USS Cyclops

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in लेखमाला
29 Oct 2016 - 12:04 am

USS Cyclops

अमेरिका खंडाचा पूर्व किनारा आणि युरोप-आफ्रिकेचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान पसरलेला समुद्र म्हणजे अटलांटिक महासागर. विषुववृत्तामुळे या महासागराचे ढोबळपणे उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागर असे दोन भाग पडतात. यापैकी उत्तर अटलांटिकचा दक्षिण-पश्चिमेचा भाग म्हणजे कॅरेबियन समुद्र. या समुद्राचा दक्षिण किनारा म्हणजे ग्वाटेमाला (तुरुंगासाठी कुप्रसिद्ध), होंडुरास, निकाराग्वा, कोस्टारिका आणि पनामा हे देश. पॅसिफिक आणि अटलांटिक यांना जोडणार्‍या पनामा कालव्याचं उत्तरेचं प्रवेशद्वार कॅरेबियन समुद्रातच आहे. पश्चिमेला मेक्सिकोचं आखात, उत्तरेला क्यूबा, हैती, डॉमिनिकन रिपब्लिक, प्युर्टो रिको आणि पूर्वेला वेस्ट इंडीजचा भाग असलेले अँटिगा, ग्वाडालूप, डॉमिनिका, सेंट लुशिया, ग्रेनेडा आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो हे बेटवजा देश. क्यूबाच्या उत्तरेला असलेल्या फ्लोरिडातल्या मयामीपासून प्युर्टो रिको आणि उत्तरेला बर्म्युडा बेटांपर्यंतचा साधारण त्रिकोनाकृती आकाराचा अटलांटिकचा भाग म्हणजे कुप्रसिद्ध बर्म्युडा ट्रँगल!

कॅरेबियन समुद्राचं सर्वात पूर्वेचं टोक म्हणजे बार्बाडोस बेट. जेमतेम २१ मैल लांब आणि १४ मैल रुंद एवढंच आकारमान असलेला हा देश. बार्बाडोसच्या पूर्वेला आफ्रिकेच्या पश्चिमेला असलेल्या थेट केप व्हराडे बेटांपर्यंत महासागर पसरलेला आहे. जगभराच्या क्रिकेट रसिकांत बार्बाडोस प्रसिद्ध आहे ते ब्रिजटाऊनचं केन्सिंग्टन ओव्हल हे मैदान आणि वॉरेल, वीक्स, वॉलकॉट हे तीन डब्ल्यूज, गॅरी सोबर्स, गॉर्डन ग्रिनिज, वेस हॉल, चार्ली ग्रिफिथ, माल्कम मार्शल आणि जोएल गार्नर या एकापेक्षा एक दादा खेळाडूंसाठी! क्रिकेटबरोबरच बार्बाडोस प्रसिद्धं आहे ते म्हणजे कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण न मिळालेल्या क्राईस्टचर्च पॅरीशमधल्या चेज व्हॉल्टमधल्या शवपेट्या हलण्याच्या विस्मयकारक घटनांमुळे!

१९१८ सालचा मार्च महिना. युरोपात पहिलं महायुद्ध अद्यापही सुरु होतं. जर्मनीने मेक्सिकोला अमेरीकेविरुद्ध जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरण्यासाठी पाठवलेला झिमरमन टेलिग्राम ब्रिटिश हेरखात्याने मध्येच पकडून अमेरिकेला कळवल्यामुळे आणि जर्मन पाणबुड्यांनी अमेरिकन जहाजं बुडवल्याचा एकत्रित परिणाम म्हणून अमेरिकेने ब्रिटन-फ्रान्सच्या बाजूने युद्धात प्रवेश केला होता. जवळपास सर्व कॅरेबियन बेटं त्या वेळेस अमेरिकेच्या किंवा इंग्लंडच्या वसाहती असल्यामुळे युद्धप्रयत्नांना हरप्रकारे मदत करण्याचे आदेश या बेटांना देण्यात आलेले होते.

३ मार्चच्या पहाटे ब्रिजटाऊनच्या रहिवाशांना जाग आली ती एका मोठ्या जहाजाने नांगर टाकताना साखळीच्या झालेल्या आवाजामुळे. एवढं मोठं जहाज तिथे क्वचितच येत असल्याने बर्‍याच जणांनी उत्सुकतेने किनार्‍यावर धाव घेतली. ब्रिजटाऊनच्या छोट्याशा बंदरात जहाज येण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने आणि समुद्रही तुलनेने उथळ असल्याने बंदरापासून सुमारे मैलभर अंतरावर कार्लाइल उपसागरात नांगर टाकण्यात आला होता. बंदरावर आलेल्या लोकांमध्ये बार्बाडोसचा अमेरिकन कौन्सिलर ब्रॉकहोल्स्ट लिव्हिंग्स्टनचाही समावेश होता. कार्लाइल उपसागरात जहाज स्थिरावल्यावर जहाजावरून युनियन जॅक फडकावण्यात आला. ते पाहताच लिव्हिंग्स्टनने आपल्या कस्टम्स अधिकार्‍यांसह एका बोटीतून जहाजाकडे प्रस्थान ठेवलं. मूळ अमेरिकन असलेलं हे जहाज होतं यूएसएस सायक्लॉप्स!
.

१९१०मध्ये फिलाडेल्फियाच्या विल्यम क्रॅम्प अ‍ॅन्ड सन्स या कंपनीने सायक्लॉप्सचं जलावतरण केलं होतं. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्यावर ७ नोव्हेंबर १९१०ला जहाजाचा नौदलाच्या राखीव अटलांटिक काफिल्यात समावेश करण्यात आला. पुढच्या चार वर्षांत जहाजाने युरोपातील बाल्टिक समुद्रापासून ते कॅरेबियन समुद्रापर्यंत अनेक सफरी केल्या. १९१४-१५मध्ये अमेरिकेने मेक्सिकोत व्हेराक्रूझवर केलेल्या आक्रमणाच्या वेळेस नौदलाच्या जहाजांना कोळसा पुरवण्याची आणि मेक्सिकोतून निर्वासितांना सुखरूप बाहेर काढण्याची महत्त्वपूर्ण कामगिरीही जहाजाने पार पाडली होती.

सायक्लॉप्सच्या पहिल्या सफरीपासून कॅप्टन होता जॉर्ज वोर्ली!

जॉर्ज वोर्ली हा अत्यंत लहरी आणि भडक डोक्याचा माणूस होता. भल्या पहाटे पायजमा, भली मोठी डर्बी हॅट घालून आणि हातात छडी घेऊन डेकवर फेर्‍या मारण्याचा त्याला छंद होता! त्यातच क्षणाक्षणाला त्याचा मूड बदलत असल्याने जहाजावर असलेले सगळे जण त्याला टरकून असत. सामान्य खलाशांपासून ते ऑफिसर्सपर्यंत कोणाची कधी कंबख्ती ओढवेल याचा काहीही नेम नव्हता. नौकानयनाचं त्याचं तंत्रं आणि ज्ञान तसं साधारणच होतं. अनेकदा त्याच्या मूर्खपणामुळे आणि अनाकलनीयरित्या जहाज हाकारण्यामुळे अनेक लहानमोठे अपघात झालेले होते, परंतु संपूर्ण जहाजावर या विक्षिप्त माणसाची जबरदस्तं दहशत असल्याने त्याला स्पष्टपणे तसं ठणकावण्याची किंवा त्याच्या निर्णयाला विरोध करण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. जहाजाचा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट हार्वे फोर्ब्स हा एकच माणूस असा होता, जो प्रसंगी कॅप्टनला चार शब्द सुनावण्यास अनमान करत नसे!
.

१९१७मध्ये अमेरिकेने पहिल्या महायुद्धात प्रवेश केल्यावर सायक्लॉप्सने फ्रान्समधल्या सेंट नाझारेथवरच्या मोहिमेत भाग घेतला. जुलैत अमेरिकेत परतल्यावर कॅनडाच्या एकमेव सफरीव्यतिरिक्त अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर गस्त घालण्यासाठीच्या कामगिरीवर आणि नौदलाच्या मुख्य जहाजांना कोळसा पुरवणारं 'सप्लाय शिप' म्हणूनच मुख्यतः सायक्लॉप्सची नेमणूक करण्यात आली. कॅप्टन वोर्लीने ही कामगिरी उत्तमपणे पार पाडली असली, तरी अनेक लहानमोठ्या अपघातांचा ससेमिरा टळला नव्हताच. त्यातच अनेकदा अत्यंत अननुभवी अधिकार्‍यांवर महत्त्वाच्या जबाबदार्‍या टाकण्याची त्याला सवय होती. त्यातूनही अनेकदा विचित्र परिस्थिती उद्भवत असे. परंतु कॅप्टनला कोण समजावणार?

१९१८च्या जानेवारीत सायक्लॉप्सने व्हर्जिनियातल्या नॉर्फोक बंदरातून दक्षिण अमेरिकेत ब्राझिलच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. ब्राझिलच्या रिओ-दि-जानेरो बंदरात असलेल्या दक्षिण अटलांटिकमधल्या ब्रिटिश जहाजांना कोळसा आणि इतर सामग्री पुरवण्याच्या मोहिमेवर जहाजाची नेमणूक झाली होती. मोहिमेच्या सुरुवातीलाच कॅप्टनच्या नौकानयनाच्या तंत्रातील त्रुटींचा जहाजाला फटका बसला. नॉर्फोक बंदरातून बाहेर पडताना भूमध्य समुद्रात जर्मन पाणबुड्यांविरुद्ध कामगिरीवर निघालेल्या सर्व्हे या जहाजाशी सायक्लॉप्सची होणारी टक्कर अगदी थोडक्यात चुकली होती. या भानगडीत जहाजाच्या एका इंजीनमध्ये बिघाड झाल्यामुळे ब्राझिलपर्यंत एकाच इंजीनवर वाटचाल करावी लागणार होती!

सायक्लॉप्सवरचा एक अधिकारी कॉनराड नर्व्हीगच्या मते या सगळ्याला कॅप्टन वोर्ली जबाबदार होता. तो म्हणतो,

"Captain Worley was a perfect example of tyrannical 'bucko' sailing ship masters who considered their crews not as human beings but merely as a mean of getting the vessels to the next port. He was a very indifferent seaman and a poor, overly cautious navigator. Unfriendly and taciturn, generally disliked by both, his officers and his men."

ब्राझिलच्या किनार्‍यावर आल्यावर रात्रीच्या अंधारात कॅप्टन वोर्लीला रिओ-दि-जानेरोचं बंदर नेमकं कुठे आहे याचा अंदाजच आला नाही. वास्तविक लेफ्टनंट फोर्ब्सने रिओच्या बंदरात जहाज नेण्याचा मार्ग आधीच नकाशावर आखलेला होता. परंतु आपल्या लहरीपणाला अनुसरून कॅप्टन वोर्लीने त्यात अनाकलनीय बदल केले होते. सुदैवाने पहाटेच्या संधिप्रकाशामुळे बंदराच्या वाटेवर असताना जहाज दगडांवर धडकण्यापासून वाचलं होतं! वोर्लीच्या लहरीपणाला वैतागलेल्या लेफ्टनंट फोर्ब्सने त्याला गाठून इतर अधिकार्‍यांसमक्ष याचा जाब विचारला! परिणाम?

लेफ्टनंट फोर्ब्सला त्याच्या केबिनमध्ये बंद करण्याचा कॅप्टन वोर्लीने आदेश दिला!

२८ जानेवारीला सायक्लॉप्सने रिओ-दि-जानेरो बंदरात प्रवेश केला. नॉर्फोकहून आणलेला कोळसा धक्क्यावर उतरवण्याचा आदेश देऊन कॅप्टन वोर्लीने रिओ बंदरातील नौदलाचं फ्लॅगशिप (प्रमुख जहाज) असलेल्या पिट्सबर्ग जहाजावर हजेरी लावली आणि आपला रिपोर्ट सादर केला. सायक्लॉप्सच्या पुढच्या सफरीच्या सूचनाही त्याला इथेच देण्यात आल्या. मँगेनीज खनिज फिलाडेल्फियाच्या दक्षिणेला असलेल्या बाल्टिमोर बंदरात नेण्याच्या कामगिरीवर वोर्लीची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर आणखी एक कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली, ती म्हणजे पिट्सबर्ग जहाजावर असलेल्या पाच कैद्यांना बाल्टिमोरला पोहोचवण्याची.

अमेरिकेने महायुद्धात प्रवेश केल्यावर अनेक लोकांना नौदलात भरती करून घेतलं होतं. यात सर्व प्रकारच्या माणसांचा समावेश होता. सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यांवर वावरणारे अनेक गुंडही यात सामील होते. ब्राझिलमध्ये येण्यापूर्वी पिट्सबर्ग जहाज सॅन फ्रान्सिस्को बंदरात असल्याने या ठग लोकांची या जहाजावर नेमणूक झाली होती. जहाजावरील इतर खलाशांमध्ये या गुंड मंडळींची चांगलीच दहशत होती. इतर खलाशांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे उकळणं हे तर नेहमीचंच होतं. अनेक अधिकारीही या गुंडांच्या नादाला लागणं टाळत असत. रिओ बंदरात असताना या टोळक्याने सहा नंबर बॉयलर रूममध्ये एक दारू पार्टी आयोजित केली होती. बॉयलर रूममध्ये हजर असलेल्या जेम्स कॉकर आणि बर्नी डीव्हो यांचा यात पुढाकार होता. पेटी ऑफिसर मॉस व्हाईटसाईड हा डेकवर वॉच ठेवण्याच्या कामगिरीवर असतानाही या पार्टीत सामील झाला होता. मध्यरात्री त्याच्या जागी आलेला जॉन मूरफिल्ड पार्टीत सामील झाला नसला, तरी त्याने त्याकडे काणाडोळा केला होता. या पार्टीत ऑस्कर स्टुअर्ट नावाचा एक तरुण खलाशीही हजर होता. कॉकर आणि डीव्हो यांची अनेक दिवसांपासून त्याच्यावर 'नजर' होती. गुंडांच्या या टोळक्यातील अनेकांप्रमाणे हे दोघं समलैंगिक होते आणि स्टुअर्ट पैशाच्या मोबदल्यात 'त्या' कामासाठी स्वतःचा वापर करून देतो, हे त्यांना इतरांकडून कळलं होतं!

बॉयलर रूममध्ये कॉकर आणि डीव्हो यांचा कार्यभाग आटपल्यावर स्टुअर्टबरोबर त्यांची बाचाबाची झाली. मूरफिल्डने हे भांडण सोडवलं खरं, पण तो डेकवर परतताच कॉकर आणि डीव्हो दोघांनी पुन्हा स्टुअर्टवर हल्ला चढवला. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघांनी स्टुअर्टला इतकी बेदम मारहाण केली की तो बेशुद्ध पडला! मूरफिल्ड परतून आल्यास सावध करण्याची सूचना देऊन कॉकरने स्टुअर्टच्या डोक्यात हातोड्याचे घाव घातले. बेशुद्ध पडलेल्या स्टुअर्टचा देह बॉयलरमागे दडवून दोघं इंजीन रूममधून पसार झाले! बॉयलर रूममध्ये सामसूम झाल्यावर स्टुअर्टच्या देहाचे तुकडे करुन बॉयलरमध्ये जाळण्याचा दोघांचा विचार होता. परंतु फायर रूममधून डेकवर जाणार्‍या एका खलाशाला स्टुअर्टचं कण्हणं कानावर येताच त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. प्रकरणाचा गवगवा झाल्याबरोबर कॉकर आणि डीव्हो यांनी चक्क कॅप्टन जॉर्ज ब्रॅडशॉ याची छोटीशी बोट ढापली आणि पोबारा केला आणि ब्राझिलचा किनारा गाठला. मात्र काही दिवसांतच दोघांची गठडी वळण्यात आली. कॉकर आणि डीव्हो यांचाबरोबरच कामात कसूर केल्याबद्दल व्हाईटसाईड आणि मूरफिल्ड यांनाही अटक करण्यात आली. कॉकर आणि डीव्होचे गुंड सहकारी त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने त्यांना कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान ब्राझिलियन हॉस्पिटलमध्ये स्टुअर्टचा मृत्यू झाला. कोर्टमार्शलमध्ये कॉकरला फाशी, तर डीव्होला नव्वद वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. व्हाईटसाईड आणि मूरफिल्ड यांनाही अनुक्रमे पंधरा आणि पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. दोघांची नौदलातूनही हकालपट्टी झालीच.

डीव्हो, व्हाईटसाईड आणि मूरफिल्ड यांच्याबरोबरच स्टेमी आणि हिल या दोघांनाही पूर्वसूचनेविना ड्युटीवर गैरहजर राहिल्याबद्दल २ वर्षांची शिक्षा झाली होती. हे पाचही कैदी पोर्ट्स्मथच्या नौदलाच्या तुरुंगात पाठवण्याची कामगिरी वोर्लीवर सोपवण्यात आली. याबरोबरच पिट्सबर्गवर असलेल्या बेचाळीस खलाशांची दुसर्‍या कामगिरीवर पाठवणी करण्यासाठी अमेरिकेला रवानगी करण्यात येणार होती. या बेचाळीस खलाशांमध्ये पिट्सबर्गवरील सॅन फ्रान्सिस्कोच्या ठग टोळक्याचाही समावेश होता. आपल्या सहकार्‍यांना मुक्त करण्यासाठी वेळप्रसंगी ते कोणत्याही थराला जातील अशी जहाजावरच्या जवळपास प्रत्येकाला खातरी होती. अपवाद कॅप्टन वोर्ली!

सायक्लॉप्सवर अफवांचं पेव फुटलं होतं. ब्राझिल सोडल्यावर जहाजावरील अधिकारी बंड करून लेफ्टनंट फोर्ब्सला मुक्त करून त्याच्या जागी वोर्लीला बंद करणार अशी एक अफवा होती! त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे कॉकरला सायक्लॉप्सवर फाशी देण्यात येणार असल्याची बातमी जहाजावर आलेल्या पिट्सबर्गवरच्या मंडळींत पसरली होती. याला कारण होतं ते म्हणजे इतर कैद्यांबरोबरच कॉकरचंही सायक्लॉप्सवर झालेलं आगमन! कैद्यांचा ताबा घेतल्यावर पहिल्याच दिवशी वोर्लीने तळपत्या उन्हाने तापून निघालेल्या जहाजाच्या स्टीलच्या सांगाड्यावरून अनवाणी पावलाने जहाजाला संपूर्ण फेरी मारण्याचा कैद्यांना हुकूम सोडला! बंदुकीच्या धाकाने सर्वांसमक्ष ही परेड झाल्यावर त्यांच्या पोळलेल्या तळपायांवर गार पाण्याचे फवारे मारण्यात आले. कॅप्टनचा हुकून न मानणार्‍याची - मग तो कोणत्याही दर्जाचा अधिकारी असो अथवा सामान्य खलाशी, त्याचीही अशीच गत होईल अशी सर्वांना धमकी देण्यासही त्याने कमी केलं नाही.

कैद्यांना शिक्षा देण्याचा कार्यक्रम आटपल्यावर कॅप्टन वोर्लीने जहाज बंदरात असलेल्या माल चढवण्याच्या धक्क्याला आणून लावलं. जहाजावर इथे मँगेनीजचं खनिज चढवण्यात येणार होतं. मँगेनीजच्या खनिजाचं वजन सायक्लॉप्स नेहमी वाहतूक करत असलेल्या कोळशाच्या तुलनेत कैकपटीने जास्त होतं. त्यातच मँगेनिजच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे ते जहाजावर चढवताना आणि सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टीने खास काळजी घेणं जरुरीचं असतं. समुद्रात असताना जहाजाच्या हालचालीमुळे ते इतस्ततः पसरू नये, यासाठी नेहमीपेक्षा जास्त बंदोबस्त करणं अत्यावश्यक असतं. सायक्लॉप्सवर असा एकच माणूस होता, ज्याला अशा प्रकारच्या खनिजाची वाहतूक करण्याचा अनुभव होता - तो म्हणजे लेफ्टनंट फोर्ब्स! नौदलात सामील होण्यापूर्वी ग्रेट लेक्सच्या परिसरात खनिज वाहून नेणार्‍या जहाजांवर त्याने खास कामगिरी बजावली होती. परंतु कॅप्टन वोर्लीच्या हुकमावरून हा अनुभवी माणूस स्वतःच्या केबिनमध्ये कैदेत होता.

सायक्लॉप्सवर मँगेनीज चढवण्याचं काम सुरू असतानाच कॉनराड नर्व्हीगची नौदलाच्या ग्लेशियर जहाजावर बदली झाली. कॅप्टन वोर्लीला ही बातमी कळताच त्याचा भडका उडाला. सायक्लॉप्सवर असलेल्या फार थोड्या अनुभवी अधिकार्‍यांमध्ये त्याचा समावेश होता. परंतु वोर्लीच्या संतापाचं खरं कारण म्हणजे नर्व्हीग हा जहाजावरचा एकमेव माणूस होता, ज्याच्याशी वोर्ली आपणहून गप्पा मारत असे! पहाटेच्या वेळेस वोर्ली डेकवर फेर्‍या मारताना नर्व्हीग वॉच ठेवण्याच्या कामगिरीवर असला की हमखास दोघांच्या गप्पा रंगत असत.

नर्व्हीग म्हणतो,

"He visited me every night when I had the dog watch. These visits would last some two hours. As we leaned against forward bridge, he regaled me with stories of his home, family, his child and many incidents of his long life at sea. I was fascinated by his experience in Philippines during Spanish-American war. These visits became a regular routine and I rather enjoyed them. I have often wondered to what I owed these visits, his fondness for me or his sleeplessness. He seemed to like me. Why? I don't know."

वोर्लीने दक्षिण अटलांटिकमधल्या नौदलाच्या अ‍ॅडमिरलची गाठ घेऊन नर्व्हीगची बदली रद्द करण्याची मागणी केली. कोणत्याही परिस्थितीत नर्व्हीगला सायक्लॉप्सवरून जाऊ न देण्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु नर्व्हीगची बदली रद्द करण्यास अ‍ॅडमिरलने ठाम नकार दिला. सायक्लॉप्स रिओ-दि-जानेरो इथे असतानाच ग्लेशियरने उत्तरेला असलेल्या साल्व्हाडोर बंदराच्या दिशेने प्रस्थान ठेवलं.

सायक्लॉप्सवर मँगेनीज चढवण्याचं काम जोरात सुरू होतं. मँगेनीजच्या वाढत्या वजनाबरोबर इंचाइंचाने जहाजाचा खालचा डेक पाण्यात बुडत होता. एकूण अकरा हजार टन मँगेनीज जहाजावर चढवण्यात आलं. सगळं मँगेनिज जहाजावर चढवण्यात आलं, तेव्हा जहाजाची प्लिमसोल लाइनही पाण्याखाली गेली होती! जहाजावर क्षमतेपेक्षा जास्तीचं वजन चढवण्यात आलं होतं हे उघड होतं.

(जहाजाच्या बाह्यभागावर जहाजाची तरणक्षमता, वजन वाहून नेण्याची क्षमता आणि पाण्याचं अपसरण याचं गणित करून एक विशिष्ट खूण निश्चित केलेली असते. जहाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वाहतुकीच्या दृष्टीने जास्तीत जास्त या खुणेपर्यंत जहाजाचा बाह्य पृष्ठभाग पाण्याखाली जाऊ देणं सुरक्षित मानलं जातं. या खुणेलाच 'प्लिमसोल' किंवा 'वॉटरलाइन' असं म्हटलं जातं).

१६ फेब्रुवारीला सायक्लॉप्सने रिओ-दि-जानेरो सोडलं आणि उत्तरेची वाट धरली. चार दिवसांच्या प्रवासानंतर २१ फेब्रुवारीला जहाजाने साल्व्हाडोर बंदरात प्रवेश केला. वास्तविक साल्व्हाडोर रिओ-दि-जानेरोच्या उत्तरेला असल्याने सायक्लॉप्सने दक्षिणेकडून साल्व्हाडोरमध्ये शिरणं अपेक्षित होतं, परंतु ते शिरलं होतं ते बरोबर विरुद्ध असलेल्या उत्तरेकडून. कॅप्टन वोर्लीच्या नौकानयनाच्या तंत्रातला हा नेहमीचा प्रताप होता!

२२ फेब्रुवारीला सायक्लॉप्सला साल्व्हाडोरमधून बाल्टिमोरला जाण्याचा आदेश देण्यात आला. साल्व्हाडोरहून निघण्यापूर्वी जहाजाचं एक इंजीन पुन्हा नादुरुस्त झाल्याचं कॅप्टन वोर्लीने आपल्या रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं. रिओ-दि-जानेरो इथे या इंजिनात करण्यात आलेली दुरुस्ती फारशी कामी आली नव्हती. साल्व्हाडोरच्या अधिकार्‍यांनी वोर्लीला जहाज अमेरिकेला परत नेण्याची आणि तिथेच दुरुस्ती पूर्ण करण्याची सूचना केली होती. नॉर्फोकहून रिओ-दि-जानेरोला येताना एका इंजिनाच्या साहाय्याने प्रवास करताना जहाजाला कोणतीही अडचण आली नव्हती, त्यामुळे परतीच्या प्रवासातही फारसा त्रास होणार नाही अशी साल्व्हाडोरच्या अधिकार्‍यांची अपेक्षा होती. सायक्लॉप्सने साल्व्हाडोर सोडण्यापूर्वी अमेरिकेचा ब्राझिलमधला कॉन्सल जनरल आल्फ्रेड गॉट्सचॉक आपल्या सर्व सामानसुमानासह जहाजावर येऊन पोहोचला! सायक्लॉप्सवरून एक खास प्रवासी म्हणून तो अमेरिकेला परतणार होता. गॉट्सचॉक जहाजावर येताच जहाजाने नांगर उचलला आणि उत्तरेची वाट धरली. जहाजावर कॅप्टन वोर्ली, कौन्सिलर गॉट्सचॉक, इतर अधिकारी, खलाशी आणि कैदी असे एकूण ३०९ लोक होते. मध्ये कुठेही न थांबता थेट बाल्टिमोर गाठण्याचा वोर्लीला आदेश देण्यात आला होता.

.... आणि ३ मार्चच्या भल्या पहाटे सायक्लॉप्स बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमध्ये प्रकटलं होतं!

सायक्लॉप्सवर पोहोचल्यावर लिव्हिंग्स्टनने कॅप्टन वोर्ली आणि कौन्सिलर गॉट्सचॉक यांची गाठ घेतली. वोर्लीने बाल्टिमोरची सफर पूर्ण करण्यासाठी जास्तीचा कोळसा, मांस, इतर खाद्यपदार्थ आणि पैसे घेण्यासाठी सायक्लॉप्स बार्बाडोसला आल्याचं स्पष्टं केल्यावर लिव्हिंग्स्टनलाही आश्चर्य वाटलं. त्यातच या सर्व सामग्रीची वोर्लीची अवाढव्य मागणी कळल्यावर दोघांची चांगलीच बोलाचाली झाली. परंतु आपल्या मागणीपासून वोर्ली एक रेसभरही मागे न हटल्याने अखेर लिव्हिंग्स्टनचा निरुपाय झाला. वोर्लीने आपल्या जहाजावरच्या खलाशांना बार्बाडोस बेटावर उतरण्याची परवानगी दिली, पण बरोबर आठ तासांत परतण्याची तंबी देऊनच!

वोर्लीच्या मागणीनुसार सर्व सामग्री जहाजावर चढवण्याचं काम सुरू असतानाच ४ फेब्रुवारीच्या दुपारी लिव्हिंग्स्टनने कॅप्टन वोर्ली, गॉट्सचॉक आणि सायक्लॉप्सचा डॉक्टर बर्ट अ‍ॅस्पर यांना चहापानाचं आमंत्रण दिलं. ही भेट अत्यंत उत्साहित वातावरणात पार पडली. तिघांच्या बोलण्यावरून ते घरी परतण्यास उत्सुक असल्याचं लिव्हिंग्स्टनला जाणवलं. लिव्हिंग्स्टनचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर कॅप्टन वोर्लीने जहाजावरील आयुष्याबाबत अनेक गोष्टी त्याला समजावून सांगितल्या. संध्याकाळी पाचच्या सुमाराला लिव्हिंग्स्टनचा निरोप घेऊन तिघांनी आपली छोटी बोट गाठली आणि लवकरच ते जहाजावर पोहोचले.

सायक्लॉप्सने नांगर उचलला आणि बाल्टिमोरच्या दिशेने सरळ उत्तरेला न जाता दक्षिणेची वाट धरली.

कॅप्टन वोर्लीच्या नौकानयनाच्या विचित्र पद्धतीचं हे आणखीन एक प्रदर्शन होतं.

सायक्लॉप्सचं हे शेवटचं दर्शन!

५ फेब्रुवारीला लॅम्पर्ट आणि होल्ट लाईन्सच्या मालकीच्या व्हेस्टर्स या जहाजाची सायक्लॉप्सशी रेडिओ संदेशाची देवाणघेवाण झाली. सायक्लॉप्सचा आतापर्यंतचा प्रवास सुरळीत सुरू असून कोणतीही अडचण नसल्याचं या संदेशात नमूद केलं होतं.

यानंतर सायक्लॉप्सकडून एकही संदेश आला नाही!

९ मार्चला अमोल्को या टँकरला सायक्लॉप्स व्हर्जिनियाच्या आसपास दिसल्याची बातमी आली. अमोल्कोच्या कॅप्टनने मात्र या बातमीचा ठामपणे इन्कार केला. सायक्लॉप्स १३ मार्चच्या आधी बाल्टिमोरला पोहोचण्याची अपेक्षा नसल्याने ९ मार्चच्या सुमाराला व्हर्जिनियाच्या आसपास असण्याची अपेक्षा नव्हती. त्यातूनही ९ मार्चला सायक्लॉप्स व्हर्जिनियाच्या परिसरात असल्यास जास्तीत जास्त १ दिवसात - १० मार्चपर्यंत बाल्टिमोरला पोहोचलं असतं.

१५ मार्चचा दिवस उलटल्यावरही सायक्लॉप्स बाल्टिमोरला पोहोचलं नाही. एव्हाना अमेरिकन आणि ब्रिटिश नौदलाने जहाजाचा शोध घेण्यास जोरदार मोहीम उघडली होतीच. हजारो चौरस मैलांचा सागर धुंडाळण्यात आला. कॅरेबियन समुद्र, अमेरिकेचा बाल्टिमोरपासून फ्लोरिडापर्यंतचा पूर्व किनारा, मेक्सिकोचं आखात, इतकंच नव्हे तर नंतर बर्म्युडा ट्रँगल म्हणून कुप्रसिद्ध झालेला फ्लोरिडा-प्युर्टो रिको-बर्म्युडा यामधला प्रदेशही अनेक जहाजांनी पालथा घातला, परंतु व्यर्थ!

सायक्लॉप्सचा एक लहानसा तुकडा किंवा ३०९ माणसांपैकी एकाचंही नखंही दृष्टीस पडलं नाही.

साल्व्हाडोरहून सरळ बाल्टिमोरला जाण्याचा आदेश असताना सायक्लॉप्सने बार्बाडोसला दोन दिवसांचा मुक्काम केल्याचं स्पष्ट होताच वॉशिंग्टन इथल्या स्टेट सेक्रेटरीने लिव्हिंग्स्टनला त्या संदर्भात चौकशी करणारी तार पाठवली. लिव्हिंग्स्टनने आपल्या उत्तरात म्हटलं होतं,

SECRETARY OF STATE

Washington

April 17, 2 PM

Department's 15th. Confidential.

Master Cyclops stated that required 600 tons coal having sufficient to reach Bermuda. Engines very poor condition. Not sufficient funds and therefore requested payment by me---unusual. I have ascertained that he took here ton fresh meat, ton flour, thousands pound vegetables, paying therefore 775 dollars. From different sources have learned the following. He had plenty of coal, alleged inferior; took coal, probably more than fifteen hundred tons. Master alluded to by others as damned Dutchman, apparently disliked by other officers. Rumored disturbances en route hither, men confined and one executed; also conspired [with] some prisoners from fleet in Brazilian waters, one [with] life sentence. United States Consul General Gottschalk passenger. 231 crew exclusive of officers and passengers. Have names [of] crew but not of all officers and passengers. Many Germanic names appear. Number telegraphic or wireless messages addressed master or in care of ship were delivered at this port. All telegrams for Barbados on file head office St. Thomas. I have to suggest scrutinizing these. While not having any definite grounds, I fear fate worse than sinking, though possibly based on instinctive dislike towards master.

LIVINGSTON, CONSUL.

लिव्हिंग्स्टनची ही तार वॉशिंग्टनला पोहोचताच नौदलाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. नौदलाच्या अधिकार्‍यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि बारकाईने चौकशीला सुरुवात केली. नौदलाची ही चौकशी सुरू असतानाच....

रिओ-दि-जानेरो इथल्या एका पोर्तुगीज वर्तमानपत्रात २९ मार्चला एक बातमी झळकली. अमेरिकेचा कॉन्सल जनरल आल्फ्रेड गॉट्सचॉक याचा सायक्लॉप्स या जहाजाबरोबर बुडून मृत्यू झाला होता आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅथलिक चर्चमध्ये एका प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. रिओ-दि-जानेरो इथल्या अनेक प्रतिष्ठित नागरिकांची नावं या बातमीत दिली होती आणि जास्तीत जास्त लोकांनी या प्रार्थना सभेला हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

अमेरिकन आणि ब्रिटिश नौदलाने सायक्लॉप्स नाहीसं झाल्याचं अधिकृतपणे १४ एप्रिलला जाहीर केलं होतं. तोपर्यंत नौदलाच्या वर्तुळाबाहेर कोणालाही याबद्द्ल काहीही कल्पना नव्हती. असं असताना या वर्तमानपत्रापर्यंत ही बातमी कोणी पोहोचवली?

अमेरिकन नौदलाला या प्रकाराची खबर मिळताच नौदलाच्या अधिकार्‍यांनी रिओ-दि-जानेरो गाठलं. ज्या वर्तमानपत्रात ही बातमी आली होती, त्याच्या संपादकाने याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचा खुलासा केला. ज्या चर्चमध्ये प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती, त्या चर्चचे पाद्री अथवा बातमीत ज्या प्रतिष्ठित नागरिकांची नावं आली होती, त्यांच्यापैकी कोणीही गॉट्सचॉकला ओळखत नव्हतं. इतकंच नव्हे, तर अशी कोणतीही सभा आयोजित करण्यात आली नसल्याचं निष्पन्न झालं!

१ जून १९१८ या दिवशी अखेर नौदलाचा असिस्टंट स्टेट सेक्रेटरी फ्रँकलीन डिलेनो रुझवेल्ट याने सायक्लॉप्स हे जहाज आणि त्यावरील सर्व ३०९ लोकांचा अंत झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं.

अमेरिकन नौदलातील अनेक अधिकार्‍यांना आणि सामान्य नागरिकांनाही हे जहाज जर्मनांच्या हाती लागलं असल्याची पक्की खातरी होती! अमेरीकन नौदलाची आणि जनमानसाची ही भावना इतकी तीव्र होती की पहिलं महायुद्धं संपताच त्या वेळी युरोपात असलेल्या अ‍ॅडमिरल विल्यम सिम्सने जर्मन नौदलाच्या नोंदींची छाननी करण्यास तातडीने सुरुवात केली. सायक्लॉप्सशी संबंधित कोणतीही बातमी सिम्सला त्यात आढळून आली नाही. इतकंच नव्हे, तर त्या काळात जर्मनीची एकही पाणबुडी किंवा गस्ती नौका अटलांटिकच्या त्या परिसरात नव्हती आणि जर्मनांनी त्या भागात पाणसुरुंग पेरल्याचंही आढळून आलं नाही. परंतु अधिक बारकाईने तपास केल्यावर अ‍ॅडमिरल सिम्सला एक विलक्षण बातमी आढळली.

आयर्लंडच्या पश्चिमेला सुमारे दोनशे मैलांवर एका जर्मन यू-बोटीने सायक्लॉप्स या नावाचं एक ब्रिटिश जहाज बुडवलं होतं!

या जहाजावरील एकही माणूस वाचला नव्हता अथवा कैद करण्यात आला नव्हता.

या यू-बोटीचा कमांडर होता दुसर्‍या महायुद्धात हिटलरचा ग्रँड अ‍ॅडमिरल असलेला कार्ल डॉनित्झ!

हे सायक्लॉप्स जहाज कोणतं होतं?

कॅप्टन वोर्लीच्या बाबत नौदलाने केलेल्या चौकशीतून वेगळीच माहिती समोर आली.

नौदलाच्या अधिकृत नोंदीनुसार कॅप्टन लेफ्टनंट कमांडर जॉर्ज वोर्ली याचा जन्म सॅन फ्रान्सिस्को इथे झालेला नसून ११ डिसेंबर १८६५ या दिवशी हॅनोव्हर या जर्मनीतल्या शहरात झालेला होता! मूळच्या जर्मन असलेल्या या माणसाचं खरं नाव होतं जोहान फ्रेड्रीक वाईकमन. वयाच्या १४व्या वर्षी १९७८मध्ये सॅन फ्रान्सिस्को बंदरात उभ्या असलेल्या बोटीतून समुद्रात उडी मारून पोहत त्याने अमेरिकेचा किनारा गाठला होता. १८९८मध्ये त्याने वोर्ली हे एका खलाशी मित्राचं आडनाव धारण केलं होतं. सॅन फ्रान्सिस्कोच्या बार्बरी कोस्ट या भागात तो दारूचा एक गुत्ता चालवत होता. जर्मनीत असलेल्या आपल्या इतर भावांनाही त्याने अमेरिकेत बोलावून घेतलं होतं. दारूचा गुत्ता सांभाळतानाच त्याने नौकानयनाचं कामचलाऊ प्रशिक्षण घेतलं होतं आणि जहाजाचा कॅप्टन म्हणून स्वतःची नेमणूक करून घेण्यात तो यशस्वी झाला होता. पहिल्या महायुद्धापूर्वी अनेक नागरी आणि व्यापारी जहाजांवर कॅप्टन म्हणून त्याने काम केलं होतं. अफूच्या चोरट्या व्यापारातही त्याचा सहभाग होता. १९१०पासून सायक्लॉप्स अमेरिकन नौदलाच्या राखीव फ्लीटमध्ये असताना वोर्ली कॅप्टन असला, तरी १९१७मध्ये अमेरिका पहिल्या महायुद्धात पडल्यावर लेफ्टनंट कमांडर म्हणून त्याचा नौदलात अधिकृतपणे शिरकाव झाला. कॅप्टन वोर्लीचे सर्व निकटवर्तीय आणि मित्रं जर्मन होते किंवा जर्मन वंशाचे होते.

सायक्लॉप्सच्या संदर्भात बार्बाडोसहून कौन्सिलर लिव्हींग्स्टनने पाठवलेल्या तारेमुळे अनेक प्रश्नं समोर उभे राहतात.

कॅप्टन वोर्लीने सहाशे टन कोळशाची मागणी केली असताना तब्बल पंधराशे टन कोळसा जहाजावर चढवण्याचं नेमकं काय प्रयोजन होतं? लिव्हिंग्स्टनशी बोलताना वोर्लीने सहाशे टन कोळसा बर्म्युडाला पोहोचण्यासाठी आवश्यक असल्याचा खुलासा केला होता. परंतु बर्म्युडाला जाण्याची नेमकी काय गरज होती?

बार्बाडोसहून निघाल्यावर प्युर्टो रिको-डोमिनिका आणि क्यूबाचा पूर्व किनारा गाठून फ्लोरिडाच्या सामुद्रधुनीतून गल्फ स्ट्रीमच्या चार नॉटच्या प्रवाहाचा वापर करून घेत अमेरिकेच्या पूर्व किनार्‍याला समांतर मार्गक्रमण करत बाल्टिमोर गाठणं हा सर्वात सोपा मार्ग होता. बार्बाडोसहून बर्म्युडाला जाताना ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्सनंतर खुल्या समुद्रातून जावं लागणार होतं. एक इंजीन बिघडलेलं असताना, जहाजावर मँगेनीजसारखं खनिज क्षमतेपेक्षा जास्त चढवलेलं असताना आणि युद्धकालात हे साहस पत्करणं म्हणजे निव्वळ आत्मघात होता. त्यातच मार्च महिन्यात प्रबळ असलेल्या उत्तर-पूर्वने वाहणार्‍या वादळी वार्‍यांनी जहाज खुल्या समुद्रात ओढून नेलं जाण्याची शक्यताही होती.

जहाजाचं एक इंजीन नादुरुस्त झालेलं होतं. दुसर्‍या इंजिनातही बिघाड झाला तर जहाज पूर्णपणे समुद्राच्या मर्जीवर अवलंबून होतं. मात्रं जहाजावर अनेक सुस्थितीत असलेले रेडिओ सेट्स आणि बॅटरीजचा भरपूर साठा होता. मात्रं असं असतानाही जहाजाकडून मदतीसाठी एकही संदेश का पाठवण्यात आला नाही?

मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कॉकरला जहाजावर खरंच फाशी देण्यात आलं होतं का? जहाज बार्बाडोसला पोहोचण्यापूर्वीच जहाजावर ही अफवा पसरली होती, याचा अर्थ कॉकरला फासावर लटकवण्यात आलं असलंच, तर ते साल्व्हाडोर ते बार्बाडोस या दरम्यानच्या कालावधीत. कोर्टमार्शलमध्ये कॉकरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली, तरी नौदलाचा संबंध असल्याने अमेरिकेच्या अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केल्याविना शिक्षेची अंमलबजावणी केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याची वोर्लीला अजिबात कल्पना नव्ह्ती? कॉकरची शिक्षा गुप्तपणे अंमलात आणली असली, तर ती हत्या ठरण्याची शक्यता होती. बार्बाडोसच्या किनार्‍यावर मोकळेपणे भटकणार्‍या एकाही खलाशाकडून खातरीपूर्वक बातमी का कळली नाही?

बार्बाडोसला जहाजावर चढवण्यात आलेले अन्नपदार्थ - एक टन मांस, पीठ आणि इतर सामग्री ३०९ (किंवा ३०८) लोकांना किती काळ पुरणार होती?

बार्बाडोस सोडल्यावर जहाजावर बंडाची शक्यता कितपत होती?

कॅप्टन वोर्लीचा अधिकारिवर्ग बहुतांशी त्याच्या विरोधात होता. लेफ्टनंट फोर्ब्सला कैदेत टाकण्याचा निर्णय कोणालाच पटला नव्हता. या अधिकार्‍यांनी वोर्लीविरुद्ध हत्यार उचलण्याची शक्यता कितपत होती? जहाजावर असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या गुंड टोळक्याने संधी मिळताच आपल्या सहकार्‍यांना सोडवण्यासाठी कोणाचीही पत्रास बाळगली नसती, हे उघड होतं. त्यातच कॉकरला खरोखरच फाशी देण्यात आलेलं असलंच, तर या गुंडांची माथी भडकलेली असणार हे उघड होतं. अमेरिकेला पोहोचल्यावर पूर्वीच्या सफरींवर खलाशांना आणि सहकार्‍यांना दिलेल्या वागणुकीबद्दल जाब विचारण्यासाठी वोर्लीची चौकशी करण्यात येणार होती. वोर्लीला अधिकृतपणे याबद्दल काही सूचना देण्यात आली नसली, तरी त्याला या बातमीचा पत्ता लागला होता का?

बार्बाडोसहून निघताना सायक्लॉप्स उत्तरेला न जाता दक्षिण दिशेने निघाल्याचं ब्रिजटाऊनच्या किनार्‍यावर हजर असलेल्या प्रत्येकाने पाहिलं होतं. वोर्लीच्या नेहमीच्या उफराट्या नौकानयनाचा हा परिणाम होता, की यामागे काही वेगळं कारण होतं? अनेकदा मोठ्या जहा़जांवर कंपासची चाचणी घेण्यासाठी जहाज विरुद्ध दिशेने नेण्यात येतं. वोर्लीचा तसा काही हेतू होता का?

वोर्लीचं उल्लेख करताना जहाजावरील अनेकांनी 'डॅम्ड डचमन' असा केला होता. पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचे सैनिक शत्रूचा उल्लेख करताना हा वाक्प्रचार वापरत असत. अमेरिकन जहाजावरील खलाशांनी तो वोर्लीच्या बाबतीत का वापरला?

लिव्हिंग्स्टनच्या तारेत नमूद केल्याप्रमाणे जहाजावर हजर असलेल्यांपैकी अनेक जण मूळ जर्मन वंशाचे असल्याचं आढळून आलं. यात खलाशांपासून अधिकार्‍यांचाही समावेश होता. जहाजावर हजर असलेला ब्राझिलचा कॉन्सल गॉट्सचॉक युद्धात भाग घेण्यासाठी म्हणून अमेरिकेला निघालेला असला, तरी अमेरिका युद्धात पडण्यापूर्वी तो खंदा जर्मन समर्थक होता. कॅप्टन वोर्लीप्रमाणे तो जर्मनीत जन्माला आलेला नसला, तरी मूळ जर्मन वंशाचा होता.

नौदलाने नंतर केलेल्या चौकशीतून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती. ५ आणि ६ मार्च या दोन्ही दिवशी एका ब्रिटिश गस्ती नौकेला सायक्लॉप्स आपल्या ठरलेल्या मार्गापासून दूर भरकटलेलं आढळलं होतं. दोन्ही वेळेस या नौकेने जहाजाबरोबर संपर्क साधून ते योग्य मार्गावर आणून सोडलं होतं. या नौकेच्या अधिकार्‍यांना पाठवलेल्या संदेशात कॅप्टन वोर्लीने आपण बर्म्युडाला जात असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता.

१९२३च्या सप्टेंबरमधल्या 'नेव्हल इन्स्टिट्यूट प्रोसिडिंग्ज'मध्ये या संदर्भात एक चक्रावणारी नोंद आढळते -

A ship built in Brunswick, Georgia and said to have carried a number of spies, is known to have been seized off Chesapeake about the time of the Cyclop's disappearance. At least one important person with German connections is known to have been abort Cyclops.

आता हा इम्पॉर्टंट पर्सन नेमका कोण?

कॅप्टन वोर्ली का कॉन्सल गॉट्सचॉक?

दुसर्‍या बाजूने विचार केल्यास बार्बाडोसहून निघाल्यावर खुल्या समुद्रातून सरळ उत्तरेच्या दिशेने बर्म्युडामार्गे व्हर्जिनियाच्या परिसरात पोहोचण्यात सायक्लॉप्स यशस्वी झालं होतं का? ही शक्यता जवळपास शून्य असली, तरी जर सायक्लॉप्स ९ मार्चला व्हर्जिनियाच्या परिसरात असलंच, तर ते १० मार्चला व्हर्जिनिया केप्सच्या परिसरात झालेल्या वादळात सापडलं होतं का? जहाजावरचं जास्तीचं वजन, इंजिनात झालेला बिघाड आणि हवामान यामुळे सायक्लॉप्सचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परंतु वादळात सापडलेल्या जहाजाचे काही ना काही अवशेष निश्चितपणे मागे राहिले असते.

सायक्लॉप्सच्या संदर्भात विचार करताना सायक्लॉप्सबरोबरच बांधण्यात आलेल्या त्याच वर्गाच्या नेरस आणि प्रोटिअस या दोन जहाजांचाही विचार करावा लागतो. ही जहाजंही सायक्लॉप्सची जुळी भावंडं होती. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात २३ नोव्हेंबर १९४१ला कॅरेबियनमधल्याच व्हर्जिन आयलंडवरून प्रोटिअसने बॉक्साईट घेऊन नॉर्फोकच्या दिशेने प्रस्थान ठेवलं होतं. १० डिसेंबरला नेरसही बॉक्साईट घेऊन व्हर्जिन आयलंडवरुनच नॉर्फोकला निघालं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सायक्लॉप्सप्रमानेच ही दोन्ही जहाजं कोणताही मागमूस न ठेवता गायब झाली.

सायक्लॉप्सच्या अनाकलनीयरित्या गायब होण्यामागे अनेक तर्क-वितर्क लढवण्यात आले असले, तरी त्याचं नेमकं काय झालं याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही.

एका सिद्धान्तानुसार जहाजावर असलेल्या मँगेनीजचं खनिज जहाजाच्या सांगाड्यात झिरपल्यामुळे जहाजाचे तुकडे तुकडे झाले असावेत. अमेरिकन नौदलाच्याच 'चकी' या जहाजाच्या बाबतीत हा प्रकार झालेला असला, तरी त्याचा काही ना काही पुरावा निश्चितच मागे राहिला असता.

जहाजावर जास्तीचं वजन चढवण्यात आलेलं होतं हे उघड होतं, पण रिओ-दि-जानेरो इथल्या अधिकार्‍यांच्या नोंदीनुसार मँगेनीज जहाजावर चढवताना योग्य ती काळजी घेण्यात आलेली होती. परंतु बार्बाडोसला जहाज आलं, तेव्हा प्लिमसोल लाईन पाण्याखाली बुडालेली होती. हे वजन जहाजाला घातक ठरलं होतं का?

बार्बाडोस सोडून जहाजाने बर्म्युडाचा मार्ग धरला असला, तर कॅरेबियन समुद्र पार केल्यावर जहाज बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झालं होतं का?

कॅप्टन वोर्ली आणि कॉन्सल गॉट्सचॉक यांनी संगनमताने जहाजावरील मँगेनीज खनिज जर्मनांच्या ताब्यात देऊन जहाज बुडवलं तर नाही ना?

अमेरिकन नौदलाच्या इतिहासातलं कधीही न उलगडलेलं एक रहस्य म्हणून सायक्लॉप्सची कायमची नोंद झाली आहे!

संदर्भ :

Ghost Ships - रिचर्ड वायनर

The Devil's Triangle - रिचर्ड वायनर

The Devil's Triangle 2 - रिचर्ड वायनर

From Devil's Triangle To Devil's Jaw - रिचर्ड वायनर

The Bermuda Triangle - चार्ल्स बार्लित्झ

Without A Trace - चार्ल्स बार्लित्झ

Washington Post, The Age, New York Times

Wikipedia आणि इंटरनेटवरील इतर अनेक संस्थळांवरील माहिती.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 8:17 am | यशोधरा

अतिशय इंटरेस्टींग!

महासंग्राम's picture

29 Oct 2016 - 10:02 am | महासंग्राम

तुफान भारी, रोचक , खतरा

कविता१९७८'s picture

29 Oct 2016 - 12:45 pm | कविता१९७८

चित्त थरारक लेखन

अजया's picture

29 Oct 2016 - 4:50 pm | अजया

एकदम बेस्ट बघा!

हेमंत लाटकर's picture

29 Oct 2016 - 5:28 pm | हेमंत लाटकर

छान! जहाजाच्या कॅप्टनचा रूबाब एखाद्या संस्थानिकासारखा असतो.

तुषार काळभोर's picture

30 Oct 2016 - 6:36 am | तुषार काळभोर

थरारक!!

तो स्पार्टेशअण्णांनी एकदम परफेक्ट पकडलेला आहे!

चांदणे संदीप's picture

30 Oct 2016 - 11:27 pm | चांदणे संदीप

आवडेश!

Sandy

लोनली प्लॅनेट's picture

31 Oct 2016 - 10:43 am | लोनली प्लॅनेट

मस्त मेजवानी स्पार्टाकस साहेब..
तुम्हाला समुद्राचं खूप आकर्षण दिसतंय..माझ्यासारखंच
भूगोल तुमचा सर्वात आवडीचा विषय होता का..?
तुमची 90डिग्री साऊथ हि लेखमाला बऱ्याच वेळा वाचली आहे
जबरदस्त लिहिलंय

मारवा's picture

31 Oct 2016 - 1:52 pm | मारवा

जबरदस्त !!!!

प्राची अश्विनी's picture

1 Nov 2016 - 7:54 am | प्राची अश्विनी

भारी लिहिलय.

प्रसाद_१९८२'s picture

1 Nov 2016 - 8:59 am | प्रसाद_१९८२

थरारक!!

अमृत's picture

2 Nov 2016 - 9:13 am | अमृत

तुमची भूगोलाची आवड खरच वाखाणण्यासारखी आहे.

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2016 - 1:38 am | स्वाती दिनेश

थरारक एकदम..
स्वाती

पैसा's picture

10 Nov 2016 - 5:44 pm | पैसा

थरारक!

कवितानागेश's picture

14 Nov 2016 - 9:19 am | कवितानागेश

सॉलिड!

जुइ's picture

21 Nov 2016 - 3:21 am | जुइ

सत्य घटनेवर आधारीत लेख आवडला.

नाखु's picture

22 Nov 2016 - 2:26 pm | नाखु

थरारक आणि विलक्षण !!!

नया है वह's picture

22 Nov 2016 - 2:44 pm | नया है वह

+१