मी भूत पाहिलंय, तुम्ही?

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in लेखमाला
29 Oct 2016 - 12:15 am

दर वर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी न जाता माझ्या मूळ गावी 'साखळी'ला, जिथे माझे काका-काकू, आजी- आजोबा राहतात, तेथे गेलो. मामाच्या घरी का नाही गेलो? याचं उत्तर काही माझ्याजवळ नाही, पण मागल्या वर्षी काकांनी मला 'साखळी'ला बोलावल्यावर काकू म्हणाली, "तो कसला येतोय? मामाला दोन मुली असल्यावर....." झालं. काकूंनी असा टोमणा मारल्यावर कोण जातंय हो मामाच्या घरी. मग ठरवलं की या वर्षी उन्हाळा काकांच्याच घरी.

काकांच्या घरासमोरच माझा बालसवंगडी राहायचा. त्याचं नाव महेश. पण लाडाने आम्ही सगळे मित्रगण त्याला 'म्हश्या' म्हणायचो. त्याच्या सोबत गप्पा मारताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लहानपणी आम्ही सर्व जण (मित्रपरिवार) शेतात दिवसभर हुंदडायला जायचो. आळीपाळीने एकमेकांच्या शेतात जायचो. पण आमच्या सर्वांच्या आवडीचं शेत म्हणजे म्हश्याच्या मामांचं शेत. म्हश्याचं शेतच नव्हतं. म्हणून आम्ही त्याच्या मामाच्या शेतात जायचो.

सकाळीच शेतात जाऊन, रात्रीतून पडलेले बेल्याचे (बेला नावाचं भलंमोठं आंब्याचं झाड होतं) पाड जमा करायचे. शेताच्या बांधाला लागूनच एक भला मोठा ओढा होता. त्यात उतरून खेकडे पकडायचे. खेकडे खात नसलो तरी पकडायचा भारी शौक. शेतातल्या बकरीचं दूध काढ, दुसर्‍याचे आंबे पाड, गुल्लर तयार करून कोणाचा दगड दूर जातो हा खेळ... असले उद्योग करून झाल्यावर आमचा मोर्चा वळायचा तो विहिरीकडे. दोन-चार उड्या मारल्याखेरीज आम्ही कधीच घरी आलो नाही. म्हश्याच्या मामांची विहीर होतीच तशी प्रशस्त आणि सुसज्ज. विहिरीत उतरायला कड्या होत्या. मजबूत बांधलेली होती. खडकही व्यवस्थित छाटलेले होते. पोहताना कधीच कोणाच्या पायाला खडक लागल्याचं आठवत नाही. फाउंडेशनही राखीव उंचीवर होतं. त्यावरून उड्या मारायला फार मज्जा यायची. गप्पा रंगल्या असतानाच काकूंनी गरम गरम चहा आणला. चहा पिता पिता म्हश्याला मी हळूच विचारलं, "जायचं का शेतात उद्या?"

"उद्या... नाही यार, दिवसा फार काम आहे." असं अनपेक्षित उत्तर मिळालं.

"मग संध्याकाळी जाऊ या." मी म्हटलं. यावर त्याने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात म्हश्याच्या आईची हाक कानी पडताच तो निघून गेला.

आमचा संवाद काकूंनी ऐकलाच होता. त्यांना माझी अन महेशची मैत्री आवडायची नाही. म्हश्याचं घर समोरच असल्यामुळे त्याचे सगळे कारनामे काकूंना तोंडपाठ होते. त्यांनी एक-एक सांगण्यास सुरुवात केली. गावात त्याच्या उनाडक्या वाढल्यामुळे त्याची रवानगी आदिवासी शाळेत झाली होती. तेथूनही तो पळून आला. आता शिक्षणाला पूर्णविराम होता. कामाचा तर त्याला खूप कंटाळा होता. घरचे सगळे त्याला वैतागले होते.

उद्या शेतात गेल्यावर ढुंकूनही त्या विहिरीकडे पाहायचं नाही, अशी काकूंनी मला तंबी दिली. "विहीर आता पहिल्यासारखी राहिली नाही." काकू सांगत होत्या. विहिरीत गवत माजलंय, शेवाळ साचलंय, काडीकचरा, पालापाचोळा आहे. मागे गावातल्या बाईने विहिरीत जीव दिला होता. त्या विहिरीत कोणीतरी एक-दोन जणांचे पाय पकडले होते, असंही काकूंनी ऐकलं होतं.
दुसर्‍या दिवशी दिवसभराची कामं उरकून म्हश्या घरी आला, तेव्हा घड्याळाने दुपारचे चारचे टोले दिले. शेतात फिरता फिरता मी म्हश्याला काकूंनी सांगितल्याप्रमाणे शहानिशा करण्यासाठी विहिरीबद्दल विचारलं, तर साहेबांनी आणखी दोन-चार आत्महत्या वाढवून सांगितल्या. तरीसुद्धा त्या विहिरीकडे जाण्याचा मी म्हश्याकडे हट्ट करू लागलो. पण फक्त वरून बघून येऊ या अटीवर तो तयार झाला.

विहिरीजवळ जाताच मला धक्का बसला. विहीर पार जुनाट दिसत होती. हीच ती लहानपणीची विहीर, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. काकूंनी सांगितल्याप्रमाणे विहिरीत गवत, शेवाळ, नको असलेली रोपटी, पालापाचोळा अगदी सगळं होतं. पण माझी नाळ त्या विहिरीशी इतकी घट्ट होती की, मी आपसूकच विहिरीत उतरू लागलो. माझ्यापाठोपाठ म्हश्याही उतरला. सर्व गवत उपटलं, शेवाळ काठीने गोळा करून काठावर टाकलं. एवढा कचरा असूनही खाली उतरण्याच्या कड्यांवर थोडीसुद्धा धुळ नव्हती, याचं मला आश्चर्य वाटलं. कुठेच जाळं नव्हतं की किडे-किटकुलं नव्हते. यावरून येथे रोज कोणाचा तरी वावर असावा असं मनात येऊन गेलं.

विहिरीतील साफसफाई होताच कड्यांना धरून वर चढत असताना माझं लक्ष एका खडकाकडे गेलं. त्यावर लिहिलं होतं, 'मला राग येतोय'. मला त्याचं हसू आलं. मी ते पाण्याने धुऊन, पुसून टाकलं. बहुधा खडूने लिहिलं असावं. बाहेरही आता अंधार पडला होता. मस्त वातावरण झालं होतं. रोज याच वेळी पोहायला यायचं, असं ठरवून आम्ही घराकडे परतलो.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी आम्ही पोहायला गेलो, तर अवाकच झालो. विहिरीत पुन्हा कचरा साचला होता. पालापाचोळा पडला होता. आजूबाजूला कोणतं झाडही नव्हतं पानं पडायला. मग ही येतात कुठून? आता मात्र मला भीती वाटू लागली. काकूंनी आणि म्हश्याने सांगितलेल्या आत्महत्येच्या गोष्टींशी मी याचा मेळ घालू लागलो. पोहून झाल्यावर कालच्या खडकाकडे बघितलं तर परत तेच लिहिलेलं होतं - 'मला राग येतोय'. मी परत खोडून टाकलं, म्हश्याच्याही नजरेस ही गोष्ट आणून दिली. त्यालासुद्धा याचं अप्रूप वाटलं.

नंतरचे दोन-तीन दिवस आम्ही संध्याकाळी सतत पोहायला जाऊ लागलो. परत तेच - कचरा, खडक, 'मला राग येतोय.' पोहून झाल्यावर मी म्हश्याला म्हटलं, "बाबा रे, आपण काकांच्या विहिरीत उतरत जाऊ उद्यापासून. या विहिरीत नको." यावर तो जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला, "काय भितोस रे तू, लहानपणापासून फट्टूच आहेस तू. जरा मोठा हो." म्हणतात ना 'अपमानाची पोळी सर्वांग जाळी....' हा अपमान सहन न होऊन मीही उसनं अवसान घेत म्हटलं, "ए, चल रे, घाबरतंय कोण? तू जरी नाही आलास ना, तरी एकटा पोहू शकतो म्हटलं मी."

दुसर्‍या दिवशी म्हश्या सायंकाळी पाच वाजता घरी आला, पण पोहायला जाण्यासाठी नव्हे, तर "मी आज येणार नाही" हे सांगायला आला होता पठ्ठया. त्याची मावशी सहा वाजता येणार होती. तो मावशीला घ्यायला बसस्थानकावर जाणार होता. जाता जाता भाऊने हळूच पिन मारली, "आज अमावस्या आहे बरं! जाशील नाही तर एकटाच." मला तर आधीच भीती वाटत होती, त्यात आता म्हश्या सोबत नव्हता, त्यात अमावस्या. जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण म्हश्याचे शब्द कानात घुमू लागले, "लहानपणापासूनच फट्टूच आहेस तू." मीसुद्ध त्याला, "तू जरी नाही आलास ना, तरी एकटा पोहीन" असं आव्हानात्मक उत्तर देऊन टाकलं होतं. मला काय माहीत दुसर्‍याच दिवशी आपल्यावर ही वेळ येणार आहे. या ठिकाणी माझ्या स्वाभिमानाने उसळी मारली. आता जाऊनच पाहू, 'आर या पार' या इराद्याने मी शेताकडे निघालो.

आज चक्क सहा वाजले होते घरून निघायला. ज्या वेळी आम्ही रोज घरी परतत होतो, त्या वेळी तर मी विहिरीत उतरणार होतो. आज पावलं एकदम हळू पडत होती. ती नेहमीपेक्षा जडही वाटत होती. मनात सतत धाकधुक - आज अमावस्या आहे, काही होणार तर नाही ना? काकूंनी सांगितल्याप्रमाणे कोणी आपला पाय पाण्यात धरून ठेवला, तर? बापरे! फक्त मी फट्टू ठरू नये एवढे सिद्ध करण्यासाठीच माझा आटापिटा सुरू होता.

शेताच्या वाटेने कुणी चिटपाखरूसुद्धा नव्हतं. त्या निरव शांततेत मला आणखीनच भकास वाटू लागलं. फक्त एक डुबकी मारून परत यायचं, या इराद्याने आता मी झपाझप चालू लागलो. आता किंचितसा उजेड शिल्लक होता. सूर्यदेवानेसुद्धा अमावस्येनिमित्त काढता पाय घेतला जणू. विहिरीत उतरून पहिल्यांदा ते खडकावरचं 'मला राग येतोय' पुसून काढलं. पण आज मात्र ते काही पुसलं जाईना. कितीही रगडलं तरी ते दिसतच होतं. ओल्या खडूने लिहिलं असावं बहुधा, अशी मनाची समजूत घालून विहिरीत उतरू लागलो. मला ती आणखीनच मोठी व रुंद वाटू लागली. पाणी पातळी खोल गेल्यासारखी वाटू लागली. खाली उतरून वर पाहिल्यावर विहीर गोल गोल फिरत आहे असा भास झाला. डोळ्यासमोर अंधारी आली. एरव्ही शांत असणारं पाणी मी मी म्हणत होतं. मला खुणावत होतं. कचरा साफ करण्याच्या फंदात आज मी पडणार नव्हतो, नुसती डुबकी मारून तर परत येणार होतो मी. आवंढा गिळत, जीव मुठीत धरून मी पाण्यात पाऊल टाकलं. पाणी रोजच्यापेक्षा आज जरा जास्तच गार होतं.

डुबकी मारल्याबरोबर हृदयाची धडधड जाणवू लागली. ते सगळं असह्य होऊन मी पाण्याबाहेर पडू लागताच कोणीतरी पाण्यात माझा पाय पकडला. आता मात्र थंडगार पाण्यातही मला दरदरून घाम फुटला. "बाबा, वाचवा मला" मी रडू लागलो. जोरजोरात किंचाळू लागलो. "सोडाss सोडा मला. मी परत नाही येणार विहिरीत. पण आता सोडा मला. आई गं, वाचव मला." मी रामनामाचा जप चालू केला. पूर्ण ३३ कोटी देवांचा दोनदा जप केला असेल त्या वेळी. वरच्या कडीला धरून जोर लावला, तर चमत्कारिकपणे माझी त्यातून सुटका झाली. कड्यांना धरून झपाझप वर चढू लागलो. खाली बघायचा तर प्रश्नच नव्हता. बाहेर कुत्रं भुंकण्याचा आवाज येऊ लागला. कोणीतरी विहिरीच्या काठावर आहे याची मला चाहूल लागली. वर चढता चढता माझा पाय कडीवरून सटकला. आता मी हाताच्या जोरावर लोंबकळू लागलो. पायाला ती कडीही लागेना. खाली बघून कडीवर पाय आरामशीर ठेवता आला असता, पण खाली बघून जर त्या आत्महत्या केलेल्या स्त्रीचा हसरा चेहरा, केस मोकळे सोडलेली पांढरी प्रतिकृती दिसली असती, म्हणजे जागेवरच 'रामनाम सत्य है' झालं असतं, म्हणून खाली न बघता मी कसाबसा वर चढून आलो. बाजूलाच निळ्या रंगाच्या तुटक्या चपला पडल्या होत्या. बहुधा भुताच्या असाव्यात. पायात कशाबशा चपला सरकावल्या. कपडे उचलले आणि धूम पळत सुटलो. आईशपथ त्या दिवशी एवढ्या जोरात पळालो की उसेन बोल्टलासुद्धा पाणी पाजलं असतं.

वेशीवर हनुमान मंदिर होतं, तेथे कपडे घातले, थोडा शांत झालो आणि काही झालंच नाही या आविर्भावात गावात प्रवेश केला. घरी कोणाला काही कळू नये म्हणून जेवून सरळ अंथरुणाकडे वळलो. विहिरीमध्ये घडलेलं सर्व डोळ्यापुढे परत परत येत होतं. डोळ्याला डोळा लागत नव्हता. घडलेलं सर्व म्हश्याला उद्या सांगायचं आणि परत कधीच त्या विहिरीकडे फिरकायचं नाही, असं ठरवून कधी झोप लागली देव जाणे...

दुसर्‍या दिवशी सकाळी एका भयंकर स्वप्नाने माझी झोप उडाली. काकूंना नवल वाटलं की एरव्ही दहा वाजल्याशिवाय न उठणारे साहेब आज सात वाजताच कसे काय उठले? पण त्यांना काय सांगणार माझ्यावर काय बेतलं ते. आंघोळ वगैरे आटपून, पोटात प्लेटभर पोहे ढकलून मी म्हश्याला कालची हकिकत सुनावण्यास निघालो.

"महेशsss" म्हणून आवाज दिला, तर काकू (महेशची आई) बाहेर येऊन सांगू लागल्या की तो सकाळीच त्याच्या मामांबरोबर शहरात चप्पल खरेदीसाठी गेला आहे आणि येता येता मावशीलाही घेऊन येणार आहे. हे ऐकून तर मला धक्काच बसला. मला तर म्हश्याने सांगितलं होत़ं की मावशीला आणायला तो कालच बसस्थानकावर जाणार होता म्हणून. काहीतरी घोळ असल्याचा संशय मनात येऊ लागला. कुठेतरी पाणी मुरत होतं. निघता निघता मी काकूंना विचारलं, "महेशची तुटलेली चप्पल निळ्या पट्ट्याची स्लीपर होती का?" तर काकू "हो" म्हणाल्या. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काल रात्री विहिरीजवळ जी चप्पल तुटून पडली होती, ती म्हश्याची होती तर. म्हणजे कालच्या प्रकरणाचा आणि म्हश्याचा जवळचा संबंध होता.

म्हश्या दुपारी साडेचारच्या सुमारास घरी आला. मला म्हणाला "अरे, जायचं नाही का पोहायला?" मीही त्याला काही झालंच नाही असं दाखवत त्यासोबत विहिरीजवळ आलो. तेथे तुटकी चप्पल नव्हती. scene एकदम रोजच्यासारखा सजवून ठेवला होता. खडकावर नेहमीचंच होतं 'मला राग येतोय.' हळूच मी त्याच्यावर लिहिलं - 'आता माझी सटकली.' ते पाहून म्हश्या व मी फिदीफिदी हसू लागलो. म्हश्या आव आणून हसत होता. काल माझा जेथे कोणी पाय पकडला होता, त्या ठिकाणी पाण्यात पाहिलं तर एक वेल तुटून पडली होती. आता माझं मलाच हसू येऊ लागलं काल रात्रीचा तो गोंधळ आणि माझी घाबरगुंडी आठवून. मनसोक्त पोहून आम्ही घरी आलो. जेव्हापासून मी खूश होतो, तेव्हापासून म्हश्याचा मात्र चेहरा पडला होता. पण तसं तो समजू देत नव्हता.

दोने-तीन दिवसांनंतर म्हश्याने मला काहीतरी सबब सांगून पोहायला येणार नसल्याचं सांगितलं. आज परत मी एकटाच जाणार म्हणून काहीतरी घडणार आणि ते पूर्वीपेक्षाही जालिम असणार, हे माहीत असल्यामुळे पूर्ण तयारीनिशी मी निघालो. तत्पूर्वी मी माझा मित्र सुरेश पाखरे, जो अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्यरत होता, त्याला फोन करून संपूर्ण घटनेची कल्पना दिली. तो पूर्ण पथकानिशी आला. त्याने सापळा रचला. मला नेहमीसारखीच वर्तणूक ठेवायला सांगितलं. थोडीशीही चूक आम्हाला महागात पडणार होती.

मी मुद्दाम शेतात आज उशिरा निघालो होतो. माझ्याजवळ टॉर्च होता, म्हणून त्या भुताला माझा संपूर्ण ठावठिकाणा माहीत पडत होता. पण त्याच्याजवळ काहीही नसल्यामुळे मला मात्र त्याचा ठावठिकाणा समजेना. तरीसुद्धा मी फक्त चालत राहिलो. त्याने वेगवेगळे आवाज काढणं सुरू केलं. मी घाबरत नाही हे पाहून त्या भुताचा विरस झाला असावा. विहिरीत उतरल्यावर त्याने विहिरीकडे दगड फेकण्यास सुरुवात केली.

डोक्यात एखादा गोटा बसला तर काय घ्या, म्हणून सुरेशला भुताला लवकर पकडण्याची विनंती केली. दोन मिनिटांत भुताला पकडल्याचं त्याने सांगितलं. विहिरीतल्या दगडावर टॉर्चचा प्रकाश टाकल्यावर कालचंच 'मला राग येतोय, आता माझी सटकली' लिहिलेलं होत. त्यात काहीही बदल नव्हता. विहिरीतसुद्धा काहीच कचरा नव्हता. भुताचा पार बिमोड झाल्याची ती सूचना होती. भुताला पकडल्याच्या ठिकाणी मी गेलो. भुताच्या दोन कानाखाली वाजवल्या. ते भूत दुसरं-तिसरं कुणी नसून आमचा म्हश्याच होता. अंधश्रद्धावाले त्याला पोलिसात द्यायचं म्हणू लागले. पण मीच त्यांना त्याला सोडून देण्याची विनंती केली. म्हश्याची समजूत काढल्यावर म्हश्या माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. मला आता त्याची कीव येऊ लागली. पुन्हा कधीही असा खोडसाळपणा करणार नाही ह्या अटीवर त्याला सोडून देण्यात आलं.

आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की, आमचा महेश धोंडिबा पवार 'साखळी'या गावचा मागील वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष आहे. ही घडलेली घटना तो अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आवर्जून सांगतो. खरंच जगात भूत, पिशाच्च, हडळ, चकवा काहीही नसून, माणूस त्याच्याशी घडलेल्या घटनेचा संबंध जोडतो इतकंच. जर त्या दिवशी या घटनेचा पाठपुरावा केला नसता, तर माझासुद्धा भुतांवर विश्वास बसला असता. फट्टू होऊन जर घरात बसलो असतो, तर अमावस्येची भीती कायम मनात राहिली असती. भुताच्या गोष्टी मीसुद्धा पाचपन्नास लोकांना तिखट-मीठ लावून सांगितल्या असत्या. विहिरीतल्या आत्महत्यांची संख्या वाढवून सांगितली असती. खर्‍या अर्थाने मी फट्टूच राहिलो असतो. भुताच्या मुळाशी जाऊन जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला, तर सर्व काही लक्षात येईल. या घटना एकट्याच्या बाबतीतच का घडतात? चार-पाच लोक घोळक्याने गेल्यावर का दिसत नाही कोणी? एकतर भूत बघणार्‍याचा तो भास असतो, नाहीतर ज्याच्यासोबत ह्या घटना घडतात तो मुळाशी जाऊन बघत नाही आणि सांगताना तीच गोष्ट अतिशयोक्ती करून सांगितली जाते.

मला कालच म्हश्याचा फोन आला होता. पुढच्या उन्हाळ्याचं निमंत्रण साहेबांनी आताच देऊन ठेवलंय. आम्ही परत बालपणीचीच धमाल करू, तशीच मजा करू. जमलंच तर एखादं भूत पकडू. तुमच्यापैकी कोणाला यायचंय का??

प्रतिक्रिया

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 Oct 2016 - 3:07 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2016 - 4:28 pm | llपुण्याचे पेशवेll

छान बाळबोध कथा

1

मस्त झाली आहे कथा. आम्हीही लहानपणी मामाच्या गावी जाऊन हेच करायचो त्याची आठवण झाली.
मुलांना नेहमी आपल्या वयाच्या आवडीच्या मित्रांबरोबर जायला आवडतं. त्यांच्याशी गट्टी होते पण ते आजीला आवडत नसते अमुक मुलांबरोबर गेलेलं. विहिर प्रकरण आम्हीही केलय.

ज्योति अळवणी's picture

1 Nov 2016 - 2:32 am | ज्योति अळवणी

मस्त जमली आहे

किस्सा जाम आवडला! लहानपणीचे बरेच प्रताप आठवून हसायला आलं. =))

कानडाऊ योगेशु's picture

1 Nov 2016 - 8:55 pm | कानडाऊ योगेशु

तो कसला येतोय? मामाला दोन मुली असल्यावर....." झालं. काकूंनी असा टोमणा मारल्यावर कोण जातंय हो मामाच्या घरी. मग ठरवलं की या वर्षी उन्हाळा काकांच्याच घरी.

खिक्क. पहील्या परिच्छेदातच जिंकलत. पुढची कथा ह्याच मूडमध्ये वाचुन झाली. भन्नाट कथा आहे.

रुपी's picture

1 Nov 2016 - 10:45 pm | रुपी

मस्त. कथा आवडली!

सही रे सई's picture

1 Nov 2016 - 11:58 pm | सही रे सई

प्रयत्न आवडला. लिहित राहा असेच.

अमृत's picture

2 Nov 2016 - 1:22 pm | अमृत

लिहित रहा.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2016 - 1:46 pm | अत्रुप्त आत्मा

@मी भूत पाहिलंय, तुम्ही? ›› मी नै. पण पांडुनी पाहिलय. हो ना रे? पां डुब्बा! =))

सस्नेह's picture

2 Nov 2016 - 4:33 pm | सस्नेह

कथा छान.

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 11:17 am | नूतन सावंत

अंधश्रद्धानिर्मूलनाचा वळसा चांगला आहे.

पियुशा's picture

5 Nov 2016 - 8:11 pm | पियुशा

मस्त मस्त !

स्रुजा's picture

5 Nov 2016 - 8:21 pm | स्रुजा

हीहीही.. छान आहे !

पैसा's picture

6 Nov 2016 - 3:33 pm | पैसा

हाहा! मस्त किस्सा!