अत्तर

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in लेखमाला
29 Oct 2016 - 12:18 am

दूरवरून शहरात माणसांचे लोंढे ने-आण करणार्‍या रेललाइनी. त्यावरून लोंबकणार्‍या विजेच्या तारा. कर्कश किंचाळ्या मारीत माणसे कोंबलेले टिनपाटाचे डब्बे ओढीत नेणारी लोखंडी धुडे. एक गाडी गेली की दुसरी केकाटत येईपर्यंत किती वेळ जाणार हे ठरलेले. गाडी जाणार असली की रेललाइनला लागून असलेल्या झोपड्यातली मुले रेललाइनच्या बाजूंनी टेहाळणी करीत फिरायची. अर्धी खाऊन प्लास्टिकच्या पिशव्यात फ़ेकलेली फळे, कागदात गुंडाळलेली पोळीभाजी, काहीबाही मिळत राहायचे. चुकूनमाकून एखादेवेळीस कोणाचे पडलेले पाकीट किंवा पिशवी वगैरे मिळालीच, तर मुलांमध्ये त्यासाठी दणकून फाईट व्हायची. जम्नी कामावर गेली की तिची मुलेपण रेललाइन धुंडाळीत फिरत असत.

रुळावरून शहरापासून दूर चालत गेले की रस्त्याच्या बाजूला काटेरी झाडीझुडपांची दाटी दिसायची. एका बाजूच्या मोकळ्या जागेत शहराचा विस्तीर्ण उकिरडा होता. दिवसभर मोठाले ट्रक भरभरून शहरातला कचरा तिथे मोकळा करायचे. रुळाला लागून असणार्‍या झोपड्यांमधल्या जम्नीसारख्या अनेक बायांचे ते रोजगारीचे ठिकाण होते. ट्रकबरोबर येणार्‍यास मुकादमाची मर्जी असेल तर ट्रकने ओतलेले कचर्‍याचे ढीग सरसे करायचे काम त्यांना मिळायचे. ते काम मिळवण्यासाठी सगळ्या बायांमध्ये तणातणी चालायची. आलेला कचरा फावड्यांनी सारवतानाच त्यांचे तयार डोळे चांगल्या वस्तू बरोब्बर टिपायचे. मग बरोबर घेतलेल्या गोणपाटात ती चीज कोंबून लगेच दुसरी शोधीत राहायचे. कधीकधी चांगल्या वस्तूदेखील मिळून जायच्या. रेडिओ, पर्सेस, पट्टे, टिनाचे डब्बे, जुने कपडे, सूटकेसेस. स्टेशनाबाहेर टपर्‍यांमध्ये जुने मार्केट लागत असे. तिथले दुकानदार अशा गोळा केलेल्या चिजांचे चारदोन पैसे देत. पण अशा जरा बरे पैसेवाल्या वस्तू मिळण्याची चैन कधीमधीच असायची. बहुतेक वेळी शहराची सगळी घाण सावडून रद्दी कागद, लोखंड, बाटल्या, डब्बे असे काही ना काही तरी पोत्यात भरले जायचेच.

झोपडीचे फळकूट ओढून घेऊन जम्नी तरातरा कामाला निघाली.
नवरा टेर होऊन आतमदी पडलाय. कालबी नवर्‍याच्या तमाशामुळे झोपायला नेहमीपरमानच उशीर झाला होता. अंग नी अंग ठणकतंय. गरम पान्यानी अंगूळ कराविशी वाटत होती. पन अंगूळ करून पुन्हा उकिरडे धुंडायलाच जायचं ना! तिथं होतीच की रोजची धुळीची अंगूळ!
चार झोपड्यांपलीकडे तिथल्या दादाने म्युनिसिपालटीच्या जमिनीखालील मोठ्या पाइपाला जोडून नळ घेऊन दिलेला. चोवीस तास धोधो फ़ुकटाचे पाणी असायचे. झोपड्यांतली वीजही अशीच फुकट आकडे टाकून घेतलेली. उकिरड्यावरून माल जमवला की बाया नळाखाली अंग विसळून मग झोपडीची वाट धरायच्या. पोरांसाठी चार शितं शिजवली जायची. पोरं बाहेर उधळली की दुपारच्याला जरा पाठीला विसावा मिळणार होता. रात्री पुन्हा घुसळून काढणार येडझवा!

झोपडपट्टी मागे टाकून जम्नी बरीच दूर आली होती. जम्नीला आपले आधीचे दिवस आठवत होते.
घरखर्च चालवायला आपल्यालाच कमाई करावी लागनार हे पल्ले पडल्यावर आपून मिळेल ते काम केलं. नवर्‍यासोबत बांधकामावर जाऊन मोलमजुरी केली. आजूबाजूच्या घरांमध्ये झाडूपोछा, भांडी घासण्याची कामे केली. यातल्या येकातबी आपला जीव लागला नाई. ओझी वाहून, भांडी घासून हातपाय दुकायचे. लोकांची खिटपिट आयकून घ्यावी लागायची. मंग येकदा यलमीने ही कचरापट्टी दाखवली. आधी किळस आली. पन मंग कचर्‍यात येकेक वस्तू शोधून पोते भरून इकायची आदत जाली. सवताचा बिजीनेस असल्यासारखे वाटायचे. नाकाला कचरापट्टीतल्या कुबट वासाचा तरासबी होनं थांबलं.

रूळ अजूनही काळोखात बुडाले होते. जम्नीसारख्या दोनचार बायाही झपाझपा उकिरड्याकडे निघाल्या होत्या. माणसांच्या वावराने झोप मोडलेले एखादे कुत्रे अंग लांबवून आळस देत होते. जम्नीने चालताना रिकाम्या गोणपाटाचे टोक ओच्यात खोवून दोन्ही हात लांबवले आन् कडकडून आळस दिला. वाशेळ्या तोंडातली रात्रीची मचूळ चव रुळावर पचकन थुंकून टाकली. मुडदा मोप दारू ढोसून येतो. तशाच गढूळ तोंडाने आपले तोंड दाबून धरतो. आपला आवाजबी भायेर फुटत नाई. ह्याला सवताचे शरीर सांबाळायला सुदरत नाई. पन निजताना बायको घोसळल्याबिगर चैन नाही सुतड्याला. आपल्याला तर कवा येकदा पटकूर टाकून निजतो असं जालं असत्ये. पन त्याचा हक्काचा घास घेतल्याबिगर तो सोडनार नसतो.

नेहमीचे ठिकाण येताच जम्नीने कचरापट्टीच्या त्यातल्या त्यात साफ वाटणार्‍या एका ढिगार्‍यावर गोणपाट पसरवून बसकण मारली. नुकत्याच येणार्‍या ट्रकचा धुरळा तिच्या नाकात भसकन गेला. ओळखीच्या कुजकट भपकार्‍यात तिला गुदमरवून ट्रक पुढे गेला. ट्रकच्या मागे पळण्याचे त्राण जम्नीत नव्हते. तिने ओच्यातली चंची काढली. तळहातावर तंबाखूचा चुरा मळला. त्याला एक चुन्याची चिमटी लावून फक्की मारली. तंबाखूच्या कडक स्वादाने कोरड्या तोंडाला लाळेची भिजवण मिळाली. रात्रीपासून मळमळ आणणारी मचूळ चव कुठल्या कुठे पळाली. मग जम्नी जरा खुलली. आज पोत्यात काय न्यायला मिळेल ह्याचा विचार करू लागली.

एका ढिगार्‍यावरून दुसरीकडे जमवाजमव करता करता जम्नीचे पोते बर्‍यापैकी भरले. आजचा दिवस बरा होता. एकही चांगली चीज जरी मिळाली नाही, तरी बाटल्या, डब्बे, किडूक मिडूक होतेच. बर्‍यापैकी पैसे आले असते. ट्रकने ओतलेला कचरा लेव्हल करायला अजून कोणाची 'कमपीठेशन' नव्हती. त्यामुळे जास्त मचमचबी कराय लागली नाई. तिथे होत्या त्या सगळ्यांनाच काम मिळाले. त्याचेही पैसे कडोसरीस होतेच.
“ए यलमी, चाल ना वं, चा पिऊ.” तिने शेजारी टेकलेल्या यल्लमाला विचारले. डोक्यावरल्या केसांचा गुंता खाजवीत यलमी म्हणली “का गं? लई पइसा जाला जनू?” ”नाय बा! लई कुटून? पन चल ना, रुळावर बघू काई मिळते का थे.”

p1

मग त्या दोघी आपापली बोचकी पाठीवर टाकून रमतगमत रुळाच्या दिशेने भटकल्या. मघा येताना काळोखात दिसले नसेल. रुळाच्या बाजूने कागद, प्लास्टिक, बोळे काय काय सडा घातलेला होता. चालता चालता सवयीने त्या दोघी पडलेल्या वस्तू पायाने ढोसून काही घेण्याजोगे आहे का ते चाचपून जात होत्या. जम्नीचे कधीतरी लाल असलेले पातळ, धुळीचे लेप बसून करडे झाले होते. अंगातले विटके पोलके ठिकठिकाणी उसवले होते. कचरापट्टीतल्या भपकार्‍याचा एक ढग तिच्या नकळत सोबतीला होता. बाहेरगावाहून येणारा रस्ता रुळांना ओलांडून जात होता, तिथे कोपर्‍यात चहाची गाडी उभी होती. “चा देयजो.” दोघींचे अवतार पाहून चहावाल्याने बोटानी फ़क्त पैसे गाडीवर ठेवा असे खुणावले. कनवटीचे रुपये काढून दोघींनी त्याच्या गाडीवर टाकले. त्याने करवडलेले चिकट ग्लास न धुताच कळकट किटलीतून त्यात चहा ओतला. ते गरम गरम पाणी तरतरी आणत जम्नीच्या घशात उतरले. साखरेने जरा उभारी आली.
“गोदी दिसत नाय गं आजकाल?” तिने यलमीपाशी चवकशी केली.
“ती संडास धुवायला जात असते. झकपक डरेस घालून!” यलम्मा फिदिफिदि हसली.
“म्हनजे?”
“मौलमंदी कामाला जाते.”
“कुट्ला मौल?”
“कुटलाबी, रोज जिथं कंपनी नेऊन सोडील तिथं.”
“आता हिला संडास साफ करायची काय अवदसा आटवली?” धुळीने लडबडलेला चेहरा पदराच्या वासाळ्या शेवाने पुसत जम्नी म्हणाली.
“काय जानं! पयसे मोप भेटत्यात म्हणत होती. उकिरडे धुंडत अंग बरबटून घेण्यापातूर ह्ये चांगले म्हनाली.”
“श्या! कंपनी सांगील तिथं जाऊन लोकाइंची हागीणखाडी साफ करायची? आपलं बरं हाय. आपला सवताचा धंदा हाय. हिथनं चिजा जमवायच्या आन इकायच्या! कोनाची ताबेदारी नाय!” जम्नीने मानेला हिसका दिला. “पन थे झकपक डरेस घालून जाते काय म्हनत होतीस?”
“कंपनी युनिफारम हाय. मौलमंदी काय आपल्यासारके फाटके लक्तरं घालून जानार काय?”
“हुं! मला युनिफारम दे म्हनावं की आनिक काय दे! म्या कदीच संडास साफ़ करायला जानार नाय!” जम्नी तटकन उठली. पोते पाठीवर टाकून ती ठेशनाच्या दिशेने निघाली.

जुन्या मालाच्या टपरीवर नेहमीसारखीच घासाघीस करून जम्नीने मनाप्रमाणे पैसे कनवटीस घातले. एका गाडीवर चहाबरोबर चार भजी खाऊन दुपारचे जेवण केले. पोत्यावर भाजी मांडून बसलेल्या पोर्‍यांकडून कालचा शिळा भाजीपाला थोड्या पैशात मिळवला. एका पोत्यावरच्या ढिगार्‍यातून दोन मापं तांदूळ पदरात बांधले. रातच्याची सोय झाली होती. स्टेशनाभोवतालची गर्दी अंगावर घेत, वाहनांची गजबज आणि गायी-कुत्र्यांना चुकवीत ती झोपडीच्या दिशेने निघाली. तितक्यात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका व्हॅनभोवती तिला निळा युनिफॉर्म घातलेल्या बाया उभ्या दिसल्या. जरा रोखून पाहिले तर गोदी निळी गोल साडी आणि पांढरे झंपर घालून उभी होती. तिने केसांचा घट्ट अंबाडा बांधला होता. चेहरा एकदम साफसुथरा होता. तिची ऐट पाहताच प्रथमच जम्नीला स्वत:च्या कळकट अवताराची लाज वाटली. ही गोदी कालपरवापातूर आपल्या बरोबर उकिरड्यावरच्या घाणीत फ़िरून वस्तू शोधायची. केसांच्या लटा आपल्यासारख्याच धुळीनी माखलेल्या. चेहरा, हात पाय सगळीकडे घामाने धूळ चिकटलेली असायची. आज शान बगून घ्यावी सटवीची. संडास साफ करायला इतकं मडमेवानी सजून जावं लागतं?जम्नीने गोदीला बघून हात हलविला. गोदीचे तिच्याकडे लक्ष गेले, तसे तिने जम्नीला एका बाजूला बोलावले.
“अगं ह्ये काय गोदे! तू तर शहरातल्या मेडमवानीच दिसतेय.”
“थे मौलमंदी साफसफाई करायला जावं लागतं ना. युनिफारम घालून जरा नीटसं रहाव लागतं!” गोदी म्हनाली. “तुजं कसं, बरं हाय ना?”
“बरं हाय की! आपूनच आपले मालीक! पन काय गं? मौलमंदी संडास साफ़ कराया जातेस असं सांगत होती यलमी?”
“तर काय! तू कधी मौलमदले पायखाने पाहिलेत? ह्ये चकचकीत असत्ये! येकदम फाईव सटार!”
“पण शेवटी लोकाइंची हागीणखाडीच धुवायची ना!” जम्नीला वाटणारी किळस तिच्या डोळ्यांत आली.
“अग असं काय नसतं. सगळं साफच असतं. आपन फकस्त अवशीद मारून पाण्याच्या फ़वार्‍यानं धुवायचं. मग चकाचक पुसायचं. घाणबीण तर कदी दिसतपन नाय.”
“तरी संडासच ना त्ये?”
“मग काय? उकिरड्यावर शहराची घाण हातानी सावडून वस्तू वेचण्यापातूर ह्ये मोप बेस. कधी हात पाय घाण होत नाही. धूळ नाई, सडक्यात हात घालने नाई. छान कापडं भेटत्यात. पयसाबी चांगला भेटतो. म्या तर म्हनती तू येऊन पाह्य येकदा. मंजीच तुला समजेल म्या काय म्हनती थे.”
गोदीचा टवटवीत साफ़ चेहरा, तिने लावलेल्या पावडरचा मंद सुवास, नीटनेटकी साडी, स्वच्छ अंबाडा. कचर्‍याचा ढिगारा उकरताना अचानक एखादा पुतळा भेटल्यासारखे झाले. अंगातल्या घामट कचकचाटाची तिला लाज वाटली. आज इकडे येण्याआधी अंघोळ करायचे राहून गेले ह्याची जाणीव झाली.
“मलाबी काम मिळेल?”
“तू येना माझ्याबरूबर सकाली. मेन मारकीटमधे हापीस आहे. नेमीच्या बायांपैकी कोनी आले नाही तर रोजाने घेतात कदीकदी.”
“पन मंग युनिफारमबी भेट्येल?”
“त्यावानी तर मौलमंदी घेऊनच जानार नाहीत. तू कवा येतेस? उद्याला येतीस?”
“हो. येइल की. पन काम नक्की भेटेल ना?”
“आता... थे तथंच जाऊन कळेल. पन जरा साफ सुतरी येजो. उद्या सकाली म्या तुज्या घरावरून तुला घेऊनच जातो.”
“बरंय. येजो मंग.”

पावडरचा मंद सुवास मनामध्ये धरून यम्नी निघाली. झोपडीजवळच्या चौकात जाऊन तिथल्या नळावर तिने हातातोंडावर पाणी यथेच्छ चोळून घेतले. चेहर्‍यावरच्या, हातापायावरच्या मळाच्या पापड्या खापरीने चोळून चोळून काढल्या. पदराने अंग झाकून घेत अंगातले घामट पोलके पिळून हवेवर वाळवले. मग आपले गोणपाट सावरून ती झोपडीत पोहोचली. पोरे भुकेने कासावीस होऊन दाराशी ताटकळत होती. तिने चार घास शिजवले. नवर्‍यासाठी थोडे गाडग्यात झाकून ठेवले. तिघांनी बाकीचे अन्न संपविले. लोटाभर पाणी पिऊन तिने भुईवर अंग टेकले. उद्या नवीन काम मिळेल का नाई कोन जानं. सायंकाळी नवर्‍याला सगळं सांगायला ती आतूर झाली. पन जनम जला सुद्दी्त घरी यायला हवा ना!

रात्री झोकून घरी परत आल्यावर होणार्‍या ससेहोलपटीखेरीज जम्नीची नवर्‍याविषयी तशी दुसरी काही तक्रार नव्हती. झोपडपट्टीतल्या जिण्यात तिच्यासारखीला नवर्‍याचा भक्कम आधार होता. बांधकामाच्या जागी मजुरी करून काहीना काही कमावून आणायचा. त्यातून त्याचा स्वत:चा विडीकाडी, दवादारू खर्च भागवायचा. जम्नीच्या पैशावर त्यानी कधी डल्ला मारला नव्हता. तिने स्वत:ची व पोरांची काळजी घ्यावी, आणि त्याच्याशी वाद घालू नाही एवढीच त्याची अपेक्षा असायची. रात्री घरात आल्यावर बिस्तर गरम करायला तिने हजर असायलाच हवे ही मुख्य अपेक्षा. जे काय घडायचे त्यात जम्नीच्या इच्छेचा काहीच संबंध नसायचा. लग्न होऊन नवी नवरी झोपडीत आली, तेव्हा जम्नीच्या मनात मोरपिसे हळुवार गुदगुल्या करीत होती. गावाकडे असताना मैत्रिणींबरोबर ऐकलेले, चिडवलेले सारे आता प्रत्यक्षात येणार ते कसे असेल? रात्री मिलनासाठी ती आतुर असायची. पण नवर्‍याचा रासवटपणा तिला लवकरच कळून आला. तशातही कधी कधी सुखांचे दोन चार अनोखे थेंब तिच्या मनातल्या मोरपिसांवर हुळहुळी शिंपडण करायचेच. अतृप्तीच्या हुळहुळीसाठी का होईना, पहिली काही वर्षे ती जगत होती. पुढे दोन बाळंतपणे झाली. चार लाथा खाल्ल्यावर, नवरा आपल्यासाठी काहीच कमावणार नाही ह्याचे आकलन झाले. कचरापट्टीतल्या घाणीमध्ये ते सुखाचे थेंब कुठे नाहीसे झाले ते कळलेच नाही. रोज रात्रीचा संबंध केवळ एक यातनामय भोग होता. नवरा म्हणविणार्‍या इसमाची गरज भागविणे हेदेखील कचरा उकरण्यासारखेच एक काम झाले.

आपल्यालाबी काय दुसरा मार्ग होता? रातच्याला येकदा हा भोग सहन केला की मंग दुसरा काही पराबलेम नाई. ह्याचीबी सवय लावून घेतली. ह्याला सोडून आपन मुलांसंगत बाह्येर पडलो असतो, तर आपले काय हाल जाले असते? झोपडपट्टीतल्या रासवटांनी किती नोचले असते? येनार्‍या जानार्‍या अनजान माणसानी कवाबी धिंडवडे काढण्यापातूर सवताच्या दादल्याने येकदा केले तर काय वाईट? बदल्यात आपल्याला बिनदास जगता तर येते! आनी रोज आपल्यापाशीच तर येतोय ना. निदान आजून तरी बाहेर शान खायला जात नसावा.

जम्नीने ठणकते अंग चेपण्यासाठी कूस बदलली. नवरा ओरबाडून त्याला पाहिजे ते घेत असताना अजूनही मनात ती हळुवार प्रेमळ संगाची स्वप्ने पाहायची. तशा स्वप्नात ती दुखरी वेळ टळून जायची. उरायचा फक्त खुपणारा ठणका. येकदा तरी त्यानी लाडात येऊन जवळ घ्यावे, हळूच आपला मुखडा वर करावा. मंग आपून लाजून तोंड फिरवावे... स्वप्नरंजनात कधी डोळा लागला ते तिला कळलेही नाही.

त्या रात्री नवरा आल्याआल्या त्याने दोन अंडी आणि ब्रेड पलंगावर टाकले. “जम्ने, बैदा पाव बनवून आण लवकर. भूक लागलीय.” त्याने ऑर्डर सोडली.
“कावून? आज दारू ढोसून नाय आलाते?”
“नाय. आज घरीच घेऊन आलोय.” त्याने पटलूणच्या खिशातून पव्वा काढला. “जा गिलास घेऊन ये.”
“काय जालं? आज खुशीत दिसता जनू?”
“उद्यापासून मोठे काम भेटलं आहे. जरा दूरच्या जागी हाय. म्हटलं आज आरामशानी घरी बसून प्यावी. चार भजी बी तळून दे”
“हो आनते.” नवरा खुशीत दिसतो बघून जम्नीने भराभरा त्याच्यासाठी खायला केले. प्लेट ठेवून ती त्याच्याशेजारी बसली. “ती गोदी मलाबी उद्या मौलमदी काम बगून देनार हाय. तीबी तिथच कामाला जाते. ह्ये काम भेटलं तर कचरा येचित बसायं नाय लागणार.” नवर्‍याच्या पोटात चार घास गेल्यावर तिने हळूच विषय काढला.
“आसं कोनतं काम देनार हाये ती?”
“काय नाय, मौलमंदी सफ़ाईचं काम हाय.”
“गोदी म्हनजी काय मोटी सायबीन लागून ग्येली का तुले काम देयला?” ग्लासात बाटली ओतीत नवर्‍याने विचारले.
“सायबीन कायले पाईजे? रोजानी पाईजे असत्येत त्याईनले.”
“जातीस तर जा. मले काय!” नवरा जडशीळ स्वरात म्हणाला. “पोरं झोपली वाटतं पडवीत. तू बी चल आता झोपायला. उद्या नवीन कामावर जान्याआदी जुनं काम करून टाकू.” आपल्याच जोकवर गडगडात हसून त्याने जम्नीला खसकन जवळ ओढले.

“अहो, रोजची अशी धुमडी कशाले लागते तुमाले? तुमचंबी नवीन मोटं काम हाय उद्या, तर जरा दमानं घ्या. दिवसभर पायपीट करून माजंबी अंग ठणकतं हाय.” नवरा जरा खुशीत दिसला होता. निदान आजतरी आपल्याशी हळुवार वागेल, काय होतंय विचारेल अशा आशेने तिने नेहमीप्रमाणे वाकडे तोंड करून त्याला दूर न लोटता खालच्या नजरेने त्याला विचारले. पण त्याच्यावर दारू स्वार झाली होती. “अंग ठणकतं काय? मंग माजं जालं की झोप गुमान.” तिला सतरंजीवर ढकलीत तो गुरगुरला. त्याच्या घामटल्या घुसमटीत ती गोदीच्या पावडरीचा वास आठवू लागली.

सकाळी उठल्या उठल्याच जम्नीने बाहेर जाऊन अंग धुऊन घेतले. ठेवणीतले धुवट पातळ नेसून तिने चार बोटे तेल केसात चोळले. जरा ठीकठाक तयार होऊन ती गोदीबरोबर मेन मार्केटमधल्या ऑफिसमध्ये गेली. आज सफाईला कुठे जायचे ते समजल्यावर गोदीने मुकादमाला रोजगारीचे काम आहे का ते विचारले. “माही शेजारीन हाय. तिला कामाची गरज हाये सायेब. बगाना काई जमत्ये कां”
मुकादमाने एकवार जम्नीला वरपासून खालपर्यंत न्याहाळले. “काय काम करतीस तू?”
“झाडू पोछा करती सायेब.” जम्नीने पढविल्याप्रमाणे सांगितले.
“हं... थांब इथेच. नेहमीची बाई आली नाई तर पाठवतो तुला.” हात उडवून तो म्हणाला.

“लई उपकार होतील सायेब.” चंची उघडून ती तंबाखू मळीत बसली. “सायंकाळला घरी भेटजो.” ट्रक येताच गोदी ओरडून सांगून निघून गेली.
आज जम्नीचे नशीब जोरावर असावे. मुकादमाने थोड्या वेळाने तिला युनिफॉर्म दिला. “हे कपडे बदलून घे. तुझी कापडं इथे र्‍याकवर ठिऊन दे. ह्या बायांबरूबर कामाला जा. त्या सांगतील तुला काम समजावून.” रजिस्टरमध्ये तिची सही घेऊन त्याने जम्नीची रवानगी केली.

शहराच्या रस्त्यांवरून रद्दी वेचीत फ़िरताना जिकडे तिकडे नव्याने उगवलेल्या अजस्र बिल्डिंगीवरून जम्नी नेहमीच जायची. त्या प्रचंड इमारतींमध्ये मोठी मोठी महागडी दुकाने असतात हे झकपक कपडे घालून जा-ये करणार्‍या गर्दीकडे पाहूनच कळायचे. अशा ठिकाणांसमोरून जाताना तिला लाजल्यासारखे व्हायचे. अशा मॉलमध्ये आपण कधीकाळी प्रवेश करू असे तर तिला स्वप्नातही वाटले नव्हते. आज मात्र स्वच्छ धुतलेला युनिफॉर्म घालून मॉल उघडायच्या आधीच ती आतमध्ये दाखल झाली. तिच्या बरोबरच्या एका बाईबरोबर तिला तीन मजल्यांवरील संडास-बाथरूम साफ करायचे होते. दुसर्‍या बाया आपापले सामान घेऊन इतर मजल्यांवर गेल्या. बरोबरीच्या बाईने तिला आधी काम समजावून दिले. कोणता साबण किती वापरायचा, होजने फवारा मारून कसे धुवायचे वगैरे. “मौल उगडण्याआधी संडास, बाथरूम फ़रशी सगळे चकचकीत जाले पाहिजेत. मुकादम चेकिंग करेल तवा जराबी कुटं घाण दिसली तर वाटेल ते सुनावनार अनं पैसं बी कापनार.” त्या बाईने जम्नीला दम देउन ठेवला. कंबर मोडून त्या दोघी कामाला जुंपल्या. सगळे होतेय तोवर बाहेर माणसांची वर्दळ सुरू झाली होती. “आता आपण खाली ब्येसमेंटमदी आपल्या गाळ्यात बसून राहायचे. दर तासाने वर येऊन पुन्हा लागेल तशी साफसफाई करून यायची. रातच्याला डुटी संपण्याआधी येकडाव पुन्हा सगळे साफसुतरे करायचे. मंग ट्रक आपल्याले हपिसात सोडनार. आनी हां, मौलमंदी कारनाशिवाय भटकायचे नाई. मुकादमाने पाहिलं तर तितल्या तिथं सुट्टी करेल तुजी.” असे सगळे तिच्याकडून समजावून घेऊन जम्नी तळघरातल्या एका खोलीत टेकली. जरा विसावतेय, तोच वरती सफाईला जाण्याची वेळ आली. मध्येच दोन-तीनदा मुकादम येऊन उगाच थोडा दम देऊन गेला. ह्या धावपळीत तिची नाही म्हटले तरी दमछाकच झाली. कचरा धुंडताना अशी वेळेची ताबेदारी नव्हती. केव्हाही कुठे बसकण मारावी. वाटल्यास कचरा सावडावा, वाटल्यास चहा मारून यावा. इथे सगळा शिस्तीचा मामला होता.

दुपारनंतर मुकादम येऊन बोलला, “सन्द्याकाली नेहमीपेक्षा गर्दी जास्त असते. तर वर वाशरूममदीच बसून राहा. अदून मदून फरश पोछा करून घ्या. टायलेटात थोड्या थोड्या येळाने चेक करून साफ ठेवा. तिथच स्टुलावर बसून लक्ष ठेवा कोनाला काय पाहिजे ते.” त्याने लेडीज वॉशरूममध्ये एकेका बाईची ड्युटी लावली.

लेडीज वॉशरूममधे येणारे एकेक कस्टमर बघत जम्नीचा टाईमपास मस्त झाला. काय येकेक बाया आन त्यांचे कपडे! कचरापट्टीत आपुन झिंजारडे डोसके खाजवीत सापडलेल्या चिजांवरून येकेमेकींशी कचाकचा करतो. इथे तर येकेकीचे रुपडे पाहून घ्या! बया बया! पोलकी अंग झाकाया घालतात की दाखवायला काही कळेना. कोणी सलवार कमीज, कोणी झुळझुळीत साडीत. कोणी पोरी इस्क्रटमध्ये, तर कोणी दोन्ही पायात पुंगळ्याची इजार घातलेल्या. आरशासमोर त्यांच्या ‘यस फ़्यस’, ‘हांजी, हांजी’, ‘जाउना गं’ करत चाललेल्या लाडाच्या गप्पा! जम्नी ते आगळे जग बघता बघता रमून गेली. कचरापट्टीतल्या तिच्या जगापासून हे सगळे दूर दूर होते. आज ती अचानक त्यांच्यामध्येच येऊन बसली होती.
ही नवी नवरी वाटतेय. किती मस्त वासाचे इंग्लीस अत्तर मारलं आहे हिने अंगावर! घरी रात्री अशा सुवासात माखून ती नवर्‍याला भेटत असेल! काय होत असेल त्यांच्यात?
नवी नवरी बाटलीतून एक फवारा आपल्या अंगभर उडवून टिक टॉक सँडल वाजवीत निघून गेली. तिच्या अंगच्या सुवासाने वॉशरूम फुलांच्या ताटव्याप्रमाणे मोहरली.

कोणीतरी आतमध्ये फ्लश केला. जम्नीला कचर्‍याच्या ढिगातला कुबट भपकारा फ़ुलांच्या ताटव्यात फ़वारल्यासारखे झाले. ती बाई निघून गेल्यागेल्या लगेच आत जाऊन जम्नीने सुगंधी औषधाचा फवारा मारून टॉयलेट साफ केले. आज सकाळी निघतानाच आंघोळ केली होती. नवीन युनिफॉर्म चढवला होता. तरीदेखील तिला आज पहिल्यांदा आपल्या अंगात मुरलेला उकिरड्याचा तीव्र वास जाणवला. नुसता जाणवलाच नाही, तर अगदी लाज वाटली. अंगावरचे हे नवीन कपडेदेखील काढून फ़ेकून द्यावे. मघाच्या नव्या नवरीचा सुगंधी फवारा घेऊन उघड्या अंगावर उधळावा. त्या वासात मनसोक्त नहावे. सुगंधी लेपात भिजून नवर्‍याजवळ जावे. कोन जानं, त्याचा धसमुसळेपनाबी पळून जाइन! नेहमी कचर्‍याचा वास जवळ करावा लागतो, म्हनून दारू पिऊन झटाझटा उरकतो आन आपल्याले ढकलून ढेर होतो. जादुई अत्तराची भूल त्याला पाडायला हवी.

जम्नीला गोदीचा खूप हेवा वाटू लागला. आपल्याला फक्त आजसाठीच हे काम मिळाले. उद्या पुन्हा उकिरड्यावर जायचे? हे काम काय गॅरंटीड थोडेच आहे! ट्रकने कचर्‍याची गाडी ओतल्यावर उडणारा धुरळा तिच्या मनात मळभ बसवून गेला. “अहो बाई, टॉयलेट रोल बसवा दुसरा.” एका कस्टमरच्या आवाजाने ती भानावर आली. नवीन रोल बसवून ती बाहेर आली. आरशापाशी स्लीव्हलेस घातलेली एक मॅडम लिपस्टिकने ओठ रंगवीत उभी होती. जम्नीने तिच्याकडे बघून स्मित केले आणि आपल्या स्टुलावर त्या मॅडमला निरखत बसली. अंगात रेशमी जंपर घातलेले. खाली टाइट जीन्स. निमुळत्या टोकांच्या सँडल. अर्धे कापलेले केस. लांब लोंबकणारे डूल. पर्समधून चकचकीत काचेची डुबरी बाटली काढून तिने भरपूर इंग्लिश अत्तर आपल्यावर फ़वारले. मानेखाली, कानामागे, अगदी जंपरच्या वरच्या घळीमधून आतमध्येसुद्दा. जम्नी भारावल्यासारखी पाहात होती.

इतक्यात मॅडमचा मोबाइल वाजला. पर्समधला फ़ोन काढून ती बोलायला लागली. काहीतरी लोचा दिसत होता. “क्या कह रहे हो! कहाँ? हलो हलो, ठीक सुनाइ नही देता. ठैरो, मै बाहर आती हूं.” भराभरा सामान पर्समध्ये कोंबून ती फोनवर बोलतच बाहेर पळाली. इंग्लिश अत्तराचा मादक ढग मागे रेंगाळत राहिला. ती गेल्याबरोबर जम्नीच्या एकदम ध्यानात आले, की घाईघाईत तिची अत्तराची बाटली वॉश बेसिनच्या कट्ट्यावर राहून गेली होती. जम्नीने झटकन उठून बाटली ताब्यात घेऊन आपल्या पिशवीत कोंबली. ती मॅडम लगेच परत आली तर कदाचित ती परत करावी लागणार होती. धाकधूक मनाने जम्नीने स्टुलावर बसून पाच-दहा मिनिटे काढली. मॅडम परत आली नाही, तेव्हा जादुई फवार्‍यात नहाण्याच्या स्वनाने तिच्या छातीतली धडधड आणखीनच वाढली.

त्यानंतर सगळे काम ती भारल्यासारखी करीत होती. मॅडम आलीच तर आपण तिला दिसू नये म्हणून ती जास्तीत जास्त वेळा रिकाम्या टॉयलेटात जाऊन बसली. पण मॅडम खरेच आलीच नाही. ऑफिसमध्ये नेणार्‍या ट्रकमध्ये बसल्यावर जम्नीने मोठा नि:श्वास सोडला. आपले आणलेले पातळ नेसून युनिफॉर्म परत केला. दिवसभराचे पैसे चांगलेच मिळाले, तेव्हा तिची कळी एकदमच खुलली. गोदी अजून परत आलेली नव्हती. तेव्हा तिची वाट न बघता हातातली पिशवी गच्च छातीशी धरून जम्नी झराझरा आपल्या झोपडीकडे पळाली. वाटेत गाडीवाल्याकडून वडापाव बांधून घेतले.

आल्यावर पोरांना खायला घालून त्यांना पडवीत अंथरुणे घालून दिली. नवरा नवीन मोठ्या कामावर जायचे म्हनला होता. ते ठिकाण दूर असल्यामुळे आज त्याला गरी यायला उशीर झाला जनू! ते बी ब्येसच जाले म्हनायचं!. बाहेर अंधार पसरला होता. तरी हवेत गरमीच होती. सणासुदीसाठी ठेवलेला साबून चोळून चोळून तिने बाहेरच्या नळावर अंग घासून काढले. केसांमध्ये उरलेल्या साबणाचा फ़ेस रगडला. स्वच्छ फडक्याने अंग कोरडे करून त्याच फडक्यात ओले केस बांधून ती झोपडीत आली. मुले पडवीत अंथरुणावर स्वस्थ निजली होती. आरशात बघून तिने कुंकू रेखले. गोधडीखाली दाबून ठेवलेले धुवट पातळ ती नेसली आणि अंगात पोलके न घालता, नुसतेच पदराने अंग झाकून तिने पिशवीतली सुवासिक बाटली काढली. त्या बाटलीतला मुलायम सोनेरी द्रव पाहून ती हरखली. बाटलीच्या चकचकीत डुबर्‍या पोटाला तिने हळूवार हात लावला. मग ती मखमली बाटलीच तिने पदराखाली धरून छातीवर फ़िरवली. दाबून धरली. काचेचा थंडगार स्पर्श आतमध्ये खोल शिरशिरी उठवून गेला. बाटलीचा स्प्रे नॉझल तिने नाकाजवळ आणून हळूच त्या जादुई सुवासाचा अंदाज घेतला. जास्त वेळ त्या वासाच्या धुंदीपासून दूर न राहवल्याने पदराखाली, चेहर्‍यावर, बगलेमध्ये, सगळ्या अंगावर भरभरून त्या अत्तराचा फवारा मारला. तो सुवास तिच्या नाकातून डोक्यात जाऊन बसला. एक विलक्षण झिंग येऊन जम्नी खाली सतरंजीवर पहुडली. अत्तराच्या बाटलीला हलकासा स्पर्श जणू नवर्‍याचा गोंजारणारा स्पर्श असावा असे पिसे तिला लागले. त्या बेभान स्थितीत तिने पुन्हा पदराखाली ती बाटली दाबून धरली. पण आता तिथे बाटलीचा नव्हे, तर नवर्‍याचा दणकट हात होता.

अर्धवट झोपेत नवर्‍याच्या रासवट शिव्या ऐकून ती जागी झाली. धडपडत उठून तिने पदर अंगभर आवळून घेतला. आज तरी हा पिऊन आलेला नसो, ती प्रार्थना करू लागली. पण दारूच्या भपकार्‍याने तिची सुवासिक झिंग एकदम उतरवली. “काय चार घास असतील ते द्ये. आज लई काम पडले. भूक खवलली हाय.” जम्नीने त्याला आणि स्वत:ला मघा आणलेला वडापाव आणि घरातला भात वाढला. हात धुतल्या धुतल्या त्याने जम्नीला नेहमीसारखे खस्सकन ओढले. दारूचा वास भपकन नाकाजवळ आला, तशी लाडिकपणे त्याला हाताने दूर केल्यासारखे करून ती म्हणाली “आयका नं, आज म्या मौलमंदी ग्येली होती. इतका झकपक मौल हाये काय सांगू! गुळगुळीत फ़रशी” पण त्याचा असल्या फ़ालतू गोष्टी ऐकण्याचा मूड नव्हता. “फ़रशी काय चाटायचियं काय?” त्याने जम्नीला अंथरुणावर ओढले. जम्नीला नेहमीची घुसळण दिसू लागली. शेवटाचा प्रयत्न म्हणून तिने उशीजवळ ठेवलेली बाटली त्याच्या हातात दिली. “अहो, जरा दमाने घ्या नां. ह्ये पायजो ना मी काय आणलेय तुमच्यासाटी.”

नवर्‍याने बाटली हातात घेतली आणि मागे-पुढे फिरवली. आतले सोनेरी द्रव हिंदकळले. बाहेरून येणार्‍या प्रकाशाच्या चुकार तिरिपेने जादू करून सोनेरी चांदण्यांच्या रेषा बाहेर पाठवल्या. जम्नीची झिंग टिपेस पोहचली होती. नवर्‍याने बाटली नाकाशी धरून सुंघली. आतापर्यँत दाबून ठेवलेले हुंकार जम्नीच्या ओठांतून न कळणारे आवाज होऊन निसटले. पाण्याबाहेरच्या मासोळीसारखी तिची तडफड झाली.
“अच्छा, ह्ये नखरे शिकवले काय तुज गोदीनी. तरी म्या म्हनतयं मघाधरनं ह्ये भपकारा कसला येतोय. ह्या बाटलीचा उच्छाद हाय!” त्यानी बाटली दूर टाकली. राक्षसासारखे पुन्हा जम्नीला जवळ घेऊन कुस्करले. सुगंधाच्या झुळकेवर तरंगणारी जम्नी त्या रासवट जोराने जमिनीवर फेकली गेली. रोजच्या भोगाला सामोरे जाण्यासाठी तिने डोळे मिटले. जवळ ओढलेल्या जम्नीच्या पदराआडून येणारा तीव्र सुगंध नवर्‍याच्या नाकात सुईसारखा घुसला. रोजचा हक्काचा आणि ओळखीचा घास आज मिळणार नाही, ही जाणीव होताच त्याची नशा खडबडून जागी झाली. एरवी त्याच्या नशेला विश्वासाने गाढ झोपेत घेऊन जाणारा जम्नीचा घामट कळकट संग आज त्याचा हात धरायला नव्हता. कुठलासा अनोळखी गंध त्याला दूर लोटू लागला. त्याचा जम्नीभोवती आवळलेला हात लुळा पडला. तटकन उठून त्याने सदरा अंगात चढवला. कपाटातला पव्वा घेऊन तो तिरमिरीने झोपडीबाहेर पडला.

उघड्या पडलेल्या अंगाभोवती गच्च पदर लपेटून जम्नीने अत्तराचा सुवास झाकून टाकला. नवर्‍याने फेकलेली अत्तराची बाटली कोपर्‍यात काळीकुट्ट दिसत होती. तिच्यातल्या चांदण्या केव्हाच विझल्या होत्या.

(कथाबीज एका अरेबिक गोष्टीवरून सुचलेले, कथा मात्र पूर्णपणे स्वतंत्र)

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

30 Oct 2016 - 4:01 pm | यशोधरा

कथा जमली आहे.

पद्मावति's picture

3 Nov 2016 - 11:03 pm | पद्मावति

+१

एस's picture

3 Nov 2016 - 11:19 pm | एस

कथा फार आवडली.

नूतन सावंत's picture

4 Nov 2016 - 9:58 am | नूतन सावंत

कथा आवडली.

आतिवास's picture

4 Nov 2016 - 10:04 am | आतिवास

जम्नीसाठी वाईटही वाटत राहिलं.

पैसा's picture

4 Nov 2016 - 11:45 am | पैसा

अप्रतिम कथा!

आनन्दा's picture

4 Nov 2016 - 12:05 pm | आनन्दा

__/\__

शलभ's picture

4 Nov 2016 - 4:30 pm | शलभ

अप्रतिम कथा. आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2016 - 4:53 pm | अत्रुप्त आत्मा

+१

निशाचर's picture

5 Nov 2016 - 4:47 am | निशाचर

कथा खूप आवडली.

जमनीबद्दल विचार करताना वाईट वाटले.
तुम्ही कथा छान लिहिलिये.

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 2:50 pm | सस्नेह

कथा आवडली.

पियुशा's picture

5 Nov 2016 - 3:50 pm | पियुशा

खुप छान कथा , आवडेश :)

शशिधर केळकर's picture

18 Nov 2016 - 6:52 pm | शशिधर केळकर

मस्त कथा, सुरेख लिखाण! स्वगतातले सर्व वेगळ्या फाँट मधे लिहिण्याची युक्तीही आवडली.

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2016 - 7:32 pm | स्वाती दिनेश

आवडली.
स्वाती