धाडसी बँक दरोडा
सात ऑक्टोबर १९२३ची सुस्तावलेली सकाळ. न्यूयॉर्क, ब्रुकलीनमध्ये ८६व्या स्ट्रीटजवळील विसाव्या अॅव्हन्यूवर असलेल्या वेस्ट एंड बँकेत नेहमीप्रमाणे सुरळीत व्यवहार सुरू होते. पण एका रिकाम्या काउंटरजवळ दोन तरुण हळू आवाजात आपापसात बोलत होते. बँकेत लोक येत होते, जात होते, कुणी पैशांचा भरणा करीत होते, तर कुणी पैसे बँकेतून काढून घेत होते. त्यामुळे या दोन तरुणांकडे कोणाचेही लक्ष असण्याचे कारण नव्हते. तिन्ही कॅशियर पैसे देण्याघेण्यात मग्न होते. कोर्या करकरीत नोटांच्या मोजण्याचे आवाज येत होते. त्यामुळेच कुजबुजत बोलणार्या ह्या दोन तरुणांकडे कोणाचे लक्षच नव्हते. अर्थात जर कुणी बारकाईने ह्या दुकलीकडे लक्ष दिले असते, तर त्यांना शंका आली असतीच. चला तर, आपण पाहू या, हे तरुण हळू आवाजात काय काय गप्पा मारीत होते. कारण अशा गप्पांतूनच ह्या शहरात घडणार्या मोठमोठया गंभीर गुन्ह्यांची बीजे सापडू शकतात. अन्यथा गंभीर गुन्हे घडत राहतात, लोक काही दिवस चर्चा करतात आणि विसरून जातात. आता हे संभाषण आमच्यापर्यंत कसे पोहोचले हे एक रहस्य आहे आणि ते रहस्यच असू द्या. ह्या रहस्याचा खुलासा योग्य वेळी आम्ही करणारच आहोत, तूर्तास तुम्ही ते नुसते ऐका.
“तर टोनी, तू ह्या बँकेत पूर्वी काम करीत होतास? मग मला सांग, पैसे ट्रान्स्फर कसे केले जात होते?“ एकाने दुसर्यास विचारले.
"त्याचं काय आहे, सर्व रक्कम एकत्र झाली की बँकेचे दोन कर्मचारी बँकेतून निघून कोलंबिया ट्रस्ट कंपनीच्या आयर्विंग शाखेत जमा करतात.” दुसरा तरुण उत्तरला.
“तेथे घेऊन जाण्याचे कारण काय?“ पहिल्याने विचारले.
“तेथे रक्कम सुरक्षित ठेवली जाते.“ टोनी म्हणाला.
“हं, असे आहे तर! पण ही रक्कम कोण घेऊन जातो?“ पुन्हा पहिल्याने विचारले.
"अं, बार्लो नावाचा साठ-पासष्टचा एक म्हातारा आहे, जो रिटायर्ड पोलीस आहे आणि दुसरा मायकेल नावाचा तरुण पोरगा आहे.“ टोनीने उत्तर दिले.
"टोनी, तुझ्याकडे कार आहे?" पहिल्याने विचारले.
"हो, माझी कार बाहेर उभी आहे." टोनी म्हणाला.
"बरं, मला एक सांग, खरंच दररोज इतकी मोठी रक्कम ते ट्रान्स्फर करतात?" पहिल्याने पुन्हा विचारले.
"मग! कधी पन्नास हजार असतात, तर कधीकधी एक लाखसुद्धा असतात. पण मला एक सांग, हे सगळं तू कशाकरिता विचारीत आहेस?" टोनीने विचारले.
"काही नाही रे, आपलं सहजच विचारतो." पहिला म्हणाला.
टोनीच्या कारमधून ते दोघे ब्रुकलीन सिटीच्या ट्राफिकमधून वाट काढत ईस्ट रिव्हर क्रॉस करून मॅनहॅटनच्या उत्तरेकडे असलेल्या ब्राँक्सवरून विल्यम्स ब्रिज रोडच्या बाजूला लाल रंगाच्या एका बंगल्यापुढे थांबले. टोनी आणि त्याच्याबरोबरचा तरुण त्या बंगल्यात शिरले. बंगला टुमदार होता आणि म्हणूनच त्यावर आजूबाजूला राहणार्यांचा डोळा होता. पण त्या बंगल्यात कोण राहतो, कोण येतो, कोण जातो ह्याविषयी काही कोणाला स्वारस्य नव्हते.
"हॅलो जो, कसा आहेस?" आत शिरल्या शिरल्या अनेकांनी त्यांचे स्वागत केले.
"हॅलो मित्रांनो, फाईन." जो म्हणाला, "हे बघा, तुम्ही याला ओळखता ना? हा टोनी आहे आणि पूर्वी हा वेस्ट एंड बँकेत नोकरी करीत होता. तोच तुम्हाला सांगेल की बँकेतून पैसे कसे ट्रान्स्फर होत असतात."
"हो, हो, टोनीला आम्ही ओळखतो." दोघे-तिघे एकदम म्हणाले.
तेवढ्यात एक तरुण मुलगा, जो टोनीला घेऊन आलेल्या तरुणाचा भाऊ होता, पुढे आला आणि म्हणाला, "हाय ब्रदर! खरंच टोनी आपल्याला वेस्ट एन्ड बँकेत किती माल आहे हे सांगेल. चल टोनी, बोल पटकन."
पहिला तरुण टोनीला म्हणाला, ”हं, बोल टोनी, लवकर सांग.”
टोनी म्हणाला, ”एक मिनिट, हे नेमकं काय चाललं आहे हे कोणी मला सांगेल काय?"
एवढ्यात समोरचा एक मुलगा पुढे आला आणि त्याने एक पिस्तूलच टोनीच्या पोटात खुपसले आणि जरबेच्या स्वरात म्हणाला, "हे बघ, बँकेतून पैसे घेऊन कोण कोण जातो, केव्हा निघतात, कोठे जातात हे सर्व तू आम्हाला सांगणार आहेस. आणि जर तू आता काही बोलला नाहीस, तर तुझी बोलती कायमची बंद करीन, काय समजलास?"
या गोष्टीला पाच आठवडे झाले. १३ नोव्हेंबर १९२३ची सायंकाळ होती. विल्यम बार्लो हा न्यूयॉर्क पोलीस दलातून निवृत्त झालेला, ६४ वर्षांचा, सेवानिवृत्तीनंतर वेस्ट एंड बँकेत रनर म्हणून काम करीत होता. आत्ता ह्या क्षणी तो ब्रुकलीनमधील आपल्या घरी आरामखुर्चीत आराम करीत होता. त्याच्या हातात सायंकाळचा पेपर होता. पहिल्याच पानावर ब्रुकलीन येथील वार्ड बेकिंग कंपनीच्या प्लँटमधील कॅशियरला - मॉर्गन मोरिसनला तीन बदमाशांनी पगाराच्या १८,००० डॉलर्सच्या रकमेला कसे लुटले होते याची हकीकत छापून आली होती. बातमी वाचून त्याने पेपर खाली ठेवला आणि तो आपल्या पुतण्याला - जिमीला म्हणाला, "जिमी, मी बँकेचे पैसे घेऊन जाताना जर कोणी मला गंडवण्याचा प्रयत्न केला ना, तर त्याला मी असा धडा शिकवीन की त्याला जगणे कठीण होऊन जाईल." स्वप्नात असल्याप्रमाणे बार्लो म्हणाला, "माझ्यावर अशी वेळ आली की बघच तू मी काय करीन ते..."
दुसर्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता, पहिल्या महायुद्धात भाग घेतलेला २४ वर्षांचा तरणाबांड मायकेल, बँकेत कॅशियर विल्यम जेरमीनच्या केबिनमध्ये शिरला. जेरमीन त्याला म्हणाला, "ओ भाऊ, जरा स्वतःची काळजी घेत चला. कालची वार्ड बेकिंग कंपनीची भानगड काही चांगली वाटली नाही." मायकेल आणि बार्लो दोघेही हसू लागले आणि त्यांनी सहज आपल्या पँटच्या मागच्या खिशावर हात ठेवून अभावितपणे आपले पिस्तूल चाचपले. जेरमीनने ४३,५०० डॉलर्सच्या नोटांच्या गड्ड्या नीट रचून मायकेलच्या हातात सोपविल्या. मायकेलने जुन्या रद्दीच्या पेपरमध्ये त्या गुंडाळल्या. त्यावर तेलाने माखलेले एक जुने फडके असे गुंडाळले, जेणेकरून कोणालाही वाटेल की आतमध्ये पकड, पाना, स्क्रू ड्रायव्हर वगैरे हत्यारे असतील. बार्लोने जुन्या रद्दी पेपरच्या घड्या आपल्या नेहमीच्या कातडी बॅगेत अशा पद्धतीने ठेवल्या की पाहणार्याला वाटावे की खरोखर ह्याच्याकडेच काही मुद्देमाल आहे. अशी ही युक्ती ते बरेच दिवसापासून करायचे आणि त्यांना असे वाटायचे की ह्या युक्तीने चोरांना ते सहज गुंगारा देऊ शकतात.
दोघेही बँकेतून बाहेर पडले. बार्लो मायकेलच्या पुढे वीसेक पावलांवर चालत होता. मायकेल मुद्दामच थोडा मागे असायचा. त्या दोघांचा व बँकेच्या अधिकार्यांचा हेतू असा की बार्लोजवळ कॅश आहे असे समजून जर कोणी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर मागून मायकेल त्यावर प्रतिहल्ला करू शकेल. दोघेही रनर अजूनही वीस फुटांचे अंतर ठेवून ८६व्या स्ट्रीटवरील विसाव्या अॅव्हन्यूच्या जवळच्या उन्नत (Elevated) रेल्वे स्टेशनवर जिन्याने वर चढून प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले. रेल्वे डब्यात चढतानासुद्धा ते एकमेकांशी ओळख नसल्याचे दर्शवत चढले व डब्यातसुद्धा, जवळजवळ न बसता दोन्ही विरुद्ध टोकाकडे बसले. त्यांचे उतरण्याचे ठिकाण होते ४५ स्ट्रीट व उट्रेच अॅव्हन्यूचा कोपरा, जेथून ते दोघेही ५३ स्ट्रीटपर्यंत सात मिनिटात पायी जात असत. ५३ स्ट्रीट व उट्रेच अॅव्हन्यू येथे आयर्विंग बँक कोलंबिया ट्रस्ट कंपनीत त्यांना रक्कम पोहोचवायची असते.
आता ज्या क्षणी ८६ स्ट्रीट २० अॅव्हन्यू याच नावाच्या स्टेशनपासून 'D' ट्रेन सुरू होत होती, त्याच क्षणी इकडे ४५ स्ट्रीट व उट्रेच अॅव्हन्यूच्या फोर्ट हेमिल्टन पार्क वे या नावाच्या दुसर्या स्टेशनवरून खाली जाणार्या जिन्याजवळ, रस्त्यावर उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या कॅडिलॅक कारमधून एक उंचसा व एक काहीसा बुटका असे दोन तरुण उतरले आणि जिन्याने चढून प्लेटफॉर्मवरील वेटिंग रूममध्ये लपून बसले. दोघांच्या हातात रिव्हॉल्वर होते. तिसरी व्यक्ती कारमध्येच बसून होती आणि गाडीचे इंजीन सुरूच ठेवण्यात आले होते. इतकेच काय, त्या व्यक्तीने आपला पायसुद्धा अॅक्सिलेटरवर ठेवला होता. एका झटक्यात तेथून पळ काढण्यासाठीच एवढी जय्यत तयारी करण्यात आली होती. कॅडिलॅक कारच्या मागे पाच-सहाशे फुटांवर आणखी एक कार उभी होती. त्या कारचेसुद्धा इंजीन सुरूच ठेवण्यात आले होते आणि ड्रायव्हिंग सीटवरील माणसाचे लक्ष थेट लाल रंगाच्या कॅडिलॅक कारवरच होते, पण तो जणू सिग्नल बदलण्याची वाट पाहत असल्याचे भासवत होता. एका भयंकर कट-कारस्थानाच्या अंमलबजावणीसाठी अशी ही जय्यत तयारी केली गेली. स्टेशनवर येणार्या जिन्याच्या पायथ्याशी कोणीही प्रवासी नव्हता.
थोड्याच वेळात दोन्ही रनर्सना घेऊन येणारी ट्रेन स्टेशनमध्ये शिरली. काही प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याच्या तयारीत होते. अजूनही ‘ते’ रिव्हॉल्वरधारी दोघे तरुण वेटिंग रूमच्या बाहेर आले नव्हते. तिकीट खिडकीच्या आतील क्लार्क मिसेस देग्मार वेन्देट आपली कॅश मोजण्यात मग्न होत्या. स्टेशनवर जाणार्या जिन्याच्या पायथ्याशी जेकब नावाचा इलेक्ट्रिक वस्तूंचा डीलर जिन्याच्या वरच्या टोकाकडे पाहत होता.
कर्णकर्कश आवाज करीत ट्रेन थांबली. एकूण पाच प्रवासी - दोन पुरुष, एक महिला व बँकेचे दोघे रनर्स ट्रेनमधून उतरले. रनर्स सर्वात शेवटी उतरले. प्रथम दोघे पुरुष प्रवासी झपझप चालत, जिना उतरून निघूनसुद्धा गेले. महिला आणि दोघे रनर्स अजून वेटिंग रूमकडे जात होते. महिला मिसेस बेटली बर्मन यांनी दोघा तरुणांना हातात रिव्हॉल्वर घेऊन वेटिंग रूमच्या बाहेर जोरात येताना पाहिले. त्यातील एक जण ओरडला, “ते बघ ते दोघे, उडव लवकर!!” ती धमकी ऐकताच मिसेस बर्मन एकदम धावत सुटली. बार्लो जिन्याच्या दरवाजाजवळ दहा फुटांवर पोहोचला नसेल, तेवढ्यात उंच तरुणाने रिव्हॉल्वरमधून बार्लोवर गोळ्या झाडल्या. पहिली गोळी बार्लोच्या गालामध्येच घुसली. पुढच्या दोन्ही गोळ्यांपैकी एक डाव्या दंडात घुसली, तर दुसरी छातीत घुसली. बिचारा बार्लो अचानक झालेल्या हल्ल्याने जमिनीवर कोसळू लागला. त्याने मागच्या खिशाकडे हात नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच त्याचा प्राण गेला.
गोळ्या झाडणार्याने कातडी बॅग उचलली. एकीकडे ही भयंकर घटना घडत होती, तेव्हा त्या बुटक्या इसमाने मायकेलवर समोरून गोळी झाडली. ती सरळ मायकेलच्या छातीतच घुसली. मायकेल अडखळला. बुटक्याने अंदाधुंद गोळ्या झाडल्या, पण त्यांची गरजच पडली नाही. त्या एकाच गोळीने मायकेल जमिनीवर कोसळला. मळक्या तेलाच्या कपड्यातील माल त्याच्या थरथरणार्या हाताजवळच पडला होता. "अरे देवा, परमेश्वरा" असे म्हणतच त्याने प्राण सोडला.
मायकेलला मारणार्या बुटक्याने, त्याच्या हाताजवळ पडलेले तेलकट मळक्या कपडयातील पुडके उचलले आणि झटक्यात जिना उतरत जेकबला ओलांडून धावत सुटला आणि त्याच्या जोडीदारापाशी पोहोचला. मिसेस बेटली बर्मन तर चक्कर येऊन तिथेच बेशुद्ध पडली. इंजीन सुरू असलेल्या अवस्थेत जी कार रस्त्यावर उभी होती, तिच्या ड्रायव्हरने गोळी झाडल्याचा पहिला आवाज ऐकताच, कारचे मागील दोन्ही दरवाजे उघडून ठेवले होते. हातात पुडके घेऊन दोन्ही हल्लेखोर विद्युतवेगाने खाली धावले, कारमध्ये बसले आणि क्षणात कार ५५ स्ट्रीटच्या दिशेने निघालीसुद्धा! काय झाले असावे याचा जेकबला दोन-तीन सेकंदात अंदाज आला, म्हणून तो मोठ्याने ओरडू लागला.
नाथन बार्जचे सिल्कच्या कपड्यांचे दुकान जिन्याजवळच असल्याने, गोळीबाराचा पहिलाच आवाज ऐकून त्यानेही रस्त्यावर येऊन आरडाओरडा करावयास सुरुवात केली. ज्या वेळी ही भयंकर घटना घडत होती, त्या वेळी अल्बर्ट स्लोन, जॉर्ज कॉर्बेट आणि अर्ल थॉम्पसन हे तिघे पोस्टाचे कर्मचारी फोर्ड ट्रकमध्ये टपालाच्या थैल्या लोड करीत होते. त्यांनी जेव्हा ह्या दोघांना घाईघाईत लाल रंगाच्या कॅडिलॅकमध्ये बसून पळताना पाहिले, तेव्हा त्यांनी लगेच ट्रकमध्ये उड्या टाकल्या आणि पाठलाग सुरू केला.
मधल्या वेळात, मागे उभी असलेली कार झटक्यात फोर्ड ट्रकच्या पुढे आली आणि जणू काही सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरून जात आहे असे भासवत फोर्ड ट्रकचा रस्ता अडवीत राहिली. अर्थातच ही खेळीसुद्धा पूर्वनियोजित होती. एका मिनिटापेक्षा कमी वेळात कॅडिलॅक कार ट्राफिकमध्ये मिसळून गेली. दुसरी कारसुद्धा अशीच ट्राफिकमध्ये अशी मिसळून गेली की जणू गिळली गेली.
थोडयाच वेळात लुईस स्टेल नावाचा एक ड्रायव्हर ६७ स्ट्रीटवरून जात असताना १९ अॅव्हन्यूकडून येणारी लाल रंगाची कॅडिलॅक गाडी त्याच्या गाडीच्या इतक्या जवळून - म्हणजे अगदी काही इंच अंतरावरून - जोरात गेली की लुईस त्याच्यावर अक्षरशः ओरडला. पण लाल रंगाच्या गाडीच्या ड्रायव्हरने वा आतील बसलेल्या दोघांनी याच्या ओरडण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. वेडीवाकडी वळणे घेत घेत कॅडिलॅक गाडी अशा एका ठिकाणी आली की तेथून पुढचा रस्ता दुरुस्तीकरिता खोदून ठेवल्यामुळे बंद होता. लुईसने पाहिले की त्या कारमधून तीन जण बाहेर निघाले. त्यातील एकाने मागची नंबर प्लेट खेचून काढली व बाजूच्या फूटरेस्टवर ठेवली. तो लगेच पुढची नंबर प्लेट काढावयास जाऊ लागला, पण त्याने पाहिले की मागून लुईस त्याच्या कारमधून उतरून त्यांच्याचकडे येत आहे, तेव्हा तिघांनी कार सोडली आणि १९व्या स्ट्रीटकडे वळून ते गर्दीत मिसळून गेले.
लुईसने घाईघाईत त्या कारच्या आतमध्ये डोकावून पाहिले, तर त्याला रक्ताने माखलेले जुने पेपर्स दिसले. त्याच वेळी नाक्यावरील कॉन्स्टेबल कारकडे येतच होता, त्यास आपण कारमध्ये काय पाहिले ते लुईसने सांगितले. घाईघाईत सोडून दिलेली कार, रक्ताने माखलेले पेपर्स ह्या दोन गोष्टी कॉन्स्टेबलसाठी पुरेशा होत्या. त्याने तत्काळ पोलीस मुख्यालयास फोनवर ही माहिती दिली. थोड्याच वेळात पोलीस इन्स्पेक्टर जॉन कोहलीम त्यांच्या गुप्तहेरांच्या टीमला घेऊन ‘त्या’ कारजवळ जमले. खून करून खुनी ज्या कारमधून पळाले, तीच ही कार होती यात त्यांना काही शंकाच नव्हती. रक्ताने भरलेल्या पेपर्सशिवाय कारमध्ये तेलाचे खराब फडके, ज्यात मायकेलने पैसे ठेवले होते ते, ०.३२ कॅलिबर पिस्तुलाच्या काडतुसांचे दोन बॉक्सेस, ब्लॅक जॅक व स्त्रियांच्या कपड्यांचा एक धागा दिसला. कारच्या खिडकीवर तसेच मुठीवर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. ह्या कारच्या नंबर प्लेटवर न्यूयॉर्क शहराचा क्रमांक होता ९६१-०९४. इतके सगळे होईपर्यंत स्टेशनवर मृत इसमांची ओळख पटली होती आणि एक-दोन पोलीस अधिकारी वेस्ट एंड बँकेत पुढील चौकशीसाठी रवाना झाले होते. बँकेभोवती बरेच टॅक्सी ड्रायव्हर गोळा झाले होते, त्यापैकी बहुतेकांना बँकेतून दररोज दोन माणसे पैसे घेऊन जातात हे ठाऊक होते. पोलीस गुप्तहेरांनी त्यांची जुजबी चौकशी करून त्यांना सोडून दिले होते.
त्याच वेळी ह्या केसमधील कॅडिलॅक कार कोणाची आहे, याचाही शोध घेण्यात आला. त्यात दोन गोष्टी उघड झाल्या. एक म्हणजे २६६५, ग्रांट कॉन्कोर्स, ब्रिंक्स येथे राहाणयार्या जेकब मोन्स्कीची ही कार आहे हे उघड झाले, पण जेकबने कार दोन आठवड्यापूर्वी चोरीस गेल्याची फिर्याद दिल्याचे आढळून आले. त्याच्या गाडीची मूळ नंबर प्लेट काढून, त्यावर ९६१-०९४ या नंबरची प्लेट बसविण्यात आली होती. हा क्रमांक खून होण्याच्या अगोदर ३ जून रोजी जोसेफ सॅम्युअलच्या फोर्ड गाडीसाठी देण्यात आला होता. सॅम्युअलने ‘द्वारा टेलर, ३३, ईस्ट २५ स्ट्रीट, ब्रुकलीन' असा पत्ता दिला होता. पण गुप्त पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार तेथे सॅम्युअल नावाचा कोणीही इसम राहत नव्हता. टेलर आडनावाची एक केअर टेकर महिला मात्र तेथे राहत होती.
“या बंगल्याचा मालक कोण आहे?" एका गुप्तहेर पोलिसाने विचारले.
“मिसेस डोरा डायमंड." तिने उत्तर दिले.
“ती कुठे राहते?" पोलिसांनी पुन्हा विचारले.
“१९५९, ८४ स्ट्रीट, ब्रुकलीन." टेलरचे उत्तर.
हे उत्तर ऐकताच दोघे गुप्तहेर चमकले, कारण हा पत्ता म्हणजे वेस्ट एंड बँकेपासून दोनच बिल्डिंग पलीकडे होता. इकडे लुईस स्टेल तसेच स्टेशनजवळील आजूबाजूच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी खून करणार्यांची व कार ड्रायव्हरची माहिती मिळवली होती आणि पोलीस हेडक्वार्टरमधून खालील वर्णन जाहीर करण्यात आले.
'संशयित क्र. १ :- अंदाजे ३० वर्षाचा, ५ फूट १० इंच उंची, मध्यम बांधा, गालाची हाडे वर आलेला, तपकिरी रंगाचे जाकीट व फेडोरा हेट घातलेला तरुण.
संशयित क्र. २ :- अंदाजे ३० वर्षाचा, बुटका, गोल व लालबुंद चेहर्याचा, अंगावर हलक्या रंगाचा ओव्हरकोट व फेडोरा हॅट
संशयित क्र. ३:- ड्रायव्हर, अंगावर हलक्या रंगाचा सूट व राखाडी रंगाची टोपी घातलेला.
स्ट्रीट क्र. ५३जवळ स्टेशनपासून थोडयाच अंतरावर राहणार्या हेन्री बेक या मेकॅनिकने माहिती पुरविली की खुनी माणसाच्या हातावर पिस्तूल लपविण्याकरिता एक मफलर गुंडाळलेला त्याने पाहिले होते. गोळीबार सुरू झाला, तेव्हा तो स्टेशनजवळच होता. त्याने घटना घडण्याच्या अगोदर दोन माणसांना जिन्याने वर जाताना पाहिले होते, त्यापैकी एकाच्या हातावर मफलर गुंडाळला होता. पोलिसांना आता खातरी झाली की हातात नक्कीच खून करण्याचे शस्त्र असले पाहिजे. पोलीस मुख्यालयातील हातांचे ठसे तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, कारच्या खिडकीवरील व दरवाजाच्या मुठीवरील बोटांचे ठसे अगदी स्पष्ट आहेत. त्या ठशांच्या नकलांचे कागद गुन्हे-शोध शाखेकडे, रेकार्ड तपासण्यासाठी त्वरित पाठविण्यात आले. दरम्यानच्या काळात गुन्हेगारांचे मिसेस डोरा यांचेशी काय संबंध आहेत याचा शोध सुरू झाला. असे समजले की मिसेस डोरा ह्या बँकेत नियमित पैसे ठेवीत होत्या. तिचा २८ वर्षांचा मुलगा मॉरिस व २२ वर्षांचा दुसरा मुलगा जोसेफ हे दोघे जण बँकेत पैसे ठेवण्यासाठी नियमित जात असत. मिसेस डोरा डायमंड यांच्या मालकीची 'डायमंड बॉक्स कंपनी' आहे आणि मॉरिस व जोसेफ हे कंपनीचे सेल्समन आहेत. ही कंपनी मिसेस डोराच्या नवर्याने - जो पाच वर्षांपूर्वी मरण पावला होता, त्याने स्थापन केली होती.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान एक बाब स्पष्ट झाली की मिसेस डोरा डायमंडचा मोठा मुलगा मॉरिस शाळेत फूटबॉल खेळात अव्वल म्हणून चमकला असला, तरीही त्याला छोटया छोटया गुन्ह्यांकरिता अनेक वेळा पोलिसांनी अटक केली होती. एक-दोन वेळा तर अल्प-मुदतीसाठी तडीपारही केले होते. त्याच्या केसांच्या रंगावरून सर्व जण त्याला ‘भुर्या‘ म्हणून ओळखत असत. मागील जूनमध्ये ब्रुकलीनमध्येच त्याला परवाना नसताना बंदूक बाळगल्याबद्दल पकडले होते. कनेक्टिकटमध्ये एकदा पिस्तूल लपवून ठेवले म्हणून, तर एकदा कारचोरी केल्याबद्दल पोलिसांनी पकडले होते. आणि ऑगस्ट १९२३मध्ये मारामारी व चोरी करण्याबद्दलसुद्धा पकडले होते, पण पुरेशा पुराव्याअभावी सोडून दिले होते.
दरम्यानच्या काळात, खून झालेल्या बँकेच्या दोघा कर्मचार्यांच्या प्रेताचे पोस्ट मॉर्टेम करण्यात आले. त्यात मायकेलच्या उजव्या फुफ्फुसातून ०.४५ कॅलिबरची गोळी पाठीतूनसुद्धा आरपार निघून गेल्याचे सिद्ध झाले. बार्लोच्या जॅकेटच्या डाव्या खिशातील घड्याळाला गोळी भेदून, घडयाळ बंद पडून डाव्या खिशातच राहिली. दुसरी ०.३२ कॅलिबरची गोळी उजव्या गालातून थेट निघून घशातून फुप्फुसातच अडकलेली सापडली. तिसरी गोळी डाव्या हातातून थेट छातीत गेली होती. ह्याचाच अर्थ दोघा हल्लेखोरांनी बार्लोवर गोळ्या झाडल्या, त्या वेळी मायकेलचा हात पाठीमागचे रिव्हॉल्वर काढण्यात गेला होता हे स्पष्ट झाले. त्यांच्या समाजाच्या प्रथेप्रमाणे सन्मान देऊन दोघांचा दफनविधी केला गेला. त्या वेळी पोलिसांकडून मानवंदना दिली गेली. ह्या दोन्ही निर्घृण खुनाबाबत सर्व समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती.
दोन गुप्तहेर वेष पालटून, व्यापारी म्हणून बॉक्स डायमंड कंपनीच्या कार्यालयात दुपारी गेले आणि त्यांनी सहज मॉरिस डायमंड कोठे आहे म्हणून चौकशी केली.
"मॉरिस डायमंड आत्ता येथे नाहीत." सेल्स मॅनेजर लेनॉर्ड सॅक्सने उत्तर दिले.
"ते केव्हा परत येतील याबाबत काही सांगू शकाल काय?" पोलिसांनी विचारले.
"नाही, मला त्याबद्दल जराही कल्पना नाही." लेनॉर्डने उत्तर दिले.
"बरं, आज दिवसभरात ते येथे केव्हा आले होते, काही सांगू शकाल?" पोलिसाने प्रश्न केला.
"होय, आज सकाळी आठ वाजता ते आले होते, पण पंधरा मिनिटातच बाहेर निघून गेले." लेनॉर्ड म्हणाला, "पण त्यांचा भाऊ जोसेफ आतमध्ये आहे. तुम्हाला त्यास भेटायचे का?"
"नाही, नको, आम्ही मोरिसशी एका ऑर्डरबद्दल बोललो होतो. आम्ही उद्या येतो." पोलीस म्हणाला.
आणि ते दोघे गुप्त पोलीस तेथून निघून गेले. थोडयाच वेळात मॉरिस शांतपणे बॉक्स डायमंड कंपनीत आला आणि आपल्या टेबलापाशी जाऊन खुर्चीत बसला. दरम्यानच्या काळात दुसर्या गुप्त पोलिसांनी खुनाच्या जागेपासून आजूबाजूच्या परिसरातील सर्व गॅरेजेस पिंजून काढावयास सुरुवात केली. त्यात मिसेस लिंडा लॅपेन्स्कीने २१व्या स्ट्रीटवर २१४५, बेन्सोहरस्ट येथे सुरू केलेले गॅरेजही तपासले. विशेष म्हणजे ब्रुकलीनच्याच ह्या भागात मिसेस डोरा डायमंडचे घर होते. मिसेस लॅपेन्स्कीला विचारण्यात आले की तिच्या गॅरेजमध्ये लाल रंगाची कॅडिलॅक आहे काय? लॅपेन्स्कीने होकार दिला. कार ठेवण्यासाठी कोण आले होते? असे विचारल्यावर ती म्हणाली, "मॉरिस डायमंड आणि त्याचा भाऊ जोसेफ."
"आता कार गॅरेजमध्ये आहे का?" गुप्त पोलिसाने विचारले.
लॅपेन्स्कीने न बिचकता उत्तर दिले, "हो, आहे ना! आज सकाळी आठ वाजता ते घेऊन गेले आणि नऊ वाजायच्या आत त्या दोघांपैकी एक जण कार ठेवून गेला. तेव्हापासून कार येथेच आहे."
खून सकाळी दहानंतर झाले होते. गॅरेजमध्ये प्रवेश करून त्यांनी खातरी केली की लाल रंगाची कॅडिलॅक कार तेथेच होती.
इकडे पोलीस मुख्यालयात, रक्ताचे नमुने तपासणार्या पोलिसाने सुचविले की कारमधील ठसे आणि मॉरिसच्या हातांचे ठसे जुळवून पाहायला काय हरकत आहे? कारण मॉरिसच्या ठशांचे रेकॉर्ड आपल्याकडे आहे. आणि तसेच झाले. दोन्ही ठसे एकमेकांशी पक्के जुळले. मात्र ही बाब पोलिसांनी बाहेर कोठेही जाहीर केली नाही. पोलिसांना मॉरिसचा ठावठिकाणा लागत नव्हता. पोलिसांना वाटायचे की ठशांची बातमी बाहेर फुटली, तर मॉरिस फरार होईल. पण हे एवढे एकच कारण नव्हते, इतरही खास कारण होते. खुनाच्या घटनेचे स्वरूप पाहता घटनास्थळी दिसलेले तिघेच फक्त या कटात सामील असतील असे त्यांना वाटत नव्हते. घटना घडताना त्यांचा एखादा सूत्रधार घटनास्थळाच्या जवळपास कुठूनतरी नक्कीच नजर ठेवून असणार. जोपर्यंत सबळ पुरावा मिळत नाही, तोपर्यंत ही बातमी जाहीर करणे चुकीचे ठरेल, असे त्यांचे मत होते.
मध्यरात्रीपर्यंत तपास करता करता त्यांना कळले की मॉरिस त्याच्या राहण्याच्या ठिकाणात बदल करीत असतो. कधी त्याच्या आईच्या घरी बेन्सोहर्स्ट येथे, तर कधी मॅनहॅटनच्या ईस्ट २७ स्ट्रीटच्या फर्निश्ड घरी. मग मोक्याच्या ठिकाणी - म्हणजे मिसेस डोरा डायमंडच्या घराभोवती, बॉक्स डायमंड कंपनीच्या बाहेर व मॅनहॅटनच्या घरी पोलिसांच्या तीन पथकांची ताबडतोब रवानगी करून, येणार्या जाणार्या लोकांवर नजर ठेवण्याचे काम सुरू झाले. तेथे आत येणार्या व बाहेर जाणार्या प्रत्येकाची मिनिटामिनिटाला नोंद घेणे सुरू केले.
दुसर्या दिवशी ह्या प्रकरणात डायमंड बॉक्स कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल एक नवीनच माहिती हाती आली. गुप्त पोलिसांच्या ही गोष्ट अगोदर का लक्षात आली नाही याचीच खंत वाटू लागली. चौकशीदरम्यान विचारणा केल्यावर एका धनकोने (Creditorने) पोलिसांना सांगितले की खुनाची घटना घडण्याच्या आदल्या दिवशीच तो मॉरिस डायमंडला भेटला होता आणि त्याने मागील थकबाकीचा हिशोब करून पैसे त्वरित देण्याबाबत तगादा लावला होता. त्यावर मॉरिसने म्हटले होते की, "हे बघा, सध्या कंपनीकडे निधी कमी आहे, पण एक दोन दिवसात तुमचे पैसे परत करून टाकू."
धनको म्हणाला, "ही इतक्या दिवसांची थापेगिरी बंद करा. आजपर्यंत पैसे देण्यासाठी खूप फिरविले आणि आता एक दोन दिवसात कंपनीची स्थिती कशी काय सुधारणार?"
"मी सांगतोय ना आता." मॉरिस म्हणाला, "आता आमच्याकडे भरपूर कॅश येणार आहे आणि एक-दोन दिवसात तुमचे सर्व पैसे परत करून टाकू."
खुनाच्या घटनेच्या दुसर्या दिवशी दुपारनंतर, बर्याच बँकांना भेटी दिल्यावर गुप्त पोलिसांना असे आढळले की मॉरिस डायमंड हा २३व्या स्ट्रीटवरील फिफ्थ अॅव्हन्यू बँकेत भरणा करीत असे. खून झाल्याच्या आदल्या दिवशी या बँकेतील त्याच्या खात्यात फक्त ३५.६३ डॉलर्स शिल्लक होते. पण खुनाची घटना घडल्याच्या दुसर्या दिवशी पोलिसांनी बँकेत भेट देण्यापूर्वी फक्त तीनच तास आधी १५८४ डॉलर्सचा भरणा करून गेला. त्यानंतर एक तासाने, म्हणजे गुप्त पोलीस येण्याच्या दोन तास आधी आला आणि १००० डॉलर्स काढून घेऊन गेला. एवढे होईपर्यंत जोसेफ या त्याच्या बावीस वर्षांच्या भावाच्या हालचालींवर गुप्त पोलिसांची बरोब्बर नजर होती.
बॉक्स डायमंड कंपनीच्या आजूबाजूस राहणार्या अनेकांकडून समजले की खुनाची घटना घडल्यानंतर ४५ मिनिटांनी जोसेफ कंपनीत आला होता. जे दोन गुप्त पोलीस व्यापारी बनून बॉक्स डायमंड कंपनीत गेले होते, ते पुन्हा एकदा कंपनीत गेले. त्यांनी मॉरिसबाबत विचारणा केली. विली फ्रेड या सेल्समनने सांगितले की "मॉरिस व्यवसायानिमित्त बाहेर गावी गेले आहेत." पोलीस म्हणाले की "ठीक आहे. आम्हाला जोसेफबरोबर बोलायचे आहे." त्यावर सेल्समन म्हणाला, "माफ करा, जोसेफसुद्धा बाहेर गेले आहेत." दिवसामागून दिवस जात होते, पण पोलीस तपासात म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. लोक पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर टीका करू लागले. अर्थात हे यापूर्वीही घडले होते. पोलीस अजूनही खुनी इसमांना पकडू शकले नाहीत म्हणून टीका होत होती. आता तपासात नेमकी किती प्रगती झाली, हे जनतेला माहीत नव्हते आणि पोलिसांनी ठरविले होते की जोपर्यंत त्यांच्याकडे सबळ पुरावा हाती येत नाही, तोपर्यंत काहीही जाहीर करावयाचे नाही. अजून बर्याच गोष्टींची उकल व्हायची होती.
पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा होता की डायमंड बंधू जर या भानगडीत गुंतले होते, तर ती कॅडिलॅक कार खुनाच्या वेळी मिसेस लेपेन्स्कीच्या गॅरेजमध्ये कशी काय होती?
गॅरेजमधील कार खून करताना वापरलेल्या कारच्या मॉडेलची डुप्लिकेट होती आणि मिसेस लेपेन्स्कीबाईला वाटले की खुन्यांनी वापरलेली हीच कार असावी. वस्तुतः ती कार काही दिवसांपूर्वी ब्राँक्समधून चोरण्यात आली होती. पोलिसांना कळून चुकले की कट करणार्या इसमांनी - त्यात डायमंड बंधूंचा हात आहे हेही समजले होते - मोठ्या हुशारीने ही डुप्लिकेट कार गॅरेजमध्ये आणून ठेवली होती. समजा, पैसे घेऊन पळताना जर कार सोडून द्यावी लागली, तर आमची कार तर गॅरेजमध्येच होती असा पुरावा पुढे आणता येईल आणि आपण सुटून जाऊ, असा त्यांचा होरा होता. एक धूर्त डाव, पण तितकासा धूर्त व चलाखीचा म्हणता येणार नाही.
बॉक्स कंपनीच्या बँकेतील व्यवहारांवर पोलिसांचे सतत लक्ष होते, कारण कंपनीच्या खात्यातील शिल्लक एकदम वाढलेली आढळली. पब्लिक नॅशनल बँकेत गुन्हा घडण्याच्या आदल्या दिवशी कंपनीच्या खात्यात फक्त २०० डॉलर्स शिल्लक होते. १५ नोव्हेंबरला १५०० डॉलर्स, तर १९ तारखेला ११०० डॉलर्स जमा करण्यात आले होते. अशाच तर्हेने अनेकांची देणी भागविण्यात आली होती. पण ह्यात मॉरिस व जोसेफ यांनी कोठेही हे व्यवहार केलेले नव्हते. दोघांचा अजूनही शोध लागत नव्हता.
२१ नोव्हेंबरला फिफ्थ नॅशनल बँकेत मॉरिसने दिलेला २०० डॉलर्सचा एक चेक आला. चेक फिलाडेल्फिया येथून पाठविण्यात आला होता. पोलिसांनी अंदाज लावला की कोणी ना कोणी कंपनीशी संपर्क साधेलच. म्हणून त्यांनी कंपनीचा फोन टॅप करण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नाला अपेक्षेप्रमाणे यश आले. दुपारनंतर सेल्समन विली फ्रेडच्या नावे एक कॉल आला.
"विली, मी मॉरिस बोलतोय." कोणीतरी फोनवरून दुसर्या टोकाकडून बोलला. "काय खबरबात?"
"हॅलो, जरा सांभाळून, ते तुम्हाला शोधत आहेत." विलीने म्हटले.
"असं आहे का?"
"हो."
"ठीक आहे, आभारी आहे, गुड बाय" आणि पटकन फोन लाईन बंद झाली. फोनच्या दुसर्या टोकाला असलेली व्यक्ती घाबरल्यासारखी वाटली. ताबडतोब काहीतरी केलेच पाहिजे. पोलिसांनी लगेच टेलिफोन कंपनीशी संपर्क साधून आलेला कॉल कुठून आला हे विचारले. उत्तर मिळाले की फिलाडेल्फिया येथील हॉटेल लॉरेनमधून फोन केला गेला. अर्ध्या तासातच, पोलिसांची एक तुकडी शोध घेण्यासाठी रवाना झाली. पण तेथे पोहोचण्यापूर्वी एक तास अगोदर डायमंड बंधू तेथून पसार झाले होते.
"मॉरिस आणि त्यांचा भाऊ जोसेफ येथे पंधरा तारखेस हॉटेलमध्ये आले होते आणि आज दुपारीच निघून गेलेत." रिसेप्शन क्लार्कने पोलिसांना माहिती दिली.
"बरं, ते कोठे गेले याची काही कल्पना?"
"नाही, त्यांनी असे काही सांगितले नाही." क्लार्कचे उत्तर.
"अस्सं, हॉटेलमध्ये आणखी कोणाला याबद्दल काही कल्पना?" पोलिसांनी विचारले.
"नाही, त्याबाबत मी काही सांगू शकत नाही. तसं पाहिलं तर मला अशी चौकशी करण्याचं काही कारण नाही, त्यामुळे मला काही माहिती नाही." क्लार्क म्हणाला.
पोलिसांनी हॉटेलच्या टेलिफोन ओपरेटरशी संपर्क साधला. तिने महत्त्वाची माहिती सांगितली. मॉरिस व जोसेफ यांच्या रूममधून त्याच हॉटेलमध्ये दुसर्या रूममध्ये राहणार्या मिस जोयास नॉर्मंड आणि मिस बेट्स यांच्याशी अनेक वेळा फोनवर बोलणे झाले आहे. त्या दोघी अजूनही हॉटेलमध्येच आहेत. फिलाडेल्फिया शहरात सध्या सुरू असलेल्या संगीत नाटकात दोघी काम करीत आहेत. क्षणाचाही विलंब न लावता पोलीस त्यांच्या रूममध्ये गेले. त्या दोघी रूममध्येच होत्या. पोलिसांनी अधिक वेळ न घालवता सरळ प्रश्नच विचारला, "तुम्ही मॉरिस आणि जोसेफ यांना ओळखता काय?"
"हो तर, ओळखतो त्या दोघांना." त्यांनी न बिचकता उत्तर दिले.
एका पोलिसाने त्यांना बिल्ला दाखवीत म्हटले, "आम्ही न्यूयॉर्क पोलीस खात्याकडून आलेलो आहोत. ब्रुकलीनमध्ये १४ तारखेला बँकेच्या दोन कर्मचार्यांचा खून झाला आहे, त्या संदर्भात आम्ही डायमंड बंधूच्या शोधात आहोत." ही बातमी ऐकून त्या दोघींना धक्काच बसला. काही क्षण त्या स्तब्धच झाल्या. नंतर त्यातील मिस नॉर्मंड स्वतःला सावरत म्हणाली, "ओ! शेवटी ही भानगड माझ्यापर्यंत आली तर." तिने सांगितलेली हकीकत अशी होती :-
"मिस बेट्स आणि मी येथे आलो आणि पंधरा तारखेस डायमंड बंधूसुद्धा ह्याच हॉटेलमध्ये आले. मिस बेट्स त्यांना ओळखते. मिस बेट्स आल्याचे त्यांना समजले, म्हणून त्यांनी फोन करून सांगितले की त्याचा भाऊ जोसेफ त्याच्यासोबत आहे. आणखी एखादी जोडीदार मुलगी शोध, म्हणजे आपण चौघे मिळून पार्टी करू. मिस बेट्सने मला फोन केला आणि जोसेफशी ओळख करून दिली. आम्ही येथे पाम गार्डनमध्ये सायंकाळी खूप मजा केली. जोसेफ आणि मी तीन तास एकत्र होतो आणि शेवटी त्याने मला लग्नाची ऑफरसुद्धा दिली. तो माझ्या कानात म्हणाला, "बायकांच्या पोटात कोणतेही गुपित राहत नाही, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. असे म्हणून त्याने त्याच्या वडिलांबद्दल / भावाबद्दल बरेच काही काही सांगितले, त्याचबरोबर त्यांच्या मागावर पोलीस आहेत व त्यांच्याकडून बँकेच्या दोघांचा खून झाल्याचेही सांगितले. तो हे सांगत असतांना मॉरिस आला. मी त्याला विचारले की "पोलीस तुमच्या मागावर आहेत, हे खरे आहे का?"
मॉरिस - "तुला कोणी सांगितले? ह्याने ना? ते खरे नाही. जोसेफ मानसिक आजारी आहे, त्याच्यावर चांगल्या डॉक्टरकडून उपचार करावयाचे आहेत." पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर मिस डोरोथी म्हणाली, "मॉरिसने जोसेफवर इलाज करण्यासाठी क्लीव्हलँडची दोन रेल्वेची तिकिटे मात्र दाखविली होती." पोलिसांनी लगेच क्लीव्हलँड येथील पोलिसांशी संपर्क साधून, डायमंड बंधूंचे वर्णन पाठवून एखाद्या हॉटेलमध्ये नावानिशी उतरले आहेत काय याची चौकशी करावयास सांगितले.
इकडे विली फ्रेडला पोलिसांनी ताब्यात घेऊन खडसावून खोलवर चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितले की खुनाची घटना घडल्याच्या दुसर्या दिवशी डायमंड बंधू फिलाडेल्फिया येथे गेले. १६ तारखेस मॉरिसने सॅकला फोन करून सांगितले की फ्रेडने लॉरेन हॉटेलवर जाऊन त्यांची भेट घ्यावी. महत्त्वाचे काम आहे. त्याप्रमाणे मी म्यानहटन येथे लॉरेन हॉटेलवर गेलो. पण तेथे दोघांची नावे नोंदलेली नव्हती, म्हणून परत आलो. आल्यावर सॅकला म्हटले, "काय रे, मला उल्लू बनवतो काय? लॉरेन हॉटेलवर कोणी नव्हते." दुसर्या पुन्हा दिवशी मॉरिसचा फोन आला व हॉटेलवर का आला नाही म्हणून विचारणा केली. मी सांगितले की मी आलो होतो, पण रजिस्टरमध्ये तुमचे नावच नव्हते. मॉरिस म्हणाला, ओ, तू मॅनहॅटनच्या हॉटेल लॉरेनमध्ये गेला असशील. माझीच चूक झाली, आम्ही फिलाडेल्फियाच्या हॉटेल लॉरेनमध्ये आहोत, तेथे ये. आणि कोणाला हे सांगू नकोस." फ्रेड फिलाडेल्फिया येथे जाऊन १९ तारखेला म्हणजे खुनाच्या घटनेच्या पाच दिवसानंतर मॉरिसला भेटला आणि न्यूयॉर्कला परतला.
त्याने सॅककडून माहिती घेतली व पुन्हा मॉरिसला फिलाडेल्फिया येथे जाऊन कळविले की ‘पोलीस तुम्हा दोघांचा शोध घेत आहे. फॅक्टरी, मिसेस डोरा डायमंडचे घर व न्यूयॉर्कमधील घर इ. तिन्ही ठिकाणी गुप्तहेर फिरत आहेत.’ पोलिसांची आपल्यावर नजर आहे हे माहीत असूनसुद्धा, मॉरिस ३० तारखेला सॅकबरोबर न्यूयॉर्कला आला. सॅककडून त्याने मुष्टियुद्धाची तिकिटे मागविली, शो पाहिला आणि रातोरात फिलाडेल्फियाला निघून गेला. आणखी दोन दिवस गेले, पण डायमंड बंधू हाती येत नव्हते.
दिनांक २५ नोव्हेंबर, रविवारची दुपार. पोलिसांना खबर मिळाली की क्लीव्हलँड येथे स्टटलर हॉटेलमध्ये एम.बी. डायमंड, न्यूयॉर्क सिटी या नावाने खोली बुक करण्यात आली आहे. पोलीस अॅलर्ट झाले. मुख्य पोर्टरकडे गुप्त पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना असे समजले की मॉरिस आज सायंकाळी सहा वाजता ट्रेनने न्यूयॉर्कसाठी निघणार आहे. पोलिसांनी तपास केल्याप्रमाणे दुपारी ४ वाजता खोलीत मॉरिस नव्हता. तो फूटबॉलचा प्रेमी असल्याने एक महत्त्वाचा सामना पाहावयास गेल्याचे समजले. साध्या वेषातील पोलिसांनी फिल्डिंग लावली. इन्स्पेक्टर मार्टिन आठव्या मजल्यावर, मॉरिसच्या खोलीजवळच एका अन्य खोलीत दबा धरून बसले होते. इन्स्पेक्टर डॅनियल स्वागत कक्षाच्या सोफ्यावर बसले. कारण त्यांना ठाऊक होते की मॉरिस किल्ली घेण्यासाठी तेथेच येईल. बरोबर पाच वाजता मॉरिस तेथे आला आणि रिसेप्शन क्लार्कला म्हणाला, "मी लगेच निघणार आहे, माझे बिल तयार ठेवा, माझे सामान घेऊन मी आलोच." मॉरिस लिफ्टमध्ये शिरला, त्याच्या पाठोपाठ डॅनियलसुद्धा आत गेले. मॉरिसने लिफ्टमधील आरशात पाहून केस ठीकठाक केले. त्याला कोणतीही शंका आली नाही.
लिफ्ट आठव्या मजल्यावर पोहोचली. डॅनियलने मार्टिनला खूण केली. त्यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. मॉरिसजवळ शस्त्र असले तर? मार्टिन समोरून अशा गतीने येत होता की मॉरिस त्याच्या खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर एका पावलाने मार्टिन तेथे पोहोचेल. पायाखाली गालिचा असल्याने, डॅनियल मॉरिसच्या अगदी मागे आहे अशी शंकासुद्धा त्याला आली नाही. दोघा इन्स्पेक्टरांनी ठरवून ठेवले होते की मॉरिस जेव्हा एका हाताने किल्ली कुलपात घालेल आणि दुसर्या हाताने दरवाजाची मूठ फिरवेल, तेव्हाच त्याच्यावर झडप घालायची, जेणेकरून त्यास प्रतिकारास वाव मिळू नये. आणि जेव्हा मॉरिस दार उघडण्यासाठी मुठीवर हात ठेवीत होता, त्याच वेळी दोघा इन्स्पेक्टरांनी त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले.
"हे... हे काय चालविले आहे तुम्ही?" मॉरिस म्हणाला.
"हं, काय चालले आहे ते तुला चांगलेच ठाऊक आहे." डॅनियल शांतपणे म्हणाला.
"ठीक आहे, मी तुमच्याबरोबर न्यूयॉर्कला येण्यास तयार आहे. मला माहीत आहे, तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते, पण तुमची काहीतरी चूक होत आहे. तुम्ही चुकीच्या माणसाला पकडत आहात." मॉरिस.
मॉरिसला न्यूयॉर्कला आणण्यात आले. येताना खुनाची गोष्ट सोडून तो बाकीचे बरेच काही बोलला. "तुझा भाऊ जोसेफ कोठे आहे?" असे विचारल्यावर "माहीत नाही" असे उत्तर त्याने दिले. मॉरिसला पकडले, तेव्हा त्याच्याजवळ २२०० डॉलर्स सापडले. एवढे पैसे कोठून आणले? ह्याचेही समाधानकारक उत्तर तो देऊ शकला नाही. क्लीव्हलँड येथील लॉकरमध्ये ९,००० डॉलर्स ठेवल्याचे मात्र त्याने कबूल केले. मॉरिस डायमंडला अटक झाली ही बातमी सगळीकडे वेगाने पसरली. न्यूयॉर्कमध्येच दडून बसलेल्या जोसेफच्या कानावरसुद्धा बातमी पोहोचली, तेव्हा त्याने वकिलाचा सल्ला घेतला. वकिलाने त्यास पोलिसांना शरण जाण्यातच शहाणपणा आहे असा सल्ला दिला. त्यालाही लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. रात्रभर पोलिसांच्या प्रश्नांच्या भडिमारासमोर त्या दोघांचे उसने अवसान टिकले नाही. मात्र खुनाच्या घटनेत आपला हात नाही असे दोघेही सांगत राहिले. त्यांना कोर्टापुढे हजर करून तीन दिवसांचा रिमांड मिळाला. २८ तारखेस त्यांनी कटकारस्थानाची उकल केली आणि उरलेल्या साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली. कटात सामील झालेले सर्वच आरोपी एक एक करून पकडले गेले.
यथावकाश कोर्टात खटला चालला. पोलिसांकडे भक्कम पुरावे होते, ते त्यांनी कोर्टात व्यवस्थित मांडले. मॉरिस, जोसेफ आणि प्रत्यक्ष गोळ्या झाडणारे दोघे साथीदार यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. इतरांना वेगवेगळ्या मुदतीच्या तुरुंगवासात पाठविले.
(True Detective Stories – Feb.1930च्या अंकातील कथेचा अनुवाद ).
प्रतिक्रिया
1 Nov 2016 - 3:15 pm | चांदणे संदीप
Instant Karma Instant Justice!
पोलीस मग ते कुठलेही असोत, त्यांच्या यशस्वी तपासाच्या कथा वाचायला आवडते.
Sandy
2 Nov 2016 - 7:41 pm | महामाया
छान लिहिलंय...
पोलिसांची चांगली कामगिरी वाचणं नेहमीच थरारक असतं...
याचा अनुभव ते वर्णन वाचताना येतोच.
3 Nov 2016 - 6:28 pm | ऋषिकेश
कथा ठीक. वार्तांकणासारखी शैली मात्र आवडली
3 Nov 2016 - 7:35 pm | शब्दबम्बाळ
दरोडेखोर भरपूर चाणाक्ष वाटले नाहीत! पण काळ खूप जुना असल्यामुळे त्यांच्याकडे परफेक्ट प्लॅन बनवण्यासाठी आवश्यक माहितीदेखील सहज उपलब्ध नसणार...
आपली लिखाणाची शैली मात्र आवडली! :)
7 Nov 2016 - 9:39 am | आतिवास
जुन्या काळातली कथा वाचताना मजा आली.
8 Nov 2016 - 12:07 am | रुपी
व्यक्तींचा आणि घटनांचा मेळ घालताना थोडा गोंधळ उडाला, पण कथा आवडली :)
8 Nov 2016 - 10:18 am | पैसा
जवळपास ४ पिढ्यांपूर्वीची तपासकथा! खूप आवडली! अनुवाद उत्तम जमला आहे.
9 Nov 2016 - 3:23 pm | स्वाती दिनेश
जुन्या काळातली अनुवादित कथा वाचायला आवडली.
स्वाती