*/
सिनेमा नावाचे हत्यार
A
आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर'चा पुरेपूर वापर केला आहे. 'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली. कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकद न वापरता राजकारणातली उद्दिष्टे साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे 'सॉफ्ट पॉवर. एखाद्या देशाची 'सॉफ्ट पॉवर' म्हणजे त्या देशाची सांस्कृतिक मूल्ये, त्या देशाची कला आणि संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि यासारखे अनेक घटक. आपल्या आजूबाजूच्या परिघाचे जाणीवपूर्वक निरीक्षण केले, तरी अमेरिकेचा या बाबतीतला वरचश्मा सहज लक्षात येईल. केएफसी, कोकाकोला-पेप्सी, मॅकडोनाल्ड यांच्याबरोबरीनेच हॉलीवूड हासुद्धा अनेक भारतीयांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेक अमेरिकन सिरियल्सना भारतात प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. त्यातूनच 'पृथ्वीवरचे नंदनवन ' अशी अमेरिकेची प्रतिमा बनली आहे. हॉलीवूडने कायमच आपल्या चित्रपटांतून आक्रमक उजव्या अमेरिकन राष्ट्रवादाचा प्रचार केला आहे. जगावर आलेले प्रत्येक संकट निवारण्याची जबाबदारी या जगाचा स्वघोषित नेता म्हणून आमचीच आहे, अशी भूमिका अमेरिकन चित्रपट मांडत आलेले आहेत. 'इंडिपेंडन्स डे'सारख्या चित्रपटात अमेरिका कशी इतर देशांची तोंडदेखली मदत घेऊन अतिशय शक्तिशाली परग्रहवासीयांचा पराभव करते, हे दाखवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असणाऱ्या 'इस्लामिक' दहशतवाद्यांचा बीमोड धीरोदत्त अमेरिकन नायक एकटाकी कसा करतो, हे अनेक चित्रपटातून पाहता येते. हॉलीवूड चित्रपट अमेरिकन सरकारचे परराष्ट्र धोरण कसे पुढे रेटतात याचा ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याने अमेरिकन चित्रपटातील खलनायकांचा अभ्यास करावा. ह्या खलनायकांच्या चरित्रनिर्मितीवर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा ठसा स्पष्ट उमटलेला दिसतो. ८०च्या दशकातला खलनायक हा क्रूर, आडदांड असा रशियन असायचा. शीतयुद्धकाळात रशियन लोकांची जी विशिष्ट नकारात्मक प्रतिमा अमेरिकन माध्यमांनी बनवली, त्यातून रशिया अजूनही पुरतेपणी सावरला नाही. १९९० सालानंतर अमेरिकन चित्रपटात खलनायक हा दाढीवाला आणि कट्टर इस्लामिक बनत गेला. ९/११च्या अमेरिकन भूमीवर झालेल्या हल्ल्यानंतर तर जवळपास प्रत्येक चित्रपटातला खलनायक हा आशियाई मुस्लीम दाखवण्याची चढाओढ अमेरिकन निर्मात्यांमध्ये सुरू झाली. गेल्या काही वर्षांत मात्र चिनी किंवा कोरियन खलनायक त्यांची जागा घेत आहेत. अमेरिकन संरक्षण विभाग 'पेंटागॉन'ची स्वतःच्या मालकीची चित्रपट निर्मिती संस्था आहे, यावरून काय अर्थ घ्यायचा तो समजून घ्यावा.
तर अशा या अमेरिकेला आणि हॉलीवूडला पहिल्यांदाच तोडीस तोड उत्तर देणारा प्रतिस्पर्धी तयार होत आहे, तो प्रतिस्पर्धी म्हणजे चीन. चिनी खाद्यसंस्कृती अगोदरच जगभरात लोकप्रिय झाली आहे. आता चिनी चित्रपटही अमेरिकन आणि युरोपियन मार्केटवर चढाई करण्यास सिद्ध झाले आहेत. सध्या चिनी चित्रपट अमेरिकेत भरपूर गल्ला गोळा करत आहेत. 'कुंग फू पांडा'सारखा अमेरिकन निर्मिती असणारा पण चिनी जीवनशैलीभोवती फिरणारा चित्रपट अमेरिकेत उत्पन्नाचे उच्चांक तोडतो, हे प्रतीकात्मक आहे. जॅकी चॅन, दिग्दर्शक आंग ली यासारखे चिनी वंशाचे बरेच दिग्गज अमेरिकेत चिनी संस्कृतीचा प्रसार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलत आहेत. ऑस्कर्स पुरस्कारांमध्येसुद्धा चिनी चित्रपट आपली उपस्थिती दाखवून देत आहेत. २००८च्या भव्यदिव्य ऑलिम्पिकपासून चीनने आपल्या 'सॉफ्ट पॉवर'च्या आक्रमक प्रचाराची मुहूर्तमेढ रोवली. तर 'सॉफ्ट पॉवर'च्या आक्रमक युद्धाची युद्धभूमी तयार झाली आहे. ही लढाई जो जिंकेल, त्याचे जगावर वर्चस्व राहील हे निश्चित.
अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर अतिशय मर्यादा असणारा चीन भारतासारख्या लोकशाही देशाच्या या बाबतीत अनेक योजने पुढे आहे, ही बाब वेदनादायक आहे. चित्रपट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर 'प्रपोगंडा'चे साधन होऊ शकते यावर आपल्या राज्यकर्त्यांनी आणि देशातल्या इतर लोकशाही संस्थांनी कधी विचारच केला नाही, ही बाब खेदजनक आहे. काहीही विशेष प्रयत्न न करता अनेक आशियाई आणि मध्यपूर्वेच्या देशात भारतीय चित्रपट लोकप्रिय आहेत. अनेक देशात भारतीय चित्रपट हीच आपली ओळख आणि 'सांस्कृतिक राजदूत' आहेत. भारत-चीन संबंध, भारत-पाकिस्तान संबंध आणि एकूणच भारत देशाची प्रतिमा यात सिनेमाने मोठी भूमिका बजावली आहे. पण तो एका स्वतंत्र आणि मोठ्या लेखाचा विषय आहे.
दोन देशांमधील संबंधांमध्येसुद्धा ही ‘सॉफ्ट पॉवर’ महत्त्वाची भूमिका बजावत असते. भारत-पाकिस्तान संबंधही त्याला अपवाद नाहीत. भारतीय चित्रपटांची पाकिस्तानमधली लोकप्रियता सर्वविदित आहे. इतकी की, बॉलीवूडपुढे लॉलीवूड (पाकिस्तानी चित्रपटसृष्टी) पूर्णपणे झाकोळून गेली आहे. सध्या पाकिस्तानी चित्रपटसृष्टी काही चांगले चित्रपट तयार करत असली, तरी तिची परिस्थिती चिंताजनक म्हणावी अशीच आहे. आपल्याकडे ‘खुदा के लिये’, ‘बोल’, ‘रामचंद पाकिस्तानी’ असे काही चांगले पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण, ज्याप्रमाणे आपल्याकडे पाकिस्तानी गायकांना आणि अभिनेत्यांना विरोध करणारे घटक आहेत, तसेच ते पाकिस्तानमध्येही आहेत. भारतीय चित्रपटांची लोकप्रियता त्यांना सहन होत नाही. नुकताच दिग्दर्शक कबीर खानला या उपद्रवी लोकांचा फटका बसला. एका कॉन्फरन्ससाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या कबीर खानला विमानतळावरच उग्र निदर्शनांचा सामना करावा लागला. कारण काय, तर ‘फॅण्टम’ हा त्याने दिग्दर्शित केलेला सिनेमा पाकिस्तानविरोधी होता. पाकिस्तानमध्ये ‘आर्मी’ ही ‘अल्ला’ किंवा ‘अमेरिका’ यांच्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे, हे एक उघड गुपित आहे. याच धर्तीवर पाकिस्तानी सैन्याचा ‘I S P R’ (Inter Services Public Relations) नावाचा एक विभाग कार्यरत आहे. आपण त्याला पाकिस्तानी सैन्याची मीडिया विंग म्हणू शकतो. तर हा विभाग पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये (ज्यात सिनेमाही आला) भारतविरोधी प्रचाराची राळ उडवण्यासाठी सढळ हातांनी खर्च करतो. ‘वार’ चित्रपट निर्मितीमागे त्यांचाच हात होता. त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्याबद्दल कुठे काही वेडेवाकडे छापून किंवा पडद्यावर येत तर नाही ना, हेही हा विभाग तपासतो. पाकिस्तानमधला इंग्रजी मीडिया तसा बऱ्यापैकी स्वतंत्र बाण्याचा आहे. त्यामुळे आपला ‘बनियाविरोधी’ (भारताला पाकिस्तानी लष्करी अधिकारी ‘बनिया देश’ असे कुचेष्टेने म्हणतात.) अजेंडा पसरवण्यासाठी त्यांनी उर्दू माध्यमांना हाताशी धरले आहे.
उरी इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नटांवर आणि गायकांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली चालू आहेत. पाकिस्तानी कलावंतांना देशातून हाकलून लावा अशी उच्चरवातली मागणी जोर धरत आहे. पण ह्या सगळ्यांमुळे पाकिस्तानप्रेरित दहशतवाद थांबणार आहे का? सगळीच युद्धे बंदुकीने लढता येत नाहीत. अमेरिका जगावर वर्चस्व राखून आहे ते मॅक डी, पेप्सी आणि मुख्य म्हणजे हॉलिवूड यांच्यामुळे. शीतयुद्धाच्या काळात रशियावर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिकेने हॉलिवूडचा वापर कसा केला याचे किस्से रोचक आहेत. रशिया शस्त्रबळात कधीही कमी नव्हता. ते सॉफ्ट पॉवरच्या बाबतीत कमी पडले. आपला सॉफ्ट पॉवरच्या बाबतीत पाकिस्तानवर वरचश्मा आहे. आपल्या सीरियल्स, सिनेमे तिथे तुफान लोकप्रिय आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण बंद करून आपण आपले नुकसान करून घेत आहोत. आपण जिंकत आलेले सांस्कृतिक युद्ध मध्येच थांबवून आपलेच नुकसान करून घेत आहोत. कुस्ती जिंकत आलेल्या मल्लाने मध्येच रिंग सोडून जाण्यासारखा हा प्रकार आहे. जनतेने भावनिक होणे समजू शकतो. राज्यकर्त्यांनी भावनिक होऊ नये.
आपल्याकडे 'प्रपोगंडा' म्हणजे काही तरी वाईट गोष्ट अशी प्रतिमा जनमानसात विनाकारण आहे. यापूर्वीसुद्धा 'भांडवलशाही 'म्हणजे अतिशय वाईट गोष्ट असा एक देश म्हणून आपला समज होता. 'प्रपोगंडा' म्हणजे आंतरराष्ट्रीय संबधात उद्दिष्ट साध्य करून घेण्याचे एक साधन आहे, हे प्रथम अमेरिकेने आणि आता चीनने सिद्ध केले आहे. आपले याविषयीचे पूर्वग्रह बाजूला सारून आपण त्यासाठी एक देश म्हणून कधी वाटचाल सुरू करणार, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
प्रतिक्रिया
17 Jan 2017 - 11:31 am | प्रियाभि..
उत्कृष्ट लेख आणि एक वेगळा दृष्टीकोन..
दोन्ही आवडलं..
17 Jan 2017 - 11:52 am | आनन्दा
मस्तच आहे. बाकी एक पिंक टाकतो.
सरकारने जरी देवाणघेवाण बंद करू नये हे योग्य असले, तरी देखील समाजाने देखील सरकारवर दबाव टाकलाच पाहिजे.
सरकारचे धोरण हे परस्परविरोधी मतांच्या रस्सीखेचीमधूनच ठरले पाहिजे.
17 Jan 2017 - 12:11 pm | आदूबाळ
चांगला लेख, पण अपूर्ण वाटला. भारतीय चित्रपटांत प्रामुख्याने पंजाबी संस्कृती दाखवणं, मराठी लग्नांत संगीत वगैरे प्रकार बोकाळणं हेही सॉफ्ट पॉवरचं उदाहरण आहे.
19 Jan 2017 - 1:52 pm | प्रान्जल केलकर
हित तर लग्नात मिठ्या मारायचे प्रकार सुरु आहेत सॉफ्ट पॉवर मधून अजून काय प्रकार येतील हे सांगणे न लगे (मिपा वरच मला वाटते लग्नात नवरा नवरी ज्या मिठ्या मारतात त्याचे फोटो टाकले होते )
17 Jan 2017 - 12:33 pm | कंजूस
नवीन पिढीची आवड थालिपिठ,मोदक ,पुरणपोळीकडून नुडल्स,पिझ्झिकडे जात आहे. तुणतुण लावणीकडून ढिक्कढिक्क ढिक्कढिक्क पंजाबी फदफद्याकडे आहे. आता आपण काय करणार कोणती ढाल शोधणार या सॅाफ्ट हत्यारापुढे?
17 Jan 2017 - 12:48 pm | बोका-ए-आझम
मस्त लेख. पण अपूर्ण वाटला. बाकी खाद्यपदार्थांमार्फत सांस्कृतिक आक्रमण होतंय याबद्दल साशंक आहे. आपल्याकडे पिझा, बर्गर इत्यादी गोष्टी भारतीयीकरण करून दिल्या जाताहेत. नूडल्समध्येही जैन नूडल्स निघाले आहेत.
17 Jan 2017 - 1:13 pm | एस
भारताने त्याची सॉफ्ट पॉवर म्हणावी तितकीशी वापरलेली नाहीये ह्याच्याशी सहमत. तसे पाहिले तर पौर्वात्य देशांमध्ये केवळ वंश वगळता संस्कृती, भाषा, धर्म इत्यादी बाबींवर भारताचा इतका प्रभाव आहे हे आपल्याला माहिती नसते. भारताच्या सॉफ्ट पॉवरची क्षमता खूप जास्त आहे. आपण ती जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे.
18 Jan 2017 - 6:45 am | कंजूस
सूर्यनमस्कार परदेशी पाठवा.
17 Jan 2017 - 1:19 pm | पैसा
लेख आवडला, पण काहीसा आवरता घेतलाय असे वाटले. वर आदूबाळ म्हणतोय तसे फंजाबी आक्रमण आपल्या सगळ्या लाईफ स्टाईलवर होत आहेच. आता हे सगळे जागतिकीकरण म्हणून काणाडोळा करावा का आपण नेमके का मागे पडतोय याचा शोध घ्यावा.
17 Jan 2017 - 1:26 pm | यशोधरा
सॉफ्ट पॉवरबाबत सहमत. लेख आवडला. एसभाऊंच्या म्हणण्याशीही सहमत.
17 Jan 2017 - 1:29 pm | अनुप ढेरे
लेख आवडला आणि पटला. पाकिस्तानी कलाकारांना इथे काम मिळू न देणं हे आपली सॉफ्ट पॉवर कमी करण्यासारखं आहे असं वाटतं. पण त्या बजरबट्टुंना कोण समजावणार!
भारतीय सास बहु टाईप डेली सोप्स अफ्रिकेत आणि पूर्व आशियात भरपूर पॉप्युलर आहेत असं ऐकलय.
17 Jan 2017 - 2:09 pm | चिनार
मस्त लेख !!
अजुन लिहा या विषयावर...
17 Jan 2017 - 3:23 pm | फेदरवेट साहेब
पर तुमी तो पॉईंट लैच ऑसमली मांडलेला हाय. अमेरिकन सॉफ्ट पॉवर प्रोजेकशन आपुनला 'युनायटेड फीचर्स' नेम असलेल्या वन animation कंपनी ने जुन्या जमान्यात बनवलेल्या 'पोपॉय द सेलर' मंदी बी दिसते, रशियन हेवी इंडस्ट्री, मॉस्को सेंट पीटर्सबर्ग मिलिटरी कॉम्प्लेक्स ची बद्धी खिल्ली उडवणारे लै कार्टून ह्या कंपनी ने बनवले हाय.
भारत देस अने सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शन,
आपुनला कधी एक्सपोजर मिलाला नाही असे वाटत नाय, फकस्त आपुन त्ये एंकॅश नाय केलेला , आज बी आपुनच्या इंडस्ट्रीचे बेसिक्स लै भारी हाय (वर्ल्ड नंबर वन फिल्म इंडस्ट्री बाय व्हॅल्युम ऐटसेट्रा) फक्त आपुनला आपला प्रॉपगंडा त्याच्या संग सिंक्रोनाईज करता येत नसे , लै आधीची वार्ता पाहलो तर कळते राज कपूर अने गुरुदत्त ची जे पब्लिसिटी कवा फॅन फॉलोइंग ऑसम हुती रशिया अने युरोप मंदी, पर त्येला कारण होता कि त्या बिज्या लोकांचा सॅड मुव्ही हे युरोपियन्सचा कॉलॉनिअल इगो कुरवाळत असे, अजूनही काही बिघडलेला नाय, आपुन ते वापीस करू शकते, फक्त त्येला फॉलो केला पायजेल, हल्ली इंडियन सिनेमाचा नरेटिव्ह बदलला असून त्येच्यात वापीस एकवार patriotism इन फॅशन आला हाय, लेटेस्ट मंदी आपुन अक्षयकुमारचा समद्या मुव्ही पाहिल्या तर ते फील होते (हॉलिडे, बेबी, ऐरलिफ्ट) त्येंचा मार्केटिंग कराया हवा, अने त्यासाठी ते पिच्चर हॉलिवूड टाईप पायजे, दर पिच्चर मंदी गाना असण्याच्या आग्रव आपुन सोडाय पाहिजे,
हॉलिवूड नरेटिव्ह अने इंडिया,
अदुगर हॉलिवूड पिच्चर मंदी अमेरिकन लोक एखादा डिक्टेतर ते एलियन्स समद्याला हरवत असे, अने इंडिया म्हंजी फक्त ताजमहाल समोर हात जोडून बसलेला राजस्थानी फेटा वेयरिंग जनता दाखवत असे (इंडिपेंडन्स डे, आयर्न मॅन पार्ट वन) पर हळू हळू इंडिया ला अमेरिकन मूवी मध्ये ड्यु जागा भेटते हाय, एगजांपाल बघले तर दिसून येते का आता इंडियन technologyला ज्यागा भेटत हाय, उदाहरण इंटरस्तेलर मंदी असलेले इंडियन रेफ्रेन्सस कवा, जी आय जो रिटालियेशन मंदी डोकं फिरलं म्हणूनश्यानी धाडकन समदी न्यूक्लियर मिसाईल फायर करणारा इंडियन पीएम, असा हळू हळू वाढायला आपुनच्या साईड न बी स्कोप हाय अर्थात हे एक्झाम्पल म्हंजी इंडो अमेरिकन रिलेशन्सचा आरसा हायच.
एक येगला इचार,
आपुनला वाटते, हॉनरेबल पीएम साहेब न ज्यो 'इंटरनॅशनल योगा डे' सुरु केला हाय तो अश्याच पॉवरफुल सॉफ्ट पॉवर नरेटिव्हचा भाग असावा काय? जसा चीन ने लै अग्रेसीवली कुंग फु इकला तसा आपुनला योगा इकायचा स्कोप ओपन झाला हाय ह्या इंडेव्हर मुले असे वाटते.
17 Jan 2017 - 5:07 pm | अभिजित - १
टॉम क्रूझ आणि तत्सम अमेरिकन नायक आपले मिशन कोणालाही थांगपत्ता ना लागून देता पूर्ण करतात.
पण बेबी मध्ये आपले अक्षय कुमार आणि कंपनी जेव्हा बेबी ला दुबई मधून पळवून आणत असतात तेव्हा तिथल्या डेरा पोलीस ला हे सगळे कसे घडले आहे ते समजत असते. सगळ्यात शेवटी तो विमानतळावर फोन करून अक्षय आणि मंडळी एका पेशंट ला भारतात नेत आहेत हे पण त्याला समजते. तो पेशंट म्हणजेच "बेबी" !! पण हा डेरा ते विमान थांबवत नाही. सोडून देतो !! हि आपली टिपिकल भारतीय सॉफ्ट पॉवर प्रस्थापित करण्याची पद्धतच आहे. पण खूप वेगळी .
खरोखर असे घडले तर प्रत्यक्षात डेरा काही भारतीय एजंट ला सोडणार नाहीत. पण त्यांनी सोडावे असा हा प्रयत्न . आपल्या बॉलीवूड वाल्यांचा !!
17 Jan 2017 - 5:16 pm | इशा१२३
वेगळ्या विषयावरचा लेख! आवडला.
17 Jan 2017 - 8:15 pm | पगला गजोधर
भारत म्हटला की ताजमहाल, बुद्ध, महात्मा गांधी, खादी , मदर टेरेसा, बॉलिवूड, शाकाहार, योग
आयुर्वेद, तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत जगभरात गेली अनेक वर्षे (सन २०१४ पेक्षाही खूप खूप आधी बरका)
भारताची प्रतिमा सॉफ्ट पॉवर स्टेट सारखी होती (आठवा सद्दामच्या सैन्याने भारतीयांचे शिरकाण नाही केले कुवेत युद्धात )
आणि आहे, जगात कुठेही जा साऊथ आफ्रिका , इतर आफ्रिका इजिप्त इराण इराक , नॉर्वे, जपान , रशिया अफगाणिस्तान किर्गिझीस्तान
तुर्कमेनिस्तान कुठेही भारताबद्दल चांगली भावना होती, पुढे राहील का नाही याबद्दल शाश्वती नाही ........
17 Jan 2017 - 9:02 pm | सामान्य वाचक
भारतीय चित्रपट हे बरेचदा हॉलीवूड ची कॉपी असल्याने विषय तेच असतात
आणि मुळात भारतात जर काही अशा विचारधारेचे चित्रपट बनवूया असे कुणी या रथी महाराथीना सांगितले तर कुणी ऐकेल असे वाटते का
17 Jan 2017 - 9:21 pm | अनरँडम
लेखात मांडलेला विषय चिंतनीय आहे पण लेखात मोठ्या प्रमाणात सुलभीकरण झाले आहे असे वाटते. उदा. आंग ली हे चीनच्या सॉफ्टपॉवरचे उदाहरण कसे असू शकेल? आंग ली हा तैवानमध्ये जन्मलेला अमेरिकन नागरिकत्व असलेला दिग्दर्शक आहे. त्याने 'ब्रोकबॅक माउंटन' (अमेरिकेतल्या समलैंगिक संबंधांवर) आणि 'लाइफ ऑफ पाय' (भारतीय पार्श्वभुमी) यासारखे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. यामुळे फक्त एक-दोन चीनच्या पार्श्वभुमीवर बनवलेल्या चित्रपटांमुळे त्याला सॉफ्टपॉवरचे उदाहरण ठरवणे फारच बादरायणी वाटते.
आता रशियन हॅकर्सच्या उद्योगांना या व्याख्येनुसार सॉफ्टपॉवर ठरवता येईल का?
18 Jan 2017 - 1:13 am | गामा पैलवान
कंजूस,
नवीन पिढीत शास्त्रीय संगीताची आवडही वाढीस लागलीये. आपण समजतो तितकी काही परिस्थिती वाईट नाही. बॉलीवूडमधला कला पैसा पंजाबी उथळपणावर उधळला जातोय. आज ना उद्या बंद होईलंच.
आ.न.,
-गा.पै.
18 Jan 2017 - 6:55 am | कंजूस
समारंभातल्या जेवणावळींचा मेन्यु तेच ठरवतात. सगळे पंजाबी पदार्थ ठरवतात. आता कंत्राटदार मराठी फक्त असतो हाताखालचे जो स्वस्तात मिळेल तो अथवा पुन्हा आउटसोर्सिंग. हॅालमध्ये कांद्याचा ,गरममसाल्याचा घमघमाट.
नवीन पिढी शा संगिताकडे वळलेली नाहीये. ती भेळचाट "फ्युजनकडे" टैमपाससाठी गेलीय. खाताखाता ढुमढुमटामतिनढुमकफाम थोडं कमी कपड्यात केस झिंज्या हलवून झालं की संपलं.
18 Jan 2017 - 1:15 am | गामा पैलवान
लोकहो,
भारतीयांनी गणितात शून्याचा वापर सुरू केला. हे मृदूवर्चस्व मानावं का?
आ.न.,
-गा.पै.
18 Jan 2017 - 1:26 am | अंतु बर्वा
सहज कुतुहल म्हणुन गुगल केले असता हे सापडले: Operation Hollywood: How the Pentagon Shapes and Censors the Movies
त्यातला हा पॅरा बर्यापैकी बोलका आहे: Paramount Pictures was the Pentagon's favorite movie studio in 1987, the year Paramount was trying to get the Pentagon's approval for the Pre-sidio. A year earlier Paramount had released Top Gun, the most successful collaboration between Hollywood and the military of all time. The film starring Tom Cruise as a cocky naval aviator, was a huge office hit, and a flood of young men had joined the navy after seeing it. And now Paramount had plans to produce five more movies with military themes that the Pentagon hoped would produce similar results.
18 Jan 2017 - 8:36 pm | प्रदीप
देशाचे आर्थिक बळ सर्वात महत्वाचे आहे, त्यातून मग त्याला राजकीय बळ प्राप्त होते. सॉफ्ट पॉवर ही त्यानंतरची गोष्ट झाली. मात्र तिचा वापर, स्वतःकरता नवनवी मार्केट्स निर्माण करण्याकरता अथवा, आता जागतिकीकरणामुळे इतरांना स्वतःची मार्केट्स खुली करण्याकरता उपयोग करण्यापुरता प्रामुख्याने होतो.
लेखात अमेरिका व चीनची उदाहरणे दिलेली आहेत. ह्या दोन्ही देशांना भरपूर आर्थिक बळ प्राप्त झाल्यानंतरच 'सॉफ्ट पॉवर' ही प्राप्त झाली. मात्र लेखात म्हटल्याप्रमाणे स्वतःचा राजकिय विचार जगभर प्रसारीत करण्यासाठी हे दोन्ही देश ह्या पॉवरचा वापर करताहेत असे मलातरी वाटत नाही. अमेरिकेच्या हॉलीवूडचे उदाहरण घ्या. एकतर हा सर्व व्यवसाय संपूर्णपणे खाजगी क्षेत्राच्या हातात आहे, सरकार त्या क्षेत्राला हाताशी धरून मुद्द्दाम काही स्वतःचा विचार प्रसवत आहे, असे अजिबात संभवत नाही. मी स्वतः हॉलीवूडचे चित्रपट खूपच कमी पहातो, तेव्हा लेखातील दिलेल्या स्पेसिफिक संदर्भांविषयी मी अनभिज्ञ आहे. पण तसे ( म्हणजे, पूर्वी व्हिलन रशियन, मग गेल्या पंधरा- वीस वर्षांत तो अरब/ मुस्लिम) जरी आहे हे मान्य केले तर हे, तेथील समाजाच्या जगाकडे पहाण्याच्या दृष्टीचे (वर्ल्ड- व्ह्यूचे) प्रतिबिंब आहे -- एक प्रकारची वैचारीक दिवाळखोरीच म्हणा, हवी तर. ह्यापलिकडे काही नाही. मला वाटते अलिकडे अनेक वर्षांत परग्रहावरील मानवांचे आक्रमण, अथवा येथील मानवांनीच निर्मीलेल्या तत्सम 'व्हिलन' पात्रांची रेलचेल तेथील चित्रपटांतून आहे. आता इथे कसला राजकीय विचार कुणाला प्रसवावयाचा आहे?
हेच चीनच्या बाबतीतही म्हणता येईल. एकतर लेखात दिलेली उदाहरणे चिनी चित्रपटांची असली तरी आंग ली, तैवानी, जॅर्की चांग हॉम्गकाँगचा. तेव्हा त्यांमागे एकच राजकीय, सरकारी, निमसरकारी शक्ति नाही. दुसरे, ८० व नव्वदीच्या दशकांत खरे तर 'बीजिंग फिल्म अकादमी' च्या दुसर्या व तिसर्या पिढीतील काही तरूण दिग्दर्शकांनी अनेक खास चिनी मातीत रूजलेले बहारदार चित्रपत बनवले. उदा. चेन कायगेचे '' Yellow Earth', 'Farewell My Concumbine', जांग यिमौ ह्यांचे 'Red Sorghum', 'Raise The Red Lantern'. परंतु तेव्हा चीन आजच्या इतका आर्थिकदृय्ष्ट्या बळकट झालेला नव्हता. त्यामुळे ह्या चित्रपटांचे काही परदेशांतील फिल्म फेस्टिव्हल्समधे कौतुक झाले तेव्हढेच. त्यांमुळे बाहेरील जगतांत चीनच्या संस्कृतीच्या प्रसारामधे अजिबात काही वृद्धि झाली नाही. मात्र गेल्या दहा- पंधरा वर्षांत चीनची आर्थिक बळकटी झाल्यावर तेथील मध्यमवर्गीय समाज, हॉलीवूडच्या चित्रपटांसाठी मोठी बाजारपेठ बनली. आतातर तिच्यावर हॉलीवूडची इतकी भिस्त आहे की गेल्या वर्षी तिथले त्यांचे उत्पन्न थोडे घटल्यावर ते चिंतेत पडले आहेत. हे चिनी चित्रपट तर खाजगी बनावटीचे आहेतच, त्याचप्रमाणे आंग ली इत्यादींंच्या निर्मीती ह्यांचा व चिनी सरकारचा सुतराम संबंध नाही.
इतर सर्वच देशांप्रमाणे, ह्या देशांच्या सरकारांच्या स्वतःच्या प्रोपागेंडा करणार्या संस्था आहेतच, उदा. अमेरिकेतील पीबीएस, चीनचे 'सीसीटीव्ही'. ह्यांच्या परदेशांतील प्रक्षेपणांतून त्यांना हवा तसा स्वतःचा देश ते दाखवू शकतात. त्यासाठी खाजगी व्यावसायिकांना ते वेठीस धरत नाहीत.
एखाद्या जागेस आर्थिक बळ प्राप्त झाले की व्यवासायासाठी उपयुक्त अशी सॉफ्ट पॉवर तिला आपोआप प्राप्त होते. त्याचा व गुणवत्तेचा काहीच संबंध नसतो. म्हणूनच अचाट कँटनीज चित्रपट, कँटनीज पॉप म्युझिक, कोरीयन पॉप म्युझिक ह्यांना जगांतून प्रचंड मागणी असते. ह्याउलट, आमच्याकडे १९४५ पासून नव्वदीच्या दशकांत हिंदी व दाक्षिणात्य चित्रपट जगताने अतिशय गुणी कलाकारांनी निर्मीलेली चित्रपट गीते आम्हास दिली, त्या गाण्यांना विशेष स्थान देणारे चित्रपट बनवले गेले, पण तेव्हा मनोरंजनाच्या क्षेत्रांतील जागतिक उलाढालीच्या मानाने आपल्या ह्या चित्रपटसृष्टीची आर्थिक उलाढाल अतिशय नगण्य होती. तेव्हा त्याची दादच जगात घेतली गेली नाही. वास्तविक चित्रपट गीतांचे तिसर्याच व्यक्तिकडून पार्श्वगायन करून घेणे हे नवे तंत्र आपल्या ह्या चित्रपटसृष्टीने स्वतःहून विकसित केले होते. पण त्यातून आपल्याला काही सॉफ्ट पॉवर अस्त्र म्हणून मिळाली नाही. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्याने व शिक्षीत तरूणवर्गामुळे, नव्वदीच्या दशकानंतर आपल्या येथील मध्यमवर्गीय समाज झपाट्याने विस्तारीत झाला व अजून तो तसा होत आहे. ह्या मार्केटकडे अर्थात हॉलीवूडचे लक्ष न वळले तर ते नवलच! ह्याच सुमारास टी. व्ही. प्रसारणावरील बंधनेही आपन शिथील केली, मीडिया फोफावू लागला. आणि जगभरच्या मीडियास हे मोठे मार्केट आहे, हे लक्षात आले, त्यामुळे मग सलग दोन किंवा तीन (चूभुद्याघ्या) वर्षी भारतीय महिला 'विश्वसुंदर्या' बनल्या! आणि ह्याचमुळे आपल्या चित्रपटांचाही जगभरात बोलबाला होऊ लागला-- 'बॉलीवूड' उदयास आले. तसेच ह्या आपल्या मार्केटमुळे क्रिकेटमधील आपली सॉफ्ट पॉवर वधारली. ह्या सर्व उदाहरणांतून जाणवते ते हे की, ह्या पॉवरचा उपयोप्ग, देशाच्या राजकीय विचारांचा प्रचार जगात करण्यासाठी होत नसून, तो त्या त्या क्षेत्राच्या अर्थकारणाशी निगडीत आहे.
बाकी, आपल्या 'बॉलीवूड' निर्मीत चित्रपटांतून आपले राजकीय/ सामाजिक विचार आपण आपल्या शेजारी देशांत प्रसवू शकतो, तसेच आपल्या व त्यांच्या देशांचे खुले आदान-प्रदान असावे म्हणजे त्यांतून आपण प्रोपगंडा करू शकू, इत्यादी आशयाची विधाने मला अतिशय भोळसट वाटतात.
18 Jan 2017 - 8:52 pm | संदीप डांगे
अत्यंत आवडीचा विषय.... =)) =))
लेख थोडासा तोकडा पडलाय अनेक बाजू नीट मांडण्यात...
अनेकांना चित्रपटांतून प्रोपगंडा करण्यामागे सरकार आहे ही कल्पना कन्सपिरसी थेरी वाटू शकते. ते एक असो.
सध्या नेमका वेळ हाताशी नसल्याने पोच देत आहे. जमल्यास थोड्या विटा लावीन म्हणतो... :-)
18 Jan 2017 - 9:26 pm | वरुण मोहिते
अमेरिकेचं वाटत कारण अमेरिका महासत्ता होती त्यामुळे त्यांच्या चित्रपट विषयक कल्पना आपणच मसीहा आहोत जगातले अश्या होत्या. प्रत्येक देशाची काही एक सॉफ्ट पॉवर असते पण ती एनकॅश करायला अर्थव्यवस्थाही तितकीच मजबूत असावी लागते . पाकिस्तान मध्ये आपले चित्रपट पाहतात लोकप्रिय आहेत तरी त्यांच्या राष्ट्राविषयक कल्पना त्यामुळे बदलणार नाहीत . आपणही गुलाम अलींच संगीत ऐकतो त्यामुळे हा मुद्दा वेगळा आहे . फारतर एखादी स्टाईल ट्रेंड कॉपी होईल पण त्यामुळे फार काही फरक पडत नाही. राज्य राज्यांमधील सॉफ्ट पॉवर च हि तेच आहे .
19 Jan 2017 - 11:44 am | मृत्युन्जय
अतिशय उत्कृष्ट लेख. लेख आणी प्रतिसादांमधुन बरीच नविन माहिती मिळाली.
उरी इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नटांवर आणि गायकांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली चालू आहेत. पाकिस्तानी कलावंतांना देशातून हाकलून लावा अशी उच्चरवातली मागणी जोर धरत आहे. पण ह्या सगळ्यांमुळे पाकिस्तानप्रेरित दहशतवाद थांबणार आहे का? सगळीच युद्धे बंदुकीने लढता येत नाहीत.
अमोल मला वाटते तुमच्या लेखाचा आशय आणि वरचा परिच्छेद पुर्णतः विसंगत आहेत. सॉफ्ट पॉवर तुम्हीच लेखातुन दाखवुन दिली आहे. त्यामुळे कलाकार आणि गायक किती मोठा मानसिक आणी सांस्कृतिक परिणाम घडवुन आणतात ते स्पष्टच होते आहे. तुम्हीच तुमच्या लेखात अतिशय विस्तृतपणे विषद केले आहे की ही सोफ्ट पॉवर बंदुकीपेक्षा जास्त घातक ठरु शकते. त्या पार्श्वभूमीवर वरील विधार खुपच विसंगत वाटते.
19 Jan 2017 - 10:21 pm | कैलासवासी सोन्याबापु
भारत करत असलेल्या सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शनचे हे एक लाईव्ह उदाहरण मानावे काय ? नमस्ते लंडन तसं पाहता एक मिडिओकर पिक्चर आहे, फार काही उच्च नाही, वरती काही सन्माननीय मंडळीने ज्यावर खेद अन राग व्यक्त केलाय अश्या पंजाबी संस्कृतीने ठसाठस भरलेला . त्यात हा एक विशिष्ट सीन आहे जिथे 'कॉलॉनिअल' मानसिकतेत असलेल्या एक ब्रिटिश म्हाताऱ्याला एक भारतीय (पंजाबी असलेला) माणुस बऱ्यापैकी शालजोडीतले हाणून थोतरतो.
हा सीन एका रशियन मुलीने पाहिल्यावर तिने जी 'रीअकॅशन ऑन अ सीन ऑफ नमस्ते लंडन' दिली आहे ती पाहता हे मला एकदम सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शन असल्यासारखे भासले, म्हणुन हा पोस्टिंग प्रपंच. बरं ती तिच्या रीअकॅशन मध्ये 'इंडिया' म्हणजेच भारत ह्या इंटिटी बद्दल बोलते आहे, 'पंजाब' किंवा 'शीख' इंटिटी वर नाही, मग अश्या प्रसंगी म्हणावे वाटते की
१. आपल्या प्रयोरिटी स्पष्ट हव्यात त्यात आपल्याला
अ. भारतीय सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शन हवंय का
ब. पंजाबी 'आक्रमण' झाल्याचा उद्वेग आहे
हे स्पष्ट असावे, जर हे सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शन मानले, तर ते यशस्वीरीत्या झाले आहे असे म्हणता येईल का? उत्तर हो असल्यास माझी प्रयोरिटी भारत आहे, त्याचे सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शन व्हायला कुठलीही घटकसंस्कृती कामी येऊ दे, मग ती पंजाबी असो वा मल्याळी असो वा बिहारी असो वा मराठी असो, मला त्याने फरक पडत नाही, जागतिक कॅनव्हासवर विचार करताना आपल्या 'सबनॅशनल आयडेंटिटी' वर आपण किती जोर द्यायचा हा ज्याचात्याचा प्रश्न. ते एक असो, पण सॉफ्ट पॉवर वगैरे काही नसतेच असे टोकाचे मत माझे नक्कीच नाहीये अर्थात सॉफ्ट पॉवरचे महत्व किती आहे किती असावे नसावे ह्यावर बोलायला मी त्या विषयाचा तज्ञ नाही, पण ती एक ताकद म्हणुन थोडीबहुत तरी असावी असे मात्र हा विडिओ पाहून प्रामाणिकपणे वाटले इतके म्हणतो.
(हार्डपॉवर पाईक) बापु
20 Jan 2017 - 11:24 am | स्वीट टॉकर
वेगळ्या विषयावर उत्तम लेख!
31 Jan 2017 - 6:25 pm | रेवती
वेगळ्या विषयावरील लेखन आवडले.