विंगेत गलबला - प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रभाकर भावे

सूड's picture
सूड in लेखमाला
10 Jan 2017 - 5:17 am

*/

नाटक, सिनेमा, पडद्यावर किंवा रंगमंचावर प्रस्तुत होणारी कोणतीही कलाकृती असो - त्यातले कलाकार, त्यांचा अभिनय महत्त्वाचा असतोच, पण त्यासोबतच महत्त्वाचं असतं आपल्या डोळ्यांना काय दिसतंय. कलाकार कितीही सुंदर देखणे असले, तरी तत्कालीन प्रकाशयोजना, प्रसंग याचा विचार करून केलेली रंगभूषा ते देखणेपण वाढवतं. त्यासाठी काम करत असतात पडद्यामागे असलेले रंगभूषेत पारंगत असलेले लोक. आपल्या ‘गोष्ट तशी छोटी’ या संकल्पनेनिमित्त आपण जाणून घेणार आहोत

अशाच एका ज्येष्ठ रंगभूषाकाराबद्दल - प्रभाकर भावे यांच्याबद्दल!!

मूळचे साताऱ्याचे असलेल्या भाव्यांचा आतापर्यंतचा प्रवास अगदी रोचक आहे. त्यांचे वडील हरहुन्नरी होते. त्याकाळी नाटकाचे पडदे रंगवणं, मूर्ती तयार करणं अशा गोष्टी हौसेने करत असताना नाटकात स्त्रीपार्ट करत असलेल्या मावसभावाने त्यांना रंगभूषा करण्याबद्दल विचारलं. त्यांच्या वडिलांनी ते सुरू केलं. मधल्या काळात वडील करत असलेल्या रंगभूषा भावे बघत असत. त्यासोबतच ते म्हणतात, शाळेत रंगभूषेसाठी भिडे म्हणून एक व्यक्ती येत असत त्यांचंही काम ते पाहत असत. पुढे शिक्षण होत राहिलं, ड्राफ्टमनचा डिप्लोमा झाला, मुंबईत नोकरी सुरू झाली, पण त्यांना पुण्यात यायचं होतं. मग पुण्यात किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी सुरू झाली. वडिलांनी रंगभूषेची कामं बंद करून एव्हाना वीस वर्षं झाली होती, पण घरात साहित्य होतं. शालेय वयातल्या आकर्षणाने आता खुणावलं, वडिलांकडे त्या साहित्याबद्दल कुतूहल व्यक्त केलं आणि नोकरी सांभाळत पुढे रंगभूषेचा प्रवास सुरू झाला.

bhave kaka

3

1

१९६१-६२ साली साहित्य संमेलनात 'रायगडाला जेव्हा जाग येते' आणि 'सवाई माधवराव' नाटकांसाठी ते स्वयंसेवक म्हणून काम करत होते. मा. दत्तारामांनी साकारलेल्या तरुण आणि उतारवयातल्या भूमिका पाहून आपण करतोय त्यात आणखीही सुधारणा गरजेची असल्याची जाणीव झाली. परदेशात दौरे केले. कॅनडा, इंग्लंड यासारख्या देशांत दौरे करत असताना जपानी नाटकात केलेला मुखवट्याचा प्रयोग पाहिला. त्यांनतर मुखवटे बनवण्याच्या उत्सुकतेपोटी अगदी आदिवासी भागात जाऊन राहिले. तिथल्या एका आदिवासी व्यक्तीने मुखवटा कसा बनवला ते ऐकताना आपणही अवाक होतो. भावे म्हणतात, “त्या व्यक्तीने गुडघ्याचा बेस घेऊन त्यावर माती थापली, गुंजेचे डोळे केले, गवताच्या मिश्या-भुवया बसवल्या आणि मग अलगद तो मुखवटा गुडघ्यावरून उचलला.” या अशा विविध निरीक्षणांनंतर त्यांनी जवळपास २५० ते ३०० मुखवटे केले. त्यांची प्रदर्शनं झाली. पहिल्या प्रदर्शनाचं उदघाटन विजया मेहतांनी केलं होतं, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. पूर्वी दूरदर्शनवर होणाऱ्या सुरभि कार्यक्रमात या मुखवट्यांची दखल घेतली गेली आणि एक भाग भावे यांच्या घरी चित्रित झाला. आपल्यातल्या फार कमी लोकांना हे माहीत असेल की जब्बार पटेलांच्या 'विदूषक' चित्रपटात वापरलेले मुखवटे हे भावेंनी केलेले होते. ‘सिटी ऑफ सेव्हन सिन्स’ नाटकाकरता पुढे त्यांनी डेव्हिड ग्रीव्ज यांच्यासोबतही काम केलं.

रंगभूषेचे एकेक किस्से ते अगदी मनापासून सांगतात. १९८१-८२ साली आपल्याकडे केवळ ३५ रुपयाला मिळणारा पॅनकेक ते परदेशप्रवासात सोबत घेऊन गेले. तिथल्या मेकअप आर्टिस्टने तो वापरून पाहिला आणि त्याबदल्यात भावेंना आपल्यापासचा मॅक्स फॅक्टर कंपनीचा पॅनकेक दिला, ज्याची किंमत भारतात त्या काळी जवळपास ८०० रुपये होती.

आपल्या पौराणिक कथांचं कधीही न ऐकलेलं तत्त्वज्ञान मला इथे ऐकायला मिळालं. ते म्हणतात, “लोक म्हणतात रावण दशमुखी होता. सहज विचार केला तर असा दशमुखी माणूस कुशीवर वळला तर डोक्यांची संबंध भिंत उभी राहील.” म्हणून ते म्हणतात - दशमुखी म्हणजे दहा मुखांचा नव्हे, तर दशगुणी!! तितक्या गोष्टीत पारंगत असलेला!! तेच चतुर्भुज, अष्टभुजच्या बाबतीत. तेवढ्या भुजा असलेली व्यक्ती नव्हे, तर दोन बाहूंत तितकं बळ असलेली व्यक्ती!! या दशमुखांच्या संकल्पनेचा विस्तार करत त्यांनी पुढे रावणाचं रूपक असलेले नऊ रसांचे नऊ मुखवटे केले आणि दहावा मुखवटा होता आपल्या साहित्यात उल्लेख न झालेल्या रसाचा - उदात्तरसाचा!!

आपलं ज्ञान दुसऱ्याला न देण्याची वृत्ती त्यांना भारतात बऱ्याच ठिकाणी दिसली. रंगभूषा करत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या पुढ्यात ते बसले की आपलं लक्ष नाही असं बघून या व्यक्ती त्यांचे 'सिक्रेट फॉर्मुले' वापरत असत, पण ते सांगत नसत. त्यानंतर त्यांनी मग १९९१-९२ साली आपल्या अनुभवांवर आधारित रंगभूषा हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं प्रकाशन पुलंच्या हस्ते झालं. पुलं म्हणतात, "हे पुस्तक वाचता वाचता मी प्रभाकरचा विद्यार्थी कधी झालो कळलं नाही." हे पुस्तक पुढे पुलंनी कुसुमाग्रजांना वाचायला दिलं. ते वाचून कुसुमाग्रजांनी कौतुकपर पत्र पाठवलंच, त्याशिवाय सोबत जेवणाचं निमंत्रणही दिलं. ज्या ज्या विद्यापीठात नाटक विभाग आहे, तेथे तेथे आता हे पुस्तक अभ्यासक्रमाला आहे.

रंगभूषेचा आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे कृत्रिम दाढी-मिश्या, विग!! पुणे-मुंबई प्रवास करत कृत्रिम दाढीमिश्या, विग कसे विणायचे ते शिकून तसे विग, दाढीमिश्या तयार केले. त्यातील पौराणिक नाटकांना लागणारं केशभूषा साहित्य आता शिलेदारांच्या नाटक कंपनीकडे असतं.

पुरुषोत्तमसाठी मेकअप करतानाचा अनुभव सांगताना ते म्हणतात, “स्क्रिप्ट त्यांच्याकडे तयार असतं. मेकअप करताना मुलांशी आधी संवाद साधतो, त्यातून कशा पद्धतीच्या मेकअपची गरज आहे त्याचा विचार करून मगच मेकअप सुरू होतो.” तब्बल ४६ वर्षं ही कला जोपासण्याची दखल घेऊन इफ्ताने एक डॉक्युमेंटरी केली. त्याच्या स्क्रीनिंगला भावेंचे काका आले होते. ‘मलये भिल्लपुरंध्री चंदनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते’ म्हणावं, तसं त्यांच्या काकांना भावेंच्या कामाबद्दल माहिती तर होती, पण ते काम इतकं मोठं आहे ते कदाचित जाणवलं नसावं. स्क्रीनिंगनंतर त्यांच्या काकांनी व्यासपीठावर चक्क साष्टांग नमस्कार घातला.

सगळ्या मुलाखतीत मला आवडलेलं एक वाक्य म्हणजे, "माणसाला कसलीतरी जाणीव व्हावी लागते. उजेडाची जाणीव झाली आणि विजेच्या दिव्यांचा शोध लागला, त्याप्रमाणे सौंदर्याची जाणीव झाली आणि प्रसाधनं उदयास आली."

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

20 Jan 2017 - 11:40 am | संदीप डांगे

वा! सुंदर ओळख!

पैसा's picture

20 Jan 2017 - 11:49 am | पैसा

ओळख आवडली

मार्मिक गोडसे's picture

20 Jan 2017 - 11:57 am | मार्मिक गोडसे

सुंदर ओळख!
लेखमालेतून 'उदात्तरसाचा' आस्वाद पुरेपूर मिळतोय.

सामान्य वाचक's picture

20 Jan 2017 - 11:58 am | सामान्य वाचक

त्या क्षेत्रामधले formal शिक्षण नसताना हे लोक इतके नैपुण्य मिळवतात याचे जाम आश्चर्य वाटते.
निव्वळ निरीक्षण आणि अनुभव याच्या जोरावर

सिरुसेरि's picture

20 Jan 2017 - 12:31 pm | सिरुसेरि

छान ओळख . सुंदर माहिती .

जबरदस्त ओळख. कसलेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नसतानादेखील इतके कौशल्य साधणाऱ्या प्रभाकर भावेंना अभिवादन!

पद्मावति's picture

20 Jan 2017 - 1:20 pm | पद्मावति

क्या बात है. सुंदर ओळख.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Jan 2017 - 1:39 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त.

यशोधरा's picture

20 Jan 2017 - 2:02 pm | यशोधरा

लेख आवडला.

"माणसाला कसलीतरी जाणीव व्हावी लागते. उजेडाची जाणीव झाली आणि विजेच्या दिव्यांचा शोध लागला, त्याप्रमाणे सौंदर्याची जाणीव झाली आणि प्रसाधनं उदयास आली."

:)

इशा१२३'s picture

20 Jan 2017 - 5:25 pm | इशा१२३

छान ओळख!

सतिश गावडे's picture

20 Jan 2017 - 9:19 pm | सतिश गावडे

मस्त ओळख करुन दिली आहे.

खेडूत's picture

20 Jan 2017 - 10:18 pm | खेडूत

छान!
परिचय आवडला.

संजय क्षीरसागर's picture

21 Jan 2017 - 12:04 am | संजय क्षीरसागर

धन्यवाद !

कलाकारांना त्यांच्या भूमिका साकारायला मदत करण्याचे मोठे काम श्री. भावे करत आहेत. त्यांची ओळख आवडली.

माझ्या काकांची आपण करून दिलेली ओळख खूप आवडली.

पिलीयन रायडर's picture

8 Jun 2018 - 6:24 pm | पिलीयन रायडर

तुमचे काका आहेत भावे सर? त्यांना नमस्कार सांगा! फारच डाऊन टू अर्थ माणूस आहे. त्यांच्या मिसेस सुद्धा खूप छान बोलल्या आमच्याशी!

स्रुजा's picture

8 Jun 2018 - 8:41 pm | स्रुजा

अरेच्या टर्मिनेटर चा हा प्रतिसाद मिसला होता मी. पिराला +११११११११

रंगीला रतन's picture

8 Jun 2018 - 10:21 pm | रंगीला रतन

धन्यवाद पिराजी.

मल देखिल फार छन अनुभव आला होता त्यांना भेटल्यावर.

टर्मीनेटर's picture

17 Jun 2018 - 10:52 am | टर्मीनेटर

हो, माझे चुलत काका आहेत ते.

आजपुन्हा वाचली ही मुलाखत -पुन्हा एकदा खुप आवडली. प्रतिसाद द्यायचा राहुन गेला होता. सूड ने उत्तम काम तर केलंच पण भावे काकां च्या पडद्यामागच्या कामा चं ही खुप कौतुक वाटलं .

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2018 - 2:36 am | पिवळा डांबिस

श्री. भावेंची ओळख आवडली.
पिराजी आणि सुडक्याजीन्ला एक-एक कडं इनाम!!

माझे काका ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे ह्यांचे दिर्घ आजाराने आज सकाळी ८:३० वजता पुण्यात निधन झाले. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

Nitin Palkar's picture

10 Jan 2023 - 7:56 pm | Nitin Palkar

आज प्रथमच हा लेख वाचला.
ईश्वर त्यांच्या आत्मीयस सद्गती देवो ही प्रार्थना.
_/\_

आज प्रथमच हा लेख वाचला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.
_/\_

Nitin Palkar's picture

10 Jan 2023 - 7:59 pm | Nitin Palkar

आज प्रथमच हा लेख वाचला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.
_/\_

श्वेता व्यास's picture

11 Jan 2023 - 12:27 pm | श्वेता व्यास

अरेरे, ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना.

बिपीन सुरेश सांगळे's picture

11 Jan 2023 - 11:33 pm | बिपीन सुरेश सांगळे

त्यांच्याशी बोलण्याचा योग काही आला नाही .
पण भरतमध्ये दोन तीन वेळा त्यांना प्रत्यक्ष काम करताना पाहायला मिळाले , हे माझे भाग्यच !

टर्मिनेटर - ते तुमचे काका होते , ऐकून छान वाटलं . पण हा प्रसंग दुःखद .
भावपूर्ण श्रद्धांजली !