मुगाचे पौष्टिक लाडू

Primary tabs

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in लेखमाला
29 Oct 2016 - 12:24 am

मुगाचे पौष्टिक लाडू

साधारणपणे मुगाचे लाडू हे नेहमीच्या (साल काढलेल्या) डाळीच्या पिठापासून बनवले जातात. परंतु मी (खरे तर माझ्या सासूबाईंनी) इथे थोडा बदल केला आहे. सालवाली मुगाची डाळ आणि इतर साहित्य वापरून हे लाडू अधिक पौष्टिक बनवले आहेत.
हे लाडू उपवासालाही चालतात. थंडीच्या दिवसांत भरपूर उष्मांक देतात. शिवाय गरोदर आणि स्तनपान देणार्‍या स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत.

.
साहित्य:

सालवाली मुगाची डाळ - २५० ग्रॅम
पिठीसाखर- १०० ते १२५ ग्रॅम (तुम्हाला कितपत गोड आवडते त्या प्रमाणात.)
साजूक तूप - १२५ ग्रॅम
बदाम पूड - पाव कप (साधारण अर्धी वाटी )
खारीक पूड - पाव कप (साधारण अर्धी वाटी )
डिंक - २ टेबलस्पून
काळ्या मनुका - पाव कप (साधारण अर्धी वाटी )
जायफळ पूड - अर्धा टीस्पून
वेलची पूड - १ टीस्पून

कृती :

सालवाली मुगाची डाळ गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये दळावी.
डिंक थोड्याशा तुपात फुलवून (तळून) घ्यावा. मिक्सरवर जाडसर दळून घ्यावा.
पिठीसाखरेतील गुठळ्या मोडून, ती चाळून घ्यावी.
जाड बुडाच्या एका भांड्यात/कढईत किंवा नॉन-स्टिक पॅनमध्ये गरजेप्रमाणे तूप घेऊन मुगाचे पीठ खमंग वास येईपर्यंत मध्यम ते मंद आचेवर (जसे बेसन लाडूसाठी बेसन भाजतो, तसे) भाजावे. सतत हलवावे, अन्यथा खालून जळण्याची भीती असते.
थंड झाल्यावर चवीप्रमाणे पिठीसाखर व इतर सर्व पदार्थ त्यात मिसळून लाडू वळावेत.

टीप: साखर वापरायची नसेल, तर मेथीच्या लाडूला जसा आपण गुळाचा पाक करतो, तसा करून भाजलेले मुगाचे पीठ व इतर सर्व साहित्य पिठीसाखर वगळून त्यात घालून लाडू वळावेत. यात तूप कमी वापरले तरी चालते.

प्रतिक्रिया

पौष्टिक लाडू आवडले. यावेळी डिंकाऐवजी हे लाडू करून पाहीन.

इशा१२३'s picture

29 Oct 2016 - 8:53 am | इशा१२३

डिंक घालण्याची कल्पना आवडली.असे करुन पहाते.

कविता१९७८'s picture

29 Oct 2016 - 12:32 pm | कविता१९७८

मस्त पौष्टीक रेसिपी

अनन्न्या's picture

31 Oct 2016 - 11:00 am | अनन्न्या

आता असे पण करीन.

छान.. मुगाच्या डाळीचे लाडू माझे अत्यंत आवडते. माझी आजी छान करायची.

पैसा's picture

2 Nov 2016 - 5:25 pm | पैसा

पाकृ आणि फोटो खासच!

अजया's picture

2 Nov 2016 - 10:08 pm | अजया

मस्त पाकृ!

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2016 - 12:43 am | स्वाती दिनेश

लाडू छान झालेले दिसतात.
स्वाती

पद्मावति's picture

3 Nov 2016 - 1:57 am | पद्मावति

मस्त पाक्रु.

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 10:47 am | नूतन सावंत

मुगाचे लाडू माझे आवडते,पण या पद्धतीने केले नव्हते,आता करून पाहीन,थंडी येतेच आहे.

स्नेहांकिता's picture

5 Nov 2016 - 2:56 pm | स्नेहांकिता

बेसन लाडूसारखीच दिसतेय पाकृ, पण टेस्ट वेगळी असणार !