पर्दाफाश

धनंजय's picture
धनंजय in लेखमाला
12 Jan 2017 - 8:20 am

*/

मिसळपाव यूट्यूब चॅनलवर ‘पर्दाफाश’ ही माझी चित्रफीत आहे. त्यासोबतची माझी ही वैयक्तिक अनुभवांची काही टिपणे आहेत.

इंग्लिश व्यावसायिक रंगभूमीवर स्टेजसमोरचा पडदा आजकाल क्वचितच उघडतो, पडतो. या विषयावर मिसळपावकरिता ‘पर्दाफाश’ चित्रफितीचा पहिला मसुदा पाठवला, तेव्हा संपादक स्रुजा व पिलीयन रायडर यांनी विचारले, की पडदा असल्या-नसल्यामुळे काय फरक पडतो, याबाबत माझे वैयक्तिक अनुभवही सांगावेत. पण माझ्या आठवणीत गेल्या कित्येक वर्षांत असा पारंपरिक पडदाच नाही, तर मी कुठले तुलनात्मक अनुभव सांगणार असा मला प्रश्न पडला. आणि योगायोग असा, की नुकताच ‘Les Liaisons Dangerous’ नाटकाचा प्रयोग बघायला मी बाल्टिमोरच्या सेंटरस्टेज प्रेक्षागृहात आलो, तर समोर बघतो काय.... लाल मखमली पडदा!

या थिएटरचा नकाशा चित्रफितीत मी दाखवलेला आहे. स्टेजच्या समोर येणार्‍या भागाला छेद देणारी रेषा मी चितारली होती, नेमका त्याच रेषेवर पडदा लावलेला होता.

a

पण हा पारंपरिक पडदा नसणार, याची नेपथ्यकाराने आधीच कल्पना देऊन ठेवली होती, कारण पडद्याच्या समोर जुन्या फ्रेंच पद्धतीच्या टेबलखुर्च्या आधीच मांडून ठेवल्या होत्या. पडदा उघडला, आणि आतल्या जुन्या फ्रेंच दिवाणखान्यात पात्रे आधीपासून गप्पा सुरू असल्यासारखा संवाद म्हणू लागली. बोलता-बोलता पात्रे सहजच ठेवलेल्या टेबल-खुर्च्यांवर येऊन बसून पत्ते खेळू लागली. इतके हे पडद्यासमोरचे साहित्य दिवाणखान्याच्या सेटमध्ये पुरते मिसळलेले होते.

LLD2

नंतरच्या प्रवेशांमध्ये समोरच्या पडद्याचा काही काही कल्पक उपयोग केला गेला. कधी फक्त उजवीकडचा अर्धाच, कधी डावीकडचा अर्धाच पडदा पडे, आणि सेटमध्ये प्रेक्षकांच्या समक्ष काही थोडाफार बदल करून वेगळेच स्थान बनवून काही प्रवेश वठवले गेले.

या नाटकाचा अपवाद सोडला, तर माझ्या आठवणीत गेल्या पाचेक वर्षांत रंगपटासमोर नाटकाआधी पडदा पाडलेला नसतोच. पहिला अंक सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांची घटनास्थळाशी चांगली ओळख व्हावी, म्हणून स्टेज आधीपासून उघडे असण्याची पद्धतच माझ्या बघण्यात आहे. उदाहरणार्थ, बाल्टिमोरमधील एव्हरीमॅन थिएटरच्या ‘August, Osage County’ नाटकाकरिता मी प्रेक्षागृहात आलो, तर खालच्या-वरच्या मजल्यांवर अनेक खोल्या असलेल्या घराचा सेट माझ्या डोळ्यांसमोर होता. तो सेट थिएटरच्या संकेतस्थळावर पात्रांनी भरलेला दाखवलेला आहे, तरीही वाचकांना कल्पना येईल की प्रेक्षागृहात मी पोहोचलो, तेव्हा रिकामा रंगमंच किती गुंतागुंतीचा आणि भरगच्च दिसला होता. नाटक सुरू होण्यापूर्वी मी आणि बाकीचे प्रेक्षक त्या घराची रचना, घरातील वस्तू अनायासे टिपून घेत होतो. अनायासे त्यावरून कथानकाचा काळ, तिथे राहाणार्‍या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक ठेवण वगैरेंबाबत आडाखे बांधत होतो.

AOC

पडद्याला नेपथ्याची सीमा नव्हे, तर कथानकातच ठिकाण देणारा उपयोग मी एकदा बघितलेला आहे. उदाहरणार्थ, बाल्टिमोर येथील एव्हरीमॅन थिएटरने सादर केल्या ‘Under the Skin’ नाटकातील नेपथ्य घ्या. यात एक वयस्कर आजारी गृहस्थाला आता रक्ताच्या नातेवाइकाकडून दान केलेल्या मूत्रपिंडाची आवश्यकता आहे. आजवर एकमेकांपासून गुप्त ठेवलेल्या, दोन वेगवेगळ्या बायकांपासून झालेल्या, त्याच्या मुलीची आणि मुलाची हॉस्पिटलात एकमेकांशी ओळख होते. हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डातल्यासारखे एक बेड स्टेजवर आहे, आणि आजारी पात्र त्या बेडवर असते.

UTS8

त्या बेडभोवती हॉस्पिटलमध्ये असतो तसा हिरवा पडदा ओढायची नेपथ्यात सोय आहे. जेव्हा केव्हा तो दोन बायकांचा दादला धडधाकट होता असा भूतकाळातला फ्लॅशबॅक होता, तेव्हा खाटेभोवती पडदा ओढून उरलेला रंगमंच त्या भूतकाळात जायचा.

UTS1_0

हा एकाप्रकारे पडद्याचा म्हणावे तर पारंपरिक, तरीही अतिशय वेगळा उपयोग होता.

या टिपणांपैकी शेवटचे आधी उल्लेखलेल्या ‘Les Liaisons Dangerous’ नाटकाच्या शेवटाकडच्या एका प्रवेशाबद्दल आहे. प्रवेश एक तलवार-द्वंद्वयुद्धाचा होता. ज्या जड तुळईला/फ्रेमला समोरचा पडदा बांधला असल्यासारखे दिसत होते, ती तुळईच तारांनी तेव्हा खाली आणली गेली. आणि लढता-लढता योद्धे त्या तुळईवर चढलेसुद्धा!

LLD8

अर्थातच नाटक संपताना पडदा खाली पाडला नाही. त्या उद्ध्वस्त भासणार्‍या सेटवर पुढच्या प्रवेशात स्त्री पात्रांनी त्यांचे संवाद म्हटले, आणि सर्व दिवे बंद करून नाटक संपल्याचा संकेत दिला गेला. म्हणजे जे नाटक सुरुवातीला पारंपरिक पडदा असल्यासारखे भासले, त्या नाटकातसुद्धा शेवटी पडदा पडलाच नाही. कथानक असे आहे, की एक उमराव आणि त्याच्या ओळखीची एक पुरंध्री कधी एकमेकांच्या संगनमताने, कधी एकमेकांना शह देत आजूबाजूच्या कुटुंबांना फूस लावतात, लफडी घडवतात आणि मोडवतात. त्यांनी आजूबाजूच्या लोकांचा कठपुतलीचा खेळ मांडलेला असतो - म्हणजे नाटकच. परंतु खेळाचा विचका होऊन त्यांच्या स्वतःच्या नाजूक भावना गुंत्यात आडकतात. त्यांचे पाताळयंत्र त्यांनाच भोवते, आणि तलवार युद्धात त्या उमरावाच्या जिवावर बेतते, तेव्हा पडदा लावलेली चौकट खाली पडते. हे असे जिवावर बेतले, की सगळी नाटके संपतात - पडदा लावलेली चौकटच खाली पाडून दिग्दर्शकाने नेपथ्य वापरून कथेला सांकेतिक जोड दिली.

अशा प्रकारे परंपरा आहे, म्हणून रंगपटावरून पडदा सरतो किंवा पडतो, हा उपचार दिग्दर्शकांनी पूर्णपणे त्यागलेला आहे. जर नाटकात पडदा वापरलाच, तर अर्थ देणारा नेपथ्याचा भाग म्हणून वापरतात असा माझा अनुभव आहे.

----
तळटीप : या लेखामध्ये वापरलेली नटांची/नाटकाची स्थिरचित्रे नाट्यकंपन्यांनी प्रेससाठी उपलब्ध करून दिली आहेत, म्हणून त्यांचा उपयोग या लेखाकरिता कायदेशीर आहे. नकाशाचे चित्र वर्णनात्मक खरडीमुळे योग्य वापराचे आहे.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Jan 2017 - 11:47 am | यशोधरा

धनंजय, तुम्ही ह्या उपक्रमासाठी लिहिणार हे समजल्यापासून तुमचा लेख वाचायची फार उत्सुकता होती आणि एका जुन्या गुणी आणि व्यासंगी मिपाकराने पुन्हा लिहिते व्हावे ह्याचा खूप आनंद झालाय! :) ही केवळ तुमच्या पुनरागमनाची पावती. लेख वाचून पुन्हा प्रतिसाद लिहिनच.

पैसा's picture

22 Jan 2017 - 1:15 pm | पैसा

पडद्याची वेगळी ओळख!

जयंत कुलकर्णी's picture

22 Jan 2017 - 1:33 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच !

क्या बात हैं! पडद्याची ओळख आवडली. इतक्यात मीही नाटके पाहिली नाहीत पण कधीकाळी पाहिली आहेत तेव्हा तो लाल/ मरुन रंगाचा पडदा वर जाताना, नाटक सुरु होत असल्याची घोषणा होत असताना, घंटा वाजवली जात असताना आता नाटक पहायचे आहे आणि त्यासोबतचे एक वातावरण मनात आणि आजूबाजूला भरुन राहते. बिनपडद्याचे नाटक कसे वाटेल, असा विचार सुरु झाला आहे!

संदीप डांगे's picture

22 Jan 2017 - 5:28 pm | संदीप डांगे

खूप सुंदर लेख! तांत्रिक बाबी सोप्या करुन सांगितल्यात. पडदापद्धत बंद होत जात आहे हे माहित नव्हते. पृथ्वी थिएटरची रंगभूमी व बैठक व्यवस्था आठवली...
तुमचा व्यासंग आणि ध्यास पाहून छान वाटले... _/\_

बाजीप्रभू's picture

22 Jan 2017 - 5:50 pm | बाजीप्रभू

अप्रतिम!!

बोका-ए-आझम's picture

22 Jan 2017 - 7:14 pm | बोका-ए-आझम

अप्रतिम लेख. प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात ' तो मी नव्हेच ' साठी केलेला फिरत्या रंगमंचाचा आणि पडद्यांचा उपयोग सांगितला आहे त्याची आठवण झाली. जसा पाश्चात्य रंगभूमीवर पडद्याचा वापर करून घेतलेला आहे, तसा आपल्या रंगभूमीवर का केला जात नसावा हा प्रश्न हा लेख वाचून नक्कीच पडला.

लेखन आवडले. पडद्यावरूनही लेखन होऊ शकेल असा विचार मी कधी केला नव्हता. नाटकांचे सेटस पाहून एखादे नाटक पहावेसे वाटायला लागले आहे.

इशा१२३'s picture

22 Jan 2017 - 10:44 pm | इशा१२३

मस्त!

सामान्य वाचक's picture

23 Jan 2017 - 12:10 am | सामान्य वाचक

पडद्याशिवाय नाटकाची कल्पना जरा झेपत नाही पण

धनंजय's picture

23 Jan 2017 - 12:57 am | धनंजय

लेखातील एक चित्र दिसत नाही. ते येथे देत आहे (संपादकांनी जमल्यास ते मूळ लेखात चढवावे.) :

(मागून चालू)
या थिएटरचा नकाशा चित्रफितीत मी दाखवलेला आहे. स्टेजच्या समोर येणार्‍या भागाला छेद देणारी रेषा मी चितारली होती, नेमका त्याच रेषेवर पडदा लावलेला होता.

(येथे चित्र हवे)
stage curtain

पण हा पारंपरिक पडदा नसणार, याची नेपथ्यकाराने आधीच कल्पना देऊन ठेवली होती, कारण पडद्याच्या समोर जुन्या फ्रेंच पद्धतीच्या टेबलखुर्च्या आधीच मांडून ठेवल्या होत्या. (पुढे चालू)

नाटक्या's picture

23 Jan 2017 - 11:53 pm | नाटक्या

अतिशय सुन्दर लेख. मनापासुन आवडला...

प्रदीप's picture

19 Feb 2017 - 6:13 pm | प्रदीप

मिपाच्या जुन्या व जाणत्या लेखकाने हात घातला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

ह्यावरून मला सत्तरीच्या दशकांतील मराठी समांतर रंगभूमीच्या प्रवाहाची आठवण झाली. पालेकरांनी सादर केलेल्या एलकुंचवारांच्या 'सुलतान, होळी व इतर एकांकिका' तसेच आविष्कारची काही सादरीकरणे, जी छबिलदासच्या छोटेखानी हॉलमधे केली जायची, -- उदा. 'पाहिजे जातीचे' --त्यांची आठवण आली. ते बरेच काही पाहिल्या- अनुभवल्यामुळे मलातरी हा विषय थोडाफार परिचीत होता.

मात्र इथे हा विषय लेखाच्या स्वरूपात आला असता तर बरे झाले असते असे त्याचे अट्टाहासाने केलेले 'चित्रीकरण' पाहून वाटले.

छबिलदासच्या छोटेखानी हॉलमधे केली जायची, -- उदा. 'पाहिजे जातीचे' --त्यांची आठवण आली. ते बरेच काही पाहिल्या- अनुभवल्यामुळे मलातरी हा विषय थोडाफार परिचीत होता.

माझ्या याच सुमारासच्या आठवणी जाग्या झाल्या
असो.

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 12:16 am | संजय क्षीरसागर

अंधाराचा पडदा म्हणून उपयोग अनेकांनी केलायं पण पडद्याचा नेपथ्य म्हणून उपयोग ही कल्पना नाविन्यपूर्ण आहे.

‘Under the Skin’ चा शेवट काय होतो ?

पात्रांमध्ये तणाव उद्भवणे आणि तो (काहीसा) निस्तरणे हे मुख्य कथानक होते. आयुष्यभर फसवून आता भावनिक blackmail करणाऱ्या बापाकरिता मूत्रपिंड का द्यावे? इथपासून मी-देणार-मी-देणार या भावंडांमधील वादापर्यंत संघर्षाची विरुद्ध टोके जातात.
शेवटी त्या दोघांपैकी कोणाशी tissue match होते, कोण मूत्रपिंड दान करते, या तपशिलाआधीच नाटक संपते.

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2017 - 9:52 am | संजय क्षीरसागर

असे अधांतरी आणि प्रेक्षकांवर सोडलेले विषय मला भावत नाहीत.

मला वाटते, की परीकथा सोडल्या, तर कथा नेहमी अपूर्णच असतात. अगदी वाल्मिकीचे रामायण घ्या. लंकेहून अयोध्येला येऊन संपते. परंतु "पुढे काय झाले"करिता पुरेसे कुतूहल मूळ रामायणात बीजे ठेवून अनुत्तरित ठेवलेले आहे. म्हणून तर उत्तररामचरिताकरिता कथानक शिल्लक राहाते. तुम्ही तुम्हाला आवडलेले कुठलेही प्रौढ नाटक मनात आणा. "ती फुलराणी" मध्ये नाटकादरम्यान जी पात्रे आपल्या ओळखीची होतात, त्यांचे नाटकानंतर जीवन आहे असे वाटते, की ते राजाराणी happily ever after झाल्यासारखे होतात?

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2017 - 8:42 pm | पिलीयन रायडर

मी मागच्या आठवड्यात पहिल्यांदाच ब्रॉडवेवरचे नाटक पाहिले. मला तिथला पडदा पहाण्याची फार उत्सुकता होती ह्या लेखामुळे.

लायन किंग ह्या म्युझिकलमध्ये तरी नेहमी असतो तसा लाल मखमली पडदा नव्हता तर एखादी मोठी स्क्रीन असावी तसा खाली वर होणारा पडदा होता. नाटका दरम्यान अनेकदा वेगवेगळे पडदे स्टेजवर येऊन मागे नेपथ्य बदलत होते. स्टेजला विविध भागात विभागण्यासाठी पडद्यांचा उत्तम वापर केला होता. नेपथ्य तर विचारांच्यापलीकडचे होते.

तुमच्या ह्या लेखामुळे बर्‍याच गोष्टी जाणिवपुर्वक पाहिल्या. एरवी इतक्या बारिक सारिक मुद्द्यांकडे लक्ष जात नाही. तुम्ही जरुर बघायला हवीत अशा इतरही नाटकांबद्दल लिहावे म्हणजे आवर्जुन पहाता येतील.