Nature's Thoughtful Trail

अश्विनी वैद्य's picture
अश्विनी वैद्य in लेखमाला
29 Oct 2016 - 12:38 am

Nature's Thoughtful Trail

असंच एका पहाटे - अर्थातच सुट्टीच्या दिवशी, पाठीवर छोटी बॅग (पोटापाण्याची सोय) अडकवून आणि आवडत्या गाण्यांची playlist load केलेला फोन बरोबर घेऊन अगदी एकटीने पायी बाहेर पडले. ठरवलं असं काहीच नव्हतं. म्हणायला तरी, रस्ता नेईल तिकडे पाय वळवणार होते… पण पायाखालची माती अगदीच अनोळखी नव्हती, त्यामुळे नेहमीच्या रस्त्याने गावाबाहेर पडले. बाहेर पडताना आजवर चिकटलेले किंवा चिकटवून घेतलेले सगळे मुखवटे, सगळ्या जबाबदार्‍या, सगळी लेबलं तात्पुरती तरी काढून ठेवून, निदान तसा प्रयत्न करून घराबाहेर पडणार होते. एका मोडमधून दुसर्‍या मोडमध्ये स्वतःला असं पटकन स्विच करणं तितकंसं नाही जमत, पण तरी हे सारं अडकलेपण थोडंस उसवून, गुंता थोडा सैल करायचा होता.

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे... थांब ना
हूल की चाहूल तू इतके कळू दे... थांब ना
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे... थांब ना
तोल माझा सावरू दे... थांब ना

सुदैवाने आमच्या गावाच्या जवळच एक भरपूर उंच, मोठमोठी, दाट झाडी असलेला जंगलवजा विस्तीर्ण भाग आहे. मी चालत असलेली वाट तिकडे वळली. साधारण अर्ध्या तासात चालत मी तिथे पोहोचले. पहाटेला प्रसन्न करण्याचं कोणतं सामर्थ्य या निसर्गात असतं ना, कोण जाणे, मग ते अगदी घनदाट जंगल असो, एखादं लहानसं खेडं असो, गजबजलेलं मोठ्ठं शहर असो किंवा अगदी माळरान असो… पहाट जन्मते तीच मुळी प्रसन्नतेची आणि प्रफुल्लतेची आभूषणं लेवून आणि तेच सौंदर्य नुसतं डोळ्यांनी टिपण्यासाठी नाही, तर अगदी कणाकणाने अनुभवण्यासाठीच आज ही पहाटेची वेळ गाठायची होती.

नुकतच उजाडू लागलं. उंच झाडांच्या दाट पडद्याआडून कोवळी सूर्यकिरणं जणू लाजत खाली जमिनीकडे हळूच डोकावत होती. त्यातल्या काही खालपर्यंत पोहोचलेल्या सोनेरी रेषा जमिनीवर वाढलेल्या खुरट्या गवतावर जमलेल्या दवाबिंदूंना मोत्याचं रूप देत होत्या, मध्येच पसरलेले जांभळट, गुलाबीसर fuschiaचे बहरलेले गुच्छ डोळ्यांना तृप्त करत होते. मधूनमधून येणारं वेगवेगळ्या पट्टीतलं पक्ष्यांचं गूज कानांना सुखावत होतं. पायवाटेवर पडलेल्या पानांचा सडा ती पायवाट आहे हे कळण्याइतपतच विरळ होता. त्या क्षणी तिथे अगदी भरभरून पसरलेली ती प्रसन्न शांतता खूप हवीशी वाटत होती. खूप छान वाटत होतं… कधीकधी हे असं वाटणं व्यक्त करण्यासाठी शब्द किती अपुरे असतात ना...!

निसर्गाने उभारलेल्या त्या शोभिवंत मांडवातून पुढे पुढे तशीच चालत राहिले. थोड्या अंतरावर एक छोटा तलाव पसरलेला दिसला. त्याच्या काठावर कोवळी उन्हं अंगावर घेत चार-सहा बदकं आणि साधारण आठ-दहा canadian geese आरामात बसले होते, तर काही जणू शुचिर्भूत होण्यासाठी तलावात पोहत होते. त्यांच्या पोहण्याने पाण्यावर हलकेच उमटलेले तरंग काठावर येऊन विरत होते. तलावाच्या दुसर्‍या बाजूने दोन राजहंस माझ्यापासून जवळ असलेल्या काठाकडे येताना दिसले. त्या निळसर हिरव्या अंथरलेल्या पाण्याच्या गालिच्यावर हे देखणे, शुभ्र हंस अगदी राजाच्या डौलात येत होते.

आतमध्ये येताना या भागाचा नकाशा आणि इथे दिसणारे पक्षी, प्राणी यांची विस्तृत माहिती दिली होती. त्यामुळे एखादं गोजिरं हरीण या तलावाकडं येताना दिसावं असं खूप वाटत होतं. पण अजून तरी दिसलं नव्हतं. बाकी विशेष काही प्राणी असण्याची शक्यताच नव्हती. पण पानांचा आडोसा घेतलेले पक्षी मात्र बरेच असावेत असा अंदाज बांधायला काहीच हरकत नव्हती, इतकी त्यांची गोड गाणी कानांवर पडत होती. बराच वेळ चालल्यामुळे पायांना जरा विसावा देत बाजूच्या गवतावर मग मीही खाली टेकले. कुठे कसली गडबड नाही, गोंधळ नाही, कोणाची कशासाठी घाई नाही. सगळं कसं शांत, सुंदर. हे सारं डोळ्यांकरवी आतपर्यंत किती आणि कसं साठवावं, किती भरून घ्यावं की नुसतंच त्यात सामावून जावं, कळेना. बराच वेळ बसले, ती शांतता आत कुठेतरी रुजत होती.

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला

एक इटुकली खार अगदी पायाजवळून गेली, तेव्हा तंद्री भंग पावली… कधीकधी काहीच न बोलताही आपण स्वतःशीच खूप बोलत असतो. माझं ते बोलणं तोडत ती खार पायाजवळून सरसर झाडावर चढली. मग मीही उठले, मघाशी धरलेली ती वाट पुढे कुठे जातीये हे बघण्यासाठी परत चालायला लागले. दोन्ही बाजूंना पसरलेल्या उंच झाडांमधून जाताना निसर्गापुढे असलेलं आपलं खुजेपण परत परत जाणवत होतं. कैक वर्षं कणखरपणे, मजबुतीने उभ्या असलेल्या त्या झाडांना, हलक्या, नाजूक पण त्यांवर विश्वासाने लपेटलेल्या वेलींना, बहारलेल्या फुलांना, त्या स्थितप्रज्ञ राजहंसांना एकापाठोपाठ एक शृंखलेत ओवत ती पायवाट रुंद होत होत जंगलाबाहेर पडली. पुढे एका हमरस्त्याला मिळाली. तिथून मी दोन गावांना जोडणार्‍या एका आतल्या रस्त्याला लागले.

आता उन्हं चांगली डोक्यावर यायला लागली होती. सुट्टीचा दिवस असल्याने विशेष रहदारी नव्हती. काही उत्साही लोक पळायला बाहेर पडले होते, तर काही सायकलिंग करणारे ग्रूपने दिसत होते. उन्हाची तीव्रता हवेत असलेल्या गारव्याने नाहीशी होत होती. खूप दिवसांनी मी अशी रस्त्याच्या एका बाजूने पायी चालले होते. एरवी गाडीतून जाताना लक्ष न गेलेल्या बर्‍याच गोष्टी त्यामुळे दिसत होत्या. एकसंध आकाशाला छेदणारे पाखरांचे थवे मधूनमधून उडत होते. हलक्या वार्‍याबरोबर dandelionचे तुरे फुलापासून विलग होऊन गवतावर जाऊन पडत होते. इथून पुढच्या आठवड्याभराच्या तरी उन्हाची खातरी देणारे ladybirds गवतावर मध्येच उठून दिसत होते. या दिवसात हमखास दिसणारे ब्रिटिश रॉबिन अगदी आपल्याकडच्या चिमण्यांसारखे जागोजागी उडत होते.

'निसर्गाच्या शांत सांनिध्यात जेव्हा जेव्हा जायला मिळतं, तेव्हा स्वतःच्याही जरा जवळ जाता येतं' असं आपलं मला नेहमी वाटतं. स्वतःपासून थोडं बाजूला होऊन स्वतःकडेच पाहता येतं, मग तेव्हा उगाचच खूप बाऊ केलेल्या गोष्टी अगदी क्षुल्लक भासतात, छोट्या गोष्टींमधले आनंद जाणवतात, स्वतःचं चूक-बरोबरचं पारडं अगदी सरळ धरता येतं, झालेल्या चुकांमुळे येणारा अपराधी भाव निवायला उभारी मिळते. शेवटी काय, तर घरातून निघताना उतरवून ठेवलेले सगळे मुखवटे दारात वाट बघत थांबले होते, त्यांना परत चढवावं तर लागणार होतंच, पण ते कायमस्वरूपी चिकटून आतल्या खर्‍या चेहर्‍याला कायमचं पुसून तर टाकणार नाहीत ना, एवढीच खबरदारी घ्यायची होती ही जाणीव कुठेतरी झाली. बस्स, एवढंच.

बावर्‍या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे

पुढे बराच वेळ चालल्यानंतर रस्ता ओळखीचा वाटू लागला. माझ्या गावाच्या खुणा लांबून दिसू लागल्या आणि मघापासून बॅगमध्ये ठेवलेला फोन गाणी ऐकण्यासाठी मी बाहेर काढला.

प्रतिक्रिया

छोटेखानी, साधा, सरळ लेख. खूप आवडला.

किती सुरेख वर्णन केलंय. अगदी त्या भागात फिरून आल्यासारखं वाटलं

अस्वस्थामा's picture

30 Oct 2016 - 9:53 pm | अस्वस्थामा

अरे वा, छानच लिहीलंय.. थोडे फोटो अजून छन वाटले असते खरं तर. :)

पैसा's picture

1 Nov 2016 - 7:56 pm | पैसा

किती सुरेख! लिखाण खूप आवडले.

वा! सुरेख लिहिलंय.असंच उठून चालु पडावं वाटलं वाचून!

नूतन सावंत's picture

4 Nov 2016 - 11:03 pm | नूतन सावंत

अश्विनी,अतिशय मनोहारी चित्रण केलंयस निसर्गाचं.असेच उठून फिरायला निघावं आणि असा निसर्ग भेटवा,यापरते सुख नाही.

मित्रहो's picture

8 Nov 2016 - 8:12 pm | मित्रहो

तितकच शांत लिखाण

पद्मावति's picture

8 Nov 2016 - 10:01 pm | पद्मावति

खुप सुरेख.

आनंदयात्री's picture

8 Nov 2016 - 11:36 pm | आनंदयात्री

ललितलेखन अतिशय आवडले. मध्ये पेरलेल्या ओळींनी तुमचे भावविश्व् जिवंत झाले आहे.