"चिकन" माझं पाहिलं प्रेम. लहानपणा पासून मी ह्या प्राण्याच्या सॉरी पक्षाच्या प्रेमात इतका अखंड बुडालोय कि " किचन", "कि चैन" या सारख्या शब्दात सुद्दा मला चिकन हा शब्द दिसतो. लहानपणी एकदा दुकानदाराला किल्लीला आडकवायचं चिकन मागितलेलं आठवतंय. आपल्याला लोकांनी खावे म्हणून जन्मल्या नंतर फक्त ४० ते ४५ दिवसात स्वतःला खाण्यायोग्य बनवून असंख्या मानव जातीवर आणी डिमांड सप्लाय समतोल राखून असंख्या प्राण्यांवर जे उपकार चिकनने केलेत त्या उपकारांची परतफेड करायला शब्दही कमी पडतील.
तर असा हा सर्वरससंप्पन पक्षी, घरचाच पोल्ट्री फार्म असल्यामुळे काय कशाशी खावे हे कळायच्या आगोदर पासून माझ्या मुखात हा पक्षी भरवला गेला. गावाकडे शेतकऱ्याच्या शेतात वांगी आली आणी दुसरी कुठली भाजी नसली कि कसं घरात महिनाभर वांगीची भाजी आणी वांगीची आमटी असते तसं आमच्या घरात भाजीला काय नसलं की काप कोंबडी आणी खा असं चालायचं. लहानपणी गरीब बिचारा मी आठवडा आठवडा फक्त चिकन खाऊन काढलेत.
या सर्व प्रकारचा एक फायदा झाला तो म्हणजे पचन शक्ती कमालीची वाढली. पण आता मित्रानं बरोबर बसलो (चिकन खायला) की हा किती चिकन खातो म्हणून मित्र बदनाम तर करतातच वरून अफवा पण पसरवतात की " तो तर रस्त्यानी जाताना चिकन दिसलं तर पळत जाऊन पकडतो आणी कच्च खातो". दुसरी अफवा म्हणजे 'कंपनी याला चिकन आलौन्स म्हणून मंथली वेगळा भत्ता देते'.
तर असं हे चिकन आणी त्याच्या प्रेमात बदनाम झालेला मी.
आज पर्यंत चिकनचे बरेच प्रकार केले होते पण तंदुरी हा प्रकार उपकरणे नसल्यामुळे करू शकलो नव्हतो. त्यामुळे पहिला उपकरणे गोळा करण्याच्या कार्याची सुरवात केली.
पूर्व तयारी:-
बाजारात भेटणारे बारबेक्यू रॉड्स हलक्या प्रतीचे आसल्यामुळे स्वतः चिकन ट्रॉली सॉरी किचन ट्रॉली बाणवणर्या दुकानात जाऊन हवे त्या साईझचे बनवून घेतले.
आता ब्रॉयलर पक्षी घरच्या पोल्ट्री मध्ये नसल्यामुळे सकाळी जाऊन बाजारातून तीन कोंबड्या कट करून आणल्या. काप पण त्यालाच घालायला सांगितले. काप खूप डीप गेले.
आजून बाकीची खूप तयारी बाकी आसल्यामुळे तंदूरचा तयार मसाला वापरला. दही आणी आले लसूण पेस्ट घरची.
चिकन ला मीठ आणी लिंबू लावून १५ मिनिटे ठेवले. तो पर्यंत तंदूरचा तयार मसाला, लाल पावडर, दही आणी आले लसूण पेस्टचे मिश्रण एका भांडयात तयार करून घेतलं.
तयार पेस्ट चिकनला लावून चिकन सकाळी ११:३० ला फ्रीझ मध्ये ठेऊन दिलं.
प्रयत्न करू जमलं तर बारबेक्यू स्टॅन्ड घेवू असं ठरवले होत. बारबेक्यू स्टॅन्ड नसल्यमुळे कोळशे पेटवण्यासाठी विटांचा चौक दुपारीच तयार करून घेतला आणी संघ्याकाळ व्हायची वाट बघू लागलो.
आग लावणं ईतकं सोप्पं नसतं हे मला कोळसे पेटवताना समजलं. कागद आणी लाकडे घेऊन आग लावली आणि नंतर कोळसे टाकले. अर्धा तास हवा मारून झाल्यावर शेवटी कोळसे पेटले.
चिकन पीस बारबेक्यू रॉड ला लावून मस्त भाजून घेतले. मध्ये मध्ये लोणी लावल्यामुळे चिकन जळत नाही.
माझे हात स्वच्य नसल्यमुळे आणि घरातल्यानी फोटो कडेपर्यंत चिकन फस्त केल्यामुळे फायनल चिकन चे फोटो कडू शकलो नाही.
एकूण काय तर बरं झालं होते म्हणायचं....
टीप :- हा माझा अनुभव लिहला आहे. चिकन तंदुरी बनवण्या पूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या आणखी चांगलं बनवण्यसाठी आणखी काय करू शकतो मलाही सल्ला द्या.
प्रतिक्रिया
28 Nov 2016 - 6:01 pm | रेवती
बराच खटाटोप केला आहे असे दिसते.
चिकन ट्रॉलीवाल्याकडील बार्बेक्यू रॉडस आवडले. ;)
29 Nov 2016 - 11:11 am | पी. के.
हो, बऱ्याच कॅलरी बर्न झाल्या. नंतर चिकन खाऊन भरून काढल्या.
28 Nov 2016 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकृती भारी. फोटो आवडले. वीटकामाला तर पैकीच्या पैकी मार्क दिले.
चार पाच मित्र एकत्र येऊन असे खास उद्योग केले पाहिजेत.
आमच्या घरात भाजीला काय नसलं की काप कोंबडी आणी खा असं चालायचं.
लहानपणी गरीब बिचारा मी आठवडा आठवडा फक्त चिकन खाऊन काढलेत.
हहपुवा झाली.
-दिलीप बिरुटे
29 Nov 2016 - 11:13 am | पी. के.
चार पाच मित्र एकत्र येऊन असे खास उद्योग केले पाहिजेत.
तंदूर कट्टा करूया मग
28 Nov 2016 - 6:11 pm | पाटीलभाऊ
चांगली पाककृती.
"चिकन आलौन्स" आणि "लहानपणी गरीब बिचारा मी आठवडा आठवडा फक्त चिकन खाऊन काढलेत"
हे लय भारी... :D
28 Nov 2016 - 6:55 pm | नूतन सावंत
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात, इथे तर कोंबडी पण मेलीय म्हणजे स्वर्गच स्वर्ग.
एक सूचना :एका कोंबडीला एक चहाचा चमचा काश्मिरी लालमिर्ची पावडर इतर मसल्यासोबत वापरावी.लाल रंग न वापरता झकास रंग येतो.
29 Nov 2016 - 11:15 am | पी. के.
पुढच्या वेळी काश्मिरी लालमिर्ची पावडर नक्की वापरीन.
28 Nov 2016 - 9:25 pm | पिलीयन रायडर
चिकनला हातही नाही लावु शकत मी. पण हे उद्योग आवडले. लोणी वगैरे लावुन बार्बेक्यु म्हणजे फारच उच्च झालं असेल हे प्रकरण!
29 Nov 2016 - 12:23 pm | बोका-ए-आझम
काट्या - चमच्याने पण चिकन खाता येतं. :)
29 Nov 2016 - 12:23 pm | बोका-ए-आझम
काट्या - चमच्याने पण चिकन खाता येतं. :)
29 Nov 2016 - 8:56 pm | पिलीयन रायडर
हात"ही" नाही लावु शकत हो! आम्हाला ही काही वेळापुर्वी जिवंत.. चालती फिरती.. कुकुचक्कु करणारी कोंबडी होती हे विसरता येत नाही ना!
29 Nov 2016 - 8:29 am | एस
खंग्री!
29 Nov 2016 - 10:51 am | रायनची आई
तुमची रेसिपी झकास आहे..मी पण चिकन आणि मत्स्यप्रेमी आहे.नुसत्या कल्पनेने भूक लागली.
29 Nov 2016 - 11:16 am | इरसाल कार्टं
भूक लागली राव...
29 Nov 2016 - 11:16 am | संजय पाटिल
झकास!!!
29 Nov 2016 - 12:26 pm | बोका-ए-आझम
हा मित्रांच्याबरोबर खाण्याचा प्रकार आहे. पण मित्रांना पेशन्स पाहिजे. तसे मित्र कुठे मिळतील ब्रे?
29 Nov 2016 - 2:13 pm | दिपक.कुवेत
कधी येउ बोला....
29 Nov 2016 - 8:05 pm | बोका-ए-आझम
कधीही!
29 Nov 2016 - 2:12 pm | दिपक.कुवेत
पाकृ आवडलीच पण ती सांगायची पद्धत अधीक आवडली. फक्त तो टॉवेल वरचा फोटो टाळायला हवा होता....(रॉडसच्या खालचा).
29 Nov 2016 - 2:50 pm | पी. के.
हा हा हा, चांगलं निरिक्षण आहे तुमचं. हात कोरडे करून घेयला बरं असतं.
29 Nov 2016 - 8:59 pm | पिलीयन रायडर
झालं का?!! आता जाऊन पाहुन आले मी तो फोटो!! =))
ओ लेखकु, क्रॉप करा की ते!!
29 Nov 2016 - 9:08 pm | मोदक
:=))
29 Nov 2016 - 2:19 pm | पैसा
काय काय उपद्व्याप करता राव तुम्ही चिकनसाठी! सांगण्याची इश्टाईल मार फार आवडली!
29 Nov 2016 - 5:40 pm | अजया
चिकनमागची श्टोरी फार आवडली :)
29 Nov 2016 - 8:58 pm | मोदक
झक्कास.. विटांचा चौक करताना थोडा गॅप ठेवा मग कोळसे आणखी चांगले फुलतील.
9 Dec 2016 - 5:50 pm | gogglya
१. ब्रायनींग मी स्वतः हे करून बघितले आहे, आणी भन्नाट प्रतीचे तन्दूरी चिकन झाले. आजपर्यंत २० - ३० वेळा किमान १० ते कमाल २२ लेग पीस ईतक्या प्रमाणात तंदूरी केले आहे, पण ब्रायनींग केलेले चिकन खुपच लुसलुशीत झाले.
२. दही एका पातळ कापडामध्ये ठेवून त्यातील पाणी काढून टाकले तर मसाला खुपच मस्त घट्ट होतो, आणी चिकनला त्याचा लेप देणे सोपे जाते.
३. हार्ड्वेअर दुकानामधून लोखंडी जाळी चे २ तुकडे [ १ x २ फूट ] आणावे. वीटांचा १ थर, त्यावर १ जाळी. या जाळीवर कोळसे ठेवावे. कोळसे आणताना कांडी कोळसा आणावा. हा पेटल्यावर तडकत नाही आणी आकार सुबक असल्याने रचणे सोपे जाते. या जाळीवर वीटांचा दुसरा थर रचून कोळसे आधी पेटवून घ्यावेत. मग २ री जाळी वीटांवर ठेवून चिकनचे तुकडे त्यावर ठेवावेत. २ री जाळी नको असेल तर सळ्या वापरल्या तरी चालतील.