संपादकीय - पुढां स्नेह पाझरे, मागां चालतीचि अक्षरे ...

Primary tabs

आदूबाळ's picture
आदूबाळ in लेखमाला
29 Oct 2016 - 12:01 am

1

नमस्कार! सर्व मिपाकरांना, वाचकांना आणि हितचिंतकांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!

आपल्या मिपाचा पाचवा दिवाळी अंक आपल्या हाती देताना आज आम्हां सर्वांना अतिशय आनंद होत आहे. मिपाकरांच्याच डोक्यातून आलेला, मिपाकरांनीच लिहिलेला आणि मिपाकरांनीच सजवलेला असा हा दिवाळी अंक आहे.

मिपा आज मराठीतलं एक आघाडीचं संस्थळ आहे. विषयवैविध्य हे कायमच मिपाचं बलस्थान. गेल्या चार दिवाळी अंकांत त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आहेच. यंदाच्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तर मिपाने आपलं हे बलस्थान टिकवून ठेवल्याचं लक्षात येईल. ब्रह्मदेशातल्या दिवाळीपासून ऑस्ट्रेलियातल्या कांगारू बेटाच्या सफरीपर्यंत. पण हे इतक्यावरच संपत नाही.

मिपाच्या माध्यमातून नेहेमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आजवर केला आहे. छायाचित्र स्पर्धा, कथा स्पर्धा, भटकंती विशेषांक आदी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. यंदाच्या दिवाळी अंकात 'रहस्यकथा विभाग' ठेवावा ही कल्पनाही 'काहीतरी वेगळं करू' याच प्रेरणेतून स्फुरली. रहस्यकथा हा प्रकार वाचायला जितका रसाळ, तितकाच लिहायला कठीण. रहस्याची बांधणी, त्यातली रोमहर्षकता, रहस्य उकलतानाचं चातुर्य या सर्व गोष्टी लिहायला कठीण, किचकट. रहस्यकथा लिहिणं ही जितकी कला (आर्ट) आहे, तितकीच, किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात ती कुसर (क्राफ्ट)देखील आहे.

पुन्हा रहस्यकथा या वाङ्मयप्रकाराचा आवाका प्रचंड मोठा असतो. गुप्तहेरकथांपासून ते पोलिसी चातुर्यकथांपर्यंत, आणि गूढकथांपासून विज्ञानकथांपर्यंत विविध प्रकार संभवतात. त्यातून दिवाळी अंकासारख्या माध्यमातून रहस्यकथा समोर आणताना काही मर्यादा आपसूकच पडतात. रक्तरंजित खूनसत्राच्या कथा दिवाळी अंकासारख्या व्यासपीठावर असणं योग्य नव्हे. बीभत्स रस, भयानक रस हे दिवाळीसारख्या सण साजरा करणार्‍या अंकात असू नयेत असा संकेत मिपाच्या दिवाळी अंकांनी कायमच पाळला आहे.

या सगळ्या मर्यादांचं भान ठेवूनच हा उपक्रम करायचं ठरवलं, आणि मिपाकर लेखकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. सुरुवात करताना 'पाच रहस्यकथा आल्या तरी बरं, सात आल्या तर डोक्यावरून पाणी...' वगैरे भाषा करणार्‍या आम्हाला, आलेल्या प्रतिसादाने अक्षरशः भुईसपाट केलं! तब्बल चौदा रहस्यकथा या अंकाची शोभा वाढवत आहेत. त्यात हेरकथा, पोलिसी चातुर्यकथा, गूढकथा याबरोबरच विनोदी रहस्यकथा आणि फॅन फिक्शन यासारखे तुलनेने अनवट प्रकारही हाताळले गेले आहेत. यासाठी मिपाकर लेखकांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत.

याशिवाय विशेष उल्लेख करावासा वाटतो तो मुलाखतींचा. असा काही विभाग असावा असा कोणताही पूर्वनियोजित आडाखा नव्हता. तरी तीन मिपाकरांनी आपणहून मुलाखती घेतल्या. हा वेगळा विभाग सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात मुलाखतींना वाहिलेला वेगळा विशेषांक निघावा अशी इच्छा / आशा इथे व्यक्त करतो.

याबरोबरच मिपाकर लेखकांनी लिहिलेल्या कथा, कविता, पाककृती, प्रवासवर्णनं आणि लेख यांचाही आस्वाद या दिवाळी अंकात घेता येईल.

मिपाला यंदा दहा वर्षं पूर्ण होतील. दहा वर्षांत पुलाखालून किती पाणी (आणि कमानीखालून किती टेम्पो) गेले हे आपण सगळेच जाणतो. मिपाच्या या दशकपूर्ती वर्षात काही विशेष उपक्रम राबवून हे वर्ष संस्मरणीय व्हावं अशी इच्छा आहे. हे उपक्रम नेमके काय असावेत, त्याचं स्वरूप, व्याप्ती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा संपादकीय विभागातच काढत आहोत. आपणांस विनंती करतो की आपल्या मनात असलेल्या कल्पना या धाग्यावर विस्ताराने लिहाव्यात. यातूनच भविष्यातल्या मिपाची पायाभरणी होईल. तसंच, दशकपूर्तीनिमित्त मिपाच्या माध्यमातून साकारणार्‍या शुभारंभाच्या एका दृक्-श्राव्य उपक्रमाची माहितीही स्वतंत्र धाग्यात आपणांस मिळेल.

...आणि शेवटी - ऋणनिर्देश.

सर्वात पहिलं, आणि सर्वात मोठं ऋण ते लेखकांचं. तब्बल पस्तीस लेखकांनी या अंकासाठी लेखन केलं. आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून लेखन करणं आणि वेळेत ते आमच्यापर्यंत पोहोचवणं ही साधी कामगिरी नक्कीच नाही. आम्ही या लेखकमंडळींचे अत्यंत आभारी आहोत.

दिवाळी अंक आपल्या हाती देण्यासाठी मिपाकरांची एक आख्खी टीम गेले तीन महिने कार्यरत होती. संपादक, साहित्य संपादक, तंत्रज्ञ, रंगभूषा मंडळ, मुद्रितशोधक वगैरे लेबलं सोयीसाठी लावली खरी, पण 'आपल्या मिपाचा दिवाळी अंक झकास व्हावा' हीच अंतरीची तळमळ होती. 'गंगेत घोडं नहावं' असा पडेल दृष्टीकोन नव्हता, तर 'देऊ ते उत्तमच' असा चढेल बाणा होता. या सर्वांचे आभार मानणं म्हणजे स्वतःचीच पाठ थोपटून घेतल्यासारखं होईल, पण तरीही प्रत्येकाचा नावानिशी ऋणनिर्देश करणं ही जबाबदारीच. तर या दिवाळी अंक टीममध्ये खालील आयडींनी योगदान दिलं :

सुधांशुनूलकर, अभ्या.., पियुशा, पैसा, स्नेहांकिता, अजया, पिलियन रायडर, स्रुजा, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, नीलकांत, प्रशांत

आणि सर्वात महत्त्वाचं, वाचकहो, तुमचे अनेकानेक आभार.

| शुभ दीपावली |
1

---------
(रांगोळी: मिपाकर स्मिता चौगुले)

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

28 Oct 2016 - 11:57 pm | पिलीयन रायडर

अत्यंत सुरेख संपादकीय! अनुक्रमणिकेतुनच अंकाचा दर्जा कळतो आहे. भरगच्च अंक आहे अगदी!!

प्रचेतस's picture

29 Oct 2016 - 6:04 am | प्रचेतस

सुरेख संपादकीय.
अंक उत्कृष्टच असणार ह्याची खातरी आहेच.

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 8:11 am | यशोधरा

संपादकीय आवडले!

मित्रहो's picture

29 Oct 2016 - 8:58 am | मित्रहो

आता मोर्चा रहस्यकथांकडे

सहजसाधे नि हृद्य संपादकीय !

नूतन सावंत's picture

29 Oct 2016 - 1:12 pm | नूतन सावंत

हृदयाला भिडणारी भावना संपादकीयातून व्यक्त होत आहे.
या देखण्या आणि दर्जेदार अंकात आपलाही खारीचा वाटा आहे याचा अभिमान वाटतो.

पैसा's picture

29 Oct 2016 - 1:17 pm | पैसा

अंकासाठी काम करणार्‍या सर्व टीमचे आभार आणि अभिनंदन! तसेच आमच्या विनंतीला मान देऊन लिखाणासाठी आपला बहुमोल वेळ देणार्‍या सर्व लेखकांनाही मनापासून धन्यवाद.

मिपा चालक, पालक, बालक, वाचक, लेखक, हितचिंतक यांना त्यांच्या त्यांच्या कुटुंबासहित दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नाखु's picture

31 Oct 2016 - 3:59 pm | नाखु

मनकवड्या असल्याने आम्च्य्साठी शुभेच्छा शब्द द्यायलाही काही शिल्लक ठेवले नाही म्ह्णून वरच्या प्रतिसादाला मम म्हणतो.

बाकीचा साक्षीदार नाखु

नंदन's picture

29 Oct 2016 - 1:54 pm | नंदन

संपादकीय. आता अंक पुरवून, पुरवून वाचेन. संपूर्ण चमूचे अभिनंदन!

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 5:02 pm | यशोधरा

दिवाळी अंक वाचते आहे. काही लेख वाचून झालेत, काही अजून वाचायचे आहेत.
लेखांखाली प्रतिसाद दिलेच आहेत, तरीही इथे संपादकांसाठी एक वाचक म्हणून धावता आढावा.

आतापर्यंत वाचलेले/ पाहिलेले आणि आवडलेले/ उल्लेखनीय वाटलेले -

१. मुखपृष्ठ
२. संपादकीय
३. अतिवासताईंची आंजी आणि तडिंजु
४. दशकुमारचरितम वाकाटक - जयंतकाका
५. स्वातीताईची ब्लाईंड डेट - शेअर केला हा अनुभव
६. भूत ही भृशुंडी ह्यांची कथा
७. जगण्याची लय सापडलेले डॉक्टर ही उल्का ह्यांनी घेतलेली मुलाखत
८. USS Cyclops - स्पार्टाकस
९. सहज सुचलं म्हणून -वटवट

अजून लेखन वाचायचे आहे.

थोडेसे खटकलेले - रहस्यकथा ह्या थीमला बांधून घेतला गेलेला अंक.
कवितां/कथांमधील रेखाटने कोणाची आहेत, त्याचा नामनिर्देश नाही. (की माझ्या नजरेतून सुटलाय?)
काही रेखाटने अजून चांगली असू शकली असती, हे मत रेखाटनकारांचा पूर्ण आदर राखून सुद्धा मांडते.

अर्थात, दिवाळी अंकावर काम करणे हे लष्करी भाकर्‍यावाले काम आहे ह्याची नम्र जाणीव आहे आणि तुम्हां सार्‍यांच्या मेहनतीमुळे हा अंक मज वाचकाच्या पदरी आयता पडला आहे, हे माहितीच आहे आणि त्याबद्दल शतशः धन्यवाद!

ह्या अंकामुळे दिवाळी अजूनच साजरी झाली!

पद्मावति's picture

29 Oct 2016 - 9:50 pm | पद्मावति

सुंदर संपादकीय.

अतिशय सहज सुंदर आणि मनापासून आलेलं संपादकिय ! अंक अप्रतिम झालाय .. आदुबाळचं खास कौतुक . अतिशय कार्यक्षम आणि मुख्य म्हणजे डोकं ठिकाणावर ठेवुन मॅनेज केलंय सगळं.. प्रेशरमध्ये डोकं शांत ठेवुन काम करणं अवघड असतं. तुम्ही ते लीलया केलंत. या अंकावर काम करताना मजा आली..

सगळ्या लेखकांन ___/\___

म्हणजे तुम्हाला काम करायला फक्त दोन आठवडे मिळाले. या दोन आठवड्यांत एवढा सर्वांगसुंदर अंक काढणं, त्याची प्रसिद्धी आणि सजावट या सगळ्याबद्दल संपादकांची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे. _/\_

आतिवास's picture

30 Oct 2016 - 9:53 am | आतिवास

टीम 'मिपा दिवाळी अंक' चे अभिनंदन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Oct 2016 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर संपादकिय आणि दिवाळी अंक ! सर्व दृश्य-अदृश्य टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !

स्वाती दिनेश's picture

30 Oct 2016 - 10:36 pm | स्वाती दिनेश

संपादकीय छानच आहे, आता अंक आस्वाद घेत वाचते.
स्वाती

विजुभाऊ's picture

30 Oct 2016 - 10:59 pm | विजुभाऊ

अनुक्रमणीकेवरुनच अंदाज बाम्धतोय. एकंदरीत भरघोस आणि झकास अंक दिसतोय.
वाचनीय मजकूराची रेलचेल आहे. मस्त.

आदूबाळाचे खास अभिनंदन! दिवाळीअंकाच्या सगळ्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. मिपाकर जबराट आहेतच! _/\_
आता फराळा बरोबरच कथांचा आस्वाद घ्यायला बसतो.
(वाचनोत्सुक्)रंगा

संपादकीय अतिषय आवडले. धन्यवाद अदूबाळासाहेब.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2016 - 7:37 am | अत्रुप्त आत्मा

+१

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Oct 2016 - 12:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

संपूर्ण अंक, अतिशय दर्जेदार झालाय. सर्व टिमचे मनापासून आभार.

अवांतरः मी दिलेल्या मुलाखतीचं अंकातले प्रकाशन वाचून खुप आश्चर्य वाटले. मी दिले होते त्यापेक्षा खुपच नीटनेटकी मांडणी झालिये, मला खुप बरं वाटलं ती मुलाखत वाचून. नुलकर काका, रातराणी आणि अभ्या यांचे विषेश आभार.

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2016 - 4:37 pm | टवाळ कार्टा

आख्खा दिवाळी अंक भारी आहे

संपादकीय आवडले. पूर्ण टीमचे अभिनंदन आणि धन्यवाद!

मारवा's picture

2 Nov 2016 - 7:32 am | मारवा

आवडलय

दिल्या वेळात उगाच चालढकल न करता लेख देणाऱ्या सर्व लेखकांचे आभार.
देतो देतो करत शेवटच्या तारखेपर्यंत लटकवुन मग लेख न देणारे लोक बघितले असल्याने यावेळचा अनुभव अतिशय सुखद होता हे आवर्जून नमूद करावेसे वाटतेय.
स्पार्टाकसने अक्षरशः एका रात्रीत त्याचा लेख लिहून दिलाय.तो घरगुती आणि हापिसातल्या कामात प्रचंड व्यग्र असताना.चुकलामाकला,सानिकाचेही तेच.पण हो म्हंटलंय लेख द्यायला मग मागे न फिरता या सर्वांचे लेख वेळेत हजर होते.अतिशय कृतज्ञ वाटते आहे.
बोक्याची दीर्घकथा वाचताना दम लागला होता.ती इतकी इंटरेस्टिंग होती की आपण तपशिलातल्या चुका शोधतोय हे विसरून वाचतच बसले होते!
सर्व पाकृ तज्ञांनी पण वेळेत पाकृ देखण्या फोटोसह पाठवून दिल्या.
वेळेत सतत मुद्दाम लिहितेय.अंकाचे पोस्ट प्रोसेसिंग हेही मोठे काम असते.त्यासाठी अभ्या, पैसाताई,प्रशांत हे टिम मेंबर दिवसरात्र काम करतात शेवटी.या सर्वांचेच आपले व्यवसाय, कामं,नोकरी सांभाळून इतके आपुलकीचे योगदान दरवर्षी अंकाला मिळते की मिपाधर्म नावाची गोष्ट खरंच अस्तित्वात आहे यावर विश्वास बसतो!
आदूबाळने अतिशय नियोजनबद्ध काम करुन दिवाळी अंक कसा करावा याचा पाठच शिकवला आहे!
सर्वांगसुंदर अंकासाठी या सर्वांचेच आभार.

फारच सुंदर लिहिता आपण. आवडलं संपादकिय. अंकदेखील सुरेख आहे.

पुढां स्नेह पाझरे, मागां चालतीचि अक्षरे .

ही ओळ ज्ञानेश्वरीतील आहे का?

स्रुजा's picture

3 Nov 2016 - 2:21 am | स्रुजा

आदूबाळ तपशील देतील च पण माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानेश्वरीतील ओळी आहेत आणि पूर्ण ओळी अशा आहेतः

पुढां स्नेह पाझरे

माघा चालती अक्षरे

शब्द पाठी अवतरे

कृपा आधी...

होय. तेराव्या अध्यायातल्या ओळी आहेत.

शांतपणे अध्यात्मरंगी रंगलेल्या 'क्षेत्रज्ञा'चं हे वर्णन आहे. असा मनुष्य त्याच्या स्नेहाळ कृतीतून जगाला दिसतो. अक्षरं आणि शब्द मागाहून येतात (किंवा येतही नाहीत.)

फारशी बडबड न करता दिवाळी अंकासाठी गेले तीन महिने पडद्यामागे परिश्रम घेणार्‍या दिवाळी अंक टीमचा हा अल्पाक्षरी, पण कृतज्ञ उल्लेख आहे.

अमृत's picture

2 Nov 2016 - 12:35 pm | अमृत

सम्पादकिय छान लिहिलय. कथा वाचायला एव्हाना सुरूवात केली आहेच. सर्वच लेखक, कवि,संपादक मंडळ, साहित्य संपादकांचे हार्दिक अभिनंदन व आभार.

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2016 - 2:14 pm | सानिकास्वप्निल

संपादकिय आवडले.
संपूर्ण टीमचे अभिनंदन.
आता अंकाचा आस्वाद घेते.

स्मिता चौगुले's picture

2 Nov 2016 - 3:00 pm | स्मिता चौगुले

मला दिवाळी आधी एक रांगोळीवर लेख लिहायचा होता.पण काही कारणास्तव जमले नाही.
आज बर्याच दिवसांनंतर आले असता माझी एक रांगोळी या लेखात सुशोभनासाठी दिल्याचे दिसले.
पाहून बरे वाट्ले , धन्यवाद

प्रीत-मोहर's picture

2 Nov 2016 - 5:07 pm | प्रीत-मोहर

भारीच झालाय अंक!!!

गवि's picture

3 Nov 2016 - 4:03 am | गवि

जियो आबा.

फक्कड अंक झालाय. उत्तम त्रयोदशगुणी विडा जमवून तुम्ही सर्वांनी वाचकाच्या हाती ठेवलाय. तुमची सर्वांची बांधिलकी आणि पद्धतशीर चोख प्लॅनिंग सतत पाहात होतो. संपूर्ण टीमसाठी स्टँडिंग ओवेशन..!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2016 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपादकीय आवडलं....!!

मिपाचा कोणताही उपक्रम असू द्या. आणि मिपा लेखांसाठी कोणीही आवाहान करु द्या, मिपाकर लेख घेऊन हजर असतात. उत्तम लेखही देतात. आपण मिपाच्या उपक्रमात आणि अंकात असावं असं अनेकांना वाटत असतं. अनेक मिपाकर सहभागीही होतात. काहींना इच्छा असूनही सहभागी होता येत नाही असं होतं. मिपा दिवाळी अंकासाठी अगदी तहेदिलसे परिश्रम घेणारे आदुबाळ यांचं मनापासून कौतुक करतो. उत्तम समन्वयक म्हणुन त्यांनी उत्तम जवाबदारी पार पाडली. कोणतीही सुचना आली की त्याला वेळेवर उत्तरं देणे, पाठपुरावा करणे ही काम अतिशय घरची म्हणुन जवाबदारी त्यांनी पार पाडली. आपला अमुल्य असा वेळ दिला. आम्हा सर्व मिपाकरांच्या वतीने मी आपलं मन:पूर्वक अभिनंदन करतो. आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे सुधांशु नूलकर. शुद्धलेखन करणे सोपं काम नाही. अतिशय तन्मयतेने ते काम करतात. नुलकरसाहेब आपले आभार काय आणि किती मानावे. थॅक्स अ लॉट.

बाकी, अभ्या आणि चित्र काढणारी मंडळी, लेखन करणारे मिपावरील लेखक, अंकात खारीचा वाटा उचलणारी सर्व मान्यवर यांचेही अभिनंदन. आणि आभार. (माझं तर कारण नसतांना ऋण निर्देश केले त्याबद्दल आपले आभार) :)

अंक वाचतोच आहे. मांडणी आवडली हे वेगळे सांगणे न लगे.

मिपा मालक नीलकांतसेठ, प्रशांत यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले त्यामुळेच विविध मिपाउपक्रम आम्हा वाचकांना इंजॉय करता येतात. आभार हो मालक....!!!

-दिलीप बिरुटे

गवि's picture

3 Nov 2016 - 8:24 pm | गवि

पुष्पगुच्छ राहिला ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2016 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हा सर्व मिपाकरांच्या वतीने मिपाचे सिद्धहस्त लेखक, ललित आणि वैचारिक लेखनात आपला ठसा उमटवणारे नव्या पिढीचे लेखक आणि मिपाचे जेष्ठ संपादक गवि यांनी मिपा दिवाळी अंकाचे संपादक आदुबाळ यांचं पुष्पगुच्छ देऊन कौतुक करावं...!

-दिलीप बिरुटे
(निवेदक)

स्मिता_१३'s picture

3 Nov 2016 - 5:46 pm | स्मिता_१३

अतिशय सुंदर अंक आणि तितकेच सुंदर संपादकीय. संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार !!

मोदक's picture

3 Nov 2016 - 8:32 pm | मोदक

सुरेख संपादकीय...!!

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2016 - 8:40 pm | प्रभाकर पेठकर

मिपाच्या दिवाळी अंकाच्या संपादकियातून कुटुंबप्रमुखाने सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन दिवाळी साजरी करावी अशी भावना ओसंडून वाहताना जाणवली. फार सुंदर संपादकिय आहे.

लवकरच २०१६ संपून २०१७ सुरु होईल. २०१६च्या संध्येला २०१७ चे नविन मनसुबे, नवे संकल्प, सामाजिक उपक्रमाच्या शपथा वगैरे वगैरे विनोदी, गंभीर, वास्तवदर्शी लेखन केंद्रस्थानी योजून एक 'नववर्ष विशेषांक' काढावा असे मी सुचवितो.

किसन शिंदे's picture

4 Nov 2016 - 5:47 pm | किसन शिंदे

संपादकीय आवडले!!

रेषाक्षरे.कॉमच्या 'अंकनामा'मध्ये दिवाळी अंकांची झाडाझडती घेणे चालू आहे. त्या मालिकेत आज मी लिहिलेला मिपाच्या दिवाळी अंकाचा लेखाजोखा इथे वाचता येईल.

मुलाखत 'मोदक' यांची नसून मोदक यांनी घेतलेली 'मानस चंद्रात्रे' या दुसऱ्या मिपाकरांची आहे.

ऋषिकेश's picture

25 Nov 2016 - 12:04 pm | ऋषिकेश

होय. चुक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. बदल करत आहे.

रेषाक्षरे.कॉमच्या 'अंकनामा'मध्ये दिवाळी अंकांची झाडाझडती घेणे

ते काय स्वयंघोषित वगैरे म्हणतात, तसे वाटले अगदी.