मेमॉयर्स ऑफ गेइशा

पद्मावति's picture
पद्मावति in लेखमाला
18 Jan 2017 - 7:23 am

*/

झुकलेली नजर, ओठांवर मंद स्मित आणि एक लाजरा कटाक्ष…अगदी क्षणभरच.. पण त्या क्षणभरच्या नजरभेटीतूनही जी कुठल्याही पुरुषाला वेड लावू शकते, ओढ लावू शकते ती खरी गेइशा!!  स्पर्श नाही, अंगप्रदर्शन नाही किंवा सवंग हावभाव नाहीत...फक्त एक कटाक्ष.

'गेइशा'- जपानच्या इतिहासातले, त्याच्या संस्कृतिक जडणघडणीतले महत्त्वाचे अंग. सामाजिक जीवनाचा अभिमानास्पद नसला तरी एक अविभाज्य भाग.
आता गेइशा म्हणजे कोण आणि काय? तर गेइशाचा शब्दश: अर्थ आहे कलाकार.  नृत्य-गायनाने पुरुषाचे मनोरंजन करणारी कलावंत, आपल्या सौंदर्याने आणि वाकचातुर्याने त्याला रिझवणारी मोहिनी, त्याच्या समस्या ऐकून घेणारी, प्रसंगी सल्ला देणारी मैत्रीण. ही स्त्री शरीरविक्रय करणारी वेश्या नाही, पण त्याचबरोबर कायदेशीर पत्नीसुद्धा अर्थात नाहीच नाही. हिचे स्थान आहे कुठेतरी अधेमधे…

पुरुषांसाठी निर्माण केलेले एक जग...आभासी दुनिया. या जगात फक्त सौंदर्य आहे, सुगंध आणि आनंद आहे, जिथे येऊन घरच्या=दारच्या सर्व चिंता साकेच्या पेल्यात आणि गेइशांच्या सहावासात विरघळून जाव्यात असे हे स्वप्नांचे जग.
पण हे जग निर्माण करण्यासाठी मात्र काही स्त्रियांना फार भारी किंमत चुकवावी लागायची.  सुंदर चेहरे, महागडे किमोनो  आणि त्या नाजूक हास्याच्या मुखवट्याआड किती जखमा, किती अश्रू असतील याची परक्या व्यक्तीला कल्पनाही करणे अशक्य आहे.
मध्ये याच विषयावर एक नितांतसुंदर पुस्तक माझ्या वाचनात आले. लेखक आर्थर गोल्डन यांची कादंबरी ' Memoirs of a Geisha’.

Book

कथेचा काळ आहे साधारणपणे १९३०पासून ते १९५६पर्यंतचा. ग्रेट डिप्रेशन ते दुसरे महायुद्ध असा हा कालखंड. जपानच्या समुद्रकिनार्‍यावरचे एक लहानसे गाव. या गावात नऊ वर्षांची चिमुरडी चियो आपली मोठी बहीण सात्सु आणि आईवडिलांबरोबर राहत असते. मरणाच्या दारात असलेली आजारी आई आणि वृद्ध गरीब बाप. हे चियोचे आई-वडील परिस्थितीसमोर हात टेकून, काळजावर दगड ठेवून एक निर्णय घेतात, तो म्हणजे पोटच्या मुलींना स्वत:पासून दूर करण्याचा... पैशाच्या मोबदल्यात त्यांना विकण्याचा. 
आता या मुलींची रातोरात घरातून उचलबांगडी होते आणि त्यांना नेण्यात येते दूर क्योतो शहरात.  जपानचे संस्कृतिक केंद्र असलेले क्योतो शहर कला, साहित्य, स्थापत्यशास्त्र याबरोबरच आणखी एका गोष्टीसाठी ओळखले जायचे, ते म्हणजे इथल्या गेइशा.

स्वत:च्या घरापासून अक्षरश: ओरबाडून नेलेल्या या मुलींचे दुर्दैव आत्ता कुठे सुरू झालेय. आधीच अनाथ झालेल्या या बहिणी इथे येऊन एकमेकींपासुनही दूर केल्या जातात. जितक्या अलिप्ततेने आपण धान्य निरनिराळ्या डब्ब्यात भरून ठेवतो ना, तितक्या सहजतेने या मुलींनासुद्धा दूर वेगवेगळ्या घरांमध्ये पाठवले जाते.  
खरी कहाणी सुरू होते ती इथपासून. चियोला केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण कथा लिहिण्यात आली आहे. 

गेइशांच्या दुनियेत घर आणि परिवाराच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत. इथे घर, परिवार म्हणजे काही गेइशांचा एक समूह. एक ग्रूप. हा परिवार जिथे राहतो ते घर. या घराला ओकिया असे म्हणतात. लहानगी चियोचान ज्या घरात पडली आहे, तेथील सर्वेसर्वा आहे तेथील मालकीण. घरातला प्रत्येक निर्णय हा हिच्या मर्जीवर. या बाईच्या खालोखाल स्थान आहे हात्सूमोमोचे. हात्सूमोमो आहे या ओकियातील प्रमुख कमावती सदस्या. क्योतोमधील त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाच्या गेइशांमधली एक. दिसायला अप्रतिम सुंदर असलेली ही मुलगी स्वभावाने मात्र फार दुष्ट आहे. चियोशी तर ती साताजन्माचे वैर असल्यासारखे वागत असते.

या जगात दुर्दैवाने अडकलेल्या मुलींच्या आयुष्याला दोन दिशा असतात. एक म्हणजे जन्मभर ओकियामध्ये गुलामाचे जीवन जगत राहणे. हा मार्ग अर्थातच  कुणालाच नको असतो. दुसरा मार्ग आहे राजमार्ग....तो म्हणजे कसेही करून स्वत: गेइशा बनणे हा. अर्थात हाही मार्ग महाकठीण असायचा आणि तो निवडण्याचे स्वातंत्र्यही मुलींना नसायचे.  एखादी मुलगी दिसायला, वागायला बरी असेल, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मालकिणीच्या मर्जीतली असेल, तर मात्र मग तिचे नशीब उजळायचे. अशा मुलीचे मग गेइशा बनण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण सुरू व्हायचे. 
चियोलाही असे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळते. नृत्य, वादन, साहित्य, काव्य अशा विषयांमध्ये तिची काटेकोर तालीम सुरू होते. गेइशा तालमीचा आणखी एक महत्त्वाचा भाग असायचा तो म्हणजे पुरुषांना मोहवण्याच्या, रिझवण्याच्या निरनिराळ्या खुब्या शिकणे. यामधे संवादकला, मेकअप करण्याची कला, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मद्य अशा अनेक गोष्टी शिकणे हे आवश्यक असायचे.
थोड्याच कालावधीत चियो शिक्षण पूर्ण करते आणि तिला एक नवीन नाव मिळते...सायुरी!!!

कथा जरी सायुरीच्या आयुष्याभोवती फिरत असली, तरी ही कथा तिच्या एकटीचीच नाहीये. ही कथा वाचकाला सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीच्या जपानमध्ये घेऊन जाते. तत्कालीन समाजजीवन, राहणीमान, लोकांची विचारसरणी, राजकीय चढउतार यांचे चित्र लेखक अगदी सहजपणे वाचकासमोर उभे करतो. गेइशांची झगमगती दुनिया, गेइशांचे आश्रयदाते आणि चाहते असलेले बडे राजकारणी, सर्वोच्च लष्करी अधिकारी, मोठे उद्योगपती त्याचबरोबर मानवी भावना, स्वभाव, हेवेदावे, प्रेम, मत्सर असे सगळे रंग, सगळी रूपे आपल्या पुढ्यात हळुवारपणे उलगडले जातात. पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी आहे.

याच कथेवर निर्माता स्टीवन स्पीलबर्ग आणि दिग्दर्शक रॉब मार्शल या जोडीने २००५मध्ये एक चित्रपट बनवला. चित्रपटाचे नाव तेच - 'Memoirs of a Geisha’.

1
(गूगल इमेजेसवरून साभार)
 
कथेचा आवाका प्रचंड आहे. साडेचारशे पानांचे पुस्तक अडीच तासांमध्ये प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे खरे म्हणजे फार कठीण काम होते. पण ही कथा पडद्यावर रॉब मार्शल यांनी अत्यंत समर्थपणे आणि फार देखण्या रूपात मांडली आहे. सिनिमॅटोग्राफी अप्रतिम आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असला, तरी तो कुठेही उदासवाणा किंवा डार्क वाटत नाही. अतिशय सुरेख चित्रण. 
स्क्रीनप्ले सशक्त आहे आणि एडिटिंग अगदी नेमके. घट्ट विणलेली ही पटकथा त्यातील कलाकारांनी रूपेरी पडद्यावर मोठ्या ताकदीने साकारली आहे. 

सूझूका ओहगो या लहानशा गुणी मुलीने चियोचानची भूमिका फार सुरेख केली आहे. घरापासून, आईवडिलांपासून दुर्दैवाने दूर झालेली ही मुलगी हालअपेष्टा सोसतेय. पण तरीही खळखळ वाहणार्‍या पाण्याची लवचीकता हिच्या स्वाभावात आहे. म्हणूनच ही मुलगी तुटत नाही, कुठेही थांबत नाही. पाण्याच्या प्रवाहासारखी स्वत:साठी वाट बनवण्याची जिद्द हिच्या अंगात आहे. मनाची घालमेल, दु:ख पण तरीही अतिशय निश्चयी स्वभाव सुझूकाने डोळ्यामधून आणि हावभावांमधून फार जबरदस्त दाखवलाय. 

गॉँग ली या अभिनेत्रीने हात्सूमोमोची भूमिका साकारलीय. पराकोटीचा मत्सरी आणि उर्मट स्वभाव, पण त्याचबरोबर अप्रतिम सौंदर्य असलेली ही बाई या चित्रपटातली खलनायिका आहे. भूमिकेला तिने शंभर टक्के न्याय दिलाय. 

सायुरीवर एकतर्फी प्रेम करणारा नोबू आणि फक्त पैशाशी इमान ठेवणारी मालकीण या दोन भूमिकांमध्ये अनुक्रमे कोजी याकुशो आणि काओरी मोमोइ या कलाकारांनी अगदी मनापासून काम केलेय. 

चियोच्या आयुष्यात काही लोक मात्र देवदूत बनून येतात. त्यामधली एक म्हणजे मामेहा! क्योतोमधील त्या काळातील सर्वात यशस्वी गेइशा. चियोला सायुरी बनवण्यात या मामेहाचा खूप मोठा वाटा असतो. सायुरीची मोठी बहीण बनून तिला मार्गदर्शन करणारी, प्रसंगी कठोर बनणारी पण प्रत्येक वळणावर तिला सांभाळून घेणारी मामेहा मिशेल येओह या अभिनेत्रीने उत्तम साकारलीय. 
 
सायुरीच्या या गोष्टीत तिच्या स्वप्नांचा राजकुमारसुद्धा आहे. रखरखीत वाळवंटात अचानक एखादी हिरवळ दिसावी, त्याच प्रकारे हा राजकुमार सायुरीच्या आयुष्यात येतो आणि तिच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. केन वातानाबे या प्रचंड गुणी अभिनेत्याने या नायकाची भूमिका केलीय. अत्यंत शांत, खंबीर आणि संयमी असा हा मनुष्य.  अबोलपणे प्रेम करणारा प्रियकर, दूर राहूनही नायिकेला प्रत्येक पावलावर साथ देणारा, आधार देणारा सखा, मित्रासाठी स्वत:च्या प्रेमाचा त्याग करणारा सच्चा मित्र अशी अनेक रूपे केन वातनाबेने ज्या ताकदीने सादर केली आहेत, त्याला तोड नाही.   

चित्रपटातला केंद्रबिंदू आहे सायुरी! झॅंग झियी या अभिनेत्रीने आर्थर गोल्डनची ही नायिका पडद्यावर अक्षरश: जिवंत केलीय. भूमिकेचे लहानात लहान बारकावेसुद्धा हिने अप्रतिम दाखविले आहेत. सुरेख कोवळा चेहरा, गोड आवाज आणि अभिनयाची उत्तम जाण. या मुलीने कमाल केली आहे. 

2
(गूगल इमेजेस वरुन साभार)

हा चित्रपट बोट धरून आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. क्योतोच्या रस्त्यांवरून, गजबजलेल्या मैफलींमधून, ओकियामधल्या घरांमधून आपल्याला तो फिरवून आणतो. आता जवळपास लोप पावलेल्या गेइशा नावाच्या एका अध्यायाची जराशी झलक दाखवतो.

मेमॉयर्स ऑफ अ गेइशा हे केवळ आत्मचरित्र नाही. ही स्मरणयात्रा आहे जपानच्या एका वादळी कालखंडाची, त्या देशाच्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांची, मानवी स्वभावांच्या अनुभवांची, तरल प्रेमाची, अपेक्षाभंगांची आणि राखेतून पुन्हा भरारी घेणार्‍या एका पक्ष्याची....ही आहेत स्मृतिचित्रे..... स्मृतिचित्रे एका गेइशाची!!!
………………………………………………….

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

18 Jan 2017 - 8:27 am | बोका-ए-आझम

जबरदस्त पमीचान! फारच सुंदर! रच्याकने गाँग ली ने Hannibal Rising मध्ये आणि केन वातानाबेने The Last Samurai आणि Letters from Iwojima मध्येही आपल्या अभिनयाची चमक दाखवलेली आहे!

जावई's picture

18 Jan 2017 - 8:39 am | जावई

आवडलं..अगदी भोवतालच्या जगाचा विसर पडला...!

सामान्य वाचक's picture

18 Jan 2017 - 9:42 am | सामान्य वाचक

पण पुस्तक वाचले आहे

बरेच संदर्भ आपल्याला समजायला वेगळे आहेत, पण एकंदरीत खिळवून ठेवणारे पुस्तक होते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Jan 2017 - 10:19 am | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय सुंदर लिहिलंय ताई हे! खूप खूप आवडले. सहसा पुस्तक वाचले की त्यावर तयार केलेल्या सिनेमात शक्यतो माणसे चुकाच शोधतात (पॉटर भक्तांत हे जास्त सापडते) , पण दोन्ही (लिखित अन चित्र स्वरूपात) रसग्रहण करून दोन्हीचे बलस्थान मांडणे म्हणजे दर्दी असणे वाटते. सुंदर लेखन सुंदर परिचय. :)

सुरेख लिहिलेस पद्मावती. आवडले. पुस्तक वाचले आहे आणि सिनेमाही पाहिला आहे.

प्रसाद प्रसाद's picture

18 Jan 2017 - 10:48 am | प्रसाद प्रसाद

पुस्तक परिचय अतिशय सुंदर लिहिलंय तुम्ही. खूप इंटरेस्टने पुस्तक वाचले, शेवट वाचून आनंदही झाला पण हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे असा माझा का कुणास ठाऊक समज झाला होता, पुस्तक पूर्ण काल्पनिक आहे असे शेवटी वाचून हिरमोड झाल्यासारखे वाटलेले आठवते ( व्यवस्थित काही कारण नसताना).

संजय क्षीरसागर's picture

18 Jan 2017 - 11:00 am | संजय क्षीरसागर

Memoirs of a Geisha’ आजच मिळवतो आणि बघतो.

पैसा's picture

18 Jan 2017 - 11:46 am | पैसा

पुस्तक वाचलंय. सिनेमा पाहिला नाही. पण दोन्हीबद्दल सुरेख लिहिलंस पद्मावति, तुझ्या सहज सुंदर ओघवत्या शैलीत!

इशा१२३'s picture

18 Jan 2017 - 12:18 pm | इशा१२३

सुंदर ओळख पद्मावती!पुस्तक वाचलय. सायुरिच आयुष्य गेइशा सारखच पण एक स्त्री म्हणून तिचा विचार केला तर अनेक प्रसंग धक्का देतात.कठिण आयुष्य.संयमित छान लिहिले आहेस.
चित्रपट मात्र पहायचा राहिलाय.आता बघते.

इशा१२३'s picture

18 Jan 2017 - 12:26 pm | इशा१२३

सुंदर ओळख पद्मावती!पुस्तक वाचलय. सायुरिच आयुष्य गेइशा सारखच पण एक स्त्री म्हणून तिचा विचार केला तर अनेक प्रसंग धक्का देतात.कठिण आयुष्य.संयमित छान लिहिले आहेस.
चित्रपट मात्र पहायचा राहिलाय.आता बघते.

सस्नेह's picture

18 Jan 2017 - 1:14 pm | सस्नेह

सुरेख पुस्तक आणि चित्रपट परिचय ! वेगळ्या जगाची ओळख.

पुष्करिणी's picture

18 Jan 2017 - 3:03 pm | पुष्करिणी

छान लिहिलय, पुस्तक नाही वाचलं अजून पण सिनेमा पाहिलाय.

पिशी अबोली's picture

18 Jan 2017 - 3:11 pm | पिशी अबोली

पुस्तक आणि चित्रपट दोन्ही बर्‍याचदा वाचलंय/पाहिलाय. पुस्तकातील बारकावे फार आवडले होते, पण चित्रपटाच्या मर्यादा सांभाळून अतिशय सुंदर बनवलाय तो. हात्सुमोमोचं पात्र तर अतिशय जिवंत केलंय गाँग लीने. तिचा ताठा, अहंकार, प्रेम करणं, सायुरीला छळणं आणि शेवटचं कोलमडून पडणं सगळंच सुंदर. मामेहाचं काम सुंदरच आहे, पण मला तिथे हात्सुमोमोची प्रतिस्पर्धी म्हणून शोभणार्‍या कुणाला बघायला आवडलं असतं. तरीही, सुंदर!

लेखही मस्तच. आता परत बघणे आले.

विशाखा राऊत's picture

18 Jan 2017 - 4:16 pm | विशाखा राऊत

खुपच छान ओळख. सुंदर लिहिले आहेस पद्मवति :)

चित्रपट सुंदर आहे. परिचयदेखील छान.

प्रचेतस's picture

19 Jan 2017 - 6:45 am | प्रचेतस

+१

रेवती's picture

18 Jan 2017 - 6:41 pm | रेवती

या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. लेखन आवडले. चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करीन. यूट्यूबवर आत्ताच ट्रेलर पाहिला. जबरदस्त सादरीकरण आहे.

सही रे सई's picture

18 Jan 2017 - 7:23 pm | सही रे सई

मस्त लिहिले आहेस पद्मावती.. आता पुस्तक वाचणे आणि चित्रपट बघणे दोन्ही करणे आले. लायब्ररी ला भेट देण्यासाठी कारण मिळाले आहे.

खटपट्या's picture

18 Jan 2017 - 7:45 pm | खटपट्या

वाचतोय

बाजीप्रभू's picture

18 Jan 2017 - 7:54 pm | बाजीप्रभू

पुस्तक परिचय अतिशय सुंदर!

मनिमौ's picture

18 Jan 2017 - 8:24 pm | मनिमौ

सुरेख लिहील आहेस. मी फार पूर्वी पुस्तक वाचले आहे.आता पिक्चर नक्की बघेन

सुरेख लिहील आहेस. खूपच आवडल.

वरुण मोहिते's picture

18 Jan 2017 - 9:01 pm | वरुण मोहिते

फार पूर्वी वाचलेलं हे पुस्तक पण त्या वेळी अनुवादित वाचलेलं . आता परत वाचायला हवं मूळ भाषेत कधीतरी .

शैलेन्द्र's picture

19 Jan 2017 - 11:47 am | शैलेन्द्र

सुरेख ओळख

वेल्लाभट's picture

19 Jan 2017 - 2:48 pm | वेल्लाभट

उत्तम परिचय ! अतिशय उत्तम.

प्रीत-मोहर's picture

19 Jan 2017 - 3:06 pm | प्रीत-मोहर

पुस्तक वाचलय. आता मूवी बघेन शोधुन.

संजय पाटिल's picture

19 Jan 2017 - 3:10 pm | संजय पाटिल

चित्रपट पाहिला आहे!!

ज्योति अळवणी's picture

19 Jan 2017 - 3:12 pm | ज्योति अळवणी

सुंदर लेख. हे पुस्तक वाचलं होत खूप अगोदर. लेख वाचून परत एकदा त्या पुस्तकातल्या आठवणी ताज्या झाल्या. सिनेमा मात्र बघितला नाही. पण आता बघीन. धन्यवाद

Sanjay Uwach's picture

19 Jan 2017 - 3:50 pm | Sanjay Uwach

सुंदर वाचनीय लेख

चैत्रबन's picture

19 Jan 2017 - 4:56 pm | चैत्रबन

उत्तम परिचय...

उल्का's picture

19 Jan 2017 - 10:12 pm | उल्का

सुरेख लिहिले आहेस.
पुस्तक आणि चित्रपट वाचलं/पाहिला नाही पण तुझ्या लेखनाच्या शैलीमुळे उत्सुकता वाढली आहे.

रुपी's picture

20 Jan 2017 - 5:53 am | रुपी

नेहमीसारखेच छान लेखन!
ओळख आवडली. चित्रपट पाहणे जमेल की नाही माहीत नाही, पण पुस्तक नक्की वाचेन.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2017 - 6:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं ओळख, पुस्तक टु रिड लिस्ट॑ आणि चित्रपट टु वॉचलिष्टीवर टाकलेला आहे. बाकी लेखं भारी झालाय.

रातराणी's picture

21 Jan 2017 - 12:00 am | रातराणी

सुंदर लेख, चित्रपट नक्की पाहण्यात येईल.

अकिरा's picture

21 Jan 2017 - 3:31 pm | अकिरा

लेखामुळं पुस्तक वाचण्याची आणि सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाटत आहे. लवकरच मिळवेन दोन्हीही.

विशाल कुलकर्णी's picture

23 Jan 2017 - 10:58 am | विशाल कुलकर्णी

पुस्तक काही वाचलेले नाही, पण चित्रपटाची मात्र पारायणे केलीयेत. मिशेल योह ची मामेहा आणि विशेषतः केन वाटानबेचा चेअरमन या भुमिका अक्षरशः अविस्मरणीय झाल्यात. एका सुरवंटाचे रुपांतर सुंदर फुलपाखरात करणारी मामेहा आणि या सर्व प्रक्रीयेत ठामपणे सायुरीच्या पाठीशी उभे राहणारे चेअरमन, या दोन भुमिका अक्षरशः अजरामर केल्या आहेत या दोन कलावंतांनी. विशेषतः मिशेल योह सारख्या अ‍ॅक्शन स्टारची ही वेगळीच भुमिका प्रचंड आनंद देवून जाते. सायुरीपेक्षाही मामेहाच्याच प्रेमात पडायला होते.
पुनःप्रत्ययाच्या आनंदासाठी मनःपूर्वक आभार !

विशाल कुलकर्णी's picture

23 Jan 2017 - 11:13 am | विशाल कुलकर्णी

गाँग ली ने साकारलेली हात्सुमोमो हा ताज ठरावा चित्रपटाचा. प्रचंड ताकदीने उभी केलीये ही भुमिका तीने. त्या ओकियोची मुख्य कमावती स्त्री असल्याने स्वतःही केवळ एक गेइशा असुनही तिच्यातली स्वामीत्वाची भावना, तो ताठा. तिचा अहंकारी स्वभाव. चियोच्या निळ्या डोळ्यांमुळे भविष्यातील स्पर्धेची चाहूल लागताच अस्वस्थ झालेली हात्सुमोमो. मग उभी राहण्या आधीच चियोला नेस्तनाबूत करण्यासाठी तिने केलेले प्रयत्न, चियोवर केलेले अत्याचार.

हे सगळे करत असतानाच तिच्या आयुष्याची स्वतःची अशी सुद्धा एक बाजू आहे. गेइशांच्या परंपरेविरुद्ध तिचा एक प्रियकर असणे, त्याच्याशी असलेले संबंध जपण्यासाठी तिने केलेली धडपड, त्यात अपयश आल्यावर दारुच्या आहारी जाणे आणि मालकिणीने नंतर घरातून बाहेर काढल्यानंतर तिचे कोसळून पडणे. हे सगळं गाँग लीने इतक्या अप्रतिमरित्या उभे केलेय की खलनायिका असुनही ती जास्त लक्षात राहाते.

प्रदीप's picture

5 Feb 2017 - 4:25 pm | प्रदीप

माझी अतिशय आवडती चिनी अभिनेत्री. मी तिला चिनी मधुबालाच म्हणतो. झांग यिमौ व चेन कायगे ह्यांच्या चित्रपटांतून तिने अतिशय परिणामकारक भूमिका केलेल्या आहेत.

चित्रपटाची ओळख आवडली. आता हा चित्रपट पहाणे आले.

पूर्वाविवेक's picture

28 Jan 2017 - 5:47 pm | पूर्वाविवेक

एका अप्रतिम सिनेमाची तू छान ओळख करून दिली आहेस. लेख वाचल्यामुळे कधी एकदा सिनेमा पाहते असं झालंय.

फ्रेनी's picture

29 Jan 2017 - 6:20 pm | फ्रेनी

लेख आवडला :)

अभिजीत अवलिया's picture

29 Jan 2017 - 7:00 pm | अभिजीत अवलिया

चित्रपट नक्की पाहिला जाईल.