निरंक

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in लेखमाला
29 Oct 2016 - 12:13 am

निरंक
०१

मोठ्या कष्टाने त्याने पापण्या उघडल्या. खूप दिवसांनंतर. त्याला तरी निदान तसंच वाटलं.
आधी नुसतंच झावळ झावळ. मग हळूहळू दिसू लागलं.

छत? हो, छ्तच.

कुठे आहोत आपण?

हे काही आपलं घर नाही. छताच्या प्लास्टरचे असे पोपडे पडलेले. लोखंडी सळ्या अशा गंजत उघड्या पडलेल्या. छे! हे आपलं घर नाही!

त्याने मान वळवून पाहण्याचा प्रयत्न केला, तो ती एकदम ओढल्यासारखी झाली. गळ्याभोवती काहीतरी गुंडाळलेलं होतं. मग अचानक नाकात वळवळ झाली. तेसुद्धा जागं झालं. त्याने शिंक आवरायला हात नाकाकडे नेला, तोच तोसुद्धा कशानेतरी ओढला गेला. एकदम मोठा लोखंडी खडखड आवाज झाला. शिंक आलीच नाही. त्याने बुबुळं डोळ्यांच्या कोपर्‍याशी आणत त्या आवाजाकडे पाहण्याचा प्रयत्न केला.

सलाइन!

आता एकदम जोरदार ‘सूं...’ करून आवाज झाला. कानही मोकळे झाले. अचानक कोलाहल वाढला.

"डॉक्टरांना बोलवा. पेशंटला शुद्ध येतेय…” कोणीतरी बोलल्याचं त्याला ऐकू आलं. नव्हे, त्याने तसंच ऐकलं.

०२

“आता कुठे आहे तो माहीत नाही तुला, म्हणजे?”
मी खुर्चीतून थोडं उठत माझ्यासमोर बसलेल्या सुनयनाकडे पाहिलं.

सुनयना गप्पच होती. वरच्या ओठाने खालचा ओठ दाबत तिने आतापर्यंत माझ्यावर रोखलेली नजर बाहेर खिडकीकडे वळवली.

ही सुनयना तीच आहे का, दहा वर्षांपूर्वींची, जेव्हा मी आभाससाठी तिला ‘बघायला’ गेलो होतो त्याच्यासोबत. व्यक्ती तर तीच असते, पण आयुष्यात मिळालेले धडे, सुखदु:खाचे चटके माणसाच्या शरीरावर न मिटणारी नक्षी रेखाटतात. काळज्यांचे भार वाहून घेताना कणा पोक्त होत जातो. उत्तरोत्तर वाढत जाणार्‍या असाहाय्यतेतून आलेल्या सोशिकपणाच्या वलयाने चेहर्‍यावरचे तेज झाकोळून जातं. काही लोक यालाच शहाणपणाही म्हणतात. पण सुनयनासारखे लोक काळालाही फसवू शकतात, हे मला आता तिला पाहिल्यावर पटत होतं.

एक मोठा काळ मध्ये उलटून गेल्याचा तिच्यावर, निदान शरीरावर तरी काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता. एखाद्या गवयाने सतत रियाझ करून एखादी चीज घोटून घोटून पक्की करावी, तिला अजूनच खुलवत, लयबद्ध करत नेमक्या ‘जागा’ घ्याव्यात तशा चिजेप्रमाणे ती आता आणखीनच खुलून दिसत होती. चेहर्‍यावर बळेच आणलेले कठोर भाव सोडले, तर तिच्या पदराआडून दिसणार्‍या पोटाच्या थोड्याशा भागावरची थरथर अजून तशीच अवखळ होती. की त्यात दडवलेलं काहीतरी गुपित बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं? पहिल्या दिवशी होतं तेच एक कुलीन आकर्षण आजही तिच्यात होतं.

खरं सांगायचं तर हेवा वाटला होता मला आभासचा तेव्हा, असलं स्थळ कोणी मला का सुचवत नव्हतं याचा. पण आज त्याचीच कीव करावीशी वाटत होती. आठ वर्षं संसार करून नवरा एक दिवस बेपत्ता झाला. त्यालाही आता दोन वर्षं झाली तरी ह्या बाईला त्याचं काहीच नाही, म्हणजे? मला कळेच ना.

माझी गोष्ट वेगळी होती. गेली काही वर्षं मी कधी नामिबियात, कधी नाजयेरियात तर कधी मध्य आफ्रिकेतल्या आणखी कुठल्यातरी ‘ट्रबल्ड झोन’मध्ये इंटरनॅशनल रेडक्रॉसच्या पथकात काम करत होतो. त्यामुळे माझ्याशी सहज संपर्क होऊ शकला नसेल, हे ठीक होतं. पण आमच्या इतर कोणाच दोस्तमित्रांना हिने काहीच सांगू नये म्हणजे? इथे परत आल्यावर आभासचा कुठेच पत्ता नाही यावर विश्वास बसणंच कठीण होतं.

“तो पागल झाला होता! पागल!” ती अचानक त्वेषाने उसळत म्हणाली.

मी एकदम भानावर आलो.

“याउप्पर मी जास्त काही सांगू शकत नाही. तू त्याचा जीवश्चकंठश्च म्हणून एवढं तरी बोलले. नाहीतर आम्ही हा विषयही कधी काढत नाही. आणि तशीही ‘ह्यां’ची यायची वेळ झालीच आहे आता, सो प्लीज...” ती इतका वेळ खिडकीकडे पाहत नसून खिडकीशेजारच्या दरवाजाकडे पाहत होती, नव्हे मला सुचवत होती; माझ्या अचानक लक्षात आलं.

इथून आता अधिक काही माहिती मिळणं अशक्य आहे, हे ओळखून मी उठलो. पण जाताजाता कधीकाळी आभासचा फोटो असायचा, त्या शो केसमधल्या फ्रेममध्ये सुनयनाच्या नव्या ‘ह्यां’चा फोटो मी नीट पाहून घेतला.

०३

“बस! बस! साएब... थांबवा अथीच गाडी. तो पा तो आला बाबाजीचा मठ!”

बाजूला बसलेला म्हातारा गणपत म्हणाला. मी ब्रेक मारला. गणपतने उतरताना दार जोरात ढकलल्याने आमच्या ‘एट हंड्रेड’वर केव्हाची चिकटलेली हिवाळी धूळ उडाली. त्या आवाजाने समोरच्या नाल्यात एका दगडावर निवांत बसलेल्या बगळ्याने थोडं मान वर करून पाहिल्यासारखं केलं आणि तो पुन्हा आपल्या ध्यानाला लागला.

“उतरा आता साएब! गाडी इथलोकच येते. आता तुम्हाले ह्या नाल्यात उतरूनच पलीकडे जा लागंल. आस्ते आस्ते जा बापा. मी निंगतो आता. ढोराइचं चरून झालं असंल. माह्यीच वाट पाह्यत असतीन ते बुढा कुठं गायब झाला म्हून.” गणपत हसत म्हणाला.

“नक्की तेच आहे का?” मी कारच्या खिडकीतून वळतच विचारलं.

“काय म्हाईत बॉ, पन गावातलं आखरी घर तं थेच!” गणपत चपला वाजवत निघून गेला. मी गाडीतून न उतरताच नाल्याचा पलीकडे पाहू लागलो. शेणाने सारवलेलं एक खोपटं तिथून दिसत होतं....

....हे गाव म्हणजे आभासचं मूळ गाव. पण गेल्या कैक पिढ्यांपासून त्यांचं इथे कोणी नाही. मागे एकदा कधीतरी बोलता बोलता त्याच्याकडून ऐकलं होतं. कोणाला सुचलंच नव्हतं इथे एक चक्कर मारून पाहायचं. नुसतं गावाचं नाव माहीत असून काय झालं, इथवर पोहोचणं सोपं होतं का माझ्यासाठी? गूगल मॅप काही इतका प्रगत झाला नाही अजून. गावच्या पारावर, काली-पिली स्टँडवर, न्हाव्याच्या दुकानात, पानपट्टीवर सगळीकडे विचारत हिंडावं लागलं. असला शहरी माणूस कुणीच नाहीये म्हणे गावात. त्यांचंही बरोबर होतं म्हणा. जंटलमन माणूस का लपून राहू शकतो का असल्या छोट्याशा खेडयात? गणपत भेटला फाट्यावर, म्हणून बरं. नाहीतर हे शेत आणि हे घर मला कधीच सापडलं नसतं. गावातलं हे असलं जुनं खोडच शेवटी कामी येतं...

“...आडनाव काय सांगतलं तुमी?” मी पुन्हा एकदा गणपतला आभासचं नाव-आडनाव सांगितलं. फोटो दाखवला. दिवसभर आता तेच ते सांगून मला कंटाळा आला होता. आता हा शेवटचा दगड, मी ठरवलं होतं.

गणपतने जरा वेळ विचार केला. त्याची ट्यूब फडफडत होती, पण पूर्ण लागत नव्हती. मग त्याने सावकाश बंडीच्या खिशात ठेवलेली चंची बाहेर काढली. चिमूटभर तंबाखू आणि नखभर चुन्याचं मन:पूर्वक मीलन केलं. थोडी मलाही ‘ऑफर’ केली, पण मी नाही म्हटल्यावर मग त्याने ती गोळी सावकाश तोंडात टाकली. मग त्याची ट्यूब लखकन् पेटली.

“अर्रर्र...हौ सायेब! याद आलं. त्यायची जमीन होती अथी - कूळकायद्यात गेलेली. मंग ती कोनीतरी दोन दोन लोकायले इकली. खूप बरस झाले आता याले. थे जमीन्तं कोरटात जमा हाये. बराबर. गावच्या बाहेर. नाल्याचा काठी. सिरस्काराच्या वावराले लागून. एक साधूबाबा राह्यते बॉ तथी एका झोपड्यात, दोन बरस झाले. कुकडून आला, नाव गाव काय कोनाले म्हाईत नाई. कधी कधीच दिसते फक्त पान्याले आला की नाल्यावर. चाला, घीऊन चालतो तुमाले त्या बाबाजीच्या मठालोक!” ......

......नाल्यातल्या गोट्यांवरून तोल सावरत सावरत मी पलीकडे पोहोचलो. हिवाळ्यातला तो लहानसा दिवस काढता पाय घेत होता. कंटाळवाणी रात्र सुरू व्हायच्या आत मला आजच्या दिवसाचा काहीतरी निकाल लावून परतायचं होतं. मी पुन्हा एकदा खिशात टॉर्च असल्याची खातरी करून घेतली आणि झपाझप त्या पाऊलवाटेवरनं चालू लागलो. ही पाऊलवाट नक्की त्या झोपडीतल्या माणसाचीच होती. इतक्या निर्जन ठिकाणी कोण येणार होतं?

झोपडीभोवतालचं काटेरी कुंपण बाजूला करून मी झोपडीच्या अंगणात आलो आणि थबकलो. माझ्यासमोर एक माणूस पाठमोरा बसून समोरच्या वाफ्यात उगवलेलं काहीतरी उपटत होता. साध्या पाण्यात धुतलेला पांढरा सदरा, वार्‍यावर भुरूभुरू उडणारे केस. गळ्यापर्यंत रुळलेली दाढी. मी घसा खाकरला, तसा तो माणूस अचानक थांबला. सावध झाला, कसलातरी कानोसा घेत असल्यासारखा. त्याने मान मागे वळवली -

एकवेळ माणसाला दाढी-मिशा येतील वा जातील... गाल उतरतील.. दात पडतील.. चेहर्‍यावर सुरकुत्यांच्या घड्या पडतील.. गोर्‍याचा रंग काळा होईल तर कधी सावळा माणूस गोरा होईल. पण डोळे, ते मात्र सहसा बदलत नाहीत.

तो आभासच होता.

फार नाही, फक्त दोनेक वर्षांपूर्वींपर्यंत रिझर्व बँकेत सांख्यिकीतज्ज्ञ असलेला! नक्की तोच होता!

०४

“हॅलो अंकल? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय का?” रेसिडेंट डॉक्टर नमिताने तिच्यासमोर गेल्या चार दिवसांपासून बेशुद्ध पडून असलेल्या पेशंटला विचारलं.

“हम्म...” त्याने क्षीण होकार भरला आणि एक एक शब्द गोळा करत म्हणाला, “पण मी इथे? काय झालंय मला? मी असा इथे, हॉस्पिटलमध्ये कसा आलो डॉक्टर?”

“काही नाही. एक छोटासा अॅक्सिडेंट झाला होता तुमचा.” डॉ. नमिता हातातली पेशंटची हिस्टरी शीट चाळत म्हणाली. “सिस्टर, अजून नाव लिहिलं नाहीये तुम्ही यांचं? पोलिसांनी काही कळवलं नाही का? कुणी नातेवाईक?”

नर्सने नकारार्थी मान डोलवली.

“असू दे. आता आपण त्यांनाच विचारूच शकतो, नाही का? तुमचं नाव काय अंकल?”

“आभास... आभास अष्टपुत्रे.”

डॉ. नमिताने तिच्या हातातील शीटवर ते नाव खरडलं. “गुड! सिस्टर, ह्यांचा अॅड्रेस, घरचा काँटॅक्ट नंबर लिहून घ्या आणि मला आणून द्या. डॉ. रुहाटिया थोड्या वेळात येतीलच, त्यांना सांगायला हवं.” डॉ. नमिता दुसर्‍या पेशंटकडे वळत म्हणाली.

०५

“...नो नो! जिग्नेश, डोंट गो फॉर रिलायन्स! डॉ. अगरवाल अॅड्व्हाईज्ड मी टू बाय एस्सार इन ऑइल सेक्टर... ओके.... व्हॉट?... हाउ मच?... या... या... डन! अँड व्हॉट अबाउट कमोडिटी फ्युचर्स? थोडी टर्मेरिक और धनियाकी पोझिशन देखो और बताओ. आय सी गुड ऑप्शन्स देअर.... या... आय अॅम नाऊ इन जीएमसी ओपीडी... आय विल बी इन क्लिनिक इन अनादर हाफ अॅअन अवर. ओके? बाय.”

डॉ. रुहाटियांनी सेलफोन बंद केला आणि आभासकडे वळले.

“युअर रिपोर्टस आर फाइन, मिस्टर आभास.” डॉक्टरांनी केसपेपर्सवर काहीतरी खरडून त्यांच्यापुढे कधीपासून ताटकळलेल्या आभासच्या समोर त्याचे मेडिकल रिपोर्ट्स सरकवले, “तुम्हाला डिस्चार्ज करायला लिहिलंय, फाइन?”

आभासने त्या कागदांवर नजर टाकली...

हिमोग्लोबिन, फास्टींग ब्लड शुगर, पी.पी. ब्लड शुगर वगैरे ओळखीचे शब्द त्याला दिसले. त्यापुढे नॉर्मल व्हॅल्यूज आणि ऑब्सर्वड व्हॅल्यूजचे दोन कॉलम. पण ते दोन्ही कॉलम रिकामे होते. सरकारी प्रिंटर्स ते, नीट छापले गेले नसावे, त्याला वाटलं. त्याने ते कागद उचलून अगदी डोळ्यांजवळ आणून पाहिले. तरीही व्हॅल्यूजचे कॉलम रिकामेच. त्याने पान उलटलं, तिथेही तेच. फटाफट पानं उलटली. कागद उलटसुलट केले. प्रत्येक पानावर तोच प्रकार. त्याने डोळे चोळून पाहिलं, तरी तेच. मग आळीपाळीने एक एक डोळा बंद करून वाचायचा प्रयत्न केला, तरीही तेच. तो प्रचंड अस्वस्थ झाला. काय झालंय डोळ्यांना आपल्या? अपघाताने आपली दृष्टी गेली की काय?

“डॉक्टर....!” त्याने नजरेसमोरचे ते कागद खाली करून समोर पाहिलं. पण तोवर डॉ. रुहाटिया आपल्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जाण्यासाठी निघून गेले होते.

पण त्याच्या लक्षात आलं होतं.

त्याला अक्षरं लागत होती, पण त्यापुढचे आकडे मात्र दिसत नव्हते.

०६

“....आकडे न दिसणारा माणूस काहीच कामाचा नसतो प्रशांत. आणि नवरा तर नाहीच नाही. अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हेच कळत नसेल तर काय उपयोग, नाही का? जिथे मला माझं आडनावच कळत नाही, विथ्ड्रॉवल स्लिप भरता येत नाही की एटीएमचं पिन आठवत नाही की माईंड अनसाउंड आहे म्हणून मी केलेलं मृत्युपत्र कायद्याने ‘नल अँड व्हॉईड’ आहे, तिथे तिने मला टाकून दिलं, हे बरंच झालं म्हणायचं. मी तरी एका पाशातून मुक्त झालो.” आभास शेणाने सारवलेल्या जमिनीत अडकलेल्या एका मेलेल्या खोडकिड्याला नखाने उकरत किंचितशा उद्वेगाने म्हणाला. “माहीत आहे, या किड्यासारखे आपण सर्व जण अडकलो आहोत या आकड्यांच्या जंजाळात.”

सुनयनाबद्दल विचारून त्याच्या नकोशा आठवणींना आपण उगीच उजाळा दिला, याचं माझं मलाच अपराधी वाटत होतं. पण त्याचा चेहरा निर्विकार होता.

“हम्म.. पण इथे असं जंगलात राहून तू काय करणार? चल परत माझ्याबरोबर.”

“अंहं... आता मला अशक्य आहे तिथे जगणं. मला पैसे कळत नाही की हिशेब करता येत नाही. आणि तसंही तुमच्या त्या जगात तरी काय आहे मिरवण्यासारखं? नुसते आकडे? वाहनांचे नंबर्स, लिफ्टमध्ये इमारतींचे मजले दाखवणारे आकडे, बसचा रूट दाखवणारे नंबर्स, ट्रेनचे नंबर्स, प्लॅटफॉर्मचे नंबर्स, बँक खात्यांचे नंबर्स, त्यातल्या बॅलन्सचे आकडे, परीक्षांचे मार्क्स, चेक्सचे क्रमांक, क्रेडिट कार्डचे नंबर्स, असंख्य फोन नंबर्स, निवडणुकीतले मतांचे आकडे, तारखांचे आकडे, पॅन कार्ड-आधार कार्डांचे नंबर्स. नोटांवरचे आकडे. शेअर्सच्या किंमतींचे आकडे. लॉटरीचे आकडे. मटक्याचे आकडे. बीपी-शुगर लेवलचे आकडे. डॉक्टरांच्या फीयांचे आकडे. अपघातात मेलेल्यांचे आकडे. नेत्यांनी खालेल्या पैशाचे आकडे. ऑफिसात हाताळायचा दुनियाभरचा डेटा. आकड्यांनी भरून वाहणा‍री एक्सेल शीटस. अगणित चार्ट. प्रोजेक्शन्स, मॅथमॅटिकल-स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग. घरी तेच, दारी तेच. कामावर तेच, सुट्टीतही तेच. आकडे... आकडे... आकडे! नुसता आकड्यांचा खेळ, ज्यातला एकही आकडा आता मला दिसत नाही. किती भाग्यवान आहे मी! आकडे कसे असतात तेही मला आठवत नाही. आणि त्याची मला गरजही नाही. तसंही माणसाला जगायला करावं तरी काय लागतं?” बोलता बोलता तो उठला आणि खोपटाच्या बाहेर आला. मीसुद्धा त्याच्यामागोमाग आलो.

“बघ. इथे काय कमी आहे, सांग? भरपूर पाणी आहे. अंगणात ही भाजीपाल्याची झाडं लावली आहेत. माझी बकरी आता बाहेर चरायला गेलीय. येईलच इतक्यात. खरं म्हणजे मीच तिचा आहे. एक दिवस कुठून तरी वाट चुकून इकडे आली आणि इथेच राहिली. तिचं थोडं दूधही मिळतं कधी इच्छा झाली तर. आता हा सदरा, मला घरून हाकलून दिलं त्या दिवसापासूनचा आहे खरा. पण तो बघ कापसाचा ढीग. सूत कातून पंचा बनवणं काही कठीण नाही. आजूबाजूला एक चक्कर मारली की शेण मिळून जातं, जळण मिळून जातं. कधी एखादं फळही मिळून जातं. काही दिवस देवळात झोपलो खरं. नंतर हे कुडाचं खोपटंही मीच बांधलं. जोवर कुणी पुन्हा हाकलत नाही, तोवर इथेच राहायचं, दुसरं काय? एकंदरीतच माझं छान चाललंय. का येऊ मी तुमच्या त्या कृत्रिम जगात?” तो माझ्याकडे पाठ वळवून उकिडवं बसला आणि वाफातल्या तुरीच्या कोवळ्या शेंगा खुडू लागला, मघाशी त्याला मी पहिल्यांदा पाठमोरं पाहिलं, त्याच निर्विकारपणे.

०७

आभास मला सोडायला नाल्यापर्यंत आला. पण तिथेच थांबला. मी नाला ओलांडला व टॉर्चच्या मिणमिणत्या प्रकाशात झपाझप चालू लागलो. अंधार वाढला होता. मला आता तिथून निघून जायची घाई झाली होती. गाडीपर्यंत पोहोचलो, तो गाडीवर आणखी धूळ साचलेली मला दिसली. गाडीतलं कापड काढून मी काच पुसली. बॉनेट पुसलं. खाली सरकत माझा हात नंबर प्लेटपर्यंत आला. ती तर मातीने पूर्ण माखली होती. गाडीचा नंबर काय आहे हे कळतही नव्हतं. माझा हात आपोआपच पुढे गेला, पण मग मध्येच थांबला.
*
मी गाडी स्टार्ट करून माझ्या परतीच्या रस्त्याला लागलो. खिडकीतून एकदा मागे वळून पाहिलं. मला पुन्हा एकदा आभासचा हेवा वाटला होता.

-------
.
1
.
- अभिषेक अनिल वाघमारे, नागपूर

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2016 - 7:40 am | बोका-ए-आझम

सुरुवात आणि शेवट, विशेषतः शेवट तर मस्त जमलेला आहे. निरंक शब्द समजला नव्हता पण कथा वाचल्यावर तो चपखल बसतो. फारच छान!

ए ए वाघमारे's picture

2 Nov 2016 - 4:40 pm | ए ए वाघमारे

धन्यवाद!

निरंक हा आमच्या सरकारी मराठीतला नित्याचा शब्द आहे. निरंक म्हणजे-निल NIL

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 Oct 2016 - 2:40 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खुप छान. निरंक चा निराळा अर्थ कळला.

मित्रहो's picture

29 Oct 2016 - 3:21 pm | मित्रहो

मला निरंक हा शब्द माहित नव्हता. आता तो शब्द आणि त्याचा एक अर्थ कळला

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 9:12 pm | यशोधरा

मस्त!

मितान's picture

31 Oct 2016 - 9:48 pm | मितान

छान कथा !

पैसा's picture

31 Oct 2016 - 10:39 pm | पैसा

शेवट तर अगदी भयंकर आवडलाय! मस्त लिहिताय!

मनिमौ's picture

1 Nov 2016 - 1:57 pm | मनिमौ

कथा आवडली

सस्नेह's picture

2 Nov 2016 - 4:31 pm | सस्नेह

आणखी थोडी विस्ताराने यायला हवी होती.
चित्रही चपखल !

ए ए वाघमारे's picture

2 Nov 2016 - 4:39 pm | ए ए वाघमारे

हमम्....पण आळस आणि व वेळेचा अभाव आड येतो.
एवढी कथा लिहायला मला दोन वर्षे लागली.

ए ए वाघमारे's picture

2 Nov 2016 - 4:37 pm | ए ए वाघमारे

सर्व प्रोत्साहकांचे आभार!

पिलीयन रायडर's picture

2 Nov 2016 - 6:58 pm | पिलीयन रायडर

छान लिहीली आहे. थोडी विस्ताराने चालली असती खरं तर. शैली उत्तम आहे तुमची.

अमितदादा's picture

3 Nov 2016 - 12:12 am | अमितदादा

छान.... आवडली.

विचित्रा's picture

3 Nov 2016 - 6:41 pm | विचित्रा

आणि चपखल शीर्षक

निओ's picture

4 Nov 2016 - 11:22 pm | निओ

आवडली.

रुपी's picture

8 Nov 2016 - 12:09 am | रुपी

वेगळीच कथा.. आवडली.

शलभ's picture

8 Nov 2016 - 2:59 pm | शलभ

आवडली कथा

अलका सुहास जोशी's picture

19 Nov 2016 - 3:08 pm | अलका सुहास जोशी

आवडली कथा.

संजय पाटिल's picture

19 Nov 2016 - 3:36 pm | संजय पाटिल

कथा आवडलि, निरंक.. नविन शब्द कळला..

शशिधर केळकर's picture

20 Nov 2016 - 8:33 pm | शशिधर केळकर

निरंक कथा छान जमली आहे.
पण सुरू होता होता संपली सुद्धा असे वाटले! एकाद्या मोठ्या गायकाचा ख्याल ऐकायला बसावे, आणि अचानक गाणे संपावे तसे काहीसे झाले.
असो. अजून येऊ द्या.

संदीप डांगे's picture

20 Nov 2016 - 9:18 pm | संदीप डांगे

क्लास!

निशाचर's picture

22 Nov 2016 - 2:59 am | निशाचर

कथा आवडली.

गामा पैलवान's picture

22 Nov 2016 - 6:53 pm | गामा पैलवान

अ.अ.वा.,

गोष्ट आवडली. धन्यवाद! :-)

शेवटी या व्याधीचं नाव शोधायची हुरहूर लागून राहिली. सापडलं नाव विकीवर : https://en.wikipedia.org/wiki/Dyscalculia

आ.न.,
-गा.पै.

ए ए वाघमारे's picture

23 Nov 2016 - 9:01 am | ए ए वाघमारे

धन्यवाद !

Dyscalculia हे मलाही माहीत नव्हतं. मी मेडिकल दृष्टीने नव्हे तर एक फॅण्टसी म्हणूनच लिहिलं होतं.

पिंगू's picture

23 Nov 2016 - 10:14 am | पिंगू

कथा आवडली..

कथा आवडली.. पुढील लिखाणाला शुभेच्छा..!!