ए ब्लाइंड डेट

Primary tabs

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in लेखमाला
29 Oct 2016 - 12:34 am

ए ब्लाइंड डेट

तायलनचा फोन आला, "येत्या बुधवारी काय करत आहात? संध्याकाळ मोकळी ठेवा, बरोबर ५ वाजता घ्यायला येतो. आपण सगळे एका ठिकाणी जातोय." जास्त काही न बोलताच त्याने फोन ठेवला. तायलनच्या आदेशाप्रमाणे त्या बुधवारी आवरून, तयार होऊन वाट पाहत बसलो. पाचच्या सुमाराला तायलन आणि अनिता आलेच. दुसर्‍या गाडीत रोमेन, टीना, स्टेफानी आणि पेटर होते. "हा तायलन कुठे जायचंय, काय करायचंय? काही सांगत नाहीये.." रोमेन कुरकुरला. "इट्स अ ब्लाइंड डेट ड्यूड, माझ्यामागून हानावर लांड ष्ट्रासला तुमची गाडी आणा" असे त्याला सांगून त्याने गाडी सुरू केली. झाले.. आमच्या दोन्ही गाड्या त्या दिशेने निघाल्या. त्या रस्त्यावर मर्सिडिझ, बीएमडब्ल्यू, ऑडी, फोक्सवागन, टोयोटा, स्कोडा, पोर्शे.. अशा ओळीने गाड्यांच्या शोरूम्स आहेत. हा नवी गाडी घेतोय की काय? सगळ्यांना दाखवायला नेतो आहे बहुधा अशा कुतूहलाने वाटेत तायलनला "काय आहे रे आजचा प्रोग्राम?" असे विचारल्यावर उत्तर म्हणून त्याने सीडीच्या गाण्यांचा आवाज वाढवला, सिग्नललाही आवाज कमी करायला तयार नाही आणि अनिताही काही सांगायला तयार नाही. उत्सुकतेचे रबर ताणून धरत आम्ही तो हानावर लांड ष्ट्रास कधी येतो त्याची वाट पाहत राहिलो.

.

.

त्या रस्त्याला लागल्यावर 'डायलॉग म्युझियम' अशी पाटी असलेल्या ठिकाणी त्याने गाडी उभी केली, दुसरी गाडीही तेवढ्यात आलीच. दोन्ही गाड्या पार्क करून आत गेलो. आतमध्ये एक रिसेप्शन हॉल होता. तिथे एक जण आमच्या स्वागतासाठी आला. "मी थॉमस, आपण ओळख करून घेऊ या. तुमची नावं सांगा प्लीज." सगळ्यांनी ओळख करून दिल्यावर आमच्याकडे वळून त्याने विचारले, "आपण कोणत्या भाषेत बोलू या? इंग्लिश की जर्मन?" हा असे का विचारतो आहे ते न कळून आम्ही दोन्हीपैकी काहीही चालेल असं उत्तरलो. मग त्याने आपापली घड्याळे, मोबाइल्स, कॅमेरा आणि ज्या काही चकाकणार्‍या वस्तू आहेत, त्या काढून लॉकरमध्ये ठेवायला सांगितले, मोबाइल आणि कॅमेरा ठीक आहे, पण चकाकणार्‍या वस्तू? आम्ही बुचकळ्यात पडलो आहोत हे समजून तो नुसतेच हसला आणि लॉकरची किल्ली पुढे केली. किल्ली घेतानाची त्याची आरपार नजर बघताना लक्षात आले की ह्याला दिसत नसावे बहुधा. पण तो तर तिथे चालताना कुठेही अडखळत नव्हता की चाचपडत नव्हता. त्याच्या रोजच्या सवयीचा, वावराचा एरिया असल्यामुळे ते साहजिकच होते. आमचे कुतूहल वाढायला लागले होते.

.

त्याने "आंतोन" अशी हाक मारली, एक दरवाजा उघडून आंतोन उगवला. "तुम्ही आठ जण आहात. चार जण माझ्याबरोबर आणि चार जण आंतोनबरोबर या." आंतोननेसुद्धा आमची ओळख करून घेतली. परत तीच प्रश्नोत्तरे.. ह्याचीही नजर आरपार.. हासुद्धा? हो.. तोही दृष्टिहीन होता. "माझ्या खांद्यावर एकाने हात ठेवा आणि बाकीच्यांनी एकमेकांच्या खांद्यावर अशी साखळी करा, मग आपण आत जाऊ या." एकमेकांकडे बघून आम्ही खांदे उडवले आणि त्याने सांगितले तसे करून आम्ही आत जायला निघालो. आत एक मोठा कॉरिडॉर होता. मंद निळा प्रकाश, खाली रुजामा आणि सांद्र का कायसेसे ते संगीत होते. आणि तिथे लिहिले होते - 'डिऑलॉग इम डुंकेल्न' म्हणजे अंधारातला संवाद, अंधाराशी संवाद! अनेक प्रश्न मनात घेऊन आम्ही आपले त्या कॉरिडॉरमधून चालत होतो. हे असे काय गाडीगाडी करत लहान मुलांसारखे नेतोय अशा विचारात होते मी, तर आंतोनने बजावले, "कोणीही पुढच्याच्या खांद्यावरचा हात काढू नका, नाहीतर अडखळून पडाल कुठेतरी.." प्रकाश क्षीण होत होता आणि कॉरिडॉरचे दार उघडल्यावर तर पूर्ण काळोख. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही. असा काळोख पूर्वी क्योतोला झुइगुडोच्या मंदिरात अनुभवला होता. पण तिथे अंधुक प्रकाशाची एक तिरीप सतत होती आणि दोराला धरून एका दिशेने आपल्याला पुढे जायचे असते. इथे दोरबीर काही नाही आणि अगदी अंधुकसुद्धा प्रकाश नाही, फक्त मंद संगीत चालू होते, आपण कोठे आहोत? आत किती जागा आहे? काहीही समजत नव्हते. तेवढ्यात थॉमस म्हणाला, "वेलकम टू अवर वर्ल्ड. तुमची दोन टेबलं ठेवली आहेत, आता आपण तिथे जाऊ या. सांभाळून हं पण, एक पायरी आहे मोठी." आम्ही चाचपडत ती पायरी चढलो आणि चाचपडतच त्याने सांगितले तसे टेबलापाशी आलो. "आता ही खुर्ची आहे, अंदाज घ्या आधी आणि मग बसा." असे म्हणून थॉमस आणि आंतोनने आम्हाला नावे घेऊन एकेकाला बोलावले आणि हाताला धरून एकेका खुर्चीवर बसवले.

.

"इथे आपण जेवणार आहोत, आपण आता चार कोर्सचं डिनर घेणार आहोत. मेन्यू ठरलेला असतो. तुम्ही फक्त व्हेज की नॉनव्हेज तेवढं सांगा." तायलनने आत्ता तोंड उघडले आणि गौप्यस्फोट केला. त्या मिट्ट काळोखातसुद्धा आमच्या चेहर्‍यांवरचे आश्चर्य वाचून आंतोन आणि थॉमस म्हणाले, "तुम्ही प्रत्येकाने स्वतः आपापले व्हेज/नॉनव्हेज सांगा आणि पेयांचीही ऑर्डर द्या." ह्या अशा आंतरराष्ट्रीय मंडळींमध्ये आणि जेवणांमध्ये मी आपली व्हेज असते. पण कट्टर नॉनव्हेज मंडळीही "ह्या अंधारात मासे कसे खाणार? आणि चिकन, मटण जे काय असेल ते बोनलेस असेल तर बरे" असे म्हणायला लागले. "ती काळजी नका करू. तुम्ही तुमची आवड सांगा," आंतोन परत म्हणाला. मग सगळ्यांनी आपापला चॉइस सांगितला. आता पेय.. जर्मनीत हॉटेलात गेल्यावर पाण्याचे पेले ठेवत नाहीत की बिसलरी हवी साब? असेही विचारत नाहीत. त्यामुळे आपल्याला काय पेय हवे ते सांगावे लागते, त्याप्रमाणे कोणी बियर, तर कोणी वाइन, तर कोला, ज्यूस अशी वेगवेगळी पेये मागवली जातात. "अरे, एकच प्रकार मागवा काहीतरी.. इथे दिसत नाहीये काहीच." स्टेफानी म्हणाली तर आंतोन उत्तरला, "नो मॅम, तुम्हाला हवे ते सांगा ना. आमच्याकडे ११० प्रकारची पेयं आहेत." झाले, मग आम्ही आपल्याला काय हवे ते सांगितले आणि पाचच मिनिटात प्रत्येकाच्या समोर हवे तेच पेय न सांडता आणि न मागता हजर झाले. चाचपडत 'प्रोस्ट' म्हणजे चिअर्स करून आम्ही डिनरची वाट पाहत राहिलो. आता अंधाराला किंचित सरावलो होतो. म्हणजे दिसत काहीच नव्हते, पण आवाजाच्या वेधाने आम्ही एकमेकांशी गप्पा मारू लागलो.

तेवढ्यात सूप आले. व्हेजमध्ये कार्तोफेल सूप आणि नॉनव्हेजमध्ये गुलाश सूप. आपल्याकडे सूप बोल असतो आणि होडीवाला चमचा ना, जर्मनीत खोलगट सूप डिश असते आणि मोठ्ठा चमचा. आम्ही आपले ज्याची त्याला डिश गेलीय ना? ह्या चिंतेत.. "डोंट वरी, ज्याला जे हवं तेच मिळालंय. करा सुरुवात. गुटन अपिटिट.." आंतोन आणि थॉमस आमच्या आजूबाजूलाच होते आणि अगदी मनकवड्यांसारखे न विचारलेल्या पण मनात आलेल्या सगळ्या शंकाकुशंकांचे निरसन सहजतेने करत होते. 'भारतात इतक्यांदा वीज जाते, चिमणीच्या प्रकाशात जेवताना घास काही तोंडाऐवजी नाकात जात नाही' असे म्हणत आम्ही जेवायला सुरुवात केली. "सगळ्यांचे सूप खाऊन झाले का?" (हो, सूप खातात, पीत नाहीत.. ) असा प्रश्न आला आंतोनकडून. आम्ही हो.. म्हटल्यावर त्याने "परत एकदा चेक करा" असे फर्मावले. चेक काय करणार डोंबल? आता काय बशीत हात घालून बघायचे का? चमच्याने बशीचा अंदाज घेत आम्ही सूप संपले असे डिक्लेअर केले. त्याने डिश नेल्या.

आता स्टार्टर्स. व्हेज आणि नॉनव्हेज मंडळींचे स्टार्टर त्या त्या जागी पोहोचले. "हे काय आहे?" विचारले, तर भोंडल्याच्या खिरापतीसारखे "ओळखा" असे म्हणाला. "आता सगळं जेवण आम्ही फक्त व्हेज की नॉनव्हेज एवढंच सांगणार. तुम्ही ओळखायचं आहे आपण काय खातो आहोत ते आणि सांगायचं आहे एकेकाने, एकमेकांना न विचारता.." झालं, पहिली खिरापत आली. चाचपडत एक घास खाल्ला. कोबी-गाजराचा कीस वाटतोय, क्रिस्प लागतेय, स्प्रिंग रोल असावा का? हो. व्हेज स्प्रिंग रोलच असावा म्हणून मी डिक्लेअर करून टाकले आणि खायला लागले. नॉनव्हेजवाल्यांचाही चिकन स्प्रिंग रोल आहे असे पेटरने सांगितले. आमचे खाणे होत आलेले कसे समजले त्या अंधारात, कोणास ठाऊक? आम्हाला समजत नव्हते, समोरच्या बशीत किती उरलेय, किती आहे आणि आंतोन आणि थॉमस मात्र आमच्या प्लेटांच्या, काट्यासुर्‍यांच्या आवाजावरून आता बहुधा संपत आलेय असे म्हणून टेबलाशी आले. परत एकदा चेक करा तुमच्या बश्या.. असे फर्मावून तिथेच थांबले असावेत. एक रोल बहुधा बशीच्या कडेला गेला असावा. चाचपडत मी तो खाल्ला. प्लेटा उचलल्या गेल्या. थॉमस आणि आंतोन आमच्याकरता अगदी तत्पर होते.

आता मेन कोर्स! मध्ये कोणाचे पेय संपले होते, त्यांचे पेले परत भरले गेले. आता आम्हाला अंधाराचा बाऊ वाटेनासा झाला होता. आम्ही गप्पांत रमलो होतो, पण तिथले वातावरण फार थंड वाटत होते. "जरा एसी कमी कर ना थॉमस" असे त्याला बोललो, तर तो नुसताच हसला. त्या थंडीत आणि मिट्ट काळोखात वॉशरूमला जायला न लागो असे सगळेच आळवत होते. पण ही वेळ यावीच ह्याकरता तपमान मुद्दामच कमी ठेवले होते. मेन कोर्स यायला अजून अवकाश होता. वॉशरूमला जायला हवेच असे वाटल्यावर आंतोनला तसे सांगावेच लागले. मग त्याने खुर्चीवरून उठायला सांगितले आणि हाताला धरून तिकडे नेले. तिथेही असाच अंधार. दार कुठेय? कडी कुठेय? काही समजेना. त्याने पेत्राला हाक मारली आणि आता माझा हात पेत्राने धरला. आपण लहान मुलांना वॉशरूममध्ये नेतो, तसे तिने मला नेले. मी बाहेर उभी आहे असे सांगितले. अरे देवा.. म्हणत ते दिव्य एकदाचे पार पडले. पेत्रानेच मग वॉश बेसिनपाशी नेले. मग बाहेर आणून मला तिने आंतोनच्या ताब्यात दिले. अनिता, स्टेफानी, टीना यांची हीच गत झाली. तिकडे पुरुषांच्या कक्षातही हाच प्रयोग झाला. सगळे आपापल्या जागांवर आणून बसवले गेले आणि मेन कोर्स आला.

परत एकदा 'ओळखा पाहू?'चा खेळ झाला आणि आम्ही जेवायला लागलो. "बहुतेक ओ ग्रातिन वाटतेय." मी पुटपुटले. "आम्हाला पोमफ्रिट्स आणि चिकन आहे." रोमेन म्हणाला. इथे आपल्याच बशीतले खाताना मारामार होत होती, तर दुसर्‍याच्या बशीतली चव काय बघणार, डोंबल? खाताना नुसते त्रेधातिरपिट होत होती. "अंधारात खायला सूप बरे त्या मानाने.." आम्ही एकमताने कौल दिला. चिकनवाल्यांनी तर त्याला पूर्ण सहमती दिली. त्यांना त्या मिट्ट काळोखात बोन्सवाले चिकन खाणे, हे फारच दिव्य वाटत होते. पेटरला आंतोनने सांगितले, "तू नुसतीच प्लेटवर सुरी घासतो आहेस, थोडं बाजूला गेलंय तुझं चिकन, जरा आतल्या बाजूला घे तुझा काटा, म्हणजे खाता येईल." काटा-सुरीच्या आवाजावरून त्यांना हे समजत होते. मी तर हातानेच खात होते, ते त्या मानाने सोपे.. परत एकदा थॉमस म्हणाला की "काही उरलेय का बशीत ते पाहा." म्हणजे चाचपडा.. ते झाले एकदाचे.. आता नाखटिश म्हणजे डिझर्ट..

काहीतरी मऊसर पुडिंग, खिरीसारखे खाता येईल असे येऊ दे, चीज प्लाटर किवा केकबिक नको.. कारण इथे केक कुकनगाबेलने - म्हणजे केकसाठीच्या स्पेशल फोर्कने खातात. ते दिव्य नको आता.. असे आम्ही बोलत असतानाच नाखटिश आले. बहुदा व्हॅनिला पुडिंग असावे. नाही नाही.. रोटं ग्रुट्झ आहे. असा आमचा गलका सुरू झाला. "हो, पुडिंग आणि ग्रुट्झ दोन्ही आहे." असे देवा.. आता हे दोन्ही खायचेय? एका बोलमध्ये पुडिंग आणि ग्रुट्झ असे दोन्हीचे एकेक स्कूप होते. जेवणाचे पैसे रिसेप्शनवरच द्यायचे असतात, त्यामुळे तो एक प्रश्न सुटला होता. पण एकत्र आला असाल तरीही पेयांचे पैसे मात्र प्रत्येकाने एकेकट्याने त्या अंधारात द्यायचे असतात. झाले.. अंदाजाने, चाचपडत पर्समधले पैशाचे पाकीट काढले. हाताला आली ती नोट त्याला देणार त्या नादात पाकिटातली नाणी जमिनीवर पडली. आता कुठे? आणि कसे शोधणार? जाऊ देत.. असे मी आणि दिनेश म्हणतोय एकमेकांना; तेवढ्यात माझ्याकडून सांडलेली नाणी आंतोनने माझ्या हातात ठेवली. प्रत्येकाला त्याचे किती पैसे झाले, त्याने कोणती नोट दिली ते सांगून उरलेले पैसे परत केले. नाणी ते आकारावरून ओळखतात आणि नोटांकरता त्यांच्याकडे एक अगदी लहानशी पट्टी असते. नोटेची अर्धी घडी करून तिची लांबी मोजतात आणि त्यावरून ते कितीची नोट आहे हे ओळखतात. मी दिलेली नोट "युरोची नाही, ही दुसरी करन्सी आहे" असे सांगून त्याने परत केली. मग मी पाकिटात हात घालून हाताला आल्या त्या सगळ्याच नोटा त्याच्यापुढे धरल्या. म्हणजे त्याच्यापुढेच धरल्या असाव्यात. त्याने त्यातली एक काढून घेतली, बाकीच्या नोटा आणि उरलेले पैसे मला दिले. प्रत्येकाची जवळपास हीच अवस्था होती. मग एस्प्रेसो प्यायलो आणि ते जेवणाचे प्रकरण संपले एकदाचे.

"आता निघायचे ना?" असे विचारताच थॉमस म्हणाला, "शेजारीच आमचा डिस्कोथेक आहे, तिथे येता का? पण डिस्को लाइट्स नाहीत हं." प्रकाशात नाचता येत नाही ते अंधारात काय नाचणार, डोंबल? एकमेकांच्या पायावर पाय देऊ, नाहीतर पायात पाय अडकून पडू, ह्याची खातरी असल्याने त्याला आम्ही नम्रपणे नकार दिला आणि परत गाडीगाडी करत आलो तसेच सगळे आम्ही बाहेर एका हॉलमध्ये आलो. तिथे मंद प्रकाश होता. हुश्श झाले. तिथे स्थिरस्थावर झाल्यावर आम्हाला पुढच्या हॉलमध्ये नेण्यात आले. तिथे आमचा मेन्यू मांडून ठेवलेला होता आणि आम्ही खाल्लेल्या बश्या. आमचे खातानाचे फोटोही.. आम्ही इतके सांडले होते, टाकलेही होते.. आम्हाला समजलेच नव्हते आमच्या बशीत हे इतके उरले आहे. सांडणे मी समजू शकले, पण आपल्या बशीतले संपलेले नाही हेसुद्धा समजू नये? सगळे दिग्मूढ झालो होतो. जे सूप खाणे सगळ्यात सोपे वाटले होते, ते सूपही आमच्या कपड्यांवर सांडले गेले होते.

ते सगळे ओशाळे होऊन बघताना थॉमसचा आवाज आला. "हे आमचं जग आहे, डोळे असलेल्यांना प्रत्यक्ष अनुभवातून त्याची किंचितशी जाणीव व्हावी, म्हणून हा प्रयत्न आहे. तुम्हाला डोळे असल्याने तुम्ही कित्येक गोष्टी सहज गृहीत धरता. आम्हाला समोर काहीच दिसत नसल्याने सगळेच समजून घ्यावे लागते. स्पर्श, कान, नाक यांना जास्त कामाला लावावे लागते. आमचे हे तिन्ही सेन्सेस जास्त कार्यक्षम असतात. दिसत नसल्याने स्मरणशक्तीवर जास्त भर असतो. इकडेतिकडे लक्ष जाऊन डेव्हिएट होत नसल्याने डोळस व्यक्तीपेक्षा एकाग्रता जास्त असते. जन्मांध किंवा परिस्थितीमुळे अंध झालेल्यांना इथे ट्रेनिंग दिले जाते आणि सक्षम केले जाते. इतके की कोणतेच रंग कसे दिसतात हे जरी आम्हाला माहीत नसले, तरी हा कोणता रंग आहे हे वासावरून आम्हाला कळू शकते. मेंदूमध्ये वस्तूंच्या काही धूसर प्रतिमा तयार होतात. मग त्याने नोटा मोजायची पट्टी दाखवली, त्या कशा मोजायच्या, ते दाखवले. मी दिलेली नोट वेगळी आहे हे कसे ओळखले? ह्या प्रश्नावर आंतोन हसला. नोटेवरून हात फिरवला की प्रिंट वेगळी आहे हे समजते. तसेच नाण्यांचे आकार, जडपणा ह्यावरून ओळखता येते. ह्या 'डोळस' अंधांशी बोलताना आमच्या प्रत्येकाच्याच मनातल्या इतक्या सार्‍या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळत होती. अंधाराशी झालेला हा संवाद, ही ब्लाइंड डेट आमचे डोळे खर्‍या अर्थाने उघडून गेली होती.

.

(काही प्र.चित्रे आंजावरून - कॅमेरा, मोबाइल आतल्या हॉलमध्ये नेता येत नसल्यामुळे रेस्तराँच्या आतले फोटो काढता येत नाहीत.)

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

29 Oct 2016 - 12:37 pm | कविता१९७८

मस्त माहीती , छान फोटो.

अफाट! थक्क झाले वाचताना! लेख शेअर करते स्वातीताई.
तुझी परवानगी हक्काने गृहित धरते.

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2016 - 9:58 pm | टवाळ कार्टा

अफाट

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2016 - 12:35 am | बोका-ए-आझम

निव्वळ अप्रतिम! तुमची परवानगी असेल तर शेअर करु का?

स्वाती दिनेश's picture

30 Oct 2016 - 10:27 pm | स्वाती दिनेश

करा शेअर. ध्न्यवाद.
@यशो, नो प्रॉब्लेम, :)
स्वाती

अगदी वेगळा नवलाइचा अनुभव.या लेखाबद्दल धन्यवाद ताई.

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2016 - 4:47 pm | संजय क्षीरसागर

आम्हाला समोर काहीच दिसत नसल्याने सगळेच समजून घ्यावे लागते. स्पर्श, कान, नाक यांना जास्त कामाला लावावे लागते. आमचे हे तिन्ही सेन्सेस जास्त कार्यक्षम असतात. दिसत नसल्याने स्मरणशक्तीवर जास्त भर असतो. इकडेतिकडे लक्ष जाऊन डेव्हिएट होत नसल्याने डोळस व्यक्तीपेक्षा एकाग्रता जास्त असते.

हे खासच! आणि हे तर

कोणतेच रंग कसे दिसतात हे जरी आम्हाला माहीत नसले, तरी हा कोणता रंग आहे हे वासावरून आम्हाला कळू शकते.

खरंच अंतरंगात शोध घेण्यासारखे !

हैदराबादेत असेच एक म्युझियम आहे. मिट्ट अंधारात गाईड तुम्हाला फिरवतो. गाईड अंध असतो आणि तुम्ही त्यांच्या दुनियेत. बाहेर येता ते एक वेगळे माणूस बनून.

लेखन खूप आवडले.

हैद्राबादबद्दल लिहायला आले होते.
एका वेगळ्या अनुभवाची उत्तम नोंद झाली आहे. लेख आवडला.

कपिलमुनी's picture

30 Oct 2016 - 8:44 pm | कपिलमुनी

?

आणखी एक दुवा. दुस-या पानावर संपर्कासाठी फोन नंबर आहेत

काय अप्रतिम अनुभव आहे ! इथे शेअर केल्याबद्दल खुप आभार !

उल्का's picture

31 Oct 2016 - 11:33 am | उल्का

स्वातीताई, नेहमीप्रमाणे सुंदर, बोलक्या लेखनशैलीत वर्णन केले आहेस गं! लेख आवडला.

नंदन's picture

31 Oct 2016 - 1:22 pm | नंदन

लेख वाचून स्तब्ध झालो. काय प्रतिक्रिया लिहावी, ते काही काळ सुचलं नाही. नवीन दृष्टिकोन मिळाला म्हणावं, तर त्यातही वाच्यर्थाने दृष्टी अध्याहृत धरलेली. एरवी 'स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला' अशी रोजची स्थिती असताना; नेमक्या दिवाळीच्या मुहूर्तावर, अंधाराचा अनुभव घेऊन, 'उजळला प्रकाशु' होण्यातला हा काव्यमय विरोधाभास अतिशय poignant आहे.

[किंचित अवांतरः बोरकरांनी त्यांच्या उत्तरायुष्यात लिहिलेलं तमःस्तोत्र आठवलं.

ॐ नमो श्री भगवन् तमा, प्रकाशजनका पुरुषोत्तमा
तुझिया महिम्या नाही सीमा, उपमा शब्द सर्व थिटे॥

बापा तुझिया ओटीपोटी, तारामंडले असंख्य कोटी
ज्योतिष्कमळे अति चोखटी, गोमटी लावण्यभांडारे॥

त्यांचीच जी आदिमज्योती, अमृतनामे बोलती श्रुती
ती तू पेरून गर्भस्थिती, निवांती मज जोजविले॥

तिजमुळेच उघडिता डोळे, त्यांनी कवळिले ब्रह्मांड सगळे
राहिले जे त्याही वेगळे, तेही पाहिले अंतर्दृष्टी॥

अति पाहून शिणता दिठी, तूच त्यांते लाविली ताटी
निजकणवेची घालून मिठी, शीण शेवटी वारिले॥]

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 3:34 pm | यशोधरा

सुरेख!

विकास's picture

31 Oct 2016 - 5:00 pm | विकास

स्वाती मस्त लेख! एकदम आगळा वेगळा आणि डोळे असलेल्यांना दृष्टी देणारा अनुभव आहे!

नंदनचे "अंधाराचा अनुभव घेऊन, 'उजळला प्रकाशु' होण्यातला हा काव्यमय विरोधाभास " वाक्य फारच चपखल आहे.

या वरून मला मध्यंतरी कुठेतरी (म्हणजे व्हॉट्सॅप अथवा फेसबुक ;) ) बघितल्याचे आठवले...

स्वाती दिनेश's picture

1 Nov 2016 - 10:44 pm | स्वाती दिनेश

फारच सुरेख.. आणि बोरकरांचे तम:स्त्रोत्र तर.. --/\--
स्वाती

प्रियान's picture

2 Nov 2016 - 1:59 am | प्रियान

वाह !

पद्मावति's picture

31 Oct 2016 - 2:19 pm | पद्मावति

खरोखर अप्रतिम लेख आहे.

आह्ह्ह्ह्ह, विलक्षण अनुभूती.
कन्सेप्टच इतकी विलक्षण आहे.
निदान आम्ही सध्या करतोय/अनुभवतोय ती चैनच वाटायली. एखादे अस्तित्व न पाहता जाणवणे हा असा अनुभव प्रत्येकानेच अनुभवला पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

31 Oct 2016 - 8:32 pm | श्रीगुरुजी

अप्रतिम अनुभव!

पिलीयन रायडर's picture

31 Oct 2016 - 10:28 pm | पिलीयन रायडर

आई शप्पथ! कसलं भारी आहे हे!!!

भारतातही आहे हे बघुन बरं वाटलं. नक्कीच जाणार मी इथे एकदा तरी..

प्रभू-प्रसाद's picture

31 Oct 2016 - 10:57 pm | प्रभू-प्रसाद

सलाम त्यान्च्या जगन्याला !!

निमिष ध.'s picture

31 Oct 2016 - 11:55 pm | निमिष ध.

खुपच सुंदर लेख. या आगळ्यावेगळ्या जागेची ओळख करून दिली आणि त्याबरोबर विचारही करायला लावलात त्याबद्दल धन्यवाद :)

पैसा's picture

1 Nov 2016 - 8:20 pm | पैसा

_/\_

दृष्टीपलिकडचा अनुभव. नवीन दृष्टी देणारा.
लेखाबद्दल अनेक धन्यवाद ताई _/\_

वरुण मोहिते's picture

1 Nov 2016 - 8:38 pm | वरुण मोहिते

पण हे अजून बेस्ट आहे.

प्रियान's picture

2 Nov 2016 - 2:08 am | प्रियान

स्वाती ताई अगदी वेगळा अनुभव !! वाचल्या नंतर थोडा वेळ काहीच सुचेना.

तुम्ही एवढं सविस्तर लिहिलंय, आणि आंतोन, थॉमस कडून वेळो वेळी इतक्या सूचना मिळत असताना, शेवटी ताटात अन्न उरलं अथवा सांडलं असेल असा मुळीच संशय नाही आला.

शब्दबम्बाळ's picture

2 Nov 2016 - 4:06 am | शब्दबम्बाळ

छान अनुभव मांडलाय...
बंगलोरला सुद्धा डायलॉग इन द डार्क हे हॉटेल आहे. तिथेही हीच संकल्पना आहे.
त्या हॉटेलची काही परीक्षणे इथे पाहता येतील.

नाखु's picture

3 Nov 2016 - 11:29 am | नाखु

वेगळ्या विश्वातला आणि तित्काच अंतर्मुख करणारा लेख.

बंगलोरास्थित ठिकाणी कुणी गेले आहे काय? काही अनुभव असतील बेंगलोर मिपाकरांचे ते द्यावेत.

स्वाती तैंचे आभार

रुपी's picture

2 Nov 2016 - 5:36 am | रुपी

अप्रतिम लेख! धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

2 Nov 2016 - 6:23 am | अभिजीत अवलिया

अप्रतिम !!!
हैदराबाद मधील म्युझियमला गेले पाहिजे आता लवकरच ...

राघव's picture

2 Nov 2016 - 7:49 pm | राघव

काय अनुभव.. जबरदस्त! धन्यू.

मस्त अनुभव. मी असच कधीतरी मला दिसत नसेल तर मी कस काम करेल हे डोळे बंद करून करायचा प्रयत्न करत असतो ३-४ मिनिटांसाठी. तेव्हा ऐकणे, स्पर्श, गंध हे सेन्सेस आणि एकाग्रता खूप वाढते असा अनुभव आहे. पण पुर्ण जेवण अस घेणं म्हणजे सहीच अनुभव असेल. तुम्ही नंतर नाचायला पण गेला पाहीजे होता.

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 8:35 am | नूतन सावंत

स्वाती,कल्पनेपालिकडलं जग आहे हे.अप्रतिम आणि अफाटच.
मी nab मध्ये पुस्तके वाचण्यासाठी जात असे.तेव्हा अशी काही अकल्पितं अनुभवली होती.ती पुस्तकं ऐकल्यावर मला एक मुलगा भेटायला आला होता,मी बाबा कदम यांची कादंबरी वाचली होती.अशा प्रकारचं पुस्तक तिथे पहिल्यांदाच वाचलं गेलं होतं.तेव्हा बोलता बोलता मी त्याच्याकडे पाहत बोलत होते आणि समोर पायऱ्या होत्या त्या माझ्या लक्षात आल्या नव्हत्या आणि त्या मुलाने जणू मीच पाहू शकत नाही अशाप्रकारे तिथे पायरी असल्याची सूचना दिली होती.
तसेच एक मुलगी दोन सुयांवरचे विणकाम इतक्या वेगाने करत होती की तसा प्रयत्न केल्यावर माझ्या सुईवरचे मधले काही टाके सुईवरून गळून गेले होते.

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 8:35 am | नूतन सावंत

स्वाती,कल्पनेपालिकडलं जग आहे हे.अप्रतिम आणि अफाटच.
मी nab मध्ये पुस्तके वाचण्यासाठी जात असे.तेव्हा अशी काही अकल्पितं अनुभवली होती.ती पुस्तकं ऐकल्यावर मला एक मुलगा भेटायला आला होता,मी बाबा कदम यांची कादंबरी वाचली होती.अशा प्रकारचं पुस्तक तिथे पहिल्यांदाच वाचलं गेलं होतं.तेव्हा बोलता बोलता मी त्याच्याकडे पाहत बोलत होते आणि समोर पायऱ्या होत्या त्या माझ्या लक्षात आल्या नव्हत्या आणि त्या मुलाने जणू मीच पाहू शकत नाही अशाप्रकारे तिथे पायरी असल्याची सूचना दिली होती.
तसेच एक मुलगी दोन सुयांवरचे विणकाम इतक्या वेगाने करत होती की तसा प्रयत्न केल्यावर माझ्या सुईवरचे मधले काही टाके सुईवरून गळून गेले होते.

अमरप्रेम's picture

5 Nov 2016 - 3:27 pm | अमरप्रेम
स्नेहांकिता's picture

5 Nov 2016 - 3:34 pm | स्नेहांकिता

जबरी अनुभव. शब्दही तितकेच समर्थ !

नूतन's picture

5 Nov 2016 - 7:43 pm | नूतन

मिपा दिवाळी अंक आज वाचायला सुरवात केली. पहिला लेख वाचला तो हा आणि खूप आवडला. एका वेगळ्या विश्वात नेणारा ,चित्रदर्शी लेख.

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2016 - 11:21 am | प्राची अश्विनी

वाह!बोरकर तर ग्रेटच!

अनुप ढेरे's picture

8 Nov 2016 - 12:20 pm | अनुप ढेरे

सुंदर लेख.

डायलॉग इन द डार्कवर मिपावर धागा येऊन गेला आहे.

http://www.misalpav.com/node/17600

पाटीलभाऊ's picture

8 Nov 2016 - 5:40 pm | पाटीलभाऊ

मस्त अनुभव

आनंदयात्री's picture

9 Nov 2016 - 2:42 am | आनंदयात्री

लेख आवडला. असे रेस्टॉरंट चालवण्याचा उपक्रम कल्पक आहे.