समोसा

Primary tabs

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in लेखमाला
29 Oct 2016 - 12:25 am

समोशाचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार आहेत - १) पंजाबी समोसा २) पट्टी समोसा.

पंजाबी समोशासारखेच 'दिसणारे' दुसरे समोसे म्हणजे लखनौ समोसा आणि गुजराथी समोसा.

पंजाबी समोसा, लखनौ समोसा आणि गुजराथी समोसा ह्यांना एकच संज्ञा वापरली जाते, ती म्हणजे 'पंजाबी समोसा'.

वरून दिसायला सारखेच असले, तरी त्यातील सारण वेगवेगळे असते. पंजाबी आणि गुजराथी समोशात बटाट्याची 'भाजी' असते. पंजाबी समोशात मसाले जरा तीव्र असतात, तर गुजराथी समोशात बटाट्याची भाजी तुलनेने सौम्य असते. दोन्ही समोशातील भाजी पिवळ्या रंगाची असते. पंजाबी समोसे पिरॅमिडसारखे असतात, तर गुजराथी समोसे त्रिकोणीच पण झोपवलेले (जरा चपटे) असतात.

लखनौ समोशातील सारण खास मसालेदार असते. आले-लसूण-मिरची, जिरे, गरम मसाला, चाट मसाला घालून चमचमीत करतात. क्वचित कोठे त्यात भाजलेली बडीशोपही घालतात, तर शिया मुसलमानांकडे ह्या समोशात काजू तुकडे आणि बेदणेही घालतात. यातील अंतर्भूत जिन्नस तुमच्या चवीच्या प्राधान्यावर अवलंबून असते. मी मूलभूत जिन्नस इथे देत आहे.

साहित्य :

मैदा - २ वाट्या
तेल - अर्धी वाटी
आलं - १ इंच
लसूण - ४ पाकळ्या
हिरव्या मिरच्या - ३
जीरं - अर्धी लहान चमचा (टी स्पून)
मटार - अर्धी वाटी
कांदे - एक मोठा
बटाटे - ३ मध्यम
तिखट - अर्धी लहान चमचा.
गरम मसाला - १ लहान चमचा
चाट मसाला - १ लहान मसाला किंवा गरजेनुसार जास्त घ्यावा.

1

कृती :

मैदा आणि तेल मिसळून घ्यावे. किंचित मीठ (१/८ लहान चमचा) घालून थोडे थोडे पाणी मिसळत पीठ घट्ट मळून घ्यावे. पीठ जरा जास्त मळावे लागते. जास्त मळल्याने त्यात ग्लुटन तयार होऊन पीठ एकजीव होते. हे मळलेले पीठ बाजूला ठेवून द्यावे.
साधारण २० मिनिटांनी मैद्याचे गोळे बनवून लंबगोल आकारात जाडसर लाटून त्याला मधून कापून त्याच्या दोन पट्ट्या बनवाव्यात.

1

ह्या प्रत्येक पट्टीचा एक समोसा होतो. म्हणजे एका लंबगोल पोळीतून दोन समोसे बनतात. सर्व पट्ट्या बनवून त्यावर ओले कापड टाकून झाकून ठेवावे.
कांदा बारीक चिरून मध्यम आचेवर, लाल रंगावर तळून घ्यावा,

1

आणि बाजूला ठेवून द्यावा.

1

आता दुसर्‍या पातेल्यात थोडे तेल घालून त्यावर जिरे टाकावे. जिरे तडतडले की त्यावर आले, लसूण, मिरची पेस्ट टाकून परतावे. नंतर त्यावर मटार घालून परतावे. मटार फ्रेश असतील (मी फ्रोजन वापरलेत) तर उकडून घ्यावेत आणि मग वापरावे. मटार परतून शिजले की त्यावर तिखट, गरम मसाला घालून परतावे.

1

मसाला न जाळता नीट परतून घेतल्यावर गॅस बंद करावा आणि त्यात उकडलेले बटाटे, तळलेला कांदा आणि चाट मसाला मिसळावा. हे सर्व मिश्रण नीट मळून घ्यावे आणि त्याचा एक गोळा करावा.

आता समोशाची एक पट्टी, सरळ बाजू (कापलेली) तर्जनीवर येईल अशी ठेवून त्याच्या मध्यापासून डाव्या बाजूला अर्ध्या भागावर, फक्त कडेलाच पाणी लावून चण्याच्या पुडीप्रमाणे त्याची घडी घालावी. पाणी लावलेली बाजू दुसर्‍या बाजूवर दाबून त्याचा कोन बनवावा.

1

ह्या कोनात सारण भरून पट्टीच्या वरच्या भागाला पाणी लावून डब्याला झाकण लावतो तसे बंद करून घ्यावे. कडा दाबून त्याची बैठक बनवावी आणि एका ताटलीत काढून ठेवावी.

1
असे सर्व समोसे (बारा होतील) बनवून घ्यावेत आणि मंद आचेवर तळून घ्यावेत.

1

शुभेच्छा.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

29 Oct 2016 - 1:14 am | राघवेंद्र

काका मस्त आहेत समोसे !!!

सामोसे भारी दिसतायत. करून पाहते.
तळलेला कांदा सारणात मिसळायचा ना?

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2016 - 7:35 pm | प्रभाकर पेठकर

होय सारणात मिसळायचा.

'मसाला न जाळता नीट परतून घेतल्यावर गॅस बंद करावा आणि त्यात उकडलेले बटाटे आणि चाट मसाला मिसळावा. हे सर्व मिश्रण नीट मळून घ्यावे आणि त्याचा एक गोळा करावा.' हे वाक्य, 'मसाला न जाळता नीट परतून घेतल्यावर गॅस बंद करावा आणि त्यात तळलेला कांदा, उकडलेले बटाटे आणि चाट मसाला मिसळावा. हे सर्व मिश्रण नीट मळून घ्यावे आणि त्याचा एक गोळा करावा.' असे वाचावे.
घाई घाईत कांदा मिसळायचे सांगायचे राहून गेले. क्षमा असावी.

रेवती's picture

2 Nov 2016 - 8:03 pm | रेवती

ओक्के. तसेच करीन.

अत्याचार आहे हा सकाळी सकाळी

काका, कधी समोसे खायला घालताय.. (तेही तुमच्या हातचे)

सविता००१'s picture

29 Oct 2016 - 11:34 am | सविता००१

तोंड खवळलं हो काका....
मी करते ते लखनौ सामोसे असं आतच कळलं. ;)
पण कांदा बाजूला का ठेवायचा? घालायचाय ना नंतर?

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2016 - 7:37 pm | प्रभाकर पेठकर

होय मिसळायचा.

नूतन सावंत's picture

29 Oct 2016 - 12:23 pm | नूतन सावंत

सुरेख दिसताहेत सामोसे.यंदा भाऊबीज मंगळवारी आल्याने शिवराक सैपाक असणार आहे.ताटाची एक बाजू सजवायला नं.१ दिश.भाजी आदल्या दिवशी करून फीमध्ये ठेवता येईल.

1

! दिवाळी शुभेच्छा तुम्हाला सर्वांना.

समोसे छान झाले आहेत. पीठ खूप मळावे लागते हे खरय.वरचं कवच खुसखुशित झाले पाहिजे

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Oct 2016 - 10:03 am | कैलासवासी सोन्याबापु

सामोसे म्हणजे ऑल टाईम फेवरेट नाश्ता अन भारतभरात कुठेही खाल्ला तरी माफक चवी असूनही उत्तम पोटभरीचा पर्याय! रेसिपी अवडलीच! काका सामोसे अजून थोडे लाल होऊस्तोवर तळले असते तर मजा आली असती (पर्सनल चॉईस माझा )

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2016 - 7:40 pm | प्रभाकर पेठकर

काका सामोसे अजून थोडे लाल होऊस्तोवर तळले असते तर मजा आली असती

खरं आहे. समोसे गडद रंगाचे होतात. हा असा पिवळसर रंग ही फ्लिकरची देणगी आहे. यंदा सर्वच बाबतीत घाई घाई झाल्याने चेक करता आले नाही. पण मुळ समोसे डार्क ब्राऊन झाले होते. असो.

मस्त दिसताएत सामोसे.करावेच लागणार!

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2016 - 5:40 pm | टवाळ कार्टा

अज्जून पर्यंत एकाही मिपाकराने स्वतः बनवून काहीही कधीही खायला बोलावले नाहीये त्यामुळे मिपाकर खाणे बनवू शकतात यावर विश्वास नाही

पाटीलभाऊ's picture

30 Oct 2016 - 6:06 pm | पाटीलभाऊ

तोंडाला पाणी सुटले

सर्वसाक्षी's picture

31 Oct 2016 - 12:48 pm | सर्वसाक्षी

करुन पहायला हवेत

या धाग्यावरून प्रेरणा घेऊन 'आज मी सामोसे बनवणार' असं जाहीर केलं खरं. पण स्वयंपाकगृहातला सर्जिकल स्ट्राईक फसला. गनीम सावध होता. 'तुम्ही बिघडवून ठेवाल' हे ब्रह्मास्त्र वापरून आम्हांला बाहेर काढण्यात आलं. यावर बरीच बाचाबाची होऊन गनिमाने बनवलेले दहा (गनीमाच्या मते बारा) सामोसे खाऊन डाएटची वाट लागलेली आहे असं लक्षात आल्यावर वैतागाने वर फुल जेवणही हाणलं. अशानं कसाकाय शेफ बनणार मी! असो! तरीपण धन्यवाद या पाकृबद्दल.

पिलीयन रायडर's picture

2 Nov 2016 - 1:17 am | पिलीयन रायडर

अशानं कसाकाय शेफ बनणार मी!

=)) जाउ द्या. ते प्रोफेशनल फुड टेस्ट करायलाही लोक असतात ना? तुम्ही ते बना!

पेठकर काका, नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट पाकृ!

पिवळा डांबिस's picture

2 Nov 2016 - 1:25 am | पिवळा डांबिस

देव तुमचं भलं करो, पेठकरकाका!!
आपल्याला करता यायला हवं अशा आवडत असलेल्या पदार्थातला हाच राहिला होता...
कांदाभजी, बटाटवडे हे भारतात असतांना एका आवडीच्या श्टॉलवाल्याकडून शिकलो होतो.
मामलेदारची मिसळ तर तुम्हीच इथे मिपावर शिकवलीत ८-९ वर्षांपूर्वी! आता चांगली प्रॅक्टिस झालीये तिची.
पण चांगला समोसा मिळत नव्हता, इथे मिळणारे ठीक असतात पण भारतासारखे नाहीत.
आता ही रेसेपी वापरून करून बघतो आणि जर काही शंका आल्या तर तुम्हालाच विचारीन.
पुन्हा, अनेक धन्यवाद.

कुठाय मामलेदाराच्या मिसळीची रेसिपी? मला पण शिकायची आहे हो.. (पिरा मोड ऑन " जमली तर मिसळ नाही तर लेख " पिरा मोड ऑफ ) :प

काका, भन्नाट दिसतायेत सामोसे. इथे मिळतात ते फ्रॉड समोसे असतात. आता अस्सल समोसे घरी च करुन बघेन म्हणते.

मस्त पाकृ! समोसा बनवण्यासाठी मेहनत फार त्यामुळे कधी बनवले नाही!

अनन्न्या's picture

2 Nov 2016 - 1:02 pm | अनन्न्या

फोटेपण छान आलेत.

स्वाती दिनेश's picture

2 Nov 2016 - 2:06 pm | स्वाती दिनेश

आवडीचा पदार्थ, हल्ली ए फ्रा मध्ये करत असल्याने गिल्ट फ्रि खाता येतो. ;)
हे लखनवी समोसे पण एकदा करून पाहिले पाहिजेत. छान दिसत आहेत.
हे आमचे पंजाबी सामोसे
आणि ही आमची मा मि. अर्थात मामलेदार मिसळ
स्वाती

दोन्ही पाककृती पाहिल्या,पण धागा वर नाही आणला.

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2016 - 12:39 pm | स्वाती दिनेश

धागा वर नाही आणला तरी काही प्रॉब्लेम नाही, पाकृ पाहिल्यात ना.. बस. :)
स्वाती

पूर्वाविवेक's picture

2 Nov 2016 - 4:01 pm | पूर्वाविवेक

मस्तच !

रायनची आई's picture

2 Nov 2016 - 4:30 pm | रायनची आई

एक प्रश्न आहे..गव्हाचे पीठ वापरुन बनवले समोसे तर होतील ना नीट? नाहितर अर्धा मैदा आणि अर्धे गव्हाचे पीठ वापरले तर? कि फक्त मैदा वापरुनच बनवता येतात?

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2016 - 7:43 pm | प्रभाकर पेठकर

आवरण खुसखुशीत व्हायचे असेल तर मैदाच वापरावा लागतो. गव्हाच्या पिठाचे नाही होणार तसे.

पैसा's picture

2 Nov 2016 - 5:18 pm | पैसा

जबरदस्त प्रकार आहे! सामोशात एवढे प्रकार असतात हेच मुदलात माहीत नव्हते!

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2016 - 7:49 pm | प्रभाकर पेठकर

ह्या पुढेही,
पट्टी समोशात मलबारी समोसे, ज्यात बटाटा+पोहे+भरपूर कांदा असतो. तर उडप्यांच्या समोशात (पूर्वी मिळायचे हल्ली नाही दिसत कुठे) कांदा+नारळ+हिरवी मिरची+मटार आदी जिन्नस असतात.
नॉन-व्हेज समोशात (पट्टी आणि पंजाबी) मटण खिमा सारण प्रसिद्ध आहे तर मटण न खाणार्‍यांसाठी चिकन खिमा हा पर्याय गेल्या कांही वर्षात उपलब्ध झाला आहे.

राघवेंद्र's picture

2 Nov 2016 - 8:50 pm | राघवेंद्र

उडप्यांच्या समोशात (पूर्वी मिळायचे हल्ली नाही दिसत कुठे) कांदा+नारळ+हिरवी मिरची+मटार आदी जिन्नस असतात

असे सामोसे पुण्यात जोशी स्वीट्स (पूर्वीच्या पवित्रा हॉटेल च्या मागे ) आणि दुसरी शाखा सिंहगड रोड इथे मिळतात. मी नेहमी खात असायचो.

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2016 - 11:36 am | प्रभाकर पेठकर

आता पुण्यात आलो की नक्कीच जोशी स्वीट्सला (पूर्वीच्या पवित्रा हॉटेल च्या मागे) भेट देईन. असे पट्टी समोसे मलबारी समोशापेक्षा कितीतरी उजवे आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2016 - 11:33 am | प्रभाकर पेठकर

राघव८२, रेवती, प्रचेतस, पिंगू, सविता००१, सुरन्गी, कंजूस, अजया, टवाळ कार्टा, पाटीलभाऊ, सर्वसाक्षी, एस, पिलीयन रायडर, पिवळा डांबिस, स्रुजा, रुपी, अनन्न्या, स्वाती दिनेश, पूर्वाविवेक, रायनची आई आणि पैसा.
सर्वांनी पाककृती वाचून प्रतिक्रिया दिल्या बद्दल आभार.

ज्योति अळवणी's picture

5 Nov 2016 - 2:04 am | ज्योति अळवणी

तशी स्वयंकाची आवड नाही पण मला समोसे खूप आवडतात. कधी केले नाहीत. आता वाचल्यावर एकदा करावे वाटत आहे. तेव्हा नक्की करून बघीन.
धन्यवाद

सही रे सई's picture

5 Nov 2016 - 2:12 am | सही रे सई

सामोसा एकदा स्वतः घरी करून बघायची जबरदस्त इच्छा आहे. बघू आता कधी जमतंय ते. ही पाकृ तेव्हा कामात येईल. तो तळलेला कांदा मस्ट आहे का?

रमेश आठवले's picture

5 Nov 2016 - 7:40 am | रमेश आठवले

जबतक समोसामे आलू
तबतक बिहारमे राज करेगा लालू.

सामोसे खल्लास दिसताहेत. पण बटाटा, मटार आणि मैदा तिन्हीशी छत्तीस असल्याने पास !

पियुशा's picture

5 Nov 2016 - 3:49 pm | पियुशा

ज्बरा !

Maharani's picture

10 Nov 2016 - 7:03 pm | Maharani

Mastach