दशकुमारचरितम वाकाटक

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in लेखमाला
29 Oct 2016 - 12:36 am

छायाचित्राची लिंक
http://www.mediafire.com/view/518ak8qx2z0xxkc/Dashkumar-Covers-web.jpg

1
मी मध्ये 'दशकुमारचरितम'चे भाषांतर करायला घेतले आणि मोठ्या कष्टाने ते पूर्णही केले, त्या पुस्तकाची ही प्रस्तावना. हे भाषांतर करताना मी श्री. जॅकॉ यांच्या इंग्रजी भाषांतराचा मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यामुळे माझी फारच तारांबळ उडाली. पण मूळ संस्कृत ग्रंथ वाचायलाच लागला. त्यात एक बरे झाले, मला संस्कृत पुस्तक वाचण्यास जरा तरी जमू लागले आहे. हा जवळजवळ एक छोटासा लेखच आहे. आपल्याला हा आवडेल अशी आशा आहे. त्या पुस्तकाचे मुखपृष्ठही मीच तयार केले, ते वर दिसतेच आहे. या मुखपृष्ठावरील छायाचित्रे मीच अजिंठ्यामध्ये काढली आहेत.

प्रस्तावना

१९०७ साली श्री. मार्क कॉलिन्स यांनी लिपझिक विद्यापीठाला एक प्रबंध सादर केला. त्याचे नाव होते ‘रघुवंश आणि दशकुमारचरितम ज्या काळात रचले गेले, त्या काळातील भौगोलिक माहिती आणि त्यावरून या दोन्ही ग्रंथांचा काळ ठरविण्याचा प्रयत्न’. यात श्री. कॉलिन यांनी दशकुमारचरितम या कांदबरीतील आठव्या प्रकरणावरून असे अनुमान काढले आहे की या काळात नागपूर व त्याच्यावरच्या भागात एक प्रबळ राज्यसत्ता होती व त्या सत्तेचे मांडलिकही बर्‍यापैकी प्रबळ होते. अर्थात या मतालाही बराच विरोध झाला. उदा. कार्ल खंडालवाला, ब्रह्मानंद देशपांडे, शिला वाईनर इत्यादींनी यात ऐतिहासिक व भौगोलिक सत्य काहीही नसून याला फक्त कादंबरीचेच महत्त्व द्यावे असे आग्रहाने प्रतिपादन केले. विरोध करणारे मातबर अभ्यासक होते, त्यामुळे त्यांच्या मतांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. पण महामहोपाध्याय श्री. मिराशी यांनी श्री. कॉलिनचे म्हणणे उचलून धरले आणि त्याला पुष्टी मिळाली अजिंठ्याचे अभ्यासक श्री. स्पिंक यांच्या अभ्यासाने. या सगळ्या अभ्यासकांचे म्हणणे होते की या आठव्या भागात वाकाटकांच्या उतरत्या काळाचे वर्णन मोठ्या खुबीने केले आहे. अर्थात तसे असावे असे आता बर्‍याच अभ्यासकांना वाटते. महामहोपाध्याय मिराशींचे मत जर ग्राह्य धरले, तर या ग्रंथावरून त्या काळातील बरीच माहिती गोळा करता येते व त्या काळातील समाजजीवनावर थोडाफार प्रकाश आपल्याला टाकता येतो. तो प्रयत्न आपण करणार आहोत, पण त्या अगोदर आचार्य दंडी कोण होते, ते एवढे प्रसिद्ध का झाले, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आचार्य दंडींनी हा ग्रंथ पल्लवांचा आत्मसंतुष्ट राजा नरसिंहवर्मन दुसरा याला शहाणपणाचे दोन शब्द सुनविण्यासाठी रचला असावा. यथा राजा तथा प्रजा या नियमानुसार प्रजेतही बेबंदशाही माजली असावी.

त्या काळात सहाव्या किंवा सातव्या शतकात आचार्य दंडी हे पल्लवांच्या दरबारी राजकवी होते. हे पद त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आले होते. हे घराणे मूळचे विदर्भाचे. त्यांचे गोत्र होते कौशिक. हे घराणे मूळचे गुजरातमधील आनंदपूर येथील. त्यांच्या कुठल्यातरी पूर्वजांनी नाशिक्यमधील अचलापुउर येथे स्थलांतर केले. याच घराण्यात आचार्य दंडींच्या आजोबांनी - ज्यांचे नाव दामोदर होते त्यांनी - जन्म घेतला. कवी भारावी यांच्यामुळे राजा विष्णुवर्धन यांच्याशी दामोदर यांची मैत्री झाली. एकदा दामोदर राजाबरोबर जंगलात शिकारीला गेले असता, त्यांना भुकेपोटी मांसभक्षण करावे लागले. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली. त्या तीर्थयात्रेदरम्यान त्यांनी गंगा घराण्यातील एका राजाच्या दरबारी राजकवीची नोकरी पत्करली. काव्यावरील त्यांचे प्रभुत्व पाहून त्यांना त्या दरबारातून पल्लवांचा राजा सिंहविष्णूने त्याच्या दरबारी आमंत्रण दिले. या वेळी त्यांचे वय असेल अंदाजे वीस. श्री. दामोदरांना अनेक मुलींनंतर एक मुलगा झाला, त्याचे नाव होते वीरदत्त. हा वीरदत्त व त्याची पत्नी गौरी यांच्या पोटी श्री. दंडींनी जन्म घेतला. वयाच्या सातव्या वर्षीच दंडीचे शिक्षण सुरू झाले. दुर्दैवाने चालुक्यांनी पल्लवांवर केलेल्या आक्रमणाच्या राजकीय रणधुमाळीमुळे आचार्यांना कांची सोडणे भाग पडले. त्याच काळात त्याच्या मातापित्यांचाही मृत्यू झाला असावा. पुढील बारा वर्षे तरुण दंडीला चालुक्यांनी व्यापलेल्या स्वत:च्या देशात अज्ञातवासात काढावी लागली. त्याचे हे नष्टचर्य संपले, जेव्हा परमेश्वरवर्मन पहिला याने चालुक्यांचा राजा विक्रमादित्याचा पराभव केला तेव्हा. कांचीमध्ये पल्लवांची सत्ता परत प्रस्थापित झाल्यावर आचार्य दंडींना राजकवीचे पद परत उपभोगण्यास मिळाले व ते त्यांनी परमेश्रवरवर्मन-१ व त्याचा मुलगा नरसिंहवर्मन-२ यांच्या कारकिर्दीत उपभोगले. त्या काळातील त्यांचे मित्रही चांगलेच प्रसिद्ध पावले. उदा. ललितालय जो एक श्रेष्ठ वास्तुरचनाकार, जादूगार व कवी होता, रणमल्ल जो सेनाप्रमुखांचा मुलगा होता, मातृदत्त जो वेदांचा प्रकांडपंडित व कवी होता, देवशर्मन एक बुद्धिमान ब्राह्मण होता, जयंत, नारायण, भजनानंद, रामशर्मा इ. इ.

आचार्य दंडी हे एक बुद्धिमान कवी होते व त्यांनी कौटिल्याचे अर्थशास्त्र व वात्सायनाचे कामसूत्र यांचा विशेष अभ्यास केला होता. जेव्हा त्यांना कांची सोडावे लागले, तेव्हा त्यांनी उत्तरेत भरपूर प्रवास केला होता व तेथील जनपदांचा अभ्यासही केला होता, ज्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणातही दिसते. राजदरबारात व राजगृही त्यांची ऊठबस असायची. त्यामुळे त्यांना राजदरबारातील कामकाजांची पूर्ण कल्पना होती, तसेच काळ्या कृत्यांचीही माहिती होती. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अत्यंत खेळकर होता व अडीअडचणींकडे ते त्याच दृष्टीकोनातून पाहायचे व त्यावर मात करत असणार.
याच काळात आचार्य श्री. दंडी यांनी त्यांचे तीन ग्रंथ लिहिले. म्हणजे त्यांनी जास्त लिहिले असतील, पण आज आपल्याला त्यातील तीनच माहीत आहेत. १. अवंतीसुंदरीकथा, २. दशकुमारचरितम व ३. काव्यदर्श. नावावरून दंडी एक संन्यासी वृत्तीचा माणूस वाटण्याची शक्यता आहे. पण हा माणूस भौतिक सुखांत व जगाच्या रहाटीत गुंतून पडणारा होता. दरबारात सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती व त्याचा उपभोग तो उत्तमपणे घेत असणार. अर्थात त्याची बुद्धिमत्ता अफाट होती व अनेक टीकाकारांनी ती मान्यही केली आहे. याच्या ग्रंथांमध्ये कांचीच्या प्रदेशाचे जास्त वर्णन येत नाही, उलट विदर्भाचा त्याला बराच अभिमान असावा असे वाटते. त्याला महाराष्ट्रीचेही कौतुक होते व त्याच्या काव्यदर्श या ग्रंथामध्ये त्याने विदर्भी लिखाणशैलीचेही पोटभरून कौतुक केलेले आढळते. दशकुमारचरितमच्या प्रारंभी जे श्लोक आढळतात, त्यावरून ते विष्णूचे भक्त होते हे कळते. आजही जळगाव, धुळे, नागपूर भागात श्रीविष्णूची पूजा बर्‍यापैकी प्रचलित आहे. काही अभ्यासकांच्या मते आचार्य दंडी हे कालिदासाचे समकालीन होते. अर्थात याला ऐतिहासिक लिखित पुरावा देता येत नाही. त्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून अभ्यासकांनी हे मत मांडलेले आहे. काहींच्या मते तीन दंडी अस्तित्वात होते. अर्थात हे मत आता फारसे कोणी गृहीत धरत नाहीत. काहींच्या मते दशकुमारचरितमची पूर्वपीठिका कोणीतरी मागाहून घुसडली आहे. पूर्वपीठिका आणि इतर भागात ज्या विसंगती आढळतात, त्यांचाही या मतासाठी आधार घेण्यात येतो. दंडी, कालिदास, भवभूती यांच्या गद्य काव्यातील सारखेपणा ते साधारणत: एकाच काळातील असावेत यासाठी पुरावा म्हणून काही जण वापरतात, पण तो काही ऐतिहासिक पुरावा नाही. पण त्याकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. कविचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे.

एकदा साक्षात सरस्वतीने एका सुंदर युवतीचे रूप घेतले व ती अल्लडपणे एका चेंडूशी खेळू लागली. ते पाहून दंडी म्हणाले,
एकोपि त्रय इत भाति कंदुकोयं कान्ताया: करतलरागरक्तरक्त: ।
भूमौ तच्चरणनखांशुगौरगौर: खस्थ: सन्नयनमरीचिनीलनील:॥

याचा स्वैर अर्थ असा होतो : जेव्हा ती त्या चेंडूला तळहाताने मारते, तेव्हा तिच्या हातात एक चेंडू नसून तीन चेंडू आहेत असा भास होतो. तिच्या तळहाताची लाली त्या चेंडूचा रंग लाल करते. जमिनीवर पडल्यावर तिच्या चमकणार्‍या नखांमुळे तो पांढरा भासतो. जेव्हा तो हवेत असतो, तेव्हा तिच्या गडद निळ्याशार डोळ्यातील किरणांनी त्याचा रंग निळा निळा होतो.

आता भवभूतीची ही रचना बघा :
विदितं ननु कंदुक ते ह्रदयं प्रमदाधरसंगमलुब्ध इव।
वनिताकरतामरसाभिहत: पतित: पुनरुत्पतासि॥

अर्थ : हे कंदुका, तुझ्या ह्रदयात काय चालले आहे ते मला चांगले समजते आहे. तिच्या करकमळाच्या थपडा खात तू वारंवार जमिनीवर पडतोस, पण तिच्या अधरस्पर्शाच्या इच्छेने परत परत तिच्याकडे उसळी घेतोस.

आणि हा कालिदास :
पयोधराकारधरो हि कन्दुक: करेण रोषादभिहन्यते मुहु:।
इतीव नेत्राकृतिभीतमुत्पलं स्त्रिय: प्रसादाय पपात पादयो:॥

अर्थ : जमिनीवर आपटून परत परत वर येताना तो चेंडू तिच्या उरोजांचा आकार घेत असल्यामुळे, विस्फारलेल्या नयनांनी ती त्या चेंडूवर तिच्या करकमलांनी रागावून प्रहार करीत होती. ते पाहताच तिच्या कमलनयनांशी स्पर्धा करणारे तिच्या केसातील कमळ दचकून तिच्या पायावर पडून गयावया करू लागले.

या तिन्ही रचना पाहिल्यावर त्या एकाच काळातील असाव्यात असे कोणालाही वाटेल. म्हणजे चेंडू व त्याच्याशी खेळणारी सुंदर तरुणी यांच्यामधील नाते उलगडताना तिच्या सौंदर्याचे रसग्रहण करण्याची ही पद्धतच त्या काळात असावी. अर्थात या अर्थाची रचना आत्ताच्या काळातही कवीला सुचू शकते. मला आठवते की ही कल्पना एका इंग्लिश गाण्यातही वापरली गेली आहे. प्रो. विल्सन यांनी आचार्य दंडी यांचा काळ अकरावे शतक काही गृहीतकांवर (भोजराजाचा उल्लेख) ठरविला. पण त्यांनीच नंतर त्यांचा काळ आधीचा असावा असेही म्हटले आहे. थोडक्यात, असे काही जण सोडल्यास, सहावे शतक हा आचार्यांचा काळ असावा असे इतर सर्व जण मानतात. आपणही तेच गृहीत धरण्यास हरकत नाही. जर स्पिंक, महामहोपाध्याय मिराशी व कॉलिन्स यांचे म्हणणे खरे मानले, तर आचार्यांच्या काळाचा अभ्यास हा सहाव्या शतकातील घडामोडींचा अभ्यास ठरतो. त्यांच्या रचनेतून साहजिकच त्या काळाचे प्रतिबिंब उठले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून दशकुमारचरितम हे त्या काळातील समजजीवनावर थोडा का होईना प्रकाश टाकू शकते असे वाटते, ज्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

आचार्य दंडींच्या आधी संस्कृत भाषेतील ग्रंथ हे अलंकारिक भाषेत रचले जायचे. अर्थातच त्यामुळे त्यात थोडीशी कृत्रिमताही आहेच. आचार्य दंडींनंतर हे सगळे बदलले. त्यांची भाषा रोखठोक व मूळ मुद्द्याला हात घालणारी म्हणून वाचकांना आवडू लागली. पण आपल्याला कुठल्याही साहित्यांची तुलना करायची नसल्यामुळे यात आपण शिरायला नको. आचार्य दंडी सहाव्या शतकात होऊन गेले याला आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे दशकुमारचरितममध्ये कुठेही मुसलमानी चालीरितींचा उल्लेख नाही, ना त्यांच्या आक्रमणांचा. यवनांचा उल्लेख आहे, पण ते ग्रीक किंवा भारतातीलच यवन असावेत.

महामहोपाध्याय श्री. मिराशी यांनी त्या वेळची राजकीय परिस्थिती काय होती आणि दशकुमारचरितममध्ये आचार्य दंडी यांनी वर्णन केलेली राजकीय परिस्थिती यात लक्षणीय साम्य दाखवून, नावे जरी वेगळी असली तरी दशकुमारचरितममध्ये वाकाटकांच्या सत्तेच्या अस्ताचे वर्णन केले आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यासाठी श्री. मिराशी यांचा एक लेख वाचकांनी जरूर वाचावा.

आचार्य दंडी यांचा काळ सहाव्या शतकाच्या आसपास होता, हे आपण गृहीत धरू या. अर्थात या बाबतीत अचूक सांगणे कठीणच नव्हे, अशक्य आहे.

ज्या दहा राजकुमारांची ही कथा आहे, त्यांची नावे देणेे सोईस्कर ठरेल, म्हणजे वाचतांना वाचकांचा गोंधळ उडणार नाही.
१ राजवाहन मगधाचा राजा राजहंस याचा मुलगा.
२ सोमदत्त सत्यवर्मन याचा मुलगा.
(सत्यवर्मन सुमतीचा भाऊ व राजहंसाचा वयोवृद्ध व अनुभवी मंत्री सितावर्मन याचा मुलगा.)
३ पुष्पोद्भव रत्नोद्भवाचा मुलगा.
(रत्नोद्भव हा सुश्रुतचा भाऊ व पद्मोद्भवाचा मुलगा. पद्मोद्भव हा आणखी एक मंत्री.)
४ अपहारवर्मन मिथिलेचा राजा प्रहारवर्मन याचा मुलगा. हा राजवाहनाच्या बाजूचा होता.
५ उपहारवर्मन मिथिलेचा राजा प्रहारवर्मन याचा मुलगा. हा राजवाहनाच्या बाजूचा होता.
६ अर्थपाल कामपालाचा मुलगा,
(कामपाल हा सुमित्राचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा. धर्मपाल हा राजहंसाचा आणखी एक मंत्री)
७ प्रमती सुमतीचा मुलगा.
(सुमती हा सत्यवर्मनचा भाऊ व सितावर्मनचा मुलगा)
८ मित्रगुप्त सुमंत्राचा मुलगा.
(सुमंत्र हा कामपालाचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा)
९ मंत्रगुप्त सुमित्राचा मुलगा.
(सुमित्र हा सुमंत्राचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा)
१० विश्रुत सुश्रुताचा मुलगा.
(सुश्रुत हा रत्नोद्भवाचा भाऊ व पद्मोद्भवाचा मुलगा)

श्री. मिराशी या बाबतीत काय लिहितात ते पाहू या. (कंसातील मते प्रस्तुत लेखकाची आहेत.) -
तिसर्‍या शतकाच्या शेवटास वाकाटकांचे साम्राज्य दख्खमध्ये चांगलेच प्रस्थापित झाले होते. वाकाटकांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणता येईल अशा प्रवरसेन-१ने चार अश्वमेध व इतर प्रकारचे अनेक यज्ञ केले होत. पुराणातील उल्लेखानुसार त्याच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या चार मुलांत वाटले गेले. थोरल्या घराण्याची सत्ता विदर्भात प्रस्थापित झाली. यांनी प्रथम रामटेकजवळील नंदीवर्धन येथे राजधानी केली होती व नंतर प्रवरपूर येथे. श्री. मिराशींनी जेव्हा हा लेख लिहिला, तेव्हा त्यांनी त्यात असे म्हटले होते की प्रवरपूर कोठे आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. (परंतु आता ते सिद्ध झाले आहे. जवळच असलेले मनसर हेच प्रवरपूर आहे, हे तेथे झालेल्या उत्खननातून समजले आहे.) दुसर्‍या म्हणजे वास्तुगुल्म शाखेने वाशिम येथून राज्य केले, तर उरलेल्या शाखांची कुठलीच माहिती उपलब्ध नाही. याच घराण्यातील पृथ्वीसेनाच्या कारकिर्दित वाकाटकांचे राज्य उत्तरेकडे नर्मदेपर्यंत पसरले होते. या शाखेच्या नंतरच्या राजांची माहिती सध्यातरी उपलब्ध नाही.
नाव घेण्यासारखे अनेक राजे थोरल्या शाखेत होऊन गेले, पण त्यातील सगळ्यात पराक्रमी होता प्रवरसेन दुसरा. याची आई गुप्त घराण्यातील होती व यानेच प्रसिद्ध 'सेतुबंध' नावाचा ग्रंथ प्राकृत भाषेत रचला. अजिंठ्याच्या अनेक शिलालेखांतून वास्तुगुल्म शाखेतही अनेक पराक्रमी राजे होऊन गेले हे सहज समजते. यांच्यातील शेवटचा होता हरीसेन (अंदाजे ४७५-५००) हा एक पराक्रमी व आक्रमक राजा असावा. पृथ्वीसेनानंतर त्याने उत्तर विदर्भावर स्वारी करून तो प्रदेश त्याच्या राज्याला जोडला; एवढेच नाही, तर कुंतल, अवंती, कलिंग, कोसाला, त्रिकूट, लाट व आंध्र या देशांतूनही महसूल गोळा करण्यास सुरुवात केली होती. याच राजाच्या काळात अजिंठ्यातील सर्वात सुंदर अशा तीन लेण्यांची (१६, १७, व १९) व त्याच डोंगररांगेत असणार्‍या घटोत्कच लेण्यांची निर्मिती झाली. अजिंठ्यातील शिलालेखातून याचे राज्य उत्तरेकडे नर्मदेपलीकडे, तर दक्षिणेकडे कृष्णा नदीपलीकडे पसरले होते. पूर्वेला अरबी समुद्रापर्यंत व पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते. हरीसेनानंतर बहुधा ही सत्ता मोडकळीस आली असावी, कारण त्यानंतर कुठल्याही शिलालेखात वाकाटकांच्या राजांची वंशावळ उपलब्ध नाही. हे असे का झाले असावे, याची पुराणात किंवा इतिहासात काहीही माहिती उपलब्ध नाही. परंतु दशकुमारचरितमच्या आठव्या उच्छवासाचा त्या दृष्टीकोनातून अभ्यास केला, तर काय झाले असावी याची थोडीफार कल्पना येऊ शकते.

दशकुमारचरितममध्ये विदर्भाचे राजे म्हणून पुण्यवर्मन व त्याचा मुलगा अनंतवर्मन यांचा उल्लेख आला आहे, तसेच महिस्मतीचा राजा म्हणून मित्रवर्मन याचा उल्लेख आला आहे. या प्रदेशात वर्मन या नावाचा वंश राज्य करत होता, असा कुठलाही पुसटचा उल्लेखही आपल्याला पुराणात किंवा इतर साहित्यात आढळत नाही. हे वाकाटक राजेच असले पाहिजेत. (अर्थात त्यांची नावे आचार्य दंडी यांनी का बदलली? हा संशोधनाचा विषय आहे. श्री. दंडी यांनी हा ग्रंथ लिहिला, त्या वेळी वाकाटकांचा अस्त होत आला होता. कदाचित त्या वेळच्या राजाला हे रुचले नसते, म्हणून त्यांनी तसे केले असावे. कारण आठव्या प्रकरणात वर्णन केलेले वातावरण असेच काहीसे होते.)
दशकुमारचरितममध्ये अनंतवर्मनच्या अनेक मांडलिकांचा उल्लेख आला आहे. अर्थात हे त्याच्या वडिलांचेही - म्हणजे पुण्यवर्मन याचेही मांडलिक असणार. हा पुण्यवर्मन म्हणजेच प्रत्यक्षातील हरीसेन असावा. या मांडलिकांपैकी कोण होते व प्रत्यक्षात ते कोण असावेत, याचा अंदाज खालीलप्रमाणे -

१. अश्मकांचा राजा वसंतभानू : अश्मकांचे राज्य हे सातमाळ व गोदावरी नदीच्या मध्ये पसरले होते. पांडारंगपल्ली येथे सापडलेल्या ताम्रपटावर यांचा व राष्ट्रकूट मानांक यांचा उल्लेख आढळतो. अजिंठा येथील २५ क्रमांकाच्या लेण्यामध्ये एका शिलालेखात अश्मकांच्या दोन मंत्र्यांचा उल्लेख सापडतो.
२. कुंतलदेशाचा राजा अवंतिदेव : श्री. मिराशींनी अन्यत्र म्हटले आहे की हे राजे वाकाटकांच्या समकालीन होते व यांचे राज्य कृष्णा खोर्‍याच्या वरच्या बाजूला होते. श्री. मिराशींच्या मते सातारा जिल्ह्यातील माणगंगेच्या किनारी मानपूर येथे त्यांची राजधानी होती. विदर्भ व कुंतल यांच्या सीमा एकमेकांस भिडलेल्या असल्यामुळे वाकाटकांच्या वास्तुगुल्म शाखेच्या राजांशी कायम चकमकी उडत. अजिंठामधील लेणी क्र. १६मध्ये एका शिलालेखात वाकाटकांनी कुंतलावर मिळवलेल्या दोन विजयांचा उल्लेख आहे. कुंतलाचे राजे वाकाटकांचे मांडलिकत्व झुगारून देण्याची संधी शोधत असणार, जी त्यांना हरीसेनानंतर मिळाली.
३. ऋशिकाचा राजा एकविरा : हे खानदेशाचे प्राचीन नाव आहे. श्री. मिराशींनी इतरत्र असे म्हटले आहे की खानदेशात सापडलेल्या काही ताम्रपटांवरून त्या काळी तेथे मनसबदार राज्य करीत होते. सध्याच्या चाळीसगावच्या आसपास त्यांची राजधानी होती असे मानण्यास जागा आहे. अजिंठामधील लेणे क्रमांक १७मध्ये, अत्यंत खराब झालेल्या एका शिलालेखात राजांची लांबलचक वंशावळ दिली आहे, ती बहुधा या वंशाची असावी. या लेखात हरीसेनाचा उल्लेख 'राजपुत्रांमधील चंद्र' असा करण्यात आला आहे, त्यावरून हे वाकाटकांचेच एक प्रबळ सरदार असावेत असे वाटते.
४. नाशिक्यचा नागपाल : त्या काळात सध्याच्या नाशिकच्या प्रदेशात राज्य करीत असलेल्या त्रैकुटकांच्या घराण्यातील हा राजा असावा. यांच्या राज्याची उत्तर सीमा दक्षिण गुजरातच्या सीमेला भिडली होती. सुरुवातीला हे अभिरांचे मांडलिक होते, पण नंतर स्वतंत्र झाल्यावर त्यांच्यापैकी एका राजाने अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आढळतो. व्याघ्रसेन नावाच्या यांच्या एका राजाचा हरीसेनाने पराभव केला असावा. ज्या पर्वतावरून या राजघराण्याने आपले नाव घेतले होते, तो पर्वत नाशिकच्या पश्चिमेला आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. काही काळापूर्वी सापडलेल्या अंजनेरी ताम्रपटात पूर्व-त्रिकूट विषय असा उल्लेख आढळतो; म्हणजे त्या काळी तेथे त्रिकूट नावाचा प्रदेश असावा, हे स्पष्ट होते व त्या पर्वताने या त्रिकूटाचे दोन भाग केले आहेत.
५. कोकणचा राजा कुमारगुप्त : कोकणचा प्राचीन इतिहास आपल्याला जरासा अनभिज्ञ आहे, कारण कोणत्याच शिलालेखात त्याचा व त्यावर राज्य करणार्‍या राजांचा स्पष्ट उल्लेख नाही. कोकणावर शकांचे व सातवाहनांचे राज्य होते. पण त्यांच्या र्‍हासानंतर त्या प्रदेशावर कोण राज्य करीत होते, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण कान्हेरीच्या स्तुपात सापडलेल्या एका ताम्रपटात ४९४ साली तेथे त्रैकूटकांचे राज्य होते असा उल्लेख आढळतो. कदाचित असे झाले असेल की कोकणाचे राज्यकर्ते आधी त्रैकूटकांचे मांडलिक असावेत आणि वाकाटकांनी त्रैकूटकांचा पराभव केल्यावर ते त्यांचे मांडलिक झाले. ही एक शक्यता आहे.
६. मुरलाचा राजा वीरसेन : हा देश कुठे असावा याबद्दल काही अंदाज बांधता येत नाही. पण तो गोदावरीच्या किनारी कोठेतरी असावा असे मानण्यास जागा आहे.

वाकाटकांचे हे सर्व मांडलिक विदर्भाच्या पश्चिमेकडे व दक्षिणेकडे राज्य करीत होते. हरीसेनाने पूर्वेचे कलिंग, कोसला व आंध्र हे देश जिंकले होते. पण दशकुमारचरितममध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. या राजांनी वसंतभानूच्या कारस्थानात भाग घेतला नाही, हे यामागचे कारण असावे. यातील दोन तर वाकाटकांचे नातेवाईक होते. दशकुमारचरितममध्ये असा उल्लेख आला आहे की अनंतवर्मनची माता कोसलाची राजकन्या होती. कोसला म्हणजे दक्षिण कोसला किंवा छत्तीसगड. पृथ्वीसेनाच्या बालाघाट ताम्रपटात कोसलांनी वाकाटकांचे मांडलिकत्व स्वीकारले होते असा उल्लेख आहे. त्या वेळी बहुधा कोसलावर शरभपूर घराण्याचा राजा राज्य करत असावा. आंध्रावर त्या वेळी विष्णुकुंडीन घराण्याचे राज्य होते आणि तेही वाकाटकांशी एका विवाहाने जोडले गेले होते. वाकाटकांच्या एका राजकन्येशी या राज्याचा संस्थापकाचा विवाह झाला होता व ती हरीसेनाचीच वंशज होती.

या मांडलिक सरदारांच्या राज्याशिवाय दशकुमारचरितममध्ये आणखी तीन राज्यांचा उल्लेख आढळतो. उत्तरेकडे महिस्मती आणि माळवा, तर दक्षिणेकडे वनवासी. महिस्मतीबद्दलही कमी माहिती उपलब्ध आहे, पण बरवानी आणि ग्वाल्हेर येथे सापडलेल्या ताम्रपटांत 'येथे पाचव्या शतकात सुबंधू नावाचा राजा राज्य करीत होता' हे कळते. त्याच्या एका दानपत्रात कलचुरीच्या कालगणनेतील वर्ष १६७ असे दिले आहे, म्हणजे ४१६-१७ साल. हा काही वाकाटकांच्या कुळातील नव्हता. कदाचित वाकाटकांनी नंतरच्या काळात हे राज्य त्यांच्या राज्यास जोडले असावे.

माळव्याचा चंडवर्मन : माळव्यावर त्या काळी एक अत्यंत शक्तिमान राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते मंदसोरचा यशोधर्मन. यानेच हूण राजा किहिरकुलाचा पराभव केला होता. मंदसोरच्या विजयस्तंभावरील लेखात याचे राज्य हिमालयापासून दक्षिणेकडे महेंद्र पर्वतापर्यंत पसरले होते असा उल्लेख आहे.

वनवासीचा भानुवर्मन : वनवासी म्हणजे आत्ताचे कर्नाटकातील बनवासी. याचे पूर्वीचे नाव वैजयंतीही होते. ही कदंबांची राजधानी होती. कदंबांची खातरीशीर वंशावळ अजूनही उपलब्ध नाही, पण पाचव्या व सहाव्या शतकात कदंबांचे एक शक्तिमान राज्य तेथे होते हे निश्चित. या घराण्याचा शेवटचा राजा हरीवर्मन याच्या सांगोली येथे सापडलेल्या ताम्रपटाच्या आधारे याचा काळ ५२६ किंवा ५४५ असावा असे वाटते. याच्या वडिलांचे नाव होते रविवर्मन, जो दशकुमारचरितममधील भानुवर्मन असावा.
दशकुमारचरितममध्ये दख्खनमध्ये वाकाटकांच्या काळात जी परिस्थिती होती, याचे सविस्तर वर्णन आले आहे. तसेच हरीसेनानंतर कमकुवत, दुर्व्यसनी वारसाच्या काळात वाकाटकांच्या र्‍हासास सुरुवात झाली व मांडलिकांनी बंडखोरीस सुरुवात केली, याचेही वर्णन आले आहे. वाकाटकांच्या राज्यात अनागोंदी माजल्यावर अश्मकांनी भरीस घातल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी वाकाटकांच्या राज्याचे लचके तोडायला सुरुवात केली व काही मांडलिकांनी विश्वासघाताने शत्रूशी कशी हातमिळवणी केली व वाकाटकांच्या राजास ठार मारले, हा पुढील इतिहास आहे.

वरील चर्चेत आचार्य दंडी यांनी सहाव्या शतकाच्या सुरुवातीची परिस्थितीचे वर्णन केले आहे, हे स्पष्ट होते किंवा आचार्य दंडी त्याच काळात होऊन गेले असे म्हणता येते.

रचनाकाराला हिमालय माहीत असावा, कारण चारित्र्याला 'हिमाइतके स्वच्छ' अशी उपमा दिली आहे. विंध्य पर्वतातील जंगलात राजाने आश्रय घेतला, असा उल्लेख आहे; किंबहुना बरीचशी कहाणी विंध्य पर्वताच्या प्रदेशात घडली आहे. हा सध्याचा सातपुडा असावा. मलय पर्वताचा उल्लेख त्यात असलेल्या चंदनाच्या झाडांसहित आला आहे. या पर्वतावरून उत्तरेकडे वाहणारे सुगंधित थंडगार वारे प्रेमिकांना उत्तेजित करतात असा उल्लेख अनेकदा आला आहे. हा पर्वत मलबारमधील सह्यादी असावा. कैलास पर्वताचाही तपश्चर्येच्या बाबतीत उल्लेख आला आहे.

दशकुमारचरितमच्या लेखकाने प्रत्येक शहराबाहेर किंवा गावाबाहेर असलेल्या बागेचे वर्णन केले आहे. या बागेत एखादे देऊळ असायचे आणि ते बहुतेक शंकराचे असायचे. कोठेही बौद्ध किंवा जैन या धर्मांच्या देवळांविषयी किंवा मठांविषयी उल्लेख नाहीत. श्री. मिराशी म्हणतात त्याप्रमाणे ही कहाणी वाकाटकांचीच आहे हे जर खरे मानले, तर ज्यांनी अजिंठा बांधले किंवा खोदले, त्या बौद्ध धर्माच्या एकही स्थानाचा यात उल्लेख नाही, हे जरा विचित्र वाटते. प्रत्येकी एकच उल्लेख आहे, पण तो चांगला नाही.

सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक फुलांचाही उल्लेख आढळतो उदा. कण्हेर, जाई, जुई, कमळ, चंपक, जस्मिन, माधवी इ. इ. तुळशीच्या समिधा यज्ञात अर्पण करीत.

जायफळाची व अंजिराची झाडे बागेत लावलेली दिसतात. आंबा, तिलक व सिंदुवरा या झाडांचा उल्लेख आहे. तिलकाचा वृक्ष म्हणजे कुठला हे लक्षात येत नाही, पण या वृक्षाखाली सतराव्या तीर्थंकरांना साक्षात्कार झाला असे म्हणतात. त्यांचे नाव होते कुंथुनाथजी. हा वृक्ष हस्तिनापूरच्या आसपास असलेल्या सहस्रमार जंगलात आढळतो, असा उल्लेख जैन पुराणात आढळतो. फाल्गुन महिन्यात अनंत व्रतात पुराणात सांगितल्याप्रमाणे ही फुले वाहून देवीची पूजा करतात. याचे सध्याचे प्रचलित नाव मालती असावे.

अशोकाच्या झाडाला संस्कृत साहित्यात शृंगाराच्या व प्रणयाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. हा अशोक म्हणजे सध्या दिसतो, सरळसोट वाढतो तो नसून इतर वृक्षांप्रमाणे वाढणारा व पसरणारा आहे. हा उन्हाळ्यात दाट सावली देतो व लाल नारंगी रंगाच्या फुलांनी बहरतो. हा बहरल्यावर जंगलाला आग लागली आहे असा भास लेखकाला होत आहे. आणखी एक समजूत आहे ती म्हणजे याला सुंदर स्त्रीचे पाय लागल्याशिवाय हा फुलत नाही. म्हणून वसंतोत्सवात समारंभपूर्वक हा कार्यक्रम केला जातो, त्याला अशोक-दोहद असे नाव आहे. दुर्दैवाने हा वृक्ष आता नामशेष झाला आहे.

बकुळीच्या झाडाचाही उल्लेख दशकुमारमध्ये झाला आहे. बकुळीचा वृक्ष विशाल, फुले लहान व नाजूक असतात. इतकी नाजूक की श्री. दंडी म्हणतात - ती मधमाशांच्या हालचालींनीही विसकटतात. याच्या फुलांच्या सुवासाचा घमघमाट सुटतो व वाळल्यावरही अनेक दिवस या फुलांचा वास येतो. कापूराचाही बर्‍याच वेळा उल्लेख येतो. काही वेळा तो औषध म्हणूनही आला आहे. वडांची झाडे त्यांच्या दाट सावलीसाठी मुद्दाम लावली जात असावीत, कारण ती बागेसमोर आढळतात.
चंदनाच्या झाडांचाही/जंगलांचाही उल्लेख बर्‍याच वेळा आहे. आपण समजतो की चंदनाच्या वाळलेल्या खोडालाच तो खास चंदनाचा सुवास येतो. पण ज्या ठिकाणी चंदनाची हजारो वृक्ष आहेत अशी जंगले आपण अनुभवलीच नाहीत. मला वाटते अशा चंदनाच्या जंगलात हिरव्या फांद्यांनाही हा सुवास येत असावा व वार्‍यामुळे तो घमघमाट सगळीकडे पसरत असावा.
जंगलात शबर व किराट जमातींचा उल्लेख आला आहे. ऐत्तरीय ब्राह्मणात म्हटले आहे की शबर किंवा सबर जमात ही विश्वामित्रांच्या थोरल्या पुत्राचे वंशज आहेत आणि त्यांना वाईट वागणुकीसाठी त्यांनी शाप दिला होता. अर्थात ही एक आख्यायिकाच आहे.

कडूलिंबाचा उल्लेख आहे, पण तो सांकेतिक. विड्याच्या पानांच्या/नागवेलीच्या व द्राक्षाच्या बागाही बर्‍याच असाव्यात.
वाकाटकांच्या काळात जमिनीवरून, तसेच समुद्रातूनही व्यापार होत असे. त्याच काळात रेशीममार्गावरील व्यापार जोरात होता व चीनवरून ग्रीसला निघालेले रेशीम मध्ये भारतातही उतरत असे. दशकुमारचरितममध्ये चिनी रेशमी वस्त्रे असा स्पष्ट उल्लेख दोनदा आला आहे व त्याच्या तलमपणाचेही वर्णन करण्यात आले आहे.

कमळाच्या देठांच्या तंतूपासूनही बहुधा तलम वस्त्रे विणायची पद्धत होती. सध्या केळीच्या बुंध्याच्या तंतूंपासून व आफ्रिकेत एक झाडाच्या तंतूंपासून धागा तयार करतात, ते पाहिल्यास हेही शक्य आहे असे वाटते. स्त्रिया कमरेवर कुठलेही वस्त्रे घालत नव्हत्या, कारण एका ठिकाणी स्त्रीच्या उरोजावर चमकणार्‍या अश्रूंचा उल्लेख आला आहे. स्त्रिया केसात फुले व वेण्या माळत. अजिंठाच्या चित्रातही स्त्रियांच्या केसात आपल्याला फुले (कमळाची) व वेण्या, गजरे माळलेले दिसतात. स्त्रिया सौंदर्यलेप लावीत असाही उल्लेख आहे.

बागेत तलाव असत व त्यात राजहंस, करकोचे व बदके विहार करीत असत. हत्ती विपुल असावेत, कारण जंगलात ते बर्‍याच ठिकाणी भेटत. माकडांचा व वाघांचाही उल्लेख आहेच. पोपट, कोकिळा, मोर यांचाही उल्लेख आहे. कुठल्याही कवीला चक्रवाक पक्षांचे फार अप्रूप. दशकुमारचरितममध्येही चक्रवाक पक्ष्याचा उपमांसाठी बर्‍याच वेळा उपयोग केलेला दिसतो. दोन प्रकारच्या कोंबड्यांच्या झुंजीचे वर्णन दशकुमारचरितममध्ये आले आहे. एक बलाका आणि दुसरा नारिकेल. हरणे, डुक्कर व गवे यांची शिकार करण्यात येई.

दशकुमारचरितम ज्या काळात लिहिले गेले, तेव्हा चतुर्वणाची व्यवस्था स्थिरावली होती. या व्यवस्थेबाहेरच्या जमाती जंगलात राहत. सनातन धर्माचे प्राबल्य वाढत होते व जैन आणि बौद्ध धर्मांचा बहुधा र्‍हास सुरू झाला होता. या दोन धर्मांना माझ्या मते राजांच्या राण्यांनी आश्रय दिला असल्यामुळे ते तगले. या धर्मांमध्ये संघर्ष होत असे, पण तो वैचारिक. धार्मिक यात्रांना जायची पद्धत असावे असे दिसते.

हळदकुंकू वाहून पूजा केली जाई व पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास होता असे दिसते. शंकराच्या पूजेचे वर्चस्व होते. सतीची प्रथा प्रचलित होती, पण बळजबरी नव्हती, हेही लक्षात येते. ज्योतिष, मुहूर्त यावर विश्वास होता व ज्योतिषींना मानही होता, असे दिसते. सीमान्तपूजनाचा उल्लेख दोन वेळा आला आहे, पण ते वेगवेगळ्या कारणांसाठी केलेले दिसते. देवीसमोर बळी देण्याची जंगली टोळ्यांमध्ये पद्धत होती असे दिसते. राजकुमारांच्या अभ्यासात कौटिल्याचे अर्थशास्त्र व कामांडकीचे नीतिशास्त्र यांचा अंतर्भाव होता. अंगणात पूजेच्या वेळी केळीचे खुंट बांधण्याची पद्धत त्या काळीही होती. तसेच विड्याची पाने आलेल्याला व निरोपाबरोबर देण्याची पद्धत होती. भारतीय मूर्तिशास्त्रात अवकाशात उडणार्‍या विद्याधरांच्या ज्या मूर्ती आढळतात, त्याचा प्रत्यक्ष वापर दशकुमारचरितममध्ये आचार्य दंडी यांनी केलेला दिसतो. खाली एका विद्याधराच्या मूर्तीचे चित्र दिले आहे. तसेच सुरसुंदरीचाही उल्लेख केला आहे. गणपतीची पूजा कुठल्याही कार्याच्या अगोदर करण्याची हल्लीसारखीच पद्धत होती.

विद्याधर व सुरसुंदरी : छायाचित्र (वेरूळ व कोपेश्वर मंदिर)

शहरात मदनोत्सव, वसंतोत्सव असे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येत.
जैन व बौद्ध धर्मांचा उल्लेख प्रत्येकी एकदाच आला आहे.

वाराणसीचे दुसरे नाव काशी होते व मनकर्णिका घाटावर गंगेचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ होते असा उल्लेख आहे. जरी चातुर्वण्य पद्धत असली, तरीही तिने विकृत स्वरूप धारण केलेले नव्हते. कारण ब्राह्मण कनिष्ठ जातीच्या घरांमध्ये जेवण्यास गेलेले दिसतात.

राजे-महाराजांच्या पदरी खुशमस्करे असत व आठव्या भागात अशाच एका खुशमस्कर्‍यामुळे झालेल्या गोंधळाचे वर्णन आहे. राजे अतिप्राचिन बृहद इंद्रजालाचाही करमणुकीसाठी वापर करीत व इंद्रजाल फेकणार्‍यांना दरबारात आमंत्रित करत. इंद्रजाल व मायाजाल हे साधारणत: एकाच माळेचे मणी आहेत. वशीकरणासाठी व काळ्या जादूसाठी यांचा उपयोग सुरू झाल्यामुळे ही विद्या बरीच बदनाम झाली. पण सहाशे साली ती बदनाम होती असे म्हणता येत नाही. सध्या मेस्मेरिझममध्ये किंवा भ्रम उत्पन्न करून आगगाडी गायब करणे, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा गायब करणे असे मायाजालाचे प्रयोग होतात, त्याचे मूळ येथे असावे. अर्थात हे सगळे हातचलाखीचेच प्रयोग असत व असतात हे सांगायला नकोच. जादूच्या प्रयोगाच्या वेळी डोळ्यात अंजन घालण्याचा उल्लेखही आहे.

कथाकथन हाही एक करमणुकीचा मार्ग होता असे मानण्यास जागा आहे. विशेषत: प्रवासाच्या कथा जास्त लोकप्रिय होत्या असे दिसते. माणसांना नवनवीन प्रदेशाच्या माहितीचे आकर्षण असते हेच खरे.

शहरातील गणिकांना बराच मान होता व त्या आपल्या नृत्यकलेने महाजनांची करमणूक करीत. त्यांच्या नृत्यांचा कार्यक्रम राजा आयोजित करीत. गणिकेच्या व्यवसाय बराच क्लिष्ट असावा. कारण त्या कशा तयार होत याचे सविस्तर वर्णन दशकुमारमध्ये आले आहे. एका राजकुमारीने केलेल्या कंदुकनृत्याचे सविस्तर वर्णन दशकुमारचरितममध्ये आलेले आहे, ते मुळातच वाचण्यासारखे आहे. त्यात दोन-तीन प्रकारच्या पदन्यासाचेही ते वर्णन करतात.

वाकाटकांच्या त्या काळात व्यापार-उदीम फार महत्त्वाचा मानला जाई. दशकुमारांपैकी एका नायकाचा व्यवसाय व्यापाराचा दाखविला आहे. व्यापार्‍यांची संघटना असे व व्यापार्‍यांचे तंटे त्यांच्यासमोरच सोडविले जात. एका व्यापाराचे घर सात मजली आहे असाही उल्लेख आहे. हे व्यापारी फार श्रीमंत असत. व्यापारांना मृत्युदंडापासून मुक्तता असे व हा नियम चाणक्याने केला आहे असाही दाखला आहे. व्यापारी समुद्र ओलांडूनही व्यापार करीत. कालयवनांच्या बेटावर ते जात. ते दामलिप्त नावाच्या बंगालच्या उपसागरावर असलेल्या एका बंदरात बोटीवर चढत. दशकुमारचरितममध्ये एका यवनी दर्यासारंगाचे नाव रामेषू असे दिले आहे. याचा अर्थ व उगम श्री. मोतीचंद्र यांच्या मते सीरियात आढळतो. राम = सुंदर व इशू = येशू. दशकुमारचरितममध्ये एका यवनी व्यापार्‍याचे नाव खनाति असे म्हटले आहे. हे नावही सीरियामध्ये प्रसिद्ध आहे. या व्यापारादरम्यान भेटणार्‍या सर्व परदेशी माणसांना ते यवन याच नावाने ते ओळखत - मग ते अरबी असोत किंवा चिनी किंवा ग्रीक.

प्रत्येक मोठ्या शहरात स्थानिक व्यापार्‍यांबरोबर आणखी एका जमातीचा उल्लेख आहे आणि तो म्हणजे सार्थवाह. अमरकोशामध्ये याचा अर्थ ‘व्यापारांच्या तांड्याचा पुढारी किंवा मार्गदर्शक’ असा दिला आहे. पुढे अशीही माहिती दिली आहे की हे व्यापारी स्वत: त्यात गुंतवणूक करीत. हा माणूस मोठा हिकमती, हल्लीच्या भाषेत मॅनेजमेंट गुरू, अत्यंत प्रामाणिक, धीरोदत्त, न डगमगणारा, नित्यनेमाने येणार्‍या कटकटींना न कंटाळता सामोरे जाणारा, उदार, सर्व धर्मांची माहिती असणणारा असा असे. त्याला सर्व संस्कृतींची ओळख असे. त्याला स्वत:च्या भूमीची व त्यातील अनेक जातीजमातींची माहिती असे, एवढेच नव्हे, तर परदेशी संस्कृतींचीही ओळख असे. कारण त्यांना या प्रवासादरम्यान यवन, शक, पहल्लव, यिर्‍ची इ. इ. असे अनेक प्रकारचे लोक भेटत. बंगाल उपसागरातील ताम्रलिप्ती (हल्लीचे मदिनापूर जिल्ह्यातील तमलुक. हे रूपनारायण नदीवर आहे, जी बंगालच्या उपसागराला मिळते.) ते सीरियामधील अँटिऑक, जावा बेटे ते कद्दा (मलेशिया), चोलामंडल ते अलेक्झांड्रिया व आफ्रिकेतील काही बंदरे एवढ्या प्रदेशात यांचा व्यापार चाले. सार्थवाह फक्त समुद्रातूनच व्यापार्‍यांचे तांडे घेऊन जात असे नाही, तर जमिनीवरूनही ते बर्‍याच प्रदेशात व्यापारी व त्यांचा माल घेऊन जात. अफगाणिस्थानपासून विदर्भ, दक्षिण कोसला असे व्यापारी मार्ग उपलब्ध होते. या तांड्यात व्यापार्‍यांशिवाय संतमहंत, राजनैतिक प्रतिनिधी, साधू, संन्यासी, भिख्कू, करमणूक करणारे विदूषक, कसरती करणारे, विद्यार्थी व इतर प्रवासी त्यांच्या कुटुंबकबिल्यासह असत. या सर्वांची जबाबदारी ही सार्थवाहाची असे.

पुरोहितांचे काम अर्थातच ब्राह्मण करीत. ब्राह्मणांना मानाचे स्थान असे व त्यांच्यासाठी वेगळे नियम असत. ब्राह्मणांमध्येही काही दुर्जन जन्म घेत, पण शेवटी त्यांना पश्चात्ताप होई. जुगाराचे अड्डे - ज्याला द्यूतगृहे म्हणत असत, त्यात बहुधा स्त्रियाही जुगार खेळायला जात असत. प्राण्यांच्या शर्यती व झुंजी यांचाही उल्लेख आहे. नृत्याच्या स्पर्धाही होत असत.

दशकुमारचरितममध्ये आणखी एका महत्त्वाच्या व्यवसयाचा उल्लेख झाला आहे, तो म्हणजे गुन्हेगारीचा. हिंदू कथांमध्ये, पुराणांमध्ये आपण पाहिले आहे - बर्‍याच वेळा एक राजकुमार असतो व तो पराक्रम गाजविण्यासाठी घराबाहेर पडतो, मग त्याला एक नायिका भेटते. हा राजकुमार शूर, देखणा, सद्गुणांचा पुतळा असतो व शेवटी शत्रूंचा परभव करून नायिकेला जिंकतो, अशी कहाणी असते. पण दुसर्‍या बाजूल नीच लोक असतात. खलनायक, चोर-दरोडेखोर असतात. संतांचा बुरखा पांघरून लोकांना फसविणे, त्यांची संपत्ती लुटून त्यांना देशोधडीस लावणे हा यांचा व्यवसाय असतो. शेवटी यांचा अंत दुर्दैवी असतो. अशा करामती करणारा एक नायक/खलनायक बर्‍याच कथांमध्ये वर्णन केला गेला आहे. त्याचे नाव मूलदेव. याच्या स्वभावाचे वर्णन करणे तसे अवघड आहे, कारण जरी याने चौर्यकर्माबद्दल आद्य ग्रंथ लिहिला असला, तरीही हा मूलत: अत्यंत चांगल्या स्वभावाचा आहे. कदाचित हल्लीच्या काळातील रॉबीनहूडवरून याच्या स्वभावाची थोडीफार कल्पना येऊ शकेल. थोडक्यात, गुन्हेगारांमध्ये किंवा चोरांमध्ये याला आदराचे स्थान आहे. हा आणखी दोन नावांनी पुराणात ओळखला जातो -‘मूलभद्र‘ आणि ‘कलांकुर’. याला चौसष्ट कला प्राप्त असतात, कारण त्याला त्याच्या व्यवसायात या सर्व कलांचा उपयोग करणे भाग असते. हा स्वत: गणिकेचा पुत्र असल्यामुळे याला गणिकांच्या विश्वाचा चांगलाच परिचय असावा. अट्टल जुगारी, प्रसंगावधानी व जुगाराची आव्हाने पेलणार्‍या अशा या मूलदेवाचा दशकुमारचरितममध्ये कौतुक करण्यासाठी उल्लेख आला आहे.

स्त्री-पुरुषातील संबंध मोकळे असावेत. मुलींची लग्ने लहान वयात होत होती. एका मुलीचे लग्न तेराव्या वर्षी झाल्याचा उल्लेख आहे व त्यामुळे तिच्या नवर्‍याला तिच्यात रस उरला नाही असाही उल्लेख आहे. संस्कृती पुरुषप्रधान होती. पुरुष गणिकांकडे सररास जात असत. गणिकांना समाजात मानाचे स्थान असावे. चमत्कारांवर सर्वसामान्यांचा विश्वास सहज बसत असे. कारण अनेक जणांनी याचा फायदा घेतल्याचा संदर्भ आहे.

राज्यकारभाराची पद्धत सरंजामी असे व भ्रष्टाचारास भरपूर वाव असावा असे दिसते. कारण एखादे काम होण्यासाठी सररास लाच देण्याची पद्धतच होती. ध्येय गाठण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब क्षम्य होता. पण राजाला मात्र याबाबतीत ताकीद दिलेली आढळते. मद्यपान हे सर्वसंमत असावे. पुरुष घरातही स्त्रीसमवेत मद्याची मजा लुटत. पिणार्‍याला मद्याचे दुष्परिणाम माहीत असत, पण आजच्यासारखेच तरीही मद्यपान चालत असे.

आचार्य दंडी यांनी कथानक आणि त्याची उपकथानके यांचा सुंदर मेळ घालून जो परिणाम साधला आहे, तो आपल्याला खालील गद्य काव्य वाचूनच अनुभवता येईल. आचार्य दंडींची भाषा सरळ सुंदर व जेथे पाहिजे तेथे अलंकारिक रूप घेते. यातही निसर्गात आढळणार्‍या पानाफुलांचा, पर्वतांचा, सुवासांचा व इतर वस्तूंचा ते आधार घेतात, ज्यामुळे ते काव्य आपल्याला अधिकच जवळचे वाटते. काही प्रसंगाचे वर्णन करतान ते बाण व कालिदास यांच्यासारखे अलंकार वापरतात व दुसर्‍याच क्षणी रोखठोक भाषेचा वापर करून आपल्याला जमिनीवर आणतात. हे धक्कातंत्रच म्हणायला हवे. एका झोपलेल्या राजकन्येचे वर्णन वाचण्यासारखे आहे. हे वाचल्यावर हे काव्य आहे की गद्य असा प्रश्न कोणालाही सहज पडावा. दशकुमारचरितम लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण आहे त्यातील गोष्टी. या कहाण्या सर्वसामान्य माणसांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या, पाहिलेल्या असतात. उदा. जुगार, प्रेम, विवाहबाह्य संबंध, युद्धे, कपट, कारस्थाने, बाल्य, तारुण्य, वृद्धत्व, कुरूप माणसे, सुंदर माणसे, सुंदर तरुणी, सामान्य रूपाच्या तरुणी, साधी सरळ माणसे, चोर बदमाष माणसे, देव, दानव, जन्म-पुनर्जन्म, इ.इ.

आचार्य दंडीन यांची लिहिण्याची पद्धत वेगळीच आहे. ते स्वत: एक कथा सांगतात, मग त्यातील पात्रे आत्मवृत्त कथन करतात व त्या दोन्हींचे वर्णन करताना आचार्य इतर माहिती सादर करतात. हे सर्व कथन करतान ते कोठेही रहस्य व रहस्यभेद या गोष्टींचा फायदा घेत नाहीत.

या भाषांतरात जी काही उणीव भासेल, ती माझ्या लिखाणातीलच आहे असे कबूल करून मी ही प्रस्तावना संपवितो.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Oct 2016 - 7:03 am | प्रचेतस

अतिशय उत्तम.

पुस्तक कधी प्रकाशित होतेय? घेणार आहेच.

दशकुमारचरित्राचा भाव्यांनी केलेला अनुवाद मजपाशी आहे.

अनुप ढेरे's picture

29 Oct 2016 - 8:02 am | अनुप ढेरे

छान लेख!

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 12:35 pm | यशोधरा

प्रस्तावना अतिशय आवडली. पुस्तक प्रकाशित झाले की नक्की सांगा.

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2016 - 12:45 am | बोका-ए-आझम

हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर नक्की घेईन. गद्यकवी दंडी असं फक्त ऐकलेलं आहे पण वाचण्याचा योग आला नाही. तुमच्यामुळे ते शक्य होईल त्याबद्दल धन्यवाद!

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2016 - 12:45 am | बोका-ए-आझम

हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर नक्की घेईन. गद्यकवी दंडी असं फक्त ऐकलेलं आहे पण वाचण्याचा योग आला नाही. तुमच्यामुळे ते शक्य होईल त्याबद्दल धन्यवाद!

जयंत कुलकर्णी's picture

30 Oct 2016 - 7:24 am | जयंत कुलकर्णी

लिहून झाले आहे पण हे कोणी प्रकाशित करेल असे वाटत नसल्यामुळे तसेच पडून आहे. अर्थात मी काही प्रती तयार करणार आहे तेव्हा तुम्हाला व प्रचेतसला देईन...
वरील प्रतिसादात लाजिरवाण्या चूका असल्यामुळे परत लिहिलाय...

प्रचेतस's picture

30 Oct 2016 - 8:09 am | प्रचेतस

धन्यवाद काका.
प्रकाशक नक्कीच मिळेल. अशी पुस्तके मिळणे भाग्याचं आहे.

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2016 - 8:11 am | बोका-ए-आझम

प्रकाशक नक्कीच मिळेल.

कपिलमुनी's picture

30 Oct 2016 - 9:55 pm | कपिलमुनी

प्रकाशित होण्यासाठी शुभेच्छा !
प्रती तयार केल्यास ऍडवान्स बुकिंग :)

कपिलमुनी's picture

30 Oct 2016 - 9:55 pm | कपिलमुनी

प्रकाशित होण्यासाठी शुभेच्छा !
प्रती तयार केल्यास ऍडवान्स बुकिंग :)

Ram ram's picture

30 Oct 2016 - 9:52 pm | Ram ram

खुपच सुंदर

सिरुसेरि's picture

31 Oct 2016 - 7:40 pm | सिरुसेरि

छान माहिती . पुर्वी पंडित महादेवशास्त्री जोशी लिखित "दशकुमार" हा दशकुमारचरितमचा दहा भागांतील अनुवाद वाचला आहे .

पैसा's picture

1 Nov 2016 - 8:02 pm | पैसा

अशा विषयांवर तुम्ही नेहमीच खूप अभ्यासपूर्ण लिहिता. पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी असेलच आणि जरूर प्रकाशित होईल.

फार छान. पुस्तक प्रकाशित झाल्यावर अवश्य कळवा. प्रकाशित होणारच यात काही वाद नाही. शुभेच्छा!

स्वाती दिनेश's picture

1 Nov 2016 - 11:47 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला, आज फुरसतीत वाचला.
पुस्तक नक्की होईल प्रकाशित,
स्वाती

मी अनेक वर्षापूर्वी (१९६० मधे) दशकुमचरितम वाचले होते. आजही माझ्याकडे हे पुस्तक आहे. प्रकाशित झाल्यास एक प्रत आताच ऍडवान्स बुकिंग करतो.असेच काम करत राहा.