जगण्याची लय सापडलेले डॉक्टर

उल्का's picture
उल्का in लेखमाला
29 Oct 2016 - 12:32 am

1
ह्या वर्षी ३१ जानेवारीला असा काही योग जुळून आला की पार्ल्याला 'मॅजेस्टिक गप्पा' कार्यक्रमात डॉ. आशुतोष जावडेकर ह्यांची मुलाखत ऐकायला मी हजर होते. त्या वेळी त्यांनी 'लयपश्चिमा' ह्या कार्यक्रमाचा काही अंशही सादर केला व मनमोकळ्या गप्पादेखील मारल्या. सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. 'संगीताला सीमारेषा नसते आणि आपण ती आखूही नये' हे नवे काहीतरी मी शिकले होते. मी तर इतकी भारावून गेले होते की लगेच त्यांचे पुस्तक 'लयपश्चिमा' विकत घेऊन त्यावर त्यांची स्वाक्षरीदेखील घेतली. ती त्यांची माझी एकुलती एक प्रत्यक्ष भेट. नंतर फेसबुकच्या माध्यमातून त्यांना भेटत, जाणत गेले आणि कौतुकमिश्रित कुतूहल जागे झाले. काय अफलातून माणूस आहे हा! खरंच!

ते व्यवसायाने डेंटिस्ट (दंतवैद्य) आहेत. शिवाय इंग्लिशचे प्रोफेसर (प्राध्यापक) आहेत. छंदाने कवी, लेखक, गायक, संगीत अभ्यासक, एक परफॉर्मर (ते 'लयपश्चिमा' हा कार्यक्रम सादर करतात), मुलाखतकार, वक्ता आणि आता संगीतकारही आहेत. ('वीण' हा त्यांचा पहिला म्युझिक व्हिडिओ खूप यशस्वी झाला आहे.)

परंतु ह्याहूनही मला महत्त्वाचे वाटले ते त्यांचे सर्वांशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध, त्यांचे संवादकौशल्य आणि स्वभावातील मोकळेपणा. त्यांना एकदा ऐकल्यावर, भेटल्यावर तुम्ही विसरूच शकत नाही इतके मोकळेपणी हसत ते तुमच्याशी बोलतात, संवाद साधतात. त्यांच्या लेखनातूनही हे जाणवत असते. (पुढील मुलाखतीतूनदेखील तुम्हाला ते जाणवेल.)
सध्या लोकसत्ताच्या 'लोकरंग' पुरवणीत 'वा!' म्हणताना...' हे त्यांचे पाक्षिक सदर प्रसिद्ध होते आहे.
'मुळारंभ', 'नवे सूर अन् नवे तराणे' व 'लयपश्चिमा' ही त्यांची तीन गाजलेली पुस्तके आहेत.

Ashu's Tunes हे त्यांचे You Tube चॅनल आहे.
https://www.youtube.com/user/ashudentist

तेव्हा अशा प्रतिभावान व्यक्तीची ओळख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा आतापर्यंतचा व्यावसायिक प्रवास जाणून घ्यावा म्हणून 'मिसळपाव' दिवाळी अंकासाठी त्यांची मुलाखत घ्यावी असे मला वाटले आणि त्यांच्या तत्पर होकाराने हा योग आज जुळूनही आला आहे. (त्यासाठी मी त्यांची अत्यंत आभारी आहे हे जाहीरपणे इथे नमूद करते.)

*********
1

सर्वप्रथम मिपा परिवारातर्फे मी डॉ. आशुतोष जावडेकर यांचे स्वागत करते व मुलाखतीला सुरुवात करते.

१. 'लयपश्चिमा' ह्या कार्यक्रमामुळे आपली ओळख झाली. म्हणून पहिला प्रश्न त्याविषयी विचारते. तुम्हाला 'लयपश्चिमा' ही संकल्पना कशी सुचली?

डॉ. : 'लयपश्चिमा' हा कार्यक्रम मुळात मी आधी लिहिला नाही. म्हणजे कार्यक्रम करायचा ह्या हेतूने म्हणून काही मी लिहायला घेतलं नाही. माझं पहिलं पुस्तक होतं 'नवे सूर अन् नवे तराणे'. ते कंटेम्पररी (समकालीन) बॉलीवूड संगीतावर बोलणारं पुस्तक होतं. ते लोकांना आवडलं. त्यावर मतभेदही झाले की मी नवसंगीताचं कुठेतरी कौतुक करतोय. हे २०११मध्ये - म्हणजे पाच-सहा वर्षंच झालीत त्याला. पण तेव्हा खूप पटकन ते पचलंही गेलं नाही. तरीही लोकांनी ते पुस्तक घेतलं, वाचलं. त्याची लगेच दुसरी आवृत्तीही त्या वेळी निघाली होती. त्या सगळ्या दरम्यान मी आणि 'राजहंस'' प्रकाशनचे दिलीप माजगावकर सर एकदा गप्पा मारताना असा विषय निघाला की पाश्चात्त्य संगीतावरही आपण पुढे काही करू या. सरांचीच ती संकल्पना होती की तू हे सगळं इतकं ऐकतोस, तुझा अभ्यास आहे, तर तू लिही. मी त्यांना म्हटलं की माझा अभ्यास नाहीये, पण ऐकलंय मी खूप. पण मी करेन अभ्यास आणि लिहीन.

मग मी तो सगळा अभ्यास चालू केला. तीन वर्षं जवळजवळ तो एक प्रोजेक्ट (प्रकल्प) सारखा चालू होता. आधी लोकसत्तात सदर आलं 'लयपश्चिमा' आणि पुस्तक नंतर आलं. पुस्तकात सदारांचं केवळ एकत्रीकरण केलेलं नाहीये. पुस्तक खूप मोठं आहे, विस्तृत आहे. कारण शेवटी त्या दोन्हीत फरक असतो. सदर हे तीन मिनिटांच्या पॉप गाण्यासारखं असतं. ते अवघड असतं, पण तीन मिनिटांचं असतं आणि पुस्तक हा विलंबित लयीतला ख्याल असतो. त्यामुळे त्या सर्व पद्धतीने मी त्याची सगळी मांडणी केलीय. ते सगळं करत असताना मागे कुठेतरी सारखं मात्र मला जाणवायचं की लयपश्चिमा हा आपण कार्यक्रम ह्या स्वरूपात आणला पाहिजे. कारण एक तर माझ्या आत परफॉर्मर आहे. मी बरं बोलू शकतो, गाऊ शकतो. तर हे सगळं कुठेतरी मला खुणावत असणार. शिवाय हा विषयच असा होता की मी नुसतं लिहिण्यापेक्षा जर मी हा श्राव्यानुभव दिला आणि विशेषतः मी जर गाऊन तो परदेशी संगीताचा आणि आपल्या संगीताचा धागा जर दाखवू शकलो, जसा मी दाखवतो आता कार्यक्रमात, तर फार मजा येईल.

असं मी ठरवत होतो, तेव्हा योगायोगाने पुस्तक प्रकाशित होण्याच्याही आधी जागतिक संगीत दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्र संचालनालयाचे अजय आंबेकर सर यांनी मला विचारणा केली की तुम्ही काही कार्यक्रम द्याल का? ते माझं सदर नियमित वाचायचे, त्यांना खूप आवडायचं. तर म्हटलं, आहे हा 'लयपश्चिमा'. आणि मग अक्षरशः एका आठवड्यात बसून मी हा कार्यक्रम केलाय आणि रवींद्र नाट्यमंदिरात उत्तम असा तो पहिला कार्यक्रम झाला. मुंबईत प्रचंड पाऊस होता. लोक येतील का नाही, कार्यक्रम रद्द करायला लागेल अशीही एकदा शंका वाटत होती. पण तो फार रंगला. किशोर कदमसारखा खूप चांगला अभिनेता, मित्र तिथे आला होता. मुंबईतील बाकीही सगळी खूप चांगली मंडळी होती. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मला वाटतं ते एक चक्र सुरूच झालं. लगेचच पुढच्या महिन्यात सोनाली कुलकर्णी ह्या ज्येष्ठ अभिनेत्रींच्या हस्ते 'लयपश्चिमा' पुस्तक प्रकाशित झालं. त्या दिवशी पुण्यातला पहिला कार्यक्रम झाला.

मला मग नेहमी वाटायचं की मुंबई, पुणे ह्याच केंद्रांभोवती आपण अडकण्यात अर्थ नसतो. परिघापर्यंत पोहोचायला हवं, कारण तिथे जास्त जिवंत, व्हायब्रण्ट असा महाराष्ट्र आहे. तिथला तरुण जास्त दक्ष, सजग वाटतो मला. त्यामुळे तिथे पोहोचायचं होतंच. आणि योगायोगाने खरोखरीच तिथल्या सगळ्या संस्थांचीच मला निमंत्रणं आली. त्यामुळे अमरावती, नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि अगदी आता वाई, दौंड अशाही सगळ्या ठिकाणी 'लयपश्चिमा' झाला. नवी दिल्लीला एक झाला. मी मोजदाद ठेवत नाही. पन्नास झालेत की शंभर झालेत. मला तसा रसही नाही त्या पद्धतीचं करण्यात. मला पोहोचवायचं होतं. आणि मला मी नव्हतो पोहोचवायचो. ते मला वाटतं माझ्या 'वीण'सारख्या गाण्यातून पोहोचतो आहे मी एक गायक म्हणून. किंवा लेखक म्हणून मी आता पण माझ्या सदरातून पोहोचतो आहे. मला पोहोचवायचं होतं ते सातासमुद्रापलीकडील संगीत आणि ते आपल्याही संगीताशी कसं निगडित आहे, ते सगळ्या समाजावर कसं परिणाम घडवतंय किंवा समाजातील विविध बदलांमुळे ते कसं आता उलट नव्या उभारीने येतंय. आणि हे सगळं मला चांगलं दाखवता आलं असं मला वाटतं.
https://www.youtube.com/watch?v=c0vrHjrhxvw (लयपश्चिमाची एक झलक)

२. हा कार्यक्रम करतानाचे काही खास अनुभव, आठवणी आहेत का?

डॉ. : खूप छान आठवणी आहेत. मला असं आठवतंय - पहिल्याच प्रयोगानंतर एक आजोबा अक्षरशः धावत आले. ते म्हणाले, "अहो, आमच्या घरात रोज माझी आणि माझ्या नातवाची भांडणं होतात. त्याच्या त्या धांगडधिंगाच्या मोठ्या आवाजातल्या गाण्यांवरनं. पण आता मात्र होणार नाहीत. मीही त्याचं ऐकण्याचा प्रयत्न करेन. निदान मला हे कळलंय की तोही जे ऐकतोय गाणं ते बरं गाणं ऐकतोय." आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे विसंवादाचं रूपांतर संवादात होत होतं आणि तेही पहिल्याच कार्यक्रमात. म्हणून त्या दिवशी चेष्टेत मी माझ्या बायकोला म्हणालो की आता खरा हा कार्यक्रम हिट होणारेय, इथे विसंवाद संवादात रूपांतरित होतोय.

सगळ्यात चांगली आठवण अर्थातच नागपूरची आहे. कारण महेश एलकुंचवार. तेव्हा त्यांची माझी अगदी जुजबी ओळख होती. खरं तर काही नव्हतीच म्हणजे. लेखक म्हणून आपण कितीतरी त्यांना ओळखत असतो. पण त्यांनी माझं सदर वाचलं असल्यामुळे कार्यक्रमाला यायचं कबूल केलं. आधीच कार्यक्रमाला खरं उशीरही झाला होता. बरेच पाहुणे त्यामुळे नाराज असणार तसेच तेही असणार. ते तर फार वेळेला पक्के आहेत. पण त्यांनी तिथे व्यासपीठावर उभं राहून एक अप्रतिम भाषण केलं. आताच्या काळाचं, पाश्चात्त्य संगीताचं आणि एकंदर साहित्याचं सगळं त्यांनी समालोचन त्यांच्या खास ढंगात तर केलंच आणि जेव्हा ते म्हणले की लयपश्चिमा हा गेल्या काही वर्षांतला - बहुधा वीस वर्षं म्हणाले होते - मराठीतला अत्यंत महत्त्वाचा दस्ताऐवज आहे, तेव्हा एक क्षण मात्र मीही असा थांबलो होतो. मला असं वाटलं की ही फार मोठी दाद झाली आणि महेशदा हे अशी ऊठसूट कोणाला देत नाहीत. दुसर्‍या दिवशी अर्थातच नागपूरला सगळ्या वर्तमानपत्रांतून ठळक मथळा व फोटोसहित बातमी छापून आली होती. अगदी टाइम्ससारख्या इंग्लिश वर्तमानपत्रांनीही दखल घेतली होती. अपेक्षितच होतं ते ह्या पद्धतीचं स्टेटमेंट आल्यावर. तर तिथून मला वाटतं ती एक आठवण मला आयुष्यभर पुरली असेल. पुढेही आता महेशदांचा सहवासही मिळाल्यानंतर फार सगळ्या सुंदर आठवणी आहेत, पण त्या लयपाश्चिमाशी निगडित आहेत असं नाही. पण लयपश्चिमाचा हा फार मोठा फायदा आहे की तुम्ही ज्या लेखकाला मोठे मानत असता ,तो तुमच्या पुस्तकाविषयी असं काहीतरी बोलतो, तुम्हाला प्रोत्साहन देतो, आशीर्वाद देतो आणि ते स्वीकारून तुमचं बळ वाढत असतं. ह्याची सगळ्याची जाणीव मला त्या नागपूरच्या कार्यक्रमात फार चांगल्या पद्धतीने झाली.

सगळेच कार्यक्रम फार मला वेगवेगळे अनुभव देत असतात. प्रत्येक ऑडियन्स (प्रेक्षक) तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. रत्नागिरीच्या कार्यक्रमात सांगण्यासारखी आठवण म्हणजे तिथे आमचे नितीन कानविंदे म्हणून मित्र आहेत - आयोजक. त्यांनी खूप मेहनत घेऊन तो सगळा कार्यक्रम आयोजित केला होता. खूप संख्येने लोक हजर होते. जवळजवळ सातशे-आठशे लोक रत्नागिरीसारख्या तुलनेने कॉन्झरवेटिव्ह (पुराणमतवादी) गावात ह्या कार्यक्रमाला होते. सगळ्यात महत्त्वाचं इथे सांगायचं म्हणजे आधी हा ऑडियन्स थोडा टाईट होता. अजिबात मोकळा होत नव्हता - दहा मिनिटं. पण माझी सासुरवाडी कोकणातली असल्यामुळे मला माहीत आहेत कोकणातले लोक. त्यामुळे मी शांतपणे जरा त्यांना खुलं केलं. आणि मग जे काही रंगलं अगदी वन्स मोअर, शिट्ट्या आणि सगळंच. फार मजा आली.

आणखी एक गमतीशीर आठवण सांगायची लयपश्चिमा कार्यक्रमाची तर ती अशी की परदेशी पाहुणे यायचा लयपश्चिमाला योग असतो. मरिन गद्रे नावाची एक औद्योगिक संस्था आहे, त्यांचे जर्मन पाहुणे होह्या रत्नगिरीच्याच कार्यक्रमाला ते. नागपूरच्या कार्यक्रमात महेश एलकुंचवार यांच्याबरोबर त्यांचे रशियन स्नेही होते. कित्येक ठिकाणी परकीय देशातले लोक लयपश्चिमाला येत असतात. आडगावात येत असतात. त्यांना ते छान वाटतं, आवडतं आणि सुद्धा मधलं नरेशन (कथन) मी मराठीत करत असतो.
https://www.youtube.com/watch?v=xeN6yiTzlg8 (लयपश्चिमाची दुसरी झलक)

३. तुमचा कार्यक्रम 'लयपश्चिमा' सध्या फक्त महाराष्ट्रात आणि मराठीतूनच होतो की हिंदीतून, इंग्लिशमधून इतर राज्यात, देशातही होतो? नसल्यास करायला आवडेल का?

डॉ. : लयपाश्चिमा मी काही फक्त मराठीतून करत नाही, तर इंग्लिशमध्येही करतो. ह्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सेंट झेविअर्समध्ये जेव्हा लिटफेस्ट होता, तेव्हा त्यामध्ये मी प्रथम हा इंग्लिशमधून केला आणि त्यानंतर नागपूरला VNITमध्येदेखील केला. तर तोही एक वेगळा प्रवास चालू झालाय. देशभर होईल. कदाचित परदेशातही दौरे होतील. मीही अधीरतेने वाट बघतोय. मला असं नेहमी वाटतं की हे माझं शिडाचं गलबत आहे. मी शीड मोकळं करून ठेवलंय. वारा खूप सुटलाय. आता वाट बघतोय की कुठे मला वारा नेणार आहे ते.

1

४. लेखक म्हणून तुमचे पहिले पुस्तक 'मुळारंभ'. ह्या पुस्तकाविषयी काय सांगाल?

डॉ : 'मुळारंभ' हे लेखक म्हणून माझं पहिलं पुस्तक आहे, पण प्रकाशित झालेलं दुसरं. 'नवे सूर अन् नवे तराणे' हे आधी २०११मध्ये प्रकाशित झालं आणि 'मुळारंभ' हे २०१४मध्ये झालं. 'मुळारंभ' हे माझ्या आयुष्यात मला अत्यंत महत्त्वाचं असं वाटतं. मी त्याच्या प्रस्तावनेत लिहिलंही आहे की मुळारंभ नावाचं एक मोठं स्वप्न मी पाहिलं आणि ते आज पूर्ण होतंय ह्याचा आनंद आहे. तर ते स्वप्न फक्त काही लिहिण्यापुरतं नव्हतं, तर जगण्यातलं होतं. माझ्या जगण्याचा हिस्सा झालेलं असं ते पुस्तक आहे. २००६ ते २००९ ही तीन वर्षं माझ्या आयुष्यातली अत्यंत समृद्ध असा अनुभव देणारी मला वाटतात ती मुळारंभमुळे. वैयक्तिक आयुष्यात त्या वेळी अनेक ताणतणाव असले, तरी मी त्याच दरम्यान मुळारंभ कादंबरीचं लेखन करत होतो.

मी काही ठरवूनही करत नव्हतो की मला आता कादंबरीच लिहायची आहे. मला आधी तर वाटलं की मी कथा लिहायला घेतलीय. मग वाटलं की दीर्घकथा होतेय हां. आणि मग ५०-६० पानं झाल्यावर माझ्या लक्षात आलं की मी जे काही करतोय ते छोटं नाहीय. मला जो अनुभव लिहायचाय तो थोडक्यात मांडताच येणार नाहीये आणि बहुतेक मी कादंबरी लिहितोय. इतक्या अनकॉन्शसली (अभावितपणे) कोणी कादंबरी लिहिली असेल का, ह्याविषयी मला शंका वाटते. अगदी उधाण आल्यासारखी मी ती लिहीत गेलो. पण वेळ दिला. घाई केली नाही. संस्करणं केली. मला खूप प्रकर्षाने वाटतं की ह्या पद्धतीचं इंटेन्स पुस्तक मी पुढे कधी लिहू शकेन का? म्हणजे उत्तम लिहीन अशी आता मला जवळजवळ खातरी आहे की इतपत आता आपण अभ्यास केल्यावर उत्तम लिहू शकतो, पण मुळारंभमध्ये जी इंटेन्सिटी आहे भाषेला, आशयाला, ती मला वाटतं खास त्या वयाची म्हणून असलेली असते. म्हणून जेव्हा सरतेशेवटी २०१४मध्ये ते प्रकाशित होणार होतं, तोपर्यंत बरंच पाणी वाहून गेलं होतं. माझं पहिलं पुस्तक आलं होतं. मी काही नवखा लेखक राहिलो नव्हतो. माझं सादर चालू होतं. तर एडिटिंगच्या टप्प्यावर असताना असं खरंच वाटलं की आणावं का हे पुस्तक बाहेर? किंवा चुका दिसत होत्या मला काही काही, तर त्या करेक्ट कराव्यात का? पण नंतर शेवटी मी असा निर्णय घेतला की असं काही करू नये. कारण त्याचं जे चैतन्य आहे ते आधी फार महत्त्वाचं आहे. ते आपण ही सगळी प्रक्रिया करताना हरवून बसू. आणि आजही मला असं वाटत की मुळारंभचं जे चैतन्य आहे, ते इतकी वर्षं मी लिहिल्यानंतर आणि आता प्रकाशित होऊन अडीच वर्षं झाल्यानंतर वाचकांना आवडतंय ते.

तो काळ जागतिकीकरणानंतरचा अगदी जो आताचा टप्पा आहे, त्याची सुरुवात दाखवणारा असा काळ आहे. पहिले जे बदल जागतिकीकरणानंतर झाले, ते बाह्य रूपात झाले नाहीत, तर आधी मानसिकतेवर पहिले होत गेले. पहिली मनं बदलली आणि मग शरीरं आणि त्याचे तंत्रज्ञानाचे वापर बदलत गेले. तर मन बदलण्याची जी पिढी आहे ,ती माझी पिढी आहे. तर माझ्या पिढीचं छोटंसं असं काढलेलं चित्र आहे. मला वाटत मी ते रेखीव आणि बारकाईने काढलं आहे. त्यात प्रेम आहे, विश्वास आहे, विश्वासाला तडा जाणं आहे. घाबरणं आहे आणि भीतीवर जिंकणंदेखील आहे. त्या कादंबरीत अठरा वर्षाच्या एका मुलाचा (ओमचा) पुरुषामध्ये रूपांतरित होण्याचा एक प्रवास आहे. त्याची अनेक अर्थाने होणारी वाढ - शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक - सगळी घुसळण जी आहे त्या वाढीमधली, ते जे टप्पे आहेत ते त्या कादंबरीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं - मुळारंभ वाचताना काही वाचकांची अशी फसगत झाली की त्यांना ती मेडिकल कॉलेजच्या बॅकग्राउंडवर जशी एखादी कादंबरी असते तशी आधी ती वाटत गेली. चांगल्या वाचकांना लगेचच निम्म्यापर्यंत आल्यावर कळलं की हे वेगळं प्रकरण आहे, कारण ते वेगळंच होतं. मी माणसाच्या अटळ एकटेपणाविषयी बोलत होतो. त्यातल्या पहिल्या प्रकरणापासून शेवटपर्यंत. आणि खूप जाणीवपूर्वक. लिहितानाही मला ते दाखवायचं होतं. त्यामुळे त्याचा शेवट लोकांना अनपेक्षित वाटला. उदास करणारा वाटला तसा शहाणंही करणारा काही जणांना वाटला.

निरंजन कुलकर्णी नावाचा माझा एक आर्किऑलॉजिस्ट (पुरातत्त्वशास्त्रज्ञ) मित्र आहे, ज्याच्याशी ह्या पुस्तकानंतर माझी मैत्री झाली. आधी ओळख नव्हती. त्याने 'राजहंस'ला पत्रही पाठवलं की त्याला हा शेवट उपनिषदेतील प्रार्थनेसारखा वाटला. मला खूप छान वाटलं. नुसतं कौतुक केलं म्हणून नाही, तर ती प्रतिक्रिया खूप गहिरी वाटली. आणि उपनिषदांइतकं ते चांगलं आहे की नाही मला माहीत नाही, कारण माझा उपनिषदांचा काही अभ्यास वगैरे नाही. पण असं मला वाटतं की प्रार्थनेसारखं होतं ते. त्या अटळ एकटेपणाचा स्वीकार ओमने केला होता कुठेतरी. पण आतल्या एका स्तरेवर खूप मस्ती आहे, दंगा आहे. छान जग आहे कॉलेजचं. सगळं छोटं जग आहे आणि त्या छोट्या जगातच आपल्याला सगळं काही मोठं वाटत असतं. पण जेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे सगळं छोटं जग आहे, तेव्हा तुमच्या जगण्याचा खरा प्रारंभ होत असतो. तोच मुळारंभ असतो. सिद्धार्थ केळकर माझा मित्र आहे. त्याने तर वाचक म्हणून फार सुंदर अशा ज्या प्रतिक्रिया दिल्या की त्याने मला समृद्ध व्हायला झालं. मुळारंभचं जसं कौतुक झालं तशी टीकाही केली गेली. पुरस्कार चांगले मिळाले. २०१४च्या मध्यावर आलेली कादंबरी अजूनही वाचली जातेय. आताच नुकतं जुई कुलकर्णी, ज्या साहित्य सूचीत समीक्षा करत असतात, त्यांनी फेसबुकला एक पोस्ट टाकलीय. तुम्ही वाचू शकता.

ह्या वर्षी खरं तर जास्त वाचक भेटताहेत. नवीन पिढीला त्या पुस्तकातील जग अनोळखी, जुनं वाटत असावं. पण त्यातील माईंडसेट आहेत ते नवे आहेत. ते बहुधा ह्या तरुण पिढीला आपलेसे वाटत असावेत. रिलेशनशिप्स जिथे हल्ली आज अत्यंत हलत्या अशा दिसतात, तिथे मुळारंभमधील मैत्रीचे नातेसंबंध गहिरे, खोल जाणारे आहेत. उथळ, वरवरचे काहीही नाही आहे. ना प्रेम उथळ आहे ना भांडण उथळ आहे. तर ह्या अनेक टप्प्यांवर मुळारंभ एक कसदार कादंबरी, अर्थात त्यातील मर्यादांसकटही आहे; असं आज मागे वळून बघताना मला वाटतं. इथे आणखी एक सांगावस वाटतंय की मी माझ्या लेखनातून नंतर स्वतःला अलिप्त ठेवतो. म्हणजे कुणाला कादंबरी नाही आवडली आणि मला सरळ सरळ तोंडावर सांगितलं, तरीही मला खरंच काहीही फरक पडत नाही. हे प्रत्येक वाचकाचं स्वातंत्र्य असतं. आणि मुळारंभ ह्या कादंबरीच्या मी प्रेमात आहे असं मला वाटत नाही. तो काळ तर कधीच माझ्यासाठी संपलाय. आणखीही एक मुद्दा होता की खूप जणांना ते सगळं आत्मचरित्रपर वाटलं, कारण त्याला डेंटल कॉलेजची पार्श्वभूमी आहे. अर्थात काही प्रमाणात तुम्ही उतरता तुमच्या कुठल्याही लेखनात.

मी तर म्हणेन की मी माझ्या सदारांमध्ये आहे, लयपश्चिमामध्येही आहे. लपून आहे पण आहे. पण ते आख्ख तसंच्या तसं मांडणं ही कादंबरी कधीच नसते. कल्पिताचा आणि सत्याचा तुम्हाला छान मिलाप जितका करता येतो, ते लेखकाचं कौशल्य असतं. आणि तेवढंच करून फक्त भागत नाही, तर मुळात ती एक दृष्टीही लागते. ती दृष्टी लिहिताना तुम्हाला मिळत जाते. ती मागून मिळत नाही. लेखनसिद्धी ही तुम्हाला लिहितानाच मिळते. मुळारंभचा मला एक मोठा फायदा झाला म्हणजे पर्सनल लेव्हलला कुठेतरी मीच एक पायरी पुढे गेलो. पुढच्या दिशा दिसायला लागल्या. त्याअर्थी मला त्या कादंबरीविषयी कृतज्ञता आहे.

५. 'वीण' हा तुमचा म्युझिक व्हिडिओ चांगलाच गाजला. त्याविषयी आणि येऊ घातलेल्या नवीन व्हिडिओविषयी जाणून घ्यायला आवडेल.

डॉ. : वीण हा म्युझिक व्हिडिओ खरोखरीच खूप गाजला. खूप कौतुक केलं लोकांनी. अगदी नंदुरबारपासून, दिल्लीपासून ते अमेरिकेपर्यंत मराठी आणि अमराठी दोन्ही माणसांनी केलं. मी मुद्दाम त्याला इंग्लिशमधून सबटायटल्स दिली आहेत. संगीत आणि साहित्यिक क्षेत्रातल्या खूप जाणत्या अशा माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनी, बुजुर्ग कलाकारांनी सगळ्यांनी कौतुक केलं. त्यामागचा फोकस मात्र मी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली तेव्हा स्पष्ट केला होता की कुठेतरी मी संगीताचं लोकशाहीकरण या दृष्टीने ह्या व्हिडिओकडे बघतो आहे. मुळात मी हा व्हिडीओ ऑनलाईन माझा मी लाँच केला. कुठल्या कंपनीतर्फे गेलो नाही. कोणी ऑफिशिअल पार्टनर घेतले नाहीत. रेडिओवर ऐकू येणार नाही किंवा कुठल्या चॅनलवर हे दिसणार नाही. नुसत्या यू ट्यूबच्या माध्यमातनं, मित्रमैत्रिणींच्या माध्यमातनं पुढे गेलं. आणि एकदा आवडलं की ते आणि पुढे पुढे पोहोचत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडीओ करताना मी जसा आहे तसाच दिसतो. पस्तिशीतला आहे तर पस्तिशीतलाच दिसतो. कसलाही मेकअप मी केला नाही.

सिंगापूरला मी खरंच फिरायला म्हणून गेलो होतो. गाणं तोवर तयार होतंच. तिथलं लोकेशन मला आवडलं. तेव्हा तिथे शूट करायचं ठरवलं. मी आणि माझ्या बायकोने तिथे यु कि योंक नावाचा एक कॅमेरामन शोधून काढला. तो खरं तर चायनीज लग्नांचे व्हिडिओ शूट करतो. यू ट्यूबवर त्याचे व्हिडिओज चांगले वाटले. त्याची मदत घेतली. शूटिंग अक्षरशः अडीच-तीन तासात केलं. मी त्यासाठी कोणीही सुंदर मॉडेल घेतली नाही. जे मार्केटचे निकष असतात ते तिथूनच मी तोडायला सुरुवात केली. त्यात चकाचक ग्लॅमरस काही दिसलं नाही. कारण मला असं वाटतं की आख्खं जगणंच ग्लॅमरस असतं असं नसतं. तर मग गाणं का? संगीत का? कविताही का? तुमच्या जगण्यासारखंही एखादं गाणं असू शकतं. असे कुठेतरी आत हे कप्पे होते. आणि ते वीणच्या निमित्ताने मला वाटतं बाहेर आले. आता हा एवढा तात्त्विक भाग सोडला, तर वीण हे मुळात अत्यंत छानसं हळवं असं एक गाणं आहे. सगळ्या माणसांना आपल्याला प्रेम हे आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत असतं. कधी मिळतं, कधी मिळत नाही, कधी हातातून सुटतं. कधी कधी आपणच पुढे सरकत जातो त्या प्रेमाच्या. ह्या सगळ्या छटा मला वाटतं की वीणमध्ये आल्या आहेत. ह्या व्हिडिओमुळे एक वेगळाच पायंडा पडताना दिसतोय. मी लिहिलेलं, गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अशा पद्धतीचं ते माझं गाणं आहे आणि त्याचा व्हिडिओ त्या पद्धतीचा आला आहे. तर नवा इंडिपेन्डन्ट मुझिकचा सीन ह्या निमिताने मराठीत चालू झालेला मला आता दिसतोय.

आता माझं दुसरं गाणं येतंय. ते मी आणि सावनी रवींद्र असं दोघांचं आहे. दिवाळीनंतर ते येईल. ते अजून वेगळ्या तर्‍हेचं गाणं आहे. ते द्विभाषिक आहे. मी त्यातला इंग्लिश भाग गायलोय, तर सावनीने मराठी भाग गायलाय. तर मला वाटतं की हे स्वतःला एक पुन्हा शोधणं असतं की लेखक म्हणून तुम्ही असताच, पण गायक म्हणून तुम्ही कसे आहात, संगीतकार म्हणून कसे आहात. आणि मूळ एक्स्प्रेशन मला द्यावीशी वाटते म्हणून मी ती देतोय. तर वीण हा मला लँडमार्क माझ्या करिअरच्या दृष्टीने फारसा वाटत नाही. पण मराठीत जो इंडिपेन्डन्ट म्युझिक सीन नव्हता, तो ह्या गाण्याने चालू झालाय हे मात्र मी नक्की सांगू शकेन.
https://www.youtube.com/watch?v=qTJ3xuwSY2I (वीण)

६. तुमचे लेख वाचताना वाचकाला ते लेख खूप जवळचे, मनमोकळे वाटतात. ह्याचं रहस्य काय आहे?

डॉ. : माझे लेख वाचताना बरेचदा वाचकांनी मला असं सांगितलंय की तू लिहीत नाहीस, तू बोलतोस, गप्पा मारतोस. खूप जणांना त्याचं कौतुक वाटतं, तर काही जणांना ते आवडत नाही. काही जणांना वाटतं की हे टू मच कॅज्युअल (खूप साधं सोपं) असं आहे. पण मग त्याचीही गंमत अशी होते की एखाद्या माझ्या त्या कॅज्युअल विधानामागे एखादं असं सणसणीत अत्यंत अ‍ॅकॅडेमिक असं विधान आल्यामुळे समीक्षकांना मला मोडीतदेखील काढता येत नाही. तर मला असं वाटत की मी अत्यंत जाणीवपूर्वक एका मधल्या सीमारेषेवर उभा आहे की जिथे मी एकाच वेळी अभिजात भाषादेखील वापरतो; जेव्हा मला वापरायची असेल तेव्हा आणि त्याच्या लागोपाठ पुढे मागे बोली भाषादेखील मी वापरत असतो. बोली भाषेची वळणं वापरत असतो. इंग्लिश शब्द वापरत असतो. हे कॉम्बिनेशन मला मराठीत पटकन आढळत नाही. क्वचित असेलही. मी असं नाही म्हणत की माझं एकट्याचंच असेल, पण मला तरी पटकन दिसलेलं नाही.

साधारणतः असं असतं की माणसं एकतर बोली भाषेत लिहितात किंवा अभिजात दर्जा जर एकदा प्राप्त झाला, तर त्यातच लिहायला लागतात. हे जाणीवपूर्वक मिश्रण मी अशासाठी करतो कारण आपण तसे जगतही असतो - व्यामिश्र. आपण नसतो सतत एकाच प्रतलावर जगत. त्यामुळे कम्युनिकेट जेव्हा मला करावंसं वाटतं की अरे, हे वाचकांपर्यंत मला पोहोचवायचंय तेव्हा मी बोली भाषाच वापरणार. आणि मग एकदा ते माझं ऐकायला लागले की जसं गप्पा मारतानाही गप्पा रंगल्यानंतर आपण अवघड जरी काही बोललो, तरी समोरच्या माणसाला सगळं काही कळतं, तशी माझी मध्ये अभिजात भाषा येते आणि तीही अगदी सामान्य भाषाज्ञान असलेला वाचक एखादा असेल तर त्यालाही ती कळते. निदान ती कळून घ्यायचा उत्साह त्याच्यात राहतो आणि उत्सुकतादेखील त्याला लागते. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या ह्या लेखन प्रवासाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की एक पद्धतीने ते कम्युनिकेटिव्ह असे लेख आहेत. मोकळे आहेत, कारण मला वाटतं लेखकाचा स्वभावही उतरत असतो. मी मोकळा आहे. मला हात राखून वाचकांना काही सांगायचंच नाहीय. मला समजा समीक्षा लिहिताना, आता ''वा! म्हणताना...' लिहिताना सदरात आनंद मिळालाय, तसंच लयपश्चिमात समजा गाणं ऐकताना आनंद मिळालाय, तर तो मला पोहोचता करायचाय. पण मग तो मला असाही नाही पोहोचता करायचाय की मला छान आनंद झालाय आणि मी तो फक्त शेअर करतोय. तर माझी त्यात काय मतं आहेत, त्याचा मला काय रेलेवन्स (समर्पकता) वाटतोय आसपासच्या घटनांशी, समाजाशी, परिस्थितीशी, माणसांशी हेदेखील मला जाणवून द्यायचं असतं. मग तो जो शेअर करण्याचा भाग आहे तो बोली भाषेत येतो. वाचकांना ओढून घेतो आणि त्यानंतर माझं विश्लेषण असतं ते अभिजात भाषेत येतं. तेही वाचकांना कालांतराने आवडायला लागतं. त्यामुळे हा प्रश्न मला खूप आवडला. कारण माझ्या लेखनाकडे खूप कमी वेळा ह्या नजरेतून लोकांनी बघितलंय. त्यामुळे माझा मित्र मला नेहमी सांगतो की तू कध्धीच लिहीत नाहीस, कायम बोलत असतोस. ते खरंय की मी बोलत असतो. पण मी बोलतानाही कधीकधी जड बोलतो, तसंच कधीकधी लेख लिहितानाही - जेव्हा आवश्यक असेल तेव्हा. प्रत्येक अनुभवाची एक मागणी असते. कसे शब्द पाहिजेत, कुठे पाहिजेत? त्या अनुभवाला तुम्ही शरण जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं.
1

७. डेंटिस्ट म्हणून व्यवसाय करत असताना अचानक कला शाखेकडे कसे वळलात? तुम्ही इंग्लिशमधून एम.ए. केलंत आणि तेसुद्धा प्रथम क्रमांकाने.

डॉ. : मी डेंटिस्ट असताना कला शाखेकडे अचानक वळलो असं खरं तर झालं नाही. ती एक मोठी प्रक्रिया होती. मुळात मी डेन्टिस्ट्रीला गेलो ते त्या काळात जे काही पर्याय होते त्यात एक बरं आर्थिक स्थैर्य देणारं क्षेत्र म्हणून. मला आवडही होती शास्त्राची. खूप मनापासून. आणि मग MBBSपेक्षा डेन्टिस्ट्रीला इमर्जन्सीज कमी असतात आणि आपल्याला गायला व लिहायला वेळ मिळेल असंही मला त्या वेळी अंधुकसं जाणवलं होतं म्हणून. पण प्रत्यक्षात असं काही नसतं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात की अडकता ही गोष्ट नंतर कळते. पण तरीदेखील तो एक कुठेतरी धागा होता. मनापासून मी डेन्टिस्ट्री केली. आजही करतो, प्रॅक्टिस करतोय. पण जसजसा माझा कल गायनाकडे आणि लेखनाकडे झुकायला लागला आणि जेव्हा विशेषतः 'मुळारंभ' या माझ्या पहिल्या कादंबरीच्या लिहिण्याचा प्रवास झाला, तेव्हा माझ्या बायकोच्या खरं पहिलं लक्षात आलं की मला इतकी ओढ वाटतेय; तर तिने मला सुचवलं की तू सरळ शिक्षण घे ह्यात पुढचं. कुठेतरी माझ्याही मनात घोळत होतं. मग मी सरळ एम.ए. इंग्लिशचा फॉर्म भरला. पुणे विद्यापीठात दोन वर्षं खूप मन लावून अभ्यास केला. स्वतःमध्ये खोल उतरत गेलो, त्या साहित्यामध्ये खोल उतरत गेलो. आणि मग कुठेतरी ते सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं की एक स्थैर्य तुम्हाला येतं. एक वेगळ्या पद्धतीचा प्रत्यय येतो की सगळेच अभ्यास, म्हणजे 'सगळे नमस्कार अंती केशवाला जातात' म्हणतात तसे, सगळ्या स्वरूपाचे अभ्यास - शास्त्र शाखेचे असतील, कला शाखेचे असतील - हे अंतिमतः एकाच कुठल्या तरी दिशेने झुकत असतात. आणि मग इतकं उतरत गेलो खोल की पहिलाच आलो विद्यापीठात. म्हणजे पहिलं येणं, पुढे प्राध्यापक होणं किंवा त्यात करिअर करणं असे काही उद्देशच नव्हते. पण आलो हे खरंय. मग मात्र मी नंतर विझिटिंग फॅकल्टी म्हणून भारती विद्यापीठाच्या वाय.एम. कॉलेजमध्ये आता गेली चार-पाच वर्षं काम करतोय आणि खूप मजा येतेय. तुमचा शैक्षणिक क्षेत्राशीही संबंध राहतो. त्यातनं आता माझ्या पुढच्या नव्या कादंबरीची सगळी बीजं मला मिळताहेत. माझे परदेशी खूप विद्यार्थी-विद्यार्थिनी असल्याने. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही उतरत जाता, अनुभव घेत जाता. ते करताना आर्थिक स्थैर्य थोडंसं कमी होईल, त्या काळामध्ये तेव्हा घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. तो मला माझ्या बायकोचा होता, हे आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि मग पुढे गोष्टी होत जातात आपसूक.

८. मा. मंत्री श्री. प्रकाश जावडेकर हे तुमचे वडील असल्यामुळे एक प्रश्न ओघाने येतो. तुम्हाला राजकारणात किती रस आहे?

डॉ. : बाबांचं आणि माझं नातं कसं असतं, त्यांच्या पदाचा मला काय लाभ होत असावा, मी राजकारणात जाणार आहे का असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात - अर्थात त्यांना ते कळलं तर की माझे वडील प्रकाश जावडेकर आहेत हे! मी बोलत नाहीच, आणि मीडियात तशा बाप-लेक वगैरे मुलाखतीही मी सहसा देत नाही. आमचं नातं सगळ्या चांगल्या घरातल्या बाप-लेकांसारखं आहे - त्यातले ताणेबाणे, आत्मीयता आणि प्रेम आणि भांडणही... सगळ्या घरात असतात तशीच आणि तितकीच आहेत. प्रत्यक्ष सहवास मात्र आता अगदी कमी मिळतो हे खरं. पण भेटल्यावर पटापट सगळा बॅकलॉग भरून निघतो - तशी लहानपणापासून सवयच झाली आहे म्हणा! :) बाबांना माझी गाणी आवडतात, वीण तर त्यांना फारच आवडलं! माझे सदर, लेख लोकसत्तामध्ये असल्याने आणि तो पेपर दिल्लीत दिल्लीतूनच निघत असल्याने रविवारी सकाळीच त्यांना मिळतात आणि अनेकदा पहिला फोन त्यांचा असतो. आता राजकारण : माझा तो पिंड नाही हे खरं, पण said that, मला राजकारण उत्तम समजतं! हिलरी क्लिंटन आणि भारतीय ज्यू यांच्यावर लिहिलेले लेख पूर्वी गाजले आहेत. माझी राजकीय विचारसरणी ही मला कुठल्या पक्षात बसवावी वाटत नाही, ती मध्यममार्ग पकडणारी आहे आणि उजवे-डावे असे सारे माझे मित्रही आहेत. International politics (आंतरराष्ट्रीय राजकारण) हा माझा आवडता विषय आहे आणि आता माझ्या आगामी इंग्लिश कादंबरीत तो उतरणार आहे!
1

९. तुम्ही व्यवसायाने डेंटिस्ट आहात आणि आता एक लेखक, गायक, कवी, संगीतकार, एक परफॉर्मर अशी ओळख मिळाली आहे. तुमची स्वतःची लाडकी ओळख कोणती? शिवाय सध्या असलेल्या ओळखीव्यतिरिक्त आणखी कोणती वेगळी ओळख निर्माण करायला आवडेल का? उदाहरणार्थ अ‍ॅक्टर, डान्सर किंवा इतर काही....

डॉ. : नाही. इतर आणखी कसलीही ओळख - अ‍ॅक्टर, डान्सर असली काहीही मला आवडणार नाही. करिअर म्हणून मी लिहितो, गातो आणि दात काढतो हे तर सांगितलंच आहे. पण मला खूप चांगली ओळख, माझी स्वतःची आयडेंटिटी म्हणून जी पहिली वाटते, ती म्हणजे मी माझ्या बायकोचा चांगला मित्र नक्की आहे. नवरा कसा आहे ते तीच ठरवेल. चांगला आहे की काय आहे ते. पण मित्र मी खातरीने चांगला आहे. माझ्या 'मुळारंभ' ह्या कादंबरीची अर्पणपत्रिका मी 'मानसी भावे जावडेकर ह्या माझ्या सर्वोत्तम मैत्रीणीस' अशी लिहून दिली आहे. ती अत्यंत मनापासून दिली आहे. आजही माझी ती भावना आहे. ती माझी ओळख मला आवडते. आणि आता त्याहून मला माझी सगळ्यात आवडणारी ओळख आहे ती म्हणजे आरोहीचा - माझी मुलगी जी आता सहा वर्षांची होईल - तिचा मी बाबा आहे. आणि जेव्हा ती छान तिच्या गोड आवाजात "आशु, आशु" अशी मला हाक मारत असते, तेव्हा ती ओळख मला बाकी सगळ्या ओळखींपेक्षा अधिक अर्थपूर्ण, महत्त्वाची आणि प्रगल्भ करणारी अशी वाटते.
https://www.youtube.com/watch?v=ysBogmjtKXU (नवे सूर अन् नवे तराणे)

कामात अतिशय व्यग्र असतानाही वेळात वेळ काढून मिपासाठी ही दिलखुलास मुलाखत दिल्याबद्दल समस्त मिपा परिवारातर्फे मी डॉ. आशुतोष जावडेकर यांचे आभार मानते आणि त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.
धन्यवाद!
- उल्का कडले

1

प्रतिक्रिया

झकास मुलाखत! लोकसत्तामधलं जावडेकरांचं सदर मी वाचते आणि बर्‍याचदा आवडतं.
धन्यवाद!

पद्मावति's picture

29 Oct 2016 - 6:33 pm | पद्मावति

अतिशय गुणी कलाकार आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची सुंदर मुलाखत. धन्यवाद उल्का.

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Oct 2016 - 12:05 am | माम्लेदारचा पन्खा

धन्यवाद !

उल्का's picture

31 Oct 2016 - 12:26 pm | उल्का

सर्वांची आभारी आहे.
यू ट्युब लिंक्स जरूर पाहाव्यात ही विनंती.
खूप छान आहेत.

पैसा's picture

31 Oct 2016 - 9:59 pm | पैसा

खूप छान! डॉक्टर अगदी मनापासून बोललेत आणि उल्काने प्रश्नही नेमके विचारलेत! जियो!

मारवा's picture

1 Nov 2016 - 10:28 pm | मारवा

Simply superb !

सर्वगुणसंपन्न असे व्यक्तिमत्व म्हणायला हवे.
मुलाखत आवडली.

पिलीयन रायडर's picture

2 Nov 2016 - 9:44 pm | पिलीयन रायडर

केव्हाची ही मुलाखत वाचायची होती. आज सवडीने वाचली. थक्क झाले! एका माणसाकडे एवढे गुण कसे काय असु शकतात?

विशेष उल्लेखनीय बाब ही आहे की तू मुलाखत फार सुंदर घेतली आहेस ग! अगदी नेमके प्रश्न आणि सादरीकरणही व्यवस्थित.

सुंदर मुलाखत. लयपश्चिमा बद्दल नुकतंच वाचण्यात आलं आणि तुझ्यामुळे आज त्याचे व्हिडीओ पण बघायला मिळाले. नेमके प्रश्न विचारले आहेत अगदी आणि ते पण मनापासून बोललेत. सुरेख !

मॅजेस्टिक गप्पांबद्दल बरंच ऐकुन आहे. थोडी माहिती दे ना प्रतिसादातच.

अजया's picture

2 Nov 2016 - 10:34 pm | अजया

मुळारंभ वाचल्यापासून समव्यवसायिक असणाऱ्या आशुतोष जावडेकरांबद्दल कुतुहल होते.हा माणूस हे लिहिणं वाचणं गाणं सगळंच इतकं उत्कृष्ट कसं जमवतो बुवा!
फार सुंदर मुलाखत.धन्यवाद उल्का.

उल्का's picture

4 Nov 2016 - 11:28 am | उल्का

मे 1973 मध्ये पुण्यात ‘मॅजेस्टिक गप्पां’ना प्रारंभ झाला. ‘मॅजेस्टिक साहित्यिक गप्पा’ म्हणून सुरू झालेल्या या गप्पांचे स्वरूप सुरुवातीला निखळ वाङ्मयीन होते पण कालांतराने सामाजिक-राजकीय-आर्थिक प्रश्न, आरोग्य, लेखक-कलावंतांच्या मुलाखती असे गप्पांचे स्वरूप बदलले. ‘मॅजेस्टिक’तर्फे होणार्‍या गप्पांचे लोण महाराष्ट्रभर पसरले. 1984 पासून विलेपार्ले येथील ‘लोकमान्य सेवा संघा’च्या सहकार्याने दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘मॅजेस्टिक गप्पां’चे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रांतील नामवंत या गप्पांमध्ये आवर्जून सहभागी होतात. 2008 च्या जानेवारी महिन्यात पंचवीस वर्षे पूर्ण झालेल्या ‘गप्पा’ पार्ल्याच्याच नव्हे तर, मुंबईच्या सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे अंग बनल्या आहेत. महाराष्ट्रात रसिकप्रिय ठरलेल्या या वाङ्मयीन उपक्रमाचे श्रेय नि:संशयपणे केशवराव कोठावळे यांना दिले जाते.

वरील माहिती मॅजेस्टिक प्रकाशनच्या साइट वरुन घेतली आहे.
Majestic

मी ह्या वर्षी प्रथमच गेले होते. गप्पा, मुलाखत, चर्चा असे एकन्दर स्वरूप असते. शिवाय पुस्तकांचे प्रदर्शन असते. एकुण ८ ते १० दिवस कार्यक्रम असतो. रोज सा. ७ ते ९ या वेळेत होतो. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

गेल्या काही वर्षांपसुन बोरिवली येथे 'शब्द' गप्पा अयोजित केल्या जातात.

ह्या मॅजेस्टीक गप्पांबद्दल अधिक लिही ना.

अगं ह्या वर्षी मॅजेस्टिकने एक स्पर्धा घेतली होती. त्यात मी भाग घेतला होता. बक्षीस मिळाले होते. बक्षीस समारंभ शेवटच्या दिवशी ठेवला होता. डॉ आशुतोष जावडेकर ह्यांच्या हस्ते तो पार पडला. हा तो जुळुन आलेला योग. :-)
तर मीही हा एकुलता एकच कार्यक्रम अटेंड केलाय. ह्यावर्षीच! फार महिती (अनुभव) नाही.
पण मटा मिडिआ पार्टनर असल्यामुळे रोज पेपरमध्ये वृत्तांत वाचत होते. दरवर्षी वाचते.
मॅजेस्टिक गप्पा महाराष्ट्र टाइम्स असे गुगल सर्च करुन बघ. वाच, नक्की आवडेल तुला.
पुढच्या वर्षी मी अटेंड केल्यास मात्र नक्की लिहिन. :-)

यशोधरा's picture

4 Nov 2016 - 1:56 pm | यशोधरा

कसली स्पर्धा? काय बक्षीस मिळाले?

उल्का's picture

4 Nov 2016 - 2:46 pm | उल्का

Link

ह्यात सर्व डिटेल्स आहेत बघ.

पुंबा's picture

4 Nov 2016 - 3:58 pm | पुंबा

अभिनंदन उल्काताई.. कवितासंग्रह शोधणे खरेच अवघड वाटते कित्येक नावे तर अतिशय अनवट असतात.. ही मुलाखतदेखील सुरेख आणि सुरेल आहे..

स्रुजा's picture

5 Nov 2016 - 8:29 pm | स्रुजा

अरे वा ! अभिनंदन..

ते पत्रं ज्यातुन कवितासंग्रह ओळखले ते टाक ना मिपा वर.

स्वाती दिनेश's picture

4 Nov 2016 - 1:49 pm | स्वाती दिनेश

मुलाखत आवडली उल्का.
छान घेतली आणि लिहिली आहेस.
स्वाती

नूतन सावंत's picture

4 Nov 2016 - 10:40 pm | नूतन सावंत

सुरेख घेतली आहेस मुलाखत,मुलाखत घेणाऱ्याने योग्य प्रश्न विचारले तरचमुलाखत देणारा खुलतो.तू यात यशस्वी झाली आहेस.

प्राची अश्विनी's picture

5 Nov 2016 - 9:36 am | प्राची अश्विनी

फार छान ओळख/मुलाखत.

रोचक आणि कल्पक ओळख / मुलाखत.
पुरस्कारासाठी उल्काताईचे अभिनंदन !