अल्काझार, फ्लेमिन्को आणि बरेच काही...

पद्मावति's picture
पद्मावति in भटकंती
15 Nov 2016 - 9:37 pm

.inwrap
{
background-color: #DFEDF8
}

1
(माझी मुलगी इशा मागच्या महिन्यात शाळेच्या सहलीसाठी दक्षिण स्पेनच्या आंड्यूल्यूशिया भागात गेली होती. त्या सहलीचे तिने केलेले वर्णन, तिचे अनुभव आणि तिनेच काढलेले फोटो.... शब्द फक्त माझे.....)

अल्काझार, फ्लेमिन्को आणि बरेच काही...

ज्या सहलीची आम्ही मुली मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होतो तो दिवस जसजसा जवळ येत होता तसतसा आमचा उत्साह आणि आमच्या आयांचे टेन्शन दोन्हीही गोष्टी उतू जाऊ लागल्या होत्या. खरंतर ही माझी बाहेर राहण्याची काही पाहिलीच वेळ नव्हती. पण यावेळेस दुसऱ्या देशात पहिल्यांदाच मी अशी एकटी जाणार असल्यामुळे जरा आई बाबांना काळजी वाटत असावी.

आमच्या शाळेत स्पॅनिश शिकणाऱ्या मुलींना त्या आठवीत गेल्या की त्यांना स्पेनला सहलीला घेऊन जाण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर जर्मन शिकणाऱ्या मुलींना जर्मनीत तर फ्रेंच भाषा घेणाऱ्या मुलींना फ्रान्स मधे. स्थानिक लोकांमधे चार पाच दिवस का होईना राहून त्या भाषेचे, संस्कृतीचे बारकावे समजून घेणे हा या सहलींमागचा उद्देश असतो. याच उद्देशाने आमची राहण्याची व्यवस्था पण स्थानिक घरांमधून केलेली होती. मुलींना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, फूड ऍलर्जी, घरात पाळीव प्राणी असलेले चालतील का नाही अशा मुद्द्यांवरून दोन किंवा तीनच्या समूहात विभागले होते. उदाहरणार्थ, दूध, नट्सची ऍलर्जी असलेले, माझ्यासारखे शाकाहारी पण चिकन खायची हरकत नसलेले आणि पाळीव प्राण्यांची आवड असलेले किंवा मग घरात कुत्री मांजर ज्यांना अजिबात चालणार नाही असे लोक...अशा प्रकारचे वेगवेगळे ग्रुप्स बनविले होते. घरातल्या लोकांना आमची सोय करणे आणि आमच्यासाठी स्वयंपाक करणे सोपे जावे हा हेतू. ही घरे एकमेकांच्या अगदी जवळ जवळच होती.

शुक्रवार १४ अक्टोबरला सकाळी पाच वाजता सगळे शाळेत जमले. तेथून आम्हाला बसमधे बसवून विमानतळावर नेण्यात आले. स्थानिक वेळेनुसार ११ वाजता आम्ही स्पेनच्या मालागा या गावी येऊन पोहोचलो.

beach

स्पेनच्या दक्षिणेला मालागा हे अतिशय प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश, सुंदर निळा समुद्र, चविष्ट सीफूड आणि जवळपास वर्षभर असलेले आल्हाददायक हवामान असल्यामुळे साहजिकच हा भाग अतिशय लोकप्रिय आहे.

विमान तळावरून आम्ही थेट बीचला येऊन पोहोचलो. सुंदर, स्वच्छ आणि अजिबात गजबज नसलेला हा बीच. पाण्यात जायला मात्र टीचरने आम्हाला मनाई केली होती. पण बीचवर फिरायला, खेळायला आणि आजूबाजूला कुठेही कॉफीशॉप्स मधे जायला पूर्ण परवानगी होती. तिथे एक मस्तं प्लेग्राउंड होतं तिथे आधी मनसोक्त खेळलो. मग एका कॅफे मधे जाऊन सँडविच वगैरे खाल्लं.

beach1

समुद्र किनाऱ्यावरून निघायची आमची कोणाचीही इच्छा नव्हती पण पुढे थोडाफार प्रवास अजून राहिला होता त्यामुळे मुकाट्याने मग बस मधे जाऊन बसलो. वाटेत जाताना आम्ही एका पॉटरी मधे थांबलो. तिथे पॉटरीच्या मालकांनी फिरत्या चाकावर पॉटरी कशी घडवतात त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. मग आम्ही मुलींनी सुद्धा प्रयत्न करून बघितला. दुसऱ्यांना मातीची भांडी बनवताना पाहून इतकी सोपी वाटणारी ही कला स्वतः: करून बघितल्यावर किती कठीण आहे ते आमच्या लक्षात आले.

pottery

तेथून निघून सुमारे दोन तासाच्या अंतरावर कॉर्डोबा म्हणून गाव आहे. याच गावात पुढचे चार दिवस आमचे वास्तव्य होते. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही कॉर्डोबाला येऊन पोहोचलो. बस स्टेशन वरुन आम्हाला घ्यायला आले होते मिस मारटिनेज़ आणि तिचे सूपरक्यूट कुत्र्याचे पिल्लू.....लोला :)

दुसऱ्या दिवशी कॉर्डोबा शहरात आमची भटकंती सुरू झाली. कॉर्डोबा हे स्पेनच्या दक्षिण भागातले महत्त्वाचे पर्यटन केन्द्र आहे. इतिहास, संस्कृती, स्थापत्य शास्त्र आणि कलेचे माहेरघर ज्याला म्हणावे असे हे शहर. सातव्या-आठव्या शतकात उत्तर आफ्रिकेतून आलेल्या इस्लामिक वंशाच्या राजांनी इथे राज्य केले मग साधारणपणे १३व्या शतकापासून ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी या इस्लामिक वंशाच्या राजांचा पराभव करून स्वत:चे राज्य प्रस्थापित केले. कॉर्डोबा आणि आजूबाजूचा प्रदेश आंड्यूल्यूशिया म्हणून ओळखल्या जातो.

a

हा आहे रोमन ब्रिज. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात बांधलेला हा पूल शहर आणि कलोहरा टॉवरला एकत्र जोडतो. खाली वाहणारी ही आंड्यूल्यूशियाची जीवन सरिता Guadalquivir नदी.

bridge

कलोहरा टॉवर

tower

कॉर्डोबाचे सगळ्यात प्रमुख आकर्षण आहे ती इथली ग्रँड मॉस्क / कॅथेड्रल ऑफ कॉर्डोबा. मूळ एका लहानशा रोमन मंदिराच्या जागी ख्रिस्ती राजवटीत कॅथेड्रल निर्माण करण्यात आले. मग आठव्या शतकातल्या इस्लामी राजवटीत त्याचे रूपांतर मशीदीत करण्यात आले. तेराव्या शतकानंतर आलेल्या ख्रिस्ती राजवटीमध्ये या मशीदीमध्ये कॅथेड्रल बांधण्यात आले. असा या ग्रँड मॉस्कचा प्रवास आहे. या मशीदीत रोमन, ख्रिस्ती, इस्लामी स्थापत्यशास्त्राचा उत्तम मिलाफ बघायला मिळतो. मशीदीच्या मधोमध चर्चचे आल्टर आहे आणि मीनारांचे रूपांतर बेल टॉवर मधे करण्यात आले आहे.
इथले वैशिष्ट्य असलेल्या या कमानी आणि त्यावरची रंगसंगती सूर्यप्रकाशात अत्यंत सुरेख दिसतात.

cat

cat2

cat3

दुसरे आकर्षण म्हणजे इथले अल्कझार!! तेराव्या शतकात किंग अल्फांसोने हा राजवाडा बांधला. मौल्यवान वस्तू, सुंदर बगिचे, तलाव, कारंजे, संगमरवरी पुतळे तसेच भव्य स्नानगृहे या राजवाड्याची शोभा वाढवतात…

alec1

alec2

तिसऱ्या दिवशी सकाळी घरी ब्रेकफास्ट करून आम्ही बस स्टेशनला गेलो. आज आम्हाला कॉर्डोबापासून एका तासावर असलेल्या सेवीला ( स्पॅनिश मधे सेविया) या गावी जायचे होते.
सेविया हे आंड्युलिशियाचे प्रमुख, राजधानीचे शहर. अतिशय देखणे असलेले हे शहर Guadalquivir नदीवर वसले आहे. स्पेनच्या इतिहासातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवाचे हे मानचिन्ह! या देशाचे एकेकाळचे सत्ताकेंद्र!!
आजही गतवैभवाच्या खाणाखुणा सेवियामधे अतिशय अभिमानाने जतन केल्या आहेत.

येथील रॉयल अल्कझार फार भव्य आणि अप्रतिम आहे. आजही या अल्कझारचा काही भाग राजघराण्याच्या सेवियामधील वास्तव्याकरिता राखीव ठेवला आहे.

alec3

मागच्या वर्षी आई बाबांबरोबर मी सेवियाला आले होते पण त्यावेळी नेमके हा अल्कझार पाहणे राहून गेले होते. ते आज पाहायला मिळत होते. स्थापत्यशास्त्र कलेचा एक अजोड नमुना म्हणून हा राजवाडा ओळखल्या जातो. याचा बगिचा तर फारच सुरेख आहे. दिवसभर राह्यलो तरी दिवस अपुरा वाटेल इतका सुंदर परिसर आहे हा..

alec4

स्पेन म्हणताच बुलफाइट डोळ्यासमोर येतेच. सेविया बुलफाइटसाठी नावाजले जाते. येथील प्लाज़ा दे टोरोस हे बारा हजार प्रेक्षक क्षमतेचे मैदान बुलफाइट्ससाठी अतिशय महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाते.

bull1

ground

सेवियामधला आमचा हा दिवस बराच दगदगीचा गेला होता. पुन्हा घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते. एव्हाना लोलाशी आमची खूप मैत्री झाली. रोज सकाळी आमच्या खोलीत येऊन ती आम्हाला उठवायची, ब्रेकफास्ट करताना सुद्धा आमच्या मागे मागेच. पुन्हा संध्याकाळी बस स्टॉपवर सोडायला आणि येताना आम्हाला उतरवून घ्यायलासुद्धा लोला बाई हजर!!!

दिवस ४- आज सकाळी आम्हाला एका शाळेत नेण्यात आले. तिथे आम्हाला स्पॅनिश संभाषणाचा सराव देण्यात आला. कारण आज दिवसभर शॉपिंग, लंच आणि शहरात फिरणे हे सर्व आम्ही बऱ्यापैकी स्वतंत्रपणे करणार होतो. अर्थातच पाच पाच मुलींच्या ग्रुप मधे. एकटे फिरण्यास सक्त मनाई होती.
खरेदी करताना सकाळी झालेल्या जुजबी स्पॅनिशच्या सरावाचा आम्हाला थोडाफार फायदा होत होता. दुपारभर मस्तं फिरणे, बजेट आणि बॅग मधे मावेल इतपत खरेदी त्याचबरोबर मनसोक्त खादाडी यामधे कसा अर्धा दिवस गेला ते कळलेही नाही. स्पॅनिश खासियत असलेले गरम गरम चुरोस चॉकलेट सॉस मधे बुडवून खाणे...आहाहा….

स्पेन आणि खास करून आंड्यूल्यूशिया हा भाग इथल्या उत्तम ऑलिव्सच्या उत्पादनासाठी ओळखल्या जातो. कॉर्डोबाच्या आजूबाजूच्या परिसरात बरेच ऑलिवचे फार्म आणि तेल काढण्याचे कारखाने आहेत. अशाच एका शेतीवर आम्हाला दुपारी नेण्यात आले. तिथे आम्हाला ऑलिव्सचे मळे, तेल काढण्याची प्रक्रिया याविषयी माहिती देण्यात आली. मग ऑलिव तेलाचे टेस्टिंग!! एका टेबल वर विविध प्रकारचे ऑलिव तेल मांडून ठेवलेले होते बरोबर ब्रेड्स. नेहमीचे दुकानातले तेल आणि शेतीवरचे हे ताजे तेल यांच्या चवीत मला खूप फरक जाणवला. हे तेल फारच चविष्ट होते.

ऑलिव्स मळा

olives

स्पेनची सहल फ्लेमिन्कोच्या नृत्याशिवाय कशी पूर्ण होणार??? स्पॅनिश लोकांचा अतिशय लाडका आणि खास नृत्य प्रकार म्हणजे फ्लेमिन्को. लांब लाल-काळे ड्रेसेस घातलेल्या स्त्रिया, टाळ्यांचा ठेका, टॅप शूजचा तालबद्ध खडखडाट, हाताच्या मुद्रा, खणखणीत आवाज आणि अगदी कमीत कमी वाद्यांचा योजक उपयोग या सगळ्याचा सुंदर परिपाक म्हणजे फ्लेमिन्को नृत्य.
आम्हाला फ्लेमिन्को नृत्य शिकवायला दोन शिक्षिका आल्या होत्या. त्यांनी नृत्याच्या अगदी बेसिक साध्या स्टेप्स आणि मुद्रा आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न केला. आता एक दीड तासात त्या बिचाऱ्या काय शिकवणार आणि आम्हीतरी काय शिकणार....पण मजा आली. खूप मस्तं अनुभव होता. मला त्या शिक्षिका कौतुकाने ' मोए बीएन' असे म्हणत होत्या त्यामुळे मी तर फारच खूश होते....मग कळले की त्या सगळ्यांनाच मोए बीएन म्हणत होत्या :))

आमचे शिकणे झाल्यानंतर त्यांचा फ्लेमिन्को नृत्याचा शो बघितला….

dance1

show

या देशातले हे चार दिवस कसे संपले ते काही कळलेच नाही. इथले हसतमुख लोक, सुरेख टुमदार गावे, राजवाडे...बरोबर मैत्रिणी...धमाल आली. अतिशय वेगळा छान अनुभव, खूप सारे फोटो आणि असंख्य आठवणी घेऊन आम्ही परतीच्या विमानात बसलो....... adios espana……..
.
.
-------------------------------------------
.
(बालदिनाच्या निमित्ताने अनाहितामध्ये पूर्वप्रकाशित)
.
.
1

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

16 Nov 2016 - 6:22 am | संजय पाटिल

अरे वा! मस्त सुंदर वर्णन
आणि तितकेच सुंदर फोटो!

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2016 - 7:46 am | कैलासवासी सोन्याबापु

ताई कन्येची निरीक्षणशक्ती अफाट आहे. अन माहिती अपडेटेड ठेवायचा कटाक्षही जाणवून येतो. उत्तम लेख अन ओळख.

बोका-ए-आझम's picture

16 Nov 2016 - 8:13 am | बोका-ए-आझम

शब्दांकन छान केलं आहे. कुठेही आईने लिहिलेला लेख वाटत नाहीये!

यशोधरा's picture

16 Nov 2016 - 8:33 am | यशोधरा

लेख आवडला.

प्रचेतस's picture

16 Nov 2016 - 8:44 am | प्रचेतस

छान लिहिलंय.

महासंग्राम's picture

16 Nov 2016 - 8:50 am | महासंग्राम

सहजसुंदर लिहिलंय ...

प्रीत-मोहर's picture

16 Nov 2016 - 10:53 am | प्रीत-मोहर

इशाच्या आई, तिला पुढल्या सफरीत छान क्यामेरा द्या हो ;)

खूप छान वर्णन केलय इशाने, फोटोज ही सुंदर!!!

प्रीत-मोहर's picture

16 Nov 2016 - 10:54 am | प्रीत-मोहर

म्हणजे मोबाईल क्यामेर्‍यानेही सुरेख फोटोज काढलेत अस म्हणायचे आहे

सस्नेह's picture

16 Nov 2016 - 10:58 am | सस्नेह

छान लिहिलंय. फोटोपण सुरेख !
छोटीचे कौतुक करावे तितके थोडेच :)

वा वा सहज सुंदर लेख खुप आवडला :)

बरखा's picture

16 Nov 2016 - 12:24 pm | बरखा

वा ! मस्त लिहलय. फोटो पन खुप छान आहेत.

पाटीलभाऊ's picture

16 Nov 2016 - 12:58 pm | पाटीलभाऊ

फोटो आणि वर्णन...दोन्ही सुंदर.

लेख आवडला!इशाला शाब्बासकी!

पिशी अबोली's picture

16 Nov 2016 - 1:17 pm | पिशी अबोली

फारच मस्त वर्णन. अँडल्यूशिया कसलं परीकथेतलं नाव वाटतं! छान टिपलंय सगळं भाचीने आमच्या..

लेक आईचा छान लिहिण्याचा वारसा सुरु ठेवणार हे फोटो आणि वर्णनातून सिध्द होतंय!

नूतन सावंत's picture

16 Nov 2016 - 7:48 pm | नूतन सावंत

स्पेनची सुरेख सफर इशाकृपेने! हे अल्काझार आणि थायलंडच्या अल्काझार शो यांच्यात काही संबंध आहे का?

पिलीयन रायडर's picture

16 Nov 2016 - 7:52 pm | पिलीयन रायडर

मस्तच लिहीते ग लेक!!!

स्वाती दिनेश's picture

16 Nov 2016 - 10:48 pm | स्वाती दिनेश

इशाचे खूप कौतुक ह्या सुंदर प्र व साठी..
फोटोही छान..
स्वाती

खटपट्या's picture

16 Nov 2016 - 10:53 pm | खटपट्या

खूप छान फोटो आणि वर्णन.
एक्सलांटे

इशाचं खूप कौतुक.. निरीक्षण भारीच आहे, आणि फोटोही छान काढलेत. शिवाय, प्रत्येक जागेचं वैशिष्ट्य थोडक्यात पण माहितीपूर्ण दिलंय.

अभिजीत अवलिया's picture

17 Nov 2016 - 12:55 am | अभिजीत अवलिया

आवडले.

नाखु's picture

17 Nov 2016 - 9:35 am | नाखु

लिहिले आहे आणि कन्येचे अभिनंदन..

सविता००१'s picture

19 Nov 2016 - 5:07 pm | सविता००१

मस्त लिहिलय. फोटो तर झकास