गॅलरी

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in लेखमाला
29 Oct 2016 - 12:06 am

गॅलरी

(प्रेरणा - द ओव्हरलूक - मायकेल कॉनेली)

(या दीर्घकथेतील तपशिलांसाठी मदत केल्याबद्दल नीलकांत आणि माम्लेदारचा पंखा यांचे मनःपूर्वक आभार!)

जेव्हा कॉल आला, तेव्हा बारा वाजून गेलेले होते. मी अर्धवट झोपेत होतो आणि माझ्या जुन्या स्टिरिओ सिस्टिमवर गाणी ऐकत होतो. काही जुनी गाणी, विशेषतः गझल – अंधारातच ऐकायला छान वाटतात. आजूबाजूला शांतता होती आणि तेवढ्यात फोन वाजला. मी भानावर आलो, रिमोटने स्टिरिओ बंद केला आणि फोन उचलला.
“राजेंद्र देशमुख?”
“येस सर!”
“अमित रॉय हिअर!”
बापरे! जॉइंट कमिशनर साहेबांचा फोन! काय झालंय?
“एक केस आहे. स्थानिक पोलीस स्टेशनकडून सरळ क्राइम ब्रँचकडे आलीय. मर्डर केस आहे. बाकीच्या युनिट्सकडे भरपूर लोड आहे. त्यामुळे तुमच्या युनिटकडे केस ट्रान्सफर झाली आहे. मला असं सांगण्यात आलंय की हा आणि याच्या पुढचा पूर्ण आठवडा तुम्ही आणि शेळके कॉलवर आहात!”
“होय सर!”
“गुड! मग क्राइम सीनवर जाऊन चार्ज घ्या.”
“येस सर!”
“बाकीचे डीटेल्स तुम्हाला तुमच्या ऑफिसकडून मिळतीलच आत्ता. पण तुमच्या मनात ही शंका आलीच असेल की मी तुम्हाला फोन का केलाय.”
“हो सर.”
“केस महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी. तिथे गेल्यावर तुम्हाला समजेलच. ऑल द बेस्ट! गेट गोइंग! जय हिंद!”
“जय हिंद सर!”
“आणि आणखी एक गोष्ट!”
“येस सर!”
“जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज लागली, तर फोन करा. माझा नंबर आहे तुमच्याकडे!"
“येस सर!”
त्यांनी फोन ठेवून दिला.
लगेचच दुसरा फोन आला. ऑफिसचा.
“सर, तुम्हाला फोन आला असेलच. मलबार हिलवर बॉडी सापडलीय. हँगिंग गार्डनच्या जवळ ती बॅकबे रेक्लमेशन गॅलरी माहीत असेल तुम्हाला. तिथे.”
“ठीक आहे. मी निघतोय.”
“शेळके सरांना मी कळवलंय. तेही निघताहेत.”
“ठीक आहे.” मी फोन बंद केला.
मी माझ्या ड्रॉवरमधून एक छोटी वही आणि पेन घेतलं आणि वहीच्या पहिल्या पानावर या सगळ्या माहितीची नोंद केली. नवीन केस, नवीन वही.
बॉडी सापडलीय हे ठीक आहे, पण नक्की कोणाची? या लोकांनी मला पुरुष किंवा स्त्री हेही सांगितलं नव्हतं. पुरुष असेल, तर लुबाडण्याच्या उद्देशाने किंवा मग कुठल्यातरी भांडणामुळे – प्रॉपर्टी, बायका, जमीन. स्त्री असेल, तर मग वेगळे मुद्दे समोर येतात – ऑनर किलिंग, बलात्कार, प्रेमप्रकरण. काहीही असू शकतं. जेसीपी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ही केस महत्त्वाची तर आहेच. पण का?
याच विचारात मी माझी गाडी स्टार्ट केली. बायकोला झोपेतून उठवायचा प्रश्नच नव्हता, आणि तशीही तिला सवय होतीच. तिच्या फोनवर एक निरोप ठेवून मी निघालो. गाडी बाहेर रस्त्यावर आणून अमोल शेळकेला फोन केला. मी दादरला राहत असल्यामुळे मलबार हिलला लवकर पोहोचलो असतो. पण अमोल पार मालाडला राहत असल्यामुळे त्याला नक्कीच वेळ लागला असता. अगदी रात्रीचे १२ वाजून गेलेले असले, तरीही मुंबईमध्ये रस्ते रिकामे मिळणं म्हणजे जवळपास अशक्यच.
अमोलचा आवाज अजिबात झोपाळलेला नव्हता. ही एक चांगली गोष्ट होती. मी त्याच्या आधी मलबार हिलला पोहोचलो असतो आणि स्थानिक पोलिसांकडून चार्ज घेतला असता. ही एक अत्यंत नाजूक गोष्ट असते. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला असेल, त्यांना क्राईम ब्रँचने ती केस ताब्यात घेणं म्हणजे स्वतःच्या हुशारीचा आणि कौशल्याचा अपमान वाटू शकतो आणि त्यातून काही अप्रिय प्रसंग घडतात. त्यामुळे हे अत्यंत कौशल्याने हाताळावं लागतं.
“तू कसा येतो आहेस अमोल?”
“सर, माझी गाडी घेऊन.”
“ती वरळी ऑफिसमध्ये ठेव आणि तिथून आपली ऑफिसची गाडी घेऊन ये. पण आपली गाडी आहे असं वाटायला नको.” लोकांना पोलिसांची गाडी दिसली की त्यांची माहिती द्यायची पद्धतच बदलते. मुळात लोक बोलायला तयार होतील की नाही, इथपासून सुरुवात होते. त्यामुळे उघडपणे पोलिसांची गाडी वाटणार नाही अशी एखादी गाडी असली, की नेहमीच बरं असतं.
“ओके सर. पण नक्की प्रकार काय आहे?”
“मी तिथेच चाललोय. मला समजल्यावर तुला सांगतो.” मी फोन बंद केला. माझं सर्व्हिस वेपन तर मी घेतलं होतंच, त्याशिवाय माझ्या गाडीच्या लॉकरमध्ये माझी आणखी एक गन होती. .९ मिलीमीटर उझी. २००८च्या २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या देशाच्या आणि राज्यांच्या सरकारांनी देशातील वेगवेगळ्या शहरांच्या पोलीस आणि पोलीस कमांडो दलांना शहरी युद्धतंत्राचं (urban combat techniquesचं) प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. हे प्रशिक्षण देण्यासाठी परदेशातून, विशेषतः इझराईलमधून तज्ज्ञ प्रशिक्षक यायचे. त्यामुळेच क्राइम ब्रँचमध्ये माकारोव्ह पिस्तुलांबरोबर आता उझी आणि ल्युगर यांचाही वापर होत होता. उझीचं मॅगझीन चेक करून मी गाडीचा वेग वाढवला.
रस्त्यात तुरळक रहदारी होती. नेपिअन सी रोडवरून मलबार हिलला लवकर पोहोचता येतं हे मला अनुभवाने माहीत होतं, त्यामुळे मी तोच रस्ता पकडला आणि जिथे बॉडी सापडली होती, तिथे पोहोचलो. पोलीस नक्की कुठे असतील, हे कुणाला विचारायची गरज नव्हतीच. फ्लडलाईट्सचा भरपूर प्रकाश पडलेला दिसत होताच. आणखी थोडं जवळ गेल्यावर पोलिसांच्या गाड्याही दिसल्या. फोरेन्सिक डिपार्टमेंटची गाडीही होतीच. माझी गाडी पोलिसांच्या गाडीच्या मागे पार्क करून मी चालत पुढे आलो. गाड्या जिथे पार्क केल्या होत्या, साधारण त्याच्या ७-८ फूट पुढे पिवळी टेप – लोकांना दूर ठेवण्यासाठी – लावलेली होती. तिथून मलबार हिलची ती प्रसिद्ध गॅलरी, म्हणजे तिचं रेलिंग साधारण २० ते २५ फूट लांब असेल. रेलिंगकडे येणारे रस्ते आणि आसपासचा भाग टेप लावून सर्वसामान्य लोकांसाठी बंद केलेला होता. तसंही आत्ता तिथे कुणी पर्यटक किंवा प्रेमी जोडपी असण्याची शक्यता नव्हतीच. पण खबरदारी घेतलेली कधीही चांगली. टेपच्या त्या बाजूला, म्हणजे क्राइम सीनवर फक्त एक गाडी डिकी उघडलेल्या अवस्थेत उभी होती. ऑडी. बहुतेक ज्याचा किंवा जिचा खून झालाय त्याची/तिची असणार. ऑडी म्हणजे नक्कीच कुणीतरी श्रीमंत, आणि मलबार हिल म्हणजे राजकारणी लोकांशी संबंध. जेसीपी साहेबांच्या बोलण्याचा अर्थ आत्ता माझ्या लक्षात आला.
टेप वर उचलून मी क्राइम सीनवर आलो. एक हवालदार धावतच माझ्या दिशेने आला आणि त्याने माझ्यापुढे एक रजिस्टर धरलं. त्यावर सही करून मी त्याच्याकडे पाहिलं.
“माझ्याबरोबर या सर” असं म्हणून तो मला बॉडीच्या दिशेने घेऊन गेला.
“या देशमुखसाहेब!” हा कोण एवढ्या अगत्याने स्वागत करतोय म्हणून मी त्या दिशेने पाहिलं. इन्स्पेक्टर अजय नेवाळकर समोर उभा होता. आमची मैत्री होती असं मी नक्कीच म्हटलं नसतं, पण आम्ही एकमेकांना गेली अनेक वर्षं ओळखत जरूर होतो. अगदी तो एम.पी.एस.सी.चा आणि मी यू.पी.एस.सी.चा अभ्यास करत होतो तेव्हापासून. मी पुढे जाऊन हात मिळवले. चला. नेवाळकर आहे म्हणजे केसचा चार्ज घेताना काही प्रश्न येणार नाही.
“क्राइम ब्रँचमधून कुणीतरी चार्ज घ्यायला येतंय असं सांगण्यात आलं होतं,” नेवाळकर म्हणाला, “पण तू असशील असं वाटलं नव्हतं.”
“वेल्, मलाही माहीत नव्हतं. मला आत्ता कॉल आला आणि सांगितलं गेलं.”
“तू एकटाच आला आहेस?”
“नाही. माझा सहकारी येतोय. अमोल शेळके. तो मालाडवरून येतोय. केस काय आहे?”
नेवाळकरने ऑडीच्या दिशेने नजर केली आणि आम्ही दोघेही तिथे गेलो. डिकीमध्ये मृत व्यक्तीच्या गोष्टी रचून ठेवल्या होत्या. फ्लडलाईट्सचा प्रकाश प्रामुख्याने बॉडीच्या दिशेने असल्यामुळे इथे फारसा प्रकाश नव्हता. पण फोरेन्सिकच्या लोकांनी वेगवेळ्या झिपलॉक प्लास्टिक पिशव्यांमध्ये गोष्टी ठेवल्या होत्या. पैशांचं पाकीट, काही किल्ल्या असलेली कीचेन, एक गळ्यात घालण्यासाठी असलेलं आयडी कार्ड, आणखी एक स्टीलची छोटी बॉक्स होती. तिच्यात बर्‍यापैकी पैसे होते. सगळ्या हजाराच्या नोटा होत्या आणि एक आयफोन होता. तो अजूनही चालू होता.
“आमचं काम संपतच आलंय. अजून एक दहा मिनिटं आणि मग आम्ही तुम्हाला हे सोपवून जाऊ,” नेवाळकर म्हणाला.
आयडी कार्ड असलेली प्लास्टिक पिशवी उचलून मी कार्डकडे निरखून पाहिलं. 'श्रीमती संध्या के. ताहिलियानी हॉस्पिटल फॉर विमेन' असं त्यावर ठळक अक्षरांमध्ये छापलेलं होतं. एसएसकेटी हॉस्पिटल हॉस्पिटल तर प्रसिद्ध होतंच. मुंबईमधलं फक्त स्त्रियांसाठी असलेलं पहिलं आणि सुसज्ज हॉस्पिटल असा त्याचा लौकिक होता. उद्घाटनाला त्या वेळचे पंतप्रधान आले होते, हे मला आठवलं. ही केस महत्त्वाची आहे, याचे एक एक पुरावे समोर यायला लागले होते. कार्डवर एका पुरुषाचा फोटो होता. माणूस दिसायला चांगला होता. काळे केस आणि शोधक डोळे फोटोमध्येही लक्षात येत होते. फोटोखाली नाव होतं – डॉ. संतोष त्रिवेदी. मी कार्ड उलटं करून पाहिलं. हे नुसतं आयडी कार्ड नव्हतं, तर की कार्डदेखील होतं. बंद दरवाजे उघडण्यासाठीही त्याचा उपयोग होत असावा.
“मला या केसबद्दल माहिती हवीय अजय,” मी म्हणालो.
“सांगतो ना. साधारण एक तास-दीड तासांपूर्वी या बॉडीबद्दल आम्हाला समजलं. मलबार हिल आणि नेपिअन सी रोड या दोन्हीही पोलीस स्टेशन्सच्या हद्दी इथे ओव्हरलॅप होतात. त्यामुळे दोन्हीही पोलीस स्टेशन्सची इथे राउंड असते. हा संपूर्ण भाग – एका बाजूने केम्प्स कॉर्नर, एका बाजूने नेपिअन सी रोड, एका बाजूने वाळकेश्वर आणि एका बाजूने राज भवन – एकदम महत्त्वाचा आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचा बंगला इथून जवळ आहे. त्यामुळे इथे नियमितपणे राउंड असतात. मलबार हिल पोलीस स्टेशनची वायरलेस वाळकेश्वर ते गोदरेज बाग आणि पुढे केम्प्स कॉर्नर असा राउंड घेते. साधारण सव्वाअकराच्या सुमारास जेव्हा ही वायरलेस इथून जात होती, तेव्हा त्यांना इथे ही ऑडी डिकी उघडून ठेवलेल्या अवस्थेत मिळाली. पण जवळपास कुणीही नव्हतं. गाडीमध्येही कुणी नव्हतं. वायरलेसमधल्या ऑफिसर्सनी जेव्हा आजूबाजूला शोध घेतला, तेव्हा त्यांना ही बॉडी सापडली. या माणसाच्या डोक्यात मागून दोन गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे तो त्याच्या चेहर्‍यावर पडला होता.”
“डोक्यात गोळ्या? त्याही मागून?”
“हो. असं वाटतंय की या माणसाला मृत्युदंड दिलेला आहे. He has been executed. Clean and simple.”
“ओके. मग?”
“मग आम्ही इथे आलो, पंचनामा केला. आयडी कार्ड याच माणसाचं आहे आणि पाकीटही. डॉ. संतोष त्रिवेदी. हा माणूस कफ परेडजवळ राहतो. त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्या पाकिटातच होतं आणि यावरून आम्हाला त्याचा पत्ता समजला. त्याची गाडी टी अँड के मेडिकल फिजिसिस्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर नोंदवलेली आहे. त्यातला टी म्हणजे हाच माणूस असावा. त्रिवेदी.”
“ओके. या माणसाच्या घरी कुणी गेलंय?”
“नाही.”
“गाडीची तपासणी केलीय?”
“नाही,” नेवाळकर हसला, “क्राइम ब्रँच येणार म्हटल्यावर आम्ही...”
मला राग आला होता, पण मी काहीच बोललो नाही.
“ठीक आहे. मी चार्ज घेतोय इथला. फोरेन्सिकच्या लोकांना सांगा आणि जो काही पंचनामा लिहिलेला असेल, तो मला द्या.”
सगळ्या औपचारिकता पूर्ण करून नेवाळकर आणि त्याचे लोक निघून गेले. मला मदत म्हणून दोन हवालदार आणि गायतोंडे नावाचा एक पी.एस.आय. तिथे थांबले होते. अमोल अजूनही पोहोचला नव्हता. पण ते अपेक्षित होतं. तोपर्यंत वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. मी माझ्या पँटच्या खिशातून दोन ग्लोव्ह्ज काढले आणि हातांवर चढवले. फोरेन्सिकच्या लोकांना माझं पाहून झाल्यावर गाडीची पूर्ण तपासणी करायला सांगितलं आणि तिथला एक मोठा कमांडर टॉर्च घेऊन गाडीत बघायला सुरुवात केली. गाडीत कुठेही रक्त वगैरे नव्हतं. या माणसाला त्याच्या मारेकर्‍याने गाडीबाहेरच मारलं असणार. ड्रायव्हरच्या जागेच्या शेजारी एक ब्रीफकेस ठेवलेली होती. मी उचलून पाहायचा प्रयत्न केला, तेव्हा ती उघडीच असल्याचं जाणवलं. आतमध्ये पाहिल्यावर अनेक फाइल्स, एक कॅल्क्युलेटर, पेन्स, अनेक रायटिंग पॅड्स आणि काही एन्व्हलप्स आणि लेटरहेड्स होती. मी ब्रीफकेस बंद करून जिथे होती तिथे ठेवून दिली. ब्रीफकेस ड्रायव्हरच्या शेजारच्या जागेवर होती, याचा अर्थ हा माणूस इथे एकटाच आला होता आणि त्याच्या मारेकर्‍याला इथे भेटला होता. त्याचा मारेकरी त्याच्याबरोबर आला नव्हता.
गाडीचा ग्लोव्ह बॉक्स उघडल्यावर बॉडीवर जसं आयडी कार्ड मिळालं होतं, तशी अनेक कार्डस खाली पडली. मी प्रत्येक कार्ड उचलून पाहिलं. प्रत्येक कार्डवर वेगवेगळ्या हॉस्पिटल्सची नावं होती आणि तीसुद्धा की कार्डस होती. प्रत्येक कार्डच्या पाठी एक नंबर आणि काही अक्षरं लिहिलेली होती. डॉ. संतोष त्रिवेदी हे नाव मात्र प्रत्येक कार्डवर होतं. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. या प्रत्येक हॉस्पिटलच्या गायनॅकॉलॉजी विभागाचं नाव कार्डवर लिहिलेलं होतं आणि एसएसकेटी हॉस्पिटल तर स्त्रियांसाठी असलेलंच हॉस्पिटल होतं. या माणसाला मुंबईमधल्या जवळपास सर्व हॉस्पिटल्सच्या स्त्रीरोग विभागांमध्ये मुक्त प्रवेश होता, असं दिसत होतं. असं काय करत होता हा माणूस?
सगळी कार्डस परत ग्लोव्ह बॉक्समध्ये ठेवून देऊन मी बॉक्स बंद केला. सीट्सच्या खाली आणि दोन सीट्सच्या मध्ये काहीच सापडलं नाही. आता परत डिकीमध्ये पाहायचं मी ठरवलं, आणि त्याप्रमाणे पाहत असताना मला एक जरा विचित्र गोष्ट जाणवली. डिकीमध्ये लाल रंगाचं कार्पेट होतं आणि त्यावर खोलवर गेलेल्या चार खुणा होत्या. एखादी चौरसाकृती आणि जड गोष्ट – चार पाय किंवा पायांना चाकं असलेली एखादी वस्तू त्यावर ठेवलेली असणार. गाडी डिकी उघडी असलेल्या अवस्थेत सापडली होती, म्हणजे ही जी काही वस्तू होती, ती या माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मारेकर्‍याने नेली असणार. पण जर ही वस्तू एवढी जड असेल, तर – कदाचित एकापेक्षा जास्त मारेकरी असतील.
“सर?”
मी माझ्या तंद्रीतून बाहेर आलो.
“काय झालं?”
“सर, या मॅडम आल्या आहेत इथे. त्यांना तुम्हाला भेटायचंय. मी त्यांना सांगितलं, पण त्या ऐकत नाहीयेत.”
“पत्रकार आहेत का? मी भेटणार नाही म्हणून सांग.”
“नाही सर. प्रेसवाल्या नाहीयेत. आपल्यापैकी आहेत.”
"आपल्यापैकी? कुठे आहेत?"
तो हवालदार मला क्राइम सीनच्या टेपपर्यंत घेऊन गेला. पलीकडच्या बाजूला एक बर्‍यापैकी उंच स्त्री उभी होती. तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीवरूनच ती त्या हवालदाराने सांगितल्याप्रमाणे ‘आपल्यापैकी’ असावी हे कळत होतंच.
ती पुढे झाली आणि मला तिचा चेहरा दिसला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला.
“सुजाता, तू? तू इथे काय करते आहेस?”
“हाय राजेंद्र! रात्री साडेबारा वाजता मी अशा निर्मनुष्य ठिकाणी काम असल्याशिवाय येईन का?”
“काम? आयबीला मुंबईत घडलेल्या खुनामध्ये रस असण्याचं कारण काय?”
“आयबी नाही, एन.आय.ए. नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी.”
“कधीपासून?”
“चार वर्षं.”
सुजाता सप्रेला शेवटचं भेटून नक्की किती दिवस किंवा महिने किंवा वर्षं झाली होती, हे मला आठवत नव्हतं, पण तिची आठवण झाली नाही असा एकही दिवस नव्हता. २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनंतर जे तपासकार्य चालू झालं होतं, त्यात मुंबई क्राइम ब्रँचबरोबरच आयबीचाही (इंटेलिजन्स ब्युरोचाही) समावेश होता. सुजाता तेव्हा आयबीमध्ये होती. एन.आय.ए.ची तेव्हा निर्मितीही झालेली नव्हती. तेव्हा ती जेवढी सुंदर आणि स्मार्ट दिसायची, त्यात अजूनही काही फरक पडलेला नव्हता.
माझ्या मनातले विचार बहुतेक तिने ओळखले असावेत, “तुझ्यातही काही फरक नाही पडलेला राजेंद्र.”
मी हसलो.
“पण तुला हे सांगायला मी आलेले नाही.”
“मग?”
“वेळ आल्यावर सांगेन. आता मला क्राइम सीन बघता येईल का?”
तिच्या आवाजात आता ती टिपिकल धार होती. मीही औपचारिक व्हायचं ठरवलं.
“जरूर. का नाही?”
“मी तुला मदत करू शकते इथे,” तिने आवाजातली धार थोडी कमी केली, “जर मला बॉडी पाहायला मिळाली, तर तुला त्याच्या घरच्या लोकांना इथे किंवा मॉर्गमध्ये बोलवून त्याची ओळख पटवायची गरज भासणार नाही.” हे बोलताना तिच्या उजव्या हातात असलेली एक फाइल तिने पुढे केली.
आम्ही दोघेही बॉडीच्या दिशेने गेलो. गॅलरीच्या रेलिंगपासून ५ ते ७ फुटांवर हा माणूस पडलेला होता. रेलिंगच्या पलीकडे मुंबईची शान – क्वीन्स नेकलेस दिसत होता. हा माणूस मात्र हे सुंदर दृश्य आता कधीच बघू शकणार नव्हता. तो इथल्या लाल मातीवर निष्प्राण पडला होता. आमच्या मदतीला असलेल्या हवालदारांपैकी एकाने माझ्यासमोर पंचनामा धरला. सुजाता माझ्या बाजूला येऊन उभी राहिली.
पंचनाम्यानुसार, जेव्हा हा माणूस सापडला, तेव्हा तो पोटावर पडलेला होता, आणि त्याच्या तपासणीसाठी त्याला पोलिसांनी त्याच्या पाठीवर झोपवला होता. त्याच्या चेहर्‍यावर, विशेषतः कपाळावर जखमा होत्या. त्याला डोक्यात गोळ्या लागल्यावर तो तोंडावर पुढे पडला असणार आणि त्या वेळी या जखमा झाल्या असणार. पण त्याचा चेहरा बिघडला नव्हता. आयडी कार्डवरचा चेहरा आणि हा चेहरा एकाच माणसाचा होता, हे सहज दिसून येत होतं. त्याच्या अंगावर पांढरा फुलशर्ट होता आणि पँट राखाडी निळसर रंगाची होती. त्याच्या गुडघ्यांवर लालसर माती लागलेली दिसत होती. बहुतेक या माणसाला मारण्याआधी त्याच्या मारेकर्‍यांनी त्याला गुडघे टेकून बसवलं असावं किंवा मग गोळ्या घातल्यावर तो पहिल्यांदा गुडघ्यांवर पडला असावा आणि नंतर खाली कोसळला असावा.
सुजाताने तिच्या फाइलमधून एक फोटो काढला आणि तो मृतदेहाच्या चेहर्‍याशी पडताळून पाहिला.
“पॉझिटिव्ह!” ती म्हणाली, “तोच माणूस आहे. डॉ. संतोष त्रिवेदी.”
मी पंचनाम्यात पाहिलं. डोक्यात दोन गोळ्या मारलेल्या आहेत असं लिहिलं होतं, पण चेहर्‍यावर कुठेही गोळी बाहेर येताना झालेली जखम किंवा exit wound नव्हती.
“आणखी एक गोष्ट आहे सर,” पी.एस.आय. गायतोंडे पुढे येत म्हणाला आणि त्याने दोघा हवालदारांना इशारा केला. त्यांनी परत मृतदेह त्याच्या पोटावर झोपवला.
“हे पाहा सर.”
मृत संतोष त्रिवेदीच्या अंगावर असलेल्या पांढर्‍या शर्टाच्या कॉलरवर रक्ताचे डाग होते. या माणसाच्या डोक्यावर दाट केस असल्यामुळे असेल कदाचित, पण रक्त फारसं खाली ओघळलं नव्हतं. त्याचे केस रक्ताने चिकटले होते. दोन जखमा स्पष्टपणे दिसत होत्या. पण शर्टवर, कॉलरच्या खाली कसलेतरी तपकिरी द्रवाचे डाग होते. रक्त नव्हतं हे निश्चित.
“हे काय आहे?” मी विचारलं.
“सर, बहुतेक कोका कोला किंवा पेप्सी.”
“काय?”
“हो,” सुजाता म्हणाली, “ज्याने कुणी गोळ्या झाडल्या, त्याने त्या गनची नळी कोक किंवा पेप्सीच्या प्लास्टिक बाटलीमध्ये खुपसून गोळी झाडली असणार. बाटलीमध्ये जे थोडंफार कोक किंवा पेप्सी असेल, ते गोळीबरोबर वेगाने बाहेर फेकलं गेलं, आणि याच्या शर्टवर पसरलं. आणि असं करण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे सायलेन्सर नसावा. त्यांनी हा कामचलाऊ सायलेन्सर वापरला.”
“बरोबर. म्हणूनच इथे कुणालाही दोन गोळ्या झाडलेल्या असूनही आवाज मात्र आला नाही.” पी.एस.आय. गायतोंडे म्हणाला.
“हा सगळा प्रकार कधी झाला असेल पण?” मी विचारलं.
“सर, आमची वायरलेस इथून सव्वाअकरा वाजता गेली, तेव्हा त्यांना ही गाडी दिसली. आम्हाला त्यांच्याकडून समजल्यावर आम्ही ताबडतोब निघालो आणि इथे पावणेबाराच्या सुमारास पोचलो. त्याच्या आधी दोन-तीन तास. जास्त नाही. कारण सूर्यास्ताच्या वेळी आणि त्यानंतरही अर्धा-एक तास इथे लोक असतात. जे काही झालं, ते त्याच्यानंतरच. अंधार पडल्यावरच हे झालं असणार.”
“त्यांनी त्याच्या तोंडातसुद्धा बोळा कोंबला असणार,” सुजाता म्हणाली, “कारण त्यांनी गनसाठी सायलेन्सर वापरला, पण जर हा माणूस गोळ्या लागल्यावर ओरडला असता, तर कुणाचं लक्ष वेधलं गेलं जाण्याचा धोका होता. तो टाळण्यासाठी या मारेकर्‍याने त्याच्या तोंडात बोळा कोंबला असणार.” तिने कॉलरच्या बंद बटणाकडे आमचं लक्ष वेधलं, “माझ्या मते त्याचा स्वतःचा टाय वापरला असणार त्यासाठी.”
“आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे सर.” गायतोंडे काहीतरी आठवल्याप्रमाणे म्हणाला आणि पुढे येऊन त्याने आम्हाला संतोष त्रिवेदीचे हात दाखवले. त्रिवेदीच्या दोन्ही हातांच्या मधल्या बोटांवर प्लास्टिकच्या रिंग्ज होत्या. एखाद्या अंगठीपेक्षा मोठ्या. हाताचे तळवे उघडे होते. या दोन्ही रिंग्ज लाल रंगाच्या होत्या, पण मध्येच एक पांढरा पॅच होता, आणि तो तळहाताच्या बाजूला होता.
“काय आहे हे?” मी विचारलं.
“माहीत नाही सर,” गायतोंडे म्हणाला.
“मला माहीत आहे,” सुजाता म्हणाली, “याला TLD म्हणतात.”
“TLD?”
“Thermal Luminescent Dosimetry. या रिंगमुळे तुम्ही जर किरणोत्सर्गी पदार्थांच्या संपर्कात आलात, तर समजतं.”
किरणोत्सर्ग हा शब्द ऐकल्यावर आजूबाजूला असलेल्या सगळ्यांचं बोलणं बंद झालं. सुजाताचं बहुतेक त्याकडे लक्ष गेलं नाही, कारण ती बोलतच होती, “आणि जेव्हा हा पांढरा भाग असा आतल्या बाजूला वळलेला असतो, तेव्हा त्याचा अर्थ हा असतो, की ही रिंग घालणारा माणूस किरणोत्सर्गी पदार्थ प्रत्यक्ष हाताळतो.”
त्या क्षणी सगळे जण – मी, पी.एस.आय. गायतोंडे आणि त्या दोन हवालदारांसकट – एका बाजूला झाले आणि मृतदेहापासून दूर जायला लागले.
“एक मिनिट, एक मिनिट, सगळ्यांनी लक्ष द्या,” आपल्या बोलण्याचा परिणाम शेवटी सुजाताच्या लक्षात आला, “घाबरू नका. तसं काहीही झालेलं नाहीये. जर किरणोत्सर्ग जरुरीपेक्षा जास्त झाला असेल, तर हा पांढरा भाग काळा होतो. इथे, या रिंग्ज अजूनही पांढर्‍या आहेत. याचाच अर्थ आपण सुरक्षित आहोत. शिवाय माझ्याकडे हे आहे.” तिच्या ब्लेझरच्या खिशातून तिने एक जुन्या काळचे पेजर असायचे तशी दिसणारी एक डबी काढली, “हा रेडिएशन मॉनिटर आहे. जर इथे किरणोत्सर्ग असता, तर या डबीतून मोठा आवाज आला असता, आणि सर्वात पहिले मी पळाले असते. पण तसं काहीही झालेलं नाहीये. ओके? आता सर्वांनी आपापलं काम पूर्ण करा.”
हे काहीतरी विचित्र घडत असल्याची जाणीव मला झाली. किरणोत्सर्ग वगैरे प्रकाराची कल्पनाही मी केलेली नव्हती. मी सुजाताकडे पाहिलं, तर ती माझ्याकडेच पाहत होती.
“तू जरा माझ्याबरोबर इकडे ये सुजाता. मला तुझ्याशी जरा बोलायचंय.”
“बोल ना.” ती दोन पावलं माझ्या दिशेने आली.
“तू काय करते आहेस इथे?”
“जसा तुला मध्यरात्री कॉल आला, तसाच मलाही आला.”
“याने मला काहीही समजलेलं नाहीये.”
“मी तुझी कशी खातरी पटवू, की मी इथे मदत करण्यासाठी आलेले आहे?”
“ठीक आहे. मदत करण्यासाठी आली आहेस ना तू? मग मला तू इथे का आली आहेस आणि काय करते आहेस ते सांग. आत्ताच्या आत्ता. त्याने मला भरपूर मदत होईल.”
तिने आजूबाजूला पाहिलं आणि मला क्राइम सीनच्या टेपच्या बाहेर चलण्यासाठी खुणावलं. आम्ही दोघेही टेपच्या पलीकडच्या बाजूला गेलो. आपलं बोलणं कुणालाही ऐकू जात नाहीये, याची खातरी करून घेण्यासाठी तिने एकदा परत इकडेतिकडे पाहिलं.
“मी जे तुला आत्ता सांगणार आहे, ते अत्यंत गुप्त आहे, आणि ते तसंच राहिलं पाहिजे.” ती माझ्याकडे रोखून पाहत म्हणाली, “निदान सध्यातरी.”
“ओके. माझा शब्द देतो मी.”
“ठीक आहे. डॉ. संतोष त्रिवेदी हे नाव आमच्या एका यादीवर आहे. त्याचा खून झालाय हे आज पोलिसांना समजलं. मग ही केस क्राइम ब्रँचकडे सोपवायचा निर्णय झाला. डॉ. त्रिवेदीबद्दल माहिती गोळा करण्यासाठी क्राइम ब्रँचच्या एका ऑफिसरने सायबर सेलशी संपर्क साधला. त्यांच्याकडून आम्हाला – एन.आय.ए.ला ताबडतोब हे समजलं, आणि डॉ. त्रिवेदी हे नाव समजल्यावर एन.आय.ए.च्या दिल्ली हेडऑफिसमधून आम्हाला इथे कॉल आला आणि तो कॉल माझ्यासाठी होता.”
“का? हा डॉ. त्रिवेदी दहशतवाद्यांना मदत वगैरे करतो का?”
“नाही. तो वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ आहे... होता. Medical Physicist. आणि त्याने आयुष्यात कुठलाही गुन्हा वगैरे केलेला असण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.”
“मग त्या रिंग्ज? आणि कुठल्या यादीवर होता हा माणूस?
तिने माझ्या प्रश्नाकडे सरळसरळ दुर्लक्ष केलं.
“मला एक सांग,” ती म्हणाली, “या माणसाच्या घरी कुणी गेलंय? त्याच्या बायकोला हे सांगायला?”
“अजून नाही. इथे क्राइम सीनवरचं काम संपवून आम्ही तिथे जाणार होतो.”
“मग आपल्याला ते आत्ता करायला पाहिजे,” तिच्या आवाजात घाई होती, “आपण तिथे जाऊ या. तुला जे काही विचारायचंय ते तू मला रस्त्यात विचार. त्याच्या घराची चावी त्याच्या गाडीच्या चवीबरोबर असेल. मी माझी गाडी घेते.”
“नाही. आपण माझ्या गाडीने जाऊ.” मी म्हणालो, “तिथून जर पुढे कुठे जावं लागलं मला, तर तुझ्या गाडीने कसा जाणार?”
तिने खांदे उडवले, “कुठे आहे तुझी गाडी?”
“तिथे मागे. बाकी पोलीस गाड्यांच्या मागे. MH-01 BL 5579,” मी म्हणालो, “गायतोंडे, इथे क्राइम सीनवर सापडलेल्या गोष्टी क्राइम ब्रँचच्या गाडीत हलवा. मला डॉ. त्रिवेदींच्या घरी जावं लागेल. मी लवकर परत येईन. इन्स्पेक्टर अमोल शेळके कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील. ते येऊन तुम्हाला रिलीव्ह करतील.”
“ठीक आहे सर!” गायतोंडे म्हणाला.
मी शेळकेला फोन केला. तो १५-२० मिनिटांमध्ये पोहोचला असता. त्याला लवकर क्राइम सीनवर पोहोचायला सांगून मी त्रिवेदीच्या घराची आणि गाडीची चावी असलेली प्लास्टिक पिशवी घेतली आणि निघालो.
सुजाता माझ्या गाडीच्या बाजूला उभी होती आणि कुणाशी तरी फोनवर बोलत होती. मी येऊन गाडीचा दरवाजा उघडल्यावर ती येऊन आत बसली.
“माझा पार्टनर.” ती म्हणाली, “ त्याला मी डॉ. त्रिवेदींच्या घरी परस्पर यायला सांगितलंय.”
मी गाडी चालू केली. आम्ही सरळ पुढे केम्प्स कॉर्नरला उतरून डावीकडे नेपिअन सी रोडच्या दिशेने वळलो. तिथल्या एका सिग्नलवर यू टर्न घेऊन मी गाडी पेडर रोडवर आणली आणि मरीन ड्राइव्हच्या दिशेने निघालो. सुजाता बाहेर बघत होती.
“जर डॉ. त्रिवेदी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नाहीये, तर मग नक्की कुठल्या यादीवर त्याचं नावं आहे?”
तिने माझ्याकडे पाहिलं, “तो मेडिकल फिजिसिस्ट आहे, आणि त्यामुळे त्याचा किरणोत्सर्गी पदार्थांशी सरळ संबंध येत होता. त्यामुळे तो त्या यादीवर आला.”
“संबंध कुठे? हॉस्पिटल्समध्ये?”
“हो. तिथेच हे पदार्थ ठेवलेले असतात. प्रामुख्याने कॅन्सरवरच्या उपचारांसाठी त्यांचा वापर होतो.”
“ओके.” मला साधारण कल्पना येत होती, पण काही गोष्टी अजूनही स्पष्ट झालेल्या नव्हत्या.
“मग? ”
“जे किरणोत्सर्गी पदार्थ तो नियमितपणे हाताळत होता, त्यांच्यावर जगातल्या काही लोकांचा डोळा आहे. त्यांना या पदार्थांचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करून घ्यायचा आहे. पण अर्थातच त्यात कॅन्सरवरील उपचारांचा काहीही संबंध नाहीये.”
“दहशतवादी.”
“बरोबर.”
“पण तुझं असं म्हणणं आहे, की हा माणूस आपण जसे आपल्या ऑफिसमध्ये जातो तितक्या सहजपणे हॉस्पिटल्समध्ये जायचा आणि हे पदार्थ हाताळायचा? याचे नियम असतील ना काहीतरी?”
“नियम असतात, पण जेव्हा एखादी गोष्ट ही नेहमीच होते, रुटीन होते, तेव्हा नियम आणि ज्या कडकपणे ते पाळले गेले पाहिजेत, त्यात शिथिलपणा येतो. जगातल्या कुठल्याही सुरक्षाव्यवस्थेत हे दोष असतातच. जेव्हा काहीतरी जबरदस्त घडतं, तेव्हाच लोक भानावर येतात आणि सगळे नियम परत व्यवस्थित पाळतात.”
मी विचार करत होतो. डॉ. त्रिवेदीच्या गाडीत मला जी आयडी कार्डस मिळाली होती, त्यांच्या मागे जे नंबर्स आणि अक्षरं लिहिलेली होती, ती तिथल्या किरणोत्सर्गी पदार्थ ठेवलेल्या तिजोर्‍यांच्या दरवाजांवरील कुलपांची काँबिनेशन्स असावीत बहुतेक.
“जर तुला एखादी सुरक्षाव्यवस्था भेदून, किंवा तिला बाजूला सारून काही माहिती किंवा गोष्ट मिळवायचीय, तर तू कुणाकडे जाशील?” तिने विचारलं.
“ज्याला किंवा जिला त्या व्यवस्थेची इत्यंभूत माहिती आहे, त्या व्यक्तीकडे.”
मी एव्हाना कफ परेडच्या जवळ आलो होतो आणि ज्या रस्त्याचं नाव ड्रायव्हिंग लायसन्सवरच्या पत्त्यावर लिहिलं होतं, त्या रस्त्याच्या नावाचा बोर्ड कुठे दिसतो का ते बघत होतो. मला जे हवं होतं, ते सुजाताने अजून तरी मला सांगितलं नव्हतं. अर्थात, तिच्यासारखी हुशार एजंट इतक्या सहजपणे माहिती देईल अशी अपेक्षा नव्हतीच माझी.
“तू ओळखत होतीस का डॉ. त्रिवेदींना?” तिला हा प्रश्न विचारताना मी तिच्याकडे बघत होतो. मला उत्तरापेक्षाही तिची प्रतिक्रिया पाहायची होती. ती माझ्यापासून वळली आणि तिने बाहेर बघितलं. आणि परत माझ्या दिशेने वळली, “नाही. मी ओळखत नव्हते त्यांना.”
मी गाडी थांबवली.
“काय झालं?”तिने विचारलं.
“आलं की त्यांचं घर.”
तिने आजूबाजूला पाहिलं, “इथे नाही, इथून दोन सिग्नल पुढे आणि मग डावी...” ती बोलताबोलता थांबली. आपलं खोटं बोलणं उघडकीला आल्यावर लोक जसे थांबतात, तशीच.
“तुला मला खरं सांगायचंय की गाडीतून उतरायचंय?” मी विचारलं.
“हे पाहा राजेंद्र, तुला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे...”
“उतर माझ्या गाडीतून आत्ताच्या आत्ता. मी एकटाही डॉ. संतोष त्रिवेदींचं घर शोधू शकतो.”
“मी एक फोन कॉल केला ना, तर पुढच्या एक तासात तुझ्या हातून ही केस गेलेली असेल, आणि कदाचित तुझी नोकरीसुद्धा.” तिच्या आवाज अत्यंत थंड होता.
“जरूर. माझ्या फोनवरून केलास तरी चालेल. तू माझ्या क्राइम सीनवर आलीस, स्वतःला माझ्या तपासात घुसवलंस आणि आता मलाच दमदाटी करते आहेस? ज्याला कुणाला तुला फोन करायचा असेल त्याला कर. मग पुढे जे होईल त्याला मी जबाबदार नसेन.”
तिने माझ्याकडे रोखून पाहिलं. बराच वेळ. “ओके.” ती एक निःश्वास टाकून म्हणाली, “काय माहिती हवी आहे तुला?
“मला सत्य काय आहे ते हवंय. लपवाछपवी नाही.”
ती बराच वेळ काही बोलली नाही. बहुतेक मला काय सांगायचं आणि कसं सांगायचं याचा विचार करत असावी.
“तुला डॉ. संतोष त्रिवेदी कोण आहे आणि तो कुठे राहतो, किंवा राहायचा याबद्दल अगदी व्यवस्थित माहिती आहे हे तर उघड आहे,” मी म्हणालो, “तरीही तू माझ्याशी खोटं बोललीस. तो दहशतवादी गटांना मदत करत होता का?”
“नाही. आणि हे खरं आहे. त्याचा दहशतवादाशी दूरवरचाही संबंध नव्हता. तो भौतिकशास्त्रज्ञ होता. तो आमच्या यादीवर होता, कारण तो किरणोत्सर्गी पदार्थ हाताळायचा. हे पदार्थ जर चुकीच्या लोकांच्या हातात पडले, तर त्यांचा वापर अनेक धोकादायक गोष्टींसाठी होऊ शकतो.”
“म्हणजे?”
“अनेक लोक – विशेषतः गर्दीच्या ठिकाणी जर या पदार्थांमधून होणार्‍या किरणोत्सर्गाच्या संपर्कात आले, तर अनर्थ होऊ शकतो. लंडनमध्ये एका रशियन हेराला मारण्यासाठी त्याच्या मारेकर्‍यांनी पोलोनियमचा वापर केला होता. ती बातमी सगळ्या जगभर प्रसिद्ध झाली होती. तिथे त्याचा वापर एका माणसासाठी केला गेला, पण विचार कर – जर एखाद्या दहशतवादी गटाने त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला – मॉल, रेल्वे स्टेशन्स, मुंबईसारख्या मोठ्या शहरातला कुठलाही मोठा रस्ता, तर? लंडनमध्ये अगदी थोड्या प्रमाणात पोलोनियम वापरण्यात आलं, पण एखाद्या शहरासाठी मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्गी पदार्थ लागेल, आणि अर्थातच तो कुठल्या साधनाद्वारे पसरवला जातोय तेही महत्त्वाचं आहे.”
“साधन? म्हणजे बाँब वगैरे? डॉ. त्रिवेदी जे पदार्थ हाताळायचा, त्यांचा बापर एखाद्या बाँबसाठी वगैरे होऊ शकतो?”
“हो. होऊ शकतो. त्याच्यासाठी सध्या IED – Improvised Explosive Device हा शब्द वापरला जातो हे तर माहीत असेलच तुला.”
तिने दिलेल्या माहितीमुळे मी जरा अस्वस्थ झालो होतो, “हे त्याचं घर नाही, हे तुला कसं माहीत?”
तिने डोकं दुखत असल्याप्रमाणे तिचे हात तिच्या कपाळाच्या दोन्ही बाजूंना ठेवून दाबले. समोरच्याला काही समजलं नाही, की तिची हीच प्रतिक्रिया असायची हे मला माहीत होतं, “कारण मी याआधी त्याच्या घरी गेले आहे, ओके? झालं समाधान? गेल्याच वर्षी – अगदी नेमकं सांगायचं तर ६-८ महिन्यांपूर्वी मी आणि माझा पार्टनर, आम्ही दोघेही डॉ. त्रिवेदींच्या घरी गेलो होतो, आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या व्यवसायात असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली होती. त्यांच्या घराची सुरक्षाविषयक तपासणीही केली होती, आणि त्यांना काय आणि कशी काळजी घ्यायची, तेही सांगितलं होतं. आम्हाला असं करायला केंद्रीय गृहखात्याकडून सांगण्यात आलं होतं.”
“ओके. पण मला एक सांग, हे तुम्ही केंद्रीय गृहखात्याने करायला सांगितलेला खबरदारीचा उपाय म्हणून केलं होतं, का डॉ. त्रिवेदींच्या जिवाला धोका आहे, हे तुम्हाला समजलं होतं, म्हणून केलं होतं?”
“त्यांच्या जिवाला धोका नव्हता. हे पाहा, आपण उगाचच वेळ वाया घालवतोय.”
“मग कुणाला धोका आहे?”
सुजाता आता प्रचंड वैतागली होती, “कुणा एका माणसाच्या जिवाला धोका आहे, असं अजिबात नव्हतं. आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हे सगळं करत होतो. अमेरिकेत एक केस झाली होती. सव्वा वर्षापूर्वी. तिथल्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातल्या ग्रीन्सबरो या ठिकाणी असलेल्या एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कुणीतरी शिरलं. त्यांनी तिथे असलेल्या सुरक्षाव्यवस्थेला चकवलं आणि आणि सीशियम १३७ नावाचं एक किरणोत्सारी समस्थानिक असलेल्या बावीस ट्यूब्ज पळवल्या. या पदार्थाचा वैद्यकीय आणि कायदेशीर वापर हा स्त्रियांच्या कॅन्सरसाठी होतो. एफ.बी.आय.ला अजूनही या चोरीचे काही धागेदोरे मिळालेले नाहीत. पण त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आपल्या देशातल्या या समस्थानिकाच्या वापराबद्दल सावधगिरी बाळगायचा सल्ला दिला. आपल्या देशात फक्त चार-पाच शहरांमधल्या हॉस्पिटल्समध्ये या पदार्थाचा वापर केला जातो. मुंबई, दिल्ली, चेन्नई, पुणे आणि बेंगळूरू. हा पदार्थ वापरणारे मेडिकल फिजिसिस्ट्ससुद्धा कमी आहेत. एफ.बी.आय.चा असा संशय होता, की काही अतिरेकी गट हे समस्थानिक आपल्या देशातून मिळवायचा प्रयत्न करतील, कारण आपल्या देशात या समस्थानिकाचा वापर वाढायला लागलेला आहे.”
“ओके.”
“तुला जी माहिती हवी होती, ती दिलीय मी. आता आपण निघू या का इथून?”
मी अजिबात हललो नाही, “अच्छा. म्हणजे तू त्याला सावधगिरीचा इशारा द्यायला गेली होतीस आणि म्हणून आत्ता त्याचा खून झाल्याचं कळल्यावर तू इथे आलीस.”
“हो. आम्ही मुंबईतल्या मेडिकल फिजिसिस्ट्सना सावध केलं होतं. आणि मी इथे आले नाही, मला इथे येऊन सगळं व्यवस्थित आहे ना हे पाहायला सांगण्यात आलंय. मला आणि माझ्या पार्टनरला.”
मी गाडी चालू केली, “हे सगळं तू मला आधीच का नाही सांगितलंस?”
“ग्रीन्सबरोमध्ये कुणाचाही खून झाला नव्हता. इथे झालाय. त्यामुळे हा सगळा प्रकार कदाचित पूर्णपणे वेगळा असू शकेल अशी एक शक्यता होती. त्यामुळे मला हे सांगण्यात आलं होतं, की कुणालाही यातलं काहीही कळता कामा नये. त्यामुळे मी तुझ्याशी खोटं बोलले आणि त्याबद्दल सॉरी.”
“ते ठीक आहे. पण मला एक सांग – एफ.बी.आय.ला तिथे चोरीला गेलेलं सीशियम परत मिळालं?”
तिने नकारार्थी मान डोलावली, “नाही. बहुतेक ते काळ्याबाजारात विकलं गेलंय. त्याची किंमत भरपूर असते, आणि त्याचा वापर करून केले जाणारे उपचारही महागडे आहेत. त्यामुळेच तर आम्हाला इथे नक्की काय प्रकार आहे, ते शोधून काढायचंय.”
आम्ही आता योग्य पत्त्याच्या जवळ आलो होतो. “हे डावीकडचं घर,” सुजाता म्हणाली.
आम्ही दोघेही उतरलो आणि धावतच त्या घराच्या दिशेने गेलो. घर म्हणजे एक बंगला होता आणि तो पूर्णपणे अंधारलेला होता. प्रकाशाचा अगदी एक किरणसुद्धा दिसत नव्हता. घराच्या दरवाजावर असलेला दिवासुद्धा बंद होता. मी जेव्हा दरवाजाजवळ येऊन दरवाजाला अगदी हळू धक्का दिला, तेव्हा दरवाजा उघडला.
त्याक्षणी प्रतिक्षिप्त क्रियेने आम्हा दोघांचीही सर्व्हिस वेपन्स आम्ही आमच्या हातात घेतली आणि मी अगदी हलक्या हाताने दरवाजा उघडला. आत अंधार होता. भिंतीवरून हात फिरवत मी लाइट स्विच शोधून काढला आणि दाबला. एक ट्यूब लाइट चालू झाला. आम्ही दोघांनी आजूबाजूला पाहिलं. एका श्रीमंत घराचा हॉल होता आणि वस्तू जागच्या जागी दिसत होत्या. एखादी झटापट वगैरे झाल्याची चिन्हं दिसत नव्हती.
“मिसेस त्रिवेदी!” सुजाताने जोरात हाक मारली. काहीही प्रतिसाद आला नाही. “डॉ. त्रिवेदी आणि त्यांची पत्नी एवढेच लोक घरात असतात ... असायचे,” ती मला हलक्या आवाजात म्हणाली, “मिसेस त्रिवेदी!” तिने परत एकदा हाक मारली. पण घराच्या कुठल्याही कोपर्‍यातून आवाज आला नाही. मी इकडेतिकडे पाहिल्यावर मला उजव्या बाजूला एक कॉरिडॉर दिसला. मी त्या दिशेने गेलो. तिथे आणखी एक स्विच होता. तो दाबल्यावर कॉरिडॉरमधला लाइट लागला आणि कॉरिडॉरमध्ये काय आहे ते दिसलं. चार बंद दरवाजे होते आणि एक बर्‍यापैकी मोठा कोनाडा होता. कोनाड्यात एक कॉम्प्युटर टेबल, खुर्ची, एक डेस्कटॉप कॉम्प्युटर आणि प्रिंटर ठेवलेले होते. हे डॉ. त्रिवेदींचं घरातलं ऑफिस असणार. सुजाता आणि मी त्या बंद दरवाजांच्या आड काय आहे ते बघायला सुरुवात केली. एक गेस्ट बेडरूम होती आणि एका दरवाजाच्या पलीकडे व्यायामाची उपकरणं – डम्बेल्स, ट्रेडमिल, सायकल वगैरे ठेवली होती. भिंतीवर व्यायाम किंवा योगासनं करताना वापरायच्या चटया टांगल्या होत्या. तिसरा दरवाजा म्हणजे बहुतेक गेस्ट बाथरूम होती.
“ही बहुतेक मास्टर बेडरूम असणार,” मी म्हणालो आणि चौथा दरवाजा उघडला. आतमध्ये अंधार होता. मी परत एकदा भिंतीवर हात फिरवून चाचपडत लाईट लावला आणि आमचे दोघांचेही डोळे विस्फारले. समोर एका मोठ्या किंगसाइज बेडवर एक स्त्री हातपाय बांधलेल्या अवस्थेत पडलेली होती. तिचे हात मागे ताणून पायांबरोबर बांधण्यात आले होते. त्याक्षणी माझ्या हेही लक्षात आलं की तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. ती पूर्णपणे नग्न होती. सुजाता ती जिवंत आहे की नाही हे बघायला धावली. या खोलीला आणखी एक दरवाजा होता. मी तो उघडायचा प्रयत्न केला, पण तो बंद होता. बहुतेक बाहेरून कुलूप लावलेलं असावं. मी वळल्यावर पाहिलं, तर सुजाताने या स्त्रीचे – मिसेस त्रिवेदीचे हात-पाय मोकळे केले होते. इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल साधनांच्या वायर्स बांधायला जे प्लास्टिकचे स्नॅप टाईज वापरतात, ते वापरून बांधलं होतं तिला. सुजाताने पलंगावरची चादर ओढून तिच्या अंगावर टाकली.
“जिवंत आहे?”
“हो. पण बेशुद्ध आहे. किती वेळ कोण जाणे.” सुजाता तिच्या मनगटांना मालिश करत होती. रक्तप्रवाह थांबल्यामुळे तिचे हात जवळपास जांभळे पडले होते. एक विचित्र वास – बहुतेक मूत्राचा – येत होता.
“अरे, असा उभा का राहिला आहेस? काहीतरी मदत कर. डॉक्टर वगैरे बोलाव.” सुजाता म्हणाली. मी जरा ओशाळलो आणि त्या खोलीच्या बाहेर जाऊन कंट्रोल रूमला फोन केला आणि इमर्जन्सीसाठी असलेल्या मेडिकल टीमला पाठवायला सांगितलं.
“दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचताहेत डॉक्टर,” मी आत येत म्हणालो.
माझ्या मनात आता विचारचक्र फिरायला लागलं होतं. आता आम्हाला एक साक्षीदार मिळाली होती. ती जेवढ्या लवकर शुद्धीवर येऊन आम्हाला काय घडलंय हे सांगेल, तेवढं आमच्यासाठी आणि या केससाठी चांगलं होतं.
मला कण्हण्यासारखा आवाज ऐकू आला आणि मी भानावर आलो. मिसेस त्रिवेदी शुद्धीवर येत होती.
तिने पहिल्यांदा डोळे उघडले आणि मग इकडे तिकडे पाहिलं.
“मिसेस त्रिवेदी, मी सुजाता,” सुजाता म्हणाली, “एन.आय.ए.मधून आले होते मी तुम्हाला भेटायला. आठवतंय का?”
“अं? हे..हे काय आहे? आणि संतोष... संतोष कुठे आहे?"
तिने उठून उभं राहायचा प्रयत्न केला. पण आपल्या अंगावर फक्त एक चादर असल्याची जाणीव तिला झाली असावी बहुतेक. तिने ती चादर अजून घट्टपणे स्वतःभोवती लपेटून घ्यायचा प्रयत्न केला. पण तिची बोटं आखडली असावीत. सुजाताने तिच्या अंगावरची चादर सारखी केली.
“संतोष कुठे आहे?”
सुजाताने माझ्याकडे पाहिलं.
“मिसेस त्रिवेदी, तुमचे पती इथे नाहीयेत,” मी म्हणालो, “मी सुपरिटेंडेंट राजेंद्र देशमुख, मुंबई क्राइम ब्रँच. आणि या सुजाता सप्रे, एन.आय.ए. आम्ही तुमच्या पतींना काय झालंय ते शोधून काढायचा प्रयत्न करतोय.”
तिने माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहिलं, पण सुजाताकडे पाहिल्यावर तिच्या डोळ्यांत ओळख आली, “तुम्हाला ओळखते मी. तुम्ही आमच्या घरी सावधगिरीचा इशारा द्यायला आलेलात. काय चाललंय? संतोष इथे आलेल्या लोकांच्या ताब्यात आहे का?”
सुजाताने तिला जवळ घेतलं आणि अत्यंत शांत आणि प्रेमळ आवाजात ती म्हणाली, “मिसेस त्रिवेदी – अलिशा, बरोबर? तुम्ही – तू जरा शांत हो. आपण बोलू आणि आम्ही तुला मदत करू. तुला कपडे घालायचे असतील ना?”
अलिशा त्रिवेदीने होकारार्थी मान डोलावली.
“ठीक आहे. आम्ही इथून बाहेर जातो,” सुजाता म्हणाली, “तू कपडे बदल आणि आम्ही तुझ्यासाठी बाहेर थांबतो. मला एक सांग – तुला काही शारीरिक दुखापत वगैरे झाली...”
“कुणी तुमच्यावर बळजबरी वगैरे करायचा प्रयत्न केलेला नाही ना मिसेस त्रिवेदी?” सुजाता थेट प्रश्न विचारायला लाजत होती असं वाटल्यामुळे मी विचारलं.
“नाही,” ती मान खाली घालून म्हणाली, “त्यांनी फक्त मला माझे कपडे काढायला लावले.”
“ठीक आहे,” सुजाता म्हणाली, “आम्ही बाहेर थांबतो. आम्ही इकडे एक मेडिकल टीम बोलावली आहे. ते तुझी तपासणी करतील.”
“मी ठीक आहे,” अलिशा म्हणाली, “माझ्या नवर्‍याला काय झालंय?”
“त्याबद्दल खातरी नाहीये आमची,” मी म्हणालो, “तुम्ही कपडे बदलून बाहेर या. आम्ही तुम्हाला काय झालंय ते सांगतो.”
ती तिच्या अंगाभोवती असलेली चादर घट्ट लपेटून घेत अडखळत उभी राहिली. ती उभी राहिल्यामुळे गादीवर पडलेला डाग मला दिसला. एकतर तिला प्रचंड भीती वाटली असणार, किंवा मग निसर्गापुढे तिचा नाइलाज झाला असणार.
तिने तिच्या कपड्यांच्या कपाटाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आणि तिचा तोल गेला. सुजाताने पुढे होत तिला सावरलं.
“सांभाळ.” सुजाता म्हणाली.
“मी ठीक आहे. फक्त डोकं थोडं गरगरतंय,” ती म्हणाली, “किती वाजलेत?”
तिच्या पलंगाजवळ असलेल्या डिजिटल घड्याळाकडे माझं लक्ष गेलं. त्याच्या स्क्रीनवर काहीही दिसत नव्हतं. बंद केलं असावं किंवा मग त्याची वायर काढून ठेवली असेल. मी माझ्या मनगटी घड्याळाकडे पाहिलं, “रात्रीचा एक.”
तिचं अंग ताठरलं, “ओ माय गॉड! अनेक तास उलटलेत! संतोष कुठाय?”
“तू कपडे बदल,” सुजाता म्हणाली, “मग आपण त्याबद्दल बोलू.”
ती त्या कपड्यांच्या कपाटाकडे गेली आणि तिने कपाटाचा दरवाजा उघडला आणि हँगरला लावलेला एक पांढर्‍या रंगाचा रोब हातात घेतला.
मी बाहेर आलो. सुजाताही दरवाजा बंद करत बाहेर आली.
“काय वाटतंय तुला?” तिने मला आम्ही बाहेर हॉलमध्ये आल्यावर विचारलं.
“आपल्या सुदैवाने आपल्याला एक साक्षीदार मिळालेली आहे.” मी म्हणालो, “ती आपल्याला काय घडलंय ते सांगू शकेल.”
“हो. अशी आशा करू शकतो.”
अलिशा कपडे बदलून बाहेर येईपर्यंत मी तिच्या घरात आणि घराभोवती एक चक्कर मारायचं ठरवलं. आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या खोल्या, घराची मागची बाजू आणि गराज. गराज दोन गाड्या राहू शकतील एवढं मोठं होतं, पण रिकामं होतं. जर डॉ. त्रिवेदींच्या ऑडीव्यतिरिक्त आणखी एखादी गाडी यांच्याकडे असेल, तर ती इथे नव्हती. मी परत एकदा कंट्रोल रूमला फोन केला आणि एक फोरेन्सिक टीम इथे पाठवायला सांगितलं. नंतर मी जेसीपी साहेबांना फोन केला आणि त्यांना आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
“ओके. म्हणजे मला आता माझ्या वरच्या लोकांना उठवायला पाहिजे,” ते म्हणाले,” या एन.आय.ए., आयबी वगैरे लोकांशी बोलताना एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा ते तुला जे ऐकायला हवं असेल ते सांगायला सुरुवात करतात, तेव्हा सावध राहा.”
“येस सर. मी तुम्हाला अपडेट करत राहीन सर!”
मी घरात परत आलो आणि पाहिलं तर सुजाता फोनवर बोलत होती आणि मी यापूर्वी न पाहिलेला एक माणूस हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता. मला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला आणि त्याने आपला हात पुढे केला, “हाय राजेंद्र! मी वर्धन. वर्धन राजनायक. सुजाता माझी पार्टनर आहे.”
तो ज्या पद्धतीने हे म्हणाला, त्यावरून मला जे काही समजायचं ते समजून गेलं. तो मला हे सांगायचा प्रयत्न करत होता, की आता तो आल्यामुळे सगळे निर्णय वगैरे त्याचा सल्ला घेऊनच होतील. मग ते तिला मान्य असो वा नसो.
“अरे वा! तुम्ही एकमेकांची ओळख करून घेतलीत!” सुजाताचं फोनवरचं बोलणं संपलं होतं.
“काय आहे लेटेस्ट अपडेट?” राजनायकने विचारलं.
“मी इथल्या आयबी ऑफिसशी बोलत होते. तेही आपल्याबरोबर आहेत यात. ते तीन टीम्स पाठवताहेत. या टीम्स डॉ. त्रिवेदी ज्या कोणत्या हॉस्पिटल्समध्ये जायचे, त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन चेक करतील की ते आज तिथल्या हॉट लॅब्जमध्ये गेले होते किंवा नाही.”
“हॉट लॅब्ज? म्हणजे जिथे हे किरणोत्सर्गी पदार्थ ठेवले जातात तिथे?”
“बरोबर.” राजनायक म्हणाला, “डॉ. त्रिवेदी मुंबईमधल्या जवळपास सगळ्या महत्त्वाच्या हॉस्पिटल्समध्ये जायचे. त्यामुळे ते त्यातल्या नक्की कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेले होते, ते शोधून काढायला पाहिजे.”
त्यांचं काम मी सोपं करू शकलो असतो. जेव्हा डॉ. त्रिवेदींचा खून झाला, तेव्हा एस.एस.के.टी. हॉस्पिटलचं आयडी कार्ड त्यांच्या गळ्यात होतं. सुजाता आणि राजनायकला हे अजून माहीत नव्हतं, आणि मीही त्यांना हे योग्य वेळ आल्याशिवाय सांगणार नव्हतो. या केसची दिशा एका खुनाच्या तपासावरून किरणोत्सर्गी पदार्थांकडे बदलायला लागली होती, आणि जर मी ही माहिती आत्ता सांगितली असती, तर या तपासातून माझा पत्ता कट झाला असता, हे उघड होतं. मी एक चान्स घ्यायचं ठरवलं.
“क्राइम ब्रँचचं काय?”
“क्राइम ब्रँच?” सुजाताच्या आधी राजनायक बोलला, "म्हणजे तुला म्हणायचंय की तुझं काय, बरोबर?”
“हो. तसं म्हण. माझा काय रोल आहे या सगळ्यात?”
“काळजी करू नकोस राजेंद्र,” तो माझ्याकडे रोखून पाहात म्हणाला, “तू आमच्याबरोबर आहेस. शेवटी आपण एकाच टीममधले लोक आहोत, बरोबर?”
“धन्यवाद. हेच ऐकायचं होतं मला,” मी म्हणालो. जेमतेम ५ मिनिटांपूर्वी जेसीपी सरांनी सांगितलेल्या गोष्टीचा प्रत्यय येत होता.
राजनायक काहीतरी बोलणार, तेवढ्यात अलिशा त्रिवेदी हॉलमध्ये आली. तिच्या अंगावर तोच पांढरा रोब होता. तिने बहुतेक केस विंचरले होते आणि चेहराही धुतला होता. ती दिसायला सुंदर असल्याची जाणीव मला तेव्हा झाली. उंच सुजाता आणि धिप्पाड राजनायकपुढे ती अगदीच छोटी वाटत होती. तिच्या चेहर्‍याच्या ठेवणीवरून ती बहुतेक हिमाचल किंवा उत्तराखंडसारख्या पहाडी भागातली असावी असा मी अंदाज केला. ती आत आल्यावर सुजाताने तिची आणि राजनायकची ओळख करून दिली.
“माझा नवरा कुठे आहे?” तिने बसल्यावर पहिला प्रश्न विचारला. मगाशी आमच्याशी बोलताना जो तिचा आवाज होता, त्यापेक्षा हा आवाज वेगळाच होता. तेव्हा परिस्थितीही वेगळी होती. सुजाता तिच्या शेजारी बसली आणि राजनायक एक खुर्ची घेऊन त्यावर बसला. मी मात्र उभाच राहिलो. तसंही मला प्रश्न विचारताना बसायला आवडत नाहीच.
“मिसेस त्रिवेदी”, मी सुरुवात केली, “मी एक पोलीस अधिकारी आहे. मी इथे आलोय कारण आम्हाला एक मृतदेह मिळालाय, आणि तो तुमच्या पतींचा आहे. आय अॅम सॉरी!”
हे ऐकल्यावर एक सेकंद तिने माझ्याकडे पाहिलं. बहुतेक मी काय बोलतोय ते तिच्या मेंदूपर्यंत पोहोचलं नसावं. पण तिचं डोकं पुढे झुकलं आणि आपले हात चेहर्‍यावर ठेवून ती हमसून हमसून रडायला लागली. सुजाताने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला थोपटायला सुरुवात केली. राजनायक आतमध्ये जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन आला. ती पाणी पीत असताना मी तिचं निरीक्षण करत होतो. तिच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळत होते. मी आजवर किमान १०० जणांना तरी त्यांच्या निकटवर्तीय लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी दिली असेल, पण प्रत्येक वेळी मला ते सर्वात कठीण गोष्टींपैकी वाटत आलेलं आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी मला जेव्हा समजली होती, तेव्हा मीही बधीर आणि सुन्न होऊन गेलो होतो.
बराच वेळ आम्ही कोणीच काही बोललो नाही. त्याच वेळी दरवाजावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. मेडिकल टीमचे लोक बाहेर उभे होते. त्यांना आत घेऊन मी त्यांची अलिशाशी ओळख करून दिली आणि राजनायक आणि सुजाताला आत बोलावलं.
“काही सजेशन्स?”
“तू प्रश्न विचार,” राजनायक म्हणाला, “तुला अनुभव आहे. आम्हाला काही वाटलं तर आम्ही विचारू.”
“ठीक आहे.” मी म्हणालो. सुजाता काहीच बोलली नाही.
आम्ही तिघेही बाहेर आलो. डॉक्टरांनी सुजाताला एक गोळी दिल्याचं मी पाहिलं. एक नर्स तिच्या हातांवरच्या जांभळ्या पडलेल्या व्रणांवर क्रीम लावत होती आणि दुसरी नर्स तिचं ब्लड प्रेशर बघत होती. तिच्या मानेवर आणि एका उजव्या हाताच्या मनगटावर बँडेज लावलेलं मी पाहिलं.
तेवढ्यात मला फोन आला आणि मी परत बाहेर गेलो. राजनायक आणि सुजाता कुठेतरी गायब झाले होते. काय खलबतं करत असतील दोघे? फोन बघितला तर अमोलचा होता.
“बॉडी नेली का तिथून?”
“हो. पोस्टमॉर्टेमसाठी. फोरेन्सिकवालेही काम संपवून गेले.”
मी त्याला मला आत्तापर्यंत कळलेल्या गोष्टी सांगितल्या. एन.आय.ए.ला या केसमध्ये वाटत असलेला रस आणि डॉ. संतोष त्रिवेदी हाताळत असलेल्या किरणोत्सर्गी पदार्थांबद्दल त्याला सांगितल्यावर तोही विचारात पडला.
“एक काम कर. या गॅलरीच्या आजूबाजूला चौकशी करायला सुरुवात कर. कुणीतरी काहीतरी पाहिलेलं असेल.”
“आत्ता? एवढ्या रात्री? लोक झोपलेले असतील.”
“मग त्यांची झोपमोड कर. काही फरक पडत नाही.”
अमोलने थोडं कुरकुरत फोन ठेवला. पण तसंही क्राइम सीनवरच्या फ्लडलाईट्समुळे, जनरेटरमुळे आणि तिथे पोलिसांच्या एवढ्या गाड्या पाहून तिथे राहणार्‍यांची झोप थोडीफार उडाली असणारच होती. आणि आत्ताच, लोकांची स्मरणशक्ती शाबूत असताना त्यांना विचारणं कधीही चांगलं.
मी परत जेव्हा हॉलमध्ये आलो, तेव्हा मेडिकल टीम आपलं काम आवरून निघायच्या बेतात होती. त्यांनी मला सांगितलं की अलिशा शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित आहे आणि तिला झालेल्या जखमा किरकोळ आहेत. त्यांनी तिला एक गोळी दिलेली मी पाहिलं होतंच. त्यामुळे आता घाई करणं गरजेचं होतं, कारण जर तिला त्या गोळीमुळे झोप आली असती, तर मग माझ्या तपासाला खीळ बसली असती.
सुजाता अलिशाच्या शेजारी बसली होती आणि राजनायक त्याच्या खुर्चीवर. मीही आणखी एक खुर्ची घेतली आणि अलिशाच्या समोर बसलो.
“मिसेस त्रिवेदी, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. तुम्ही आत्ता कुठल्या मनःस्थितीत आहात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण हे ज्याने कुणी केलंय त्याला किंवा त्यांना पकडणं आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही बोलण्याच्या मनःस्थितीत येईपर्यंत थांबणं आम्हाला खरंच शक्य नाही, आणि त्याबद्दल मी परत एकदा तुमची माफी मागतो. पण आम्हाला तुम्हाला आत्ताच प्रश्न विचारायचे आहेत.”
तिने समजल्याप्रमाणे मान डोलावली.
“ठीक आहे,” मी म्हणालो, “तुम्ही सुरुवातीपासून सांगा.”
“दोन माणसं,” ती हुंदका आवरत म्हणाली, “मी त्यांचे चेहरे कधीच पाहिले नाहीत. दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला तेव्हा कुणीच नव्हतं. मग मी जेव्हा दरवाजा बंद करायला गेले, तेव्हा ते अचानक आले. त्यांच्या चेहर्‍यावर मास्क्स होते आणि डोक्यावरही स्वेटशर्टला असतं तसं हूड होतं. त्यांनी मला आत ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. त्यातल्या एकाने माझ्या गळ्यावर धारदार चाकू ठेवला आणि मी जर त्यांच्या सांगण्याप्रमाणे केलं नाही, तर माझा गळा कापून मला ठार मारण्याची धमकी दिली.”
अच्छा. तिच्या मानेवर झालेली जखम याच्यामुळे होती.
“हे सगळं किती वाजता घडलं?” मी विचारलं.
“संध्याकाळी ६-६.३० वाजता,” ती आठवण्याचा प्रयत्न करत होती, “मी जेवणाची तयारी करत होते. संतोष साधारणपणे ७ वाजता घरी येतो आणि जर काही जरुरी काम असलं आणि उशीर होणार असेल तर फोन करतो.”
ती परत आपला चेहरा हातांच्या ओंजळीत धरून रडायला लागली. तिचा आवाज जडावत असल्याचं मला जाणवत होतंच. लवकरात लवकर पुढचे प्रश्न विचारायचे होते मला.
“त्या माणसांनी काय केलं मिसेस त्रिवेदी?”
“त्यांनी मला फरफटत बेडरूममध्ये नेलं आणि पलंगावर ढकललं. त्यांच्यातल्या एकाने मला माझ्या अंगावरचे कपडे काढायला लावले आणि मग त्यांनी – त्यांच्यातल्या एकाने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी घाबरले होते. मला वाटतं मी काहीतरी बोलले आणि मग त्याने मला थप्पड मारली आणि तो माझ्यावर ओरडला. मी रडायला लागले. त्याने मला शांत होऊन त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितली.”
“काय विचारलं त्याने तुम्हाला?”
“नाही, मला आठवत नाहीये. मी...मी खूप घाबरले होते.”
“आठवायचा प्रयत्न करा मिसेस त्रिवेदी. आम्हाला त्यांचा शोध घ्यायला मदत होईल.”
“त्याने मला विचारलं... घरात गन आहे का आणि...”
“एक मिनिट,” मी तिला थांबवलं, “आपण हळूहळू पुढे जाऊ. त्याने तुम्हाला विचारलं, की घरात गन आहे का. तुम्ही काय उत्तर दिलं त्याला?”
“मी हो म्हणाले,” तिने हुंदका दिला, “मी... मी खूप घाबरले होते. त्याने मला विचारलं की गन कुठे ठेवली आहे आणि मी सांगितलं की पलंगाच्या बाजूला जो ड्रॉवर आहे, तिथे. तुम्ही आम्हाला सावधगिरीचा इशारा दिल्यावर संतोषने ती गन घेतली होती.” ती सुजाताकडे पाहत म्हणाली.
“पण ते तुम्हाला त्याच गनने ठार मारतील अशी भीती तुम्हाला वाटली नाही का?” मी विचारलं, “तुम्ही का सांगितलंत त्यांना?”
“मला खूप भीती वाटत होती,” ती खाली मान घालून म्हणाली, “मी तिथे पलंगावर बसले होते. अंगावर काहीही नव्हतं. मला वाटलं की ते माझ्यावर बलात्कार करतील. मला त्याक्षणी काय वाटत होतं हे मला आत्ता आठवत नाहीये.”
मी मान डोलावली, “त्यांनी तुम्हाला आणखी काय विचारलं?”
“गाडीच्या चाव्या कुठे आहेत. मी तेही सांगितलं त्यांना.”
“तुमची गाडी?”
“हो. टॅव्हेरा. गराजमध्ये होती. चावी किचन काउंटरवर असते.”
“मी गराजमध्ये पाहिलं. रिकामं आहे.”
“ते घेऊन गेले असणार.”
राजनायक उभा राहिला, “तुमची गाडी आपल्याला शोधायला हवी मिसेस त्रिवेदी. गाडीचा नंबर सांगा मला.”
“मला असा आठवत नाहीये. गाडीच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये लिहिलेला असेल.”
“गाडी कोणाच्या नावावर आहे?”
“माझ्याच.”
“ठीक आहे. आम्ही शोधून काढू,” असं म्हणून तो फोन करण्यासाठी किचनमध्ये गेला.
“आणखी काय विचारलं त्यांनी तुम्हाला?” मी आमची प्रश्नोत्तरं परत चालू केली.
“त्यांना आमचा कॅमेरा हवा होता. माझ्या नवर्‍याला फोटोग्राफीची खूप आवड आहे...होती. तो फोटो काढायचा आणि त्याच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करायचा. मी त्यांना सांगितलं की कॅमेरा त्याच्या ऑफिसमध्ये असेल. मी एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर ते प्रश्न विचारणारा माणूस ते उत्तर दुसर्‍या माणसाला कुठल्यातरी दुसर्‍या भाषेत भाषांतरित करून सांगायचा. मग तो दुसरा माणूस बाहेर जायचा.”
“कुठल्या भाषेत प्रश्न विचारले त्याने तुम्हाला?”
“हिंदी आणि इंग्लिश. जास्तकरून इंग्लिश.”
सुजाता अचानक उठली आणि बाहेर जायला लागली.
“कुठल्याही गोष्टीला हात लावू नकोस.” मी म्हणालो, “माझी फोरेन्सिक टीम येतेय.”
तिने हात उंचावून समजल्याचा इशारा केला. ती गेली आणि राजनायक आत आला, “आम्ही तुमच्या गाडीसाठी सगळीकडे अॅलर्ट जारी केलाय.”
“मग काय झालं मिसेस त्रिवेदी?”
तिच्या डोळ्यांमधून परत अश्रू वाहायला लागले, “त्यांनी...त्यांनी मला बांधलं. माझे हात माझ्या पायांबरोबर बांधले आणि माझ्या तोंडात माझ्या नवर्‍याचा टाय बोळा करून कोंबला. मग जो माणूस कॅमेरा घ्यायला गेला होता, त्याने माझा फोटो काढला.” तिचा चेहरा लाल झाला होता.
“मग?”
“मग ते दोघेही निघून गेले. माझ्याशी बोलणार्‍या माणसाने मला सांगितलं की माझा नवरा येऊन माझी सुटका करेल. आणि तो गेला.”
“ते दोघेही ताबडतोब निघून गेले?”
तिने नकारार्थी मान डोलावली, “मी त्यांचा आवाज थोडा वेळ ऐकला. ते एकमेकांशी बोलत होते. मग गराजच्या दरवाजाचा आवाज ऐकू आला. दोनदा. मग काही नाही.”
“मी आत असताना मला तुम्ही सांगितलेली एक गोष्ट ऐकू आली.” राजनायक म्हणाला, “एक माणूस दुसर्‍या माणसाला दुसर्‍या भाषेत काहीतरी सांगत होता. कुठली भाषा होती काही सांगू शकाल?”
“नाही. माझ्याशी बोलणारा माणूस वेगळ्या पद्धतीने इंग्लिश आणि हिंदी बोलत होता. ते एकमेकांशी कुठल्या भाषेत बोलत होते ते समजलं नाही. अरेबिकसारखी वाटत होती. पण मला त्यातलं काही कळत नाही.”
आधीच माहीत असलेली कुठलीतरी गोष्ट सिद्ध झाल्याप्रमाणे राजनायकने मान डोलावली.
“त्यांनी मास्क्स घातले होते असं तुम्ही म्हणालात,” मी म्हणालो, “कशा प्रकारचे मास्क्स?”
तिने थोडा विचार केला, “फिल्ममधले दरोडेखोर घालतात तसे.”
“ओके. आणखी काही सांगू शकाल त्याबद्दल?”
“त्यांचे डोळे मी पाहू शकले नाही, कारण डोळ्यांच्या ठिकाणी छोट्या खाचा होत्या,” तिला आठवलं, “आणि तोंडाच्या ठिकाणी हे मास्क उघडे होते. हा इंग्लिश आणि हिंदी बोलणारा माणूस जेव्हा दुसर्‍या भाषेत बोलत होता, तेव्हा मी तो काय बोलतोय हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होते.”
“ग्रेट मिसेस त्रिवेदी. तुम्ही खरंच खूप चांगली माहिती दिलीत. मी तुम्हाला काय विचारायचं राहिलंय?”
“म्हणजे?”
“म्हणजे तुम्हाला असं काही आठवतंय का जे मी तुम्हाला विचारलं नाही?”’
“नाही. मला वाटतं मी तुम्हाला मला आठवतंय ते सगळं सांगितलंय.”
माझा अर्थातच यावर विश्वास बसला नाही. मी तिला तिने सांगितलेल्या गोष्टी परत सांगायची विनंती केली. मला त्यातून काही नवीन गोष्टी समजतात का ते बघायचं होतं. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत हे तंत्र – एखाद्या व्यक्तीला पुन्हापुन्हा त्याच गोष्टी सांगायला सांगणं – माझ्यासाठी नेहमीच परिणामकारक ठरलं होतं. आत्ताही त्याने मला दगा दिला नाही. अलिशाला तीच गोष्ट परत सांगताना आठवलं की तिच्याशी बोलणार्‍या त्या माणसाने तिला तिच्या ईमेल अकाउंटचा पासवर्ड मागितला होता.
“का?” माझा प्रश्न.
“मी नाही विचारलं,” ती म्हणाली, “मी फक्त त्यांना जे हवं होतं ते दिलं.”
ती तिची कहाणी दुसर्‍यांदा सांगून संपवत असताना फोरेन्सिक टीमचे लोक आले आणि मी प्रश्न विचारण्यापासून जरा ब्रेक घेतला. फोरेन्सिकवाल्यांनी मास्टर बेडरूममध्ये त्यांचं काम सुरू केलं. मी अमोलला फोन केला. त्याने सांगितलं की अजूनतरी काही पाहिलेला किंवा ऐकलेला साक्षीदार त्याला सापडलेला नाही.
“डॉ. संतोष त्रिवेदीच्या मालकीची गन होती. त्याबद्दल आपल्याला शोधून काढायला पाहिजे.”
“बरोबर,” तो म्हणाला, "बहुतेक त्याच्या स्वतःच्या गननेच त्याला मारलं असावं.”
मी फोन बंद केल्यानंतर मला सुजाताने बोलावलं. ती आणि राजनायक डॉ. त्रिवेदींच्या ऑफिसमध्ये उभे होते आणि तिथल्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहत होते.
“हे बघ,” ती मला म्हणाली.
“मी तुला सांगितलं होतं की फोरेन्सिकच्या लोकांचं काम होईपर्यंत कशालाही हात लावू नकोस.”
“तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे,” ती म्हणाली, “कॉम्प्युटर चालू होता, आणि तिचाच ईमेल अकाउंट उघडलेला आहे इथे. मी sent mailsमध्ये बघितलं. तिच्या ईमेल आयडीवरून डॉ. संतोष त्रिवेदीच्या ईमेल अकाउंटवर ६ वाजून २० मिनिटांनी मेल पाठवला गेलेला आहे.”
तिने एक क्लिक करून तो मेल पडद्यावर आणला. मेलच्या सब्जेक्ट लाईनमध्ये HOME EMERGENCY: READ IMMEDIATELY असं म्हटलं होतं.
मेलची अटॅचमेंट म्हणून अलिशा त्रिवेदीचा हात-पाय एकमेकांना एखाद्या धनुष्याप्रमाणे बांधलेला विवस्त्र फोटो होता. तो बघून कुणीही हादरला असता.
त्याच्या खाली इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं - WE HAVE YOUR WIFE. RETRIEVE FOR US ALL CESIUM SOURCES AVAILABLE TO YOU. BRING THEM IN SAFE CONTAINMENT TO MALABAR HILL GALLERY AT 8 O’CLOCK. WE WILL BE WATCHING YOU. YOU TELL ANYONE OR MAKE A CALL, WE WILL KNOW. THE CONSEQUENCE WILL BE YOUR WIFE BEING RAPED, TORTURED AND LEFT IN MANY PIECES TO COUNT. USE ALL PRECAUTIONS WHILE HANDLING SOURCES. DO NOT BE LATE OR WE WILL KILL HER.
मी हे दोनदा वाचलं. डॉ. त्रिवेदींना वाटलेली दहशत मलाही जाणवली.
“हे ज्याने कुणी लिहिलंय,” सुजाता म्हणाली, “त्याचं इंग्लिश एवढं चांगलं नाहीये, किंवा मग जाणूनबुजून हे वाचणार्‍यांच्या डोळ्यांत धूळ झोकायला केलेलं असावं.”
“त्यांनी हा मेल इथून पाठवलाय,” राजनायक म्हणाला, “आणि डॉ. त्रिवेदींना तो त्यांच्या ऑफिसमध्ये मिळाला. किंवा ते जिथे कुठे होते तिथे मिळाला.”
“हो. त्यांच्या वस्तूंमध्ये एक आयफोनही होता, बरोबर?” सुजाता माझ्याकडे पाहत म्हणाली.
“हो. आणि त्यांनी हा फोटोही पाहिला असणार.”
आम्ही काही वेळ तसेच स्तब्ध राहून त्या ईमेलचा डॉ. त्रिवेदींवर झालेला परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो.
शेवटी मी माझ्याजवळ असलेली माहिती द्यायचं ठरवलं. हे प्रकरण फारच पुढे गेलं होतं.
“मला एक गोष्ट आठवली. डॉ. त्रिवेदींच्या वस्तूंमध्ये एक आयडी कार्ड होतं. एस.एस.के.टी. हॉस्पिटलचं. हे वरळीच्या जवळ असलेलं हॉस्पिटल आहे.”
राजनायक माझ्या दिशेने वळला, “तुला हे आत्ता आठवलं? एवढी महत्त्वाची गोष्ट? आत्ता?” तो चिडला होता.
“हो. मी विसरलो...”
“त्याने काहीही फरक पडत नाही,” सुजाता म्हणाली, “एस.एस.के.टी. स्त्रियांसाठी आणि विशेषतः त्यांना होणार्‍या कॅन्सरवर उपचार आणि संशोधन यासाठी प्रसिद्ध आहे आणि सीशियमचा वापर जास्त करून गर्भाशय आणि गर्भाशयमुखाच्या कॅन्सरसाठी होतो.”
मी होकारार्थी मान डोलावली, “मग आपल्याला ताबडतोब निघायला पाहिजे.”
“ठीक आहे.” राजनायक म्हणाला, “सुजाता, तू इथेच थांब. अलिशाकडून अजून काही माहिती मिळते का बघ. मी आणि राजेंद्र – आम्ही एस.एस.के.टी.मध्ये जातो आणि सीशियमची काय परिस्थिती आहे, ते बघतो.”
तिला बोलायची संधी न देता तो बाहेर गेला. मीही त्याच्यापाठोपाठ धावलो. माझी गाडी घ्यायचा माझा विचार होता, पण राजनायक माझ्या गाडीतून आला नसता. त्यामुळे मी तो विचार सोडून दिला, आणि त्याच्या गाडीतून गेलो.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
एस.एस.के.टी. हॉस्पिटल वरळी सीफेसच्या जवळ, पोचखानवाला रोडवर होतं. कफ परेड ते वरळी हे अंतर बरंच होतं, पण आत्ता रात्री रस्त्यांवर वर्दळ नव्हती, त्यामुळे आम्ही वेगाने चाललो होतो. राजनायक गाडी चालवता चालवता अव्याहतपणे फोनवर इतर एजंट्सशी, हाताखालच्या लोकांशी, वरिष्ठांशी असा चौफेर बोलत होता. हे सगळं प्रकरण कुठल्यातरी वेगळ्याच पातळीवर चाललं होतं. डॉ. त्रिवेदींना पाठवल्या गेलेल्या ईमेलने एका फटक्यात या साध्यासरळ वाटणार्‍या केसला सैतानी परिमाण दिलं होतं.
आम्ही केम्प्स कॉर्नर पार करून पेडर रोडवरून हाजी अलीच्या जवळ आल्यावर त्याने फोन बाजूला ठेवला, “आमची एक टीम हॉस्पिटलकडे जातेय. ते हॉस्पिटलमधल्या सेफमध्ये सीशियम सुरक्षित आहे की नाही हे बघतील.”
“कुठली टीम?”
“आम्ही त्यांना रॅट म्हणतो,” तो जाणवेल न जाणवेल असा हसला, “RAT – Radiological Attack Team."
“किती वाजेपर्यंत पोहोचतील ते तिथे?”
“आपल्या आधी. त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे.”
अरे वा! याचा अर्थ एन.आय.ए.कडे एक तातडीने कामाला लागणारी टीम आहे. त्यांनाही माझ्याप्रमाणेच मध्यरात्री कॉल आला असणार.
“राज्य आणि केंद्र – दोन्हीही होम मिनिस्ट्रीज याकडे लक्ष ठेवून आहेत.” राजनायक समोर पाहत म्हणाला, “आणि संरक्षण मंत्रालयसुद्धा आणि कदाचित पी.एम.ओ.पण.” अच्छा! म्हणून त्याला इथे स्वतः यायचं होतं तर! बिचारी सुजाता!
“मला एक सांग,” मी विषय बदलला, “सीशियम हा काय प्रकार आहे?”
“तुला सुजाताने नाही सांगितलं त्याबद्दल?”
“फारसं नाही.”
“ओके. युरेनियम आणि प्लुटोनियम एकत्र आल्यानंतर त्या प्रक्रियेत सीशियम तयार होतं. चेर्नोबिलबद्दल ऐकलं आहेस का तू? रशियामध्ये अणुभट्टीचा स्फोट झाला होता...”
“हो, ऐकून माहीत आहे.”
“त्या स्फोटामध्ये सीशियमचा बराच मोठा साठा वातावरणात फेकला गेला होता. हा एक धातू आहे. तो चांदीसारखा दिसतो, पण थोडी राखाडी छटा असते. पावडर किंवा पट्ट्या – त्यांना पेलेट्स म्हणतात – यांच्या स्वरूपात येतो.”
“आणि त्यापासून कशा स्वरूपात धोका आहे आपल्याला?”
राजनायकने थोडा विचार केला, “ओके. या पट्ट्या एखाद्या खोडरबरसारख्या दिसतात. त्यांचा आकार तसाच असतो. ही पट्टी एका स्टेनलेस स्टील ट्यूबमध्ये ठेवली जाते. ही ट्यूब .४५ गनच्या गोळीसारखी दिसते. त्याचा उपयोग तर तू ऐकला असशीलच. ज्या स्त्रीच्या गर्भाशयात कॅन्सर आहे तिच्या शरीरात ही ट्यूब ठेवली जाते. एक औषध म्हणून हे खूप परिणामकारक आहे असं ऐकलंय. ज्या ठिकाणी कॅन्सर आहे, तो भाग सीशियममुळे किरणोत्सर्गाने प्रभावित होतो. ही ट्यूब किती वेळ ठेवायची ते ठरवणं हे डॉ. त्रिवेदीसारख्या लोकांचं काम असतं. जेव्हा अशा स्वरूपाची केस येते, तेव्हा त्रिवेदीसारखे लोक हॉस्पिटलच्या सेफमधून सीशियम काढतात, आणि जो ऑन्कॉलॉजिस्ट ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, त्याला स्वतः नेऊन देतात, जेणेकरून त्या डॉक्टरला सीशियम कमीत कमी वेळ हाताळावं लागेल, कारण तो ऑपरेशन थिएटरमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रतिबंधात्मक पोशाख वगैरे घालू शकत नाही.”
“ओके,” मेडिकल फिजिसिस्ट म्हणजे नक्की काय असतो, याबद्दल माझ्या मनात असलेला संभ्रम दूर झाला होता, “पण मग जो सीशियम हाताळतो – डॉ. त्रिवेदीसारखे लोक – त्यांना काय प्रकारचं संरक्षण असतं?”
“सीशियम किंवा कुठल्याही किरणोत्सर्गी पदार्थातून जे गॅमा किरण बाहेर पडतात, त्यांना एकच गोष्ट अडवू शकते – शिसं. ज्या सेफमध्ये या सीशियमच्या पट्ट्या ठेवलेल्या असतात, त्या सेफला आतून शिशाचं आवरण असतं. ज्या साधनातून ते इकडे-तिकडे नेलं जातं, ते साधनही शिशाचंच बनवलेलं असतं.”
“ओके. मग जर हे सीशियम बाहेर गेलं आणि लोक त्याच्या संपर्कात आले, तर परिस्थिती कितपत वाईट होऊ शकते?”
“ते किती सीशियम आहे, कशा प्रकारे लोक त्याच्या संपर्कात येताहेत आणि कुठे – त्यावर अवलंबून आहे,” राजनायक शांतपणे म्हणाला, “सीशियमचा अर्धआयुष्य काळ हा ३० वर्षांचा आहे. असे १० अर्धंआयुष्य काळ म्हणजे सुरक्षित असं आजकाल मानलं जातं.”
हे माझ्या डोक्यावरून गेलं होतं. “म्हणजे?”
“म्हणजे त्याच्या किरणोत्सर्गापासून असलेला धोका दर तीस वर्षांनी अर्धा होतो. जर बर्‍यापैकी सीशियम एखाद्या बंद जागेत – रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट वगैरे – पसरवण्यात आलं, तर ती जागा पुढच्या तीनशे वर्षांसाठी पूर्णपणे निकामी होऊन जाईल.”
हे ऐकून कुणीतरी खाडकन मुस्कटात मारावी तसा सुन्न झालो मी.
“आणि लोक?” माझ्या तोंडातून कसाबसा आवाज आला.
“तेही मी सांगितलं त्या गोष्टींवर अवलंबून आहे – किती, कुठे आणि कसं. जर तुम्ही बर्‍याच सीशियमच्या संपर्कात आलात, तर काही तासांत तुमचं काम आटपू शकतं. पण IED वापरून एखाद्या जागेत जर सीशियम पसरवण्यात आलं तर ताबडतोब मरणारे लोक कमी असतील, पण त्याचा खरा परिणाम हा मानसिक असेल. विचार कर – असं काही घडलं आणि तेही मुंबईसारख्या शहरात – फार भयानक होईल ते. लोकांच्या मनात कायमची भीती बसेल.”
आम्ही एस.एस.के.टी. हॉस्पिटलच्या दरवाजातून आत शिरत असतानाच हेलिकॉप्टरचा घरघराट ऐकू आला आणि पाठोपाठ ते हॉस्पिटलच्या हिरवळीवर उतरतानाही दिसलं. त्याच्यातून चार जण उतरले आणि धावतच आमच्या दिशेने आले. चौघांच्याही अंगावर किरणोत्सर्ग प्रतिबंधक पोषाख किंवा रेडिएशन सूट होता. त्यांचा प्रमुख – त्याच्या सूटवर असीम असं लिहिलं होतं आणि त्याच्या हातात सुजाताकडे असलेल्या रेडिएशन मॉनिटरसारखाच पण थोडा मोठा मॉनिटर होता.
राजनायक त्यांना घेऊन हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये गेला. माझ्यासाठी इथे करण्यासारखं काहीही नव्हतं आणि तसंही राजनायकचा हडेलहप्पीपणा इथे गरजेचा होता. त्याने तिथल्या रिसेप्शनिस्टला रीतसर धमकी वगैरे देऊन हॉस्पिटलच्या सिक्युरिटी इन चार्जला त्याच्या घरून बोलावलं आणि हॉस्पिटलची लॅब उघडायला लावली. सिक्युरिटी इन चार्जला यायला वेळ लागणार होता, पण राजनायक थांबायला तयार नव्हता. त्याने त्याच्याकडून लॅब प्रोटोकॉल्सची मागणी केली, आणि न दिल्यास त्याला घरी येऊन अटक करायची धमकी दिली.
प्रोटोकॉल्स मिळाल्यावर त्याने ते असीमला दिले. असीम आणि त्याच्या टीममधला आणखी एक असे दोघे जण लॅबमध्ये गेले. लॅबच्या दरवाज्याच्या वर आतल्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा होता आणि बाहेर लॉबीमध्ये असलेल्या स्क्रीनवर आम्ही लॅबमध्ये काय चाललंय ते बघू शकत होतो.
“तो सात वाजता आला होता इथे.” राजनायक हॉस्पिटलचा व्हिजिटर लॉग तपासत होता, “आणि इथे असंही नमूद केलेलं आहे – त्यानेच – की त्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये असलेल्या मिसेस आरती संकलेचा नावाच्या एका पेशंटसाठी सीशियमची एक ट्यूब नेलेली आहे, आणि आता या हॉस्पिटलच्या स्टॉकमध्ये ३१ ट्यूब्ज शिल्लक आहेत.”
दरम्यान असीम आणि त्याचा सहकारी लॅबमध्ये आलेले आम्ही मॉनिटरवर पाहिलं, आणि तिथला प्रॉब्लेम एका क्षणात माझ्या लक्षात आला. कॅमेरा अशा प्रकारे लावलेला होता, की सेफच्या दरवाज्यासमोर उभा असलेला माणूस सहजपणे कॅमेर्‍याला चकवू शकत होता. जर डॉ. त्रिवेदीने सेफमधून एखादी गोष्ट काढली असती, तर बाहेर मॉनिटरवर पाहत असलेल्या कुणाच्याही ते लक्षात येणं कठीण होतं. जवळपास अशक्यच.
आतमध्ये गेल्यापासून दोन मिनिटांनी असीम आणि त्याचा सहकारी बाहेर आले. असीमच्या चेहर्‍यावर भीती स्पष्टपणे दिसत होती, “रिकामी आहे सेफ, पण हे सापडलंय त्यात.”
त्याच्या हातात एक कागद होता.
मी राजनायकच्या बाजूला गेलो. त्या कागदावर काय लिहिलं होतं, ते नीट वाचता येत नव्हतं. राजनायकने एक-एक शब्द लावत ते मोठ्याने वाचलं, “माझ्यावर कोणीतरी पाळत ठेवून आहे. जर मी हे केलं नाही, तर ते माझ्या पत्नीला ठार मारतील. सीशियमच्या ३२ ट्यूब्ज... मला माफ करा....”
आम्ही सगळे तिथे स्तब्धपणे उभे होतो. आम्ही सगळे अशा व्यवसायात होतो, जिथे गुन्हे, गुन्हेगार, शस्त्रं, मृत्यू, मानवी स्वभावातल्या सगळ्या नकारात्मक आणि काळ्याकुट्ट गोष्टींशी आमचा दररोजचा सामना होत होता, आणि भीती ही एक अनिवार्य गोष्ट असली, तरी आम्ही तिला सामोरं जाऊ शकत होतो, पण ही भीती काहीतरी वेगळीच होती. डॉ. त्रिवेदींनी ३२ सीशियम ट्यूब्ज हॉस्पिटलच्या लॅबमधून बाहेर काढल्या होत्या आणि काही पूर्णपणे अनोळखी आणि खुनशी लोकांना दिल्या होत्या. त्याच लोकांनी मलबार हिलच्या गॅलरीच्या जवळ त्यांना ठार मारलं होतं.
“३२ ट्यूब्ज!” मला ही शांतता खायला उठली होती, "काय होईल त्यामुळे?”
“आपल्याला शास्त्रज्ञ लोकांना विचारायला हवं. पण जे होईल ते जबरदस्त असेल.” राजनायकने स्वतःच्या आवाजावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवलं होतं, “आपल्या कानाखाली काढलेला सर्वात मोठा आवाज!”
त्या क्षणी मला एक गोष्ट आठवली. एक विसंगती.
“एक मिनिट,” मी म्हणालो, “डॉ. त्रिवेदींच्या बोटांमध्ये त्या TLD रिंग्ज होत्या. त्या काळ्या पडल्या नव्हत्या. असं कसं शक्य आहे, की त्याने इथून सीशियमच्या ३२ ट्यूब्ज बाहेर काढल्या आणि तरी त्या रिंग्ज पांढर्‍या होत्या?”
राजनायकने नकारार्थी मान हलवली, “त्याने पिग वापरला असणार.”
“पिग?”
“या ट्यूब्ज इथून दुसरीकडे हलवण्यासाठी वापरतात. पूर्णपणे शिशाचा बनवलेला एक डबा किंवा बॉक्स असतो. दुरून तो एखाद्या ट्रॉलीवर ठेवलेल्या बादलीसारखा दिसतो. खाली चाकं असतात. त्याचं वजन खूप असतं आणि त्याचा आकार डुकरासारखा वाटतो. त्यामुळे त्याला पिग म्हणतात.”
“पण डॉ. त्रिवेदी इथून हा पिग आणि त्यामध्ये सीशियमच्या ३२ ट्यूब्ज घेऊन बाहेर पडला? इतक्या सहज?”
“एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये सीशियम घेऊन जाणं हे नेहमीच होतं. त्याने एक ट्यूब नेतोय असं सांगितलं, पण प्रत्यक्षात ३२ घेऊन गेला. पण इथे कोण त्या पिगचं झाकण उघडून बघणार आहे?”
त्या वेळी मला डॉ. त्रिवेदींच्या गाडीच्या डिकीमधल्या लाल कार्पेटवर उमटलेल्या खुणा आठवल्या. चौकोनी आणि जड. नक्कीच हा पिग असणार. सगळ्या गोष्टी जुळत होत्या, आणि एक अभूतपूर्व संकट आ वासून उभं आहे, याची जाणीवसुद्धा.
“मला एक फोन करायला पाहिजे.” राजनायक तिथून जरा बाजूला गेला. मलाही एक फोन करायचा होता. अमोलला.
“अमोल, मी बोलतोय.”
“बोला सर. काही समजलं?”
“समजलं, पण चांगली बातमी नाहीये. डॉ. त्रिवेदींनी सेफमधून सीशियमच्या ३२ ट्यूब्ज बाहेर काढल्या आहेत.”
“बापरे!”
“आणि एखादा बाँब बनवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.”
“३२ ट्यूब्ज पुरेशा आहेत बाँबसाठी?”
“मी ज्या एन.आय.ए. एजंटबरोबर इथे आलोय, त्याच्या मते हो. बरं, तू आहेस कुठे?”
“मी मलबार हिलच्या जवळच आहे, आणि मला एक पोरगा सापडलाय. त्याने कदाचित काय घडलंय ते पाहिलंय.”
“काय?”
“हो. हा पोरगा कदाचित साक्षीदार आहे डॉ. त्रिवेदींच्या खुनाचा.”
“कदाचित साक्षीदार म्हणजे? कोण आहे कोण हा? तिथेच राहतो?”
“नाही. त्याची स्टोरी थोडी विचित्र आहे. या मलबार हिल गॅलरीजवळ काही बंगले आहेत, त्यातला एक बंगला प्रियांका चोप्राचा आहे.”
“अच्छा! मग?”
“मलाही हे माहीत नव्हतं, पण नक्कीच हे छापून आलं असणार, कारण या मुलाला ते बरोबर माहीत होतं. मी आणि पी.एस.आय. गायतोंडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळीकडे चौकशी करत होतो. या बंगल्यामध्ये कुणीच नव्हतं, पण आउटहाउसमध्ये बंगल्याचा केअरटेकर राहतो. मी त्याच्याशी बोललो. त्यानेही इतर लोकांप्रमाणे काही पाहिलं वगैरे नव्हतं. त्याच्याशी बोलून आम्ही निघत होतो, तेवढ्यात एका झाडामागे हा मुलगा लपलेला आहे, हे मी पाहिलं. मला आधी वाटलं की ज्यांनी डॉ. त्रिवेदींना मारलं, त्यांच्यापैकी एखादा पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी इथे लपून बसलाय की काय? आम्ही त्याला घेरला आणि बाहेर यायला सांगितलं. तो जेमतेम २० वर्षांचा आहे आणि सुरतवरून इथे आलाय. त्याला असं वाटलं होतं, की प्रियांका चोप्रा इथेच राहते. तो भिंतीवर चढून तिच्या बंगल्याच्या आवारात गेला होता.”
“पण त्याने डॉ. त्रिवेदींचा खून होताना पाहिलंय का?”
“तो म्हणाला की त्याने काहीही पाहिलेलं किंवा ऐकलेलं नाही, पण मला माहीत नाही सर. मला असं वाटतंय की जेव्हा मलबार हिलच्या गॅलरीच्या इथे डॉ. त्रिवेदींना मारण्यात आलं, तेव्हा तो तिथेच असणार. हे घडताना बघून तो घाबरला. मग लपून बसला आणि आम्हाला सापडला.”
मला लगेचच यातली विसंगती दिसली.
“पण लपला का तो? तो तिथून पळून जाऊ शकला असता. डॉ. त्रिवेदींना ८च्या सुमारास मारण्यात आलं, वायरलेस तिथून सव्वाअकरा वाजता गेली आणि त्यांना मृतदेह सापडला. तुम्हाला तो एक-दीडच्या सुमारास सापडला असेल. एवढा वेळ तो काय करत होता तिथे?”
“हो सर. हा भाग थोडा विचित्र आहे. पण मला असं वाटतंय की तो कदाचित घाबरला असेल की खून झाला आणि त्याला कुणी पाहिलं, तर त्यांना वाटेल की त्यानेच खून केलाय.”
हे शक्य होतं.
“तू गायतोंडेला त्याच्याविरुद्ध केस नोंदवायला सांगितलीस ना?”
“हो. ट्रेसपास केस. मी त्या केअरटेकरशीही बोललो. तो ऑफिशियल तक्रार वगैरे करायला तयार आहे. काळजी करू नका सर. हा पोरगा कुठेही जात नाही. काय झालंय ते आपण त्याच्याकडून व्यवस्थित काढून घेऊ.”
“गुड! एक काम कर, त्याला आपल्या कुलाबा ऑफिसला ने आणि आपल्या रूममध्ये ठेव.”
“चालेल सर.”
“आणि सीशियम किंवा मी आत्ता जे सांगितलं, त्याबद्दल कुणालाही सांगू नकोस.”
“हो सर.”
“आणि डॉ. त्रिवेदींच्या घराचा पत्ता मी तुला पाठवतोय. फोरेन्सिकच्या लोकांनी तिथे जमा केलेला सगळा पुरावा कुलाबा ऑफिसला घेऊन ये.”
“ठीक आहे सर.”
मी फोन बंद केला. राजनायक अजूनही फोनवर बोलत होता. तो ज्या पद्धतीने उभा होता, आणि बोलत होता, त्यावरून दुसर्‍या बाजूला त्याचा बॉस किंवा त्याच्याही वरचा कोणीतरी असावा हे कळत होतं. एकतर बराच वेळ तो न बोलता फक्त ऐकत होता, आणि दोन-तीन वेळा त्याचं वाक्य त्याला पूर्ण करता आलं नाही.
“हो सर,” तो शेवटी म्हणाला, “आम्ही सगळे आता परत जातोय.”
फोन बंद करून त्याने माझ्याकडे पाहिलं, “मी हेलिकॉप्टरमधून जातोय. मला दिल्ली ऑफिसबरोबर बोलायला पाहिजे. तू एक काम कर. माझी गाडी घेऊन जा.” त्याने माझ्या हातात गाडीची चावी दिली, “आणि कफ परेडला त्रिवेदींच्या बंगल्यात सुजाता आहे, तिला दे. ती माझी गाडी घेऊन येईल. तुझी गाडीही तिथेच आहे, बरोबर?”
“हो.”
“तुझ्या सहकार्‍याला कुणी साक्षीदार सापडलाय का? मी जे ऐकलं त्यावरून वाटलं मला!”
एकीकडे फोनवर बोलत असताना माझ्या बोलण्याकडेही लक्ष ठेवून होता हा माणूस! सहीच!
“बहुतेक. काही निश्चित कळलेलं नाहीये अजून. मी माझी गाडी घेऊन तिथेच जाणार आहे.” मी म्हणालो.
त्याने माझ्या हातात एक कार्ड दिलं, “माझे सगळे नंबर्स आहेत यावर. जर काही समजलं, कॉल कर. आणि हो, सकाळी ९ वाजता या केसचा आढावा घेण्यासाठी मीटिंग बोलावलेली आहे. तुला आणि तुझ्या सहकार्‍याला या मीटिंगमध्ये आम्ही सामील करून घेणार आहोत. तोपर्यंत काही झालं, तर बघू.”
त्याने सांगितल्याप्रमाणे मी डॉ. त्रिवेदींच्या बंगल्यात जाऊन राजनायकच्या गाडीची चावी सुजाताला दिली आणि माझी गाडी तिथून घेतली आणि क्राइम ब्रँचच्या कुलाबा ऑफिसच्या दिशेने निघालो. गेल्या एक-दीड तासांत गोष्टी काहीच्या काही बदलल्या होत्या. एन.आय.ए.ला सीशियम महत्त्वाचं होतं, पण मला हा खून कुणी केला ते शोधून काढायचं होतं. हा एका खुनाचा तपास आहे, याचा मला कुठल्याही परिस्थितीत विसर पडायला नको होता.
“जर खुनी सापडले, तर सीशियमसुद्धा सापडेल,” मी स्वतःशीच म्हणालो.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
क्राईम ब्रँचच्या कुलाबा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी अमोलला फोन केला. त्याने या मुलाला – त्याचं नाव रोहित खत्री होतं – आमच्या खास खोलीत ठेवलं होतं आणि तिथला एसी बंद करून ठेवला होता. या मुलाकडे एक मध्यम आकाराची हॅवरसॅक होती. मी आधी ती धुंडाळायचं ठरवलं. मला अर्थातच काही महत्त्वाचं मिळेल याची अपेक्षा नव्हतीच.
ती अपेक्षा १० मिनिटांतच पूर्ण झाली, कारण सॅकमध्ये खरोखर काहीही नव्हतं. दोन-तीन शर्ट, दोन जीन्स, एक टूथब्रश, एक टूथपेस्ट, एक पार्ले बिस्किटांचा पुडा आणि एक पाण्याची बाटली. त्याला ट्रेसपासिंगच्या आरोपावरून अटक केलेली असल्यामुळे, निदान तसं दाखवलेलं असल्यामुळे त्याच्याजवळ सापडलेलं बाकीचं सामान झिपलॉक बॅग्जमध्ये ठेवलं होतं. त्यात थोडे पैसे होते – जवळपास ७०० रुपये असतील, एक ड्रायव्हिंग लायसन्स होतं आणि सुरतमधल्या कुठल्यातरी कॉलेजचं आयडी कार्ड होतं.
मी जेव्हा रोहित खत्रीला ठेवलेल्या खोलीत गेलो, तेव्हा तिथे प्रचंड गरम होत होतं. अर्थात, तोच हेतू होता. बरेच वेळा एखादा संशयित माणूस या गरमीला कंटाळून आम्हाला हवं ते सांगून टाकायचा. आत जाण्याआधी मी बाहेरून त्याच्याकडे एक नजर टाकली होती. अगदीच पोरसवदा होता. अमोलने तो २० वर्षांचा आहे असं सांगितलं होतं, पण तो जेमतेम १७-१८ वर्षांचा दिसत होता. अंगावरचे कपडे मळलेले होते. बहुतेक एक-दोन दिवस आंघोळही केली नसेल. चेहर्‍यावरचे भाव धास्तावलेले होते. त्याला प्रचंड उकडत असावं, पण दोन्ही हात हातकड्यांमध्ये अडकलेले आणि त्या हातकड्या समोरच्या टेबलाला अडकवलेल्या असल्यामुळे त्याला घाम पुसताही येत नव्हता.
“काय म्हणतोस रोहित?” मी आत येत विचारलं.
त्याने माझ्याकडे पाहिलं, पण मी काय बोललो ते त्याला समजलं नव्हतं बहुतेक.
“खूप गरम होतंय इथे,” तो हिंदीत म्हणाला.
अच्छा, याला मराठी येत नाही तर. मग मला आठवलं की तो सुरतहून आलाय. मग मीही हिंदीत बोलायचं ठरवलं. तेव्हा माझं लक्ष त्याच्या हातांत अडकवलेल्या हातकड्यांकडे गेलं. हे एक अमोलने चांगलं केलं होतं. जर याला आपल्याला खरंच अटक झाली आहे असं वाटलं, तर तो कदाचित त्यातून सुटण्यासाठी खरं काय ते सांगेल. अर्थात हा एक धोका होता, की तो मला जे ऐकायचं आहे तेच सांगेल, पण तो एवढा बनेल वाटत नव्हता.
माझी नजर त्याच्या हातकड्यांवर पडलेली पाहून त्याने मला विनंती करायचं ठरवलं असावं, “सर, मी काही केलेलं नाहीये. मला का इथे आणण्यात आलंय?”
“कसं आहे ना रोहित,” मी शांतपणे म्हणालो, “तुझ्या एखाद्या गर्लफ्रेंडच्या घरात घुसणं वेगळं आणि एका सेलिब्रिटीच्या बंगल्यात घुसणं वेगळं. इथे नियम वेगळे आहेत. आम्ही आमच्या फिल्मस्टार्सची काळजी घेतो, समजलं? तू आज रात्री जे केलं आहेस, त्याची शिक्षा खूप मोठी आहे.”
“पण सर, प्रियांका चोप्रा तर तिथे राहातपण नाही.”
“त्याने काहीही फरक पडत नाही,” मी थंडपणे म्हणालो, “ तुला वाटलं की ती तिथे असेल, म्हणून तर तू तिथे गेलास, बरोबर?”
“पण सर, माझा खरंच तसा काही हेतू नव्हता....”
“असं प्रत्येक चोर, खुनी, गुन्हेगार म्हणतो.”
रोहितची नजर खाली गेली.
“मी काय म्हणतो,” मी म्हणालो, “एक चांगली गोष्ट आहे. तुला ऐकायची असेल तर सांगतो.”
त्याचे डोळे चमकले, “बोला सर.”
“तुझ्यावर ट्रेसपासचा म्हणजे दुसर्‍या कोणाच्या प्रॉपर्टीवर विनापरवानगी घुसण्याचा चार्ज लागलेला आहे. पण तू जर मला मदत केलीस, तर मी त्याबद्दल काहीतरी करू शकतो.”
“पण सर,” तो पुढे झुकायचा प्रयत्न करत म्हणाला, “मी त्या दुसर्‍या सरांनापण तेच सांगितलं की मी काहीही पाहिलेलं नाहीये.”
“तू त्याला काहीही सांगितलं असशील. मला खरं ऐकायचंय.”
“खरंच सांगतोय सर. देवाशपथ!”
“हे बघ बाळा,” मी त्याच्याकडे रोखून पाहात म्हणालो, “तुझं वय काय? एकोणीस? वीस? एवढ्या लहान वयात एवढं खोटं बोलू नये. आणि तू अमोलला जे सांगितलंस ना, त्यावर त्याचाही विश्वास बसलेला नाहीये. म्हणून तर त्याने मला तुझ्याकडे एकदा बघून घ्यायला सांगितलं. आता तुला मदत करायची माझी इच्छा होती, पण तू जर अडूनच बसला असशील, तर काय करणार?”
तो काहीच बोलला नाही.
“ओके,” मी माझं निर्वाणीचं अस्त्र काढलं, “मी अर्धं मिनिट देतोय तुला. जर तुला काही सांगायचं नसेल तर मग इथे थांबण्यात काही अर्थ नाही. तुझी केस मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये फाईल केलेली आहे. तिथे आम्ही तुला घेऊन जाऊ!”
तो काहीच बोलला नाही.
अर्धं मिनिट झाल्यावर मी जागेवरून उठलो, “ठीक आहे. तुझी मर्जी. तिथे पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुझी चामडी सोलून काढतील, तेव्हा तुला कळेल. तिथे एक गावडे म्हणून हवालदार आहे. त्याचा हात लागला, की कोणीही असो, पोपटासारखा बोलायला लागतो. तुला बहुतेक तेच हवं आहे!”
“नाही सर! प्लीज नको! माझं ऐका....”
“काय ऐका? काहीही ऐकायचं नाहीये मला....”
“ठीक आहे सर. मी.. मी सांगतो. मी सगळं पाहिलंय.”
मी त्याच्याकडे रोखून पाहिलं, “कशाबद्दल बोलतोयस तू?”
“मला त्या दुसर्‍या सरांनी त्या मर्डरबद्दल विचारलं होतं. मी त्यांना म्हणालो की मला काही माहीत नाही आणि मी काही पाहिलं नाही. पण तसं नाहीये. मी...मी..”
“कुठला मर्डर?”
“तो गॅलरीच्या तिथे झालेला मर्डर. सगळे पोलीस आणि त्यांच्या गाड्या त्याच्यासाठी आल्या होत्या...”
“तू पाहिलास तो?”
“हो सर!”
“आणि तू हे आम्हाला – पोलिसांना स्वतःहून सांगायला तयार आहेस?”
“हो सर.”
“ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव. जर तू खोटं बोलतो आहेस असा मला संशय जरी आला, तरी मी तुला स्वतः मलबार हिल पोलीस स्टेशनला नेईन आणि हवालदार गावडेच्या ताब्यात देईन.”
त्याने एक आवंढा गिळला.
“तुझे हात वरती कर,” मी म्हणालो आणि त्याने तसं केल्यावर त्याच्या हातातल्या हातकड्या मी सोडवल्या. त्याने लगेचच त्याची मनगटं चोळायला सुरुवात केली. अलिशा त्रिवेदीला मी असंच करताना पाहिलं होतं, त्याची मला आठवण झाली.
“ओके. आता सांग. अगदी सुरुवातीपासून. तू इथे मुंबईला का आलास?”
“सर, प्रियांका चोप्राला भेटायला!”
“का?”
“मला ती खूप आवडते. मला तिला आयुष्यात एकदा भेटायचंय.”
त्याने त्याची सगळी रामकहाणी सांगितली. तो सुरतहून मुंबईला फक्त प्रियांका चोप्राला भेटायला आला, हे मला पटत नव्हतं, पण ते मी सोडून दिलं. मला त्यात काही रस नव्हता. त्याने काय पाहिलं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्याने सांगितलं, की तो बसने आदल्या दिवशी सकाळी मुंबईला आला. बसने त्याला दादरला सोडलं. तिथे त्याने कुणाला तरी मलबार हिलला कसं जायचं ते विचारलं. त्या माणसाने त्याला का कुणास ठाऊक, पण महालक्ष्मी स्टेशनवर उतरायला सांगितलं. इथली लोकलची गर्दी पाहून तो प्रचंड भांबावला आणि गर्दी कमी होण्याची वाट पाहत राहिला. ते होईपर्यंत अर्थातच रात्र झाली आणि महालक्ष्मीवरून चालत चालत मलबार हिलजवळ जेव्हा तो पोहोचला, तेव्हा अंधार पडला होता. तो जेव्हा त्याला हवं तिथे पोहोचला, तेव्हा त्याला तिथे कुणीही दिसलं नाही. त्याला वाटलं की प्रियांका चोप्रा कदाचित थोड्या वेळाने तिथे येईल. तो तिच्या बंगल्याच्या एका भिंतीला टेकून बसला आणि दिवसभरच्या श्रमांनी दमलेला असल्यामुळे त्याला झोप लागली. पण नंतर त्याला अचानक जाग आली.
“कशामुळे?” मी विचारलं.
“माहीत नाही. मी अचानक झोपेतून उठलो. मला वाटतं मला आवाज ऐकू आले, त्यामुळे.”
“तू त्या गॅलरीपासून किती दूर होतास?”
“माहीत नाही. फार लांब पण नव्हतो. मला दूरवरून दिवे दिसत होते. तो नेकलेस की काय म्हणतात त्याचे.”
त्याच्या सांगण्यावरून मी अंदाज केला, की तो जवळपास १५० ते २०० मीटर्स एवढ्या अंतरावर असावा.
“तू जागा झाल्यावर काय ऐकलंस?”
“नाही. काही नाही. आवाज थांबले.”
“ठीक आहे. मग?”
“मला तीन गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. एक ऑडी होती. बाकीच्या दोन कोणत्या गाड्या होत्या ते नाही समजलं.”
“कोणी माणसं दिसली तुला?”
“नाही. तिकडे खूप अंधार होता. पण मग मी आणखी एकदा आवाज ऐकला. अंधारात. कोणीतरी जोराने ओरडल्यासारखा. त्याच वेळी लाइट चमकले – दोनदा आणि आवाजपण आले. गोळ्यांचे आवाज. त्या लाइटच्या प्रकाशात मला कुणीतरी गुडघ्यांवर बसलेलं दिसलं. पण हे सगळं इतक्या पटकन घडलं, की मला फक्त एवढंच दिसलं. सॉरी.”
“नाही, काही हरकत नाही. तू जे सांगितलंस, त्याने बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या. आता एकदा परत या गोष्टी सांग मला. तू बराच वेळ चालत प्रियांका चोप्राच्या बंगल्यापाशी पोहोचलास. मला एक सांग – तो तिचाच बंगला आहे, हे तुला कसं समजलं?”
“सर, त्याच्याबद्दल छापून आलं होतं. त्याचा फोटोपण आला होता. तिने तिच्या ट्विटर अकाउंटवरपण टाकले होते दोन-तीन फोटो. त्यामुळे मला तिचा बंगला कसा दिसतो ते माहीत होतं. आणि तिथून समुद्र दिसतो असंपण लिहिलेलं त्यात. त्यावरून मी शोधलं सर.”
वा! डोकं होतं या मुलाला!
“ठीक आहे. तू झोपला होतास, मग काहीतरी आवाज ऐकून तू उठलास आणि बघितलंस तर तुला तीन गाड्या दिसल्या. त्यातली एक ऑडी होती. बरोबर?”
“हो सर.”
“ठीक आहे. मग तू परत कुणाचा तरी आवाज ऐकलास आणि गॅलरीच्या दिशेने पाहिलंस. त्याच वेळी गोळीबार झाला.”
“हो सर.”
पण माझा अजूनही त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता. तो कदाचित मला जे ऐकायचं असेल, तेच सांगत असला तर? त्याची थोडी परीक्षा पाहायची असं मी ठरवलं.
“आता मला एक सांग – गोळीबाराचा आवाज झाला, नंतर त्या प्रकाशात तू एका माणसाला त्याच्या गुडघ्यांवर खाली पडताना पाहिलंस, बरोबर?”
“नाही सर. मी त्या माणसाला पडताना नाही पाहिलं. मला वाटतं तो गुडघ्यांवरच बसला होता.”
मी मान डोलावली. या मुलाने माझी परीक्षा पास केली होती.
“ओके. आता मला एक सांग – कोणीतरी जोराने ओरडलं आणि त्याचा आवाज तुला ऐकू आला, असं तू म्हणालास. काय ओरडला तो माणूस?”
रोहितने थोडा वेळ विचार केला आणि मग नकारार्थी मान हलवली.
“नक्की नाही सांगू शकत.”
“ठीक आहे. एक काम कर. तुझे डोळे बंद कर.”
“काय?”
“डोळे बंद कर,” मी म्हणालो, “आणि जे तुला आठवतंय त्याबद्दल विचार कर. जे बघितलंस, ते आठव आणि त्याच्याबरोबर जो आवाज होता, तोही तुला आठवेल. तू त्या तीन गाड्यांकडे बघतो आहेस आणि मग एका आवाजाने तुझं लक्ष गॅलरीच्या दिशेने वेधलं गेलं. काय होता तो आवाज?”
त्याने मी सांगितल्याप्रमाणे केलं.
“नक्की नाही सांगू शकत,” तो डोळे उघडून म्हणाला, “मला वाटतं की तो अल्ला असं काहीतरी म्हणाला, आणि मग त्याने गोळ्या झाडल्या.”
माझे डोळे विस्फारले.
“अल्ला? म्हणजे मुस्लीम लोक म्हणतात तसं?”
“नाही माहीत. मला तसं वाटलं.”
“अजून काही ऐकलंस का तू?”
“नाही. गोळ्यांच्या आवाजाने हे ओरडणं मध्येच थांबलं. अल्ला असा आवाज मी ऐकला आणि तो बाकी जे काय बोलला असेल, ते गोळ्यांच्या आवाजात दबून गेलं.”
“अल्लाहू अकबर असं काही म्हणत होता तो माणूस?”
“असू शकेल सर. मी फक्त अल्ला एवढाच आवाज ऐकला.”
मी जरा विचार केला, “मला एक सांग रोहित, तुला या खोलीत बंद करण्याआधी इन्स्पेक्टर अमोलने तुला काही सांगितलं होतं?”
“नाही सर.”
“या केसमध्ये आम्हाला काही सापडलंय त्याबद्दल?”
“नाही सर.”
“तू जेव्हा त्या बंगल्यात अमोलला सापडलास, त्याच्यानंतर तो फोनवर बोलत होता?”
“नाही सर. माझ्यासमोर कधीच नाही. मला इथे आणेपर्यंत ते कोणाशीही फोनवर बोलले नाहीत आणि गाडीमध्येही कोणी बोललं नाही.”
“ओके. मग काय झालं?”
“गोळीबार झाल्यानंतर मी पाहिलं की कोणीतरी गाड्यांच्या दिशेने पळालं. तो दुसर्‍या एका गाडीत बसला आणि त्याने ती गाडी ऑडीच्या जवळ आणली. अगदी जवळ आणि मग बाहेर येऊन ऑडीची डिकी उघडली. आणि...”
“एक मिनिट. हे सगळं चालू असताना तो दुसरा माणूस कुठे होता?”
“कोण दुसरा माणूस?”
“जो या गोळ्या मारणार्‍या माणसाच्या बरोबर होता. तीन गाड्या होत्या, बरोबर? एक गाडी मेलेल्या माणसाची, एक गाडी त्याला गोळी घालणारा माणूस चालवत होता. पण तिसरी गाडी होती ना.”
“नाही सर. मी एकच माणूस पाहिला – म्हणजे गोळ्या घालणारा एकच माणूस होता. जो त्याच्याबरोबर होता, त्याला मी नाही पाहिलं. त्या तिसर्‍या गाडीत – तुम्ही म्हणताय तसा कोणीतरी असणार – पण तो बाहेर आलाच नाही.”
“तू पाहिलंस तेवढा संपूर्ण वेळ तो गाडीतच होता?”
“हो. गोळीबारानंतर ती गाडी निघून गेली.”
“आणि त्या गाडीत जो माणूस होता, तो या संपूर्ण घटनेच्या दरम्यान एकदाही बाहेर आला नाही?”
“नाही सर.”
मी जरा विचारात पडलो. ही जरा अजब प्रकारची श्रमविभागणी झाली होती, आणि अलिशा त्रिवेदीने सांगितलेल्या घटनाक्रमाशी हे जुळतही होतं. एक जण तिला प्रश्न विचारत होता, आणि नंतर तेच भाषांतरित करून दुसर्‍याला सांगत होता आणि त्याला आदेशही देत होता. कदाचित तोच गाडीमध्ये बसून राहिला होता.
“ओके रोहित. मग काय झालं?”
“मग त्या माणसाने ऑडीच्या डिकीतून काहीतरी बाहेर काढलं. खूप जड असणार, कारण त्याला ते बाहेर काढताना खूप त्रास होत होता. चाकांवर असलेलं काहीतरी होतं आणि त्याला बाजूने कड्या होत्या आणि ढकलायला एक दांडापण होता.”
पिग. सीशियम एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवायला वापरलं जाणारं साधन.
“मग?”
“ते त्याने आपल्या गाडीच्या डिकीत ठेवलं आणि मग ऑडीची डिकी तशीच उघडी ठेवून तो आपल्या गाडीत बसून निघून गेला.”
“आणि तू अजून कुणालाही पाहिलेलं नाहीस?”
“नाही सर.”
“तू ज्याला पाहिलंस त्याचं वर्णन कर.”
“नाही करू शकत सर. त्याने एक स्वेटशर्ट घातला होता आणि त्याचं हूड डोक्यावर ओढून घेतलं होतं. त्याचा चेहरा मला दिसलाच नाही. एक सेकंदासाठीही नाही. मला वाटतं त्या हूडखाली त्याने एक मास्कपण चढवला होता चेहर्‍यावर.”
“मास्क?”
“हो. फिल्ममधले दरोडेखोर घालतात तसा.” मला परत अलिशा त्रिवेदीने केलेलं वर्णन आठवलं.
“तो अंगकाठीने कसा होता? उंच, धिप्पाड, बारीक, बुटका?”
“मध्यम उंचीचा असेल सर.”
“कसा वाटत होता? नॉर्थ इंडियन? साउथ इंडियन?”
“नाही सांगता येत सर. मी खूप दूर होतो आणि त्याने हूड ओढून घेतलं होतं, आणि चेहर्‍यावरही मास्क होता.”
“त्याचे हात कसे होते? जी गोष्ट त्याने ऑडीमधून स्वतःच्या गाडीत हलवली, त्याला बाजूला कड्या होत्या असं तू म्हणालास. त्याने ते हलवताना तू त्याचे हात पाहिले असशील. कसे होते त्याचे हात?”
रोहितने एक क्षणभर विचार केला आणि त्याचे डोळे चमकले, “त्याने ग्लोव्ह्ज घातले होते. दोन्ही हातांत. मी कधीकधी वेल्डर लोकांना हात जळू नयेत म्हणून तसले ग्लोव्हज घातलेलं पाहिलंय.”
ग्लोव्हज. संरक्षण करण्यासाठी. कदाचित किरणोत्सर्गी पदार्थांपासून संरक्षण करण्यासाठी. हे मी अलिशाला विचारलं नव्हतं. कदाचित सुजाताला तिने सांगितलं असल्याची शक्यता होती.
“ओके. ठीक आहे. हा गोळ्या मारणारा माणूस ज्या गाडीत बसला ती कोणती गाडी होती?”
“बहुतेक टॅव्हेरा होती. तशीच वाटली मला. अंधारात नीट दिसली नाही.”
मी विचार करायला सुरुवात केली. अलिशा त्रिवेदीची टॅव्हेरा होती आणि तिची चावी तिने तिच्या हल्लेखोरांना दिली होती. ते तिच्या घरी ६ ते ६.३० या वेळात गेले होते आणि त्यांनी डॉ. संतोष त्रिवेदींना मलबार हिल गॅलरीपाशी सीशियम घेऊन ८ वाजता बोलावलं होतं. हे सांगणारा ईमेल त्यांनी ६ वाजून २० मिनिटांनी पाठवला होता. डॉ. त्रिवेदींनी एस.एस.के.टी. हॉस्पिटलमधून ७च्या सुमारास सीशियम बाहेर काढलं होतं. त्रिवेदींचा खून ८ वाजता झाला असा अंदाज होता, त्याला रोहितच्या या सांगण्यामुळे दुजोरा मिळत होता. आत्तापर्यंत सगळं जुळत होतं.
“मला एक सांग रोहित,” मला एक मुद्दा आठवला, “गोळीबार झाल्यावर जी गाडी निघून गेली, ती कुठे गेली, काही कल्पना आहे?”
“सर, ती गाडी यू टर्न घेऊन गेली. बंगल्याच्या विरुद्ध दिशेने.”
“आणि ही गाडी? ज्या गाडीत तो गोळ्या झाडणारा होता ती?”
“तीही त्याच दिशेने गेली सर.”
“मग काय झालं?”
“काही नाही सर. एवढंच.”
“”तू काय केलंस नंतर?”
“मी? काही नाही. मी तिथेच बसून राहिलो.”
“तुला भीती नाही वाटली?”
“वाटली ना सर. माझ्या डोळ्यांसमोर... कुणाचा तरी खून होताना पाहून मला भीती तर वाटली ना!”
“तू त्या माणसाजवळ जाऊन पाहिलं नाहीस की तो नक्की मेलाय की अजून त्याच्यात थोडी धुगधुगी आहे?”
त्याने माझी नजर चुकवली, “नाही सर. मला भीती वाटली.”
“ओके. ते ठीक आहे. तू तसंही काही करू शकला नसतास. त्याला एवढ्या जवळून दोन गोळ्या आणि त्याही डोक्यात मारल्या गेल्या होत्या. तो जिवंत असण्याची काहीही शक्यता नव्हती. पण मला हे कळत नाहीये, की तू इतका वेळ थांबून का राहिलास? पोलिसांना का नाही बोलावलंस?”
“माहीत नाही सर. मी घाबरलो होतो. एकतर मला रस्ता माहीत नव्हता. मी ज्या रस्त्याने आलो होतो, तोच एक रस्ता मला माहीत होता. परत जायचं, तर मला तो माणूस जिथे पडला होता, तिथून जावं लागलं असतं. आणि जर तेव्हा पोलीस आले असते तर? त्यांनी मलाच खुनी ठरवलं असतं. आणि मला वाटलं की हे कुणा भाईने केलेलं असेल तर?”
“कुणी?”
“भाई – मुंबईत भाईच म्हणतात ना? त्यांनी केलेलं असेल आणि त्यांना मी सगळं पाहिलंय असं समजलं, तर ते मलाही उडवतील.”
“तू खूप फिल्म्स आणि टीव्ही पाहतोस असं दिसतंय. हरकत नाही. तुला कुणीही हात लावणार नाही ही जबाबदारी आमची आहे आता. अच्छा, तुझं वय काय आहे?”
“वीस.”
“प्रियांका चोप्रा थोडी मोठी नाहीये तुझ्यासाठी?”
“नाही सर. माझ्या बहिणीसाठी आलो मी इथे. तिला मिस इंडिया व्हायचं होतं. पण माझ्या घरच्यांना ते पसंत नव्हतं. त्यांनी तिचं लग्न करून दिलं. तिला प्रियांका चोप्रा खूप आवडते. म्हणून मला वाटलं होतं, की मी प्रियांकाला भेटेन आणि तिच्या फोटोवर तिची सही घेईन आणि माझ्या बहिणीला तो फोटो पाठवीन. तिला खूप बरं वाटलं असतं सर!”
“ओके,” मला हेही जरा विचित्र वाटत होतं, पण मी विषय सोडून द्यायचं ठरवलं, “तू मुंबईमध्ये राहतोस कुठे?”
“माहीत नाही सर. मी आज इथेच कुठेतरी झोपायचं ठरवलं होतं. मी तिथून निघून गेलो नाही त्याचं एक कारण हेही आहे. जाणार कुठे?”
“ठीक आहे,” मी उठून उभा राहिलो, “मला काही फोन करायचेत. त्यानंतर कदाचित तुझी ही स्टोरी तुला मला परत ऐकवावी लागेल. तुझ्या राहण्याची व्यवस्थापण करू या आपण.”
त्याने मान डोलावली.
“मी परत येईपर्यंत त्या तीन गाड्या आणि या घटनेबद्दल पुन्हा विचार कर. बघ तुला काही आठवतंय का.”
मी बाहेर गेलो आणि ए.सी. चालू केला.
माझं लक्ष माझ्या घड्याळाकडे गेलं. पहाटेचे साडेचार वाजले होते. राजनायक ज्या मीटिंगबद्दल बोलला होता, ती अजून साडेचार तासांनंतर होती.
अमोल शेळके एका टेबलवर काम करत होता. मी बघितलं, तर तो त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. त्याच्या टेबलच्या एका बाजूला या केसमधले फोरेन्सिक आणि पोलिसांनी जमा केलेले पुरावे ठेवले होते.
माझी चाहूल लागल्यावर त्याने वर पाहिलं, “काही बोलला तो पोरगा?”
“बरंच. सांगतो तुला. पण त्याआधी मला जेसीपी साहेबांना अपडेट देऊ दे. अच्छा, डॉ. त्रिवेदींच्या गनबद्दल काही समजलं?”
“हो सर. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी ही गन विकत घेतली होती. त्यांच्याकडे लायसन्सपण आहे. .२२ गन आहे.”
“ओके. .२२. म्हणूनच बहुतेक exit wound नाहीये.”
म्हणजे महिन्यांपूर्वी सुजाता आणि तिच्या पार्टनरने डॉ. संतोष त्रिवेदींना त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली होती. त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी गन विकत घेतली. आणि आता तीच गन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली होती. बहुतेक एका मुस्लीम दहशतवाद्याने अल्लाच्या नावाने त्यांच्या डोक्यात त्यांच्याच गनने गोळ्या झाडल्या होत्या.
“डॉ. त्रिवेदींना फार वाईट प्रकारे मरण आलं.” अमोल म्हणाला.
“तुला एक सांगतो अमोल,” मी म्हणालो, ”मरण हे वाईट प्रकारेच येतं. चांगल्या प्रकारे कुणालाही मरण येत नाही.”
एक निःश्वास सोडून मी जेसीपी साहेबांना फोन लावला आणि त्यांना आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना ऐकवल्या. मला आणखी एका गोष्टीसाठी त्यांच्याकडून परवानगी हवी होती – रोहित खत्रीसाठी हॉटेलची खोली. त्याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. निदान ९ वाजताच्या त्या मीटिंगपर्यंत. एन.आय.ए.ला आणि आयबीला क्राईम ब्रँचला या तपासात सहभागी करून घ्यायचं आहे की नाही याचा पत्ताही तेव्हाच लागला असता. त्यांना अर्थातच आमच्या साक्षीदाराशी बोलायचं असणार. तेव्हा मी मग त्याच्या मोबदल्यात त्यांच्या तपासात सहभागी होण्याची मागणी केली असती.
आपल्याला वाटलं त्यापेक्षा ही केस खूपच जास्त महत्त्वाची आहे, हे जेसीपी साहेबांनी मान्य केलं, आणि आम्हाला क्राईम सीनवर मिळालेला पुरावा तपासायला सांगितलं. ते अर्थातच मी करणार होतोच.
माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता डॉ. त्रिवेदींचा फोन, आणि त्यासाठी मला अमोलची मदत लागली असती. त्याला मोबाइल या प्रकारातलं खूपच जास्त कळायचं. मी मोबाइलवर बोलणं, मेसेज पाठवणं, फोटो काढणं वगैरे जुजबी कामं करू शकायचो पण त्याच्यापलीकडे काही करणं म्हणजे माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती, पण दर ३-४ महिन्यांनी मोबाइल बदलणार्‍या अमोलसाठी तो डाव्या हाताचा मळ होता. आत्ताही त्यानेच ते हातात घेतलं. पहिल्यांदा त्याने डॉ. त्रिवेदींना आलेला तो ईमेल स्वतःच्या लॅपटॉपवर घेतला आणि त्याचा प्रिंटआउट काढला.
“डॉ. त्रिवेदींना आज दिवसभरात किती आणि कोणाकडून कॉल्स आले ते बघ.” मी अमोलला सांगितलं.
त्याने सुरुवात केली, “सकाळी ८ वाजल्यापासून कॉल्स सुरू झालेले आहेत. सकाळचे बरेचसे कॉल्स हे त्यांच्या फोनमध्ये असलेल्या नंबर्सवर केलेले आहेत, किंवा तिथून आलेले आहेत. हे कॉल्स एकतर इतर डॉक्टरांना केलेले आहेत, किंवा त्यांनी डॉ. त्रिवेदींना केलेले आहेत. काही कॉल्स हॉस्पिटल्सना केलेले आहेत. अगदी लंच टाईमपर्यंत हे असंच आहे. त्यानंतर डॉ. त्रिवेदी आणि त्यांच्या पार्टनरमध्ये तीन कॉल्स झालेले आहेत.”
“पार्टनरबद्दल तुला कसं समजलं?”
“त्यांच्या ब्रीफकेसमध्ये काही व्हिजिटिंग कार्डस होती. त्यातली काही डॉ. त्रिवेदींची एकट्याची होती, आणि काही त्यांच्या कंपनीच्या नावाने होती – त्यात त्यांच्या पार्टनरचं नावही आहे – डॉ. प्रसन्न कामत. टी अँड के. के म्हणजे कामत असणार.”
अजय नेवाळकरने टी म्हणजे त्रिवेदी असणार असं सांगितल्याचं मला आठवलं.
“या पार्टनरशी सकाळी बोलायला हवंय आपल्याला,” मी म्हणालो, “मग पुढे?”
“डॉ. कामतांबरोबर शेवटचा कॉल दुपारी ४च्या सुमारास आलेला आहे आणि त्यानंतर सुमारे अडीच तास काहीही नाही. ६.२५पासून ते ६.३०पर्यंत त्यांनी त्यांच्या घरच्या फोनवर आणि त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर सुमारे १५ कॉल्स केलेले आहेत. ५ मिनिटांत १५ कॉल्स. पण कुठलाही कॉल उचलला गेलेला नाहीये. हे सगळे कॉल ईमेल मिळाल्यानंतर केलेले आहेत.”
“ओके. म्हणजे आज नेहमीप्रमाणेच डॉ. त्रिवेदी आपल्या कामात गर्क होते. सगळे कॉल्स हे हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, त्यांचा स्वतःचा पार्टनर अशा ओळखीच्या लोकांकडून आलेले आहेत. नंतर त्यांच्या पत्नीच्या ईमेल आयडीवरून हा ईमेल आला. त्यांनी तो फोटो पाहिला आणि घरी फोन करायला सुरुवात केली.” मी आत्तापर्यंत जे काही कळलं होतं, त्याची उजळणी करायला सुरुवात केली, “मग ते एस.एस.के.टी. हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी तिथून सीशियमच्या ३२ ट्यूब्ज बाहेर काढल्या आणि ते त्या ट्यूब्ज मलबार हिलच्या गॅलरीपाशी घेऊन आले. पण मला एक गोष्ट कळत नाहीये.”
“कोणती सर?”
“एवढं सगळं त्यांनी केलं, या दहशतवाद्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकलं, तरीही त्यांनी डॉ. त्रिवेदींना ठार मारलं. का? काय कारण आहे?”
“त्यांनी कदाचित त्या दहशतवाद्यांचा चेहरा पाहिला असेल.”
“रोहित खत्री आणि अलिशा त्रिवेदी – दोघेही म्हणाले की त्यांनी चेहर्‍यावर मास्क्स घातले होते.”
“मग कदाचित डॉ. त्रिवेदींना ठार मारणं हाच त्यांचा उद्देश असेल. त्यांनी तो सायलेन्सर बनवला – कोका कोलाच्या बाटलीपासून. आणि जर हा मारेकरी आपल्या साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार ‘अल्ला’ म्हणाला असेल, तर मग आपण खातरीने म्हणू शकतो की त्यांची अशीच योजना होती.”
“पण जर तसं असेल,” माझ्या मनातली शंका मी बोलून दाखवली, “तर मग एकट्या डॉ. त्रिवेदींना का मारलं? अलिशा त्रिवेदीला का जिवंत सोडलं? साक्षीदार का जिवंत ठेवली?”
“कदाचित त्यांचा काहीतरी नियम वगैरे असेल. या अतिरेक्यांचेपण नियम असतात ना काहीतरी? स्त्रिया आणि मुलांवर हात न उचलण्याचे? तसं असेल काहीतरी.”
“एक काम कर,” मी म्हणालो, “त्या ईमेलमधला जो तिचा फोटो आहे, त्याचा ब्लो अप प्रिंट काढ आणि मला दे.”
अमोलने प्रिंट देईपर्यंत मी माझ्या खिशात नेहमी असणारी एक गोष्ट बाहेर काढली होती - मॅग्निफाइंग ग्लास. यावरून माझी आत्तापर्यंत बरीच चेष्टा झाली होती. अमोलला हे माहीत असावं, कारण मी ग्लास बाहेर काढल्यावर त्याने आपलं हसू दाबलेलं मी पाहिलं.
तिचा फोटो मी मॅग्निफाइंग ग्लासमधून बघत असताना माझं लक्ष सर्वात पहिल्यांदा गेलं ते तिच्या एकत्र बांधलेल्या हात आणि पायांकडे. तिचे हात मागे खेचून मग ते पायांना बांधण्यात आले होते. हल्लेखोरांनी एकूण ७ स्नॅप टाईज वापरले होते. तिच्या दोन्ही मनगटांभोवती या टाईजच्या गाठी होत्या आणि त्या दोन्ही टाईजच्या गाठी परत एका टायने एकमेकांत गुंतवलेल्या होत्या. पायांनाही तसंच होतं. शेवटचा – सातवा टाय जो होता, त्याने तिचे हात आणि तिचे पाय यांना एकत्र ठेवणारे टाईज जोडले होते. त्यामुळे तिच्या संपूर्ण शरीराला धनुष्याचा आकार आला होता.
फार गुंतागुंतीचा प्रकार वाटत होता हा. मला जर कुणाला बांधायचं असतं, तर मी नक्कीच साधी-सरळ पद्धत वापरली असती. तिला हे असं बांधायला तिच्या हल्लेखोरांना वेळ नक्कीच लागला असणार. तिने थोडा तर विरोध केला असेल. किंवा कदाचित केला नसेलही. जे काही असेल ते. तिच्या जांभळ्या पडलेल्या मनगटांवरून हे तर स्पष्ट होतं, की जेवढा वेळ ती बांधलेल्या स्थितीत होती, तो वेळ तिच्यासाठी वेदनामय होता. त्याचबरोबर मला हेही जाणवलं, की त्याबद्दल आणखी जास्त माहिती तिच्याकडूनच मिळू शकेल. सकाळी डॉ. त्रिवेदींच्या पार्टनरबरोबरच अलिशालाही भेटणं गरजेचं होतं.
“तू फोरेन्सिकच्या लोकांनी डॉ. त्रिवेदींच्या घरात गोळा केलेला पुरावा आणला आहेस का?” मी अमोलला विचारलं.
“हो,” तो जरा घुटमळला, “पण त्यांनी मला एकच प्लास्टिकची पिशवी दिली.”
“म्हणजे? आख्ख्या घरात फक्त एक पिशवी एवढाच पुरावा मिळाला त्यांना?”
गुन्हे किंवा आणखी स्पष्टपणे सांगायचं तर खुनासारखे गुन्हे हाताळायचा माझा जो काही अनुभव होता, त्यानुसार एकही पुरावा नसलेला क्राइम सीन हा प्रकार अस्तित्वात नसतो या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास होता आणि आहे. जेव्हा गुन्हेगार एखाद्या ठिकाणी वावरतो, तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा तिथे राहतातच आणि तो शोधून काढणं अत्यंत आवश्यक असतं.
अमोलने माझ्या हातात त्याला फोरेन्सिकवाल्यांनी दिलेली यादी दिली. त्यात बर्‍याच गोष्टी होत्या. केस, कपड्यांचे धागे, स्नॅप टाईज, निकॉन कॅमेर्‍याची लेन्स कॅप, ऑफिसमधल्या कॉम्प्युटरचं माउस पॅड वगैरे बर्‍याच फुटकळ गोष्टी होत्या. सर्वात शेवटी जी गोष्ट होती, त्याने माझं लक्ष वेधून घेतलं – सिगरेटची राख.
“कोण होतं तू तिथे गेलेलास तेव्हा?” मी अमोलला विचारलं.
“यंदेसाहेब होते.”
सुरेश यंदे म्हणजे फोरेन्सिकमधले एकदम जुने. त्यांच्या नजरेतून एकही गोष्ट सुटणं अशक्यच. पुरावा म्हणून जर त्यांनी सिगरेटची राख जमा केली असेल, तर त्यामागे काहीतरी कारण असणारच. विचारायला हवं.
माझ्याकडे यंद्यांचा नंबर होता. मी लगेचच त्यावर कॉल केला, “यंदेसाहेब, नमस्कार. राजेंद्र देशमुख बोलतोय.”
“बोला सर.”
मी लगेचच मुद्द्यावर आलो, “तुम्ही आत्ता जिथे गेला होतात, कफ परेड भागातल्या डॉ. त्रिवेदींच्या घरी – तिथे सिगरेटची राख सापडली आहे...”
“हो. तिथे ती एन.आय.ए. एजंट होती – सुजाता – तिने मला ती जमा करायला सांगितलं. त्रिवेदींच्या घरातली जी गेस्ट बेडरूम होती, तिच्या बाथरूममध्ये जो टॉयलेट टँक होता, त्याच्यावर ही राख पडलेली होती. कुणीतरी तिकडे बाथरूम वापरायला आला आणि तिथे उभा असताना तो सिगरेट ओढत होता. त्याने कदाचित ती सिगरेट तिथे ठेवली, आणि तो घाईघाईने बाहेर गेला. सिगरेट पूर्णपणे जळली, त्यामुळे टँकला भोकपण पडलं आणि ही राख तिथे राहिली. ती मला म्हणाली की एन.आय.ए.च्या लॅबमध्ये त्याबद्दल बाकी माहिती कळू शकेल.”
“एक मिनिट यंदेसाहेब. तुम्ही तिला ती राख घेऊन जाऊ दिली?”
“हो.”
“यंदेसाहेब,” मी महत्प्रयासाने माझ्या आवाजावर नियंत्रण ठेवलं होतं, “तुम्ही माझ्या केसमध्ये – माझ्या – जमा केलेला पुरावा एका एन.आय.ए. एजंटच्या हातात दिलात?”
“हो सर,” यंदे शांतपणे म्हणाले, “कारण तिने मला सांगितलं की त्यांच्या लॅबमध्ये त्याच्यावर तातडीने काम होईल आणि त्यावरून त्यांना सिगरेटची तंबाखू आणि त्यावरून कुठल्या देशातून ती आलेली आहे वगैरे गोष्टी शोधून काढता येतील. ती हेही म्हणाली की कदाचित या केसचा देशाबाहेरून आलेल्या दहशतवाद्यांशी संबंध असू शकतो.”
“आणि तुमचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला?”
“म्हणजे?” यंदे वैतागलेले होते हे कळत होतं, “काय म्हणायचंय तुम्हाला?”
“काही नाही यंदेसाहेब. तुम्ही म्हणण्यासारखं काही ठेवलेलंच नाही. माझ्या केसमधला पुरावा तुम्ही तिच्या हातात दिलात. मला एकदाही न विचारता. काय म्हणणार आता मी यावर?”
“पण एन.आय.ए.सुद्धा त्या लोकांनाच शोधायचा प्रयत्न करताहेत ना? त्यांची लॅब जास्त आधुनिक आणि सुसज्ज आहे. आमच्या लॅबपेक्षा.”
“ठीक आहे यंदेसाहेब!” मी फोन ठेवून दिला.
अमोल हे सगळं ऐकत होता, “सर, आपल्या फोटोग्राफरने काढलेले सगळे फोटो माझ्या लॅपटॉपवर आहेत. तुम्हाला हवे असतील तर...”
“हो. तू त्यांचे प्रिंट काढून दे मला. आत्ता.”
“आत्ता? सर, पन्नास तरी फोटो असतील.”
“हरकत नाही अमोल,” मी त्याच्याकडे रोखून पाहात म्हणालो, “पन्नास आहेत. पन्नास हजार नाहीयेत.”
त्याने मुकाट्याने पन्नास प्रिंट्स काढायला सुरुवात केली.
या लोकांनी – हल्लेखोरांनी – डॉ. त्रिवेदींना ठार का मारलं हा प्रश्न माझ्या डोक्यातून जायला तयार नव्हता. त्यांना मारलं आणि त्यांच्या पत्नीला जिवंत ठेवलं. का?
अमोलने सगळे पन्नास प्रिंट्स माझ्यासमोर ठेवले आणि मी माझ्या विचारातून भानावर आलो. त्याने आणि मी सगळे फोटो लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली. टॉयलेटचा फोटो होता, त्यात टॉयलेटची सीट उंचावलेली दिसत होती. याचा अर्थ कुठल्यातरी पुरुषाने वापर केला होता. सिगरेटच्या राखेचा फोटोही पाहिला. फोटोग्राफरने एक छोटी फूटपट्टी त्याच्या बाजूला ठेवून फोटो काढला होता. राख जवळपास दोन इंच लांब होती. एका पूर्ण सिगरेटच्या लांबीएवढी. याचा काय अर्थ होता?
वैतागून मी माझा फोन बाहेर काढला. त्यात सुजाताचा नंबर होता. जवळपास ७-८ वर्षांपूर्वी तिचा हाच नंबर होता. मी माझे फोन जरी बदलले असले, तरी हा नंबर मी न विसरता नव्या फोनमध्ये टाइप करायचो. इतक्या वर्षांत कधीही तिच्याशी फोनवर बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. इच्छा बरेच वेळा झाली होती, आठवण तर कधीही पुसली गेली नव्हती. हा नंबर ती आत्ता वापरते आहे की नाही हेही मला माहीत नव्हतं. पण तरीही मला माझा राग आणि वैताग कुठेतरी काढायलाच हवा होता. मी तिचा नंबर डायल केला. फोन वाजला आणि व्हॉइसमेलवर गेला.
“मी बोलतोय. राजेंद्र देशमुख,” मी आवाजात आणता येईल तेवढा राग आणला होता, “मला तुझ्याशी बोलायचंय आणि माझी सिगरेटची राख मला परत हवी आहे. ही माझी केस आहे.”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
जेसीपी साहेबांशी बोलून आम्ही मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या ग्रीन्स नावाच्या एका हॉटेलमध्ये रोहित खत्रीची व्यवस्था केली. हॉटेल ठीकठाक होतं. पोलीस स्टेशनच्या सीनियर इन्स्पेक्टरशी बोलून मी कुणीतरी दर २-३ तासांनी रोहितची खबरबात घेत राहील आणि काही संशयास्पद दिसलं, तर मला किंवा अमोलला फोन करेल याची व्यवस्था केली आणि आम्ही दोघेही ग्रीन्समधून निघालो. सकाळचे साडेसहा वाजले होते. आकाशात मळभ आलेलं होतं. रोहितला आम्ही राजीव कपूर या नावाखाली ठेवलं होतं. आत्ता तोच आमच्या हातातला हुकमाचा एक्का होता. जरी त्याने डॉ. त्रिवेदींच्या मारेकर्‍याचा चेहरा पाहिला नसला, तरी त्याने सांगितलेल्या घटनाक्रमावरून मलबार हिलच्या गॅलरीजवळ नक्की काय घडलं त्याची थोडीफार कल्पना आम्हाला आली होती.
“सर, तुम्हाला काय वाटतं?” अमोल म्हणाला.
“कशाबद्दल?”
“हा रोहित इथे राहील? पळून जाणार नाही?”
“कुठे जाणार तो?” मी म्हणालो, “त्याच्याकडे दुसरी जागाच नाहीये.”
जेसीपी साहेबांनी आम्हाला रोहितला चार दिवस ग्रीन्समध्ये ठेवायला सांगितलं होतं. तेवढ्या वेळात या केसची दिशा स्पष्ट झाली असती.
रोहितला सोडून आम्ही दोघेही निघालो. मी माझ्या फोनवरचे मेसेजेस आणि व्हॉइसमेल चेक केलं. सुजाताने अजून माझ्या मेसेजचं उत्तर दिलं नव्हतं, म्हणून मग मी राजनायकला फोन केला.
“बोल राजेंद्र.”
“काही विशेष नाही. ९ वाजताच्या मीटिंगबद्दल फोन केला होता मी. आहे ना ही मीटिंग?”
राजनायक थोडा घुटमळला, “मीटिंग... आहे, पण वेळ जरा पुढे ढकलली गेलीय.”
“अच्छा!”
“हो. ९ऐवजी १० वाजता आहे आता. मी सांगेन ना तुला.”
मी विचारल्याशिवाय त्याने मीटिंग १०ला आहे हे सांगितलं नव्हतं, त्यामुळे तो आपण होऊन मला काही सांगेल याची शक्यता अजिबातच नव्हती. पण तरी मला त्याच्याकडून माहिती हवी होती, म्हणून मी त्याला आणखी छेडायचं ठरवलं.
“कुठे आहे मीटिंग? एन.आय.ए.ऑफिसमध्ये?” एन.आय.ए.चं ऑफिस मुंबई पोलीस आयुक्तांच्या ऑफिसजवळच कुठेतरी असल्याचं मी ऐकलं होतं.
“नाही. सी.बी.आय.चं वरळी ऑफिस माहीत असेल ना तुला? तिथे. चौदावा मजला. एन.आय.ए. विचारलंस तर कोणीही सांगेल. बरं, तुला मिळालेला साक्षीदार – त्याच्याकडून काही कळलं?”
माझी नक्की काय परिस्थिती आहे, हे कळेपर्यंत राजनायकला मी काहीही सांगणार नव्हतो. पण तो कुठल्या ताणाखाली आहे, हे माहीत असल्यामुळे मी थोडीशी जुजबी माहिती द्यायचं ठरवलं.
“त्याने गोळीबार पाहिला, पण काही अंतरावरून. मग त्याने डॉ. त्रिवेदींच्या गाडीतून सीशियम दुसर्‍या गाडीत ठेवलेलं पाहिलं. तो म्हणाला की या दोन्हीही गोष्टी एकाच माणसाने केल्या. जो दुसरा माणूस होता, तो गाडीतच बसून होता आणि बाहेर आलाच नाही.”
“गाडीच्या नंबर प्लेट्स?”
“नाही. बहुतेक अलिशा त्रिवेदीची गाडी वापरण्यात आली असणार पिग नेण्यासाठी. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये सीशियम असल्याचा काहीही पुरावा मिळाला नसता.”
“त्याने ज्या माणसाला पाहिलं त्याचं काय?”
“मी बोललो ना तुला आत्ताच. तो त्या गोळीबार करणार्‍या माणसाचा चेहरा पाहू शकला नाही. तो अलिशाने सांगितल्याप्रमाणे मास्क घालून होता. बाकी काही नाही.”
राजनायकने पुढचा प्रश्न विचारण्याआधी जरा विचार केला, “तुम्ही काय केलं त्याचं?”
“काही नाही. जाऊ दिलं त्याला.”
“कुठे राहतोय तो?”
“सुरत.”
“मला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजलंय देशमुखसाहेब.”
त्याच्या आवाजातला बदल मी टिपला. तो अचानक माझ्या नावावरून माझ्या आडनावावर आला, हेही.
“तो इथला नाहीये. इथे त्याच्या ओळखीचं कुणीही नाहीये. आम्ही त्याला सुरतचं तिकीट काढून दिलं आणि बाँबे सेंट्रल स्टेशनला सोडलं. थोडे पैसेही दिले. खायलाप्यायला.”
अमोल अवाक नजरेने माझ्याकडे बघत असल्याचं मला जाणवलं.
“एक मिनिट होल्ड कर राजेंद्र. दुसरा कॉल येतोय.”
“जरूर.”
त्याने कॉल होल्डवर ठेवला.
“सर, तुम्ही त्याला का...” अमोलने बोलायला सुरुवात केली. मी त्याला हातानेच थांबवलं.
राजनायक परत लाईनवर आला, “दिल्लीहून कॉल होता. आता ते तिथून सगळं नियंत्रित करताहेत.”
“म्हणजे?”
“आम्ही आर्मीची काही हेलिकॉप्टर्स वापरतोय. सीशियममुळे वातावरणात जर थोडासा किरणोत्सर्ग पसरला असेल, तर तो आम्हाला बघायचाय. त्या गॅलरीपासून सुरुवात करावी लागणार आहे. खरं सांगायचं तर सीशियम शोधण्यासाठी तो त्या पिगच्या बाहेर येणं आवश्यक आहे. पिगमध्येच राहिला, तर काहीही कळू शकणार नाही.”
मी काही बोलण्याआधीच त्याचा पुढचा प्रश्न आला – “आपल्या मीटिंगला थोडा वेळ आहे. तू काय करणार आहेस तोपर्यंत?”
मीही घुटमळलो पण थोडाच वेळ, “आता मी परत डॉ. त्रिवेदींच्या घरी जाऊन मिसेस त्रिवेदींशी बोलणार आहे. काही फॉलो अप करायचाय. नंतर डॉ. त्रिवेदींच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे काही मिळतंय का ते बघायचंय आणि त्यांच्या पार्टनरशी – डॉ. कामतांशी बोलायचंय.”
समोरून काहीही उत्तर किंवा प्रतिसाद आला नाही.
“हॅलो वर्धन...”
“मी आहे लाइनवर,” तो म्हणाला, “मला असं वाटतंय की तू डॉ. त्रिवेदींच्या घरी आणि ऑफिसमध्ये जायची गरज नाहीये.”
मी उद्वेगाने मान हलवली. मला माहीत होतं असं काहीतरी होणार आहे. “का? तुम्ही सगळं घेऊन गेलात की काय तिथून?”
“हे बघ, हा माझा निर्णय नव्हता. मला जी काही माहिती मिळालेली आहे, त्यावरून ऑफिसमध्ये काहीही नाहीये आणि डॉ. कामतांना आम्ही इथे आमच्या ऑफिसमध्ये आणलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोलतोय. सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही मिसेस अलिशा त्रिवेदींनाही आमच्या ऑफिसमध्ये आणलंय, आणि त्यांच्याशीही बोलणं चालू आहे.”
“जर हा तुझा निर्णय नव्हता, तर मग कोणाचा निर्णय होता? सुजाताचा?”
“मला त्याबद्दल काहीही सांगायचं नाहीये.”
“ठीक आहे,” मी म्हणालो, “मग आता मी आणि अमोल – आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येतो. कारण जेवढं मला माहीत आहे, त्यावरून ही अजूनही एका खुनाची केस आहे आणि आम्ही त्याचा तपास करतोय.”
समोरून उत्तर येण्याआधी एक निःश्वास ऐकू आला, “हे पाहा सुपरिंटेंडंट देशमुखसाहेब, ही केस आता फक्त एका खुनाची केस राहिलेली नाही. तुम्ही आणि तुमचे सहकारी – आम्ही दोघांनाही आमच्या मीटिंगला बोलावलेलं आहे. त्या वेळी डॉ. कामत आमच्याशी काय बोलले, ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि मी स्वतः तुमची आणि त्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. मिसेस त्रिवेदींशीसुद्धा. पण एक गोष्ट मला इथे स्पष्ट करायला पाहिजे. या खुनाचा तपास आमच्यासाठी सीशियमच्या शोधाएवढा महत्त्वाचा नाही. सीशियम सापडणं महत्त्वाचं आहे, आणि ते गायब झाल्याला १२ तास होऊन गेलेले आहेत आणि आपल्याला त्याबद्दल काहीही माहित नाहीये.”
“मला असं वाटतंय की जर आपण खुन्यांना शोधलं, तर आपल्याला सीशियमसुद्धा मिळेल.”
“कदाचित,” तो म्हणाला, “पण माझा जो काही अनुभव आहे आणि आम्हाला एफ.बी.आय.कडून जी काही माहिती मिळालेली आहे, त्यावरून सीशियम फार लवकर हस्तांतरित केलं जातं. ते कुणा चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्याचा वेग फार प्रचंड असेल. आम्हाला आमचा तपास त्याहीपेक्षा जास्त वेगाने करायचा आहे, आणि आत्ता तेच करतोय आम्ही.”
“बरोबर. आणि आम्ही तुमच्या मार्गातले अडथळे आहोत.”
“मी असं म्हटलेलं नाही.”
“ठीक आहे. मी तुम्हाला १० वाजता भेटतो एजंट राजनायक.” मी फोन बंद केला.
गाडी अमोल चालवत होता आणि आम्ही आता रिगल सिनेमाजवळ होतो.
“एक काम कर,” मी म्हणालो, “गाडी पार्क कर. काहीतरी खाऊन घेऊ या आपण.”
गाडी पार्क करून आम्ही नुकत्याच उघडलेल्या कॅफे माँडेगारच्या दिशेने चालत जात असताना अमोलने माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला, “सर, काय करताय तुम्ही? तुम्ही त्याला आपल्या साक्षीदाराबद्दल खोटं का सांगितलं? काय चाललंय काय नक्की?”
“एक मिनिट अमोल,” मी म्हणालो, “पोट रिकामं असताना मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. आपण नाश्ता करून घेऊ आणि मग मी तुला नक्की काय चाललंय ते सांगतो.”
कॅफे माँडेगार म्हणजे मुंबईमधल्या सर्वात अप्रतिम ब्रेकफस्ट मिळणार्‍या जागांपैकी. दोन घास पोटात गेल्यावर मी जरा शांत झालो.
“तुला काय चाललंय हे विचारायचंय ना?” मी अमोलला म्हणालो, “आपला पत्ता कट होतोय.”
“कशावरून सर?”
“कारण एन.आय.ए.ने आपल्या आधी डॉ. त्रिवेदींच्या पार्टनरला आणि त्यांच्या पत्नीलाही ताब्यात घेतलंय, आणि मी खातरीने सांगू शकतो की आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार नाही.”
“पण सर, असं कुठे कोण म्हणालंय? तुम्ही त्यांच्या तोंडून असं स्पष्टपणे ऐकलंय का? सर, गैरसमज करून घेऊ नका, पण तुमच्या मनात या लोकांविषयी थोडा पूर्वग्रह आहे.”
“अच्छा! पूर्वग्रह? ठीक आहे. जस्ट वेट अँड वॉच!”
“त्या ९ वाजताच्या मीटिंगला आपण जाणार आहोत ना अजूनही?”
“हो. पण आता ती मीटिंग पुढे ढकलण्यात आलेली आहे. १० वाजता. आणि १० वाजता जर ती मीटिंग झालीच, तर आपल्यासमोर काही तुकडे टाकण्यात येतील, आणि मग ते आपल्याला म्हणतील – धन्यवाद. आता यापुढचं काम आम्ही करू. सोड रे. इथे एका माणसाचा खून झाला आहे आणि मला कोणीही माझ्या केसवरून अशा प्रकारे बाजूला काढू शकत नाही.”
“त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवा सर.”
“माझा स्वतःवर विश्वास आहे. मला एक सांग – जेव्हा २००८चा हल्ला झाला होता, तेव्हा तू कुठे होतास?”
“ट्रेनिंगमध्ये होतो सर.”
“मी फील्डमध्ये होतो आणि आयबीच्या लोकांबरोबर काम करत होतो. आयबी म्हणा, एन.आय.ए. म्हणा – मूळ वृत्ती बदलत नाही. स्थानिक पोलिसांबद्दल या लोकांना कधीच विश्वास वाटत नाही. एकीकडे आपण म्हणू शकतो की काय फरक पडतो? करू दे त्यांना तपास. पण मला फरक पडतो. माझा त्यांच्यावर विश्वास नाही, कारण त्यांना सीशियम हवंय. मला ते हरामखोर हवेत ज्यांनी डॉ. त्रिवेदींना त्यांच्या पत्नीचा फोटो दाखवून घाबरवलं आणि नंतर त्यांना गुडघे टेकायला लावून गोळ्या घातल्या.”
“पण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे सर.”
“जो माणूस तिकडे गॅलरीपाशी मरून पडला होता, तोही याच राष्ट्राचा नागरिक आहे अमोल आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये त्याला ठार मारणार्‍यांना पकडणं आणि शिक्षा देणं या गोष्टीही येतात हे विसरू नकोस.”
अमोलने मुद्दा पटल्याप्रमाणे मान डोलावली, “पण सर, मला अजूनही वाटतं, की आपण त्यांना आपल्या या साक्षीदाराबद्दल खोटं सांगायला नको होतं. त्याच्याकडून त्यांना खूप महत्त्वाची माहिती मिळू शकते. त्याने आपल्याला जे सांगितलं, त्यावरून त्यांना सापडलेली एखादी गोष्ट कन्फर्म होऊ शकते. त्यांना ते सांगण्यात काय चुकीचं आहे, ते मला अजूनही कळत नाहीये.”
“नाही,” मी नकारार्थी मान डोलावली, “तो आपला साक्षीदार आहे आणि आपण त्याची माहिती कुणालाही सांगणार नाही आहोत. तोच आपला हुकमी एक्का आहे. जर त्यांना त्याच्याशी बोलायचं असेल, तर त्यांना आपल्याला सगळी माहिती द्यावी लागेल आणि या तपासात सहभागी करून घ्यावं लागेल.”
त्याक्षणी मला काहीतरी आठवलं, “एक काम कर. पटपट खा. राजनायकचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसलेला नसणार. माझाही बसला नसता, जर मी त्याच्या जागी असतो तर. त्याच्याकडे माझा नंबर आहे. तो माझा फोन ट्रॅक करून आपल्याला गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. त्याआधी आपल्याला इथून निसटलं पाहिजे.”
सुदैवाने अमोलने अजून वाद घातला नाही आणि आम्ही पुढच्या १० मिनिटांत माँडेगारमधून बाहेर पडलो.
“कुठे?” अमोलने विचारलं.
“कफ परेड. डॉ. त्रिवेदींच्या घरी.”
“सर...”
“तुला यायचं नसेल तर आत्ता सांग. मी टॅक्सीने जाईन.”
“नाही सर. मी येतोय.” त्याने गाडी चालू केली.
अलिशा त्रिवेदी जरी एन.आय.ए.ची पाहुणी असली, तरी तिच्या पतीच्या ऑडीची चावी माझ्याकडे होती. त्याच प्लास्टिक पिशवीत तिच्या घराचीही चावी होती. मी आणि सुजाता तिथे गेल्यावर आम्हाला दरवाजा उघडाच मिळाला होता, त्यामुळे या चावीचा वापर झालाच नव्हता. पण आता ती कामाला येणार होती.
त्रिवेदींच्या घरापाशी पोहोचल्यावर मी पाहिलं, तर दोन गाड्या तिथे पार्क केलेल्या होत्या. पण गेट उघडं होतं. दोन्हीही गाड्यांकडे दुर्लक्ष करत मी घराच्या दरवाजाकडे गेलो आणि चाव्यांच्या जुडग्यातली मला जी वाटली, ती चावी लॅचमध्ये घातली.
“एन.आय.ए. जिथे आहात तिथेच थांबा” मागून आवाज आला.
मी चावी फिरवली. बरोबर चावी होती.
“दरवाजा उघडू नका.”
मी वळलो आणि आमच्या दिशेने येणार्‍या माणसाकडे पाहिलं.
“क्राइम ब्रँच. आम्ही आमचं इथलं काम संपवायला आलोय.”
“नाही,” तो एजंट म्हणाला, “आता हा संपूर्ण भाग एन.आय.ए.च्या ताब्यात आहे आणि आम्हीच यापुढचा सगळा तपास हाताळणार आहोत.”
“अच्छा?” मी शांतपणे म्हणालो, “सॉरी. मला तुमच्या किंवा माझ्या ऑफिसकडून तसं काहीही सांगण्यात आलेलं नाही.” आणि परत दरवाजाकडे वळलो.
“दरवाजा उघडू नका,” तो एजंट पुन्हा एकदा म्हणाला, “याचा तपास आता आम्ही करतोय. तुमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून घ्या हवं तर.”
मी लक्ष दिलं नाही.
“सर,” अमोल म्हणाला, “मला वाटतं आपण...”
मी त्याला थांबवलं आणि त्या एजंटकडे वळलो, “एन.आय.ए. काय? काही आयडी कार्ड वगैरे असेलच ना तुमच्याकडे?”
त्या एजंटने वैतागल्याचे भाव चेहर्‍यावर आणले आणि खिशातून आपलं वॉलेट बाहेर काढलं, त्याचा एक फ्लॅप उघडला आणि ते माझ्यापुढे धरलं. मी तयारच होतो. त्याचं मनगट गच्च धरून मी त्याला माझ्या दिशेने पण माझ्यापासून दूर खेचलं आणि माझ्या दुसर्‍या हाताने त्याचा चेहरा भिंतीवर दाबून धरला आणि त्याचा वॉलेट धरलेला हात मागे पिरगळला.
काय होतंय हे लक्षात आल्यावर त्या एजंटने वळायचा प्रयत्न केला, पण त्याआधीच मी माझ्या खांद्यांनी त्याला भिंतीवर दाबलं आणि माझ्या एका हाताने त्याच्या जॅकेटच्या खिशातल्या हातकड्या बाहेर काढल्या आणि त्याचे हात त्यात अडकवायला सुरुवात केली.
“सर! सर, काय करताय तुम्ही...” अमोल जवळजवळ ओरडलाच.
“मी बोललो होतो ना तुला. मला कुणीही माझ्या केसवरून असा झटकून टाकू शकत नाही.” मी हातकड्या लॉक केल्या आणि त्याचं वॉलेट त्याच्या हातून काढून घेतलं, आणि त्यावरचं नाव बघितलं. शशांक मेहरोत्रा. मग त्याला फिरवलं आणि तेच वॉलेट त्याच्या जॅकेटच्या एका खिशात टाकलं.
“तुझी करिअर संपली आता,” मेहरोत्रा शांतपणे म्हणाला.
“बरं.”
मेहरोत्राने अमोलकडे पाहिलं, “जर तू याला मदत केलीस, तर तुझीही करिअर बाराच्या भावात जाईल. विचार कर.”
“शट अप एजंट मेहरोत्रा,” मी म्हणालो, “बाराच्या भावात आम्ही नाही, तू जाशील, जर तू तुझ्या ऑफिसमध्ये जाऊन हे सांगितलंस की तू क्राइम ब्रँचच्या दोन अधिकार्‍यांना आत येऊ दिलंस.”
हे ऐकल्यावर तो गप्प बसला. मी दरवाजा उघडला आणि त्याला आत ढकललं आणि हॉलमध्ये एक खुर्ची होती, त्यावर बसवलं. “आता बस इथे आणि तोंड बंद ठेव.”
मेहरोत्राचं सर्व्हिस वेपन त्याच्या डाव्या कुशीवर असलेल्या होल्स्टरमध्ये होतं. त्याचे हात मागे अडकवलेले असल्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे मी त्याला हात लावला नाही पण त्याच्या पायांच्या जवळ त्याने दुसरी गन ठेवलेली नाहीये हे बघून घेतलं.
“आराम कर आता थोडा वेळ,”मी म्हणालो, “आम्हाला आमचं काम करू दे.”
अमोलला मी माझ्या मागे यायला सांगितलं, “तू ऑफिसमध्ये बघ आणि मी बेडरूममध्ये बघतो. जे काही सापडेल ते. आपण सगळ्या गोष्टींसाठी शोध घेतोय. जेव्हा आपल्याला ते दिसेल, तेव्हा समजेलच. कॉम्प्युटरही बघ. जर काही विचित्र दिसलं, तर मला सांग.”
“सर....”
मी मागे वळून पाहिलं. अमोल जागचा हलला नव्हता.
“आपण चूक करतोय सर. हे...हे असं करायला नको आपण...”
“मग कसं करायचं अमोल? तुझं असं म्हणणं आहे, की आपण थ्रू प्रॉपर चॅनेल जायला हवं, आपल्या बॉसने याच्या बॉसशी बोलायला हवं आणि मग त्यांच्या परवानगीची वाट पाहायला हवी? कशासाठी? आपलं काम करण्यासाठी?”
अमोलने मेहरोत्राकडे पाहिलं. तो आमच्याकडेच पाहत होता.
“सर, मला ते समजतंय, पण तुम्हाला वाटतं हा एजंट एवढ्या सुखासुखी हा सगळा प्रकार जाऊ देईल? तो तक्रार करेल आणि मग आपली नोकरीही जाऊ शकते. त्यासाठी माझी तयारी नाहीये.”
मी माझा आवाज हळू केला, “हे पाहा अमोल, असं काहीही होणार नाहीये. मला तुझ्यापेक्षा थोडा जास्त अनुभव आहे या गोष्टींचा आणि एन.आय.ए. किंवा आयबी कशा प्रकारे काम करतात, हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यांच्या संपूर्ण ट्रेनिंगमध्ये एक मुद्दा त्यांच्या मनावर अगदी खोल बिंबवला जातो – काहीही झालं तरी चालेल, पण तुमच्या संस्थेची बदनामी होता कामा नये. आता मला एक सांग – एन.आय.ए.चे सगळे एजंट्स सीशियम शोधायला बाहेर आकाशपाताळ एक करताहेत, आणि हा इथे काय करतोय? तोही एकटा? इथला सगळा पुरावा तर ते घेऊन गेलेत. या घराची मालकीण त्यांच्या ताब्यात आहे. मग हा इथे या रिकाम्या घरावर पहारा का देतोय?”
अमोलच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव आले.
“कारण त्याने याआधी काहीतरी गंभीर चूक केलेली असणार.” मी म्हणालो, “त्याची शिक्षा म्हणून त्याला एकट्याला इथे ठेवण्यात आलंय. आता मला सांग – तो परत त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगेल – की दोन क्राइम ब्रँच अधिकारी इथे आले, त्यांनी त्याची गठडी वळली आणि घराची तपासणी केली? नो वे. त्याची करिअर बाराच्या भावात जाईल त्यामुळे. तो असं काहीही करणार नाही.”
अमोल काहीच बोलला नाही.
“म्हणूनच मी म्हणतोय की ताबडतोब या घराची तपासणी करू या आणि लवकरात लवकर इथून बाहेर पडू या. जेव्हा मी पहाटे इथे आलो, तेव्हा अलिशा त्रिवेदी आम्हाला सापडली. त्यानंतर एस.एस.के.टी. हॉस्पिटलमध्ये धावावं लागलं. आता दिवसाच्या उजेडात मला या घराची नीट तपासणी करायची आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत, त्यांचा फेरविचार करायचा आहे. मी असंच काम करतो. लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे कोणताही पुरावा नसलेला क्राइम सीन ही गोष्ट अस्तित्वात नसते. गुन्हेगार जेव्हा क्राइम सीनवर वावरतो, तेव्हा काही ना काहीतरी पुरावा तो क्राइम सीनवर सोडतोच.”
“ठीक आहे सर.”
“ग्रेट!” मी त्याच्या खांद्यावर थाप मारली, “तू ऑफिसमध्ये बघ, मी बेडरूम बघतो.”
मी मास्टर बेडरूममध्ये, जिथे आम्हाला अलिशा सापडली होती तिथे गेलो. कुठलीही गोष्ट हलवलेली वाटत नव्हती. गादीजवळ गेल्यावर मूत्राचा वास येत होता.
पलंगाच्या डाव्या बाजूला असलेल्या टेबलापाशी जाऊन मी पाहिलं. तिथे फोरेन्सिकच्या लोकांनी टाकलेली काळी पावडर अजूनही होती. टेबलवर डॉ. त्रिवेदी आणि अलिशा यांचा एक फोटो होता. मी फोटोफ्रेम उचलली आणि फोटो निरखून पाहिला. दोघेही एका गुलाबाच्या झाडाच्या बाजूला उभे होते. झाडावरचे सगळे गुलाब फुललेले होते. अलिशाच्या चेहर्‍यावर माती लागलेली होती, पण ती हसत होती. अगदी एखाद्या आईने आपल्या बक्षीस मिळवलेल्या मुलाच्या बाजूला उभं राहून अभिमानाने हसावं तसं. हे झाड तिने लावलं आणि वाढवलं असल्याचं सांगायची गरज नव्हती. फोटो त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला घेतला असावा. या फोटोशिवाय आणखी दुसरा कोणताही फोटो तिथे सापडला नाही.
फोटो खाली ठेवून मी टेबलाचे ड्रॉवर्स तपासून पाहिले. त्यात वैयक्तिक स्वरूपाच्या अनेक गोष्टी होत्या. सगळ्या डॉ. संतोष त्रिवेदींच्या वाटत होत्या. चश्मे, पुस्तकं आणि काही औषधांच्या बाटल्या. खालचा ड्रॉवर रिकामा होता. अलिशाने संतोष इथेच आपली गन ठेवत असल्याचं सांगितलं होतं.
ड्रॉवर्स बंद करून मी बेडरूमच्या एका कोपर्‍यात गेलो. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की जर तुलना करायची असेल, तर माझ्याकडे क्राईम सीनचे फोटो हवेत. ते फोटो माझ्या ब्रीफकेसमध्ये होते आणि ती आमच्या गाडीच्या डिकीमध्ये होती. फोटो आणण्यासाठी मी बाहेर आलो, तेव्हा मेहरोत्रा जमिनीवर पडलेला मी पाहिलं. तो त्याचे मागे बांधलेले हात पुढे आणण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे हातकड्या घातलेले हात त्याच्या पार्श्वभागापर्यंत आले होते, पण आता त्याचे हात आणि गुढघे काहीतरी विचित्र प्रकारे अडकले होते. माझी चाहूल लागताच त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा लाल झाला होता आणि प्रचंड घामेजला होता.
“मला सोडव.” तो म्हणाला, “मी अडकलोय.”
मी जोरात हसलो, “एक मिनिट थांब.”
बाहेर जाऊन मी फोटो घेऊन आलो. अलिशाचा ईमेलमधला फोटोही त्यात होता. मी आत आल्यावर मेहरोत्राने परत एकदा मला आवाज दिला, “सोडव मला.”
मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बेडरूमकडे गेलो. जाता जाता पाहिलं तर अमोल डॉ. त्रिवेदींच्या ऑफिसमधले ड्रॉवर्स धुंडाळत होता, आणि काही फाइल्स त्याने टेबलवर रचून ठेवलेल्या होत्या.
बेडरूममध्ये गेल्यावर मी तो ईमेलमधला फोटो बाहेर काढला आणि त्याची आणि खोलीची तुलना करायला सुरुवात केली. कपड्यांच्या कपाटापाशी जाऊन त्याचा दरवाजा फोटोत दाखवला होता, त्याप्रमाणे उघडला. मग मी पाहिलं, तर फोटोमध्ये एक पांढरा रोब कोपर्‍यात असलेल्या एका खुर्चीवर ठेवला होता. मी कपाट उघडून त्यामध्ये असलेला रोब बाहेर काढला आणि तो त्या खुर्चीवर फोटोमध्ये जसा टाकला होता, तसा टाकला.
नंतर मी खोलीमध्ये ईमेलमधला फोटो जिथून काढला असेल, असं मला वाटत होतं, तिथे उभा राहिलो. आजूबाजूला पाहिलं. काही विसंगत दिसतंय का ते पाहायचा प्रयत्न केला. तेव्हा माझं लक्ष त्या डिजिटल घड्याळाकडे गेलं. ते बंद होतं. मी फोटोमध्ये पाहिलं. त्यातही ते बंद होतं.
मी घड्याळाजवळ जाऊन त्याचं निरीक्षण केलं. त्याचा प्लग काढून ठेवला होता. मी प्लग परत सॉकेटमध्ये घालून घड्याळ चालू होतंय का ते पाहिलं. ते चालू झालं. अर्थातच त्यावरची वेळ चुकीची होती. ते परत सेट करायची गरज होती.
अलिशाला हा अजून एक प्रश्न मला विचारायचा होता. जर ती मला भेटली असती तर. त्या हल्लेखोरांपैकी कुणीतरी हे केलं असणार. पण का? बहुतेक किती वाजलेत किंवा ती किती वेळ बांधलेल्या परिस्थितीत आहे हे त्यांना अलिशाला कळू द्यायचं नसेल.
मी बाकीच्या फोटोंकडे पाहायला सुरुवात केली. त्यामध्ये कपाटाचा दरवाजा थोड्या वेगळ्या प्रकारे उघडलेला होता आणि तो रोब नव्हता, कारण तो अलिशाच्या अंगावर होता. मी परत कपाटाचा दरवाजा या फोटोत होता, त्याप्रमाणे केला आणि परत एकदा सगळ्या बेडरूमकडे पाहिलं. पण कुठलीच विसंगती वाटली नाही. कुठेतरी काहीतरी चुकत होतं. ते याच खोलीत होतं, पण माझ्या लक्षात येत नव्हतं.
मी घड्याळाकडे पाहिलं, तर साडेसात वाजले होते. ती १० वाजताची मीटिंग – झालीच तर – अडीच तासांनी होती. बेडरूममधून बाहेर पडून मी किचनच्या दिशेने गेलो. जाता जाता प्रत्येक खोलीत जाऊन तिथे काही मिळतं का तेही पाहिलं.
व्यायामाची साधनं ठेवलेल्या खोलीत असलेल्या कपाटात अनेक लोकरी आणि थर्मल कपडे होते. अलिशा चेहर्‍यावरून हिमाचल किंवा उत्तराखंडसारख्या थंड, पहाडी प्रदेशातून आलेली असणार हा माझा तर्क बरोबर होता बहुतेक. इथे मुंबईमध्ये असल्या गरम कपड्यांची काहीही गरज नव्हती. पण या तिच्या आठवणी असणार.
कपाटाचा दरवाजा बंद करून मी आजूबाजूला पाहिलं आणि एका भिंतीकडे माझं लक्ष गेलं. भिंतीवर असलेल्या हूक्सना रबरी मॅट्स टांगलेल्या होत्या आणि त्याच्याच बाजूला एक रिकामा चौकोनी भाग होता. तिथे नक्कीच काहीतरी चिकटवलेलं असणार. चार बाजूंना असलेल्या टेपच्या खुणाही नीट ओळखू येत होत्या. एखादं पोस्टर किंवा मोठं कॅलेंडर वगैरे असणार.
तिथून मी परत हॉलमध्ये आलो, तेव्हा मेहरोत्रा अजून जमिनीवरच पडलेला होता. त्याने एक पाय सोडवला होता, पण दुसरा पाय सोडवणं काही त्याला जमलं नव्हतं. त्यामुळे त्याचे हातकड्या घातलेले हात आता त्याच्या पायांच्या मध्ये आले होते.
“आमचं काम संपतच आलंय एजंट मेहरोत्रा!” मी त्याला म्हणालो. त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
किचनच्या दरवाज्यातून मी बाहेर बागेत गेलो. अलिशाला बागकामाची प्रचंड आवड होती आणि तिला ते जमतही होतं, हे बाग बघून कळत होतं. आत्ता दिवसाच्या प्रकाशात बागेकडे पाहणं आणि रात्रीच्या किंवा पहाटेच्या अंधारात पाहणं यात फरक होताच.
किचनमध्ये परत येऊन मी दुसरा दरवाजा उघडला. हा दरवाजा गराजमध्ये उघडत होता. गराजच्या मागच्या भिंतीवर असलेल्या कपाटांमध्ये बागकामाची हत्यारं, घरकामाच्या काही वस्तू, खतांच्या पिशव्या, बियाण्यांची पाकिटं वगैरे गोष्टी होत्या. त्याच कपाटांच्या खाली एक कचर्‍याचा डबा ठेवलेला होता. मी तो उघडला. आतमध्ये एक प्लास्टिकची पिशवी होती आणि त्यात किचनमधला कचरा होता. पण एका बाजूला काही पेपर टॉवेल होते. त्यांच्यावर काही जांभळे डाग पडले होते. मी वास घेतला तर कसलातरी गोडसर आणि ओळखीचा वास आला. मग मला आठवलं की तो द्राक्षाच्या ज्यूसचा वास होता.
मी परत किचनमध्ये आलो तर अमोलही तिथेच होता.
“तो हात पुढे आणायचा प्रयत्न करतोय,” तो म्हणाला.
“करू दे. तुझं ऑफिसमधलं काम संपलं का?”
“जवळपास हो. मी तुम्हाला बघायला आलो.”
“ठीक आहे. तुझं काम संपव. मग आपण इथून बाहेर पडू.”
अमोल गेल्यावर मी किचनमधल्या कपाटांमध्ये पाहिलं. काहीही वेगळं असं सापडलं नाही. तेवढ्यात मला आठवलं आणि मी गेस्ट बेडरूममधल्या बाथरूममध्ये गेलो. पांढर्‍या टॉयलेट टँकवर जळत्या सिगरेटमुळे डाग पडला होता. जवळपास अर्ध्या सिगरेटएवढा असेल.
मला सिगरेट सोडून दहापेक्षा जास्त वर्षं होऊन गेली होती, पण अशा प्रकारे मी कधी सिगरेट ओढल्याचं मला आठवत नव्हतं. जर टॉयलेटमध्ये कुणी सिगरेट ओढत असेल, तर शक्यतो सिगरेटचं थोटूक फ्लश करण्याकडे त्या माणसाचा कल असतो. ही सिगरेट नक्कीच विसरली गेली असणार. पण सिगरेट विसरावी असं काय घडलं असेल?
तिथून निघून मी परत हॉलमध्ये आलो आणि अमोलला हाक मारली, “अमोल, झालंय का तुझं काम? निघू या आता.”
मेहरोत्रा अजूनही जमिनीवर होता पण आता तो शांत पडला होता. बहुतेक थकला असणार.
“हात सोडव माझे,” तो ओरडला.
“चावी कुठे आहे या हातकड्यांची?” मी विचारलं.
“माझ्या जॅकेटच्या डाव्या खिशात,” तो म्हणाला.
त्याच्या जॅकेटच्या खिशात हात घालून मी चाव्यांचा एक जुडगा बाहेर काढला. त्यात हातकड्यांची चावी कोणती होती ते शोधून काढलं आणि हातकड्यांच्या मधली साखळी पकडून वर ओढली.
“आता जास्त आरडाओरडा करू नकोस मी तुझे हात सोडल्यावर,” मी म्हणालो.
“साल्या xxxxxx! मी xx मारणार आहे तुझी!”
मी त्याक्षणी ती साखळी सोडून दिली. मेहरोत्राचे हात जमिनीवर आदळले.
“काय करतो आहेस तू?” तो ओरडला, “हात सोडव माझे.”
“तुला एक सल्ला देतो मी एजंट मेहरोत्रा,” मी शांतपणे म्हणालो, “पुढच्या वेळेला जेव्हा तू मला माझी xx मारायची धमकी देशील ना, तेव्हा मी तुझे हात सोडवेपर्यंत वाट पाहा.”
मी उठून उभा राहिलो आणि चाव्यांचा जुडगा खोलीच्या दुसर्‍या कोपर्‍यात भिरकावला, “तूच सोडव स्वतःला!”
अमोल माझ्यापुढे बाहेर पडला होता. मी बाहेर पडता पडता एकदा मेहरोत्राकडे पाहिलं. त्याचा चेहरा ट्रॅफिक सिग्नलसारखा लाल झाला होता.
“मी वचन देतो तुला,” तो गुरकावला, “मी धमक्या देत नाही. तुझी xx मी मारेनच. बघशीलच तू!”
मी दरवाजा लावून घेतला आणि येऊन गाडीत बसलो. अमोल आमच्या गाडीतून प्रवास करणार्‍या आमच्या काही पाहुण्यांसारखाच हादरलेला दिसत होता.
पुढची पाच-एक मिनिटं आम्ही कोणीच काही बोललो नाही. अमोल बहुधा आपली नोकरी आता जाणार आणि ती गेली तर काय करावं याचा विचार करत होता. मी त्याला त्यातून बाहेर काढायचं ठरवलं.
“जशी अपेक्षा होती, त्याप्रमाणे काही मिळालं नाही,” मी म्हणालो, “तुला ऑफिसमध्ये काही मिळालं?”
“नाही. तिथला कॉम्प्युटर तर ते लोक घेऊन गेले असणार.”
“मग तिथल्या डेस्कमध्ये आणि ड्रॉवरमध्ये काही होतं की नाही?”
“डॉ. त्रिवेदींच्या आणि त्यांच्या कंपनीच्या इन्कमटॅक्स रिटर्न्सची एक कॉपी होती. शिवाय एक मृत्युपत्र होतं.”
“कोणाचं?”
“डॉ. त्रिवेदींच्या वडलांचं. हा बंगला त्यांनी बांधलेला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो डॉ. संतोष त्रिवेदींना मिळाला.”
“ओके.” माझ्या मनातली एक शंका यामुळे दूर झाली होती. डॉ. त्रिवेदी मेडिकल फिजिसिस्ट होते वगैरे सगळं ठीक होतं, पण कफ परेडसारख्या मुंबईमधल्या अत्यंत महागड्या आणि पॉश भागात बंगला असण्याएवढी त्यांची कमाई असेल असं मला वाटलं नव्हतं. पण जर हा बंगला वडिलोपार्जित असेल, तर मग गोष्ट वेगळी होती.
“आणि काही?”
“त्यांचा बंगला त्यांच्या नावावर आहे, पण बाकी अनेक गोष्टी कंपनीच्या नावावर आहेत, आणि कंपनीत त्रिवेदींचा हिस्सा ५२% आहे. डॉ. कामत उरलेल्या ४८%चे मालक आहेत.”
“ओके. म्हणजे त्यांचा पार्टनर हा अजूनही संशयाच्या जाळ्यात आहे. बरं, त्यांच्या रिटर्न्सवरून त्यांनी गेल्या वर्षी किती कमावले ते समजलं का?”
“कंपनीची गेल्या वर्षीची उलाढाल जवळपास ७० कोटी रुपयांची आहे. डॉ. त्रिवेदींनी जवळपास ५ कोटी रुपये गेल्या वर्षी कमावले असतील.”
“आणि अलिशा त्रिवेदी?”
“ती गृहिणी आहे. स्वतःचं उत्पन्न काही नाही.”
“ठीक आहे. आता जरा गाडी थांबव. मला एक कॉल करायचाय.”
“कोणाला?”
“जेसीपी साहेबांना.”
अमोलचा चेहरा पांढराफटक पडला, “म्हणजे आपण आत्ता जे केलं, ते तुम्ही त्यांना सांगणार?”
“सांगावंच लागेल. त्यांना बाहेरून कुठूनही कळण्यापेक्षा आपण सांगितलेलं कधीही चांगलं.” मी शांतपणे म्हणालो, “आणि काळजी करू नकोस. याची जबाबदारी माझी. तुला कुणीही हात लावणार नाही.”
अमोल काही बोलायच्या आत मी जेसीपी सरांचा नंबर लावला. त्यांनी लगेचच उचलला.
पुढची पाच मिनिटं मी बोललो. मग त्यापुढची पंधरा मिनिटं फक्त ऐकून घेतलं. अमोलसाठी मी फोन स्पीकरवर ठेवला होता.
“तुमच्यासारख्या सीनियर ऑफिसर्सनी असं वागावं हे कदापि क्षम्य नाही मिस्टर देशमुख.”
“सर, त्यांनी मला पर्याय ठेवला नव्हता. मलाही असं करावं लागलं, त्याबद्दल वाईट वाटतंय पण नाइलाज होता सर.”
“आता तुम्ही हे मला सांगितल्यावर काय अपेक्षा आहे तुमची?”
“सर, कमिशनर साहेबांना जर हे बाहेरून समजलं तर...”
“मी सांगावं अशी इच्छा आहे तुमची?”
मी काहीच बोललो नाही. अशा वेळी न बोलण्यात शहाणपणा असतो, हे मला अनुभवाने माहीत होतं.
“ओके. माझ्याकडेही एक बातमी आहे तुमच्यासाठी.”
“येस सर,” आम्ही दोघेही एकदम अॅलर्ट झालो.
“आज सकाळी ६च्या सुमारास वॉर्डन रोडच्या जवळ असलेल्या वॉर्डन व्ह्यू नावाच्या इमारतीबाहेर एक गाडी सापडलीय. टॅव्हेरा. पांढरी.”
“अलिशा त्रिवेदीची गाडी?”
“येस, आणि त्या इमारतीत तळमजल्यावर राहणार्‍या एका माणसाचा मृतदेहसुद्धा सापडलाय. त्याचाही खून कालच झाला असावा असं डॉक्टरांना प्रथमदर्शनी वाटतंय.”
“अजून एक खून?”
“हो. त्याचं नाव आहे अजित कालेलकर.”
“काय? अजित कालेलकर? म्हणजे ...”
“येस. द सेम अजित कालेलकर.”
माझं विचारचक्र फिरायला लागलं. सीशियम चोरीला जाणं, नंतर डॉ. त्रिवेदींचा खून, त्या वेळी तिथे टॅव्हेरा असणं, त्रिवेदींचा खून करणार्‍या माणसाने ‘अल्ला’ म्हणून ओरडणं आणि आता अजित कालेलकरचा खून. कालेलकर ‘हिंदू राष्ट्र’ नावाच्या कट्टर हिंदुत्ववादी साप्ताहिकाचा संपादक होता. कट्टर हिंदुत्ववादीपेक्षाही इस्लामविरोधी. त्याच्या साप्ताहिकात छापून येणारे लेख आणि बातम्या यांच्यासाठी एकच शब्द होता – प्रक्षोभक. त्याला खुनाच्या धमक्या आलेल्या होत्या हे सर्वश्रुत होतं, आणि कालेलकर असा माणूस होता, की त्याने त्याचीही बातमी बनवली होती. त्याच्यावर आणि त्याच्या साप्ताहिकावर बदनामीकारक आणि प्रक्षोभक मजकूर छापल्याबद्दल आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याबद्दल किमान तीनतरी खटले चालू होते.
या सगळ्या गोष्टी ही केस दिसते तशी साधी किंवा फक्त खुनाची नाही याकडे निर्देश करत होत्या आणि मला वाटतं आयुष्यात पहिल्यांदा मला एन.आय.ए. किंवा त्यासारख्या कुठल्यातरी केंद्रीय संस्थेचा हस्तक्षेप योग्य वाटत होता. जर ज्या लोकांनी डॉ. त्रिवेदींचा खून केला त्यांनीच अजित कालेलकरचाही खून केला असेल, तर यात दहशतवाद आणि आण्विक हल्ल्याचा अँगल होताच. पण कालेलकर एवढा मोठा माणूस होता का की इस्लामी अतिरेक्यांनी त्याचा खून करावा? का त्यांना सर्वांना दाखवून द्यायचं होतं की जर कोणी इस्लामविरोधी लिहिलं, तर त्याची काय गत होईल?
“The only reason we have put up with your cowboy methods Mr. Deshmukh, is because you have got results!” जेसीपी साहेबांच्या बोलण्याने मी भानावर आलो.
“मी सीपी सरांशी बोलेन आणि तुम्हाला डॉ. कामत आणि मिसेस त्रिवेदी यांच्याशी बोलता यावं म्हणून काय करता येईल, ते पाहीन. पण मी कोणतीही खातरी देऊ शकत नाही. विशेषतः तुम्ही एजंट मेहरोत्राशी जसे वागला आहात त्यामुळे.”
“सॉरी सर.”
“जय हिंद!” त्यांनी फोन ठेवून दिला.
अमोलने रोखून धरलेला श्वास सोडल्याचं मला ऐकू आलं, “चिअर अप अमोल,” मी म्हणालो, “आपल्या दोघांच्याही नोकर्‍या आहेत अजूनही.”
आता काय करायचं त्याबद्दल माझा निर्णय पक्का होत नव्हता. “एक काम कर अमोल,” मी म्हणालो, “तू मला आता इथेच सोड, आणि सरळ कालेलकरांच्या घरी जा. तिथे काही पुरावा मिळतो का ते बघ.”
“आणि सर, तुम्ही...”
“मी एन.आय.ए.च्या लोकांना भेटायला जातो. बघू या, काय होतं ते. मला फोनवर ‘तुम्हाला या लोकांना भेटता येणार नाही’ असं सांगणं वेगळं आणि मी तिथे गेल्यावर त्यांनी मला न भेटू देणं वेगळं.”
“आणि मी १० वाजताच्या त्या मीटिंगसाठी येऊ?”
“हो. तू कालेलकरांच्या घरी काही मिळालं तर मला फोन कर.”
“ओके.”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
आत्ता सकाळच्या वेळी दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे जाणार्‍या रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती, पण तरी मला वरळीला पोहोचायला थोडा वेळ लागला. तिथल्या क्राइम ब्रँच ऑफिसमध्ये जाऊन मी एक गाडी घेऊन सी.बी.आय.च्या ऑफिसकडे निघालो. जाता जाता सुजाता आणि राजनायक या दोघांच्याही फोनवर कॉल करायचा प्रयत्न केला, पण दोघांनीही फोन उचलले नाहीत.
इमारत जरी अधिकृतरित्या सी.बी.आय. ऑफिस म्हणून ओळखली जात असली, तरी इतर केंद्रीय संस्था – आयबी आणि एन.आय.ए. यांचीही ऑफिसेस तिथे आहेत. २००८मध्ये आयबीबरोबर काम करत असताना या इमारतीबद्दल मी ऐकलं होतं, पण यायची संधी कधी मिळाली नव्हती.
खाली सिक्युरिटीवर असलेल्या माणसाने माझं आयडी कार्ड नीट तपासलं आणि मला चौदाव्या मजल्यावर जायला सांगितलं. लिफ्टचा दरवाजा उघडतो न उघडतो तोच राजनायक समोर आला. सिक्युरिटीकडून फोन गेला असणार.
“तुला निरोप मिळाला नाही असं दिसतंय,” तो म्हणाला.
“कसला निरोप?”
“ती मीटिंग रद्द झालीय त्याचा.”
“सुजाता माझ्या क्राइम सीनवर आली, त्याच वेळी खरं तर तो निरोप मला मिळाला होता. असली कोणतीही मीटिंग होणार नव्हती, बरोबर ना?”
राजनायकने माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, “तुला नक्की काय हवंय?”
“सुजाता. तिच्याशी बोलायचंय मला.”
“मी तिचा पार्टनर आहे. जे तू तिला सांगणार आहेस, ते मला सांगितलंस तरी चालेल.”
“सॉरी. फक्त तिच्याशी बोलायचंय मला.”
त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं, “माझ्याबरोबर ये.” तो म्हणाला.
त्याने आपलं आयडी कार्ड वापरून एक दरवाजा उघडला आणि आम्ही आत गेलो. एक भरपूर लांब पण अरुंद कॉरिडॉर होता. राजनायकच्या मागून मी चालत होतो.
“तुझा सहकारी कुठे आहे?” त्याने विचारलं.
“क्राइम सीनवर,” मी म्हणालो. हे खोटं नव्हतं. कुठल्या क्राईम सीनवर, हे मी सांगितलं नाही, एवढंच. “शिवाय, तो इथे नाहीये हे एक प्रकारे बरंच आहे, कारण माझ्यावरचा राग तुम्ही त्याच्यावर काढणं मला आवडणार नाही.”
राजनायक अचानक वळला आणि त्याने मला थांबवलं, “तुला माहीत आहे तू काय करतो आहेस राजेंद्र? तू आमच्या तपासात अडचणी आणि अडथळे आणतो आहेस. याचे परिणाम भयंकर होणार आहेत. तुझा साक्षीदार कुठे आहे?”
मी खांदे उडवले, “अलिशा त्रिवेदी कुठे आहे? आणि डॉ. प्रसन्न कामत? ते कुठे आहेत?”
त्याने उद्वेगाने मान हलवली आणि एका पुढे जाऊन एका खोलीचा दरवाजा उघडला. अमोलने रोहितला ठेवलं होतं, त्यापेक्षा थोडी मोठी खोली होती. अचानक पाठीमागून मला कोणीतरी ढकललं आणि मी धडपडून आत पडलो. स्वतःला सावरून मागे वळलो, तेव्हा राजनायक दरवाजा बंद करताना दिसला. मी उठून दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तो बंद झाला होता. मी दरवाजा जोरात वाजवला, पण दुसर्‍या बाजूने कोणीही दरवाजा उघडला नाही.
दरवाजा कुणीतरी उघडेल याची मी वाट पाहिली, पण पुढची १० मिनिटं कोणीही दरवाजा उघडला नाही. शेवटी मी तिथल्या एका खुर्चीवर बसून टेबलवर डोकं ठेवलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला ताबडतोब झोप लागली.
नक्की किती वेळ झाला ते मला समजलं नाही, पण कुणीतरी जोरात हलवल्यामुळे मी जागा झालो. पाहिलं तर सुजाता समोर उभी होती.
“तू काय करतो आहेस इथे?”
“चांगला प्रश्न आहे,” मी विचारलं, “तुम्ही पोलीस अधिकार्‍यांनासुद्धा डांबून ठेवता हे मला माहीत नव्हतं. कुठल्या कलमाखाली अटक केलीय ते मला कळेल का?”
“काहीतरी बोलू नकोस. अटक?”
“हो. तुझ्या पार्टनरने, राजनायकने मला डांबून ठेवलंय इथे.”
“मी जेव्हा आले, तेव्हा दरवाजा बंद केलेला नव्हता.”
“सोड. या फालतूगिरीसाठी वेळ नाहीये माझ्याकडे. तुमचा तपास कुठपर्यंत आलाय?”
तिने लगेचच उत्तर दिलं नाही, “तू आणि तुझी क्राइम ब्रँच एखाद्या हिर्‍यांच्या दुकानात घुसलेल्या चोरांसारखे वागताय. दिसेल ती काच तुम्हाला हिरा वाटतेय. झालंय असं की त्यामुळे जमिनीवर काचांचा खच पडलाय आणि आता हिरे कुठले आणि काचा कुठल्या हे कळेनासं झालंय.”
“कशाबद्दल बोलते आहेस तू?”
“अजित कालेलकर नावाच्या माणसाचा खून झालाय आणि अलिशा त्रिवेदीची गाडी त्याच्या घरासमोर सोडून दिलेली आहे, आणि पोलिसांचं म्हणणं आहे – क्राइम ब्रँचचं टू बी स्पेसिफिक – की ही हत्या दुसर्‍या कुठल्यातरी कारणाने झालेली असल्याची शक्यता विचारात घ्यायला पाहिजे. याचा दहशतवादाशी कुठल्याही पुराव्याशिवाय संबंध जोडणं चुकीचं आहे. तुमचे जेसीपी अमित रॉय पत्रकार परिषदेत म्हणालेत असं.”
अच्छा. म्हणजे अजित कालेलकरच्या खुनाची आणि तिथे अलिशा त्रिवेदीची गाडी मिळाल्याची बातमी एन.आय.ए.पर्यंत पोहोचली तर.
“तुला काय वाटतंय?”
“तुझ्या अजून लक्षात येत नाहीये? एवढ्या उघडपणे दिसतंय, तरीसुद्धा? अजित कालेलकर इस्लामविरोधी लिहायचा. त्याच्या ब्लॉगवर, त्याच्या साप्ताहिकात. त्याचा बदला आहे हा. जे इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी फ्रान्समध्ये चार्ली हेब्दोच्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी केलं, तेच इथेही झालेलं आहे.”
“मला नाही वाटत तसं. मला वाटतं त्यांचा यामागे काहीतरी वेगळा हेतू आहे.”
“वेगळा हेतू?”
“मला एक सांग – यात तू म्हणते आहेस, तसा दहशतवादाचा अँगल असेल, तर ते स्वतःकडे लक्ष वेधून का घेताहेत? त्यांनी डॉ. त्रिवेदींना मारलं, पण अलिशाला जिवंत ठेवलं. ती पोलिसांना सांगेल याचा विचारही केला नाही?” माझ्या मनातल्या शंका एकापाठोपाठ एक बाहेर येत होत्या, “आणि आता कालेलकरला मारून अलिशाची त्यांनी चोरलेली गाडी तिथे ठेवली. म्हणजे सगळ्या जगाला कळावं की त्यांनी कालेलकरला मारलंय? २६/११च्या वेळी मुंबईमध्ये दहशतवादी घुसून त्यांनी गोळीबार करेपर्यंत पोलिसांना कळलंही नव्हतं की दहशतवादी मुंबईत शिरलेत. कुठे ते दहशतवादी आणि कुठे हे मुंबईत शिरून सीशियम असलेला IED बनवून त्याचा स्फोट घडवण्याची योजना आखणारे दहशतवादी? ज्यामुळे सगळ्या पोलीस यंत्रणेचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जाईल इतक्या पोरकट चुका ते करतील यावर तुझा विश्वास बसतो?”
“कदाचित त्यांना हे दाखवून द्यायचं असेल की मुंबईच्या संरक्षणासाठी सरकारने काहीही केलं, तरीही आम्ही आम्हाला जे हवंय ते साध्य करू शकतो,” सुजाता शांतपणे म्हणाली, “दहशतवादी जी गोष्ट करतात, त्यामागे त्यांचं काहीतरी तर्कशास्त्र असतं. आपल्याला जरी ते वेडेपणा किंवा पोरकटपणाचं वाटलं, तरी त्यांच्या नजरेत ते महत्त्वाचं असतं.”
“तू अशक्य आहेस सुजाता,” मी तिला कोपरापासून नमस्कार केला, “आपण चुकू शकतो, हे मान्य करायलाच तयार होत नाही तुम्ही लोक!”
“ते जाऊ दे. अजित कालेलकरच्या खुनाबद्दल आम्हाला समजण्याआधी तू जे काही चालवलं आहेस त्याचं काय?”
“मी ही खुनाची केस सोडवण्याचा प्रयत्न करतोय सुजाता...”
“आणि ते करताना संपूर्ण शहराला आपल्या स्वार्थी मनोवृत्तीने वेठीला धरतोयस तू.”
“तुला असं वाटतं? मला समजत नाहीये का की तुम्ही लोक काय शोधायचा प्रयत्न करताय ते?”
“अजिबात वाटत नाहीये मला असं. तुला तपास कुठल्या दिशेने चाललाय हे माहीतच नाहीये, कारण तू साक्षीदार लपवणं आणि एन.आय.ए. एजंट्सना बदडणं हेच करतो आहेस आज पहाटेपासून.”
“अच्छा. एजंट मेहरोत्राने हे शब्द वापरले का? मी त्याला बदडला वगैरे नाही...”
“तो काय म्हणाला ते महत्त्वाचं नाहीये. आम्ही इथे या शहराचं अस्तित्व धोक्यात आणणारी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करतोय आणि तू पूर्णपणे विसंगत वागतो आहेस. का करतो आहेस तू असं?”
“तुम्ही जर माझा पत्ता कट केलात, तर असले प्रश्न तुम्हाला पडणारच.” मी थंडपणे म्हणालो.
“ठीक आहे राजेंद्र,” तिचा आवाज शांत होता, “एक एन.आय.ए. एजंट म्हणून नाही, एक मित्र आणि एकेकाळचा सहकारी म्हणून मला सांग. नक्की काय करतो आहेस तू?”
“तुला ऐकायचंय? ठीक आहे. पण मी इथे, या खोलीत सांगणार नाही तुला. आपण बाहेर जाऊ या.”
“ओके” तिने अजिबात आढेवेढे घेतले नाहीत.
आम्ही दोघेही बाहेर पडलो. राजनायक आणि आणखी एक एजंट तिथे उभे होते.
“आम्ही जरा बोलायला बाहेर जातोय,” ती राजनायकला म्हणाली, आणि त्याच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता पुढे गेली. मला तसंही राजनायकशी बोलायचं नव्हतंच. मीही पुढे गेलो.
आम्ही लिफ्टच्या जवळ गेलो आणि लिफ्टची वाट पाहात होतो, तेवढ्यात माझ्या मागून आवाज आला, “देशमुखसाहेब!”
कोण आहे हे पाहायला मी वळणार, तेवढ्यात माझ्या पोटात आणि चेहर्‍यावर दोन गुद्दे बसले. डोळ्यांपुढे एक क्षण अंधारी आली, पण एजंट मेहरोत्राला मी ओळखलं. मला काही कळण्याच्या आत त्याने मला भिंतीकडे ढकललं आणि माझ्या गालांवर दोन उलट्या हातांच्या थपडा बसल्या.
“शशांक,” सुजाता कडाडली, “काय करतो आहेस तू?”
मीही भानावर आलो होतो. त्याचा माझ्या चेहर्‍याकडे येणारा गुद्दा मी अडवला आणि त्याचा हात पकडून त्याला उलटं फिरवायचा प्रयत्न केला. पण सुजाता मध्ये पडली आणि तिने आम्हाला दोघांना वेगळं केलं.
“तुझ्या ऑफिसमध्ये जा,” ती मेहरोत्राला म्हणाली, “आत्ता. ताबडतोब.”
“माझ्या ऑफिसमधनं चालता हो xxxxx!” मेहरोत्रा ओरडला. हे काय चाललंय ते बघायला बरेच एजंट्स बाहेर आले.
“चला, आपापल्या कामाला जा,” सुजाता थंडपणे म्हणाली, “सिनेमा संपलाय.”
तेवढ्यात लिफ्ट आली आणि आम्ही दोघेही आत गेलो.
“ठीक आहेस तू?” तिने विचारलं.
“हो.”
“शशांक मेहरोत्रा वेड्यासारखा वागतो कधीकधी. मॅच्युरिटी नावाची गोष्ट नाहीच आहे त्याच्याकडे,” माझ्याकडे रोखून पाहत सुजाता म्हणाली.
“मला आश्चर्य वाटतंय की त्याने मी त्याला हातकड्या घातल्याचं तुमच्या ऑफिसमध्ये सांगितलं.”
“का?”
“कारण त्याला एकट्याला त्या घरात ठेवलं होतं, त्यावरून मी असा अंदाज केला होता, की त्याने नक्कीच काहीतरी मोठी चूक केली असणार आणि त्याची शिक्षा म्हणून तो तिथे आहे. त्यात आम्ही तिथे येऊन त्याच्या नाकावर टिच्चून घरात घुसल्याचं तो का कुणाला सांगेल?”
“तुला एक समजत नाहीये,” ती म्हणाली, “मेहरोत्राने चुका केल्या असतील, पण त्याला कुणीही शिक्षा म्हणून तिथे ठेवलं नव्हतं. एकतर हे सगळं प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, त्याला काहीही फरक पडत नाही, की त्याच्या नाकावर टिच्चून तुम्ही त्रिवेदींच्या घरात घुसलात. त्याने जे घडलं ते सांगितलं, कारण आमच्या तपासात त्यामुळे अडथळा येऊ नये हा त्याचा हेतू होता.”
“ओके.”
आम्ही इमारतीच्या गच्चीवर आलो होतो.
“पण तेही महत्त्वाचं नाहीये राजेंद्र. सीशियमच्या १-२ नाही, ३२ ट्यूब्ज गायब आहेत, आणि मला नाही वाटत की तुला या प्रकरणाचं गांभीर्य समजतंय. तू याकडे एक खून म्हणून बघतो आहेस. प्रत्यक्षात ही चोरीची केस आहे. पण किरणोत्सर्गी पदार्थाची चोरी. त्यांना सीशियम हवं होतं, ते त्यांना मिळालं. त्यामध्ये डॉ. त्रिवेदींचा अडथळा येईल असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी त्यांना मारलं. आता जर हे पाहिलेल्या एकमेव साक्षीदाराशी आम्हाला बोलता आलं, तर या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊ शकतो. कुठे आहे तो आत्ता?”
“तो सुरक्षित आहे. अलिशा त्रिवेदी आणि डॉ. कामत कुठे आहेत?”
“तेही सुरक्षित आहेत. डॉ. कामतांशी आम्ही इथे बोलतोय आणि अलिशाला आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसजवळ जे एन.आय.ए. ऑफिस आहे, तिथे ठेवलंय. जोपर्यंत तिच्याकडून आम्हाला सगळी माहिती मिळत नाही तोपर्यंत.”
“ती तुम्हाला काय मदत करणार? तिने फार काही...”
“इथेच चुकतो आहेस तू. तिने आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.”
आता मला आश्चर्याचा धक्का बसला.
“काय सांगितलं तिने? तिने तर त्यांचे चेहरेसुद्धा पाहिले नव्हते.”
“चेहरे नाही पाहिले तिने. पण एक नाव ऐकू आलं होतं तिला. ते एकमेकांशी बोलत असताना.”
“कोणतं नाव? आधी तर तसं काही बोलली नाही ती.”
सुजाताने होकारार्थी मान डोलावली, “म्हणूनच तर मी म्हणतेय की तुझ्या साक्षीदाराला आमच्या ताब्यात दे. आमच्याकडे साक्षीदारांकडून सगळी माहिती इत्यंभूत काढून घेणारे लोक आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी काढून घेता आल्या नाहीत, त्या आम्ही काढून घेऊ शकतो. जशा आम्ही त्या तिच्याकडून काढून घेतल्या.”
“काय नाव मिळालं तुम्हाला तिच्याकडून?”
तिने नकारार्थी मान हलवली, “मुळीच नाही राजेंद्र. आम्ही कोणाचंही नाव जाहीर करणार नाही आहोत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. तू इथे उपरा आहेस. आणि तू तुझ्या जेसीपी आणि सीपींच्या द्वारे या तपासात घुसण्याचा कितीही प्रयत्न केलास तरीही तुला आम्ही काहीही सांगणार नाही.”
अच्छा. म्हणजे मी जेसीपी साहेबांना जे सांगितलं, ते त्यांनी सीपी साहेबांना सांगितलं आणि त्यांनी एन.आय.ए.कडे मला अलिशा आणि डॉ. कामत यांच्याशी बोलू देण्याची विनंतीसुद्धा केली, पण या लोकांनी ती फेटाळून लावली.
“माझ्याकडे माझा साक्षीदार हीच एकमेव गोष्ट आहे,” मी म्हणालो, “तू मला अलिशाने सांगितलेलं नाव सांग, मी तुला त्याचा ठावठिकाणा सांगतो.”
“तुला त्याचं नाव का हवंय पण? तू त्याच्या जवळपासही जाऊ शकणार नाहीस.”
“मला नाव हवंय.”
तिने जरा विचार केला, “ठीक आहे. आधी तू सांग.”
“मी माझ्या घरी ठेवलंय त्याला,” मी म्हणालो, “दादरला. तुला माहीत असेलच मी कुठे राहतो ते!”
तिने लगेचच तिच्या ब्लेझरच्या खिशातून एक मोबाईल काढला.
“एक मिनिट. अलिशाने सांगितलेलं नाव काय आहे?”
“सॉरी राजेंद्र.”
“मी तुला सांगितलंय आमचा साक्षीदार कुठे आहे ते. आता कबूल केल्याप्रमाणे तू मला ते नाव सांग.”
“राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. सॉरी.”
माझा अंदाज बरोबर होता तर.
“मी खोटं बोललो,” मी थंडपणे म्हणालो, “तो माझ्या घरी नाहीये.”
तिने तिचा फोन ब्लेझरच्या खिशात ठेवून दिला. ती संतापली होती.
“काय चाललंय हे तुझं?” तिचा आवाज टिपेला गेला. तिला एवढं संतापलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं, “१३ तास झालेत ते सीशियम गायब होऊन. त्या अतिरेक्यांनी कदाचित ते IEDमध्ये ठेवलंही असेल...”
“मला नाव सांग, मी तुला आमच्या साक्षीदाराचा पत्ता सांगतो.”
“ओके,” ती धुसफुसत म्हणाली. आज मी दोनदा तिचं खोटं पकडल्याचा तिला जास्त राग आला होता बहुतेक.
“ती म्हणाली की तिने मुबीन हे नाव ऐकलं आहे. तिने आपण तिच्याबरोबर होतो, तेव्हा याबद्दल विचार केला नाही, कारण हे कुणाचं नाव असू शकेल असा विचारच तिच्या मनात आला नाही.”
“कोण आहे हा मुबीन?”
“हा पाकिस्तानी तालिबानशी संबंधित दहशतवादी आहे. तो मूळचा ताजिक आहे – रशीद मुबीन फातिम हे त्याचं खरं नाव. तो भारतात आहे, असा एफ.बी.आय.ला आणि मोसादला संशय आहे. त्यांनी आमच्याकडे त्याचे डीटेल्स पाठवले आहेत आणि आम्ही ते तपासतो आहोत. एफ.बी.आय.ला तर हाही संशय आहे, की ग्रीन्सबरोमध्ये जे सीशियम चोरीला गेलं, त्यातही मुबीनचा हात असावा, कारण त्या वेळी तो अमेरिकेत होता. तो कदाचित सीशियम काळ्या बाजारात विकत असेल, आणि ते पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरत असेल, किंवा मग सीशियमचा वापर बाँब बनवण्यासाठी करणार असेल. त्याला थांबवणं गरजेचं आहे. झालं समाधान? आता तुझ्या साक्षीदाराचा पत्ता दे.”
“एक मिनिट. तू दोन वेळा खोटं बोलली आहेस माझ्याशी.”
मी माझा मोबाइल काढला आणि इंटरनेट चालू आहे का ते पाहिलं. नंतर गूगलमध्ये रशीद मुबीन फातिम हे नाव टाकलं. त्याच्याशी संबंधित अनेक बातम्या माझ्या मोबाइलच्या स्क्रीनवर आल्या. सर्वात जुनी बातमी ८ वर्षं जुनी होती. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये या माणसाचा सहभाग असल्याचा संशय होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो भारतात असल्याचा उल्लेख कुठेही नव्हता.
“कुठेही तो भारतात असल्याचा उल्लेख नाहीये,” मी म्हणालो.
“अर्थात. हे आमच्याशिवाय कुणालाही माहीत नाहीये. त्याचमुळे तिने दिलेली माहिती खरी आहे हे आम्हाला समजलं.”
“काय? तिच्यावर तुमचा एवढा विश्वास आहे? आपल्यासमोर तिला हे काहीही आठवलं नव्हतं, आणि तुम्ही तिच्याकडून हे नाव ऐकल्यावर हा निष्कर्ष काढून मोकळे झालात की तो या देशात आहे आणि या सगळ्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे?”
“एक मिनिट. तो आपल्या देशात आहे हे आम्हाला खातरीलायक माहीत आहे. त्याला आयबीच्या चेकपोस्टवर स्पॉट केलेलं आहे. नेपाळमधून तो उत्तर प्रदेशातल्या सुनौलीमध्ये आणि तिथून गोरखपूरला आला आणि तिथून लखनौला गेला, तिथून दिल्लीला गेला आणि मग तिथून विमानाने मुंबईला आला. त्याच्याबरोबर दुबईचा नागरिक असलेला अली सकीब नावाचा दुसरा माणूस आहे. तो अल कायदाशी संबंधित आहे असा दुबई पोलिसांना संशय आहे. मोसादने आम्हाला ही टिप दिली. या दोघांनाही मोसादच्याच एजंट्सनी काठमांडूला स्पॉट केलं होतं.”
“आणि त्यांच्याकडे सीशियम आहे, असा तुम्हाला संशय आहे?”
“ते नक्की माहीत नाही, पण सकीब डनहिल सिगरेट्स ओढतो अशी खातरीलायक माहिती आहे आणि....”
“अच्छा. म्हणून तुम्ही ती सिगरेटची राख तपासताय.”
“हो.”
मला अचानक प्रचंड ओशाळल्यासारखं झालं.
“सॉरी. आधी माहिती न सांगितल्याबद्दल,” माझी मान खाली होती, “त्याला आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनजवळ असलेल्या ग्रीन्स नावाच्या हॉटेलमध्ये ठेवलाय. रूम नंबर ३०२. राजीव कपूर या नावाने. त्याचं खरं नाव रोहित खत्री आहे.”
“धन्यवाद!”
“आणि आणखी एक.”
“काय?”
“त्याने आम्हाला हे सांगितलंय की गोळ्या झाडण्याआधी तो मारेकरी अल्ला असं ओरडला होता.”
तिने उद्वेगाने मान हलवत फोन ब्लेझरच्या खिशातून बाहेर काढला आणि एक नंबर डायल केला आणि ही माहिती सांगितली.
कॉल संपवून जेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं, तेव्हा तिच्या नजरेत मला संतापाऐवजी निराशा आणि कीव अशा भावना दिसल्या.
“काही होण्याआधी या लोकांना आपल्याला थांबवायला पाहिजे.” ती म्हणाली, “मी जाते आता. सीशियम मिळेपर्यंत मी एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन्स आणि मॉल्ससारख्या जागांपासून लांब राहीन.”
ती वळली आणि जायला लागली. तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे मी बघत असताना माझा फोन वाजला.
मी पाहिलं, तर अनोळखी नंबर होता. मी फोन उचलला.
“राजेंद्र देशमुख बोलतोय.”
“सर, मी राजश्री शेळके बोलतेय.”
मला पटकन लक्षात आलं नाही. मग एकदम ट्यूब पेटली. अमोलची पत्नी.
“बोला.”
“सर, अमोल तुमच्याबरोबर आहे का? त्याचा फोन उचलत नाहीये तो.”
“नाही. तो दुसरीकडे आहे. काही निरोप द्यायचा आहे का?”
“हो सर. मला आज लवकर ड्युटीवर रिपोर्ट करायला सांगितलंय.”
अमोलची पत्नी जसलोक हॉस्पिटलमध्ये नर्स होती, हे मला माहीत होतं.
“त्यामुळे मी निघाले आहे. काहीतरी इमर्जन्सी आहे बर्न वॉर्डमध्ये. कुणीतरी ARS असलेला पेशंट आलाय म्हणे. त्यामुळे कदाचित माझा फोन त्याला लागू शकणार नाही, कारण किती वेळ लागू शकेल ते माहीत नाही.”
“अच्छा.”
“हो सर. रेडिएशन बर्न्सचं काहीच सांगता येत नाही. अमोलला सांगाल ना...”
“एक मिनिट,” माझ्या आजूबाजूचे आवाज ऐकू येणं अचानक बंद झालं. निदान मला तसं वाटलं.
“तुम्ही काय म्हणालात? रेडिएशन बर्न्स?”
“हो सर. मला डॉक्टरांनी जे सांगितलं, त्यावरून केस क्रिटिकल आहे खूप.”
“तुम्ही अजूनही जसलोकमध्येच काम करता ना?”
“हो सर, पण...”
“ARS म्हणजे काय?”
“Acute Radiation Syndrome, पण ...”
“थँक्स. मी सांगेन अमोलला.” मी फोन ठेवून दिला.
मी जेव्हा सुजाताला गाठलं, तेव्हा ती लिफ्टमध्ये शिरतच होती.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सकाळी दक्षिण मुंबईकडे जाणारे रस्ते गर्दीने तुडुंब भरलेले असणं हे अत्यंत नॉर्मल आहे हे मला माहीत होतं. पण दुसरा पर्याय नव्हता. यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे माझ्या गाडीला सायरन होता, त्यामुळे गरज पडली असती, तर मी वाहतूक कोंडीतून मार्ग काढायला त्याचा उपयोग केला असता.
“कुठे चाललोय आपण?” सुजाताने हा प्रश्न मला तिसर्‍यांदा विचारला होता.
“बोललो ना मी. सीशियमकडे घेऊन चाललोय मी तुला.”
“म्हणजे?”
“माझा सहकारी अमोल. त्याची पत्नी नर्स आहे. जसलोक हॉस्पिटलमध्ये. त्याने तिचा फोन उचलला नाही. तिला त्याला निरोप द्यायचा होता, म्हणून तिने मला फोन केला. देव त्यांचं भलं करो – त्याने तिला माझा नंबर दिला होता. तिच्या बोलण्यातून मला कळलं की जसलोकमध्ये Acute Radiation Syndrome झालेल्या एका माणसाला अॅडमिट करण्यात आलेलं आहे. आपण तिथे पुढच्या पाच मिनिटांमध्ये पोहोचू.”
तिने एक क्षण माझ्याकडे अविश्वासाने पाहिलं आणि मग आपला फोन बाहेर काढला आणि कोणतातरी नंबर फिरवला. समोरून फोन उचलला गेल्यावर तिने सुरुवात केली, “जसलोक हॉस्पिटलमध्ये एक टीम पाठवा. किंवा मरीन ड्राईव्हकडे जाणार्‍या टीमला जसलोकला जायला सांगा. इथून अँटि-कंटॅमिनेशन सूट्सपण पाठवा. जसलोकमध्ये एक केस आलेली आहे. बहुतेक सीशियममुळे. ताबडतोब.”
आम्ही हाजी अलीच्या जवळ आलो होतो. इथला सिग्नल म्हणजे प्रचंड वेळखाऊ. पण आत्ता सुदैवाने तो हिरवा होता, आणि नसता तर मी तोडला असता.
तिथे जाता जाता माझ्या डोक्यातलं विचारचक्र चालूच होतं. कोणाबरोबर तरी मला माझ्या मनातल्या शंका बोलायलाच हव्या होत्या.
“कोण आहे हा माणूस, ज्याला अॅडमिट केलंय?” सुजाताने विचारलं.
“माहीत नाही. पण मला एक गोष्ट कळत नाहीये.”
“काय?”
“त्यांनी डॉ. त्रिवेदींना कसं शोधून काढलं?”
“कोणी?”
“मुबीन आणि सकीब. त्यांनी त्रिवेदींना शोधलं कसं?””
“काही कल्पना नाही. जर हॉस्पिटलमधला हा माणूस त्यांच्यापैकी कुणी एक असेल, तर आपण विचारू त्याला. संधी मिळाली तर.”
“आणखी एक शंका येतेय माझ्या मनात!”
“तू आणि तुझ्या शंका! आता काय?”
“तुला हे खटकत नाहीये का की सगळ्या गोष्टी त्या घरातून आलेल्या आहेत?”
“म्हणजे? कशाबद्दल बोलतो आहेस तू?”
“डॉ. त्रिवेदींचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेली गन, अलिशा त्रिवेदीचा फोटो काढण्यासाठी वापरण्यात आलेला कॅमेरा, डॉ. त्रिवेदींना ज्या कॉम्प्युटरवरून मेल पाठवण्यात आला, तो कॉम्प्युटर, त्यांनी ज्या कोका कोलाच्या बाटलीचा सायलेन्सर म्हणून वापर केला असेल, ती बाटलीसुद्धा. मला तशा अनेक प्लास्टिकच्या बाटल्या त्यांच्या किचनमध्ये दिसल्या. तिला बांधण्यासाठी वापरण्यात आलेले स्नॅप टाईज – तेही तिच्या बागेतून आलेले आहेत. गुलाबाच्या फुलांना आधार देण्यासाठी वापरण्यात आलेले. फक्त तिच्या मानेवर टेकवण्यात आलेला चाकू आणि त्या दोघांनी घातलेले मास्क्स – या दोनच गोष्टी त्यांच्याकडे स्वतःच्या अशा होत्या. तुला हे खटकत नाहीये का हे मी विचारतोय.”
“हे पाहा,” ती थोडा विचार करून म्हणाली, “या दोघांसारख्या प्रशिक्षित अतिरेक्यांना साधनं महत्त्वाची नसतात. त्यांचा जिहादच्या संकल्पनेवर असलेला विश्वास आणि त्याच्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी – या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.”
“पण मग डॉ. त्रिवेदींकडे काय काय मिळेल याची माहिती त्यांना आधीपासून होती असं म्हणायला पाहिजे. सीशियम पळवायची योजना अशी एका दिवसात तर बनली नसणार.”
तिने माझ्याकडे पाहिलं, “हा मुद्दा महत्त्वाचा आहे. डॉ. कामत आणि अलिशा यांच्याकडून याबद्दल आणखी माहिती मिळवायला हवी.”
आम्हाला कॅडबरी जंक्शनचा सिग्नलदेखील सहज पार करता आला आणि आम्ही जसलोक हॉस्पिटलच्या आवारात शिरलो. एका दिवसात दोन हॉस्पिटल्समध्ये जायची ही आयुष्यातली पहिलीच वेळ होती.
राजश्रीचा नंबर माझ्या मोबाइलवर आला होताच. तिला फोन करून मी इमर्जन्सी बर्न्स वॉर्ड कुठे आहे, ते विचारून घेतलं. तो सातव्या मजल्यावर होता. लिफ्टपाशी बर्‍यापैकी रांग होती, पण आमच्या आयडी कार्डसमुळे आम्हाला जाता आलं.
जिथे या माणसाला ठेवण्यात आलं होतं, तो भाग इतर भागांपेक्षा वेगळा ठेवलेला होता हे दिसलंच. मी आणि सुजाता आतमध्ये गेलो. या माणसापाशी सरळ जाता आलंच नाही आम्हाला. त्याच्या पलंगाभोवती कसलंतरी आवरण होतं. मला जेवढं दिसू शकत होतं, त्यावरून मी पाहिलं. त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. छोट्या चणीचा माणूस होता. तिथल्या सगळ्या उपकरणांच्या पसार्‍यात तो आणखीनच लहान आणि केविलवाणा दिसत होता. त्याचे डोळे बंद होते. बहुतेक गुंगीच्या औषधांच्या प्रभावाखाली असावा. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. लज्जारक्षणासाठी एक टॉवेल तेवढा कमरेवर ठेवलेला होता.
आणि तेव्हा मला त्याच्या जखमा दिसल्या. त्याच्या डाव्या कुशीवर, कमरेच्या डाव्या बाजूवर आणि पार्श्वभागाची जी बाजू मला दिसत होती, तिथे सगळीकडे लालबुंद रंगाची वर्तुळं आणि जांभळट रंगाचे चट्टे होते. काही जखमांतून पू बाहेर आला असावा. त्याच्या हातावरही असेच चट्टे होते.
“राजेंद्र, त्याच्या फार जवळ जाऊ नकोस.” सुजाताने मला बजावलं, “आपण डॉक्टरांना विचारू या आधी.”
“हे सीशियममुळे होऊ शकतं?”
“हो. जर हा माणूस बर्‍याच सीशियमच्या सरळ संपर्कात आला असेल, उदाहरणार्थ त्याच्या शर्टच्या खिशात – तर होऊ शकतं. किती वेळ तो सीशियमच्या संपर्कात आलाय त्यावरही हे अवलंबून आहे.”
“अच्छा, हा मुबीन किंवा सकीब यांच्यापैकी कुणी आहे?”
“नाही. दोघांपैकी कुणीच नाही.”
आम्ही दोघेही बाहेर कॉरिडॉरमध्ये आलो. सुजाताने एक कॉल केला.
“हो, ही केस खरी आहे” ती म्हणाली, “डायरेक्ट एक्स्पोजर केस. इथे आपल्याला कन्टेनमेंट प्रोटोकॉल लागू करायला हवाय. हा सगळा भाग बाकीच्या हॉस्पिटलपासून अलग करायला हवा.”
समोरून काहीतरी विचारलं गेलं असावं, कारण ती ऐकत होती.
“नाही, दोघांपैकी कुणीच नाही,” ती म्हणाली, “तो कोण आहे हे अजून माहीत नाही. समजलं, की सांगते.”
तिने फोन ठेवून दिला, “असीम आणि त्याचे लोक इथे १० मिनिटांत पोहोचतील. तू भेटला असशील ना असीमला?”
“हो. एस.एस.के.टी. हॉस्पिटलमध्ये” मी म्हणालो.
हॉस्पिटलचा निळा गाऊन घातलेली एक स्त्री आमच्या जवळ आली.
“मी डॉक्टर अलका साठे. तुम्हाला पेशंटपासून दूर राहायला पाहिजे, कारण त्याला काय झालंय ते आम्हाला अजून माहीत नाहीये.”
आम्ही तिला आमची आयडी कार्डस दाखवली.
“तुम्ही आत्ता काय सांगू शकता?” सुजाताने विचारलं.
“काही विशेष नाही. Prodromal Syndrome – किरणोत्सर्गी पदार्थाच्या संपर्कात आल्यावर लगेचच जो परिणाम होतो, तो तर दिसून येतोय. पण तो नक्की कशाच्या आणि किती वेळ संपर्कात आलेला आहे, ते आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही आहोत.”
“आणखी काही दिसून आलं तुम्हाला?” मी विचारलं.
“भाजल्याच्या खुणा आणि चट्टे तर पाहिले असतील तुम्ही. ते बाहेर दिसताहेत, पण खरा प्रॉब्लेम त्याच्या शरीरात अंतर्गत स्वरूपात झालेला आहे. त्याची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होत चाललेली आहे, आणि पोटाचा आतला भाग भाजून निघालेला आहे. बाकीच्या शरीरावर इतका दबाव आल्यामुळे तो कार्डिअॅक अरेस्टच्या परिस्थितीत पोहोचला आहे.”
“तो किरणोत्सर्गी पदार्थाच्या संपर्कात आल्यापासून साधारण किती वेळात हा Prodromal Syndrome चालू होतो?”
“एका तासात चालू होऊ शकतो.”
“बरं, हा माणूस कोण आहे आणि तो तुम्हाला कसा आणि कुठे सापडला?” मी विचारलं.
“आधार नावाची एक एनजीओ आहे. त्यांच्या अ‍ॅम्ब्युलन्सने त्याला इथे आणण्यात आलं होतं एवढं माहीत आहे मला. त्यांना तो कुठे सापडला, ते माहीत नाही. तो रस्त्यावर सापडला. बेशुद्धावस्थेत पडला होता. जिथे पडला असेल, तिथल्या लोकांनी आधारच्या स्वयंसेवकांना सांगितलं असेल, आणि ते इथे घेऊन आले असतील. त्याचं नाव नजरूल हसन आहे. वय ४१. पत्ता वगैरे काहीही दिलेला नाही.”
सुजाता थोडी बाजूला झाली. ती परत कोणाला तरी फोन करणार असं दिसत होतं. बहुतेक नजरूल हसन हे नाव एन.आय.ए.ला माहीत असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत आहे का ते बघत असावी.
“या माणसाचे कपडे आणि इतर गोष्टी कुठे आहेत?”
“आमच्या लोकांनी ते सगळे इथून हलवले आहेत. आम्हाला त्यामुळे बाकीचे लोक किरणोत्सर्गाच्या संपर्कात यायला नको होते. तुम्ही त्या नर्सेसना विचारू शकता.” डॉक्टरांनी तिथल्या नर्सिंग स्टेशनकडे निर्देश केला. तिथे असलेल्या नर्सने सांगितलं की या माणसाच्या ज्या काही वस्तू होत्या, त्या सगळ्या हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या Hazardous Waste Containerमध्ये ठेवण्यात आल्या आहेत आणि त्यांची पुढच्या एक तासात विल्हेवाट लावली जाईल. मी माझं आयडी कार्ड तिला दाखवलं आणि तेव्हा तिने एका सिक्युरिटी गार्डला माझ्याबरोबर जायला सांगितलं. तोपर्यंत सुजाता माझ्या मागे आली होती, आणि तिने आमचं हे संभाषण ऐकलं होतं. मी तिथून जाण्याआधी तिने माझ्या हातात तो पेजरसारखा दिसणारा रेडिएशन मॉनिटर दिला.
“हे घे. आणि आमची टीम येते आहे. स्वतःला धोक्याच्या परिस्थितीत टाकू नकोस. जर या मॉनिटरने सिग्नल दिला, तर ताबडतोब मागे व्हायचं. नसतं धाडस करू नकोस.”
“हो.”
तिने जसा तो मॉनिटर स्वतःच्या बेल्टमध्ये अडकवला होता, तसाच अडकवून मी आणि तो गार्ड बेसमेंटमध्ये गेलो. कंटेनरमधल्या वस्तू नष्ट करायला आणखी एक तास अवकाश होता. त्यामुळे या वस्तू जाळून टाकलेल्या असतील याचा धोका नव्हता, पण जर सीशियम इथे असलं तर...
आम्ही कन्टेनर ठेवलेल्या भागात गेलो. एक जवळपास साडेतीन फूट उंचीचा मोठा डबा तिथे वेगळा ठेवलेला दिसला. त्यावर मोठ्या अक्षरांत लेबल लावलेलं होतं – CAUTION: HAZARDOUS WASTE . तो सिक्युरिटी गार्ड, जो इतका वेळ माझ्या बरोबर चालत होता, तो माझ्या मागे उभा असल्याचं मला जाणवलं.
“तुम्ही बाहेर थांबा.” मी त्याला सांगितलं, आणि लगेचच मला दरवाजा लावल्याचा आवाज ऐकू आला. एकीकडे त्या मॉनिटरकडे लक्ष देत मी त्या डब्याचं झाकण उघडलं. आत नजरूल हसनचे कपडे रचून ठेवले होते. तो बेशुद्धावस्थेत मिळाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं मला आठवलं. अशा वेळी कपडे माणसाच्या अंगावरून कापून काढावे लागतात हे मला माहीत होतं. इथेही तसंच झालं असावं. त्याचे बूटसुद्धा त्याच्या पायांमधून कापून काढावे लागले होते. मी तो मॉनिटर माझ्या बेल्टमधून काढला आणि डब्याच्या अंतर्भागात फिरवला. काहीही आवाज आला नाही. आतमध्ये एक जीन्स, एक खाकी शर्ट, एक नारिंगी रंगाचं बिनबाह्यांचं जॅकेट, टी शर्ट आणि एक अंडरवेअर या वस्तू ठेवल्या होत्या. तिथेच एक काळ्या रंगाचं वॉलेटही ठेवलं होतं. मी त्या जीन्सच्या बाजूने मॉनिटर फिरवला. काहीच आवाज आला नाही. त्याच्या डाव्या बाजूला भाजल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे मी जीन्सच्या डाव्या बाजूने मॉनिटर फिरवला. तो शांतच होता. सीशियम बहुतेक नव्हतं इथे. मग हा माणूस सीशियमच्या संपर्कात आला कसा?
तेवढ्यात माझं लक्ष त्याच्या जीन्सच्या दुसर्‍या खिशाकडे गेलं. तिथे एक चाव्यांचा जुडगा होता. मी तो बाहेर काढला. टाटा आपे मिनी ट्रकची चावी होती. एका क्षणात मला टोटल लागली. हा माणूस सफाई कर्मचारी होता. खाकी शर्ट आणि नारिंगी बिनबाह्यांचं जॅकेट यावरून ते समजलं. मुंबई महापालिकेचे कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी आपे मिनी ट्रक्स वापरतात, हेही आठवलं. याचा अर्थ हा माणूस नुसता सफाई कर्मचारी नव्हता, तर कचरा गोळा करणारं वाहन चालवणारा होता. म्हणजे याचा तो मिनी ट्रक जिथे असेल, सीशियम त्याच्या जवळपास असू शकतं. त्याचा मोबाइल फोनही तिथे होता. स्मार्टफोन नव्हता, साधासरळ फोन. त्याच्या कॉल रेकॉर्डसमध्ये काही सापडतं का ते पाहायचा मी प्रयत्न केला, पण काहीही सापडलं नाही.
मी ताबडतोब सुजाताला फोन केला. तिनेही ताबडतोब उचलला.
“मी कपडे चेक केले त्याचे. सीशियम नाहीये इथे.”
“ओके,” तिच्या आवाजात निराशा होती, “जर ते तिथे सापडलं असतं तर हा सगळा प्रकार इथल्या इथे संपला असता. पण...”
“हो ना. बरं, त्याच्या नावावरून काही सापडलं?”
“नावावरून?”
“तू त्याचं नाव चेक केलंस ना?”
“अच्छा ते! नाही. काही नाही.”
“हा माणूस महापालिकेचा सफाई कर्मचारी आहे सुजाता, त्यामुळे...”
“माझी टीम आलीय राजेंद्र,” माझं बोलणं मध्येच तोडलं तिने, “नंतर बोलू.” आणि फोन ठेवून दिला.
मी त्याचं वॉलेट, चाव्या आणि मोबाईल फोन हे घेऊन वर यायला निघालो. येता येता राजश्रीला परत फोन केला. ती बहुतेक ट्रेनमध्ये होती.
“ही एनजीओ आधार – याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे?”
“चांगले लोक आहेत सर. त्यांच्या अ‍ॅम्ब्युलन्सेस आहेत. अपघातात सापडलेले लोक, रस्त्यावर बेवारशी असलेले आजारी लोक – ज्यांना कोणीही हॉस्पिटल्समध्ये अॅडमिट करायला नाहीये, त्यांना ते हॉस्पिटल्समध्ये घेऊन जातात.”
“हॉस्पिटल्समध्ये? म्हणजे फक्त जसलोकला आणत नाहीत?”
“नाही. तो माणूस त्यांना जिथे सापडतो, तिथून जवळचं जे हॉस्पिटल असेल, तिथे आणतात.”
“त्यांच्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये डॉक्टर्सही असतात?”
“हो. कधी कधी काही पेशंट्सना ताबडतोब औषधं किंवा इंजेक्शन्स द्यावी लागतात. त्यासाठी डॉक्टर्स असतात.” बरोबर. नजरूल हसनला झालेल्या जखमा सामान्य नाहीत, हे एखाद्या डॉक्टरच्याच लक्षात आलं असणार.
“या लोकांचा काही नंबर आहे?”
“हो. आहे. तुम्हाला हवा असेल, तर मी तुमच्या फोनवर पाठवते.”
“थँक्स.” मी फोन बंद केला.
अर्ध्या मिनिटात माझ्या फोनवर तिच्या फोनवरून मेसेज आला.
त्या नंबरवर मी कॉल केला, मी कोण आहे ते सांगितलं आणि नजरूल हसनबद्दल विचारलं.
“सर, तो आम्हाला नेपिअन सी रोडवर चार मोठ्या इमारतींचं एक कॉम्प्लेक्स आहे, तिथे सापडला. मेनका, रंभा, उर्वशी आणि ताहनी हाईट्स या चार इमारती आहेत. त्यांचं एकच सलग बेसमेंट आहे. तिथे हा माणूस बेशुद्ध अवस्थेत तिथल्या सिक्युरिटीवाल्यांना सापडला. त्याला तिथे आधी उलटी झाली, मग तो बेशुद्ध पडला असं ते लोक म्हणाले. तो दररोज तिथला कचरा गोळा करण्यासाठी यायचा, म्हणून ते त्याला चेहर्‍याने ओळखत होते. त्यांच्यातल्या एकाला आमच्याबद्दल माहीत होतं, म्हणून त्याने आम्हाला फोन केला.”
“ज्याने तुम्हाला फोन केला, त्याचा नंबर आणि नाव आहे का तुमच्याकडे?”
“आहे सर. तुमच्या नंबरवर पाठवतो.”
तो नंबर मिळाल्यावर मी त्याच्यावर फोन केला. ज्याने उचलला तो तरुण मुलगा असावा असं वाटत होतं. त्याने मला हीच कहाणी परत ऐकवली. तो हेही म्हणाला, की अजून सगळा कचरा गोळा झालेला नसल्यामुळे तो आपे मिनी ट्रक अजूनही तिथेच आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत तो ट्रक कॉम्प्लेक्सच्या बाहेर जाऊ देऊ नको असं सांगून मी सातव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरलो.
सातव्या मजल्यावर शांतता होती. असीमने घातलेल्या सूटसारखा सूट घातलेले दोघे-तिघे दिसले. सुजाता नर्सिंग स्टेशनपाशी उभी होती. नजरूल हसनच्या वस्तू मी तिच्या ताब्यात दिल्यावर तिने त्या असीमच्या टीममधल्या एका माणसाकडे सोपवल्या.
“नजरूल हसन शुद्धीवर आला का?”
“नाही. आणि येईल असं वाटतही नाही. आपल्याला त्याच्याशी बोलायची संधी मिळणार नाही असं दिसतंय.”
“ओके. तसं जर असेल, तर मी निघतो मग इथून.”
“ठीक आहे, मग मीही तुझ्याबरोबर येते.”
“पण तुला इथे सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतील ना?”
“इथे सीशियम नाहीये. म्हणजे माझं काहीही काम इथे नाहीये. मी असीमला चार्ज देऊन निघते आणि तुझ्याबरोबर येते.”
“माझ्यावर लक्ष ठेवायला?”
“तुला जे समजायचंय ते समज!” असं म्हणून तिने असीमला फोन केला.
“मी खाली थांबतो, माझ्या गाडीपाशी.”
“एक मिनिट,” तिने फोनवर सांगितलं, “कुठे जातोय आपण?”
“नजरूल हसनच्या मिनी ट्रककडे.”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
जसलोक हॉस्पिटलकडून नेपिअन सी रोडवर जायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही. पण मी हे कसं शोधून काढलं त्याबद्दल सुजाताला कुतूहल होतं.
“मी त्या सिक्युरिटीच्या माणसाला हे सांगितलंय की त्या मिनी ट्रकला कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्लेक्सच्या बाहेर जाऊ देऊ नकोस. जर या माणसाला तिथे हा त्रास सुरू झाला, तर याचा अर्थ ते सीशियम त्याच्या मिनी ट्रकमध्येच कुठेतरी असायला हवं. ते त्याच्याकडे कसं आलं, हे मात्र मला कळत नाहीये.”
“हो. आणि त्याने ते मूर्खासारखं आपल्या खिशात का ठेवलं.”
“तू हे गृहीत धरते आहेस, की त्याला ते काय आहे, हे माहीत होतं. कदाचित माहीत नसेलही.”
“त्यांचा काहीतरी संबंध असणारच. नजरूल हे बांगला देशी नाव आहे. कदाचित हा माणूस बेकायदेशीरपणे मुंबईमध्ये आलेला बांगला देशी असेल. त्याने इथे आल्यावर मतदार ओळखपत्र वगैरे बनवून घेतलं असेल. मुबीन आणि सकीबला पाकिस्तानच्या आय.एस.आय.चा पाठिंबा आहे, याची मला खातरीलायक माहिती आहे. कदाचित हा नजरूल आय.एस.आय.च्या इथल्या हस्तकांपैकी एक असेल.”
“पण अजित कालेलकर या सगळ्यांत कुठे येतो?”
“त्याबद्दल माझा असा अंदाज आहे, की पोलिसांना आणि एन.आय.ए.ला कामाला लावण्यासाठी आणि सीशियमकडे त्यांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून त्याला मारण्यात आलं. वेल्, तसं होणार नाहीये.”
थोडा वेळ शांततेत गेला.
“तो मेसेज, जो तू माझ्या फोनवर ठेवला होतास, तो अत्यंत पोरकट होता!” ती हसत हसत म्हणाली.
तिचा मूड अचानक का बदलला, हे माझ्या लक्षात आलं नाही, पण कदाचित माझ्यामुळे असं झालेलं असू शकतं या विचाराने मला बरं वाटलं.
“माझा नंबर अजून आहे तुझ्याकडे?” तिने विचारलं.
“हो. आहे. मी अजून तो डिलीट केलेला नाही.”
“आणि तुला तुझ्या मेसेजमध्ये मी राजेंद्र बोलतोय हे सांगायची गरज नव्हती. तुझाही नंबर आहे माझ्याकडे अजून. मीही तो डिलीट केलेला नाही.”
आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसलो.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
माझी गाडी त्या बेसमेंटमध्ये शिरली आणि दोन सिक्युरिटीवाले धावतच गाडीपाशी आले. मी माझं आयडी कार्ड दाखवल्यावर त्यातला एक जण पुढे झाला.
“मीच तुमच्याशी बोललो होतो साहेब,” तो म्हणाला.
“तो मिनी ट्रक कुठे आहे?”
तो आम्हाला त्या ट्रकपाशी घेऊन गेला. मी मॉनिटर घेऊन अगदी हलक्या पावलांनी त्याच्यापाशी गेलो. ट्रकचा दरवाजा बंद होता. नजरूल हसनने ट्रकमध्ये उलटी व्हायला नको, म्हणून दरवाजा बंद केला होता बहुतेक. पण त्याच्या कपड्यांमध्ये मला चावी मिळाली होती. टाटाच्या लोगोची कीचेन असलेली चावी मी त्यातून काढली आणि ट्रकचा दरवाजा उघडला.
“राजेंद्र,” मला मागून सुजाताचा आवाज आला. मी तिच्या आवाजाच्या रोखाने गेलो. ट्रकच्या मागे असलेल्या सामानाच्या जागेत अर्थातच प्रचंड कचरा भरलेला होता, पण त्यात असलेली एक गोष्ट उठून दिसत होती – चाकांच्या ट्रॉलीवर असलेला एक काळपट राखाडी रंगाचा डबा.
“पिग!” आम्हा दोघांच्याही तोंडातून एकाच वेळी हे उद्गार निघाले.
“आपण हे उघडून बघायचं का?” मी विचारलं.
“नाही. मी असीमला फोन करते. तो त्याच्या टीममधल्या कुणालातरी इथे पाठवेल. त्या माणसाला उघडू दे. त्याच्याकडे संरक्षक कपडे असतील.”
हे बरोबर होतं. मी पिगचा नाद सोडून ड्रायव्हरच्या जागेत काही सापडतं का ते बघायला पुढे गेलो. दरवाजा उघडलेला होताच. पण तिथे अंधार असल्यामुळे नीट दिसत नव्हतं.
“टॉर्च आहे का?” मी त्या सिक्युरिटीच्या माणसाला विचारलं. त्याने मला एक टॉर्च आणून दिला.
टॉर्चच्या प्रकाशात मी आतमध्ये पाहिल्यावर सर्वात पहिली गोष्ट जर दिसली असेल, तर ड्रायव्हरच्या सीटवर ठेवलेला कॅमेरा. मी माझ्या खिशातून ग्लोव्हज काढून हातांवर चढवले आणि तो कॅमेरा उचलला. त्याच्या लेन्सवरची कॅप नव्हती. कॅमेरा मात्र भारी होता. निकॉन DSLR 5200. त्याक्षणी मला आठवलं. त्रिवेदींच्या घरात फोरेन्सिकच्या लोकांना सापडलेल्या वस्तूंमध्ये निकॉनची लेन्स कॅप होती. मी कॅमेरा चालू केला, तो चालूही झाला, पण त्याचं मेमरी कार्ड आतमध्ये नसल्याचा मेसेज स्क्रीनवर आला. अलिशा त्रिवेदीचा फोटो घेण्यासाठी हाच कॅमेरा वापरला होता का, हे आता ते मेमरी कार्ड मिळेपर्यंत समजणार नव्हतं.
मी त्या ड्रायव्हर कंपार्टमेंटमध्ये शिरलो आणि टॉर्चने इकडेतिकडे बघायला सुरुवात केली. ड्रायव्हर सीटच्या मागे काहीतरी होतं. मी ते खेचून काढलं. कुठलंतरी पोस्टर होतं. गुंडाळी करून ठेवलं होतं. ते मी उचलताच त्यातून काहीतरी खाली पडलं. मी ती वस्तू उचलली. ते एक .२२ रिव्हॉल्व्हर होतं. डॉ. त्रिवेदींचा खूनही .२२ नेच झाला होता, म्हणून तर आम्हाला exit wound दिसली नव्हती.
“सुजाता,” मी तिला हाक मारली, “ज्या गनने डॉ. त्रिवेदींवर गोळ्या झाडण्यात आल्या, ती गन बहुतेक मिळालीय मला.”
मला काहीही उत्तर मिळालं नाही. ती अजूनही बहुतेक फोनवर असावी.
मी ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलो आणि ते पोस्टर सरळ करून पाहिलं. त्यात १२ योगासनांची चित्रं होती आणि चारही कडांना चिकटपट्ट्या होत्या. माझ्या डोक्यात त्रिवेदींच्या घरातल्या जिम रूममधल्या भिंतीवरच्या जागेचा विचार आला. तीही जागा बहुतेक या पोस्टरएवढीच होती.
त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की माझ्या उजव्या हाताचं कोपर ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूचा माणूस यांच्यामध्ये असलेली जी आर्मरेस्ट असते, त्याच्यावर टेकलं गेलंय. मी हात उचलल्यावर ती आर्मरेस्ट थोडीशी हलली. मी ती अजून हलवून पाहिली, तर ती उचलता येतेय असं दिसलं म्हणून मी ती उचलली आणि आत पाहिलं, आणि त्याक्षणी थिजलो.
आतमधल्या जागेत पांढर्‍या रंगाची अनेक काडतुसं ठेवलेली होती. दुरून बघताना कोणालाही ती चांदीची बनवली आहेत असंच वाटलं असणार.
मी माझ्याकडे असलेला रेडिएशन मॉनिटर त्यावरून फिरवला. पण काहीही आवाज झाला नाही. मी तो मॉनिटर नीट निरखून पाहिला, तर त्याच्या बाजूला एक छोटा स्विच होता. बहुतेक मी मॉनिटर खिशात ठेवल्यावर तो दाबला गेला होता आणि मॉनिटर बंद झाला होता. मी तो स्विच दुसर्‍या बाजूला फिरवला.
त्याक्षणी कानठळ्या बसवणारा कर्कश्श आवाज व्हायला लागला. मी घाईघाईने आर्मरेस्ट बंद केली आणि ट्रकबाहेर पडलो. ट्रकचा दरवाजाही बंद केला.
सुजाता आणि सिक्युरिटीवाले धावतच तिथे आले.
“काय झालं राजेंद्र?” सुजाता ओरडलीच.
“सगळ्यांनी ट्रकपासून दूर व्हा,” मी कसाबसा बोललो, “त्याच्या आर्मरेस्टमध्ये... ते सीशियम आहे!” आणि मटकन खाली बसलो. माझ्या हातून ते पोस्टर, कॅमेरा आणि गन खाली पडले.
नजरूल हसनच्या डाव्या कुशीवर आणि पार्श्वभागाच्या डाव्या बाजूला भाजल्याच्या खुणा होत्या. तो जर ड्रायव्हरच्या जागेवर बसला असेल, तर ती आर्मरेस्ट त्याच्या डाव्या बाजूलाच आली असणार.
सुजाता माझ्याकडे बघत असल्याचं मला जाणवलं.
“ठीक आहेस का तू?” तिने विचारलं.
“माहीत नाही,” मी म्हणालो, “दहा वर्षांनी विचार.”
तिने एक आवंढा गिळला.
“काय झालं?” मी विचारलं. बहुतेक तिला काहीतरी माहीत होतं, पण मला सांगायचं नव्हतं.
“काही नाही. तू डॉक्टरांकडून चेक करून घे.”
मी तो मॉनिटर तिच्यासमोर धरला, “हा बंद होता मग मी तो चालू केला. याचा अर्थ...”
“याचा अर्थ तू जेव्हा त्याचे कपडे तपासायला बेसमेंटमध्ये गेला होतास, तेव्हाही हा बंद असणार.”
बापरे! म्हणजे मी...मी किरणोत्सर्गाच्या संपर्कात आलो होतो. आता तो किरणोत्सर्ग मला कायमचं संपवण्याइतका होता, की अजून काही, ते कळायचं बाकी होतं.
मला गरगरायला लागलं आणि जसलोकमधल्या डॉ. साठे काय म्हणाल्या, ते आठवलं. नजरूल हसनला अंतर्गत स्वरूपात जास्त त्रास झालेला आहे. मलाही तसंच काहीतरी होतंय का? माझ्या मनात अचानक माझ्या पत्नी आणि मुलीचे विचार आले.
“राजेंद्र!” सुजाताचा आवाज आला. ती माझ्यासमोर उभी होती.
“असीमची टीम इथे येतेय. पाच मिनिटांत पोहोचतील ते इथे. कसं वाटतंय तुला आता?”
“ठीक आहे मी.”
“ओके. मी डॉ. साठेंशी बोलले. त्या म्हणाल्या की जसलोकच्या बेसमेंटमध्ये आणि इथेही तू दहा मिनिटांपेक्षा कमी वेळ सीशियमच्या संपर्कात आला आहेस. त्यामुळे तसा धोका नाहीये. पण तरीही तू हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक अप करून घेतलेलं कधीही चांगलं.”
मला अचानक तहान लागल्यासारखं वाटलं. मी कसाबसा उठलो आणि माझ्या गाडीच्या दिशेने चालायला लागलो. माझ्या गाडीत एक पाण्याची बाटली होती आणि मी ती उघडून घटाघटा पाणी प्यायलो.
पाणी प्यायल्यावर मला जरा हुशारी आली आणि मी बाहेरच्या दिशेने पाहिलं. नजरूल हसन हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे इथला कचरा बराच वेळ उचलला गेला नव्हता. पण आता कोणीतरी आलं होतं आणि कचरा उचलला जात होता. हिरव्या रंगाचे कचर्‍याचे डबे मिनी ट्रक्समध्ये रिकामे होत होते. दोन ट्रकवाले एकमेकांशी बोलत होते. त्यांचं बोलणं मला ऐकू येत होतं.
“पुढची राउंड कुठे आहे?”
“इथून मलबार हिलवर जाणार. वरती चढून. आणि मग तिथून गोदरेज बाग, मग उतरून पेडर रोडवर. तू?”
“उलट्या साइडने. वाळकेश्वर, तीन बत्ती – त्या बाजूला.”
आणि त्याक्षणी माझ्या डोळ्यांसमोर सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. माझ्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याक्षणी माझ्यासमोर आली. बहुतेक या सीशियममधून जे गॅमा किरण बाहेर पडले, त्यांनी माझ्या मनातला सगळा गोंधळ दूर केला.
सुजाता माझ्या मागे येऊन उभी राहिल्याचं मला जाणवलं.
“हा माणूस – नजरूल हसन – कचरा घेऊन जाणारा मिनी ट्रक चालवायचा. लोक कचरा हिरव्या रंगाच्या कचर्‍याच्या डब्यांमध्ये भरतात आणि त्याच्यासारखे लोक तो कचरा आपल्या ट्रकमधून घेऊन जातात.”
“हो. बरोबर. तो सफाई कर्मचारी आहे असं तू म्हणालेलास ना?”
“हो. आजही तो आपला ट्रक घेऊन इथे आला. त्याने सुरुवात कुठे केली ते माहीत नाही, पण तो इथे आल्यावर त्याला त्रास सुरू झाला, याचा अर्थ नेपिअन सी रोडवर कुठेतरी त्याने पिग आणि सीशियम उचललं असणार.”
“काय? तुझं म्हणणं आहे त्याला सीशियम कचर्‍याच्या डब्यात सापडलं?”
“हो. नकाशा लक्षात घे. हाजी अली. तिथून पुढे आलो आपण की पेडर रोड आणि वॉर्डन रोड. वॉर्डन रोड पुढे नेपिअन सी रोडला जाऊन मिळतो आणि तिथून आपल्याला मलबार हिलवर जाता येतं आणि मलबार हिलवरून तिथे उतरताही येतं. आणि मलबार हिलवरच ही गॅलरी आहे, जिथे आपल्याला डॉ. त्रिवेदींचा मृतदेह मिळाला.”
सुजाता माझ्या बाजूला उभी होती, ती समोर येऊन उभी राहिली. मला सायरनचा आवाज ऐकू येत होता.
“म्हणजे तुझं म्हणणं आहे की मुबीन आणि सकीब यांनी ते सीशियम घेतलं, आणि नंतर तेच एका कचर्‍याच्या डब्यात फेकून दिलं? आणि मग ते या सफाई कामगाराला सापडलं?”
“हे बघ सुजाता, एन.आय.ए.ला सीशियम हवं होतं. ते आता तुम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे आता ही केस परत एकदा खुनाची केस झालेली आहे. तू जर त्या गॅलरीवरून केम्प्स कॉर्नरला खाली उतरलीस आणि डावीकडे वळलीस आणि सरळ गेलीस, की चालत १० मिनिटांच्या आत आणि गाडीने बहुतेक २-३ मिनिटांत तू या भागात पोहोचतेस.”
“म्हणून काय झालं? त्यांनी सीशियम चोरलं आणि डॉ. त्रिवेदींना मारलं. का तर इथे येऊन ते कचर्‍याच्या डब्यात फेकण्यासाठी? हे म्हणतो आहेस तू? का तुला असं म्हणायचंय की त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी ते फेकून दिलं? का करतील ते असं? या सगळ्या गोष्टींना काही अर्थ असायला हवा ना? हे फक्त त्यांनी आम्हाला घाबरवण्यासाठी केलं?”
“तुला एकाच वेळी अनेक प्रश्न विचारायची सवय आहे, हे मला माहीत आहे सुजाता, पण ७ प्रश्न? तेही एकापाठोपाठ? तुझ्यासाठीही हे रेकॉर्ड आहे.”
“त्यातल्या एका तरी प्रश्नाचं उत्तर दे तू!” ती म्हणाली.
“मुबीन आणि सकीब सीशियमच्या जवळ कधी नव्हतेच,” मी म्हणालो.
मी परत त्या ट्रकपाशी गेलो आणि तिथे असलेल्या तिन्ही गोष्टी उचलल्या आणि तिच्याकडे दिल्या.
“काय आहे हे?” तिने ते पोस्टर सरळ करून पाहात विचारलं.
“नजरूल हसनला ज्या कचर्‍याच्या डब्यात तो पिग आणि सीशियम मिळालं, त्याच डब्यात किंवा त्याच्या जवळच्या डब्यात त्याला हे पोस्टर, हा कॅमेरा आणि ही गन मिळाले असणार.”
“ठीक आहे, पण याचा अर्थ काय होतो?”
त्याच वेळी एन.आय.ए.च्या दोन गाड्या बेसमेंटमध्ये शिरल्या आणि आमच्या दिशेने यायला लागल्या. त्या पुरेशा जवळ आल्यावर मी पाहिलं, की त्यातली एक गाडी वर्धन राजनायक चालवत होता.
माझे पाय अचानक लटपटायला लागले. माझा तोल गेला आणि मी तिला घट्ट धरायचा प्रयत्न केला. तिनेही मला धरलं.
“काय झालं राजेंद्र?”
“मला...मला बरं वाटत नाहीये,” मी कसंबसं पुटपुटलो, “मला वाटतं हॉस...हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक... तू मला माझ्या गाडीकडे....”
तिने मला आधार देऊन उभं राहायला मदत केली आणि मग मला ती माझ्या गाडीकडे चालवत न्यायला लागली. मी माझ्या गाडीची चावी तिच्या हातात दिली.
राजनायक धावतच आमच्या दिशेने आला.
“काय झालं?” त्याने विचारलं.
“सीशियमच्या संपर्कात आलाय हा. ते ट्रकच्या ड्रायव्हरच्या आर्मरेस्टच्या खाली आहे आणि पिग ट्रकच्या मागच्या भागात आहे. काळजी घे. मी याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते.”
राजनायक माझ्यापासून दूर झाला, “ठीक आहे. मला कॉल कर.”
सुजाताने मला माझ्या गाडीत बसवलं आणि गाडी चालू केली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सुजाता गाडी प्रचंड वेगात चालवते हे मला माहीत होतंच. ८ वर्षांपूर्वीचा अनुभव होता मला. आत्ताही तिने गाडी केम्प्स कॉर्नरपर्यंत झपाट्याने आणली.
“उजवीकडे घे.” मी म्हणालो.
तिने माझ्याकडे पाहिलं, “जसलोकला जायला डावीकडे वळायला हवं आपल्याला.”
“जसलोकला नाही जायचंय मला,” मी म्हणालो, “वळ उजवीकडे.” ती उजवीकडे वळून केम्प्स कॉर्नरच्या फ्लायओव्हरवर गेली.
“कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचंय तुला?”
“कुठल्याही नाही. डॉ. त्रिवेदींच्या घरी घेऊन चल मला.”
“काय?”
“हो. मी नंतर चेक अप करून घेईन. आत्ता मी व्यवस्थित आहे.”
“म्हणजे? ते पाय लटपटणं, खाली पडणं वगैरे..”
“हो, नाटक होतं. मला तुला राजनायकपासून दूर घेऊन जायचं होतं, म्हणून मी हे केलं.”
“वा! आता राजनायक दिल्ली ऑफिसला सांगेल की सीशियम त्याने शोधून काढलं. सगळं श्रेय त्याला मिळेल. धन्यवाद!”
मी गाडीत बसताना कॅमेरा, रिव्हॉल्व्हर आणि ते पोस्टर या तिन्ही वस्तू मागच्या सीटवर ठेवल्या होत्या. त्यातलं पोस्टर मी माझ्या हातात घेतलं आणि सरळ करून तिला दाखवलं. विशेषतः एक आसन. धनुरासन.
“हे काय आहे?”
“अलिशा त्रिवेदी योगासनं करते. नियमितपणे. त्यांच्या घरात जी व्यायामाची साधनं असलेली खोली आहे, तिथे रबरी मॅट्स टांगलेल्या आहेत.”
“हो. मग?”
“त्याच्याच बाजूला एक थोडा रंग उडालेली अशी आयताकृती जागा दिसलेली तुला? तिथे एखादं पोस्टर असावं असं कुणालाही बघितल्यावर वाटेल. तिथल्या चिकटपट्ट्यांमुळे भिंतीवर उमटलेल्या खुणा अजूनही आहेत.”
“हो. ते पाहिलं मी. त्याचं काय?”
“मी हे पोस्टर त्या ठिकाणी लावून पाहणार आहे,” मी ते पोस्टर तिच्यासमोर धरत म्हणालो, “माझी ९९% खातरी आहे की हे तिथे असलेलं पोस्टर आहे आणि जर ते तिथे फिट बसलं, तर या केसविषयी मला जे वाटतंय, त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. हे पोस्टर नजरूल हसनला सीशियमबरोबर मिळालं.”
“आणि जर ते फिट बसलं, तर काय अर्थ आहे त्याचा?”
“याचा अर्थ आपल्याला या खुनाचा कट जिने रचला, ती व्यक्ती मिळेल. इन फॅक्ट, ती तुमच्याच ताब्यात आहे. अलिशा त्रिवेदी.”
“काय?” तिच्या आवाजातला आणि नजरेतला अविश्वास मी लगेच टिपला. पण तसंही ती त्यावर विश्वास ठेवेल असं मला वाटलं नव्हतंच.
“हो. जर नजरूल हसनला हे पोस्टर आणि सीशियम मिळालं नसतं, आणि जर त्याने ते सीशियम चांदी आहे असं समजून त्याच्या ट्रकमध्ये ठेवलं नसतं आणि जर तो त्यामुळे बाधित होऊन जसलोकमध्ये भरती केला गेला नसता आणि जर आपल्याला हे राजश्री शेळकेमुळे समजलं नसतं, तर अलिशा त्रिवेदीने जगात अस्तित्वात नसलेली एक गोष्ट केली असती – परिपूर्ण गुन्हा. अ परफेक्ट क्राइम.”
“कम ऑन राजेंद्र! तुझं म्हणणं आहे की अलिशा त्रिवेदीने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या दहशतवाद्यांशी संधान बांधून तिच्या नवर्‍याचा खून करवला आणि तोही कशाच्या मोबदल्यात? सीशियमच्या?”
“नाही. अलिशा त्रिवेदीने खुनाचा कट ज्याच्याबरोबर रचला, तो दहशतवादी नाहीये. सीशियम कचर्‍यात फेकलेलं असणं या एका गोष्टीवरून हे सिद्ध होतं. तू स्वतः बोलून गेलीस – मुबीन आणि सकीब हे सीशियम चोरून मग कचर्‍यात का फेकतील? यावरून हे सिद्ध होतंय की ते कोणत्याही दहशतवाद्याने चोरलेलं नाही. ही सीशियमच्या चोरीची केस नाहीच आहे. ही केस सुरुवातीपासून आत्तापर्यंत खुनाची केस आहे. सीशियम, मुबीन, सकीब, अजित कालेलकर – हे सगळे आपल्याला गोंधळात पडण्यासाठी मुद्दामहून तयार केलेले धागेदोरे आहेत. रेड हेरिंग्ज.”
“आणि हे सगळं या पोस्टरने सिद्ध होतंय?”
“या पोस्टरमधल्या या चित्राने.” मी तिला दाखवलं. त्या चित्रात एक स्त्री धनुरासन करताना दाखवली होती. तिने तिचे हात पाठीमागे नेऊन आपल्या पायांचे अंगठे पकडले होते. त्यामुळे तिच्या शरीराला धनुष्याचा आकार आला होता. मग मी तिला माझ्याकडे असलेला अलिशा त्रिवेदीचा ईमेलमधला फोटो दाखवला.
“जर हे पोस्टर त्या जागी फिट बसलं, तर त्याचा अर्थ हा आहे की तिने आणि तिच्या साथीदाराने ते भिंतीवरून काढलं, कारण पोलीऑस किंवा एन.आय.ए. या कोणाच्याही लक्षात ते येणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. समजा, आपण हे पाहिलं असतं आणि आपल्याला संशय आला असता तर?”
“ही तुझी थिअरी म्हणजे सगळा असंबद्ध प्रकार आहे.”
“अजिबात नाही. मी हे सिद्ध करू शकतो.”
“कसं?”
“त्याच्याचसाठी आपण चाललोय ना तिच्या घरी.”
“तुझ्याकडे चावी असेलच तिच्या घराची.”
“अर्थात!”
आम्ही एव्हाना मरीन ड्राइव्हच्या शेवटाकडे आलो होतो. इथून कफ परेडला जायला जेमतेम ५-७ मिनिटं लागली असती.
“मला नाही पटत आहे हे तरीपण,” सुजाता गाडीचा वेग कमी करत म्हणाली, “तिने आम्हाला मुबीन हे नाव सांगितलं. तो देशात आहे हे तिला कुठून समजणार? अशक्य आहे. तुझा स्वतःचा साक्षीदार पण म्हणाला की गॅलरीवर जेव्हा डॉ. त्रिवेदींचा खून झाला, तेव्हा त्यांच्या मारेकर्‍याने ‘अल्ला’ अशी आरोळी ठोकली होती. मग हे...”
“आपण हे पोस्टर त्या भिंतीवर लावून पाहू. जर ते फिट बसलं तर तू माझं ऐकून घे, नाहीतर मी माझी चूक झाली हे मान्य करीन.”
तिने खांदे उडवले आणि गाडीचा वेग वाढवला.
त्रिवेदींच्या घराबाहेर एन.आय.ए.च्या गाड्या नव्हत्या. सगळे जण, अगदी मेहरोत्रासुद्धा – सीशियमच्या मागे असणार. डॉ. त्रिवेदींच्या चवीने मी घराचा दरवाजा उघडला आणि आम्ही दोघेही आत आलो, आणि सरळ त्या व्यायामाची साधनं असलेल्या खोलीत गेलो. दोघेही त्या रंग उडालेल्या जागेच्या दोन्ही बाजूंना उभे राहिलो आणि ते पोस्टर उलगडलं. ते त्या जागेवर अगदी फिट बसलं. अगदी त्या चिकटपट्टीच्या खुणाही. माझ्या मनातली उरलीसुरली शंकाही आता उरली नव्हती. नजरूल हसनला मिळालेलं पोस्टर अलिशा त्रिवेदीच्या घरातून आलेलं होतं.
सुजाताची प्रतिक्रिया मात्र मला अनपेक्षित होती.
“माझा अजूनही याच्यावर पूर्णपणे विश्वास बसत नाहीये” असं म्हणून ती बाहेर निघून गेली.
मी तिच्या पाठी गेलो. ज्या खुर्चीवर मी एजंट मेहरोत्राला बसवलं होतं, त्याच खुर्चीवर ती बसली.
“त्यांना ही भीती होती, की या पोस्टरमुळे त्यांचं गुपित उघड होईल.” मी म्हणालो, “समजा, एखाद्या एजंटने किंवा पोलीस अधिकार्‍याने धनुरासनाचं चित्र पाहिलं आणि मग अलिशाला तशा परिस्थितीत बांधलेलं पाहिलं, तर तो किंवा ती असा निष्कर्ष काढू शकतात की हे स्त्री नियमितपणे योगासनं करते, कदाचित एवढा वेळ ती अशा प्रकारे बांधलेल्या परिस्थितीत राहू शकते, कदाचित ही तिच्याच डोक्यातून निघालेली कल्पना असेल, कदाचित आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी किंवा चुकीच्या दिशेने पाठवण्यासाठी तिने हे केलं असेल. कुठल्याही प्रकारे त्यांना हे होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे ते पोस्टर त्यांनी कचर्‍यात टाकलं. सीशियम, डॉ. त्रिवेदींची गन आणि बाकी सगळ्या गोष्टीही कचर्‍याच्या डब्यात टाकल्या गेल्या. मला असं वाटतं, की आपण जर आजूबाजूच्या कचर्‍याच्या डब्यांमध्ये शोध घेतला, तर कदाचित मास्क्स, सायलेन्सर म्हणून वापरलेली कोका कोलाची बाटली, स्नॅप टाईजचा पहिला सेट, ग्लोव्हज – या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील.”
“स्नॅप टाईजचा पहिला सेट?”
“येस. मी त्यावर येतोच आहे. पण मला थोडं पाणी प्यायची गरज आहे. माझा घसा कोरडा पडलाय.”
मी किचनमध्ये गेलो. त्याआधी जेव्हा मी इथे आलो होतो, तेव्हा रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याच्या बाटल्या पाहिल्या होत्या. रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडून मी एक बाटली काढली आणि पाणी प्यायलो. तेवढ्यात मला ती गोष्ट दिसली. आतमध्ये पाण्याच्या बाटल्यांच्या शेजारी द्राक्षाच्या ज्यूसचा टेट्रापॅक ठेवलेला होता. मी तो बाहेर काढला, आणि त्याचं झाकण उघडून वास घेतला.
या कोड्याचा अजून एक भाग फिट बसला. मी आणि अमोल इथे आलो होतो, तेव्हा मी गराजमधल्या कचर्‍याच्या डब्यात जांभळ्या रंगाचे डाग पडलेले काही पेपर टॉवेल्स पाहिले होते. त्यांना द्राक्षाच्या ज्यूसचा वास येत होता.
मी हॉलमध्ये परत गेलो. सुजाता खुर्चीवरच बसलेली होती.
“मला एक सांग, या मुबीन आणि सकीबला तुम्ही सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पकडलंय, बरोबर? दोघेही जेव्हा नेपाळहून भारतात आले, तेव्हा?”
“त्याचा याच्याशी काय संबंध?”
“उत्तर तर दे.”
“हो.”
“काय तारीख होती ते आठवतंय तुला?”
“हो,” ती लगेच म्हणाली, “१२ ऑगस्ट. आम्ही ताबडतोब सगळीकडे रेड अॅलर्ट जारी केला होता. १५ ऑगस्टच्या एवढ्या जवळ दोन दहशतवादी भारतात नेपाळमधून येतात याची आम्हाला वेगळीच शंका आली होती. सुदैवाने तसं काही झालं नाही. पण आम्ही त्यांच्या मागावर २४ तास होतो.”
“मग काय झालं?”
“लगेचच काही झालं नाही. मुबीन आणि सकीब यांची तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून ओळख पटवून घ्यायला आम्हाला दोन महिने लागले. एफ.बी.आय. आणि मोसाद या दोघांकडूनही आम्ही खातरी करून घेतली. मग मी एक अधिसूचना लिहिली. एन.आय.ए.च्या सगळ्या ऑफिसेससाठी. ९ ऑक्टोबरच्या दिवशी ही सूचना सगळ्या ऑफिसेसमध्ये जारी झाली की हे दोघेही जण भारतात आहेत.”
“त्याच दिवशी डॉ. संतोष त्रिवेदींच्या खुनाची योजना बनायला सुरुवात झाली!”
सुजाता इतका वेळ हातांची घडी घालून बसली होती. आत्ता मी हे बोलल्यावर तिने आपले हात सोडले आणि माझ्याकडे रोखून बघितलं. कदाचित मी जे सांगतोय ते कुठे चाललंय याची थोडीफार कल्पना तिला आली असावी.
“जर आपण शेवटापासून सुरुवात केली, तर जास्त चांगलं होईल. अलिशा त्रिवेदीने तुम्हाला मुबीन हे नाव दिलं. तिला हे नाव कुठून मिळालं असेल?”
“तिने त्या दोघांपैकी एकाला त्या नावाने दुसर्‍याला हाक मारताना ऐकलं.”
“चूक. तिने तुम्हाला सांगितलं, की तिने ऐकलं. पण जर ती खोटं बोलत असेल, तर तिला हे नाव कळलं कसं? तिने १२ ऑगस्टला भारतात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याचं नाव असंच सांगितलं तुम्हाला?”
“अच्छा. म्हणजे तू म्हणतो आहेस की एन.आय.ए. किंवा इतर एजन्सीज, ज्यांच्याकडे मी लिहिलेली अधिसूचना गेली, त्यांच्यापैकी कुणीतरी तिला हे नाव सांगितलं.”
“बरोबर. त्याने तिला हे नाव सांगितलं. का? तर जेव्हा एन.आय.ए.चे हुशार अधिकारी तिला प्रश्न विचारतील, तेव्हा ती ते नाव घेऊ शकेल. हे नाव आणि अजित कालेलकरांचा खून करून त्यांच्या घराबाहेर तिची टॅव्हेरा ठेवणं हा त्यांच्या एन.आय.ए. आणि आयबी यांच्या डोळ्यांत धूळ झोकण्याच्या योजनेचा एक भाग होता.”
“त्याने?”
“मी येतो आहे त्याच्यावर. तुझं म्हणणं बरोबर आहे. तू पाठवलेली अधिसूचना एन.आय.ए.मध्ये अनेकांना मिळाली असणार. एन.आय.ए.च्या मुंबई ऑफिसमध्येच अनेकांना त्याबद्दल माहीत असेल.”
“मग?”
“मग आपल्याला आणखी मागे जाऊन या लोकांची संख्या कमी करायला पाहिजे. अलिशा त्रिवेदीचं आयुष्य आणि ज्यांना मुबीनबद्दल माहीत आहे, अशा सुरक्षाव्यवस्थेत काम करणार्‍या लोकांचं आयुष्य हे नक्की कुठे एकमेकांच्या समोर येऊ शकतात?”
तिच्या कपाळावर आठ्या आल्या, “हे कुठेही होऊ शकतं. एखाद्या मॉलमध्ये, एखाद्या पार्टीत, अगदी ती जिथे तिच्या बागेसाठी खत विकत घेत असेल तिथेही.”
ग्रेट. ती मी दाखवलेल्या शक्यतांवर विचार करायला लागली होती तर.
“मग आणखी खोलात जाऊन विचार कर,” मी म्हणालो, “ती आणि ज्याला मुबीनबद्दल माहीत आहे आणि हेही माहीत आहे की तिचा नवरा मुबीनला हव्या असलेल्या किरणोत्सर्गी पदार्थांना नियमितपणे हाताळतो, असे दोघं कुठे एकत्र येऊ शकतात?”
तिने नकारार्थी डोकं हलवलं, “कुठेही नाही. असं घडायची शक्यता लाखांत एक.....”
ती थांबली. तिच्याही ते लक्षात आलं असावं. पण त्याचा निव्वळ विचार केल्यानेही तिला धक्का बसला होता, हे मी बघू शकत होतो.
“माझा पार्टनर आणि मी – आम्ही डॉ. त्रिवेदींना सावध करण्यासाठी भेटलो होतो. तुझा माझ्यावर तर संशय नाहीये ना?”
“मी ‘त्याने’ असं म्हटलं. ऐकलंस ना तू? तू इकडे एकटी तर आली नव्हतीस.”
तिच्या डोळ्यांत एका क्षणासाठी अंगार फुलले, पण ती लगेचच शांत झाली, “वेड्यासारखं बोलू नकोस.”
ती उठून उभी राहिली, “हे बघ, माझं ऐक. तू मला सांगितलंस ते ठीक आहे, पण दुसर्‍या कोणाला बोललास तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तुझ्याकडे पुरावा, हेतू, कबुलीजबाब काही म्हणजे काहीही नाहीये. एका योगासनांच्या पोस्टरवरून तू हे असले निष्कर्ष काढतो आहेस.”
“दुसरं कुठलंही स्पष्टीकरण या सगळ्या घटनांना लागू होत नाही, आणि मी या केसमधल्या घटना आणि वस्तुस्थितीबद्दल बोलतोय. एन.आय.ए.ला कदाचित इथे दहशतवादाचा अँगल हवा असेल, पण तसं काहीही इथे नाहीये. पुरावा आहे आणि अलिशा त्रिवेदीने सांगितलेल्या गोष्टी जर आपण नीट तपासून पाहिल्या, तर तुला नीट कळेल की ती अत्यंत पाताळयंत्री बाई आहे. तुम्हाला जे ऐकायचं आहे ते तिने तुम्हाला ऐकवलं आणि तुम्ही तिचंच खरं असं मानून चाललात.”
“तिला प्रश्न मी विचारले होते.” सुजाता म्हणाली.
“काहीही फरक पडत नाही.” मी म्हणालो, “ती एक नंबरची खोटारडी आहे. आपल्याला आता खरं काय घडलंय ते माहीत आहे, त्यामुळे आपण तिचं खोटं बाहेर काढू शकतो.”
“मग तुझ्या साक्षीदाराचं काय? त्याने डॉ. त्रिवेदींच्या मारेकर्‍याला ‘अल्ला’ म्हणून ओरडताना ऐकलं. तोही या सगळ्या योजनेचा भाग आहे का? का तू असं म्हणतो आहेस की तो तिथे आहे हे मारेकर्‍यांना माहीत होतं आणि त्याने पोलिसांना सांगावं म्हणून ते 'अल्ला’ असं ओरडले?”
“नाही.” मी म्हणालो, “मला वाटतं की आपण आपल्याला जे ऐकायची इच्छा असते, ते ऐकतो. त्या मुलाने मला पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की त्याची त्याने काय ऐकलं त्याबद्दल खातरी नाहीये. त्याला हेही माहीत नव्हतं की नक्की कोण ओरडलं. तो बर्‍याच अंतरावर होता आणि अंधार होता. कदाचित डॉ. त्रिवेदी ओरडले असतील. त्यांनी मृत्यूच्या वेळी त्यांच्या प्रिय पत्नीचं नाव घेतलं असेल. तिनेच आपला खून करवलाय हे त्यांना माहीतही नव्हतं.”
“अलिशा!”
“हो. ‘अलिशा’ असं ते ओरडले आणि लगेचच त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यामुळे आमच्या साक्षीदाराला ते ‘अल्ला’ असं ऐकू आलं.”
सुजाताने तिच्या हातांची घडी सोडली होती आणि ती विचार करत होती. माझ्यासाठी ही चांगली गोष्ट होती.
“तू स्नॅप टाईजचा पहिला सेट म्हणालास. हा काय प्रकार आहे?”
मी तिच्या हातात माझी फाईल दिली. आतमध्ये अमोलने पहाटे काढलेले क्राइम सीनच्या फोटोचे प्रिंट्स होते.
“हे फोटो पाहा,” मी म्हणालो, “काय दिसतंय तुला?”
तिने फाईल उघडली आणि फोटो पाहायला सुरुवात केली. पहिल्या फोटोंमध्ये त्रिवेदींच्या घरातली मास्टर बेडरूम सगळ्या बाजूंनी दाखवली होती.
“ही मास्टर बेडरूम आहे,” ती म्हणाली, “काय दिसत नाहीये मला?”
“एक्झॅक्टली! जे फोटोत नाहीये, तेच महत्त्वाचं आहे. या फोटोंमध्ये एकही कपडा नाहीये. तिने आपल्याला काय सांगितलं – की त्या हल्लेखोरांनी तिला तिचे कपडे काढायला सांगितले आणि पलंगावर ढकललं. मग तिचे हात आणि पाय एकत्र बांधण्याआधी या हल्लेखोरांनी तिला तिचे कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवू दिले? कपाटात? शेवटचा फोटो पाहा. हाच फोटो डॉ. त्रिवेदींना ईमेलमध्ये मिळाला होता.”
सुजाताने फाईलमध्ये तो फोटो शोधला, आणि त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि शेवटी तिच्या डोळ्यांत चमक आली.
“काय दिसतंय तुला आता?”
“तिचा रोब,” ती म्हणाली, “जेव्हा आपण तिला कपडे घालायला सांगितले, तेव्हा तिने कपाटातून रोब काढून तो घातला. या खुर्चीवर रोब नाहीये.”
“यावरून काय समजतं आपल्याला?” मी म्हणालो, "की या दयाळू हल्लेखोरांनी तिचा रोब तिच्यासाठी कपाटात व्यवस्थित टांगून वगैरे ठेवला?”
“किंवा मग अलिशाला दोनदा बांधण्यात आलं असेल आणि या मधल्या काळात हा रोब कपाटात ठेवण्यात आला असेल.”
“आणखी एक. त्या ईमेलमध्ये पाठवलेल्या फोटोकडे पाहा. पलंगाशेजारी असलेल्या टेबलावरचं डिजिटल घड्याळ बंद आहे.”
“का?”
“मला वाटतं आपण तिला वेळेसंदर्भात अडचणीत आणणारे प्रश्न विचारू आणि तिचं खोटं उघडकीस आणू, म्हणून तिने आणि तिच्या साथीदाराने फोटोवर कुठल्याही प्रकारचा वेळ देणं टाळलं असावं. कदाचित हा ईमेलमध्ये पाठवलेला फोटो काल संध्याकाळी घेतलेला नसेल. कदाचित तो त्यांच्या रंगीत तालमीच्या वेळी – दोन दिवसांपूर्वी किंवा कदाचित दोन आठवड्यांपूर्वीसुद्धा घेतलेला असू शकतो.”
सुजाताने होकारार्थी मन डोलावली. तिचा माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसला होता, हे कळत होतं.
“तिला फोटोसाठी एकदा बांधण्यात आलं आणि सुटकेसाठी परत एकदा बांधण्यात आलं.”
“याचाच अर्थ जेव्हा डॉ. त्रिवेदींचा खून झाला, तेव्हा ती तिथे हजर असणार. तिने स्वतः गोळ्या झाडल्या नसतील, पण ती तिथे होती. खून रात्री ८ वाजता झाला. आमच्या साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार तिथे ३ गाड्या होत्या. एक डॉ. त्रिवेदींची ऑडी, दुसरी ज्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्या माणसाची गाडी आणि तिसरी अलिशाची टॅव्हेरा. त्रिवेदींचा खून झाल्यावर त्या माणसाने ऑडीच्या डिकीतून पिग काढून आपल्या गाडीच्या डिकीत ठेवला आणि ते तिथून अजित कालेलकरच्या घरी गेले. त्याचा खून नक्की किती वाजता झाला, ते माहीत नाही, पण तो आपण अलिशाच्या घरी जाण्याच्या आधी झाला असावा. तिची गाडी कालेलकरांच्या घरासमोर सोडून देण्यात आली, आणि मग या साथीदाराने तिला घरी सोडलं आणि तिचे हात-पाय या पद्धतीने बांधले.”
“म्हणजे आपण जेव्हा तिच्या घरी पोहोचलो, तेव्हा ती बेशुद्ध अजिबात नसणार. पण तिने इतका वेळ बेशुद्ध असण्याचं नाटक चांगलं वठवलं. सर्वात जबरदस्त म्हणजे तिच्या पलंगाची खराब झालेली गादी.”
“बरोबर. आणि मूत्राच्या वासाने द्राक्षाच्या ज्यूसचा वास दबला गेला.”
“हे काय आणखी?”
“तिच्या मनगटांवरच्या आणि घोट्यांवरच्या खुणा. आपल्याला तेव्हा वाटलं होतं, की बांधल्यामुळे या खुणा पडलेल्या आहेत. पण तिला एवढा वेळ बांधून ठेवण्यात आलं नव्हतं, हे आपल्याला आता माहीत आहे. मग तरीही या खुणा आल्या कुठून? तिच्या रेफ्रिजरेटरमध्ये द्राक्षांच्या ज्यूसचा टेट्रापॅक आहे आणि मला गराजमधल्या कचर्‍याच्या डब्यात द्राक्षांच्या ज्यूसचे जांभळट डाग असलेले पेपर टॉवेल्स मिळाले. तिने द्राक्षांचा ज्यूस वापरून त्या खुणा तयार केल्या.”
“ओहो! तरीच!”
“काय झालं?”
“आम्ही तिला प्रश्न विचारण्यासाठी आमच्या कुलाबा ऑफिसमध्ये आणलं. तिथे एका छोट्या खोलीत मी तिला प्रश्न विचारत होते, तेव्हा मला द्राक्षांच्या ज्यूसचा वास आला. मला वाटलं की माझ्याआधी ज्याने कुणी ही खोली वापरली असेल, त्याने ज्यूस प्यायला असेल.”
“बरोबर.”
आता शंकाच नव्हती. तिचा पूर्ण विश्वास बसला होता. पण लगेचच तिचा चेहरा काळवंडला.
“हेतू काय आहे इथे?” ती म्हणाली, “आपण एका एन.आय.ए. एजंटबद्दल बोलतोय. आपल्याला जर हे शेवटपर्यंत न्यायचं असेल, तर एवढीशीसुद्धा फट चालणार नाही.”
मी तयार होतोच.
“हेतू हाच. अलिशा त्रिवेदी. अलिशा त्रिवेदी दिसायला सुंदर आहे. वर्धन राजनायक तिच्यासाठी वेडा झाला होता, आणि डॉ. संतोष त्रिवेदींचा अडसर त्याच्या मार्गात होता.”
सुजाताला धक्का बसलेला मला जाणवलं. तिचे डोळे विस्फारले.
“पण तो तर...”
“माझं सांगून होऊ दे. असं घडलं असणार – तू आणि तुझा पार्टनर राजनायक गेल्या वर्षी कधीतरी त्रिवेदींच्या घरी त्यांना सावधगिरीचा इशारा द्यायला गेलात. तेव्हा अलिशा आणि वर्धन यांच्यात काहीतरी आकर्षण निर्माण झालं. तिला आणि त्याला, दोघांनाही एकमेकांमध्ये रस निर्माण झाला. मग ते दोघे भेटायला लागले. कॉफी, लंच, डिनर - मग बाकीच्या गोष्टी ओघाने आल्याच. हे प्रकरण नुसतं प्रकरण किंवा आकर्षण या पातळीपर्यंत राहिलं नाही. दोघांनीही फार पुढचा विचार केला. अलिशाच्या नवर्‍याला मार्गातून बाजूला सारणं किंवा मग त्याचा कायमचा काटा काढणं. कफ परेडमधला हा बंगला, बाकीची प्रॉपर्टी, कंपनीमधले ५२% वगैरे बरेच हेतू आहेत सुजाता, आणि ही केस त्याबद्दलच आहे. सीशियम, दहशतवाद – या कशाशीही या केसचा संबंध नाहीये. अत्यंत साधी सरळ मानवी प्रेरणा आहे इथे – सेक्स आणि पैसे आणि त्यातून झालेला खून!”
तिने तिचं कपाळ दाबून धरलं, “तुला समजत नाहीये तू काय बोलतोयस ते. वर्धन राजनायकचं लग्न झालंय. दोन मुलं आहेत त्याला. म्हणून तर मी त्याची पार्टनर झाले. तो आपल्या बायकोशी अत्यंत एकनिष्ठ आहे, आणि ऑफिसमधल्या स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत सभ्य.”
“समोरच्या स्त्रीने प्रतिसाद देईपर्यंत कुठलाही पुरुष सभ्यच असतो सुजाता. त्याचं लग्न झालंय आणि त्याला दोन मुलं आहेत याने काहीही फरक पडत नाही.”
“आता तू माझं ऐकून घेशील का?” ती म्हणाली, “तुझा वर्धनबद्दल काहीतरी गैरसमज झालाय. तो अलिशाला याआधी कधीही भेटलेला नाहीये. जेव्हा मी डॉ. त्रिवेदींना भेटायला आले होते, तेव्हा तो माझा पार्टनर नव्हता आणि मी कधीही तो माझा पार्टनर होता असं तुला सांगितलेलं नाही.”
आता धक्का बसायची पाळी माझी होती. तिचा आत्ताचा पार्टनर हाच आदल्या वर्षी तिचा पार्टनर असणार हे मी गृहीत धरलं होतं. म्हणून तर राजनायक गाडी घेऊन आल्यावर मी सुजाताला तिथून बाहेर काढलं होतं.
“मग तुझा पार्टनर कोण होता गेल्या वर्षी?”
ती माझ्याकडे बघत नव्हती, “माझा आधीचा पार्टनर म्हणजे वैताग होता. अत्यंत रागीट, उतावळा आणि सतत माझ्याशी स्पर्धा करायला आणि मला अपमानित करायला तयार. म्हणून तर मी वर्षाच्या सुरुवातीला माझा पार्टनर बदलून घेतला.”
“तुझा पार्टनर कोण होता सुजाता?”
तिने माझ्याकडे रोखून पाहिलं, “शशांक मेहरोत्रा.”
आता मला परत एकदा धक्का बसला. सुजाता जे मला सांगत होती, त्या वस्तुस्थितीची मी कल्पनाही केलेली नव्हती.
“काय नशीब आहे! आज सकाळी या प्रकरणातल्या खुन्याला मी हातकड्या घालून इथे, या खोलीत डांबून ठेवला होता! जेमतेम ४ तासांपूर्वी!”
सुजाताच्या चेहर्‍यावर तर मुळासकट हादरल्याचे भाव होते. डॉ. संतोष त्रिवेदींचा खून हा एका एन.आय.ए. एजंटने केला होता आणि सीशियमची चोरी ही त्यावरून लक्ष हटवण्यासाठी रचलेला एक भूलभुलैया होता हे तिच्या अजूनही पचनी पडलेलं दिसत नव्हतं, पण पुरावा बिनतोड होता.
“तुझ्या लक्षात येतंय पुढे काय झालं असतं?” मी विचारलं, “तिचा नवरा मरण पावलाय, तिला सहानुभूतीची गरज आहे, तो या केसवर काम करतोय, त्या निमित्ताने तो तिला भेटायला येतोय, मग ते एकमेकांचे मित्र होतात, मग प्रेमात पडतात – आणि कोणालाही त्यात काहीही वावगं वाटत नाही. दरम्यान तुम्ही मुबीन आणि सकीबचा शोध घेत बसता.”
“आणि समजा आम्ही त्यांना पकडलं, तरी काय?” सुजाताचा स्वर एकदम हताश होता, “ते तर या सगळ्यात आपला सहभाग असल्याचं नाकारतीलच. आणि ते खरं बोलत असतील. पण त्यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? दहशतवाद्यांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यात गुंतवणं हे मात्र डोकं आहे. मानायला पाहिजे.”
“नजरूल हसन,” मी म्हणालो, “त्या बिचार्‍या माणसामुळे या सगळ्या प्रकरणाचा पत्ता लागला. त्याच्याशिवाय तुम्ही मुबीन आणि सकीब यांना शोधात बसला असता.”
“मग आता काय राजेंद्र?”
“माझ्या मते आपण त्यांना दोघांनाही उचलू या. दोघांनाही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवू या आणि एकमेकांविरुद्ध बोलायला भाग पाडू या. मला वाटतंय अलिशा पहिल्यांदा तोंड उघडेल. ती सगळं मेहरोत्रावर ढकलेल. ती असंही म्हणायला कमी करणार नाही, की त्याने तिच्यावर बळजबरी केली, आणि तिला तिच्या नवर्‍याच्या हत्येमध्ये सहभागी व्हायला भाग पाडलं.”
“होय,” सुजाता आणि माझं एकमत व्हायचे प्रसंग फार दुर्मीळ असायचे. हा त्यातलाच एक. “मी त्याच्याबरोबर काम केलंय. तो तसा साधासरळ माणूस आहे. हे असले छक्केपंजे त्याला जमत असावेत असं...”
तिचा फोन वाजला. तिने स्क्रीनकडे पाहिलं.
“वर्धनचा फोन आहे.”
“त्याला विचार मेहरोत्रा कुठे आहे ते.”
तिने फोन उचलला. समोरून राजनायकने बहुतेक मी कसा आहे याच्यावर प्रश्न विचारले असावेत, कारण ती माझ्यावर चालू असलेल्या तथाकथित उपचारांबद्दल बोलत होती. बोलता बोलता तिने सहज विचारलं, “शशांक कुठे आहे? त्याच्या आणि राजेंद्रच्या भांडणाबद्दल मला जरा त्याच्याशी बोलायचंय.”
पलीकडून जे काही उत्तर आलं, ते चांगलं नसावं, कारण तिच्या चेहर्‍यावर एकदम विचित्र भाव आले.
“कधी?” तिने विचारलं.
पलीकडून उत्तर आल्यावर ती उठून उभी राहिली, “मी काय म्हणते वर्धन, मला जायला हवं. राजेंद्रला बहुतेक १० मिनिटांत सोडतील. मी इथनं निघाले की तुला फोन करते.”
कॉल संपवल्यावर तिने माझ्याकडे पाहिलं, “हे असं खोटं बोलणं, आणि तेही माझ्या पार्टनरशी, हे बरोबर नाही. तो कधीच विसरणार नाही हे.”
“मी बोलेन त्याच्याशी. तो काय म्हणाला पण?”
“त्या नेपिअन सी रोडवरच्या बेसमेंटमध्ये अनेक एजंट्स आहेत आत्ता. नक्की किती ते वर्धनलाही माहीत नाही. तुला आठवत असेल की मी रोहित खत्रीला ग्रीन्समधून आणायला जाणारी टीम जसलोककडे वळवली होती. शशांक मेहरोत्रा त्या टीममध्ये होता. त्यातले बाकीचे लोक बेसमेंटमध्ये गेले. तो एकटाच ग्रीन्सकडे गेलाय. त्याने आपणहून सांगितलं की तो रोहित खत्रीला घेऊन येईल.”
“तो एकटाच गेला?”
“असं वर्धन म्हणाला.”
“कधी?”
“अर्धा तास तरी झाला असेल.”
“तो रोहितला मारायला गेलाय तिथे.”
आम्ही त्याक्षणी धावलो.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
गाडी या वेळीही सुजातानेच चालवली. तशीही ती वेगानेच चालवायला हवी होती. ग्रीन्स म्हणजे मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या जवळ. आम्ही होतो कफ परेडच्या जवळ. जरी अंतर फार नसलं, तरी मेहरोत्रा अर्धा तास आधी निघाला होता, म्हणजे तो ग्रीन्सपर्यंत नक्कीच पोहोचू शकला असता.
मी आधी अमोलला फोन केला. तो कालेलकरांच्या घरून कुलाब्याला यायला निघाला होता. मी त्याला ग्रीन्सकडे यायला सांगितलं.
दुसरा फोन मी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये केला. तिथला एक कॉन्स्टेबल रोहितच्या रूमवर लक्ष ठेवून होता.
“मी स्वतः आल्याशिवाय कुणालाही त्याच्यापर्यंत जाऊ देऊ नका,” मी बजावलं.
“हो सर.”
“तो जर ग्रीन्सच्या मागच्या बाजूने गेला तर?” मी सुजाताकडे पाहात स्वतःलाच प्रश्न विचारला.
“मी काय म्हणते,” ती म्हणाली, “रोहितने शशांकचा चेहरा पाहिलेला नाहीये. तो जरी रोहितपर्यंत पोहोचला तरी तो पहिल्यांदा त्याच्याकडून ही माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करेल, आणि जेव्हा त्याला समजेल की रोहितपासून आपल्याला धोका नाही, तेव्हा...”
“अजिबात नाही. ज्या क्षणी सीशियम सापडलं, त्या क्षणी त्याला समजलं असणार की त्याचा खेळ संपलेला आहे. त्याला जिथून धोका आहे, त्या सगळ्या व्यक्तींना तो संपवणार. पहिल्यांदा रोहित, मग अलिशा...”
“अलिशा? हे सगळं तिच्यामुळे झालं ना पण?”
“ते काहीही असू दे. तो आता सारासार विचार करण्याच्या परिस्थितीत नसणार.”
“बरोबर आहे तुझं,” सुजाता म्हणाली, “आता त्याचं लक्ष या प्रकरणातून बाहेर कसं निघायचं, त्याच्याकडे असणार. जर अलिशालाच उडवलं तर....”
तिने एकदम गाडी वळवली आणि समोरच्या लाल सिग्नलची पर्वा न करता यू टर्न घेतला.
“हे काय करते आहेस तू? मरीन ड्राइव्हकडे जायचंय आपल्याला.”
“नाही. तूच म्हणालास ना की रोहितने मेहरोत्राचा चेहराही पाहिलेला नाही?”
“हो.”
“पण अलिशाने तर पाहिलाय ना? शेवटी तो प्रशिक्षित एजंट आहे हे विसरू नकोस. त्याने रोहितला आणायला जातो असं ऑफिसमध्ये सांगितलं असेल, पण प्रत्यक्षात तो अलिशाला संपवायला जातोय, आणि आपणही तिथेच जायला पाहिजे.”
माझ्या लक्षात आलं. रोहितपेक्षाही अलिशा हा मोठा धोका होता मेहरोत्रासाठी. तिला तो नक्कीच आधी संपवणार. तीच जर नसेल, तर त्याच्याविरुद्ध साक्ष कोण देणार?
कुलाबा मार्केट आणि कफ परेड यांना जोडणारी एक चिंचोळी गल्ली आहे. सुजाताने त्या गल्लीतून गाडी घातली आणि आम्ही कुलाबा भागात आलो.
“कुठे आहे तुमचं ऑफिस?”
“रेडिओ क्लबच्या समोर.”
मी लगेचच अमोलला फोन केला आणि त्याला तिथे यायला सांगितलं. तो काही विचारायच्या आत फोन बंद केला.
कुलाबा मार्केटमधून रेडिओ क्लबपर्यंत पोहोचायला आम्हाला १० मिनिटं लागली असतील, पण ती १० मिनिटं म्हणजे १० तास वाटले मला.
रेडिओ क्लबच्या समोर असलेल्या एका जुन्यापुराण्या, ब्रिटिशकालीन इमारतीसमोर सुजाताने गाडी थांबवली.
“इथे?” मी अविश्वासाने विचारलं.
“हो. बाहेरून काय दिसतं त्यावर जाऊ नकोस. आत पूर्णपणे वेगळं आहे.”
सुजाता कुणालातरी फोन करत होती. फोन उचलला गेला नाही.
“कुणाला फोन करते आहेस?”
“इथे नेहमी एक on duty एजंट असतो. ऑफिस कधीही रिकामं ठेवायचं नाही असा नियम आहे. पण तो उचलत नाहीये.”
“आणि तुम्ही अलिशाला कुठे ठेवलंय?”
“चौथ्या मजल्यावर. तिथे एक टीव्ही रूम आहे. त्यामध्ये आहे ती.”
“तिच्यावर लक्ष ठेवायला कुणी आहे?”
“अर्थात. तिला एकटं सोडायचं नाही, असं मी सांगितलेलं आहे.”
अमोलची गाडी त्याक्षणी तिथे येऊन थांबली.
“तुला येताना एजंट मेहरोत्रा दिसला का?” अमोल गाडीतून उतरल्यावर मी विचारलं.
“कोण?”
“एजंट मेहरोत्रा. ज्याला आपण आज सकाळी हातकड्या घातल्या होत्या तो!”
“नाही सर. का?”
“तो या सगळ्या प्रकरणाच्या मागे आहे. मी तुला सांगतो नंतर!
“तो इथे का येईल पण? ही कुठली जागा आहे?”
“हे एन.आय.ए.चं ऑफिस आहे. एजंट मेहरोत्रा इथे अलिशा त्रिवेदीला मारायला येईल असा आम्हाला संशय आहे.”
“ती पण इथे आहे?”
“हो. एक काम कर. या दरवाजापाशी थांब. आम्ही वरती जातोय. चौथ्या मजल्यावर. जर मेहरोत्रा इथून बाहेर आला, तर त्याला सोडू नकोस.”
“येस सर!”
आम्ही लिफ्टच्या दिशेने गेलो. लिफ्टमध्ये शिरलो आणि सुजाताने तिचं कीकार्ड वापरून लिफ्ट चालू केली.
“इथे एवढा शुकशुकाट का आहे?” मी विचारलं.
“बहुतेक सगळे एजंट्स सीशियमच्या मागे गेलेत. म्हणून तर मेहरोत्राने संधी साधली ना!”
चौथ्या मजल्यावर लिफ्ट पोहोचली. मी आणि सुजाता आमच्या गन्स घेऊन तयार होतो. पण चौथ्या मजल्यावर कुणीच दिसत नव्हतं.
मी ऑफिसमध्ये प्रवेश केला. सुजाताही माझ्या पाठोपाठ आली. हे एन.आय.ए. ऑफिस म्हणजे एक मोठा ट्रेनचा डबा असल्यासारखं होतं. एका बाजूला सगळे क्युबिकल्स आणि एका बाजूला तीन रूम्स होत्या. क्युबिकल्सच्याच जवळ बरीच इलेक्ट्रॉनिक उपकरणं होती.
पहिल्या रूमला एक छोटीशी खिडकी होती. मी आत पाहिलं, तर एक माणूस खुर्चीवर बसला होता. त्याचं डोकं मागे होतं आणि डोळे उघडे होते. त्याच्या शर्टच्या समोरच्या भागावर लाल रंग पसरलेला होता. मी सुजाताला दाखवल्यावर तिने एक निःश्वास सोडला.
खोलीचा दरवाजा किलकिला होता. आम्ही दोघेही आत शिरलो. अलिशा त्रिवेदी जमिनीवर बसली होती. तिचं डोकं मागच्या भिंतीला टेकलं होतं. तिचे डोळे उघडे होते, पण ती जिवंत नव्हती. भिंत रक्ताने लाल झाली होती. तिच्या पायांजवळ एक गन ठेवलेली होती. .३८.
मेहरोत्राचा डाव माझ्या लक्षात आला. त्याने असं भासवायचा प्रयत्न केला होता, की अलिशाने त्या एजंटकडून गन हिसकावून घेतली, त्याला मारलं, आणि मग त्याच गनने आत्महत्या केली. जेवढा वेळ आणि संधी होती, त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला होता त्याने.
तो इथेच कुठेतरी जवळपास असण्याची शक्यता होती. मी दरवाजाजवळ गेलो. सुजाता माझ्या बाजूला होती. आम्ही या खोलीतून बाहेर पडलो आणि दुसर्‍या खोलीकडे जाणार, तेवढ्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं जिथे ठेवली होती, तिथे मला हालचाल जाणवली. मी सुजाताला ते दाखवलं. आम्ही दोघांनीही आमच्या गन्स तयारीत ठेवल्या. पुढच्याच क्षणी आम्हाला मेहरोत्रा तिथून एका दुसर्‍या दरवाज्याच्या दिशेने धावताना दिसला.
“मेहरोत्रा! थांब!” मी ओरडलो.
तो दरवाजापर्यंत पोहोचला होता, तो वळला, आणि त्याने गोळ्या झाडायला सुरुवात केली. मी त्याक्षणी एका क्युबिकलचा आडोसा घेतला. माझ्या बाजूने सुजाताने दोन गोळ्या झाडलेल्या मला ऐकू आल्या.
तो दरवाजातून पुढे पळाला आणि आम्ही दोघेही उठून उभे राहिलो आणि त्याच्या मागोमाग पळालो. दरवाजाच्या थोडं पुढे जिना होता.
“हा जिना कुठे जातो?”
“आपण ज्या दरवाज्यातून इमारतीच्या आत आलो, त्याच्याच जरा बाजूला निघतो हा जिना. मला वाटतं त्याने त्याची गाडी तिकडेच पार्क केली असणार.”
माझी भिस्त आता अमोलवर होती. मी त्याचा नंबर डायल केला. त्याने उचलला.
“तो खाली येतोय.” मी बोललो. मला खालच्या पायर्‍यांवर मेहरोत्राच्या बुटांचा आवाज येत होता. तो खूपच पुढे होता. मी तीन-तीन पायर्‍या घेत उतरायला सुरुवात केली. सुजाता माझ्या मागोमाग येत होती.
तेवढ्यात गोळ्यांचा आवाज ऐकू आला. कोणी झाडल्या आणि कोणावर ते खाली गेल्यावरच समजलं असतं.
मी आणि सुजाता बाहेर आलो. एका गाडीला टेकून अमोल उभा असलेला मी पाहिलं. त्याच्या डाव्या खांद्यात गोळी घुसली होती बहुतेक.
“ही मेहरोत्राची गाडी आहे.” सुजाता अमोल ज्या गाडीला टेकून उभा होता, तिच्याकडे निर्देश करत म्हणाली.
“कुठल्या दिशेने गेलाय तो?”
अमोलने गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने हात केला, “मी मारलेल्या दोन गोळ्या त्याला लागल्या आहेत सर. तो फार दूर जाऊ शकणार नाही.”
मी आणि सुजाता धावतच त्याने दाखवलेल्या दिशेने गेलो. रस्त्यावर एका ठिकाणी रक्त सांडलेलं दिसलं. मेहरोत्रा जखमी झाला होता. फार दूरवर जाऊ शकला नसता. पण गेटवेच्या जवळ तो एखाद्या टॅक्सीवाल्याला किंवा गाडीवाल्याला धमकावून त्याची गाडी पळवण्याची शक्यता होती.
अजून थोडं पुढेही रक्त सांडलं होतं. त्याच्या रोखाने आम्ही जायला सुरुवात केली. गेटवे प्रोमेनाड चालू होईपर्यंत रक्त दिसत होतं, नंतर अचानक पुढे काहीही नव्हतं.
तेवढ्यात दोन गोळ्या हवेत झाडल्याचा आवाज ऐकू आला आणि पाठोपाठ लोकांच्या किंकाळ्या आणि त्यांच्या धावण्याचा आवाज. मी कुलाबा कॉजवेच्या दिशेने धावलो, आणि मला अगदी वेळेत कॅफे गॅलरीमध्ये मेहरोत्रा शिरत असताना दिसला.
“गॅलरीमध्ये शिरलाय तो,” मी माझ्यापाठोपाठ धावत आलेल्या सुजाताला सांगितलं.
“मी त्यांच्या किचनच्या दरवाजाने घुसते. तू इथून बघ,” ती मला म्हणाली आणि मी काही बोलण्याआधी मागच्या बाजूला धावली.
मी गॅलरीच्या दरवाजाच्या दिशेने सावधगिरीने एक एक पाऊल पुढे टाकू लागलो.
तेवढ्यात माझा फोन वाजला. एक डोळा दरवाजावर ठेवून मी बघितलं तर सुजाताचा फोन होता. मी उचलला.
“तो आतमध्ये आहे,” ती म्हणाली. "मला दिसतोय तो इथून. तू पुढच्या दरवाजाने आत ये. जर त्याने काही केलं, तर मी कव्हर करते तुला.”
फोन बंद न करता मी आत शिरलो. गॅलरी एकदम छोटेखानी रेस्टॉरंट आहे, त्यामुळे मेहरोत्रा तिथे कुठे लपू शकेल अशी शक्यता नव्हतीच.
तो एका रेफ्रिजरेटरला टेकून बसलेला दिसला मला.
माझ्या गनवरची माझी पकड घट्ट झाली.
तेवढ्यात मला सुजाताचा आवाज ऐकू आला, “शशांक, मी सुजाता. तुला मदत हवी आहे बहुतेक.”
मी पाहिलं, तर सुजाता त्याच्यापासून जेमतेम ६ फुटांवर होती. तिने तिची गन खाली ठेवली होती.
“कुणीही मला मदत करू शकत नाही.” मेहरोत्रा म्हणाला.
“सगळं संपलंय शशांक. शरण ये. तू एक चांगला ऑफिसर आहेस.”
“होतो.” तो खोकला.
“मी तुझ्याकडे येतेय शशांक. मला तुला मदत करायचीय.”
“नाही, नको. मला तुलाही गोळी घालावी लागेल.”
ती जिथे होती, तिथेच थबकली.
“मला फक्त एक सांगायचंय,” तो कुठेतरी शून्यात पाहात म्हणाला, “हा सगळा तिचा प्लॅन होता. तिला त्याला ठार मारायचं होतं. मला फक्त ती हवी होती. पण तिची हीच मागणी होती. मी तिला जे हवं ते केलं... आणि ...”
मी एक पाऊल पुढे आलो. मी इथे आहे, हे मेहरोत्राला कदाचित जाणवलं नसावं.
“आय अॅम सॉरी सुजाता. सांग त्यांना. आय अॅम सॉरी!”
मी आणि सुजाता काही बोलायच्या आत त्याने आपली गन कपाळाला टेकवली आणि ट्रिगर दाबला.
मी आणि सुजाता त्याच्याकडे धावलो. त्याचं डोकंही अलिशाप्रमाणेच भिंतीला टेकलं होतं. गनसुद्धा तशीच बाजूला पडली होती.
त्याक्षणी रेस्टॉरंटमधल्या घड्याळाने १ ठोका दिला. मी घड्याळात पाहिलं. दुपारचा एक.
माझ्याकडे आल्यापासून जवळपास साडेबारा तासांनी ही केस क्रॅक झाली. एका गॅलरीपासून सुरू होऊन दुसर्‍या गॅलरीमध्ये संपली. पाच लोकांनी आपले प्राण गमावले, एक जण – अमोल जखमी झाला आणि एक जसलोक हॉस्पिटलमध्ये मृत्यूची वाट बघत होता.
मी आणि सुजाता गॅलरीच्या बाहेर आलो. समोर कुलाबा कॉजवेवर वाहतूक काहीही न घडल्यासारखी अव्याहत चालू होती.
मी अमोलला फोन केला, “तुझ्यासाठी गाडी पाठवतोय मी. आणि हो, जसलोकला घेऊन जाईल तुला ती गाडी. चालेल ना?”
तो हसला, “अर्थात सर.”
मी आणि सुजाता – आम्ही समोरच्या वाहत्या रस्त्याकडे एकदा पाहिलं, आणि आपापल्या दिशेने गेलो.

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

29 Oct 2016 - 8:27 am | पिलीयन रायडर

इसको बोलते रहस्यकथा! एका बैठकीत वाचुन काढली. एकदाही सस्पेन्स काय असेल याचा अंदाज आला नाही.

फार मस्त बोकाभौ!!!

कविता१९७८'s picture

29 Oct 2016 - 12:47 pm | कविता१९७८

मस्त रहस्यकथा, रोमांचक

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Oct 2016 - 1:39 pm | माम्लेदारचा पन्खा

आणि आभार वगैरे मानू नका हो...कसंतरीच वाटतं !

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2016 - 8:08 pm | टवाळ कार्टा

भ ह न ना ट

अजया's picture

29 Oct 2016 - 8:16 pm | अजया

जबरदस्त!

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 8:33 pm | यशोधरा

किती गुंतागुंत!

लालगरूड's picture

29 Oct 2016 - 11:04 pm | लालगरूड

Best ever.. दंडवत _/\_

कपिलमुनी's picture

30 Oct 2016 - 1:27 am | कपिलमुनी

फक्कड लिहीला आहे

हुश्श...

पहाटेचे चार वाजून सहा मिनिटे झाली आहेत...

काम संपवून साधारण सव्वा ला मिपाचा दिवाळी अंक उघडला...

आणि ‘गैलरी...’ वर नजर थांबली...

राजेंद्र देशमुख बायकोला न सांगता अपरात्री ड्यूटी वर निघून गेला...हे वाचून मामला इंटरेस्टिंग वाटला आिण खरंच एक टाकी वाचत गेलो...

कुठेच असं वाटलं नाही की कंप्यूटर बंद करुन घरी जावं...

सोबतीचे सहकारी एक एक करुन विचारुन जात गेले की-चलते हो क्या तेलंग जी...

मी आपलं-बस यार दस मिनट और...म्हणत राहिलो आणि चार कसे वाजले हे कळलं देखील नाही...

समाेर टीवी वर जुन्या चित्रपटांची गीते सुरू आहेत...

आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर
सबको मालूम है और सबको खबर हो गई...

मजा आली...सस्पेंस स्टोरी खूप दिवसांनी एकटाकी वाचली...

vcdatrange's picture

18 Nov 2016 - 4:44 am | vcdatrange

रात्रीचे १.४५ ते पहाटे ४.४२.......

हुशशश......

मजा आली,,, आता ऑफिसमध्ये डुलक्या

स्पार्टाकस's picture

30 Oct 2016 - 10:23 am | स्पार्टाकस

बोकोबा,
मस्तं जमली आहे. फक्तं दोन चुका नाहीतर परफेक्ट मर्डर झाला असता!

सुखी's picture

30 Oct 2016 - 10:30 am | सुखी

अप्रतीम......

वेगवान अन रोचक कथा....

कुठेही लूपहोल न ठेवता पुर्ण केलीये....

जबरी

सुखी

सस्नेह's picture

30 Oct 2016 - 10:49 am | सस्नेह

खिळवून ठेवणारी वेगवान वेधक रहस्यकथा !
जमून आलीय !!

प्रचेतस's picture

30 Oct 2016 - 11:10 am | प्रचेतस

जबरदस्त.

दीर्घकथा असूनही कुठेही कंटाळवाणी न होता सलगतेने वाचून काढली.
उत्कृष्ट लेखन.

नँक्स's picture

11 Nov 2016 - 3:09 pm | नँक्स

++११११

भीमराव's picture

30 Oct 2016 - 12:17 pm | भीमराव

बोकोबा एकदम भारी आहे ही रहस्यकथा

प्रीत-मोहर's picture

30 Oct 2016 - 11:01 pm | प्रीत-मोहर

जबराट!!"

आनंद's picture

30 Oct 2016 - 11:07 pm | आनंद

जबरदस्त ! !

तुमच्या मुळे मायकेल कॉनेली चा पंखा झालो आहे.

'डॉक्टरांनी सुजाताला एक गोळी दिल्याचं मी पाहिलं...' येथे 'अलिशाला' असं हवं. बाकी कथा अतिशय थरारक.

पद्मावति's picture

31 Oct 2016 - 1:40 am | पद्मावति

थरारक. मस्त!!

अनन्त अवधुत's picture

31 Oct 2016 - 5:07 am | अनन्त अवधुत

जबरी स्टोरी आहे.
खतरनाक !! आवडली.

आतिवास's picture

31 Oct 2016 - 6:23 am | आतिवास

थरारक.

तुषार काळभोर's picture

31 Oct 2016 - 9:55 am | तुषार काळभोर

वरील सर्वांना +१

उल्का's picture

31 Oct 2016 - 11:09 am | उल्का

भन्नाट कथा! आवडली.

नाखु's picture

31 Oct 2016 - 11:49 am | नाखु

अता पुन्यांदा वाचावी लागणार प्रिंट घेऊन सावकाश दिवाळी फराळ खात.

वरील विशेषणे इथे एकत्र कल्पावीत.

जय बोकेशा जय मिपा आणि जय मिपाकर

नाखु वाचनवाला

मनिमौ's picture

31 Oct 2016 - 12:58 pm | मनिमौ

अगदी थरारक कथा

ए ए वाघमारे's picture

31 Oct 2016 - 3:50 pm | ए ए वाघमारे

जबरदस्त!

भुमन्यु's picture

31 Oct 2016 - 5:24 pm | भुमन्यु

एकाच दमात वाचली. सस्पेन्स एकदम शेवट पर्यन्त राहिला. लिहिते रहो

माझीही शॅम्पेन's picture

31 Oct 2016 - 8:14 pm | माझीही शॅम्पेन

जबरदस्त एकदम खतरनाक , सविस्तर प्रतिक्रिया देईन सुचेल तेंव्हा __/\__

अप्रतिम बोकाभौ...!मस्त लिखाण...!

मोदक's picture

1 Nov 2016 - 3:07 pm | मोदक

+११११

तुषार ताकवले's picture

31 Oct 2016 - 9:04 pm | तुषार ताकवले

लईच भारी, कथा वाचताना नक्की कुठ आहे ते कळत नव्हत जबरदस्त , आवडलं !!!

घायाळ's picture

31 Oct 2016 - 10:36 pm | घायाळ

एका दमात वाचून काढली

अफगाण जलेबी's picture

31 Oct 2016 - 11:33 pm | अफगाण जलेबी

अफाट! निव्वळ कल्ला केलेला आहे!

सलग वाचून प्रतिसाद देणार. सध्या ही पोहोच.
सध्या तुकड्या तुकड्यात वाचली ते पण भारी वाटले.

टिवटिव's picture

1 Nov 2016 - 12:58 am | टिवटिव

एकदम जबरदस्त. ___/\__

स्रुजा's picture

1 Nov 2016 - 1:42 am | स्रुजा

तुमची आणि कॉनेली ची जोडी हिट्ट आहे एकदम !

निव्वळ अप्रतिम __/\__

फक्त आपल्याकडे असं काऊबॉय मेथ्ड्स साधे पोलिस वापरतात? त्या अँगलवर मात्र ईंग्रजी साहित्याचा आणि फिल्म्स चा प्रभाव जाणवला.

अमितदादा's picture

1 Nov 2016 - 2:05 am | अमितदादा

निव्वळ अप्रतिम...खतरनाक...

शलभ's picture

1 Nov 2016 - 2:12 pm | शलभ

अप्रतिम.._/\_

बोकाभाऊ.... पहिल्यांदा नं वाचता प्रतिसाद देत आहे... कथा भारीच असणारे ...
आता वाचायला बसतोय....

वरुण मोहिते's picture

1 Nov 2016 - 4:49 pm | वरुण मोहिते

ब्रेक नं घेता . मस्त

वटवट's picture

1 Nov 2016 - 6:23 pm | वटवट

भले बाप्पा.....
घेऊन टाका आमचा कुर्निसात...
कॉलेज सुटून सुद्धा अजून हेच वाचत बसलो होतो...
टॉप टू बॉटम संपवली ही कथा एकाच सिटटींगमध्ये... हलू पण नाही वाटलं बप्पा...
जबरी, फाडू, वेगवान, पिच्चर बघितल्याचा फील आला ना भाऊ...
काय बोलावं गरीबानं अजून...

भम्पक's picture

1 Nov 2016 - 7:33 pm | भम्पक

एका बैठकीत वाचून काढली....अगदी कशालाही उठलो नाही.जबर , रोमांचक आणि खिळवून ठेवणारी...
बादवे वेगवेगळ्या संस्थांचे कामकाज आणि एकमेकांना पाण्यात कसे पाहतात याची माहिती पण मिळाली.

सुकामेवा's picture

1 Nov 2016 - 9:13 pm | सुकामेवा

रह्स्यकथा एकदम फाडु लिहलि आहे

आज काहितरी लिहायचे म्हणुन लाअ‍ॅग इन केल, अन हि वाचायला घेतलि. ते संपवुन च थांबले . खिळवुन थेवले आगदि

जबरदस्त! अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा!

आता हेही पुस्तक वाचावे लागेल :). मुंबईतल्या स्थळांशी आणि प्रसंगांशी सांगड मस्त घातली आहे.

विशाखा राऊत's picture

2 Nov 2016 - 3:52 am | विशाखा राऊत

जबरदस्त

साहेब! हा तर कादंबरीचा ऐवज आहे.
कमाल!

एकदम चित्तथरारक. जबरदस्त. या कथेवर कसला भारी पिक्चर बनेल. बोकाशेठ, कुर्निसात घ्या..

पिलीयन रायडर's picture

4 Nov 2016 - 2:04 am | पिलीयन रायडर

मी सुद्धा पुर्णवेळ हाच विचार करत होते. १ नंबर पिक्चर बनेल!!