कळलावी

शिवकन्या's picture
शिवकन्या in लेखमाला
29 Oct 2016 - 12:19 am

कळलावी

[Richard Mathesonच्या Button Button या इंग्लिश कथेचा हा मराठी अवतार. याच कथेवर आधारित ‘The Box’ नावाचा चित्रपट २००९मध्ये प्रदर्शित. अधिक माहितीसाठी गुगला.]

फ्लॅट नं.२१७समोर एक पार्सलचे खोके येऊन पडले. चहूबाजूंनी सीलबंद. नाव आणि पत्ता हस्ताक्षरातच होता. ‘श्री. सतीश देवताळे आणि सौ. अनुजा देवताळे, २१७ अ, गांधी मार्ग, नागपूर’. संध्याकाळी ऑफिसहून परतताना अनुजाच्या नजरेस ते पार्सल पडले. आपले नाव आणि पत्ता पाहून तिला जरा आश्चर्यच वाटले. हे पार्सल कुणी पाठवले असेल, असा विचार करत करत तिने फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि पार्सल घेऊन आत आली.

कपडे बदलून, फ्रेश होऊन, चहाचा कप ओठांना लावता लावता तिने त्या पार्सलच्या चिकटपट्ट्या काढायला सुरुवात केली. खोकडे उघडले आणि आत तिला एक नवलाची वस्तू दिसली. मध्यम आकाराच्या एका लाकडी ठोकळ्यावर एका बटनाचे युनिट बसवले होते आणि त्या संपूर्ण युनिटवर काचेचा एक डोम फिट केला होता. अनुजाने तो काचेचा डोम उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कुठूनतरी लॉक केला होता. तिने तो संपूर्ण ठोकळा उचलून वर-खाली निरखून पाहिला, तर त्याच्या तळाशी एक बारीकशी चिट्ठी चिकटवलेली दिसली. त्यावर लिहिले होते, ‘रात्री आठ वाजता श्री. काळे फोन करतील.’
अनुजाला सुरुवातीला किंचित भीती आणि आश्चर्यही वाटले. आठवून आठवून पाहिले तरी काळे नावाचे कुणीही तिच्या वा सतीशच्या परिचयातले आठवेनात. तिने परत ती बारीकशी चिट्ठी वाचली. तेवढ्यात सतीश कामाहून परत आला. तिने त्याला सगळी हकीकत सांगितली. त्यालाही काहीच उलगडा होईना. पण आठ वाजेपर्यंत वाट बघू म्हणून त्याने वर्तमानपत्रात डोके खुपसले.

बरोब्बर आठच्या ठोक्याला फोनऐवजी दाराची बेल वाजली. स्वयंपाकघरातून प्रचंड वेगाने अनुजा दाराशी आली. की होलमधून आधी पाहिले. डोक्यावर उन्हाळी टोपी, अंगात कोट आणि गळ्यात टिपिकल सेल्समन वापरतात तशी बॅग घेऊन एक माणूस उभा असलेला तिला दिसला. ‘हा आणखी एक सेल्समनचा नमुना!’ असे वैतागून म्हणत तिने दरवाजा उघडला.

त्या किंचित बुटक्या माणसाने अनुजाला पाहताच डोक्यावरची टोपी काढून बगलेत धरली, ठेवणीतले एक मिठास हसू फेकले आणि अत्यंत अदबीने विचारले,
"मिसेस देवताळे आपणच ना?"
"हो. का?"
"जरा आत येऊ का?"
"हे पाहा, मी खूप बिझी आहे, सॉरी. आम्हाला काहीही नकोय. तुम्ही थांबा इथेच. तुमचं खोकं मी तुम्हाला परत आणून देते." असे म्हणून अनुजा वळणार, तोच मिस्टर काळे म्हणाले,
"पण ती वस्तू काय आहे, हे तरी किमान जाणून घ्या."
अनुजाने वैतागून त्याच्याकडे एक कुत्सित नजर टाकली. म्हणाली, "नाही. मला अज्जिबात माहीतपण करून घ्यायचं नाही"
"पाहा! प्रचंड फायद्याची गोष्ट आहे!"
"फायदा? मला काय लाखो-करोडो मिळणार आहेत काय?" तिने अत्यंत तिरसटपणे विचारले.
"अन मिळाले तर?" काळेंनी अत्यंत शांतपणे बॅटिंग केली आणि तिच्याकडे ज्या पद्धतीने पाहिले, तिला ती नजर नाही आवडली. ती खेकसली, "काय विकायचंय काय तुम्हाला?"
"मला काहीही विकायचं नाही." काळेंची तीच शांतता. तोच आत्मविश्वास.
तेवढ्यात सतीश आतून बाहेर आला. "अरे, काय चाललंय?"
काळेंनी पुढे होऊन स्वतःचा परिचय करून दिला.
"ओह!" सतीशने हॉलमध्ये ठेवलेल्या त्या खोकड्याकडे बोट केले आणि हसून विचारले, "अहो, पण ती चीज काय आहे ते तरी सांगा."
काळेंनी पटकन संधीचा फायदा घेतला. "शुअर! अगदी काही मिनिटांत सांगतो सगळं काही. पण मी जरा आत येऊ का?"
"पण तुम्ही काही विकायला आला असाल, तर मात्र......" सतीश सावधपणे म्हणाला.
काळेंनी जोरात नकारार्थी मान हलवली. "नाही, मी काहीच विकणार नाही."
सतीशने अनुजाकडे एक कटाक्ष टाकला. उत्तरादाखल ‘पाहा बाई तुमचं तुम्ही’ अशी नजर. मग सतीशने जरा बिचकतच काळेंना घरात घेतले आणि "सांगा आता काय ते" म्हणाला.
***
हॉलमध्ये बसताच काळेंनी आपल्या कोटाच्या खिशातून एक सीलबंद पाकीट बाहेर काढले. "या पाकिटात या काचेच्या डोमची चावी आहे." असे म्हणत जवळच्या टेबलावर त्याने ते पाकीट हलकेच ठेवले. "आता या ठोकळ्यावर जे बटन आहे, ते दाबलं की त्याचा आवाज थेट आमच्या ऑफिसच्या एका विशिष्ट केबिनमध्ये लगेच रजिस्टर होतो!"
"पण हे सगळं कशासाठी?" सतीशने विचारले.
काळेंनी घसा खाकरला. तीच शांतता आणि तोच आत्मविश्वास.
"त्याचं असं आहे की हे बटन दाबताच जगाच्या पाठीवरील, तुम्हाला माहित नसलेली एक व्यक्ती तत्काळ मरेल; आणि त्या बदल्यात तुम्हाला पन्नास लाख मिळतील."
अनुजाने चमकून त्या बुटक्या काळ्यांकडे पाहिले. त्याच्या चेहर्‍यावर कसलेसे हसू होते.
"काय सांगताय काय तुम्ही!!!" सतीशने भयचकित होऊन विचारले.
तसे काळे शांतपणे म्हणाले, "तुम्हाला मी हे फक्त सांगितलं. घडलं तर काहीच नाही"’
"कुणाचे हस्तक आहात तुम्ही?" अनुजाने संशयाने विचारले.
काळे एकदम अवघडून म्हणाले, "अं.... ते सांगायची मुभा नाही मला. पण एवढंच सांगतो, ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची संघटना आहे आणि तुमचे पैसे काही बुडणार नाहीत."
"निघा! चालते व्हा इथून आत्ताच्या आत्ता!" सतीश ताडकन उठत म्हणाला.
"हो हो. हा निघालोच." काळेही उभे राहिले.
"आणि ते तुमचं दळभद्री खोकं... जा घेऊन!"
"असू दे एखाद दिवस. विचार करा." काळे रेटून म्हणाले.
सतीशने ते खोके, टेबलावरचे ते पाकीट सारे काही काळेंच्या हातात तावातावाने कोंबले. ताडताड जाऊन दरवाजा उघडला.
"ओके, ओके. पण माझं कार्ड ठेवतोय इथे." घाईघाईने सतीशच्या मागून जाताजाता काळेंनी जवळच्या टेबलावर आपले कार्ड मोठ्या शिताफीने ठेवलेच!

काळे निघून जाताच सतीशने खाड्कन दरवाजा बंद केला. त्याच्या कार्डाचे दोन तुकडे केले आणि रागारागाने टेबलावर फेकले.
अनुजा अजूनही सोफ्यावर बसून होती. तिने सतीशला विचारले, "तुला काय वाटतं? काय असेल ते सगळं?"
"मला अज्जिबात रस नाही यात." तो फाटकन बोलला.
"अरे, पण तुला याबद्दल जराही कुतूहल नाही का?" तिने परत खोदून विचारले.
"नाही." सतीश ताठर चेहर्‍याने म्हणाला.
तो आत गेला आणि त्याने परत पेपरमध्ये डोके खुपसले. अनुजा स्वयंपाकघरात काम करू लागली.
***
रात्रीच्या जेवणानंतर सतीश हात धूत बेसिनपाशी उभा होता, तेव्हा अनुजा सहज बोलावं तसं म्हणाली, "पण त्या वस्तूबद्दल निदान बोलायला तरी काय हरकत आहे?"
त्याने बेसिनच्या आरशातून अनुजाकडे पाहिले.
"तुला हे सगळं नवीन माहीतही करून घ्यावंसं नाही वाटत?"
"नाही! मला त्या गोष्टीचा भयानक संताप येतो उलट."
"ते दिसतंय मला. पण....." केसांमध्ये क्लचर खुपसता खुपसता ती म्हणाली, "हा काहीतरी हलकाफुलका फिरकी घेणारा प्रकार असेल, असाही जरा विचार कर ना."
"कुणाचा जीव हा हलकाफुलका प्रकार कसा असू शकतो?"
अनुजा गप्प झाली.
परत उशीवर डोके टेकता टेकता म्हणाली, "न जाणो, हा काही मानसशास्त्रीय संशोधनाचा भाग असेल."
"असेल." सतीश विषय संपवण्याच्या इराद्याने म्हणाला.
"न जाणो, कुणी विक्षिप्त अब्जाधीश हे सगळं त्याच्या टाईमपाससाठी करत असेल."
"असेल!"
"तुला जराही उत्सुकता कशी नाही रे वाटत?"
सतीशने नकारार्थी मान हलवली.
"का?"
"कारण.... कारण, हे सगळं अनैतिक आहे." त्याने तिला एकदम ठासून सांगितले.
तरी त्या रात्री अनुजाच्या मिटत्या डोळ्यांसमोर पन्नास लाखांचा आकडा तरळून गेला.
***
दुसर्‍या दिवशी सकाळी अनुजा ऑफिससाठी बाहेर पडणार, इतक्यात तिची नजर काळेंच्या फाडून दोन तुकडे करून टाकलेल्या कार्डावर गेली. तिच्याही नकळत तिने दोन्ही तुकडे पर्समध्ये टाकले. फ्लॅटला कुलूप ठोकले आणि पटकन सतीशच्या मागोमाग लिफ्टमध्ये शिरली.

ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये तिने पर्समधील व्हिजिटिंग कार्ड बाहेर काढले. त्याच्या दोन्ही फाटक्या कडा जुळवल्या. ते कार्ड तिने नीट पाहिले. त्यावर काळ्यांचे केवळ नाव आणि टेलिफोन नंबर होता. टेबलवर जाऊन तिने ते दोन तुकडे सेलोटेपने चिकटवले. ते करता करता तिने स्वतःला विचारले, ‘पण ही सगळी जुळवाजुळव मी का करतेय?’ उत्तर आले नाही.

संध्याकाळी पाचच्या सुमारास तिने कार्डावरचा नंबर फिरवला.
"नमस्कार!" पलीकडून काळ्यांचा मिठास आवाज. क्षणभर काय बोलावे ते अनुजाला कळलेच नाही. तिने घसा खाकरला. म्हणाली, "मी अनुजा देवताळे बोलतेय."
"बोला, देवताळे वहिनी." काळ्यांच्या स्वरातला आनंद लपत नव्हता.
"अं ...... जगाच्या पाठीवर कुणीतरी मरेल, म्हणजे नक्की कोण, काय..... परत सांगा."
काळे तत्परतेने उत्तरले, "तेच तर! कुणीतरी म्हणजे अगदी कुणीही मरेल. तुम्हाला त्याची काळजी नको. त्या मरणार्‍या व्यक्तीला तुम्ही जाणत नसणार, याची शंभर टक्के खातरी बाळगा. आणि हो, तो माणूस काय तुमच्या समोर मरणार नाही की तो मरताना तुम्हाला त्याला बघावं लागणार नाही. सगळा दृष्टीआडचा मामला."
"हे सगळं पन्नास लाखाच्या बदल्यात?" अनुजा अभावितपणे उद्गारली.
"बरोब्बर!"
"पण.... पण हा तर वेडाचार आहे." तिचा आवाज विचित्र झाला.
"हरकत नाही! बोलूनचालून ती एक ऑफरच होती. नको असेल तर राहिलं. त्यात काय?" काळे बेफिकीरपणे म्हणाले.
पण इकडे अनुजा जरा नरम पडली आणि म्हणाली, "अगदी नकोच असं काही नाही."
काळेंनी काय ते ओळखले.

संध्याकाळी लिफ्टमधून बाहेर येता येता अनुजाने परत तो बॉक्स आपल्या दाराशी पाहिला. कुलूप उघडले. त्या खोक्याकडे एक कटाक्ष टाकला. ‘नाही, मी नाही हे खोकं घरात घेणार!’ तिने स्वतःला उगीच बजावले. ती आत गेली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली.

परंतु थोड्या वेळाने तिने दरवाजा उघडला आणि तिच्याही नकळत ते खोके स्वयंपाकघरामध्ये टेबलावर आणून ठेवले. हॉलमध्ये येऊन खिडकीतून बाहेर पाहात बसली. कुकरच्या शिट्ट्यांनी ती भानावर आली. गॅस बंद करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये आली. हे खोके उद्या सकाळी बाहेर फेकून देऊ असा विचार करून तिने ते पार स्वयंपाकघराच्या ओट्याच्या तळाशी सरकावून दिले.

त्या रात्री जेवता जेवता ती एकदम सतीशला म्हणाली, "मला तर वाटतंय, कुणी विक्षिप्त अब्जाधीश लोकांशी खेळतोय!"
तिच्याकडे पाहात सतिश म्हणाला, "मला नाही कळलं काही."
"नाही, म्हणजे... त्या खोक्याबद्दल बोलतेय मी."
"जाऊ दे ना!" तो वैतागून म्हणाला.
ती मुकाट्याने जेवू लागली. पण परत हातातला घास तसाच ठेवून एकदम म्हणाली, "पण ती ऑफर खरीखुरी असेल, तर...?"
सतीशने तिच्याकडे चमकून पाहिले.
"म्हणजे समज.... अरे, फक्त समज..... की ती ऑफर खरी असेल तर?"
सतीशने तिच्याकडे संशयाने पाहिले. "ओके! चल, आहे, ती ऑफर खरी आहे. काय करणारेस तू? ते बटन परत मागवायचंय? पाहायचाय प्रयोग करून? करायचाय कुणाचा तरी खून?"
तिने त्याच्याकडे तीव्र नाराजीने पाहिले, म्हणाली, "खून?? काय व्याख्या तरी काये तुझी खुनाची? जर आपल्याला ती व्यक्ती माहितच नसेल, तिला आपण जाणतच नसू, तर.... तर... तर काय हरकत आहे?"
सतीशला ते ऐकून धक्काच बसला, "अगं, काय ऐकतोय मी?"
त्याच्याकडे दुर्लक्ष करत अनुजा पुढे म्हणाली, "जर मरणारा हज्जारो मैल दूरवरचा एखादा चिनी शेतकरी असेल, तर? किंवा आपल्याला कधीही माहीत होण्याची शक्यताही नसलेला कुणी कांगोमधला एखादा इसम असेल, तर?"
".... अन समज, ते शेजारच्या हॉस्पिटलातलं एखादं छोटं बाळ असेल तर? किंवा आपल्याला माहित नसलेला, पण पलीकडच्या बिल्डिंगमधला कुणी घरातला कर्ता पुरुष असेल तर?"
"तू अती करतोस."
"मुद्दा असा आहे अनुजा," तो पुढे म्हणाला, "कुणाचा खून करतोय, याने काय फरक पडणारेय? खून तो खूनच!"
अनुजा मध्येच तीव्रपणे म्हणाली, "मुद्दा असा आहे, ज्या व्यक्तीला तू आयुष्यात कधी पाहिलंही नाहीस, अन पुढे कधी पाहण्याचा चान्सही नाही, अशी व्यक्ती की जिच्या मरणाविषयी तुला काहीही कधीही माहीत होणार नाही, तिच्यासाठी तू ते बटन नाही दाबणार?"
"मी तरी नाही! पण तू ते बटन दाबशील?" सतीशने अस्वस्थपणे विचारले.
"पन्नास लाख, सतीश, पन्नास लाख!" तिचे डोळे क्षणभर चमकले.
"अरे, असला पैसा...." त्याला मध्येच तोडत ती म्हणाली, "विचार कर. पन्नास लाखात काय काय नाही होऊ शकत? किती वर्षं या भाड्याच्या फ्लॅटामध्ये राहणार आपण? तेवढ्या पैशात स्वतःचा एक मस्त फ्लॅट घेता येईल."
"नाही, अनुजा, नाही!" त्याचा चेहरा पांढराफेक पडला. त्याचा चेहरा पाहून तिने स्वतःला आवरले. "ओके! टेक इट इझी! तू इतका अस्वस्थ का होतोयस? आपण फक्त चर्चा करतोय."
जेवणानंतर हॉलमध्ये जाताना तो थांबला, वळून म्हणाला, "यापुढे तो विषय बंद."
"ओके." अनुजाने थंडपणे ताट-वाटी उचलली.
***
दुसर्‍या दिवशी सकाळी अनुजा नेहमीपेक्षा जरा लवकर उठली. सतिशच्या नाश्त्याची तयारी करू लागली. आज त्याच्या आवडीचा उपमा तिने बनवला.
"अरे! काय विशेष आज?" त्याने हसत हसत प्रसन्नपणे विचारले.
"काही नाही! मला करावासा वाटला उपमा, म्हणून केला. इतकंच." वर न पाहताच ती तुटकपणे म्हणाली. कपात चहा गाळला. "मला इतकंच म्हणायचंय की मी..." ती थबकली.
"काय?"
"....की मी स्वार्थी नाहीये."
"पण मी तसं काही म्हणालो का?"
"अं ..... काल रात्री...." ती अस्पष्टपणे पुटपुटली.
सतीश काहीच बोलला नाही मग अनुजाच पुढे म्हणाली, "त्या बटनाबद्दल! तुझा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय."
"तो कसा?" सतीशने सावधपणे विचारले.
तिचा कंठ किंचित दाटून आला, "तुला असं वाटलं असावं की मी केवळ माझ्यापुरताच विचार करतेय."
"ओह.."
"पण तसं नाहीये सतीश."
"अनू...."
"खरंच! पण मी जेव्हा नव्या फ्लॅटबद्दल बोलत होते......"
"अनू, पण तू का इतका विचार करतेयस? का इतकी गुंतत चाललीयेस त्या पन्नास लाखात?"
"नाही! मी अज्जिबात गुंततबिंतत नाहीये." ती कापर्‍या आवाजात म्हणाली, "मला फक्त एवढंच म्हणायचंय की......"
"काय?"
"की.... आपल्यासाठी एक घर असावं, हक्काचं. स्वतःचं. सगळ्या सोयी असलेल्या. एखादी कार. थोडासा आराम. आणि.... आणि आपलं स्वतःचं एक मूल." तिने एका दमात सगळे बोलून घेतले.
"अनू, होईल! होईल आपल्याला मूल."
"कधी पण?" तिने किंचित आक्रस्ताळेपणाने विचारले.
सतीशचे मन द्रवून गेले. किंचित मवाळपणे तो म्हणाला, "अगं .... तुला असं वाटतंय का...."
त्याला वाक्यही पूर्ण करू न देता ती म्हणाली, "हे बघ, मला असंही वाटतंय की तो बटनाचा प्रयोग हा कुठल्यातरी रिसर्च प्रोजेक्टचाही भाग असू शकतो. अशा परिस्थितीत माणूस काय करेल, त्याची काय प्रतिक्रिया असेल याचा त्यांना अभ्यास करायचा असेल. माणूस मरेल असं ते केवळ सांगत असतील, प्रत्यक्षात तसं काही होत नसेलही. कुणाला तरी मारून आपल्याला पन्नास लाख देण्यात त्यांचा काय फायदा?"
सतीश गप्प राहिला, पण त्याचे हात थरथरत होते. थोड्या वेळाने तो निमूटपणे उठून निघून गेला.
तो निघून गेला, तरी अनुजा मात्र तशीच टेबलाशी बसून राहिली. कपातल्या चहावर जमा होणार्‍या सायीच्या जाळीकडे ती एकटक पाहात राहिली. मनात आले, कामाला जायला उशीर होतोय, उठायला पाहिजे. दुसरे मन लगेच म्हणाले, नाही जायचे मला त्या कळकट्ट ऑफिसात!
***
बेसिनमध्ये कप विसळता विसळता ती अचानक थांबली. हात कोरडे केले आणि काल रात्री तळाशी ढकलून दिलेले ते खोके ओढून बाहेर काढले. त्यातून तो काचेचा डोम आणि बटनचे युनिट बाहेर काढून टेबलावर ठेवले. आत चावी असलेले पाकीटही त्यात होते. ती छोटीशी चावी घेण्याआधी तिने त्या काचेच्या डोमकडे एकटक जरा वेळ पहिले. मग काळजीपूर्वक तो काचेचा डोम काढून बाजूला ठेवला.
‘या एका निर्जीव बटनासाठी मनाचा केवढा गदारोळ!’
मग तिने एक बोट स्थिरपणे त्या बटनावर टेकवले. ‘काय ते सगळं नीट होऊ दे!’ असे म्हणत तिने ते बटन जोरात दाबले.
तिने बटन दाबले खरे, पण लगेचच ती बाजूला सरकली. भीतीची एक लहर सणसणत तिच्या सर्वांगातून गेली. ‘जगाच्या पाठीवर कुण्या एका जीवावर याचा काय परिणाम होत असेल आता!’ तो एक निर्णय! तो एक क्षण!........ आला तसा निघून गेला. तिने एक विचित्र सुस्कारा टाकला. राग... भीती... त्रागा... काही नाही होत अशी एक बेफिकिरी..... ती सावरली आणि ते बटन युनिट, काचेचा डोम आणि ती इवलीशी चावी सगळे गोळा करून डस्टबिनमध्ये फेकून दिले. तिला आता कामाला जायचे होते. एकटीने घरात थांबायची जणू भीती वाटत होती.

तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी तिने गळ्यात बॅग लटकवली. तितक्यात टेलिफोनची बेल वाजली. तिने रिसीव्हर उचलून "हॅलो" म्हटले.
"मिसेस अनुजा देवताळे?"
"होय, बोलतेय."
"मी सिव्हिल हॉस्पिटलमधून बोलतोय."
पुढे तिच्या कानी जे आदळले, ते ऐकून तिचे अवसानच पार गळून गेले. घशाला कोरड पडली. शहरातल्या रस्त्यावरून भरधाव येणार्‍या एका चारचाकीने सतिशला उडवले होते. ती मटकन खाली बसली. तिला हमसून रडू फुटले.
त्याच वेळी तिला आठवले, सतीशची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पंचवीस लाखांची आहे. त्याचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्याचे पन्नास लाख मिळणार होते!

तिला धड श्वासही घेता येईना. ती कशीबशी चालत स्वयंपाकघरातील बेसिनपाशी पोहचली. डस्टबिनमध्ये टाकलेले बटन युनिट घाईघाईने बाहेर काढून टेबलवर ठेवले. मस्तकात घणाघाती घाव पडत होते. तिने तो ठोकळा बराच वेळ उलटसुलट करून पाहिला. पण त्यावर एखादा स्क्रू, वायर असे काहीच दिसेना. ते दुरुस्त करायचा ती निष्फळ प्रयत्न करू लागली. काहीच होईना म्हटल्यावर, तिने तो ठोकळा ओट्यावर जोरजोरात आपटायला सुरुवात केली. त्या ठोकळ्याचे शेवटी दोन तुकडे झाले. तिने ते दोन तुकडे ओढून ओढून बाजूला केले. या खटपटीत तिच्या करंगळीला रक्ताची धार लागली. पण ती भानावर नव्हती. त्या ठोकळ्याच्या आत ट्रान्झिस्टर, सर्किट, वायर काही म्हणजे काहीच नव्हते. तो केवळ एक ठोकळा होता.

तेवढ्यात परत टेलिफोनची बेल वाजली. तिने विजेच्या चपळाईने रिसीव्हर उचलला.
"सौ. अनुजा देवताळे?" हॉस्पिटलमधला मघाचाच आवाज.
"तुम्ही मघाशी म्हणालात की मयत व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही म्हणून?"
अनुजा पुतळ्यासारखी स्तब्ध झाली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. तसा पलीकडचा आवाज गंभीरपणे पुढे म्हणाला, "तुम्ही तुमच्या नवर्‍याला खरंच ओळखत नव्हता का?"

(टीप: कथेला मराठी साज चढवताना, ‘कळलावी’ हे शीर्षक सुचले. कळलावी हे गर्भपात करणारे फूल आहे असे ऐकलेय. फूल प्रत्यक्ष पाहिलेय, पण त्याच्या या कर्तृत्वाची सत्यता माहीत नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा. तसेच बटनसाठी कळ असा मराठी शब्द आहे, पण तो रोजच्या बोलण्यात वापरला जात नाही. म्हणून बटन तसेच ठेवलेय. कळलावी फुलाचे कर्तृत्व आणि इथल्या इंग्रजी बटनाचे कर्तृत्व याचा अर्थपूर्ण संबंध हुश्शार मिपाकर समजून घेतीलच!)
- शिवकन्या.

Copyright © 2016, .

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

29 Oct 2016 - 12:47 pm | नूतन सावंत

सुंदर अनुवाद,मराठी वेशभूषा चपखल बसली आहे.

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 1:29 pm | यशोधरा

कथा चांगली जमली आहे.

मितान's picture

31 Oct 2016 - 10:40 am | मितान

छान अनुवाद :)

प्रचेतस's picture

31 Oct 2016 - 11:19 am | प्रचेतस

उत्तम रूपांतर.

कळलावी गर्भपातासाठी नाही तर गर्भधारणा सुकर होण्यासाठी वापरतात. कळलावीच्या कंदाचा अर्क सह्याद्रीतील आदिवासी लोक बाळंतिणीच्या ओटीपोटावर लावतात त्याने कळा कमी होऊन प्रसूती सुलभ होते.
ह्या फुलाला अग्निशिखा नावाचे अत्यंत सुंदर नाव आहे. अगदी तसेच ते दिसते.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:01 pm | शिव कन्या

माहितीबद्दल धन्यवाद.
सुकर गर्भधारणे साठी कि बाळंतपण सुकर होण्यासाठी? कारण दोन्हीत भयानक फरक आहे.
अग्निशिखा नाव खरेच सुंदर आहे.... आणि ते फुल दिसतेही तसे!

भ ट क्या खे ड वा ला's picture

31 Oct 2016 - 11:20 am | भ ट क्या खे ड वा ला

कळलावी म्हणजेच बचनाग Gloriosa superba.
कंद सापाच्या दंशावर उपयुक्त. याच्या शेंगा गेली काही वर्ष परदेशी पाठवल्या जातात. यात अल्कलाइडस आहेत.कळलावी हे नाव या वरून असावे > गाय म्हैस अडली तर याचा कंद कापून त्याचा रस त्यांच्या अंगाला चोळतात. त्यामुळे कळा येण्याचे प्रमाण वाढते व सुलभ प्रसूती होते.गणपती गौरींच्या दिवसात ही वेल फुलते , फुलाना गौरीचे हात असे ही नाव आहे.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:03 pm | शिव कन्या

सर्पदंशावर उपयुक्त ही नवी माहिती! धन्यवाद.
अग्निशिखा प्रमाणेच गौरीचे हात हेही नाव सुंदरच!

कळलावीच्या फुलाचा फोटो टाका कोणीतरी असला तर.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:05 pm | शिव कन्या

यशो, माझ्याकडे मी स्वतः काढलेला या फुलाचा फोटो आहे, पण मिपावर मला फोटो नाही टाकता येत...
सगळे करून पहिले..

नेटवरुन शोधले मी. माझ्याकडेही आहेत ह्या फुलाचे फोटो, फक्त नाव ठाऊक नव्हते. :)

प्राची अश्विनी's picture

1 Nov 2016 - 8:07 am | प्राची अश्विनी

अनुवाद आवडला.

सौन्दर्य's picture

1 Nov 2016 - 8:21 am | सौन्दर्य

मराठी साज सुंदर चढविलात.

मराठी कथालेखक's picture

1 Nov 2016 - 12:27 pm | मराठी कथालेखक

छान आहे.
पण 'मयत व्यक्तीला ओळखत नाही' असे ती का म्हणाली ते नीट कळाले नाही. शिवाय अनोळखी व्यक्ती मरण्याऐवजी तिचा नवरा का मेला ते पण नाही समजले. उलगडून सांगाल काय ?

असंका's picture

1 Nov 2016 - 12:36 pm | असंका

+१...

मराठी कथालेखक's picture

1 Nov 2016 - 2:19 pm | मराठी कथालेखक

थोडा अजून विचार केल्यावर असं वाटतंय की , बटन दाबल्यावर काही क्षणांकरिता नवर्‍याचा सगळा डेटा तिच्या मेंदूतून नाहीसा झाला म्हणजेच काही क्षणांकरिता सतीश तिच्यासाठी अनोळखी झाला आणि मरण पावला. फोन आला तेव्हा ती म्हणाली की त्याला ओळखत नाही, त्यानंतर तो डेटा तिच्या मेंदुत पुन्हा प्रवेशला :)
असंच काहीसं आहे का ?

चलत मुसाफिर's picture

1 Nov 2016 - 2:16 pm | चलत मुसाफिर

शेवटी अनोळखी तर सगळेच असतात. नवरा, बायको, भावंडे, आईबाप, मित्रमैत्रिणी. प्रसंगोपात्तर (शब्द योग्य आहे का?) त्यांची वेगळी, अपरिचित रूपे समोर येतात.

सदरची कथा स्वप्नरंजनात्मक आहे. पण वास्तवातही आपण फारसा दूरगामी विचार न करता बेदरकारपणे (किंवा अपराधी टोचणीला दाबून टाकत) स्वपक्षपाती निर्णय घेत असतोच. फलस्वरूप परिणाम हे कोणाला, कधी भोगावे लागतील याची कल्पना नियती आपल्याला देईलच असे नाही, असा या कथेचा मतितार्थ असावा.

मराठी कथालेखक's picture

1 Nov 2016 - 2:21 pm | मराठी कथालेखक

हं असेही असेल.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:12 pm | शिव कन्या

नेमकेपणाने मर्म इस्कटून सांगितल्या बद्दल धन्यवाद.

रच्याकने, प्रसंगोत्पात असा तो उपद्यवापी शब्द आहे.
:)

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:27 pm | शिव कन्या

उपद्व्यापी असे वाचावे !

पैसा's picture

4 Nov 2016 - 11:44 am | पैसा

अनुवाद आवडला. नवरा अनोळखी अशा अर्थाने आहे का, की दोघेही या निकराच्या परिस्थितीत कसे वागतील याची एकमेकाना कल्पना नव्हती आणि त्या अर्थाने ते अनोळखीच निघाले.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:13 pm | शिव कन्या

पै ताई, हे पण बरोबर.

ज्योति अळवणी's picture

4 Nov 2016 - 4:39 pm | ज्योति अळवणी

पती पत्नी म्हणून एकत्र राहत असूनही तिला सतीश ची मानसिकता समजू शकले नाही. त्याला कोणालाही मारून ऐहिक सुख विकत घ्यायचे नव्हते. म्हणजे एक प्रकारे तिने त्याला ओळखले नव्हते... म्हणून तो अनोळखी झाला तिच्यासाठी. असंही असू शकतं.

कथा मात्र सुंदर लिहिली आहे

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:14 pm | शिव कन्या

होय, हे पण बरोबर.... सुंदर कथेचे श्रेय मात्र मूळ लेखकाला.
:)

मनिमौ's picture

4 Nov 2016 - 7:21 pm | मनिमौ

कथा

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 2:52 pm | सस्नेह

कथा मांडणी व अनुवाद छान.
अनोळखी ही संकल्पना मलाही नाही समजली.

बबन ताम्बे's picture

5 Nov 2016 - 9:50 pm | बबन ताम्बे

उत्कंठा वर्धक आणि अनपेक्षित शेवट

भृशुंडी's picture

5 Nov 2016 - 11:25 pm | भृशुंडी

विनय धुमाळे दिग्दर्शित महानगर मालिकेत ह्याच कथेवर आधारित एक भाग होता -

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2016 - 10:18 am | प्राची अश्विनी

अगदी हेच आठवत होते, "यक्ष".

कानडाऊ योगेशु's picture

7 Nov 2016 - 6:07 pm | कानडाऊ योगेशु

त्या भागाचे नाव बहुदा "यक्षप्रश्न" असे होते.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:16 pm | शिव कन्या

ओह.... हे नव्हते माहित मला.... लिंक दिल्याबद्दल आभार.
माध्यमांतर होताना केलेले बदल आवडले.

जयन्त बा शिम्पि's picture

7 Nov 2016 - 9:48 pm | जयन्त बा शिम्पि

" यक्ष " पाहिला, पण त्यातही सर्वच गोष्टी व्यवस्थित मांडता आल्या नाहीत. शेवट कसातरी जुळविल्यासारखा वाटला.

रुपी's picture

8 Nov 2016 - 12:09 am | रुपी

आवडली..

पिशी अबोली's picture

8 Nov 2016 - 10:48 am | पिशी अबोली

का कुणास ठाऊक पण 'monkey's paw' आठवलं.
आवडलं.

आतिवास's picture

8 Nov 2016 - 11:00 am | आतिवास

भावानुवाद ओघवता वाटला.
पण शेवट मात्र कळला नाही.
आता मूळ कथा मिळतेय कुठं ते बघते.

आतिवास's picture

8 Nov 2016 - 11:43 am | आतिवास

तेवढ्यात परत टेलिफोनची बेल वाजली. तिने विजेच्या चपळाईने रिसीव्हर उचलला.
"सौ. अनुजा देवताळे?" हॉस्पिटलमधला मघाचाच आवाज.
"तुम्ही मघाशी म्हणालात की मयत व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही म्हणून?"
अनुजा पुतळ्यासारखी स्तब्ध झाली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. तसा पलीकडचा आवाज गंभीरपणे पुढे म्हणाला, "तुम्ही तुमच्या नवर्‍याला खरंच ओळखत नव्हता का?"

मूळ परिच्छेद असा आहे -
She whirled with a gasp as the telephone rang. Stumbling into the living room, she picked up the receiver.
"Mrs. Lewis?" Mr. Steward asked.
It wasn't her voice shrieking so; it couldn't be. "You said I wouldn't know the one that died!"
"My dear lady," Mr. Steward said, "do you really think you knew your husband?"

अनुवाद काहीसा असा हवा -
तेवढ्यात परत टेलिफोनची बेल वाजली. तिने विजेच्या चपळाईने रिसीव्हर उचलला.
"सौ. अनुजा देवताळे?" हॉस्पिटलमधला मघाचाच आवाज.
"तुम्ही तर म्हणाला होतात की मरणारी व्यक्ती मला अनोळखी असेल. " तिचा आवाज चढलेला नव्हता, .... (या वाक्याच्या उत्तरार्धाचा अनुवाद मला नीट जमला नाहीये)
तसा पलीकडचा आवाज गंभीरपणे पुढे म्हणाला, "तुम्ही तुमच्या नवर्‍याला खरंच ओळखत होता असं तुम्हाला वाटतं का?"
----
मूळ कथेचा शेवट अप्रतिम आहे. अनुवादात गडबड झाल्याने मला शेवट समजला नव्हता.

आतिवास's picture

8 Nov 2016 - 11:45 am | आतिवास

तो शेवटचा फोन हॉस्पिचलमधून आला नव्हता तर तो काळेंचा फोन होता.

मराठी कथालेखक's picture

8 Nov 2016 - 11:49 am | मराठी कथालेखक

दिवाळीच्या गडबडीत अनुवाद गडबडला :)

आनंदयात्री's picture

9 Nov 2016 - 2:27 am | आनंदयात्री

आता टोटल लागली. धन्यवाद.

स्मिता श्रीपाद's picture

10 Nov 2016 - 2:17 pm | स्मिता श्रीपाद

ओह्ह अता कळला शेवट
सुंदर कथा आहे...पण शेवट वाचुन खरच काही कळेनासे झाले...प्लीज योग्य शेवट बदलाल का ?

मराठी कथालेखक's picture

8 Nov 2016 - 11:57 am | मराठी कथालेखक

"तुम्ही तर म्हणाला होतात की मरणारी व्यक्ती मला अनोळखी असेल. " तिचा आवाज चढलेला नव्हता, .... (या वाक्याच्या उत्तरार्धाचा अनुवाद मला नीट जमला नाहीये)

"तुम्ही तर म्हणाला होतात की मरणारी व्यक्ती मला अनोळखी असेल. " संयम सुटू न देता ती म्हणाली.

इथे तिने स्वतःवर ताबा ठेवण्याचं मुख्य कारण हे आहे की काळेंनी काहीही कबूल केलं असलं तरी बटण दाबणारी ती होती. त्यामुळे 'it couldn't be' महत्वाचं वाटतं.

बाकी मूळ कथेचा परिच्छेद आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:22 pm | शिव कन्या

टोटल नीट मारून दिलीत त्याबद्दल आभार.
<"तुम्ही तुमच्या नवर्‍याला खरंच ओळखत होता असं तुम्हाला वाटतं का?"> हा अनुवाद चपखल.
मूळ कथानक शोधून, त्याची मराठीत यथास्थित परत मांडणी करण्याचे कष्ट घेऊन कथांत सुरेख केलात.
परत एकदा धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2016 - 5:46 pm | स्वाती दिनेश

अनुवादाचा मराठी साज चांगला जमला आहे.
शेवटी गोंधळात पडले होते पण अतिवास यांनी मूळ परिच्छेद व योग्य अनुवाद लिहिल्यामुळे गोंधळ दूर झाला.
सा सं- योग्य बदल करता येईल का?
स्वाती

जव्हेरगंज's picture

10 Nov 2016 - 6:40 pm | जव्हेरगंज

मस्त अनुवाद!

पण मूळ कथेच्या शेवटात पण शब्दांचा घोळ घातल्याने मूळ शेवटसुद्धा नाही आवडला.

तसं म्हटलं तर आपण स्वत:ला तरी किती ओळखतो. मग बटन दाबणारी व्यक्ती स्वत: गचकली असती तर आश्चर्य वाटायला नको .

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 6:25 pm | शिव कन्या

आपण स्वतः सुद्धा प्रसंगा प्रसंगाने बदलत असतो.
अशीही उकल केल्याबद्दल धन्यवाद.

मित्रहो's picture

11 Nov 2016 - 12:16 pm | मित्रहो

शेवट काय असावा याचा अंदाज आला नंतर वरील प्रतिसादातून तोच आला. बाकी आपण आपल्या आजूबाजूचीच माणसेच काय स्वतःला सुद्धा बरोबर ओळखत नाही हे जव्हेरगंज यांचे मत पटते.