकडला. त्यांचं मोठेपण हे की ते एका कौटुंबिक परिस्थितीमध्ये व्यस्त असताना मिळेल तो वेळ या चित्राला देत होते. असे लोकं जेव्हा तुम्हाला येऊन सामील होतात तेव्हा प्रवास मुक्कामापेक्षा ही अधिक रंगतदार होतो.
तोपर्यंत मिपाची नवी थीम आली होती. पांढर्या रंगाचा अधिक वापर बघून एस भाऊंनी आम्हाला अजून एक मोलाची सूचना केली. या स्केचला रंगांमध्ये बसवा , नवीन थीम वर ते अधिक खुलेल. वेल्लाभटने ती जबाबदारी स्वीकारली आणि आज दिसणारं मुपृ साकार झालं. वेल्लाची विचारप्रक्रिया त्याच्याच शब्दांतः
"मुखपृष्ठ. एका इतक्या महत्त्वाच्या गोष्टीला आकार देताना चांगलंच दडपण आलं होतं. आकार नव्हे, मी केवळ रंग दिले. एका कॅलिडोस्कोप बघणार्या मुलाचं स्केच एस भाऊंनी अप्रतिम काढलं होतं. परंतु काही निमित्ताने त्यावर रंगांचा साज चढवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. गोष्ट तशी छोटी च्या थीमशी सुयोग्य ताळमेळ साधणारं, चित्रपट-नाट्य विश्वाचा माहोल निर्माण करणारं, असं मुखपृष्ठ असावं हे मनात तेव्हाच पक्कं केलं. शाळेपासून चित्रकला म्हटलं की चित्र'काला'च केलेला आठवतो मला. तो पंथच नाही आपला. पण कॉम्प्युटर आल्यापासून तो पंथ नसल्याची खंत तितकी जाणवली नाही. फोटोशॉप, कोरल ड्रॉ इत्यादी सॉफ्टवेअर्सनी क्रांतीच केली म्हणायची. मला ही दोनही सॉफ्टवेअर बर्यापैकी वापरता येत असल्याने, मुखपृष्ठ बनवण्याचं काम आनंदाने हातात घेतलं.
तर एक अतिशय बोलकं, बरंच काही सांगून जाणारं, तरीही कॅलिडोस्कोपच्या स्लाइड्सप्रमाणे एक उत्सुकता कायम ठेवणारं एस भाऊंनी काढलेलं स्केच घेऊन विचाराला सुरुवात केली. रंगीबेरंगी विश्व म्हणजे रंग हवेत, चित्र, नाट्य म्हणजे त्या विश्वातल्या लाक्षणिक गोष्टी हव्यात जसं की कॅमेरा, नृत्य, संगीत म्हणता त्याला अनुसरून येणारी काही चित्र आकृत्या हव्यात अशी एक एक एन्ट्री करत गेलो. शेवटी वाणिज्य शाखेचा असल्याने एंट्रीवरच येतो मी, आणि ती करायला चुकत नाही. असो; तर या एक एक गोष्टी मूळ चित्रासोबत जोडत गेलो. कॅलिडोस्कोपच्या आतलं जे रंगीबेरंगी चित्र असतं, तसं काहीसं ते चित्र दिसायला लागलं. थोडे कलात्मक आकार, नक्षी त्यात जोडल्या. आता अपेक्षित प्रभाव येत होता. आता शीर्षकाची उणीव होती. एस भाऊंच्याच कल्पक डोक्यातून आलेलं लाल-हिरवा-निळा किंवा आर जी बी रंगात रंगलेलं शीर्षक, 'गोष्ट तशी छोटी' जेव्हा त्या पटावर आणलं, तेव्हा पूर्णपणा आल्याचं समाधान वाटलं. हे मुखपृष्ठ बनवताना मला एक मुख्य गोष्ट अभिप्रेत होती ती म्हणजे मनातले रंग. मग कॅलिडोस्कोप बघताना त्या मुलाच्या मनात उमटणार्या रंगछटा असतील, किंवा चित्रपट बघताना प्रेक्षकाच्या मनावर खुलणारे रंग असतील, किंवा 'गोष्ट तशी छोटी' चा आस्वाद घेऊ तेंव्हा तुमच्या आमच्या मनांत खुलणारे रंग असतील; मुखपृष्ठ बघितल्यावर त्या रंगछटा बघणार्यापर्यंत पोचायला हव्यात. हे लिहिताना कदाचित त्रोटक होतंय, पण मला आशा आहे की 'गोष्ट तशी छोटी' चं मुखपृष्ठ उर्वरित गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवेल."
एस भाऊ आणि वेल्ला दोघांनी क्रिएटिव टीमवर्क चा एक सुंदर वस्तुपाठ आमच्यासमोर ठेवला होता... दोघांची निष्ठा आणि १००% योगदान देण्याची कळकळ यातून बनलेलं हे मुखपृष्ठ ! गोष्टीचा चेहरामोहरा या दोन सच्च्या कलाकारांनी बनवला याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि यात आमचा गौरव देखील !!
प्रतिक्रिया
16 Jan 2017 - 1:29 pm | पैसा
एसबुवा चित्र आवडले. वेल्लाभटाची संकल्पना आवडली. पण त्याचे एक्झिक्युशन मी जरा वेगळे केले असते! :)
19 Jan 2017 - 4:52 pm | स्रुजा
:) पण या संकल्पनेला यापेक्षा जास्त चांगलं एक्झिक्युशन असेल असं वाटत नाही. वेल्लाभटने थीम आणि एस भाऊंचं चित्र दोन्हींना पुरेपुर न्याय दिलाय आणि शिवाय त्यात स्वतः चे असे खास रंग भरलेत ... क्या बात हे !
16 Jan 2017 - 1:41 pm | मोदक
सुंदर मुखपृष्ठ आहे.. या लेखमालेसाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन. बाकी सर्व लेख सवडीने बघतो.
16 Jan 2017 - 2:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम झाले आहे मुखपृष्ठ ! २०० टक्के मार्क्स !!
16 Jan 2017 - 2:39 pm | फेदरवेट साहेब
चान्गला हाय नी कव्हर पीक, तेच्यात असलेला स्केचचा बेस अने वापरला गेलेला कलरफुल फोरग्राउंड बिज्या गोस्ट त्येला एखाद्या जुन्या विंतेज मुव्हीचा हॅन्ड पेंटेड पोस्टर माफिक रेट्रो लुक देते. समद्या टीम ला हार्टफेल्ट काँग्रेट्स
16 Jan 2017 - 3:03 pm | इशा१२३
छान झालय मुखपृष्ठ !आवडले.
16 Jan 2017 - 3:17 pm | विशाखा राऊत
आवडले. मस्त झालेय मुखपॄष्ठ
16 Jan 2017 - 5:08 pm | पद्मावति
एस आणि वेल्लाभट...ग्रेट जॉब. अप्रतिम जमलंय.
16 Jan 2017 - 7:57 pm | रेवती
मुखपृष्ठ आवडले. एसभाऊ व वेल्लाभट यांचे अभिनंदन व आभार.
19 Jan 2017 - 5:03 pm | अत्रुप्त आत्मा
+१
17 Jan 2017 - 9:14 pm | सामान्य वाचक
अगदी साजेसे
18 Jan 2017 - 1:45 pm | एस
धन्यवाद मंडळी. एका सहज काढलेल्या सामान्य स्केचला आणि सुलेखनाला इतक्या देखण्या रूपात पेश करणाऱ्या वेल्लाभट आणि त्यांच्याकडे पाठपुरावा करणाऱ्या सृजाताई व पिराताई यांना सर्व श्रेय जातं. मी नको म्हणत असतानाही त्यांनी आग्रहाने हेच चित्र वापरलं. मुखपृष्ठ सर्वांना आवडलं यामागे या टीमची मेहनत आणि धडपड आहे.
18 Jan 2017 - 3:08 pm | प्रीत-मोहर
__/\__ सुंदर!!
19 Jan 2017 - 12:27 pm | पूर्वाविवेक
मुखपृष्ठ आवडले. एसभाऊ व वेल्लाभट खूपच भारी काम !
19 Jan 2017 - 5:33 pm | सूड
वेल्लाकाकांचे अभिनंदन, हस्ताक्षर आणखी चांगलं काढता आलं असतं.
19 Jan 2017 - 8:45 pm | सही रे सई
रोज मिपावर आले कि पहिले नवीन लेख या वर टिचकी मारणारी मी आता पहिले गोष्ट तशी छोटी वर टिचकी मारून बघते कि आज काय नवीन खमंग वाचायला मिळणार आहे. मला वाटत आपल्यातल्या बहुतेकांची हीच स्थिती असावी आणि हेच गोष्ट च मोठ्ठ यश आहे.
गोष्ट साठी मेहनत घेतलेल्या सर्व कलाकार (होय हे सगळे कलाकाराच म्हणायचे) खूप खूप कौतुक या साठी.
19 Jan 2017 - 10:23 pm | उल्का
मुखपृष्ठ बघाताक्षणी आवडले होते पण वरील लेख वाचून अधिकच आवडले.
एस, वेल्लाभट यांचे अभिनंदन!
सृजा, पिरा तुमचे देखील.
20 Jan 2017 - 1:31 pm | स्वीट टॉकर
एसभाऊ, वेल्लाभट, स्रुजाताई आणि पिराताई __/\__
20 Jan 2017 - 5:22 pm | विनिता००२
पूर्ण टिमचे अभिनंदन __/\__
6 Feb 2017 - 8:31 am | नमकिन
इतके दिवस मला तो मुलगा व स्कोप दिसलाच नाहीं, आज हे वाचल्यावर दिसला. खरंच!
6 Feb 2017 - 10:24 am | शब्दबम्बाळ
वरून केलेल्या रंगरंगोटीमुळे ते पेंसिल स्केच दबून गेले आहे जरा त्यामुळे झालं असेल.
7 Feb 2017 - 11:46 pm | पिलीयन रायडर
दिसणारच नाही इतकी नाही हो रंगरंगोटी! ह.घ्या!
जोक्स अपार्ट.. आधी फक्त हे स्केच घायचं होतं. अगदी प्लेन, साधं मुखपृष्ठ. पण मिपाची थीम बदलली आणि एस भाऊंनीच सुचवलं की आता मुपृ थोडं रंगीत हवं. वेल्लानी त्याला फिल्मी टच दिला.. एखाद्या पिक्चरच्या पोस्टर सारखा. त्यातही तुम्ही पाहिलं तर त्याने कॅमेराचे इम्प्रेशन्स टाकले आहेत. वेल्लानी खुप सुंदर सांगितलंय अर्थात की त्याचे विचार काय आहेत ह्यामागे.
मला फार मनातुन हे मुखपृष्ठ आवडतं!! :)
8 Feb 2017 - 10:47 am | शब्दबम्बाळ
म्हणून तर 'जरा' दबले आहे चित्र असे म्हणालो! :)
मुखपृष्ठ वाईट आहे असे म्हणायचे नाही, पण कॅलिडोस्कोप मध्ये पाहणाऱ्या मुलाचे चित्र हे अधिक ठळकपणे पुढे यायला हवे होते असे मला वाटते.
रंगबेरंगी जग हे त्या कॅलिडोस्कोपमध्ये आहे त्यामुळे रंग बॅकग्राऊंडला आणि त्यावर हा मुलगा असे काहीसे चित्रही आवडले असते.
अर्थात, कलाकृती अशी हवी होती तशी हवी होती हे प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. खरी मेहनत ती तयार करणाऱ्यांची असते त्यामुळे सर्वांचे अभिनंदन!