कट्यार, गाणी, गीतकार
स्थळ शिवाजी पार्क, दादर.
वेळ संध्याकाळी ७च्या सुमारची,
मी CCDजवळ वाट पाहत होतो. शेवटी एकदाचा धापा टाकत समीर आला, तेवढ्यात मागोमाग मंदारही आला. आता तुम्ही
म्हणाल की कोण समीर? कोण मंदार? तर समीर सामंत आणि मंदार चोळकर. हे दोघेही तरुण पिढीचे तरुण कवी, गीतकार.
कविता करणं आणि आपल्या समविचारी मित्रांबरोबर मैफली जमवून त्या ऐकणं, ऐकवणं हा आवडता उद्योग. २०१०-११च्या सुमारास या दोघांना आणि अशाच काही इतर तरुणांना अचानक एक व्यासपीठ मिळालं. Orkut. आजपर्यंत जे मिळालं नव्हतं, ते त्यांना ह्या व्यासपीठावर मिळायला लागलं - प्रतिक्रिया. सुरुवातीला ओळखीच्या अन् मग अनोळखी
लोकांच्या. लोकांपर्यंत पोहोचणं अगदीच सोप्प झालं. मग अशा लोकांचा एक समूह, ज्याला Orkut Community असं म्हणतात, ते तयार झालं. आता क्षितिओ आणखी विस्तारली गेली. 'प्राची-गच्ची'वाल्या कवींबरोबरच काही मोजकं चांगलंही निर्माण व्हायला सुरुवात झाली. अशाच मोजक्या चांगल्यांमध्ये या दोघांचा समावेश होतो. त्यांना आणखी काही असेच तयारीने लिहिणारे भेटले. त्यातल्या प्राजक्त देशमुख आणि मकरंद सावंत यांच्याशी यांची चांगलीच गट्टी जमली. त्यातून मग 'चार'ची संकल्पना अस्तित्वात आली. 'Weचार' हा म्हटलं तर काव्यवाचनाचा कार्यक्रम, म्हटलं तर चार कवी मित्रांची मैफल. पहिल्याच प्रयोगाला, श्री. नितीन केळकर (सह्याद्री वाहिनीचे) यांनी या कार्यक्रमाचा वेगळेपणा ओळखला आणि चक्क त्या दिवशीच्या साडेसातच्या बातम्यांमध्ये या कार्यक्रमाचा वृत्तान्त प्रसारित केला गेला. बहुधा या प्रकारच्या कार्यक्रमाचा वृत्तान्त बातम्यांमध्ये प्रसारित होण्याची सह्याद्री वाहिनीच्या इतिहासात ही पहिलीच घटना असावी. त्यानंतर या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढतच गेला, लोकप्रियता वाढत गेली. पण हे चारही जण आपापला नोकरी-धंदा सांभाळून हे प्रयोग करत होते. त्यामुळे वाढत्या मागणीला न्याय द्यायला त्यांचा हा संच वाढत गेला आणि इतर काही तरुण कवी त्यात सामील झाले. काव्यवाचनाचे कार्यक्रम ते मराठी चित्रपटाचे गीतकार असा प्रवास केलेल्या 'Weचार'मधील दोन कवी समीर सामंत आणि मंदार चोळकर यांच्याशी केलेली ही बातचीत.
मिसळलेला काव्यप्रेमी (मि का) : तुमची सुरुवात कशी झाली लिहिण्याची?
समीर : Weचारची सुरुवात होण्याआधी ऑर्कुटवर काव्यांजली हा ग्रूप होता. त्या ग्रूपमध्ये आम्ही लिहायचो, एकमेकांना ऐकवायचो. असेच इतर ग्रूप - उदा. नेटाक्षरी, स्वरनेटाक्षरी, मराठी कविता आणि काव्यांजली अशा चार ग्रूप्सनी एकत्र गेटटुगेदर केलं होतं. त्याच दरम्यान आम्ही वाशीला 'एक इवरली अक्षरे' नावाचा कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाने आम्हाला आत्मविश्वास दिला की आपण चांगलं लिहिण्याबरोबरच चांगलं सादरीकरणही करू शकतो. ह्या कार्यक्रमानंतर सुजीत शिंदे या आमच्या मित्राने कल्पना मांडली की चौघे मिळून काव्यवाचनाचा कार्यक्रम करू या. आणि त्यातून मग मी, मंदार, प्राजक्त आणि मकरंद अशी Weचारची सुरुवात झाली. सुजीत स्वतःही उत्तम लिहितो.
मंदार : सुजीतविषयी माझा वेगळा अनुभव सांगेन. Weचारचा पहिला प्रयोग झाला, तेव्हाच सुजीतला आत्मविश्वास होता की आपण आणखी प्रयोग करायचे. मला स्वतःला तसा काहीच अंदाज नव्हता. एकच प्रयोग असेल असं मला स्वतःला वाटलेलं. पहिल्या प्रयोगाच्या आधी आम्ही जी रिहर्सल केली, त्यात फक्त काही मुद्दे हायलायटरने मार्क करणं एवढंच केलेलं. त्याव्यतिरिक्त त्या रिहर्सलमध्ये काहीच झालं नाही. दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता रवींद्रला प्रयोग केला आणि तो सुंदर झाला. त्यानंतर मग मला आणि सर्वांनाच आत्मविश्वास आला की आपण हे करू शकतो.
समीर : व्यावसायिक दृष्टीकोनातून केला गेलेला तो आमचा पहिला प्रयोग होता. त्या प्रयोगाला नितीन केळकर आले होते, सह्याद्री वाहिनीचे. मध्यंतरामध्ये त्यांनी विचारलं की तुम्ही कॅमेरा आणलाय का? आम्ही तर तशी काही तयारी केली नव्हती. त्यांनी तेव्हा विनंती केली की मध्यंतर थोडा लांबवा आणि वरळी केंद्रामधून त्यांनी कॅमेरामनला यायला सांगितलं. प्रयोग झाल्यावर त्यांनी चौघांची मुलाखत घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी, म्हणजे १९ जून २०११ला साडेसातच्या बातम्यांमध्ये वीस मिनिटं आमची मुलाखत प्रक्षेपित झाली होती. त्यानंतर जवळजवळ वर्षभर आम्ही प्रयोग सादर केले. मग एक वेळ अशीही आली की प्रयोगाची मागणी खूप वाढली, पण आम्हाला स्वतःला मर्यादा होत्या. आम्ही पुणे, नाशिक आणि मुंबईमध्ये सहज करत असू प्रयोग, पण इतर शहरांमध्ये करताना थोडं अवघड होत होतं. हे सर्व जसं जसं लक्षात येत गेलं, तसं मग आम्ही जशी मागणी येईल तसे प्रयोग करायला सुरुवात केली. Weचारचे आमचे प्रयोग खूपच अनौपचारिक होते. चार मित्र सहज गप्पा मारत मारत काही कविता सादर करतायत असं काहीसं स्वरूप होतं. कार्यक्रमाची संहिता समीरने लिहिली होती, पण ती मार्गदर्शक म्हणून होती. अनेकदा उत्स्फूर्तपणे एखादी कविता बदलली जायची. प्रत्येक कविता ही प्रयोगात पहिल्यांदा सादर केली जायची. त्यामुळे बरेचदा आम्हालासुद्धा एकमेकांना माहीत नसायचं की आता प्राजक्त कुठली कविता सादर करणार आहे. आम्ही स्वतःसुद्धा प्रेक्षकांच्या भूमिकेतच असायचो. आमच्यापैकी प्रत्येकालाच स्वतःच्या कवितेपेक्षा दुसर्याने सादर केलेली कविता जास्त आवडायची. अशा वातावरणात फार मजा आली प्रयोग करताना. आणि प्रेक्षकांनासुद्धा ते अतिशय आवडलं. आपण जसं मित्रांशी कोपरखळ्या मारत, चिमटे काढत गप्पागोष्टी करत बोलतो, तसा मराठी कवितांचा कार्यक्रम हा सर्वांसाठीच एक वेगळा विशेष अनुभव होता. Weचार सुरू होण्यापूर्वी आम्ही चौघे चांगले मित्र तर होतोच, Weचारमधून कलाकार म्हणूनही आमची मैत्री वाढत गेली.
मि का : माझ्या मते हे सर्व तुम्ही तुमचे नोकरी-व्यवसाय सांभाळून करत होतात. तर एकूण हा प्रवास कसा होता? तुम्हाला आलेली आव्हानं, समस्या याबद्दल थोडं...
समीर : हो, अवघड तर होतं. सुरुवातीला आम्ही फक्त शनिवार-रविवार प्रयोग करायचो, महिन्यात एकच प्रयोग करायचो. ह्या सर्वामागे उद्देश हाच होता की इतर जबाबदार्या सांभाळताना प्रयोग रद्द करावा लागू नये. आणखी एक समस्या होती, ती म्हणजे इतर शहरांमध्ये प्रयोग करताना बर्याच गोष्टी माहीत नसायच्या - त्या शहरातलं ऑडिटोरियम कसं बुक करायचं, राहायची व्यवस्था हे सर्व जर तुम्हाला तिथलं कुणीतरी माहीत असेल तर सोपं असतं. ह्यावर उपाय म्हणून मग आम्ही हळूहळू ग्रूप वाढवायला सुरुवात केली. अश्विनी शेंडे, श्रीपाद देशपांडे, तेजस रानडे हेही वि४मध्ये आले. काही महिन्यांपूर्वी बँकॉकमध्ये प्रयोग केला, त्यात विनायकही सामील झाला. इथेही मालेगावला, सोलापूरला प्रयोग झाले. आणि ऑन डिमांड जेव्हा प्रयोग करू लागलो, तेव्हा अशी काही खातरी नसायची कायम शनिवार किंवा रविवारच मिळेल. अशा वेळी मग अश्विनी, तेजस, श्रीपाद यांची फार मदत व्हायची.
मि का : Weचार ह्या कार्यक्रमातून तुम्ही लोकांसमोर आलात. या कार्यक्रमाचं बस्तान बसत होतं. मराठी चित्रपटांकडे कधी वळलात?
मंदार : मी Weचारच्या आधीपासून मराठी चित्रपटांमध्ये गीतकार म्हणून प्रयत्न करत होतो. Weचारच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी जी रिहर्सल केली होती, त्यात आम्ही फक्त गप्पाच मारल्या होत्या. पण दुसर्या दिवशी प्रयोग झाला आणि आमचा तिथेच विचार पक्का झाला की हे आपल्याला करायचंय. स्ट्रगल तर आपण सगळेच आपल्या क्षेत्रात करत असतो. माझ्या बाबतीत असं झालं की मी स्वतः किंवा Weचार तेव्हा कलाक्षेत्रात एस्टॅब्लिश झाले नव्हतो. समीरला त्यानंतर तीन वर्षांनी ब्रेक मिळणार होता आणि तोही कट्यारमध्ये. त्याची आम्ही कुणी कल्पना केली नव्हती. पण या सर्वामध्ये Weचारच्या दृष्टीने आमच्याभोवती तसं वलय नसणं हे चांगलंच होतं असं वाटतं. नाना पाटेकर जसं ‘पुरुष’च्या प्रयोगाला म्हणायचे की मला बघायला येऊ नका, माझी कला बघायला या. तसं जर ‘देवा तुझ्या गाभार्याला’चा गीतकार मंदार आहे म्हणून Weचारला गर्दी होणं हे Weचारला हानिकारक झालं असतं. वि४च यश यातही आहे की आम्हाला कुणाला प्रसिद्धीचं वलय नाही. वि४ला येणारे प्रेक्षक हे फक्त आमच्या कविता ऐकायला येतात, हा मोठा फरक होता आमच्यामध्ये आणि असे प्रयोग करणार्या इतरांमध्ये. आम्हाला आमच्या यशापेक्षा आमच्या कामाने ओळखलं जातं.
समीर : मला वाटतं गुरू ठाकूर आणि सौमित्रदेखील एक प्रयोग करायचे. त्या कार्यक्रामाचं नाव मला वाटतं 'असे गीत आले ओठी' असं काहीसं आहे. तर होतं असं की कार्यक्रमाचं नाव आपल्याला आठवावं लागतं, पण गुरू ठाकूर आणि सौमित्र या नावाचं एक वलय आहे. आमच्या बाबतीत याच्या अगदी उलट आहे. Weचार ही आमची ओळख आहे. मी जेव्हा संगीतकारांना भेटायचो, तेव्हा ते विचारायचे की याच्या आधी काय काम केलंय? मी त्यांना सांगायचो की मी कवितांचा कार्यक्रम करतो, तर ते म्हणायचे अच्छा म्हणजे तू Weचारचा समीर सामंत आहेस होय!
मंदार : एका चित्रपटाच्या म्युझिक रिलीजला एक मुलगी आली आणि म्हणाली, "सर, एक फोटो काढू का? मी तुमच्या कविता ऐकल्यात." ती मुलगी त्या चित्रपटात काम करणारी होती. आमची काही ओळख नव्हती, त्यामुळे मी म्हटलं, "माझा फोटो का बरं?" तर तिने सांगितलं, "तेजस रानडे माझा मित्र आहे, त्याने खूप कविता ऐकवल्यात तुमच्या. आणि मला Weचार बद्दलही माहिती आहे." तर हा जो आनंद असतो, तो शब्दात नाही सांगता येणार. २००८च्या सुमारास मराठी गाण्यांचे आल्बम निघायचे. तेव्हा निलेश मोहरीर माझा ऑर्कुटवर मित्र होता. आणि मी त्याला सांगितलं होतं मला आवडेल लिहायला, तर तसं काही काम असेल तर सांग. तर त्याने योगिता चितळेंच्या आल्बमसाठी एक गाणं लिहायला सांगितलं. ते मी लिहिलं आणि मग तिथून सुरुवात झाली. २०१०मध्ये 'दुर्गा म्हणतात मला' चित्रपट मिळाला. आणि मग हळूहळू कामं मिळत गेली. वि४चा आम्हाला एक फायदा असाही होता की त्यामुळे आम्ही कौशल इनामदार, चंद्रशेखर गोखले, नंदू घाणेकर या कलाक्षेत्रात ओळख असलेल्या लोकांच्या संपर्कात आलो होतो.
मि का : कट्यार कसा मिळाला?
मंदार : दुनियादारीचा साहाय्यक दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आमचा मित्र आहे. दुनियादारी जेव्हा बनत होता, तेव्हा कट्यारची जुळवाजुळव सुरू होती. म्हणजे रिलीज व्हायच्या आधी जवळजवळ तीन-साडेतीन वर्षं कट्यारची तयारी सुरू होती. इतका तो अभ्यासपूर्ण प्रोजेक्ट आहे. तर वैभवचा एक दिवस फोन आला की एक गाणं लिहायचं आहे, लिहिशील का? मी हो म्हणालो. तर तो म्हणाला, अंधेरीला येऊन भेट. तो दिवस होता ३१ डिसेंबर २०१३. त्याला जाऊन भेटलो, तेव्हा त्याने मला प्रोजेक्टची कल्पना दिली. संगीतकार कोण, कथा, दिग्दर्शक हे सर्व ऐकल्यावर तर मी खूपच एक्सायटेड होतो. सुबोध भावेही त्या दिवशी भेटला. त्याने थोडीशी माहिती दिली. त्याच दिवशी वैभवने मला चालही दिली. मी ठीक आहे म्हणून घरी गेलो. आणि दुसर्या दिवशी सकाळीच मी त्याला शब्द पाठवले. आणि एक अशी इमेज असते की असं घाईघाईत लिहून पाठवलं म्हणजे काहीही असेल वगैरे, तर तसं होत नाही. ही प्रोसेस सुरू राहत असते, आपण लिहिलेल्या गाण्यावर आणखी संस्कार होत जातात हळूहळू. जेव्हा तुम्ही खरोखर पॅशनेटली काम करता, तेव्हा वेळेचं भान राहत नाही. पण माझ्यापेक्षाही समीरची कथा जास्त रोचक आहे. आधी थोडी बेकग्राउंड मी सांगतो. तर माझं गाणं फायनल झालं होतं आणि आम्ही पान खायला गेलो होतो टपरीवर. तर तिथे विषय निघाला की कट्यारची टीम एक कव्वाल शोधतीये दोन वर्षांपासून. आणि त्यांना मिळत नाहीये. तुला जमेल का लिहायला? तर मी म्हटलं की "कव्वाली मी लिहू नाही शकणार कदाचित, पण लिहिणारा तुम्हाला आणून देतो." कोण आहे? म्हटलं, समीर. कोण समीर खान? समीर शेख? नाही नाही, समीर सामंत. वैभवला मग नंबर दिला समीरचा. समीरला फोन केला, तर शनिवारची दुपार होती. त्याला सुट्टी होती आणि तो नुकताच उठून आंघोळीला चालला होता. मी त्याला म्हटलं, "एक कव्वाली लिहून देशील का?" तर तो म्हणाला, "असं तुझ्यासारखं नाही जमायचं मला." समीर स्वःत खूप उत्तम लिहितो. पण कुणी जर त्याच्या मागे लागलं, तर मात्र काम अवघड असतं. उदाहरणार्थ, त्याची ही एक नज्म बघ -
तुम्हारा नाम....
शब भर खयाल ए आशिकी उसपर तुम्हारा नाम
आता रहा जुबान पर अक्सर तुम्हारा नाम
क्या रंग लाएगी कभी मेरी भी बंदगी
लेता हूं सुबह नींद से उठकर तुम्हारा नाम
ये क्या की चढ रहा नशा बनकर तुम्हारा नाम
रस्ते मे मुझ को दे न कहीं ठोकर तुम्हारा नाम
पूछी किसी ने जब मेरे उल्फत की दास्तां
सफहा पलट के रख दिया लिख कर तुम्हारा नाम
निकली तुम्हारी बात तो महफिल से चल दिये
जंचता नही है गैर के लब पर तुम्हारा नाम
कितनी तुम्हारे नाम की इज्जत है देख ले
नीचे मेरी गजल लिखी... ऊपर 'तुम्हारा नाम'
क्या बात है की... है तुम्हे इतना यकीं 'समीर'
लिखा है आज भी उसी दिल पर तुम्हारा नाम
- समीर सामंत (We-चार)
इथून पुढची गोष्ट आता समीरकडूनच ऐकू या.
समीर : मंदारचा फोन आला आणि मी पहिल्यांदा इतका काही उत्सुक नव्हतो. कारण चालीवर शब्द लिहिणं, मीटरमध्ये लिहणं हा माझा पिंड नाही. तेव्हा त्याने दोन गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे चित्रपट कट्यार काळजात घुसली या नाटकावर आधारित आहे आणि संगीतकार शंकर एहसान लॉय आहेत. हे ऐकून तर मी आणखीनच घाबरलो. तरीही आंघोळ करून येऊन वैभवला घाबरत घाबरत फोन केला. त्याने विचारलं की नाटक पाहिलंय का? मी म्हणालो, पाहिलंय. तर तो म्हणाला, "हा प्रसंग नाटकात नाहीये. खांसाहेबांची मुलगी त्यांना उलट प्रश्न विचारते आणि ते तिच्यावर हात उगारतात. मागे एक कव्वाली चालू असते, तिथे खांसाहेब जाऊन गातात, असा प्रसंग आहे" असं त्याने सांगितलं. "या प्रसंगाला अनुरूप अशी कव्वाली लिहू शकशील का?" असं विचारलं. मी म्हटलं, "ठीक आहे. मी ऑफिसमध्ये येऊन भेटतो." घरून निघाल्यावर ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत माझ्या डोक्यात पूर्ण वेळ तो प्रसंग चालू होता. एखाद्याने प्रश्न विचारल्यावर आपल्याला राग तेव्हा येतो, जेव्हा आपण तो प्रश्न टाळत असतो. उत्तर आपल्याला माहीत असतं आणि ते न पचणारं असतं. तर तेव्हा मला पहिली ओळ सुचली -
'दिलही जब इलजाम लगाये देवे कौन
सफाई, तुझसे नजर मिलाउं क्या जब खुदसे नजर चुराई'
'चुराई'वर मला तो इलाहीचा ठेका नशिबाने मिळाला. ऑफिसमध्ये गेल्यावर वैभव म्हणाला, "शंकरजींना आता फक्त पंच लाईन पाहिजे. तू तेवढी दे, मग तुला वेळ मिळेल विचार करायला." मी ठीक आहे म्हणून आत बसलो आणि पंधरा-वीस मिनिट लिहीत बसलो. वैभवला बोलावलं आणि ऐकवलं. तोपर्यंत जवळपास तीन पानं लिहून झाली होती. वैभव म्हणाला, "सुबोधला बोलवतो.' सुबोधने ते पाहिलं आणि त्याला अतिशय आवडलं. सुबोध म्हणाला, "हे तुझ्याकडे ठेव. मी फोन करतो उद्या तुला." दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये सुबोधचा फोन आला की किती वाजता निघतोस ऑफिसमधून? मी म्हणालो, निघेन साडेपाच-सहाला. तर तो म्हणाला, "सात वाजता आपण वांद्र्याला शंकरजींच्या स्टुडियोमध्ये भेटू या." शंकरजींचं नुसतं संगीत आहे म्हटल्यावर मी घाबरलेलो, त्यांच्या स्टुडियोत जायचं म्हटल्यावर तर जमीन हादरली पायाखालची. सुबोधने आणखी असंही सांगितलं की त्यांच्याकडे वेळ कमी असतो, तर तू दोन-तीन ऑप्शन्स तयार ठेव. ते ऐकून मी मनात म्हणालो, आधीच तीन पानं लिहिली आहेत. आता आणखी काय ऑप्शन देणार? स्टुडियोमध्ये त्यांना पहिल्यांदाच जे ऐकवलं ते आवडलं. हे परफेक्ट आहे म्हणाले. त्यांनतर 'सूर से सजी संगिनी'वर त्यांची चर्चा चालू होती. त्यांना त्यात काही बदल करून हवे होते. ते करून दिल्यावर ते म्हणाले, "अरे, तुमची दोघांची जोडी एकदम डेडली कॉम्बो आहे!" आम्ही म्हणालो, "अजून दोनच पाहिलेत. चार भेटल्यावर मग बघा."
मंदार : तिथे आम्ही सातला गेलो होतो. कव्वाली फायनल करून नऊपर्यंत निघू असं एक गणित होतं मनात. पण तिथे गेल्यावर पहिल्या अर्ध्या तासात कव्वाली ठरली होती. आणि मग उरलेल्या वेळात आम्ही 'सूर से सजी संगिनी'चे बदल केले होते. 'मनमंदिरा'चा अंतरा त्यांना थोडा बदलून हवा होता, तो दिला होता.
समीर : दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा वैभवचा फोन आला की "अरे, अवधीमध्ये लिहणार कुणी माहीत आहे का?" त्याला म्हणालो, "मला थोडा अवधी दे. मी सांगतो तुला." कशासाठी पाहिजे वगैरे विचारल्यावर त्याने सांगितलं की नाटकात जे कविराजाचं पात्र आहे, त्यात कवी भूषण वगैरे असे शब्द आहेत, त्याऐवजी सर्वांना कळतील असे शब्द असलेलं लिहून पाहिजे. संध्याकाळी मी त्याला ते लिहून दिलं. तो प्रसंग चित्रपटात नाही ठेवता आला. त्यामुळे ते चित्रपटात गेलं. पण त्यांनतर वैभव आणि सुबोध दोघांना विश्वास वाटू लागला की हा लिहू शकतोय. चित्रपटाच्या सुरुवातीला जे निवेदन आहे, तेही लिहिलं. उर्दू जमतंय म्हणल्यावर आणि खाँसाहेबांचं पात्र उर्दू असल्यामुळे मग खाँसाहेबांच्या वाट्याची काही गाणी माझ्याकडे आली. अशी आणखी दोन-तीन गाणी केली होती, पण एडिटिंगमध्ये ती गेली.
मि का : दिल की तपिश तू तेव्हाच लिहिलंस का?
समीर : दिल की तपीश खरं तर सुबोधने मराठीत आधी लिहलं होतं.
मि का : सुबोध भावेने?
समीर : हो, सुबोधने स्वःत.
मंदार : सुबोध भावेने एक उत्तम ठुमरीसुद्धा लिहिली होती. मात्र ती चित्रपटात नाही ठेवली. एक दिग्दर्शक म्हणून चित्रपटाची लांबी-रुंदी, त्यात कोणते प्रसंग ठेवायचे, कोणते नाही... हे सर्व करत असताना एक उत्तम प्रेमगीत लिहूनही सुबोध त्यात अडकून राहिला नाही. तर त्याने अगदी सहज ती चित्रपटातून वेगळी केली. मनमंदिराचीसुद्धा सुरुवात 'हृदयातल्या तेजाने' अशी होती. तर शंकरजी म्हणाले की तिथे एक शब्द द्या. गाण्याची ओळख होईल असा एक शब्द हवा आहे तिथे. मग तिथेच मनमंदिरा शब्द सुचला. आणखी एक ओळ होती सुबोधने लिहिलेली - 'सप्तसुरांचा करून झुला, मिठीत घे आभाळा.' ती ओळ त्या पात्रासाठी, त्या प्रसंगासाठी योग्यच होती. मी म्हणालो, "सुबोध, ये अच्छा है." पण सुबोध म्हणाला, "मुझे पता है अच्छा है, लेकिन मुझे और अच्छा चाहिये." सर्वांनीच कट्यारसाठी फार भारावून जाऊन काम केलंय. आमच्यासाठी हा अनुभव जबरदस्त होता. बर्याच गोष्टी ऑन सेट ठरत होत्या. समीरने जी कव्वाली लिहिली होती, ती गाताना शंकरजी एक शब्द गायचा विसरले होते आणि त्यामुळे त्या कडव्याचा अर्थ बदलत होता. तेव्हा समीर आणि सुबोध चर्चा करीत होते की इथे शब्द चुकलाय आणि ते फिक्स करायला हवं, तेव्हा तो शब्द गायला आहे असं समजून सचिनजींनी शॉट दिला होता.
मि का : कट्यार हे मराठीतलं अतिशय गाजलेलं नाटकं आणि त्यातल्या नाट्यपदांचा - घेई छंद, तेजोनिधी यांचा तर अजूनही प्रभाव आहे तर या गोष्टीचं दडपण होतं का लिहिताना?
मंदार : कट्यार काळजात घुसली या नाटकाचा नक्कीच प्रभाव आहे अजूनही, आणि फक्त इतरांवरच नाही, तर आम्ही स्वतःसुद्धा असं म्हणतो की आम्ही जे लिहिलं ते ठीक आहे, पण खरोखर 'सुरत पिया की' आणि 'तेजोनिधी'ला तोड नाहीये. माझ्या बाबतीत सांगायचं, तर मला तसं फार दडपण नाही आलं. त्याचं पहिलं कारण म्हणजे मी एकच गाणं केलं. दुसरं कारण हे की सुबोध आणि वैभवने जवळजवळ तीन-साडेतीन वर्षं जो गृहपाठ केला होता, तो माझ्यासोबत होता. कोणताही प्रसंग असू दे, त्याविषयीचं त्यांच्या मनात असलेलं चित्र अतिशय स्पष्ट होतं. उदा., मनमंदिरा गाण्यात मला हे आधीपासून माहीत होतं की एक प्रतिभावान गायक आणि त्यांचा शिष्य असलेला एक छोटा मुलगा यांच्यावर हे गाणं चित्रित होणार आहे. तो गायक त्या मुलाला सांगतोय की तुझं भविष्य घडवण्याची ताकद तुझ्या स्वतःच्या हातात आहे. हाताच्या रेषांवर काहीच अवलंबून नाही. जेव्हा तू तुझ्या हाताची मूठ वळशील, काहीतरी कर्म करशील तेव्हा त्याचं फळ तुला मिळणार आहे. त्यावरून मग 'तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी' हे सुचलं. मला वाटतं अशा अगदी छोट्या छोट्या वाटणार्या गोष्टीही सुबोध आणि वैभवने वेळोवेळी मला सांगितल्या होत्या. त्यामुळे माझं काम बर्यापैकी सोपं झालं होतं. दडपण यायचं आणखी एक कारण होतं की शंकरजींबरोबर आम्ही प्रथमच काम करत होतो. याआधी त्यांची अनेक गाणी ऐकली होती आणि त्यांच्या नावाचा जो दबदबा आहे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, त्याची जाणीव होती. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी तसं आम्हाला कधीही जाणवू दिलं नाही. बर्याचदा रात्री बारा-एक वाजता त्यांचा फोन यायचा आणि ते म्हणायचे, "अरे मंदारसर, क्या लिखा है आपने! ये मैं आपको ला ला ला में गाके सुनाऊ तो चलेगा ना? या फ्लूटपे सुनाऊ?" हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला की आमच्यासारख्या धडपडणार्या मुलांना त्यांनी इतक्या सहज सामावून घेतलं.
समीर : मला वाटतं माझ्या बाबतीतही मला दडपण फारसं नाही जाणवलं. मूळ नाट्यपदं जी आहेत, ती अभिजात आहेत. त्यांच्या यशाला तीन बाजू आहेत - पहिली महत्त्वाची बाजू म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तरांचे शब्द, दुसरी बाजू म्हणजे संगीत आणि तिसरी बाजू वसंतरावांचा आवाज. यातल्या संगीत आणि आवाज या दोन गोष्टींचं दडपण आम्हाला आलं नाही, कारण टीम जबरदस्त होती. शंकरजींचं संगीत, त्यांचा आवाज आणि राहुल देशपांडे, महेश काळे हे गायक असणार आहेत हे माहीत असल्यामुळे एक नक्की माहीत होत की आपल्या शब्दांना पुरेपूर न्याय मिळणार आहे. राहता राहिलं शब्दांचं दडपण, तर मी त्याही बाबतीत नशीबवान होतो, कारण मला गाणी उर्दूत लिहायची होती. मला एकूण चार गाणी मिळाली - दिल की तपीश, शाहे तरन्नुम, सूर से सजी संगिनी, यार इलाही. त्यातल्या सूर से सजी संगिनीला एक जबाबदारीची जाणीव होती की 'या भवनातील गीत पुराणे' या मूळ नाटकातल्या पदाला ते गाणं रिप्लेस करत होतं. कट्यार हे नाटक ज्यांना कुणाला माहीत आहे, त्या लोकांच्या डोक्यातून हे नाट्यपद जाणं शक्यच नाहीये. कट्यारच्या रसिकांना ही गोष्ट पचायला अतिशय जड असणार होती. पण ते वगळण्यामागेही कारण होतं. त्या काळातील मराठी नाटकाचा जो प्रेक्षकवर्ग होता, तो पूर्ण उर्दू बोलणारा खाँसाहेब समजू शकत नव्हता. आता चित्रपट काढताना मात्र हे लक्षात आलं की खाँसाहेब जर बरेलीवरून आलेले आहेत, तर ते अस्खलित मराठी बोलताना दाखवणं हे आताच्या प्रेक्षकांना कितपत रुचेल? आणि मूळ गाण्यात जो भाव आहे, जी कल्पना आहे ती जपण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. नाट्यपदात असे शब्द आहेत,
भावभक्तीची भावुक गाथा,
पराभूत हो नमविल माथा
नवे सूर अन् नवे तराणे
हवा नवा तो नूर
जाऊ द्या दूर जुने ते सूर
तर या कल्पनेवर आधारित सूर से सजी संगिनीमध्ये आहे,
'रैन बसेरे
उठने दे डेरे
अब मेरी तन्हाइ हो
नाम तेरे'
हा राग कशाला? तर इतके वर्ष मी एकटा होतो, आता तू एकटा राहून दाखव.
मंदार : त्यांच्याआधी तू शंकरजींना गाऊन दाखवलं तेही सांग. आणि ते ऐकून मी असा अवाक होऊन बघत होतो समीरकडे!
समीर : नाही नाही, असं काही नाही. शंकरजी म्हणत होते की ते मीटरमध्ये कसं बसतंय दाखव. म्हणून मी फक्त माझी बाजू मांडण्यासाठी त्यांना गाऊन दाखवत होतो आणि सुबोधने तेवढ्यात काहीतरी खूण करून सगळं म्युझिक बंद करायला लावलं आणि आख्ख्या रूममध्ये फक्त माझाच आवाज. मी गातोय आणि शंकरजी समोर उभे. अशी आपली एक गंमत झाली, एवढंच. त्यानंतर शंकरजींनी म्हणाले, "कल के शेड्युलमे और कौनसे गाने है? तेजोनिधी? ओके." ते चालू केलं लगेच. आणि आम्ही भाग्यवान असल्यासारखे त्यांच्या आवाजात लाइव्ह तेजोनिधी ऐकलं. तो अप्रतिम अनुभव होता. हे सगळं चालू असतानाच ते पाच मिनिटं जाऊन येतो म्हणाले आणि मग परत येऊन म्हणाले, "अरे, कुछ नहीं| लोचा ए उल्फत गाके आया हूँ."
एका वेळी वेगवेगळी कामं करायची त्यांची खासियत आहे. आणि सगळीच कामं ते असंच मन लावून करतात. खूप काही
शिकायला मिळालं आम्हाला त्यांच्याकडून.
मंदार : आणखी एक आठवण आहे शंकरजींची भारावून टाकणारी, ती सांगतो. सुबोध तेव्हा लोकमान्यही करत होता. त्यात एका गाण्यासाठी त्यांना मदत हवी होती. ओम राऊतचा मला फोन आला की अशी अशी सिच्युएशन आहे. तू करशील का? दुर्दैवाने ते नंतर चित्रपटात आलं नाही. माझ्यासाठी ते तेव्हा अगदीच शेवटच्या क्षणी आलेलं काम होतं, म्हणून मी म्हणालो की "असं कसं करतो ओम तू? आपण एवढ्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतो आणि तू आता शेवटच्या क्षणी कसं विचारू शकतो?" तेव्हा ओमने सांगितलं, ते ऐकून मी थक्क झालो. तो म्हणाला, "तुम्हाला माहितीये का तुमची पब्लिसिटी कोण करतंय?" मी म्हणालो, कोण? तर तो म्हणाला, "तो समीर सामंत थोडा जाड्या आहे का?" मी म्हटलं, "हो आहे. का?" तेव्हा त्याचं उत्तर होतं की "अरे, खुद्द शंकर महादेवन आम्हाला सांगत होते की गाण्यात काही प्रॉब्लेम असेल, तर एक जाड्या आहे आणि एक पतला. त्यांच्याकडे जा. ते सिच्युएशन ऐकतात. चहा पिऊन येतात. आणि पंधरा मिनिटात तुम्हाला गाणं देतात." आपण यांच्याबरोबर काम करतोय ते शंकरजी स्वतः इतरांकडे आपलं कौतुक करतात ही जी भावना आहे, याहून मोठं कौतुक कुठलंच नाही. ही जी इमेज म्हणू शकतो आपण, ती तयार होण्यात समीरचं खूप कौतुक आहे. कारण ही सगळी गाणी लिहिताना मी त्याला बघितलं आहे. कव्वाली त्याने अगदी सहज लिहून दिली होती. पुन्हा दिल की तपीशही तसंच. आणि स्वतः इतकं प्रतिभावान असतानाही प्रत्येक गाण्याच्या वेळी तो मला आधी ते पाठवायचा आणि विचारायचा की यात काही करता येईल का? मी म्हणायचो, तू केलंय म्हणजे परफेक्ट असणार. तो सांगायचा की तरीही बघच. आपण जेव्हा एका कमर्शियल प्रोजेक्टवर काम करतोय, तेव्हा आपलं काम आणखी छान कसं करता येईल हे सतत बघत राहिलं पाहिजे... हा त्याचा गुण आहे, तो खूप कमी लोकांमध्ये असतो.
मि का : माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं, तर मला स्वतःला यार इलाही कव्वाली अतिशय आवडली. मी आधी फक्त गाणं ऐकलं होतं, तेव्हाही त्यातले शब्द मनाला भिडले होते. आणि जेव्हा मी ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलं, तेव्हा तर ते शब्द आणखी जास्त प्रभावी वाटले. सर्वप्रथम जेव्हा मी ती कव्वाली ऐकली, तेव्हा असं वाटलं होतं, समजा, ज्याला एक खून माफ आहे, तो राजगायक मी असतो, तर मी या माणसाचा खून केला असता. इतकं त्रासदायक झालं होतं ते. तर एकूणच ही कव्वाली कशी बनली, ती कशी उतरली कागदावर हे जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. ती रेकॉर्ड झाली, तेव्हा तू होतास का?
समीर : रेकॉर्डिंगच्या वेळेस मी नव्हतो, ऑफिसमुळे नाही जाता आलं. शंकरजींच्या आवाजात जे रेकॉर्ड झालं होतं, ते ऐकलं होतं. सीन शूट करायच्या आधी डमी सिंगरच्या आवाजात ते गाणं गाऊन घेतात, जेणेकरून सीन शूट करून घेता यावा. ते डमी सिंगर म्हणून शंकरजींनी गायलं हा त्यांचा मोठेपणा आहे. ते ऐकून काही करेक्शन्स होत्या, त्या सांगितल्या होत्या. त्यानंतर अरिजित आणि दिव्या यांच्या आवाजात ऐकलेली तेव्हाही आवडली. मी तीन पानं लिहिली होती. त्यातली दीड पानं या कव्वालीत आहेत. एक कडवं त्यातलं मी आधीच लिहलं होतं. चित्रपटाच्या प्रसंगामध्ये ते अनुरूप होतं, म्हणून ते थोडेसे शब्द बदलून या गाण्यासाठी वापरलं. दोन भिन्न व्यक्तिरेखांमधला फरक मुख्यत्वे या कव्वालीतून दाखवला आहे. एक व्यक्तिरेखा आशावादी आहे आणि एक निराशावादी. जशी ती लिहिली आहे, गायली आहे, त्याबरोबरच चित्रीकरणही सुरेख झालं आहे. त्यामुळे मला वाटत सर्वांनाच ही कव्वाली आवडली. अरुणी किरणी गाण्याच्या रेकॉर्डिंगला आम्ही होतो. आणि ते रेकॉर्डिंग फक्त एवढ्यासाठी म्हणायचं की महेशजी काचेच्या आड होते म्हणून. आमच्यासाठी तर ती एक मैफलच होती. चित्रपटासाठी जेव्हा क्लासिकल गायक गातात, तेव्हा एक मर्यादा असते, ती म्हणजे ते लिपसिंक बरोबर जुळलं पाहिजे. ह्या मर्यादेमध्ये राहूनही राहुलजी, महेशजी सर्वांनीच अप्रतिमरित्या या चित्रपटाची गाणी गायली आहेत. मला वाटतं, साधारण पाच-एक वर्षांपूर्वी मी दिवाळी पहाट कार्यक्रमाला गेलो होतो. महेशजींनी त्या कार्यक्रमात कट्यार काळजात घुसली नाटकातील नाट्यपदं गायली होती. जाताना मी कट्यारमधली गाणी ऐकायला मिळणार म्हणून गेलेलो आणि परत येताना महेश काळे हेच नाव लक्षात होतं माझ्या. त्यांच्याबरोबर कामं करायला मिळणं, इतक्या जवळून त्यांच्याशी बोलायला मिळणं, ऐकायला मिळणं याहून मोठी भाग्याची गोष्ट काय असेल?
मि का : खरं तर हाच माझा पुढचा प्रश्न होता की आपले शब्द हे इतके मोठे गायक कलाकार गातात, तेव्हा नेमक्या काय भावना असतात?
मंदार : खूप आनंद होतो. आणि जसा आमचा प्रवास झाला आहे, तो पाहिला तर हे सगळं स्वप्नच वाटतं. कट्यारची टीम जबरदस्त होती. मराठी चित्रपटसृष्टीतली मोठी मोठी नावं या चित्रपटाशी जोडली आहेत. कट्यार बनत होता, तेव्हा मला मितवा मिळाला. स्वप्ना जोशी चित्रपटाच्या दिग्दर्शक. त्यांनी शंकरजींना फोन केला होता आणि शंकरजींनी विचारलं, "गीतकार कोण आहे?" त्यांनी सांगितलं, "मंदार चोळकर म्हणून एक मुलगा आहे." त्यावर ते म्हणाले, "अरे, मंदार... फिर तो कोई टेन्शन नहीं." त्यांनी मनाचा हा मोठेपणा वारंवार दाखवला आहे, त्यावर मी समीरला मी कायम म्हणत असतो की नक्कीच देवाचा हात आपल्या डोक्यावर आहे, ज्यामुळे आपल्याला ह्या सर्व लोकांबरोबर काम करायला मिळतंय.
समीर : खरं सांगू का, जेव्हा चित्रपट बनत होता तेव्हा खूपच भारी वाटायचं की, माझ्या शब्दावर शंकरजी गातायत, महेशजी गातायत. प्रत्यक्ष पूर्ण चित्रपट जेव्हा पाहिला, तेव्हा 'माझे शब्द' ही भावनाच नव्हती. असा चित्रपट बनला आणि आपण त्याचा एक भाग होतो हीच एक भावना होती.
मि का : आणखी एक मुद्दा जो कट्यारच्या रिव्ह्यूजमध्ये अनेकदा आला, की तुम्ही नाटकावर आधारित चित्रपट आहे असं सांगता आणि मग त्यातले काही प्रसंग बदलता, गाणी बदलता. खांसाहेबांची भूमिकाच जर घेतली उदाहरण म्हणून, तर नाटकात हे पात्र निगेटिव्ह नाहीये आणि चित्रपटात मात्र ते अतिशय निगेटिव्ह वाटलं आहे. या गोष्टीला बर्याच प्रेक्षकांचा आक्षेप आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
समीर : मला वाटतं हा नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांतला फरक असावा. नाटक करताना बर्याच गोष्टी ह्या
संवादातून प्रेक्षकांना समजतील असं गृहीत धरलेलं असतं. चित्रपटात तुम्हाला बराच वाव असतो या गोष्टी अभिनयातून
मांडायला. आणखी एक गोष्ट अशीपण असावी की नाटकात ज्यांनी खांसाहेबांची भूमिका केली आहे, त्या वसंतरावांपासून ते
राहुल देशपांडे या सर्व कलाकारांच्या बाबतीत मराठी माणसाच्या मनात फक्त आणि फक्त आदर आहे. सचिनजींनी जी भूमिका केली आहे, ज्या ताकदीने त्यांनी हे पात्र उभं केलं आहे, अशी भूमिका मला आठवतंय त्याप्रमाणे मराठी चित्रपटात फार काळाने दिसली. दिल की तपीश खाँसाहेब गातात आणि त्यानंतर पंडितजी घेई छंद गायला सुरुवात करतात, त्या वेळेस खाँसाहेबांच्या नजरेत पंडितजींबद्दल फक्त आणि फक्त कौतुकच दिसतं. एका कलाकाराने दुसर्या कलाकाराला दिलेली दाद. पंडितजींना जेव्हा विजेते घोषित करतात, जेव्हा हार आणि जीत या दोन भावना प्रबळ होतात, तेव्हा त्यांची भूमिका बदलत जाते. सुबोध मला वाटतं नेहमी सांगत असतो की कट्यार काळजात घुसली ह्या नाटकावर आधारित चित्रपट म्हणून संपूर्ण नाटक जसंच्या तसं कॉपी केलं असं नाहीये. नाटक ही एक स्वतंत्र कलाकृती आहे आणि चित्रपट हीसुद्धा एक स्वतंत्र कलाकृती आहे.
मि का : तुम्हाला दोघांना अनेक धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही माझ्याशी बोललात, इतके छान अनुभव सांगितले, खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद आणि असंच यश तुम्हाला मिळत राहो, हीच शुभेच्छा!
शब्दांकन : रातराणी.
छायाचित्रे : मंगेश चंद्रात्रे.
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 12:49 pm | यशोधरा
आवडली मुलाखत.
31 Oct 2016 - 1:29 pm | नाखु
आणि शंकर महादेवन यांच्याबद्दलचा आदर दुणावला.
29 Oct 2016 - 10:08 pm | मित्रहो
मुलाखत वाचून गीतकारांबद्दलच नाही तर शंकरजी विषयीचा आदर वाढला
31 Oct 2016 - 12:27 pm | आतिवास
मुलाखत आवडली. ब-याच नव्या गोष्टी कळल्या.
मिका गद्यही चांगलं लिहू शकतात हेही कळलं :-)
31 Oct 2016 - 12:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
खरं तर हे श्रेय रातराणीचं.
मी फक्त मुलाखत घेतलीये. माझ्या अघळं पघळं बोलण्यातून तिनेच योग्य ते निवडून लिहून काढलयं.
रातराणी, बयो जिकंलस गो.
31 Oct 2016 - 12:37 pm | उल्का
आवडली. :-)
31 Oct 2016 - 12:54 pm | संदीप डांगे
आजपर्यंत वाचलेल्या मुलाखतींमधली ही सर्वात सुंदर! खूप मस्त! अगदी समोरच गप्पा सुरु आहेत असं वाटलं!
माहितीही खूप महत्त्वपूर्ण! _/\_
31 Oct 2016 - 1:17 pm | चौकटराजा
या मुलाखतीवर कुर्बान. या सर्व पोराना यशाची आणखी शिखरे गाठता यावीत यासाठी नम्र शुभेच्छा ! दिलकी तपीश ही माझी आवडती कलाकृती झाली आहे. किरवाणी रागात गाणे फेल जाणे फार अवघड ! बाकी शंकर महादेवन विषयी काय बोलावे? मस्त मजेशीर व नम्र कलावंत ! सचिन ना ही भूमिका न मिळती तर त्यानी फार काही गमावले असते.
31 Oct 2016 - 2:35 pm | प्रीत-मोहर
मिका सुरेख झालीय मुलाखत!!
31 Oct 2016 - 7:51 pm | पिंगू
मिका, सहीच झालीये मुलाखत..
31 Oct 2016 - 8:06 pm | अभ्या..
अप्रतिम मुलाखत. सुरेख फोटो.
मस्त रे मिका. तुझ्यासारखा जाणता अन रसिक मुलाखतकार मिळण्याने ह्या मुलाखतीला एक वेगळीच उंची अन अनौपचारीक स्निग्धता प्राप्त झालीय.
31 Oct 2016 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा
+१
31 Oct 2016 - 9:00 pm | प्रास
छान मुलाखत...
31 Oct 2016 - 10:01 pm | पैसा
मुलाखत आवडली
1 Nov 2016 - 8:46 pm | वरुण मोहिते
तुझ्या काव्य वाचनासाठी उत्सुक आता पुढे
1 Nov 2016 - 9:13 pm | खेडूत
मस्त.
मिकाशेठ आणि रातराणी यांचे आभार, कौतुकही!!
2 Nov 2016 - 4:15 pm | सिरुसेरि
मुळ कट्यार नाटकाच्या संहितेत बरेच बदल केले असल्यामुळे , चित्रपट आवडला नव्हता . मुलाखत आवडली . पुलेशु .
2 Nov 2016 - 5:29 pm | रेवती
मुलाखत आवडली.
2 Nov 2016 - 9:47 pm | चाणक्य
मिका मस्तच रे. शंकर महादेवन _/\_
2 Nov 2016 - 9:53 pm | पिलीयन रायडर
मुलाखत खुप आवडली. म्हणजे खरं तर शब्दांकन! कुणी तरी समोर बसुन मस्त गप्पा मारतंय आणि किस्से सांगतंय असंच वाटलं!!
हे फारच भारी!
3 Nov 2016 - 9:04 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हे त्यांचेच शब्द आहेत, जसेच्या तसे.
3 Nov 2016 - 5:01 pm | चांदणे संदीप
दिवाळी अंकात तो संग्रही ठेवण्यासाठी काय शोधायच असतं तर असा लेख/मुलाखत/ओळख.
मिपाचा ह्यावर्षीचा अंक संग्रही झाला आहे!
Sandy
4 Nov 2016 - 9:10 pm | बोका-ए-आझम
एकदम अनौपचारिक!
7 Nov 2016 - 10:11 am | प्राची अश्विनी
+11
7 Nov 2016 - 9:34 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सर्वांचे मनापासून आभार..
26 Nov 2016 - 2:08 am | श्रीरंग_जोशी
ही गप्पांची मैफील अतिशय सहजपणे शब्दबद्ध केली आहे.
या दोन कलाकारांपैकी मंदारबरोबर नऊ वर्षांपूर्वी एका सांस्कृतिक उपक्रमात स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे. मला कलाप्रांतातलं फारसं काही कळत नसलं तरी मंदार एकदम तयारीचा कलाकार आहे हे तेव्हा स्पष्टपणे जाणवलं होतं.
27 Nov 2016 - 4:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरे मिका हे वाचायचेच राहिले होते.
मजा आली वाचून.
तुला आणि रातराणी तैंना अनेक अनेक धन्यवाद.
गाण्यामागची गोष्ट ऐकायला आवडणारा.
पैजारबुवा,
29 Nov 2016 - 12:27 pm | संजय क्षीरसागर
गाणी कशी तयार होतात ते कळलं .
29 Nov 2016 - 1:07 pm | स्वीट टॉकर
खूप नवीन माहिती तर मिळालीच, वर गप्पांचा टच असल्यामुळे वाचायला मजा आली.
7 Dec 2016 - 12:26 pm | रातराणी
सर्वांना धन्यवाद आणि शब्दांकन करायची संधी दिल्याबद्दल मिकाचे खूप खूप आभार. मजा आली लिहिताना आणि त्या निमित्ताने युट्युब वर वि4 मधील कवितांचे विडियो शोधून पहायला!