रायगडावर जेव्हा जाणे होते
सर्वात प्रथम चौथीच्या पुस्तकात ओळख झालेला शिवाजी महाराजांचा इतिहास, आठवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टयांत रणजित देसाईंचे श्रीमान योगी भान हरपून वाचताना डोळ्यांसमोर उभा राहिलेला शिवरायांचा इतिहास आणि आज परत एकदा बऱ्याच वर्षांनी रायगडावर पाऊल टाकताच वाचलेल्या अनेक प्रसंगांच्या खुणा, अवशेष धुंडाळत त्याच्या खूप जवळ जाता येणारा छत्रपतींचा तो अजरामर इतिहास.
लेकीला महाराष्ट्राच्या या महान इतिहासाची थोडीफार तरी ओळख व्हावी या हेतूने आज तिथे जायचा बेत आखला होता. पाचगणी, महाबळेश्वर, महाड या वाटेने पुढे जात रायगडाच्या दिशेने निघालो. खूप वर्षांनी या भागात आल्यामुळे नजर जाईल तिथंवर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य कॅमेराच्या जोडीने डोळ्यातही किती साठवावे असे होत होते. ढगांमध्ये बुडालेली सह्याद्रीची शिखरं आणि त्या वरून जागोजागी खळाळत वाहणारे लहान मोठे धबधबे, बघावं तिकडं निसर्ग सौंदर्याची अशी उधळण डोळ्यांचे पारणे फेडत होती. हवेतला गारवा थोडासा वाढवत मध्येच येणारी पावसाची सर आणि पाठोपाठ त्या थेंबांना सोनेरी करण्यासाठी पडणारा उन्हाचा हलकासा शिडकावा, अशा या ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात कायम साथीला असलेली धुक्यात हरवलेली घाटातली वळणावळणाची वाट. महाराष्ट्राला निसर्गतःच भरभरून लाभलेले सह्याद्रीचे हे सौंदर्य श्रावणातल्या पावसाळी हवेत अनुभवणे याला तोड नाही आणि ते शब्दांत मांडणं तर केवळ अवघड.
महाबळेश्वर ते पोलादपूर हा जवळपास ४० किलोमीटरचा घाट साधारण दीड एक तासात संपवत पुढे महाडच्या दिशेला लागलो, आणि माध्यान्हीच्या उन्हाला रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावात पोचलो. 'सहावीत शाळेच्या सहलीमध्ये खूप मस्ती आणि दंगा करत चढलेल्या रायगडाच्या पायऱ्या', एवढीच काय ती या आधीची या दुर्गम गडाबद्दलची प्रत्यक्ष आठवण. आज मात्र माझीच छोटी पिल्लं बरोबर असल्यानं गड पायी चढण्याच्या माझ्या अति उत्साहावर पाणी सोडले आणि रोपवे च्या आधाराने पायथ्यापासून सातव्या मिनिटाला गडावरच्या हिरकणी बुरुजावर पोचलो.
रोपवे मधून पायथ्याशी दिसणारे पाचाड गाव
गडाची उंची २८०० फूट आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला आणि त्या वेळी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला शंभर एकरात पसरलेला आहे. किल्ल्यावर पाऊल टाकताच त्याची विशालता नजरेत भरते.
राणीवसा
राणीवश्या मध्ये जायचा दरवाजा
गडावर पुढे पालखी दरवाजाने आत गेल्यावर उजव्या बाजूला सात राण्यांच्या सात महालाच्या खुणा दिसतात. राणीवशाच्या डाव्या बाजूला दासदासींच्या राहण्याच्या ठिकाणांचे अवशेष आहेत. तिथून सरळ थोडे पुढे गेल्यावर मेणा दरवाजा लागतो.
मेणा दरवाजा
दासींच्या निवासस्थानाच्या मागच्या बाजूने दरवाजातून आत गेले की, जो मोठ्ठा चौथरा दिसतो, ते म्हणजे महाराजांचे राजभवन, ज्याच्या उजव्या पण थोड्या खालच्या बाजूला अष्टप्रधानांच्या महालांचे अवशेष आहेत. त्याच दिशेने (दक्षिणेला) लांबवर टकमक टोक दिसते. कडेलोटाची शिक्षा आमलात आणण्यासाठी माहितीत असलेल्या या टकमक टोकाचा वापर शिवरायांच्या कारकिर्दीत कोणाला शिक्षा देण्यासाठी कधीच करण्यात आला नसल्याची माहिती आज नव्यानेच गडावर मिळाली.
राजभवन
राजभवनातून बाहेर पडून समोरच्या बाजूला अलीकडेच सिमेंटने बांधलेली एक भली मोठी प्रशस्त भिंत दिसते त्याच्या पलीकडे राजसभा आहे, जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राजसभेच्या वास्तुरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून कितीही कमी आवाजात केलेली कुजबुज महाराजांच्या सिंहासनापर्यंत सहज ऐकू जाई, ज्याची पडताळणी करणे आम्हाला आजही शक्य झाले.
किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारे दगड, तिथल्या खोदकामात सापडलेलेच वापरण्यात आले होते. गड बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी गूळ, चुना आणि शिसे यांचा वापर करण्यात आला होता.
नगारखाना
सिंहासनाच्या अगदी समोर एक भव्य दगडी दरवाजा आहे त्यास नगारखाना असे संबोधले जाते, हेच राजसभेचे मुख्य प्रवेशद्वार. तेथून बाहेर पडले कि उजव्या हाताने होळीचा माळ, बाजारपेठ, हत्तीखाना या गोष्टीचे अस्तित्व सांगणारे अवशेष दिसतात. बाजापेठेमधून पुढे गेल्यावर साधारण एक किलोमीटर अंतरावर जगदीश्वराचे मंदिर आहे, ज्याचा कळस मुद्दामहून एखाद्या मशिदी सारखा बांधण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश केला कि समोर असलेला अष्टकोनी चौथरा म्हणजे महाराजांची समाधी. ज्या पवित्र ठिकाणी इतिहासातल्या एका मोठ्या पर्वाचा अंत झाला.
गड पहात असताना तिथल्या कणाकणात, भरलेली भव्यता, अद्वितीयता, पावित्र्य, तिथे त्या काळी घडलेल्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या अनेक प्रसंगांचे संदर्भ दाखवत त्यांचे आजारामरत्व स्पष्ट करत होते आणि त्यामुळे आम्हा सर्वांना त्या साऱ्या भारलेपणामुळे महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आपोआप नतमस्तक व्हायला झाले.
या साऱ्या गडाचे, तिथल्या इतिहासाची साक्ष असलेल्या अगदी प्रत्येक जागेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी तिथे काम करणारे लोक खूप मनापासून करत होते याचे अगदी कौतुक वाटले. स्वच्छतेच्या बाबतीतही संपूर्ण गडावर तितकीच काळजी घेत असल्याचे जाणवत होते. तिथे फिरताना कागदाचा एखादा कपटा किंवा प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, रॅपर्स असा कुठलाच कचरा दृष्टीस पडला नाही.
शिवाजी महाराजांनंतर अनेक वर्षांनी म्हणजे १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगडावर केलेल्या हल्ल्यामुळे गडावरच्या मूळ बांधकामापैकी २५% हूनही कमी भाग आता शिल्लक राहिला आहे. या हल्ल्यानंतर गड अकरा दिवस जळत असल्याची माहिती तिथल्या मार्गदर्शकाने दिली.
जवळपास ४-५ तास गडावर थांबून आम्ही रोपवेने परत खाली पाचाड या गावी जिजाबाईंचा वाडा बघण्यासाठी आलो. गडावरची थंड हवा सोसत नसल्याने महाराजांनी त्यांस खाली प्रशस्त वाडा बांधून दिला होता. त्या साऱ्या ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन, त्या सगळ्या आठवणी मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप :- गेल्या औगस्ट मध्ये रायगडावर जाणे झाले होते, सो त्यावेळी (दोन महिन्यान्पुर्वी) अनुभवलेला व्रुत्तान्त माडण्याचा प्रयत्न केला आहे.
----अश्विनी वैद्य
प्रतिक्रिया
6 Oct 2016 - 4:28 am | जयन्त बा शिम्पि
रायगडावर आम्हीही गेलो होतो,पण रोपवे ने न जाता, पायवाटेने गेलो होतो. आपण सर्वच फोटो छान घेतले आहेत, पण शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा,सिंहासन व वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा ही फोटो टाकला असता तर अधिक छान वाटले असते.
आणखी एक विशेषता रायगडाची. कदाचित आपल्या नजरेस आली नसेल. समोरच्या मोठ्या मैदानात , बाजारपट्टी साठी जागा बांधण्यात आली होती. बाजारातील विक्रेत्यांचे ओटे बरेच उंच बांधले होते. याचे कारण असे की खरेदी करणारे, घोड्यांवर बसून खरेदी करीत असत, म्हणून ऊंची जास्त.
रायगड किल्ला ज्याने आराखडा करुन महाराजांना बांधून दिला, त्या कारागिराचे नांव, वाघ्या कुत्र्याच्या समाधीपाशी दगडावर कोरलेले आहे. त्याने शिवाजी महाराजांना सांगितले होते की , ' महाराज, मी गडाची बांधणी अशी केली आहे की, वर येईल तो फक्त वारा आणि खाली जाईल ते फक्त पाणी ! ! ' त्यामुळेच अशा अभेद्य गडाची महाराजांनी, राजधानीसाठी निवड केली होती. शिवाजी महाराजांच्या वेळी, गडाचे दरवाजे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळात, खुद्द महाराज सुद्धा बदल करू शकत नव्हते. त्यामुळेच हिरकणी गडावर सायंकाळी अडकून गेली होती. परंतू तिचे लहान मूल घरी एकटे असल्याने, ती अवघड कड्यावरून उतरून घरी गेली. शिवाजी महाराजांना, सकाळी ही हकिकत समजल्यावर, त्यांनी तिचा खणा-नारळाने ओटी भरून सत्कार केला आणि ज्या कड्यावरून हिरकणी खाली उतरली, त्या कड्याचे नांव ' हिरकणी बुरुज ' असे ठेवले.
ज्या कड्यावरून, देशाशी इमान न राखणार्या, गद्दारांना , खाली लोटून दिले जात असे, ते ' टकम़क ' टोक पहावयाचे त्यावेळी वेळेअभावी आमचे ही राहून गेले होते.
आणखी एक मनोरंजक किस्सा:- शिवाजी महाराजांचा जेंव्हा राज्याभिषेक झाला, त्यावेळी इंग्रज सरकारकडून एक प्रतिनिधी रायगडावर आला होता. त्याला गड चढून जाण्यासाठी फार श्रम पडले होते. धापा टाकीत, पायी पायी कसातरी तो गडावर पोहोचला होता.( त्यावेळी रोप वे नव्हते ना ! ) गडावर चढून आल्यावर त्याने पाहिले की शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाबाहेर दोन भले मोठे हत्ती झुलत होते. त्याने बोलून दाखविले की शिवाजी महाराजांची कमाल आहे ! जेथे माणसाला गड चढणे जिकिरीचे होते, तेथे हती कसे काय आणले असतील ? अर्थात यामागील रहस्य असे होते की शिवाजी महाराजांनी हत्तीच्या दोन पिल्लांना, पिल्ले जेंव्हा अगदी लहान होते, तेंव्हाच गडावर आणवून घेतले होते. कालांतराने ते हत्ती गडावरच मोठे झालेत.
6 Oct 2016 - 8:48 am | प्रचेतस
ती समाधी वाघ्या कुत्र्याची नसून होळकरांच्या कुत्र्याची आहे. गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत कुत्र्याचा पुतळा कसा उभारण्यात आला ह्याची सविस्तर हकिकत दिलेली आहे.
घोडेस्वारांना घोड्यावरुनच खरेदी करता यावी म्हणून बाजारपेठेतील ओटे उंच आहेत हे कारण पटत नाही. मूळात ही बाजारपेठ असावी का नाही ह्याची शंका आहे अर्थात तो वादाचा विषय.
रायगडाच्या स्थापत्यकाराचे नाव जगदीश्वराच्या पायरीवर कोरलेले आहे.
सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर
तसेच जगदीश्वराच्या डावीकडील भिंतीत एक शिलालेख आहे त्यात रायगडाच्या निर्मितीचे सविस्तर वर्णन केले आहे.
री गणपतये नमः|
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञय
श्रीमच्छत्रपते: शिवस्यनृपते: सिंहासने तिष्ठत:|
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ||१||
वापीकूपडागराजिरूचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तम्भे: कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रं लिहे मीहिते|
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हिराजिना निर्मितो यावच्चंद्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ||२||
सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत् छत्रपती शिवाजीराजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजीने विहीरी, तलाव, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.
बाकी हिरकणीची कथा कपोलकलिप्त आहे. त्याला काहीही ऐतिहासिक आधार नाही.
7 Oct 2016 - 1:58 am | अश्विनी वैद्य
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासुन धन्यवाद...महारजान्चा पुतळा, कुत्र्याची समाधी आणि बाजारपेठ हे फोटो काढेपर्यन्त चमेर कमेराच्या बैट्रीने मान टाकली...हे कमेराचे दुर्दैव...काय करणार.
बाकी तुम्ही सान्गितले तसे बरेच किस्से तिथे आम्हाला भेटलेल्या मार्ग्दर्शकानेही सान्गितले. जसे कि, हिरोजीरावानी बान्धलेल्या अभेद्य गडावरुन हिरकणी खाली उतरु शकते म्हणजे त्यान्च्या गड बान्धणीत झालेल्या चुका हिरोजीरावान्च्या कायम लक्षात रहाव्यात यासाठी त्यान्च्याच हस्ते हिरकणीचा सन्मान करण्यात आला होता.
आणखी एक आठवला, बाजारपेठेची ज्या प्रकारे बान्धणी करण्यात आली आहे, ती अशी कि, प्रत्येक गाळ्यात वर चढून जाण्यासठीच्या पायर्या आतल्या बाजूला आहेत, याचे कारण मार्गदर्शकाने असे दिले कि, आत्ता सारखे अतिक्रमण तेव्हाच्या व्यापार्यांन्ना करताच येवू नये हा महाराजांचा उद्देश.
हत्तीन्बद्दलची माहिती आम्हालाही हिच सान्गण्यात आली.
आणि हो, हे सर्व मार्गदर्शन करणार्या मार्गदर्शकांबद्दल मिळालेली माहिती अशी कि, बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या अभ्यासानंतर एक परिक्षा घेण्यात येते, त्यात म्हणे पास वैगेरे झाल्यावरच तिथे मार्गदर्शक म्हणून काम करता येते.
असो, बाकी जास्त खोलात न शिरता आम्ही रायगडाचा निरोप घेतला.
6 Oct 2016 - 8:41 am | प्रचेतस
छान लिहिलंय.
रायगड पाच सहा वेळा पाहून पावसाळ्यात गडावर कधीच जाणं झालं नसल्यामुळे हिरवाईने नटलेला गड अजून पाहता आला नसल्याची खंत आहे.
6 Oct 2016 - 12:01 pm | स्वच्छंदी_मनोज
माझ्या गेल्या वेळच्या रायगड फेरीत एका प्रसिद्ध इतीहास, किल्ले, लेणी, मंदिर अभ्यासक आणी संशोधकाशी भेट आणी चर्चा करण्याचा योग आला होता.
अश्या व्यासंगी माणसाची रायगडावर भेट होण्याचे भाग्य लाभल्याने त्याच्या आठवणी ताज्या आहेत :)
7 Oct 2016 - 8:42 am | प्रचेतस
तशी माझीही गेल्या वेळची रायगड भेट सह्याद्रीतील घाटवाटांचा चालताबोलता विश्वकोश असणार्या आणि खुद्द रायगडाचा कानाकोपरा आणि प्रत्येक काना कोपर्याच्या इतिहास माहित असलेल्या एका व्यक्तीबरोबर झालेली आहे. अर्थात ती भेट खूपच अपुरी होती. त्यामुळे खास त्या व्यक्तीबरोबर रायगड समजावून घेण्यासाठी जायलाच पाहिजे.
6 Oct 2016 - 9:31 am | यशोधरा
छान लिहिलंय, अर्थात एका दिवसात रायगड बघून होणं कठीणच आहे..
6 Oct 2016 - 9:31 am | किसन शिंदे
वाह !! वृत्तांत वाचून आता पुन्हा जाण्याची ओढ लागली आहे.
6 Oct 2016 - 11:17 am | बाजीप्रभू
छान लिहिलंय, आठवणी ताज्या झाल्या.
6 Oct 2016 - 11:56 am | स्वच्छंदी_मनोज
सर्व सिझन मधे रायगड बघीतलाय, एकटा, मित्रांबरोबर, धावत पळत, सवडीने असा अनेकदा पण कितीही वेळा जा रायगडाची भुल काही केल्या उतरत नाही :)
खरे तर नुसता रायगड असा बघूच नये त्या सोबतच त्याच्या आजूबाजूला असलेले किल्ले, घाटवाटा, दरीखदरी, नद्यांची पात्रे असे सवीस्तर रायगड अनुभवावा..
6 Oct 2016 - 12:19 pm | पी. के.
छान लिहिलंय, आठवणी ताज्या झाल्या.
जगदीश्वराचे मंदिर आहे, ज्याचा कळस मुद्दामहून एखाद्या मशिदी सारखा बांधण्यात आला आहे.
माझ्या अल्प माहितीनुसार, गड 1689 मध्ये झुल्फिखार खान नी जिकला. गड मोगलांच्या ताब्यात गेल्यावर औरंगज़ेब नी त्याचे नाव इस्लामगड ठेवलं. याचं दरम्यान मंदिराचा कळस बदलला गेला असावा .
जाणकारांनी प्रकाश टाकावा...
7 Oct 2016 - 1:59 am | अश्विनी वैद्य
हो का...असेल बुवा...!
7 Oct 2016 - 8:39 am | प्रचेतस
मंदिराचा कळस शिवकालीन स्थापत्यशैलीतच आहे. बाह्यतः मशिदीच्या घुमटासारखा भासणारा शिखराचा आकार नीट निरखून पाहिला तर कमळासारखा आहे. तसाही इस्लामिक स्थापत्यशैलीचा थोडाफार प्रभाव ह्या काळाच्या एतद्देशीय इमारतींवर पडलेला दिसतोच.
6 Oct 2016 - 12:41 pm | प्रसाद_१९८२
छान ट्रेक वृत्तांत व फोटो.
आवडले.
6 Oct 2016 - 3:29 pm | टुकुल
छान लिहिलय.
अजुन गेलो नाही आहे :-( , पण आता लवकरच जावे लागेल.
--टुकुल
6 Oct 2016 - 5:04 pm | रेवती
लेखन व फोटू आवडले.
7 Oct 2016 - 2:00 am | अश्विनी वैद्य
धन्यवाद रेवतीजी..!
6 Oct 2016 - 5:22 pm | शान्तिप्रिय
मस्त लेखन
6 Oct 2016 - 6:44 pm | अजया
निरनिराळ्या ऋतूत रायगड अनुभवला आहे.परत परत जावंसं वाटणारं काहीतरी अद्भुत आहे त्या गडात!
6 Oct 2016 - 6:51 pm | गामा पैलवान
अश्विनी वैद्य,
लेख चांगला आहे. थोडक्यात आटोपल्यासारखा वाटला. अर्थात तशीच धावती भेट होती म्हणा!
आ.न.,
-गा.पै.
7 Oct 2016 - 2:18 am | अश्विनी वैद्य
अगदी बरोबर आहे तुमचं...थोडक्यातच आटोपतं घेतलं आहे एकूण. काय आहे ना... तसा इतिहास माझा प्रांत नव्हे....पण जाज्वल्य का काय म्हणतात तसला अभिमान हल्ली (गेल्या काही दिवसात) उगाचच उफाळून आला आणि मग गेल्या भेटीतल्या त्यतल्या त्यात लक्षात राहिलेल्या गोष्टी संग्रही असाव्यात म्हणून केलेला हा खटाटोप. तरी सुधारणा आवश्यक वाटल्यास नक्की सांगावे... जरा माझ्याही ज्ञानात तेव्ह्ढीच भर.
6 Oct 2016 - 6:53 pm | गामा पैलवान
प्रचेतस,
तुम्ही वापीकूपडागराजिरूचिरं असं जे म्हंटलंय तिथे वापीकूपतडागराजिरूचिरं असं हवं होतं का? थोडा ल.तों.मो.घा.घेतोय.
आ.न.,
-गा.पै.
6 Oct 2016 - 7:02 pm | प्रचेतस
हो.तुमचे बरोबर आहे. तडाग हा शब्द पाहिजे.
तडाग म्हणजे तलाव.
6 Oct 2016 - 10:05 pm | जयन्त बा शिम्पि
मी जे लिहिले आहे ते मार्गदर्शकाच्या सांगण्यावरून लिहिले आहे. आणि त्याच मार्गदर्शकासह, जमलेल्या सोबत्यांना त्याचवेळी एक किस्सा सुद्धा सांगितला होता. तो असा :- एकदा काही लोकांचा ग्रुप, ताजमहाल पहाण्यासाठी गेला होता. सोबतीला अर्थातच मार्गदर्शक होताच. तो सांगू लागला, " हे इकडचे दालन आहे,ते शहाजहानच्या राणीसाठी खास बांधले होते आणि त्या पलिकडे दिसते आहे, ते आहे राण्यांचे स्नानग्रुह. " त्याच ग्रूपमध्ये एक माणुस असा होता की पुर्वी त्याने याच मार्गदर्शकाबरोबर ताजमहाल पाहिला होता. तो माणुस म्हणाला,' पण मी दोन वर्षापुर्वी आलो होतो त्यावेळी तुम्ही सांगितले होते की ह्या इकडे, ताजच्या मागील बाजुस राण्यांचे स्नानग्रुह होते म्हणुन ? " यावर तो मार्गदर्शक म्हणाला," बरोबर आहे, सध्या तिकडे दुरुस्ती चालू आहे ". समझनेवालेको इशारा काफी है !.
7 Oct 2016 - 2:02 am | अश्विनी वैद्य
तुमचा इशारा अचूक कळलेला आहे...!
7 Oct 2016 - 2:03 am | अश्विनी वैद्य
आपल्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार...!
7 Oct 2016 - 1:48 pm | त्रिवेणी
फोटो खुप मस्त. कितीदा ठरवूनही जाण होत नाहीय गडावर.आता नक्कीच जमवेन.
7 Oct 2016 - 1:48 pm | त्रिवेणी
फोटो खुप मस्त. कितीदा ठरवूनही जाण होत नाहीय गडावर.आता नक्कीच जमवेन.
7 Oct 2016 - 5:07 pm | शब्दबम्बाळ
मस्स्त फोटो! अजून पाहायला आवडले असते! :)
7 Oct 2016 - 11:27 pm | रुस्तुम
पावसाळ्यात रायगडाचे सौंदर्य तर आवर्जून पाहण्यासारखे आहे...कास पठाराप्रमाणे रायगडावर वेगवेगळ्या प्रकारची फुले रायगडाला शब्दशः रंगवून टाकतात,... तुमची रायगडवर वारी वाचून आमच्या 3 वर्षांपूर्वीच्या रायगड वारी च्या स्मृती ताज्या झाल्या