धोंडा

आतिवास's picture
आतिवास in लेखमाला
29 Oct 2016 - 12:20 am

“आपल्याकडं दिवाळीला नंदाताई येणार आहे राहायला. तिला त्रास द्यायचा नाही बरं का”, जेवण करताना आईनं सांगितलं. कैतरी म्हत्त्वाचं असलं की जेवणाच्या येळी समद्यांना सांगायची आईला सवय हाये. म्हणजे नंदाताई म्हत्त्वाची असणार.
पण ही नंदाताई कोण? म्या तर कंदी बगितली नव्हं.
“ही कोनाय?” म्या दादाला हळूच इचारलं.
माजं हळू म्हंजे आज्जीच्या भाषेत ‘जाहीरनामा’ – म्हंजे बोंबाबोंब.
“आपल्या सुमन आत्त्याची मुलगी,” दादा म्हन्ला.
“म्हंजे मेलेल्या आत्त्याची?” म्या इचारलं.
येकदम लई कायकाय झालं.
आज्जीनं माज्या पाटीत गुद्दा घातला. दादानं एक चिमटा काढला. आईनं ड्वाळं वट्टारलं. आण्णांनी माज्याकडं लईच रागानं पायलं. म्या मान खाली घातली. उरावर धोंडा बसला बगा.
मेलेल्या आत्त्याची पोरगी.
कशी आसंल ती?
***
आण्णा घिऊन आले नंदाताईला.
मला नाय आवडली.
तशी म्याबी गोरी न्हाई, पर ती पारच काळीढुस्स.
म्या तिच्यासंगट जास्ती बोल्ले नाय.
दादाचंन तिचं मातुर झ्याक जमलं. कायबाय हसायचे-बोलायचे सारके.
म्या गपचिप त्यांच्या मागंमागं र्‍हायची. नंदाताईला लई कायकाय म्हैती. गाणी काय, गोष्टी काय, खेळ काय, चा काय – इचारू नगा. त्या दिशी तिनं केलेली शाबुदाणा खिचडी येकदम बेश. मंग मला नंदाताई आवडाया लाग्ली. तिचा हात धरून म्या गावभर हिंडाया लाग्ली.
पंदरा-इस दिसांनी नंदाताईला तिच्या घरला पोचवायचा विषय निगाला. आज्जीनं डोळ्यास्नी पदर लावला. नंदाताईबी सारकी रडाया लागली. राती माजा हात गच्च पकडून बोल्ली, “आन्जे, मला नाही जायचं घरी. कधीच नाही. मामा-मामीला सांग तू."
***
म्या लगी आज्जीकडं. आज्जी बोल्ली की आई-आण्णा दुसरं काय म्हणत न्हाईत.
“नंदाताईला आपल्याकडंच ठिवून घ्याचं” म्या आज्जीला लाडानं बोल्ली. तर आज्जी “ती परक्याची पोर” असलं कायबाय बोलाया लाग्ली.
फुस्स! आज्जीचा येळंला कायबी उपेग नसतोयच.
आण्णांकडं ग्येले, “नंदाताईला आपल्याकडंच ठिवून घ्यायचं” बोल्ले तर आण्णा “बरं” म्हन्ले. पर मला काय त्यात रामसीतामाय वाटलं न्हाय.
आईला बोल्ले तर म्हन्ली, “आपल्या गावात शाळा कुठंय नंदाताईसाठी? आपला दादाच शहरात राहून शिकतो ना? तू हट्ट केलास तर शाळा बुडेल तिची. शहाणी मुलगी ना तू.”
पोरींनी शाळा शिकाया पायजे हे बरोबर हाय. गुर्जीबी सांगतेत.
म्या नंदाताईला बोल्ली, “न्हाय जमायचं. शाळा बुडंल की तुजी.”
नंदाताई येकदम गप झाली.
****
आमी वड्यापल्याडच्या मळ्यात फिराया गेल्तो.
नंदाताई एकलीच हाये. तिला ना भैण, ना दादा.
ती आप्पांसंगट राहते. आप्पा म्हंजे तिचे वडील.
तिची आज्जी – म्हंजे आप्पांची आई – कंदीमंदी येऊन जाते त्यांच्याकडं.
आमची आज्जी कंदी तिकडं जात नाय. आण्णाबी नाय. म्याबी नाय.
तीबी येत न्हाय. या दिवाळीला पैल्यांदा आली.
म्या नंदाताईला इचारलं, “तुला करमत न्हाय का येकलीला? तुला का नाय परत जायाचं तुज्या घरला?”
नंदाताई रडाया लाग्ली. म्हन्ली, “आमचे आप्पा फार वाईट आहेत. आईला मारायचे नेहमी. आता मला मारायला लागलेत सारखे. आन्जे, मला जर परत तिकडं पाठवलं ना तर मी जीव देईन आईसारखा.”
सुमन आत्त्यानं जीव दिलता?
पुन्यांदा माज्या उरावर धोंडा पडल्यागत झालं.
****
घरी आलो तर दत्तुमामा आलते. आमच्या पुण्याच्या आत्याचा नवरा.
मला येकदम भारी सुचलं.
दत्तुमामा येकलेच पेपर वाचित व्हते.
म्या म्हन्लं, “ओ, तुमी पोलिस आहात नव्हं?”
दत्तुमामा हसले, म्हन्ले, “होय बाईसाहेब. कोण त्रास देतं तुला, नाव सांग. तुरुंगात टाकू आपण त्याला.”
इकडंतिकडं कुणी नवतं. तरी दत्तुमामांच्या अगदी जवळ जाऊन कानात बोल्ले, “आप्पा”.
“आप्पा? कोण आप्पा?” त्यांनी इचारलं.
या मोट्या मानसास्नी समदं समजून सांगावं लागतंय.
“नंदाताईचे आप्पा. तिला तरास देतेत, मारतेत.” म्या बोल्ली.
दत्तुमामा माज्याकडं पाहातच रायले.
“नंदाताई आत्त्यासारका जीव दीन म्हणती. त्या आप्पाफप्पांना पकडा तुमी.” म्या रडाया लाग्ली.
“रडू नकोस. मी बघतो काय करायचं ते,” दत्तुमामा म्हन्ले.
माजं रडू काय थांबचना.
***
लई त्हान लाग्ली व्हती. डोस्कं ठणकत व्हतं. डोळे उगाडले. उटाया जमंना.
आज्जी माज्याजवळ व्हती.
दादानं लगी माजं कपाळ फडक्यानं पुसलं.
“नंदाताई कुटंय,” म्या इचारलं.
“आन्जे, मी इथंच आहे. तुला बरं वाटल्याशिवाय मी कुठं जाणार नाही. लवकर बरी हो तू,” नंदाताई बोल्ली तशी म्या तिचा हात पकडून ठिला.
डोळे बंद करून द्येवाला म्हन्लं, “लई दुखतंय मला, पर बरं न्हाई क्येलंस तरी चालतंय. म्हंजे मंग नंदाताई जीवबीव न्हाई द्यायची.”
किती दिस गेले म्हाईत न्हाई.
दादा, आज्जी, नंदाताई, आई, आण्णा सगळे व्हते.
येक दिवस येष्टीत घालून तालुक्याला नेलं मला.
डॉक्टरकाकांनी कडूझार औषाद दिलं. ताप कायी कमी व्हईना.
नंदाताई हितंच व्हती ते बेश.
***
येके दिवशी सकाळी सकाळी जोराजोरात आवाज यायला लाग्ले.
आमच्या घरात असलं आरडाओरडीचं भांडाण कंदी नसतंय.
आज्जी जवळ नव्हती. नंदाताई रडत व्हती. दादा तिला समजौत व्हता.
दत्तुमामांचाबी आवाज आला. आण्णा चिडलेले.
आईबी कायतरी बोलत व्हती.
येक आवाज पुण्याच्या आत्याचा व्हता. दुसरा फलटणच्या आत्याचा.
समदे कशापायी आलेत?
दादानं औषाद दिलं. म्या झोप्ली.
राती जाग आली तवा आण्णा, आई, आज्जी कुजबुजत व्हते.
आई आणि आज्जी रडत व्हत्या. आण्णा कधीबी रडतील की काय असं दिसत व्हतं.
“माझ्या सुमीला काय भोगावं लागलं, तिचं तिलाच माहिती. आन्जीनं धोसरा घेतला म्हणून नंदाच्या वेळी तुम्ही सगळे जागे झालात हे नशीबच...” आज्जी म्हणत व्हती.
म्या गपचिप झोपली परत.
***
येके दिवशी जागी झाले तवा कायबी दुखत नव्हतं.
एका हातात दादाचा हात आणि दुसर्‍या हातात नंदाताईचा हात व्हता.
दोघंबी माज्याकडं पाहून हसत व्हते. आज्जी देवापुडं बसली व्हती.
आण्णा खुर्चीवर बसून हासत होते. आई डोळे पुसत व्हती.
मला लई भूक लागली व्हती.
तूप-मेतकूट-भात खाल्ला.
म्या बरी झाली म्हंजे नंदाताई आप्पांकडं जाणार? जीव देणार?
म्या हळूच तिच्याकडं पायलं. ती हसत व्हती.
आण्णा म्हन्ले, “आन्जाक्का, आता फटाफट बरं व्हायचं. आपण सगळे तालुक्याच्या गावाला राहायला जाणार.”
मला काय बरं वाटलं न्हाई.
“आणि नंदाताई?” म्या इचारलं.
“नंदाताई जाईल तिथं दादाच्या शाळेत, आणि तू दुसर्‍या शाळेत,” आई म्हन्ली.
“नंदाताई आता कायमची आपल्यासोबतच राहणार आहे.” आज्जीनं सांगितलं.
***
“आप्पा? त्यास्नी तुरुंगात घातलं का न्हाय दत्तुमामांनी? ” मी दादाला एकट्याला गाठून इचारलं.
“छे! तुरुंगात नाही टाकलं. पण नंदाताईला मारणार नाही असं सगळ्यांसमोर कबूल केलं त्यांनी. दत्तुमामांनी दम दिला आप्पांना,” दादा म्हन्ला.
झ्याक जिरली. नंदाताईला मारतेत होय?
म्हंजे आता दादापण घरी राहणार, हॉटेलात नाई. नंदाताई आमच्याकडं राहणार. म्या शेरातल्या शाळंत जाणार.
म्या पयल्यासारकी टुणटुणीत झाली.
पळत बायेर जाऊन “म्या शेरात जाणार” वराडले.
अंगणात मोत्या होता. तो शेपटी हालवत माझ्यासंगं गोलगोल फिरायला लाग्ला.
अंक्या, निम्मी, भान्याला सांगितलं, गुर्जींना सांगून आले.
समदे मला तालुक्याच्या गावाचं कायबाय विचारत व्हते, ‘आमालाबी घिऊन जा’ म्हणत व्हते.
पळापळीत उरावरचा धोंडा भौतेक कुटंतरी पडला.
ग्येला येकदाचा.
***

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 8:52 am | यशोधरा

किती गोड ही आन्जाक्का :)

आन्जाक्काला फार दिसानी भेटून आनंंद वाटला. खास आंंजी स्टाईलची ही गोष्ट नेहेमीप्रमाणे खूप आवडली.

सविता००१'s picture

29 Oct 2016 - 11:28 am | सविता००१

कसली गोग्गोड आहे हो ही आंजी. फार सुरेख.डोळ्यासमोर उभी रहाते अगदी.

नूतन सावंत's picture

29 Oct 2016 - 12:55 pm | नूतन सावंत

आन्जीला पुन्हा भेटून फार आनंद झाला.लवकर लवकर भेट घडवाहो,आतिवासताई.

पैसा's picture

29 Oct 2016 - 2:26 pm | पैसा

मस्त!!

आन्जी आवडतेच.मस्त गोडांबा.

नाखु's picture

31 Oct 2016 - 1:16 pm | नाखु

दिवाळीच्या सुभेच्छा !

अरुण मनोहर's picture

2 Nov 2016 - 8:04 am | अरुण मनोहर

कथा छान आहे.

सौन्दर्य's picture

2 Nov 2016 - 8:43 am | सौन्दर्य

छान कथा, आवडली.

खेडूत's picture

2 Nov 2016 - 9:00 am | खेडूत

:)
सगळी पात्रं एकत्र अल्यामुळे कथा विशेष आवडली.
आता आंजीचे शेरातले अनुभव आणि गमती येऊंद्या.

संदीप डांगे's picture

2 Nov 2016 - 9:01 am | संदीप डांगे

Wow!

टुकुल's picture

2 Nov 2016 - 2:18 pm | टुकुल

सुंदर

मृत्युन्जय's picture

2 Nov 2016 - 2:22 pm | मृत्युन्जय

आवडली कथा. आंजी आवडतेच आम्हाला अशीही :)

पिलीयन रायडर's picture

2 Nov 2016 - 7:09 pm | पिलीयन रायडर

आन्जी इज बॅक! फारच गोड आहे ही सुद्धा कथा!

पद्मावति's picture

3 Nov 2016 - 3:14 am | पद्मावति

काय गोड लिहिलंय. आन्जी मस्तं!!!

विचित्रा's picture

3 Nov 2016 - 3:55 pm | विचित्रा

आन्जी छानच...

खूप दिवसांनी आली आन्जी मस्त गोष्ट घेऊन.

संजय पाटिल's picture

5 Nov 2016 - 4:00 pm | संजय पाटिल

खुपच छान! आवडले..

मित्रहो's picture

5 Nov 2016 - 11:41 pm | मित्रहो

आन्जी मस्त

शलभ's picture

7 Nov 2016 - 8:58 pm | शलभ

मस्तच.

मस्त गोष्ट! खूप आवडली :)

रेवती's picture

8 Nov 2016 - 2:30 am | रेवती

मस्त आन्जी.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 5:52 pm | शिव कन्या

छोट्यांच्या नजरेतून कथानक लिहिणे अति नाजूक, अवघड काम!
फार सुंदरपणे शब्द बद्ध केलंय.
आवडली कथा.

पुंबा's picture

21 Mar 2017 - 5:42 pm | पुंबा

लई भारी..