कांगारू आयलंड.
निसर्गाला पडलेले एक नितांतसुंदर स्वप्न म्हणजे कांगारू आयलंड. मानवानेही ते तितक्याच आत्मीयतेने जपले आहे. हे ऑस्ट्रेलियातील तिसर्या क्रमांकाचे बेट असून ते अॅडलेडहून नैऋत्येला ११२ कि.मी. अंतरावर आहे. गेल्या भटकंती अंकात 'होम स्टे' या लेखात उल्लेख झालेले हेच ते कांगारू आयलंड नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करून वसवण्यात आलेले आहे. इथे वेगवेगळ्या जातीचे पक्षी, जंगलात मोकळे फिरणारे कोआला, सील, ऑस्ट्रेलियन पेलिकन आणि अर्थातच कांगारू यांचे पद्धतशीरपणे संरक्षण केले आहे. बेटाच्या वेगवेगळ्या भागातले समुद्रकिनारे आरक्षित करून प्रत्येक प्रजातीचे सरंक्षण करण्यात आले आहे. सील बे, पेलिकन बे, कांगारू बे अशीच त्यांची नावे आहेत. याशिवाय समुद्राच्या आणि पावसाच्या पाण्याने वाळूतून कोरून काढलेले रिमार्केबल रॉक्स या नैसर्गिक नवलाबद्दल तर बोलायलाच नको, ते पाहायलाच हवेत. संपूर्ण रेताड जमीन असूनसुद्धा नैसर्गिक हिरवाईने आणि गवतफुले, मुद्दामहून लावलेले गुलाब आणि इतर फूलझाडे यांनीही हे बेट नटलेले आहे. शिवाय निलगिरीची अमर्याद झाडे आहेतच.
१.
इथली मूळ वस्ती शिल्लक नाही. आता असलेली वस्ती हीसुद्धा खूपच कमी असून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून नव्याने प्रस्थापित झालेली आहे. पर्यटन, निलगिरीची शेती, तुरळक द्राक्षमळे, मधुमक्षिका केंद्र, कालवांची आणि रॉक लॉब्स्टर्सची पैदास हे इथले मुख्य व्यवसाय आहेत. एका ठिकाणी सूर्यफुलेही दिसली. हे लॉबस्टर्स (ज्याला स्थानिक भाषेत maron असे म्हणतात आणि ते असतातही मरून रंगाचेच.) आणि कच्ची कालवे यांचा आस्वाद घेणे हेही आमचे तिथे जाण्याचे एक मुख्य आकर्षण होते.
रिमार्केबल रॉक्स, सील बे, मधुमक्षिकापालन केंद्र जे निलगिरीच्या मोहोरावरील मधासाठी मुख्यत: चालवले जाते, तसेच निलगिरीचे तेल, साबण या फॅक्टरीज तिथे आहेत. निलगिरी वृक्ष नैसर्गिकरित्या पडले, की त्यांच्या लाकडापासून वस्तूही तेथे बनवल्या जातात.
या ठिकाणी दोन दिवस राहण्याचा योग गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत आला. १५ फेब्रुवारीला आम्ही तिथे गेलो.
सकाळी लवकर उठून गाडीने तासाभराचा प्रवास करून सी-लिंकच्या जेट्टीवर आलो. भन्नाट वारा होता. आधीच आरक्षण केल्यामुळे लगेच उभ्या असलेल्या भल्यामोठ्या सी-लिंक फेरीबोटीत बसलो, जिच्या पोटात कार पार्किंग होते. बसण्यासाठी जागा आरक्षित होती. तिथे सामान ठेवून सगळे डेकवर आलो. फेरी सुरू झाली नि वार्याने आण़खीनच आक्रमक रूप घेतले. त्यात उभे राहणे कठीण होऊ लागले. एकमेकांची मजा पाहत सगळ्यांनी कठडे पकडले.
एका तासाच्या प्रवासानंतर कांगारू आयलंडवर उतरलो. सुबक, ठेंगण्या इमारती, त्याच्याभोवती सुरेख बागा, त्याला लागून रस्ता, रस्त्यापासून बेटाभोवती बांधून काढलेल्या धक्क्यापर्यंत हिरवळीचा पट्टा, त्यात बसण्यासाठी ठेवलेले बाक, धक्क्यालगत अलीकडे फूलझाडे आणि धक्क्यापलीकडे समुद्रकाठावर, वाळूवर खाद्य टिपणारे पक्ष्यांचे थवे, हे होते कांगारू आयलंडचे मनोहारी प्रथमदर्शन.
२.
बारा वाजायला आलेले, सूर्य डोक्यावर पण ढगाळलेले आकाश, त्यामुळे ऊन-सावलीचा लपंडाव चाललेला आणि सुखद थंडीयुक्त हवामान. कार ताब्यात घेईपर्यंत थोडा वेळ गेला. मग आता हा भाग फिरून, जेवूनच मुक्कामी जायचे ठरवले. हा इथला शहरभाग असला, तरी दोन मजल्यांवर कुठेही बांधकाम नाही. एका बाजूने इमारती, मध्ये रस्ता, रस्त्याच्या दुभाजकावर झाडेझुडपे, फूलझाडे यांचा संगम, दुसर्या बाजूला एखादे मैदान किंवा बाग, त्यापलीकडे रस्ता, त्यापलीकडे इमारती असा सर्वसाधारण प्रत्येक चौकाचा दर्शनी चेहरा. प्रत्येक चौकात भरपूर खाद्यगृहे. हे निवडावे की ते निवडावे कळत नव्हते, इतक्या आकर्षकपणे मिळणारे पदार्थ फोटोतून मांडलेले दिसत होते.
प्रत्येक इमारतीत खाली दुकान आणि उपर मकान, किंवा पर्यटकांसाठी भाड्याने देण्याच्या खोल्या. आम्ही एक खाद्यगृह ठरवून जेवायला गेलो. आतमध्ये पाहतो तर पेपरचेही दुकान आतल्या भागात. वृत्तपत्रे आणि मासिके लावून ठेवलेली, दर्शनी काचेतून दिसावीत म्हणून एका भिंतीला मात्र संपूर्णपणे मासिके लावून ठेवलेली. दुकानमालक स्वत:च ऑर्डर घ्यायला आले. जेवण करताना आम्हाला ती जागा आवडल्याचे, आमच्या गप्पा ऐकून, त्यांनी आम्हाला त्याच्या रिटायरमेंटचा प्लान सांगितला आणि दुकान विकत घेता का? असे विचारू लागले. मीही उत्साहात, किंमत किती? वगैरे चौकशी करायला लागले, तर पूर्ण बिल्डिंगची किंमत ‘जसे आहे तसे’ या तत्त्वावर दहा लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स सांगून ते मोकळे झाले, तीही निगोशिएबल. त्या वेळी ऑस्ट्रेलियन डॉलर्सची किंमत ४३ रुपयाला एक अशी होती. विचार करते, असे सांगून आम्ही पुढचा रस्ता धरला. नेहमीप्रमाणे माझी टिंगल करायला सुरुवात केलीच होती बरोबरच्यांनी. पण मग त्यांच्याही लक्षात आले होते की सौदा काही वाईट नव्हता.
दुकानमालक सांगत होते, त्याप्रमाणे त्या बिल्डिंगला खाली-वर मिळून दहा खोल्या होत्या. एक खोली चारशे चौरस फुटांची. खालची इतर दुकाने भाड्याने देऊन मालक-मालकीण वर राहत होते. मुंबईत कुठून आली असती आख्खी बिल्डिंग तेवढ्या पैशात? मुंबईतला फ्लॅट विकून तिथली आख्खी बिल्डिंग घ्यायला हरकत नाही, असा शेरा नवर्याकडूनही आला. तुम्हाला इथली थंडी सहन झाली तर पाहू, असे सांगून मी विषय बंद केला. जगाच्या पाठीवर कुठेही जरी फुकटात घर मिळाले, तरी मुंबईत राहणारा माणूस मुंबईसाठी कसा तळमळतो, हे मी स्वानुभवावरून सांगू शकते.
तिथून निघालो, ते आमच्या राहण्याच्या ठिकाणी जाऊन घर ताब्यात घेतले. चार बेडरूम्सचे बैठे घर, मोठमोठ्या काचेच्या खिडक्यांचे, पुढे मोठी पडवी असणारे आणि बागेत झोपाळे असलेले. आजूबाजूचा निसर्ग दोन्ही हात पसरून स्वागत करत होता. घरात जाऊन रिलॅक्स होण्यासाठी सोफ्यावर बसलो. बाहेर नजर गेली. अहाहा! काय दृश्य होते. जन्माला येऊन एकदा तरी अशा जागेवर असलेल्या घरात राहायला मिळायला हवे या दृश्यासाठीच फक्त. दिवाणखान्यातून आणि या बाजूला असलेल्या बेडरूममधून हे दृश्य सतत दिसत असे. दुपारी पावसाने बदललेला नजाराही तितकाच सुंदर होता.
३.घराच्या आतून दिसणारे दृश्य.
४.बाहेरून टिपलेले उन्हातले दृश्य
५.अचानक वेष पालटलेला निसर्ग
/
सकाळी लवकर उठल्याने पुरुषमंडळी सुस्तावली. नूंग (माझी भाचेसून) आणि नमिता (माझ्या भाच्याच्या मित्राची पत्नी) दोघींना त्या वरच्या फोटोतल्या समुद्रकाठी जायचे होते. मग आम्ही त्या स्वर्गीय किनार्यावर गेलो. हवा थंड होतीच, पण दुपारी तीनच्या सुमाराला टळटळीत उन्हात समुद्राचे पाणी बर्फासारखे थंड होते. वर वाराही भन्नाट. पाऊल बुडवलेले त्या पाण्यात, तर थंडीने हुडहुडी भरायची वेळ आली. मग तिथून पुन्हा निघालो. येताना रस्ता चुकलो. पण gpsच्या साहाय्याने घरी पोहोचलो. बेटावर उभे आडवे, तिरपे कसेही फिरा, वीस-पंचवीस मिनिटांत दुसरे टोक गाठता येते. आता सगळेच फिरायला निघालो. स्थानिक रहिवाशांनी भेट द्यायला सुरुवात केली. पांढरे, राखाडी पोपट निलगिरीची फळे खायला आलेले होते; निलगिरीची पाने खाऊन मस्त झिंगून झोपलेला कोआला, गडबडीने उठला तरी डुरकाळ्या मारत पुन्हा झोपी जात होता.
६.
७.
८.
वाटेत छोटी छोटी गावे दिसत होती - गावे कसली, वस्त्याच म्हणायच्या. पण टुमदार बंगले असायचे. त्या गावांच्या नावाच्या पाट्यांवर तिथली लोकसंख्या लिहिलेली असायची, वाहनाची कमी केलेली वेगमर्यादा नोंदलेली असायची. एका ठिकाणी ९ लोकसंख्या असलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते, ते पाहून ऊर भरूनच आला. कांगारू मात्र ठायी ठायी दिसत होते. या बेटाचे नाव कांगारू आयलंड पडण्याचे कारण इथे कांगारू जास्त आहेत असे नाही, तर त्याचे एका बाजूचे भूशिर कांगारूच्या डोक्यासारखे दिसते.
पेलिकन बेवर पोहोचलो. पेलिकन बेची ओळख निरक्षर माणसालाही पटावी म्हणून की काय, त्याच्या सुरुवातीलाच एक लाकडी शिल्प आहे.
९.
इतके पेलिकन धावत आले. त्यांना आणलेल्या ब्रेडचे तुकडे ते त्यांच्या भल्यामोठ्या चोचींचा तोल सावरत, लीलया झेलत होते, फोटो काढण्यासाठी पोझ देत होते.
१०.
११.
१२.
तिथून कांगारू बेला धावती भेट देऊन परतलो. आजूबाजूला कांगारूंनी घेराव घातल्याचे दृश्य असते ते. एव्हाना कांगारूंचे आकर्षण अॅडलेडच्या जॉर्ज वाइल्ड लाइफ पार्कमुळे थोडे कमी झाले होते. साडेआठ वाजल्याने सूर्य अस्ताला जाऊ लागला होता. पुन्हा घरी येऊन फ्रीजमध्ये घरमालकालाला पूर्वसूचना दिल्याप्रमाणे त्यांनी आणून ठेवलेले चिकन व तांदूळ वापरून चिकन बिर्यानी बनवून जेवलो. होम स्टे असल्याने आम्हाला हवे असलेले मसाले वगैरे आमच्यासोबत होतेच.
दुसर्या दिवशी सकाळी मधुमक्षिका केंद्र, निलगिरी फार्म आणि सील बे इतकी ठिकाणे पाहायची होती आणि लोकल फूड खायचे होते. सकाळी लवकर निघायचे होते, त्यामुळे झोपाळ्याचा आनंद घेत घराच्या आसपास फिरत, तिथल्या मोकळ्या वातावरणाचा आणि निलगिरीच्या वासाने भरलेल्या शुद्ध हवेचा आस्वाद घेतला.
सकाळी उठून घरमालकांनी दोन दिवसांसाठी पुरेल अशा सामग्रीने भरलेल्या फ्रीजमध्ये असलेले ब्रेड, अंडी, लोणी, चीज, जॅम, फळे वापरून ज्याला जसा हवा तसा ब्रेकफस्ट घेतला. निघालो मधुमक्षिका केंद्राला भेट द्यायला. मध गोळा करून दमलेल्या एका मधमाशीने आमचे स्वागत केले क्लिफोर्डस हनी फार्ममध्ये.
१३.
दारातच बसण्यासाठी टेबलखुर्च्यांची सोय होती, अल्पाहाराची सोय केलेली होती किंवा तुम्ही बांधून आणलेली शिदोरी, कशाचाही आस्वाद तिथे बसून घ्यायला हरकत नव्हती.
मध आणि मेण यापासून बनवलेल्या असंख्य वस्तूंचे प्रदर्शन तिथे भरवले होते. तसेच क्रोशेच्या वस्तूचे प्रदर्शनही होते. मधाच्या वेगवेळ्या प्रतीच्या आणि वजनाच्या बाटल्या तिथे होत्या. मधापासून बनवलेले पदार्थ - उदा. कुकीज, पेस्ट्रीज, टॉफीज तर तिथे होतेच, त्याशिवाय मध वापरून केलेली सौंदर्यप्रसाधने आणि आंघोळीचे साबणही होते. याशिवाय एक छोटेसे कँटीन होते, त्यात मध चालून पॅनकेक, चहा, कॉफी बनवून दिले जात होते त्या बाहेरच्या खुर्च्यांवर बसून खायला. आम्ही पुन्हा थोडी मधाची चव घेतली आणि जवळच असलेल्या निलगिरी फार्मकडे कूच केले.
आपल्याकडे निलगिरीची झाडे जशी उंच उंच वाढलेली आणि लांबसडक पानांची असतात, तशी इथे नसतात, कारण प्रत्येक वेळी केली जाणारी झाडांची पद्धतशीर तोड. त्यामुळे ही झाडे फांद्या फुटून पसरट होत आणि सहज चढता येतील इतकीच वाढतात आणि यांची पाने लहान असतात. झाडेही गोंडेदार असतात. जवळजवळ तीस एकरांवर पसरलेले हे फार्म १०० वर्षांपेक्षा जास्त जुने होते. त्यात निलगिरी झाडांशी संबंधित उत्पादने असलेला एक कारखाना तिथे होता, त्यासोबतच राहायची व्यवस्था आणि छोटासा कॅफेटेरिया होता. शिवाय हजारो गुरे, डुकरे, कोंबड्या आणि बदकपालनाचे जोडधंदेही चालत असल्याने तिथल्या प्रदार्शनात त्याच्याशी संबंधित उत्पादनांचाही सहभाग होता.
आता छोट्या ट्रक-टेम्पोतून फिरता येते, पण सुरुवातीची घोडागाडी अजून जपून ठेवली आहे.
१४.
शिवाय सुरुवातीला तिथे काम कसे होते असे आणि आता कसे होते, याबद्दलचा चित्रपट एका खोलीत दाखवला जातो. एका खोलीत तिथे सापडणार्या सर्व प्राणी-पक्षी-कीटकांचे प्रदर्शन आहे. विक्रीसाठी स्मरणवस्तूंसह तिथे होणारी सर्व उत्पादने होती. त्यात मुख्यत: निलगिरी तेलाच्या बाटल्यांवर चक्क 'पॉयझन' असे छापलेले होते. आपल्याकडे मिळणार्या बाटल्यांवर असे लिहिलेले नसते. याचा अर्थ आपल्याकडे मिळणारे निलगिरी तेल हे प्रक्रिया केलेले असावे. निलगिरीपासून बनणारे तेल, त्या तेलापासून बनणारा साबण, बाम, सौंदर्यप्रसाधने यांची रेलचेल होती. तिथल्या निलगिरी उत्पादनाचे वानवळे ठेवलेले होते. थोडीशी खरेदी करून आम्ही गाडीतून एक फेरी मारली आणि निघालो. हवेतच निलगिरीचा वास इतका भरून राहिला होता की आयुष्यात सरदी-पडसे वार्यालाही उभे राहणार नसणार इथल्या लोकांच्या, याची पक्की खूणगाठ बांधता येत होती.
आता आम्ही जाणार होतो लोकल फूड खायला. कच्ची कालवे आणि तंदुरी रॉक लॉब्स्टर्स. तंदुरी हा आपला शब्द, पण तिथले या पदार्थाचे नाव 'ओव्हनबेक मॅरून'. कच्ची कालवे हेच तिथल्या आद्य मानवाचे खाद्य होते. भारतात कालवे बर्याच वेळा खाल्ली होती. भाजून, तळून, कालवे मसाला, कालवांची भाजी, कालवांची भजी, कालवांचे कालवण, कालवांचे डांगर. पण कच्ची खाण्याची वेळ पहिल्यांदाच होती. पण जिथे जायचे तिथले स्थानिक खाणे खाऊन पाहायचेच, हा नियम पाळत आल्याने खायचे म्हणून या जागी आलो होतो.
१५.
१६
आपल्याकडे लॉब्स्टरला लांब निमुळते डेंगे, त्याला काटेरी किनार असते, पण तोडले की तो झाला निरुपद्रवी. त्यात तो समुद्रातच जाळी टाकून पकडायचा. तो जिवंत असला तर फक्त शेपटीचे फटकारे देणार. या रॉक लॉब्स्टरला लांब डेंगे असतात. ते गुळगुळीत असतात, पण त्याला खेकड्यासारख्या नांग्या असतात. त्याला खेकडयासारखेच पाठीवरून हाताने पकडावे लागते किंवा चिमट्याने. नाहीतर गेलेच तुमचे बोट.
१७.
तिथे तिथल्या मालकिणीने हसतमुखाने आमचे स्वागत केले. भारतातून आलो म्हटल्यावर, तिलाही भारतात यायला आवडेल, असे म्हणाली. तिच्याकडेही आमचे रिझर्वेशन होते, ईन-मीन चार टेबले लावलेले तिचे खाद्यगृह. आगाऊ नोंदणीशिवाय गेले, तर कमीतकमी तासभर तरी थांबायला लागणारच. तिने आमची ऑर्डर घेतली. तिथे एक डझन कालवांचे बॉक्स त्याच्या आकारानुसार आणि किमतीनुसार शोकेसमध्ये ठेवले होते. ते पाहून आपल्याला कोणते हवेत ते सांगायचे.
१८.
मॅरून खायचा आहे म्हटल्यावर, ती दुकानाच्या मागच्या भागात गेली आणि एक मॅरून हातात घेऊनच आली. पोरी त्याला बघून किंचाळल्या, पोरांनाही आश्चर्य वाटले. मी मात्र पाहत हसले. लहानपणी खेकडे पकडलेले असल्याने त्याला उचलायची नॅक असते असे म्हटल्यावर, तिने त्याला टेबलवर सोडून दिले आणि मला तो उचलून पाहा, असे सांगितले. बाकीचे नको म्हणत होते, कारण चावला तर डॉक्टर शोधत फिरावे लागले असते खायचे सोडून. तर तिने गमतीने सांगितले, जो उचलेल त्याला तो ऑन द हाउस मिळेल. मी तिचे आव्हान स्वीकारले.
१९.
तिनेही खिलाडूपणे त्याचे पैसे घेतले नाहीत. पण एकाने थोडेच भागतेय? आणखी मागवावे लागतातच. आणि मॅरूनबद्दल काय बोलावे? अहाहा! काय ती चव! मी फक्त तसे मॅरून खायलासुद्धा तिथे जायला तयार आहे. कच्ची कालवेही आवडली. आता मला तितकी ताजी कालवे मिळाली तर मी कच्चीच खाऊ शकेन. फक्त लिंबू पिळून किंवा लिंबू पिळून, चिली सॉस घालूनही.
२०.
यानंतरचा कार्यक्रम होता बर्ड शो. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी - जे मांसाहारी असतात, त्यांना माणसाळवून त्यांच्या कसरती करवून घेतल्या जातात. साधारण दीड तासाचा शो. त्यात गरुड, घुबडे, गिधाडे असे निरनिराळे पक्षी पाहायला आणि हातात घ्यायला मिळतात. पाळलेल्या पक्ष्यांचे स्वतंत्र विहरणारे पक्षी त्याच्या भाईबंदांना कसे भेटतात याचेही प्रात्यक्षिक होते. त्यात एक पांढरे छोटेसे घुबड होते, त्याची प्रजाती नामशेष होत चालली आहे असे कळले. गरुडाचे एक वर्षाचे पिल्लू तेरा किलो वजनाचे होते.
२१.
२२.
२३.
२४.
यानंतर मात्र घरी येऊन त्य घरात बार्बेक्यूचा कार्यकम केला. बहुतेक सगळ्या परदेशी घरांमध्ये असते, तशी त्या घराच्या दर्शनी व्हरांड्यातच त्याची सोय होती. अगदी डायनिंग टेबलसह. कालच्याप्रमाणे रहिवासाचा आस्वाद घेऊन झोपलो. उद्या जायचे होते सील बे पाहायला. अतिशय उत्सुकता होती. सकाळी उठल्यावर कालच्याप्रमाणेच नाश्ता करून सगळी आवराआवर करून ठेवली, कारण सील बे पाहून झाल्यावर जेवण बाहेरच करून, इथे येऊन थोडा आराम करून हे कायम राहावेसे वाटणारे घर सोडायचे होते.
सरकार आणि जनता यांनी मनात आणले, तर नष्ट होत चाललेल्या प्रजातींचे संरक्षण कसे करता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सील बे. किनार्यावर ठरावीक अंतरापुढे जायला मनाई आहे, प्रवेश फीतच गाईड समाविष्ट असतो. सगळीकडे बांधलेल्या वाटेवरून चालावे लागते. वाट सोडून इकडे तिकडे जायला मनाई आहे, तसेच कशालाही हात लावायला मनाई आहे - कशालाही म्हणजे अगदी वाळूच्या कड्यांनासुद्धा. त्या ऑफिसमधून दुसर्या बाजूने बाहेर पडल्यावर लक्षात येते की आपण समुद्रसपाटीपासून साधाणपणे दोनशे-साव्वादोनशे फुटांवर आहोत.
एका बाजूने दोन्ही बाजूला कठडे असलेला, सरळसोट उतरणारा जिना, तिथे जाण्यासाठी आणि वर येण्यासाठी कड्याला लादून असलेली अर्धवर्तुळाकार वाट. त्यामुळे कितीही गर्दी झाली, तरी तिला आवर घालता येतो आणि सीलना त्याचा त्रास होत नाही. अगोदर प्रकल्पाची माहिती देतानाच गाईड महाशयांनी निक्षून सांगितले होते की "ही जागा सीलची आहे, त्यांना तुम्हाला भेटायचे नाही, तुम्ही त्यांना भेटायला आला आहात, तेव्हा जे नियम आहेत ते तुम्हालाच पाळावे लागतील."
२५.
२६.
२७.
२८.
पण त्या सीलना बघितले म्हणजे सगळे विसरायला होते. हजारो सील अवघ्या समुद्रकिनार्यावर बागडत आहेत, तिथे माणसांची निशाणी नाही. आपल्याबरोबरची मंडळी फक्त जगात शिल्लक आहेत, बाकी सगळे सील आणि सीलच दिसत असतात त्यांच्या राज्यात सुखेनैव राहणारे. फक्त त्यांच्या जोडीला सी गल्स असतात. सीलना पाहणे हासुद्धा एक आनंदच असतो. कधीकधी ते इतके जवळ दिसतात की आपण चाललेल्या लाकडी वाटेखालून बाहेर येतात, मस्ती करत असतात. फोटोला जणू पोझ द्यायला उभे राहतात. झोपलेलेसुद्धा असतात, अगदी निर्धोकपणे, कारण त्यांचेच राज्य आहे हे.
२९.
३०.
३१.
तिथली गाईड म्हणाली की "सीलच काय, पण कुठलाही प्राणी वाचवणे फार सोपे आहे. जिथे प्राणी राहतात तिथे मनुष्यप्राण्यालाच बंदी करायची. बाकी त्यांना खायला-प्यायलासुद्धा घालावे लागत नाही. सगळी जीवसाखळी नैसर्गिकरित्या वाचेल." किती खरे होते तिचे बोलणे! स्वत: हवे तसे बागडणारे, खेळणारे, सील पाहून खूप मजा आली. निसर्ग किती भरभरून देतो आपल्याला. सांभाळायची लायकी पाहिजे मात्र.
त्या ऑफिसच्या दुसर्या दाराने आपण आत शिरतो. तिथे स्मरणवस्तू, त्या आयलंडवर आणखी काय पाहता येईल याची माहिती दिली जाते, माहितीपत्रके दिली जातात. निरोप घेताना "या प्रकल्पाला मदत द्यायची असेल तर देऊ शकता" असे सांगून एका कोपर्यात ठेवलेल्या पिगी बँकेकडे लक्ष वेधले जाते. म्हणायला पिगी बँक, पण आहे एका रानडुकराएवढी. पण अत्युत्कट आनंदाने भरलेल्या हा विचार मनात येईतो हात खिशात गेलेले असतात.
तिथून पुन्हा स्थानिक फूड खायला गेल्यावर त्या मालकिणीने मला भारतीय पद्धतीने कालवे आणि लॉब्स्टर कसे करतात याची कृती विचारली. मीही तिला उत्साहाने अस्सल भंडारी, मालवणी, मलबारी अशा दोनचार पद्धती सांगितल्या. पण आज मात्र तुझीच पद्धत खाऊ घाल असे सांगितले. ती वापरत असलेले मसाले, वाईन, लोणची याचीही विक्री तिथे होत होती. आजही मस्त जेवण घेऊन आम्ही निघालो. सकाळी सीलच्या नादात भरपूर पायपीट झाली होती. दुपारीच पुन्हा रिमार्केबल रॉक हे निसर्गनवल पाहायला जायचा कार्यक्रम होता, तिथेही भरपूर चालणे आवश्यक होते. त्यातच येताना विमान प्रवासात पाय सुजून डाव्या पायाच्या अंगठ्याचे नख निळसर होऊन आता काळेपणाकडे झुकून ठणकू लागले होते. त्यामुळे दुपारी थोडा आराम करणे गरजेचे होते. घरी आल्यावर नुसते पाय पसरून समोर दिसणार्या अपूर्व दृश्याचा फोटो मनामेंदूवर कोरून घेतला आहे. निघताना तिथेच मागच्या बाजूला राहणारे घरमालक आले, त्यांना किल्ल्या देऊन, थोड्या गप्पा करून निघालो.
पाय जबरदस्त ठणकत होता. पण गाडीतून उतरून त्या, दोन्ही बाजूने तिवराची झाडं असलेल्या लाकडी वाटेवर पाय ठेवून एक वळण घेतले मात्र, समोर जे दृष्टीला पडले, ते पाहून डोळे तिथेच खिळले. पाय दुखणे विसरून चालायला लागले ते तिथे जाऊनच थांबले. हात मात्र मध्येमध्ये फोटो काढण्याचे काम करत होते. अ पू र्व आणि अ मू र्त ! असेच त्याचे वर्णन करावे लागेल. निळेभोर आकाश आणि निळागर्द समुद्र यांच्या पार्श्वभूमीवर निसर्गाने साकारलेले अप्रतिम शिल्प उभे आहे... पण अमूर्त तरी कसे म्हणायचे? पाहाल ते आकार त्यातून दिसत होते. इतकेच नव्हे, तर वाट जसजशी वळत होती, तसतसे त्याचे आकार बदलत होते.
३२.
३३.
३४.
वळणावळणाच्या वाटेने साधारण किलोमीटरभर अंतर होते. मानवनिर्मित लेणी आपण खूप वेळा पाहतो, पण निसर्गाने स्वत:च केलेले हे कोरीवकाम पाहून थक्क व्हायला होते. वाळूच्या खडकावर हवामान, पाऊस आणि समुद्राकाठचे आर्द्र हवामान यांच्यामुळे झालेल्या झिजेचा परिणाम होऊन निरनिराळे वैविध्यपूर्ण आकार निर्माण झाले आहेत. उन्हाने रापून कुठे कुठे तांबूसपण आलेल्या, भल्यामोठ्या अर्धवर्तुळाकार खडकावर कधी एखादा हत्ती, तर कधी आयाळ विस्फारून उभा असलेला जंगलचा राजा, डोके पायात घालून झोपलेला एखादा प्राणी, तर कधी रेखीव नाक-डोळे असलेला पण दाताचे बोळके झालेला मानवी चेहरा, तर कधी एखादी विरहिणी समुद्राकडे पाहात आपल्या प्रियकराची वाट पाहतेय, कधी पाऊस आल्यावर आभाळाकडे पाहून डरांव डरांव करणारा बेडूक..... कल्पनाशक्तीला उधाण आले होते नुसते. थोड्या अंतरावरच्या एका आकृतीकडे पाहून त्याला विंचू म्हणावे की रॉक लॉब्स्टर म्हणावे, हे जवळ गेल्याशिवाय निश्चित करता येत नव्हते. जवळ गेल्यावर ते दोन पाणगेंडे जणू एकमेकाला टक्कर देताहेत असे वाटले आणि पुढच्या बाजूला पूर्ण हिरवाई. खाडीचे छोटे छोटे प्रवाह त्या वाटेखलून जात असल्याने पाणथळ जागेतील तिवरांची, चिपीची, छोट्या उंचीची झाडे समोरच्या शिल्पाला कोणतीही बाधा येऊ न देता त्याचे सौंदर्य खुलवतच होती.
३५.
३६.
३७.
३८.
३९.
४०.
ते सौंदर्य डोळ्यांनी हावर्यासारखे पीत तिथवर पोहोचले की लगेच दुसरा नजारा वाट पाहात हजर होता. त्या शिल्पापलीकडे पसरलेला अमर्याद निळाभोर समुद्र! अजिबात लटा नाहीत. खाली वाकून पाहिले - पुन्हा हिरवाई, चुनखडी जमीन नि त्यात उभे असलेले, नवे शिल्प घडण्याच्या तयारीत असलेले खडक.. जणू आवळेजावळे भाऊच एकमेकाच्या मिठीत उभे आहेत किंवा एखादा देवमासा किनार्यावर येऊन पडलाय.
४१.
पुढे वाळूचा किनारा थोडासा दिसत असतो, पण तिथे उतरू शकत नाही. पुढे उतरण्यासाठी वाट नाही अजून. उंच मोठ्या उभ्या कड्यावरच आपण असतो. शब्दश: अनाघ्रात समुद्रकिनारा. मानवी स्पर्श न झालेला आणि म्हणूनच आपले सौंदर्य अबाधित राखलेला!
(या लेखातील काही छायाचित्रे वर्धन मोरे आणि अरुल रेड्डी यांच्या सौजन्याने.)
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 10:39 am | इशा१२३
सुंदर लेख !फोटो भरपुर दिल्यामुळे मजा आली वाचताना.प्रत्यक्ष फिरल्यासारखे वाटले.
29 Oct 2016 - 12:44 pm | कविता१९७८
मस्त लेख, फोटो सुंदरच
29 Oct 2016 - 1:32 pm | पद्मावति
आहा!! मस्त लेख आणि फोटो.
29 Oct 2016 - 3:40 pm | यशोधरा
छान लिहिलेय!
29 Oct 2016 - 9:49 pm | टवाळ कार्टा
अप्रतिम
2 Nov 2016 - 5:04 pm | पैसा
खूप छान लिहिलंय. फोटोही आवडले!
2 Nov 2016 - 10:09 pm | अजया
अप्रतिम!
2 Nov 2016 - 10:21 pm | सर्वसाक्षी
चित्रे आणि लेखन दोन्ही
4 Nov 2016 - 4:53 pm | पूर्वाविवेक
खूप छान वर्णन आणि फोटो तर एकदम भारी. फोटोंमुळे प्रत्यक्ष फिरून आल्याचा फील आला.
4 Nov 2016 - 5:30 pm | स्वाती दिनेश
मस्त वर्णन आणि फोटो!
स्वाती
4 Nov 2016 - 5:32 pm | पाटीलभाऊ
छान फोटो आणि वर्णन.
पण कांगारू दिसत नाहीयेत.
5 Nov 2016 - 3:32 pm | सस्नेह
फोटो छान. वर्णनही आवडले.
5 Nov 2016 - 3:47 pm | कंजूस
फोटो आणि लेख छानच!
5 Nov 2016 - 3:54 pm | यशोधरा
एक कांगारु घेऊन यायचेस! =))
11 Nov 2016 - 2:12 pm | मित्रहो
सुंदर फोटो
11 Nov 2016 - 2:49 pm | प्रीत-मोहर
सुरेख!!!
11 Nov 2016 - 8:28 pm | पलाश
मस्त माहिती व छान छायाचित्रांंनी सजलेला हा लेख फार आवडला.
12 Nov 2016 - 12:39 pm | नाखु
आणि सचित्र वर्णन , मुवींनी इथे शेती घ्यायला पाहिजे होती.
16 Nov 2016 - 10:54 am | मुक्त विहारि
पण ह्या लेखाला "वाखूसा" का नाही?
16 Nov 2016 - 11:16 am | पियुशा
मस्त सचित्र वर्णन , तुझ्या बरोबर फिरुन आल्यासारखे वाटले :)