मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
आनन्दाचे ओझे की ओझ्याचा आनन्द ?
आपण काय ओझ्याचे बैल.कामाचे ,जबाबदा-यांचे, विचारांचे ओझे वहात असतो. ब-याचदा उत्तम मिळकत असली तरी कामाचे ओझेच इतके असते की त्याखाली आपण पिचुन जातोय की काय असे वाटते. अंगावरचे ओझे झिडकारुन टाकता येते. मानसीक ओझे झिडकरता येतेच असे नाही. चिडचिड होते. कामाच्या ताणाचे रुपांतर ऎसीडीटी/ रक्त दाब या व्याधींमध्ये होते.
ओझे केवळ कामाचेच असते असे नाही. तसेच हे मानसीक ओझे केवळ मोठ्या माणसानाच/त्यातही कामकरणारांनाच असते अशी आपली समजूत असते.
आपले संस्कार शिक्षण समाज नातेवाईक इतिहास धर्म पालकांच्या मित्रांच्या शिक्षकांचा अपेक्षा या सगळ्याचे आपण ओझे वहात असतो. आणि त्या ओझ्याखाली आपली प्रगती सुद्धा मार खात असतो.
वाक्य वाचुन दचकायला होईल पण जरा विचार करुयात एखाद्या शहरात एक रस्ता रुंद करायचा आहे. मोठा रस्त्यामुळे मालवहातुक वगैरे कितीतरी सुरळीत होते
पण तो करण्यात किती अडचणी येतात? लोकानी जागा कोर्टाच्या खुशीखातार रीकाम्या करुन दिल्या तरीसुद्धा त्यात मध्येच एखादे देऊळ येते. खरे तरे ते देऊळ थोडे इकडे तिकडे हलवल्यामुळे काहीच फ़रक पडणार नसतो पण देऊळ हलवणे या विषयावरुन मोठा खल होतो, त्याचे राजकीय भांडवल होते मूळ प्रश्न बाजूला रहातो आणि उगाच बंद हरताळ जातीय तेढ वगैरे वाढीस लागतात.रस्ता होता तेवढाच रहातो.आणि दोन्ही बाजूने रुंद पण ठरावीक ठिकाणे चिंचोळा असलेला रस्ता हमेशा ट्रॆफ़ीक जाम चे उदाहरण बनतो. असेच एखादे ट्रॆफ़ीक जाम आपल्या विचारांमध्ये सुद्धा तयार होते. त्याचा त्रास होत रहातो.
एक साधी गोष्ट घेउया बारावीत एखाद्या मुलाने ईजीनीयरींग किंवा मेडीकल पेक्षा थोडा निराळा विचार केला.जास्त मार्क असून सुद्धा तो बीएससी करुया म्हंटला. तरी ब-याच पालकांना ते सहन होत नाही. आपल्याकडे मूलभूत संशोधन फ़ार कमी होते याचे कारण कदाचित आपल्या समाजाच्या या विचरसरणीत आहे.
दहावीत उत्तम मार्क्स मिळवलेल्या मुलाने आर्ट्स चे शिक्षण घेणे त्याला शक्य होत नाही. कारण पालक विचार करतात की आर्ट्स घेउन काय होणार त्यापेक्षा इंजीनीयरींग केले तर नोकरी लगेच मिळुन जाईल.
"पढोगे लिखोगे ;बनोगे नवाब...हसोगे खेलोगे; बनोगे खराब" या पठडीत वाढलेल्या बहुतेकांची हीच रड असते. खेळात उत्तम गती असणारे कित्येकजण या दहावी बारावीच्या चक्रात अडकून खेळ सोडुन देतात. गाणे/ चित्रकला शिकणारे दोन तीन वर्ष (आणि बहुतेक कायमची) साधना बंद करतात. स्वत:ची कला हरवुन बसतात.
जे काय डॊक्टर इंजीनीयर व्हायचे ते होतात आणि नोकरी वगैरे करु लागतात. चांगल्या पगाराच्या मोहात नोक-या बदलात. मूळ स्वभावाला रुचणार नाहीत अशी कामे करतात.
काही वर्षानन्तर थोडे आर्थीक स्थैर्य आल्यानन्तर काहीतरी चुकले आहे अशी मनात टोचणी वाटू लागते. कारण नसताना डीप्रेशन येणे उदास वाटणे असे होऊ लागते. कोणी उत्तम गाणारा पाहिल्यावर अरे आपणही चांगले गात होतो पण आता फ़क्त कानसेन म्हणून उरलोय याची खंत वाटायला लागते. मनातल्या मनात म्हणतही असतो पण गाणे सोडले नसते तर...हा विचार ट्रॆफ़ीकजाम करायला लागतो
हल्ली थोडे वातावरण बदललेय तेही मोठ्या शहरात. पण अजूनही छोट्या शहरात मुलगा क्रिकेट खेळतो हे आजही पालक अभिमानाने सांगु शकत नाहीत. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाची ही गत. कबड्डी खोखो वगैरेबद्दल विचारायलाच नको.
एशीयाड ऒलिम्पीक एशीयन गेम्स सारखा एखादी खेळाची जत्रा होते आपण त्यात इतर देशांच्या क्रीडापटूना मेडल्स मिळवताना बघतो आणि टाळ्या वाजवतो . त्यानन्तर भारत खेळात मागे का? अशी पत्रे लिहुन वर्तमानपत्रात छापुन आणतो. तावातावाने एकमेकांत वाद घालतो.आपणा आपली सामाजीक विचारसरणी बदलायला तयार नसतो. खरेतर भारतात इतर काही देशांपेक्षा खूप चांगल्या सुवीधा उपलब्ध आहेत. पण दहावी बारावी चा बागुलबुवा पालकांच्याच नव्हे तर शाळाकॊलेजातही केला जातोच आणि ऐन जोषातली वर्षे वाया घालवली जातात.
प्रत्येक व्यक्तीच्या मनाची काही जडणघडण असते त्यानुसार ती वागत असते. तो त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. त्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध वर्तन झाले की मग डीप्रेशन येते मानसीक ताण येतात. त्यामुळे आपण कामातला आनन्द हरवुन बसतो.
ओशो रजनीशांच्या मतानुसार माणसांच्या स्वभावाचे चातुर्वर्णा सारखेच चार प्रकार आहेत. त्याला त्यानी क्षत्रिय ब्राम्हण वैश्य शूद्र असे म्हंटले आहे यात उच्च नीच असे काहीही नाही.हे चारही स्वभाव प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात प्रभावी असतात
प्रत्येक व्यक्तीचा एक मुख्य प्रभाव स्वभाव असतो आणि इतर स्वभाव गौण असतात.
ब्राम्हण स्वभाव नव्या द्न्यानाबद्दल आवड दर्शवतो उदा शिक्षक प्राध्यापक
क्षत्रीय स्वभाव हा नेतृत्व / पुढाकार घेणे दर्शवतो उदा प्राचार्य /नेते/
वैश्य स्वभाव हा अर्थ/पैसा मिळवणे समारंभात चमकण्याची आवड असणे हे दर्शवतो उदा अभिनेते,
शूद्र स्वभाव हा सेवा करण्याची आवड दर्शवतो. उदा डोक्टर , इंजीनीयर, मेकॆनीक,
माणसाचा स्वभाव हा या सर्व स्वभाव ( प्रवृत्ती) नी बनलेलाअसतो यातेक प्रभावी आणि इतर कमीअधीक प्रमाणात गौण असतात.
आपण जर आपला स्वभाव ओळखुन त्यानुसार व्यवसाय निवडला तर यश मिळण्याची शक्यता जास्त असते कारण आपण आपल्या प्रवृत्तीनुसार वागत असतो.
थोडे अधीक स्पष्ट करुन सांगतो.काही यशस्वी व्यक्तींची उदाहाणे घेउयात
उदा : मदर तेरेसा : प्रभावी स्वभाव शूद्र गौण स्वभाव क्षत्रीय
मदर तेरेसाना लोकांची सेवा करण्यात आनन्द मिळायचा. त्याच बरोबर त्याने ब-याच सामाजीक संस्था स्थापन केल्या.
महात्मा गांधी : प्रभावी स्वभाव क्षत्रीय गौण स्वभाव शूद्र
गांधीजी भारताचे प्रभावी आणि फ़ार डॊमिनेटिंग नेते होते त्यानी बॆ जीना सारख्या नेत्यालाही गौण केले . गौण शूद्र स्वभावामुळे त्यांची सेवाभावा कडे ओढ होती
अमिताभ बच्चन : मूळ स्वभाव वैश्य गौण स्वभाव ब्राम्हण
चित्रपटात चमकला, पैसा मिळवण्याच्या संधी शोधल्या.गौण स्वभावही क्षत्रीय नसल्यामुळे स्वंत:च्या संस्थामधील कर्मचा-यानाही कन्ट्रोल करु शकला नाही
डॊ. लागु. प्रभावी स्वभाव वैश्य गौण स्वभाव क्षत्रीय
नसलेल्या शूद्र स्वभावामुळे रुग्ण सेवेपेक्षा डोक्टरकीची प्रॆक्टीस सोडुन नाटक सिनेमात रमतात.
आपण आपले थोडेसे अवलोकन केले आपला स्वभाव ओळखला आणि त्यानुसार व्ययसाय निवडला तर कामात आनन्द मिळतो. कामात आनन्द मिळत असेल तर यश फ़ारसे दूर नसते.
वपु काळे नेहमीच त्यांच्या कथांमधुन शहरातील मध्यम वर्गाचे वर्णन करतात. त्यांच्या एका कथेत ते लिहितात की इथले लोकांचा सगळा आनन्द " लोक काय म्हणतील" या ते शब्दांच्या रा़क्षसाने खाऊन टाकलाय.
आपण आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध काम केले तर मनाला ते नेहमीच ओझे वाटत असते.या उलट स्वभावानुसार निवडलेले काम आनन्द देते.
पण आपल्या प्रत्येकाला स्वभावानुसार काम मिळेलच असे नाही. पण कामातही हळुहळु स्वभावानुसार मिळेल असेच काम आपण शोधायचा प्रयत्न करत असतो.
एक झेन कथा आहे
काही झेन फ़कीर एक डोंगर चढत होते. चढण तशी ब-यपैकी कठीण होती. चढताना दमही बराच लागत होता. त्या सगळ्यांसोबत एक लहान मुलगी तीच्या धाकट्या पाठंगुळी घेउन ती चढण चढत होती. ती बिचारी धापा टाकत होती. कोणीतरी तिला म्हंतले की तुला एवढा दम लागतोय . कष्ट होत आहेत तर तू तुझ्या पाठीवरचे ओझे कमी का करत नाहीस.
ती मुलगी म्हणाली ओझे? कसले ओझे आहे माझ्या पाठीवर? ते ओझे नाहिय्ये. तो तर माझा लाडका भाउ आहे. . मला तो फ़ार आवडतो म्हणुन तर त्याला माझ्या सोबत घेऊन आले आहे.
आवडत्या कामाचे ओझे कधीच वाटत नाही.
एखादे काम आपण मारुन मुटकुन करत असतो. मनातुन कुढत असतो स्वत:ला शंभर शिव्या घालत असतो. त्यामुळे होते काय तर आपण ते काम पाट्या टाकल्यासारखे करतो. त्या कामातुन कधी सुटका होईल असे वाटत असते.आपण त्यातुन पळ काढायचे बहाणे शोधत असतो.काहे जण त्यांच्या कामात व्यवयसात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होतातही. पण मनातुन ते असंतुष्ट असतात. ही असंतुष्टता मग कामाचा ताण बनुन येते.तर त्यामुळे काही सायकोसोमॆटीक आजार होतात. सतत पाठदुखी वारंवार मान आखडणे इत्यादी प्राथमिक गोष्टी एकसारख्या अनुभवास येतात. केवळ खूप पैसे मिळाले म्हणजे माणुस आनन्दी होतोच असे नव्हे.पण दुर्दैवाने अजूनही समाजात माणसाचे यश त्याने मिळवलेले पैसे याच परिमाणाने मोजले जाते.
एखाद्या शि़क्षकाला विद्यार्थ्याना शिकवायला मनापासुन आवडते त्याला आपण दिलेल्या शिक्षणाचा उपयोग करुन आपले विद्यार्थी यशस्वी झालेले पहायला मनापासुन आवडते.
ज्या क्षेत्रात तुमची आवड असते त्या तुम्ही यशस्वी होताच.
उदा: तेंडुलकर सारखा मध्यम वर्गीय घरातला मुलगा क्रिकेट ही त्याची आवड तो त्याने व्यवयसाय म्हणुन स्वीकारला. तो आनन्दी आहे यशस्वी आहे.क्रिकेट पायी आपण आपले शिक्षण नीट घेऊ शकलो नाही याचे त्याला काही वाटतही नसेल.
एखादा तरुण ज्याचा प्रभावी स्वभाव शूद्र असतो तो उत्तम गॆरेज चालवु शकतो. उत्तम डॊक्टर बनु शकतो. तर दुसर तसेच शिक्षण घेतलेला रीसर्चमध्ये रममाण होतो. लोकांच्या वागण्याचे रहस्य मूळ स्वभावात दडलेले असते.
क्षत्रीय स्वभावाच्या व्यक्तीस नेतृत्व करावयास आवडते. त्याला कोणी त्याच्यावर हुकुम गाजवलेला आवडत नाही.दोन क्षत्रीय स्व्भावांच्या व्यक्तींचे कधीच एकमेकांशी पटत नाही. भांडणे होतात. जो प्रबळ ठरतो तो नेतृत्व करतो दुसरा त्याचे हुकुम जबरदस्तीने, मनातल्या मनात चरफ़डत मानत असतो. वेळ आणि संधी येताच तो त्यातुन मुक्त व्हायचा विचार करत असतो.
दोन प्रभावी स्वभाव शूद्र असलेल्या व्यक्तींमध्ये ज्याचा क्षत्रीय स्वभाव त्यातल्यात्यात प्रबळ असेल तो डॊमिनेट करतो आणि दुसरा त्याचे हुकुम आनन्दाने मानतो. त्या दोघात कोणीच असे डॊमिनेटिंग नसेल तर दोघानाही एकमेकांचा राग येतो. नक्की कशाचा राग येतो ते कळत नाही. अशा व्यक्ती नेहमी अन्य क्षत्रीय प्रभावी स्वभाव शोधत असतात. हुकुम मानणे दुस-याना आनन्दी करणे यात त्याना खूप रस असतो.हुकुम करणारे कोणी नसेल तर या लोकाना आपले जीवन व्यर्थ आहे असे वाटु लागते. या विचारांचे त्याना टेन्शन येते.
प्रभावी स्वभाव वैश्य असणारे लोक नेहमी लोकाभिमुख असतात. त्याना चार लोकांत मिरवायला आवडते. नवनव्या संधींच्या शोध्त असतात. प्रसिद्धी मिळाली नाही तर ते अस्वस्थ होतात.
समाजात / कार्यालयात आपल्या आसपास बरेच लोक वावरत असतात त्यांचे प्रभावी स्वभाव ओळखुन त्याना साजेल तसे काम आपण त्याना दिले तर ते खूप आनन्दाने करतात. आवडते काम मिळाल्याने त्यांची कामातली गती वाढते. कोणताही प्रोजेक्ट उत्तम रीतीने पार पाडला जातो.
आणि अर्थात "आपण काय ओझ्याचे बैल" असे बोलणारे लोक कमी होतात.
आपला प्रभावी स्वभाव ओळखला आणि त्याला साजेसे काम निवडले किंवा आपल्या कामाला त्या स्वभावानुसार बदलुन घेतले तर कामाचे तणाव/ व्यक्तींमधील अनावश्यक ताण कमी होतील. मनातले ट्रॆफ़ीक जॆम कमी होतील मन निरोगी राहील .सायकोसोंमॆटीक आजार कमी होतील. ओझ्याचा आनन्द होईल
सर्वे भद्राणे पश्ष्यन्तु.
सर्वे भवन्तु सुखीन:.
सर्वे सन्तु निरामय.
मा क:ष्चीत दु:खम आप्नुयात.
पाहुणा संपादक : विजूभाऊ.
प्रतिक्रिया
29 Sep 2008 - 2:51 am | पिवळा डांबिस
विजुभाऊंनी सुंदर विचार व्यक्त केले आहेत....
फक्त पैसे मिळवण्यासाठी करियर (मग ती कोणतीही असो!) करणं याच्याइतकं सामान्य (मिडीऑकर) ध्येय असू शकत नाही....
करियरच्या मागे जर काही उदात्त प्रेरणा असेल तर मग कामाचे ओझे वाटत नाही.....
दुर्धर मानवी रोगांवर उपाय शोधण्यात आयुष्य घालवणारा,
पिवळा डांबिस
29 Sep 2008 - 3:28 am | चतुरंग
हे सांगणारा, वेगळ्या विषयाच्या हाताळणीमुळे वाचनीय झालेला एक चांगला अग्रलेख! विजूभाऊंचे अभिनंदन!
मनाला आवडेल, स्वभावाशी मिळतेजुळते असेल असे काम व्यवसाय म्हणून करता येणे हे फार दुर्मिळ असे सुख आहे!
तो शोध कधी लागेल, कसा लागेल हे सांगता येत नाही. जितका लवकर लागेल तितके आयुष्य सुखी आणि समाधानी.
बाकीचे लोक करतात म्हणून तेच बरोबर आहे, खच्चून पैसा गाठीला मारा आणि मग 'मनाजोग्या' गोष्टी करा असे सोपे वाटणारे संदेश तुम्हाला वाकड्या वाटेने जायला सांगत असतात.
व्यवहारिक जाणीव जागी ठेऊनही आवड-निवड जोपासता येते, फक्त चाकोरीबाहेरचा विचार करायला यायला हवा.
(काही ठिकाणी किंचित विस्कळित वाटला, नेमका विषय कोठे जाणार आहे ह्याबाबत थोडी संदिग्धता होती की काय असे वाटले)
चतुरंग
29 Sep 2008 - 3:57 am | एकलव्य
आवडले. धन्यवाद विजुभाऊ!
मला वाटते ह्या ट्रॅफिक जामची आणखी एक पातळीही आहे: बर्याचदा नेमके कोणत्या ठिकाणावर पोहचायचे हेच माणूस विसरून जातो. मग रस्ता चुकला ही खंत कायमसाठीच कुरतडत राहते.
- एकलव्य
29 Sep 2008 - 11:16 pm | विसोबा खेचर
मला वाटते ह्या ट्रॅफिक जामची आणखी एक पातळीही आहे: बर्याचदा नेमके कोणत्या ठिकाणावर पोहचायचे हेच माणूस विसरून जातो. मग रस्ता चुकला ही खंत कायमसाठीच कुरतडत राहते.
सहमत आहे,
विजूभाऊ, संपादकीय आवडले....
तात्या.
29 Sep 2008 - 6:04 am | गणा मास्तर
सध्याच्या तरुण पिढीसाठी उत्तम लेख. दुनिया पळते म्हणुन आपणपण त्या दिशेने पळायचे की आपली वाट चोखळायची या द्वंद्वात सापडलेल्यांना मार्गदर्शक लेख.
भविष्यात सुखी होण्यासाठी पैसे कमवताना आजचा दिवस निसटुन जातो.
मानवी स्वभावाची चार वर्णात केलेली विभागणी पटली नाही, इतरही कित्येक परिणामकारक घटक असतात असे वाटते.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
29 Sep 2008 - 6:59 am | मुक्तसुनीत
विजुभाऊ , लेखाचा एकंदर नूर , त्या लेखाचे तात्पर्य या सार्या गोष्टी उत्तम जमल्या आहेत. मात्र चतुरंगरावांनी वर सांगितल्याप्रमाणे , लेखाच्या सुरवातीपासूनचा त्याच्या अंतापर्यंतचा प्रवास विस्कळित वाटला.
कोSहम् ? व्हॉट इज माय ट्रू कॉलिंग ? या अंतरात्म्याच्या हाकेचा प्रत्यक्ष आयुष्याशी ताळमेळ जुळतो की नाही ? हे सारे प्रश्न मोठे आहेत. त्यांचा तुम्ही आपल्यापरीने उहापोह घेतला आहे. मुळात हा असा एक प्रश्न आहे, हे जाणून घेऊन , त्याला एक्स्प्रेशन देण्याच्या तुमच्या निर्णयातच तुम्ही अर्धी बाजी मारलीत. बाकी पुढचा भाग तो अच्छा होनाही था.
आपल्या म्हणण्या पुष्ट्यर्थ तुम्ही अनेक उत्तम दाखले दिलेत. (ते क्षत्रिय -शूद्र प्रकरण मी फारसे नीट वाचू नि त्यामुळे समजू शकलेलो नाही हे मोकळेपणे मान्य करतो :-) माफ करा. ) मला वाटते , एकंदर रचनेच्या दृष्टीने आणि थोडेसे कन्स्ट्रक्शन्स आणि मुद्देसूदपणाकडे लक्ष पुरवलेत तर लेखाचा परिणाम आहे त्यापेक्षा कितीतरी उत्तम होईल. एक हितचिंतक म्हणून सांगतो ; गैरसमज करून घेऊ नये.
29 Sep 2008 - 10:50 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
29 Sep 2008 - 8:18 am | प्रकाश घाटपांडे
ईजुभाउ, आमी आमच्या दु:खाच वझ तुमच्यासारख्या मित्रांवर टाकुन मोकळे होतो. आता भरल्या गाडीला सुपाच काय वझ?येवढी वझी तुम्ही वाहता त्यात आमची बी येक. आता ल्वॉक आपल आपल्यालाच वझ झाल कि मंग उलिशि "टाकत्यात" कि लगी हल्क व्हतय.
प्रकाश घाटपांडे
29 Sep 2008 - 8:23 am | धनंजय
म्हणजे आयुष्य प्रसन्न होण्यास मदत होते.
जिज्ञासा-नेतृत्व-प्रदर्शनशीलता-सेवाभाव यासाठी चातुर्वर्ण्याचे रूपक घेणे कल्पक होते. पण त्यामुळे चार आकडा घट्ट पकडून ठेवावा लागला. कलाप्रदर्शन करायची इच्छा आणि पैशांचा व्यवहार करायची चुणूक एकच ("वैश्य") मानावे लागले. "लोकांच्या पैशांचा चोख हिशोब ठेवण्याची आवड"/कारकुनी/वकिली वगैरे कुठेच नीट बसत नाही. पण अधिक विचाराअंती असे काही वर्गीकरण केल्यास समुपदेशकासाठी उपयोगी ठरू शकेल, असे वाटते.
मुलांनी-पालकांनी व्यवसाय निवडताना "पुढे नोकरी मिळेल" या विचाराच्या जोडीने "कुठल्या प्रकारचा व्यवसाय स्वभावाच्या अनुरूप आहे" हा विचार करणे आवश्यक. ही जाणीव करून देणारा विजुभाऊ यांचा अग्रलेख आवडला.
(मलाही लेखाचा अराखडा समजला नसल्यामुळे प्रवाह विस्कळित वाटला.)
29 Sep 2008 - 2:49 pm | मनिष
असेच म्हणतो. आराखडा समजला, आवडला - पण त्या ४ वर्णांमधे बसवतांना थोडा विस्कळीत झाला असे वाटले. त्या अर्थाने स्वतःचा स्व-भाव समजणे महत्त्वाचे. इथे एप्टीट्युड टेस्ट उपयोगी ठरू शकते....मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही हे समजण्याची गरज आहे.
29 Sep 2008 - 9:02 am | यशोधरा
लेखाचा विषय अतिशय आवडला. वाचनीय लेख.
29 Sep 2008 - 7:37 pm | शितल
यशोधराच्या मताशी सहमत.
लेख आवडला. :)
29 Sep 2008 - 9:16 am | सहज
घरातील लोक [आधी आई-वडील नंतर जोडीदार ] एकत्र येउन प्रत्येकाच्या ओझ्याला आनंदाच्या सीमेत ठेवतील तरच हे शक्य आहे.
अश्या विशिष्ट प्रकारच्या जीवनाच्या अपेक्षांना [करीयर प्रेशर, रिलेशनशीप प्रेशर, लाईफस्टाईल प्रेशर ] सामोरे न जाता आल्याने जाणुन बुजून अविवाहीत [स्वांतसुखाय] रहाण्याचा मार्ग आता बरेच शहरी तरुण मंडळी स्वीकारु लागली आहेत. :-)
29 Sep 2008 - 9:39 am | सुनील
वेगळा आणि चांगला विषय. अग्रलेख किंचित विस्कळीत वाटला. जर नीट बांधला असता तर अधिक उत्तम होऊ शकला असता, असे वाटते.
आर्थिक दृष्ट्या यशस्वी म्हणजेच जीवनात यशस्वी, हे समीकरण डोक्यात फिट्ट बसले असल्यामुळेच लोकांकडून स्वभावाशी विसंगत असे अभ्यासक्रम / व्यवसाय निवडले जातात आणि मग लौकीकदृष्ट्या यशस्वी ठरूनही जीवनातील आनंदाला पारखे होतात.
ठाण्यात डॉ आनंद नाडकर्णी यांनी स्थापिलेली आय पी एच ही संस्था दहावी / बारावीच्या मुलांचा कल कुठे आहे हे पाहण्यासाठी काही चाचण्या घेते. त्या किंवा अशा चाचण्यांचा उपयोग करून जर आपला अभ्यासक्रम / व्यवसाय निवडला, तर असे "मिसफिट" होण्याची पाळी येणार नाही.
मूळ स्वभावाला रुचणार नाहीत अशी कामे करतात. काही वर्षानन्तर थोडे आर्थीक स्थैर्य आल्यानन्तर काहीतरी चुकले आहे अशी मनात टोचणी वाटू लागते.
हे बाकी खास पटले. अहो, मिपा त्यासाठीच तर आहे, नाही का?
(मिसफिट) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Sep 2008 - 9:46 am | अमोल केळकर
आपल्या संपादीयकेतून खुप छान मार्गदर्शन मिळाले
'ती मुलगी म्हणाली ओझे? कसले ओझे आहे माझ्या पाठीवर? ते ओझे नाहिय्ये. तो तर माझा लाडका भाउ आहे. . मला तो फ़ार आवडतो म्हणुन तर त्याला माझ्या सोबत घेऊन आले आहे.
आवडत्या कामाचे ओझे कधीच वाटत नाही.'
हे एकदम पटले
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
29 Sep 2008 - 10:28 am | ऋषिकेश
अतिशय महत्त्वाच्या विषयावरील अग्रलेखाबद्दल अभिनंदन!.
"ताण" हा बहुतेक येत्या शतकातील सगळ्यात कॉमन आजार असणार आहे. माझी एक आजी म्हणते त्याप्रमाणे "कीती रे पळता तुम्ही पैशाच्या मागे.. लवकर म्हातारे व्हाल"
बदलणारा (वाढणारा) आयुष्याचा वेग, अनेक अपेक्षांचे ओझे, कुटुंबातील भावनिक गुंतवणूक याच्या ओढाताणीत जर नावडत्या कामाची भर पडली तर हा तणाव मानसिक आजाराबरोबर शारीरीक आजारात बदलायला वेळ लागणार नाहि.
सध्या भारतीय शिक्षणपद्धती म्हणजे तर पदवीधरांचे कारखाने झाले आहेत. दरवर्षी कित्येक पदवीधर तयार होत आहेत. ते ठराविक पदवी घेत आहेत कारण त्यात पैसा आनि नोकर्या आहेत.. आवड आहे म्हणून ठराविक पदवी घेणारे कमी आहेत.. तेव्हा त्यांना त्यांचे क्षेत्र आवडत असेलच याची शक्यता कमी आहे.
चतुवर्णातील वर्गीकरण मात्र झेपले नाहि.
बाकी अग्रलेखातील मुद्दे तर्कशुद्ध क्रमाने आले असते तर अधिक प्रभावशाली झाला असता असे वाटते.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
1 Oct 2008 - 5:29 am | चित्रा
म्हणते. अग्रलेख मुद्द्यांमुळे वाचनीय वाटला. चातुर्वणात वर्गीकरणाची गरज नव्हती असे वाटले.
1 Oct 2008 - 10:12 am | विजुभाऊ
चातुर्वर्ण्य हे एक कॉन्सेप्ट म्हणुन वापरले आहे . समजायला सोपे जावे म्हणून. यातला शूद्र वर्ण हा क्षुद्र नाही तर ते सेवा या व्यवसायाचे प्रतीक आहे. उदा:गाडीचा मेकॅनीक, नर्स ,डॉक्टर यात हलके/उणे/ कमी प्रतीचे असे काही नाही. केवळ गैरसमजामुळे चातुर्वर्ण्याशी निगडीत म्हणजे मनुवादी वगैरे या संकल्पना बाजूला ठेवुन थोडा विचार करु यात
आपल्याला काय आवडते हे ओळखणे महा कठीण असते. सोळा-आठरा वयाच्या मुलांना तर हे अजूनच कठिण.
खरे आहे. पण तरीही एखाद्याने आवडणार्या / जे करताना खूप आनन्द आला होता/ मज आली होती/ आपल्याला त्यातल्या नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे अभिमान वाटतो अशा दहा गोष्टींची यादी केली तर ढोबळ मानाने प्रभावी आणि गौण स्वभाव कळु शकतो.
प्रत्येक व्यक्तीमध्य हे चारही स्वभाव असतातच. एकाच स्वभावाची व्यक्ती असेल तर जगणे कठेण जाईल.
एक उदाहरण:जर दोन प्रभावी क्षत्रीय स्वभाव स्वभावाच्या व्यक्ती असतील तर त्यांचे कधीच एकमेकांशी पटणार नाही. त्यातला जो डोमिनेट होत राहील तो नेहमीच दु:खी राहतो
दोन प्रभावी शूद्र स्वभावाच्या व्यक्ती एकत्र असतील तर निर्णय घेणे अवघड जाते.त्यातल्या त्यात जो गौण प्रभावी क्षत्रीय स्वभावाचा असेल तो निर्णय घेण्याचे काम करेल.
व्यवहारात असे प्रसंग येत रहातात .स्वतःबरोबर दुसर्याचा स्वभावाचा अंदाज घेतला तर त्या व्यक्तींशी कसे वागयचे ते ठरवता येते.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
29 Sep 2008 - 11:23 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
आतला समुपदेशक उसळ्या मारतोय सेठु. तो तसा सोडत नाही.
चांगला लेख.
If you do work you like
then you will not have to work for a day in life.
काहीही काम न करणारा
वि.प्र.
29 Sep 2008 - 12:23 pm | रामदास
सुंदर संपादकीय.
ललीत संपादकीय.
आवडले.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
29 Sep 2008 - 2:31 pm | दिप्ती
छान आहे लेख.
29 Sep 2008 - 2:40 pm | छोटा डॉन
आपल्यावरील " आनंदाच्या ओझ्याचा" वेध घेणारा व त्याच बरोबर भविष्यात आपल्याला नक्की काय करायचे ह्या दंद्वात सापडलेल्या पिढीसाठी एक उत्तम मार्गदर्शन ..
काही गोष्टी पटकन समजल्या, काही जरा वेळाने सम्जल्या तर काहींवर अजुन विचार करतो आहे ...
असो.
बाकी " प्रभावी स्वभाव, गौण स्वभाव, चतुवर्णाचे वर्गीकरण" बिलकुल कळाले नाही ...
विजुभाऊंचे अभिनंदन !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
29 Sep 2008 - 2:53 pm | प्रभाकर पेठकर
लेख सुंदर आहे. स्वभावाच्या तथाकथित चातुर्वण्याचे प्रतिबिंब राशी भविष्यात दिसते. आपली पत्रिका पाहून आणि जन्म रास पाहून आपला स्वभाव कुठल्या व्यवसायासाठी अनुरूप आहे हे ठोबळ मानाने सांगितले जाते.
'आपल्याला आवड असलेल्या व्यवसायात 'श्रम' जाणवत नाहीत. तेंव्हा तोच व्यवसाय करावा.' एका ओळखीच्या गुजराथी व्यावसायिकाजवळ व्यापार धंद्यात उतरण्याआधी मी जी सल्ला मसलत केली होती त्यात त्याने वरील विधान केले होते. जे १००% खरे आहे हे मला अनुभवावरून समजले. असो.
संपादकिय चांगल्या विषयावर आहे पण जरा अजून नीट फोकस्ड असते तर जास्त प्रभावशाली झाले असते.
29 Sep 2008 - 3:30 pm | लिखाळ
संपादकिय छान आहे. विषय आवडला. स्वभावाचे चार प्रकार आणि कोठला गौण आहे कोठला प्रभावी आहे हे उदाहरणे देउन चांगले सांगितले आहे.
आपल्याला काय आवडते हे ओळखणे महा कठीण असते. सोळा-आठरा वयाच्या मुलांना तर हे अजूनच कठिण. अनेक पर्याय जेव्हा अनुभवायला मिळतात तेव्हाच ज्याला आवड समजत होतो ती आपली खरी आवड आहे की नाही हे समजते. पण आपल्याला आनंदाने जगायचे असेल तर जेव्हा उपरती होईल तेव्हा बदल करण्याचे धाडस झाले पाहिजे. ते धाडस मुलात निर्माण कसे होईल ते आई-वडिल आणि समाजाने सुद्धा पाहिले पाहिजे.
संपादकियाचा विषय छानच. मांडणीमध्ये थोडा एकसंधपणा असता तर अजून छान झाले असते.
--लिखाळ.
29 Sep 2008 - 9:13 pm | प्राजु
विषय सुंदर आहे.
तुम्ही तुमच्या परिने नीट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र थोडा फोकस्ड झालं असतम तर एकसंध पणा आला असता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Sep 2008 - 3:45 pm | स्वाती दिनेश
संपादकियाचा विषय छानच आहे..
आपण जर आपला स्वभाव ओळखुन त्यानुसार व्यवसाय निवडला तर यश मिळण्याची शक्यता जास्त असते कारण आपण आपल्या प्रवृत्तीनुसार वागत असतो.
अगदी १००%
थोडा विस्कळीतपणा टाळला असता तर अधिक प्रभावी ठरला असता ह्या इतरांच्या मताशी सहमत..तरीही लेख आवडलाच.
स्वाती
29 Sep 2008 - 3:48 pm | जैनाचं कार्ट (not verified)
हेच म्हणतो आहे !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
29 Sep 2008 - 8:30 pm | विजुभाऊ
दोस्तानो मी तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रीयेशी सहमत आहे.
लेख थोडा विस्कळीत आहे. विषय थोडक्यात मांडता येणार नाही असा आहे. क्रमश: लिहिली असते तर तुम्ही मला बदडले असते. :)
यावर अधीक माहिती सविस्तर लिहीन.
चातुर्वर्ण्य हे स्वभावांचे प्रकार आहेत ढोबळ वर्गिकीरण आहे.
प्रभावी शूद्र स्वभाव असणार्या व्यक्तीला सेवेमध्ये आनन्द वाटतो
प्रभावी क्षत्रीय स्वभाव असणार्या व्यक्तीला इतरांवर सत्ता गाजवणे / कन्ट्रोल करायला आवदते / उत्तम प्रकारे जमते.
प्रभावी ब्राम्हण स्वभावी व्यक्तीना अभ्यास करायला आवडते त्याना राज्य करणे जमतेच असे नव्हे.
प्रभावी वैश्य स्वभावाच्या व्यक्तीना नव्या संधी शोधणे आवडते. चार लोकांत वाहवा मिळवणे आवडते.
उदा: प्रभावी ब्राम्हण स्वभाव व गौण स्वभाव क्षत्रीय असेल तर त्या स्वभावाची माणसे शाळेत हेडमास्तर होतात.
प्रभावी क्षत्रीय स्वभाव व गौण ब्राम्हण स्वभाव असेल तर अशा व्यक्ती शिक्षण संस्थासुरु करतात आणि त्या इतरांकरवी सांभाळतात
उदा अमिताभ बच्चन हा प्रभावी वैश्य स्वभावाचा आहे, गौण स्वभाव ब्राम्ह्मण आहे तो चित्रपटात उत्तम काम करतो. त्याच्या स्वभावात क्षत्रीय प्रभाव नसल्याने त्याने सुरु केलेली ए बी सी एल सम्स्था तो नीट सांभाळु शकला नाही.
आतला समुपदेशक उसळ्या मारतोय सेठु. तो तसा सोडत नाही.
१०००% सहमत
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
30 Sep 2008 - 3:44 pm | विजुभाऊ
बाकी " प्रभावी स्वभाव, गौण स्वभाव, चतुवर्णाचे वर्गीकरण" बिलकुल कळाले नाही ...
आता हे लक्षात आले असेल. :)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
1 Oct 2008 - 11:51 am | मदनबाण
विजुभाऊ लेख फार आवडला..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda