चिकन तंगडी फ्राय!! (सामान्यांची पाककृती?)

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in पाककृती
18 Nov 2016 - 8:38 am

आंतरजालावर कधी फसलेली पाककृती पहिलीयेत? नाही ना? त्या नेहमीच सेलिब्रिटींच्या आयुष्यासारख्या किंवा पेड न्यूज सारख्या छान-छान, चकचकीत, तोंडाला पाणी सुटवणाऱ्या आणि दिसायला आकर्षक दिसणाऱ्या असतात. पण ९०% टक्के सामान्यांच्या घरात असे पदार्थ खरेच बनतात? माझ्यासारख्या बॅचलर लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण आणि हृदय हेलावणारं ग्राउंड रिपोर्टींग या पोस्टमधे आहे.

माझ्या एरवी प्रभू रामचंद्री वागण्याच्या नाण्याची एक दुसरी अननोन बाजू आहे. ती थोडक्यात सांगायची झाली तर अगदी चायनीज वस्तूसारखी. "चले तो चाँदतक, नयतो शामतक". आणि जर का हा मिस्टर "शाम" अंगात घुसला तर आपल्या सगळ्या गोष्टी लिट्रली खाली येतात. आयमीन डोक्यातला मेंदू गुढग्यात येतो, हातातली शक्ती पायांत येते वैगरे वैगेरे. हि शक्तीची ठिकाणं बदलली कि मी पायाने टिव्ही लावतो, बाजूला करायच्या सगळ्या गोष्टी लाथेने उडवतो. फ्रिजचे, घराचे दरवाजे पदस्पर्शाने ऑटोमॅटिक बंद होतात. ड्रॉवरपर्यंत तंगडी पोहोचवण्याचा जिमन्यास्टिक याच कालावधीत जमतो आपल्याला.

आता तुम्हाला प्रश्न पडेल कि पाककृतीच्या पोस्टमधे हे स्वतःच्या तंगडी पुराणाचा काय संबंध? तर तो यासाठी कि मागच्या रविवारी असाच उपाशीपोटी असलेला माझ्यातला मिस्टर "शाम" ड्रॉवरला तंगडी लावत असतांना "तंगडी फ्राय" बनवायची आयडिया सुचली. घरात असलेला अव्हेलेबल कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्यातला लघुत्तम सामायिक विभाजक काढल्यानंतर "चिकन तंगडी फ्राय" आपल्याला जमणार नाही हे लक्षात आलं होत पण इथेच आमचं खानदान आडवं आलं. च्यामायला खोताला जमलं नाय असं कसं होईल. "सस्ती पाककृती बनानेका शौक तो हम भी नही रखते". झाली काशी तर झाली! तंगडी फ्राय बनवायचीच या निर्धाराने काढली फटफटी आणि भुर्रकन जाऊन एक अक्खी कोंबडी घेऊन आलो.

"Make the chicken happy, it will make you the same later" असं कुठेतरी वाचल्याचं आठवल म्हणून मग त्या गारठलेल्या चिकनला गरम पाण्यात बसवून ठेवलं. पंख छान भांड्याच्या कडेवर रेलून ठेवत तिला छान जाक्यूज़ी टबमधे बसवल्याचा फिल दिला. मात्र एव्हढे लाड करून सुद्धा स्वतःचा ताठपणा न सोडणाऱ्या कोंबडीला मग मायक्रोव्हेवमधे टाकायचा निर्णय घेतला. टाकली आत आणि हायपॉवरवर १० मिनिटासाठी नॉब फिरवला. डब्यातल्या शंकरपाळ्याचा तोंडात बकाणा भरत जास्तीच्या वाटीत घेऊन युट्यूबवर मोदींच भाषण लावून बसलो.

टिव्हीवर काळा पैसा बघता बघता अचानक काळं चिकन दिसलं, जोडीला जळाल्याचा वास, हाय रे दैवा!!
(आवांतर:- तसं आपलं घ्राणेंद्रिय एकदम स्ट्रॉंग आहे. ऑफिसला जायचे कपडे कितीवेळा रिपीट करायचे ते या दिव्यशक्तीवरच डिसाईड करतो पण नुकतीच सर्दी झाली होती त्यामुळे घोळ झाला) एनीवे मायक्रोव्हेवमधून वाफा येत होत्या. माझ्या मायक्रोव्हेवचा ५ मिनिटाच्या पुढल्या आकड्यांवर नॉब अडकून रहातो हे मोदींच्या नादात विसरून गेलो होतो. अख्खी कोंबडी करपून काळी झाली होती. आता या काळ्या कोंबडीचं काय करायचं हा काळ्या पैश्याचं काय करायचं या प्रश्नापेक्षा गहन प्रश्नाचा विचार करण्यात दोन मिनिटं गेली. सिचुयेशन सॅल्वेज तर करायला लागणार. कोणत्याही परिस्थितीत केलेला प्रयोग वाया जाऊ द्यायचा नाही, त्यातून पुढे वापरता येईल असा निष्कर्ष तरी काढायचा किंवा काही तरी उपयुक्त तरी करायचं, हे Thomas Alva Edison ने सांगितलेलं आपले मिपाकर "बहुगुणी" यांच्या पोस्टमधे वाचलं होतं. बेडकाचे पाय कापले तर त्याला "उडी मार" हे सांगितलेले ऐकायला येत नाही असा निष्कर्ष काढणारे सरदारजी शात्रज्ञ आमचे आदर्श असल्यामुळे आता या जळक्या कोंबडीच काहीना काही तरी बनवायचंच असा निर्धार केला.

मॅरीनेशनसाठीचा मसाला लावायच्या आधीच कोंबडी शिजलेली होती. मग सर्वप्रथम कोंबडीची जळालेली स्किन सोलून काढली. कोंबडी परत गोरी गोरी पान दिसायला लागली. मग एकीकडे कोरड्या फ्राईंग पॅनवर दोन-तीन चमचे तेल ओतून गरम करायला ठेवत दही+तंदुरी मसाला+आले-लसूणपेस्ट+हळद+लिंबाचा रस असा एकजीव केलेला मसाला कोंबडीला लावायला घेतला. परत धूरर्रर्रर्रर्र... मसाल्याचे हाथ धुवून इंडक्शन बंद करेपर्यंत पॅनमधल्या तेलाने पेट घेतला आणि अजून धूर होऊन काँडोमिनिअमचा फायर अलार्म वाजायला लागला. आता आली का पंचाईत?. कोंबडीच्या अंत्यसंस्काराला आता फायब्रिगेडची लोकं देखील येणार या विचाराने थिजून गेलो.

अपेक्षेप्रमाणे माळ्यावरचं सगळं पब्लिक बाहेर आलेलं, मीही आलो. साळसूदपणे इतरांकडे बघत कर्णकश अलार्म ऐकत उभा राहिलो. अलार्म वाजण्या व्यतिरिक्त काहीच हालचाल दिसत नव्हती. साधारण एक मिनिटाने अलार्म बंद झाला आणि जीव भांड्यात पडला. त्याच भांड्यात कोंबडी फ्राय करायची होती. म्हणून परत इंडक्शन चालू केलं. माझ्या इंडक्शन मशीनचं एक मोठ्ठं लफडं आहे. ऑन केला कि ती १८०० वॉटवर चालू होते आणि मग आपण ते कमी करायच. (कोणत्या च्युxx ने असं उलट प्रोग्रामिंग केलं काय माहित) एनीवे, पॅनवर परत तेलाचा स्प्रे मारून मसाला लावलेलली अख्खी कोंबडी दाबून धरली. जीवाच्या आकांताने कोंबडी पॅनच्या तळाला चिकटली. मग परत तिच्यावर जबरदस्ती करत उभी आडवी भाजून काढली. जवळपास १५ मिनिटे शक्तीचे प्रयोग आणि नूरा-कुस्ती झाल्यावर भादरलेली कोंबडी खाण्यायोग्य झाली.

सगळी मेहनत फळाला येईपर्यंत रात्रीचे साडे अकरा वाजले. खाण्यासाठी फक्त अर्धा तास उरला होता कारण सोमवार लवकरच लागणार होता मग मंगळवार, बुधवारी ऑफिस. लंचसाठी काळी कोंबडी म्हणजे इज्जतीचा फालुदा, म्हणजे नेक्स्ट अटेंम्प्ट बुधवारी रात्री??. पण मी यावर पळवाट शोधली. थायलंड तसाही दीडतास भारताच्या पुढे आहे म्हणजे भारतीय नियम पाळण्यासाठी दोन तासांचा अवधी माझ्याकडे होता. मस्तपैकी कांदा, टॉमेटो आणि काकडी कापून टेबल सजवला. ‘टाईम्स नाऊ’ वरील डिबेट लावून कोंबडीचा फरशा पाडायला बसलो. पहिला घास तोंडात घेतला.

चघळतोय चघळतोय, साला जबडा दुखायला लागला, आपण बाटाचा सोल खातोय कि काय असं वाटायला लागलं. श्याsss च्यायला मीठही घालायला विसरलो. मीठ वरून भुरभुरून देखील कधी अळणी तर कधी खारट असा चवीचा ग्राफ वरखाली व्हायला लागला. कोंबडी थोडावेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेउयात का? असा सुलेमानी विचार देखील येऊन गेला. पण नको!! केल्या आयडिया तेव्हढ्या बस झाल्या. उत्साहाची जागा वैतागाने घेतली होती.

बरोब्बर बाराचा ठोका वाजला आणि माझ्यातला प्रभू रामचंद्र जागा झाला जोडीला "खोत" देखील. 'खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी', 'अळणी चीजे खानेका शौक तो हम भी नही रखते' असं म्हणत अक्खी कोंबडी कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि स्टँडबाय ठेवलेलं एक अंड कांदा, टॉमेटो आणि काकडीबरोबर खाऊन पाककृतीची खाज मिटवली.

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

18 Nov 2016 - 8:39 am | बाजीप्रभू

ऋषिकेश दाभोळकर, पिलीयन रायडर आणि बहुगुणी या मिपाकरांच्या पाककृतींच्या पोस्टचा माझ्या पोस्टवर प्रभाव दिसेल. त्यांच्या पोस्टमधील काही आवडलेली वाक्ये मी जशीच्या तशी वापरली आहेत. मात्र एकुणात सत्य घटना आहे हि.

पिलीयन रायडर's picture

18 Nov 2016 - 7:51 pm | पिलीयन रायडर

नाय हो नाय!! हे जे काय आहे ते एकदम वरिजनल आहे! पॅनमधल्या तेलाने पेट घेऊन मग अलार्म वाजल्यावर बाहेर जाऊन साळसुदपणे गर्दीत उभं रहाणं... एकदम वरिजनल!! =)))

जीवाच्या आकांताने गोष्टी पॅनला चिकटतात तेव्हा काय वाटतं हे मी समजु शकते. तेव्हा करपलेल्या सुगरणपणाच्या स्वप्नांसाठी दोन मिनिटं मौन पाळुया!

पण पाकृ जमली नाही तरी तिचे फक्कड लेख होतात की नाई! सो वेलकम टु दी क्लब सिंघम!

बाकी सर्वात महत्वाचं - फटु दिसत नाईत!

पियुशा's picture

18 Nov 2016 - 10:57 am | पियुशा

जबरी लिवलय तुम्ही , असे फसलेले लोकच पुढे शिकलेले दिसतात :)
मी पण अशे (फसलेले) लै प्रकार केलेत ;)

बाजीप्रभू's picture

20 Nov 2016 - 8:52 am | बाजीप्रभू

धन्यवाद पियुशा!!

येक राहील फोटु दिसत नाय मला :(

बाजीप्रभू's picture

18 Nov 2016 - 11:10 am | बाजीप्रभू

बाजीप्रभू's picture

18 Nov 2016 - 11:18 am | बाजीप्रभू

बाजीप्रभू's picture

18 Nov 2016 - 11:19 am | बाजीप्रभू

नि३सोलपुरकर's picture

18 Nov 2016 - 11:25 am | नि३सोलपुरकर

खोतानु ,जाम लिवलंय .
एकदम मस्त .

अनन्त अवधुत's picture

18 Nov 2016 - 11:33 am | अनन्त अवधुत

सगळ्या चुकलेल्या रेसिपी आठवल्या.

अनन्त अवधुत's picture

18 Nov 2016 - 11:33 am | अनन्त अवधुत

सगळ्या चुकलेल्या रेसिपी आठवल्या.

संजय पाटिल's picture

18 Nov 2016 - 12:20 pm | संजय पाटिल

हसुन हसुन लोळलो..

संजय पाटिल's picture

18 Nov 2016 - 12:21 pm | संजय पाटिल

पण फोटु दिसंनात..

बाजीप्रभू's picture

18 Nov 2016 - 12:37 pm | बाजीप्रभू

बाजीप्रभू's picture

18 Nov 2016 - 12:38 pm | बाजीप्रभू

मला तर इथे सगळे फोटो दिसताहेत... पब्लिक शेअरही केलेले आहेत..

संजय पाटिल's picture

18 Nov 2016 - 1:05 pm | संजय पाटिल

आता दिसायलेत..

जरा सरकून बसा बाकड्यावर.

- (हमखास पाककृती फसते मंडळ सदस्य) एस.

पाटीलभाऊ's picture

18 Nov 2016 - 2:01 pm | पाटीलभाऊ

जबरा लिहिलंय. मलाही माझ्या फसलेल्या पाक कृती क्षणार्धात समोर दिसल्या.
बादवे...तो पहिला फोटो भारी. असं वाटतंय कि आताच कोंबडीनं अंड दिलंय कि काय :P

पी. के.'s picture

18 Nov 2016 - 2:13 pm | पी. के.

जबरा लिवलंय. एकदम मस्त.

साहेब..'s picture

18 Nov 2016 - 2:59 pm | साहेब..

जबरा लिहिलंय

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2016 - 7:45 pm | स्वाती दिनेश

छान लिहिले आहेत,
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 1:12 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

केडी's picture

21 Nov 2016 - 11:21 am | केडी

मज्जा आली वाचून....प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.... :-))...त्यामुळे श्वास घेणे सुरु ठेवा.. ...:):)

गणपा's picture

13 Mar 2017 - 12:28 pm | गणपा

हा हा हा मस्त खुसखुशीत लिहिलयय भावा.
लगे रहो.
देव करो तुझ्या पाकृ आधुन मधुन आश्याच बिघडत रहोत. तेवढीच आम्हाल मेजवानी. ;)

नूतन सावंत's picture

13 Mar 2017 - 1:41 pm | नूतन सावंत

कुठे लपली होती हि कोंबडी?आय मीन ,लेख,मस्तच. स्वर्गीय बाजीप्रभूंनी खिंड लढवली नसेल इतक्या हिरीरीने तुम्ही कोंबडीशी लढाई केली आहेत.

मनिमौ's picture

14 Mar 2017 - 6:19 pm | मनिमौ

आणली तुमच्या कोंबडी आख्यानान.
कोंबडी पळाली
तंगडी धरून या सुप्रसिद्ध भक्तीगीताची आठवण झाली