शिरवाळ

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in लेखमाला
29 Oct 2016 - 12:21 am

शिरवाळ

"चार पुरी हाईत, पाचवं पोरगं हु दी गं म्हासळाये"

वाळून गेलेल्या लिंबाखाली शेंदूर फासलेला दगड लालबुंद होऊन गेला होता. फराकीतल्या चारी पोरी कडंनं कोंडाळं करून बसल्या होत्या.
"आमुश्याला व्हात्या पाण्यात चार लिंब उतरून टाका" जवळच बसलेल्या बामणानं अंगारा लावला.

म्हातारी उठली. पुडीत अंगारा बांधून पायर्‍या उतरून खाली आली. फराकीतल्या चारी पोरी तिच्या मागोमाग चालू लागल्या.

रस्ता जुनाच. मळलेला. म्हातारी कितींदातरी या रस्त्यावरुन चालत गेलीय. कधी छायडीबरोबर. कधी या चार चिमण्या नातींबरोबर. कधी गोजराबाय संग यायची, तिच्याबरोबर. तर कधी एकलीच.
बापूरावला संग आणणं तिला कधी जमलंच नाही.

म्हातारी हुकमी होती. थोरल्या सुमीवर तिचा जीव. सुमी पिवळीधमक. आज्जीच्या लाडात वाढलेली. पण बाकीच्या तिघींना मात्र म्हातारीनं तेवढा जीव लावला नाही. दोन नंबराची राणी म्हातारीला चळाचळा कापायची. दात घासताना म्हातारीनं तिला मुस्काडात ठेवून दिलेली. तेव्हापासून ती म्हातारीच्या फारसं जवळ जात नाही.
तीन नंबरची 'मय्या'पण तशीच. म्हातारीनं सगळ्यात जास्त बडवलं ते हिलाच. मया कोडगी झाली होती. बंडखोरीची एक झाक तिच्या नजरेत दिसायची. एकदा म्हातारीला म्हणाली होती, "ही अवदसा आपल्या घरातनं कधी जायची.."

पहिल्या तिघी अगदी साजेसं रूप घेऊन जन्माला आलेल्या. पण शेवटची ठकी अगदीच विपरीत. तिच्या सावळ्या चामडीकडं बघितल्यावर म्हातारीला धडकीच भरली होती. पहिल्या तिघी कशाही खपतील, पण हिचं काय?

ठकी शेंडेफळ. भडकलेल्या म्हातारीला ती नकळत्या वयापासून शिव्या घालत आलेली. 'कुतरी, डुकरीण' तर ती तोंडावर बोलायची. म्हातारीनं तिला गरम उलथन्याचा चटकापण दिला होता. पण तेव्हापासून ठकी अजूनच धीट होत गेली.

चारही पोरी म्हातारीच्या मागून गुमाट चालत होत्या. रणरणत्या उन्हात बाभळी होत्या साक्षीला. या बाभळीसुद्धा येड्या. माजल्या होत्या माळरानात. जमीन दिसेल तिथून टरारून फुगून वर आल्या होत्या.

ओढ्याच्या पुलावर गारीगारवाला दिसला. कुणाची टाप नव्हती म्हातारीला गारीगार मागायची. पोरी गुमाटच राहिल्या.
शेवटी म्हातारीनंच सगळ्यास्नी एकएक गारीगार घेऊन दिलं. म्हातारी अशीच करायची. पोरी गुमाट असल्या की त्यांच्यावर भरभरून माया करायची. एरव्ही म्हातारीला त्यांचे लालचुटूक ओठ दिसले असते तर त्यांची थोबाडं तशीच रंगवली असती.

तांबड्या मातीत वाट काढत म्हातारी ओढ्यात शिरली. तिथून वर चढत चिंचेखालच्या बांधावरून घराची वाट तुडवत राहिली. म्हातारीनं दिलेल्या गारीगारात चार धपाटे खाऊन मिळवलेल्या गारीगाराची चव नव्हती. सुमीनं तेवढं गारीगार नीट खाल्लं. ठकीनं सगळं वगाळ तोंडावरुन फराकीवर सांडून ठेवलं. जागोजागी रंगाचे भडक लालेलाल धब्बे.
म्हातारीनं वटावटा करायला सुरू केलं. घर येईस्तोर म्हातारीची वटवट चालूच होती. ठकीला तिनं झोडपतच घरी नेलं. तिच्या पसरलेल्या भोकाडात बाकीच्या तिघींना आपापली गारीगारं घशाखाली नीटशी उतरवता आलीच नाहीत.

म्हातारीची शिस्त करडी होती. जालीम होती.
उदासवाणं, बुरसटलेलं ते छप्पर म्हातारी असली की ज्वलंत व्हायचं. संपूर्ण घरावर तिचा दबदबा. दरारा.
नवीन लग्न होऊन छायडी जेव्हा या घरात आली, तेव्हा म्हातारीनं तिला सळो की पळो करून सोडलं होतं. अगदी कालवणात मीठ जास्त झालं तरी म्हातारी तिच्यावर जाळ काढायची. एकदोनदा तर छायडी म्हातारीला घाबरून लपून बसली होती. म्हातारीनं तिला "घराभाईर काढीन.." म्हणून धमक्याही दिलेल्या.
पहाटे उठायला तिला उशीर झाला, तर म्हातारी सकाळपासूनंच उदासवाणी बडबड करत राहायची जी असह्य होती.

पण छायडी नंतर मुरली. ती गुमाट झाली. ती एखादाच शब्द असा काय बोलायची की म्हातारी पेटून उठायची. नंतर नंतर हे फारच वाढत गेलं. छायडी मजा घ्यायची. शेवटी म्हातारीनंच "आपलं इंगित हिला कळलं गं बया" म्हणून तिच्याशी जमवून घेतलं. दोघीही आता मायलेकीसारख्या राहतात. हिशोबाचं बघतात. वाणसामानाचं ठरवतात. भरदुपारी गप्पा ठोकतात. तशी आता तिची काही तक्रार नाही. म्हातारी चारचौघात "गुणाची गं माझी सून.." तिचं म्हणून कौतुक करते.

असं असूनपण म्हातारीचा भडका हा ठरलेलाच असतो. एक सुमी सोडली तर बाकींच्या तिघींना म्हातारी अजून कळलीच नाही. भडकलेल्या म्हातारीला केवळ सुमीच शांत करू शकते. ती जवळ असली की म्हातारीला बरं वाटतं.
एरव्ही ती बापूरावलापण सोडत नाही.

लाकडाच्या वखारीत ठेकेदार असणारा बापूराव चार चार दिवस घरी येत नाही. आलाच तर हमखास त्याने गांजा ओढलेला असतो. सकाळी तो लवकर उठत नाही. तेव्हा म्हातारी ठकीला पुढे करते. पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या डोक्यावर ओतायला सांगते. भोळाभाबडा बापूराव उठून घरादाराला चार शिव्या घालतो. मात्र तो म्हातारीला घाबरतो. बहुधा म्हातारी त्यालाही अजून कळलीच नाही.

म्हातारीचं आणि त्याचं बोलणं फारसं होतंच नव्हतं. म्हातारी चार हिताच्या गोष्टी सांगायची. मुंडी हलवत "होय होय" करत तो निघून जायचा.

ओठांना लिपस्टिक लावलं, म्हणून तिनं मय्याचं मुस्काड फोडलं. ही सगळी तमासगिरणींची कामं. नटणं मुरडणं घराला बट्टा लावतं. म्हातारीला मुळीच खपणारं नव्हतं.
पोरींच्या केसांना ती ओंजळभरून खोबर्‍याचं तेल लावायची. दोन्हीकडं दोन वेण्या आणि रिबिनी. चिपचिपीत तेलकट चेहरा घेऊन पोरी शाळेत जायच्या. शाम्पू वगैरे प्रकार त्यांनी कधी बघितला नसावा.

नंतर नंतर तिनं मोठ्या होत चाललेल्या पोरींवर हात उगारणं बंद केलं. एकवेळ ते मारणं परवडलं. पण तिचा शाब्दिक भडिमार मनात खोल रुतून बसायचा.

सगळ्या दुनियेचा राग म्हातारीला ठकीवरच काढावा लागायचा. तिचं मारणं म्हणजे मुस्काड फोडणं. पण मारताना ती जोराजोरात शिव्या घालायची ते ऐकूनच भडभडून यावं.

दुर्लक्षित राहिली ती दोन नंबरची राणी. तीही बापासारखीच भोळीभाबडी. स्वयंपाकपाणी, धुणीभांडी सगळं करायची, पण कौतुक तिच्या वाट्याला नाही.
अबोल. कष्ट करणं एवढंच शिकलेली. राणी साजर्‍या मुखड्याची. बहुतेक हिलाही म्हातारी नंतर समजत गेली असावी. म्हातारीच्या शिव्या तिला फारशा पडल्या नाहीत.

म्हातारीच्या करड्या शिस्तीत चारही पोरी फुलत गेल्या. काटेरी कुंपणासारखा म्हातारीनं त्यांच्यावर पहारा दिला.

सुमीला एकदा पाहुणे बघायला आले आणि म्हातारीचं 'सोन्याचं पिल्लू' हरवलं.

म्हातारी बैचेन झाली. सुमीनंतर त्या घरात आता राम नाही. म्हातारीची कालवाकालव झाली ती इथेच.

पण सुमी गेली. जाताना म्हातारीला सोबतच घेऊन गेली. म्हातारीनं तिथं महिनाभर तळ ठोकला. तिथल्या व्याह्यांनापण तिचा लळा लागला. म्हातारीनं सुमीच्या सासूवरपण एकदा जाळ काढला होता. तेव्हा सुमी खुदकन हसली होती. पण म्हातारी खमकी होती. सुमीचा संसार नीटनेटका आहे याची खात्री केल्यावरच ती परतली.

सुमी गेल्यापासून म्हातारी जरा उतरलीय. पहिल्यासारखा तिचा भडका उडत नाही. आता तर ठकीनंपण तिला समजून घेतलंय की काय असं वाटून जातं.

सुमीसारखा जीव अजून कोणावर लावावा असं म्हातारीला वाटलं नाही. कारण त्याही एक दिवस तिला सोडून जाणार. तो धक्का पुन्हा सहन करण्याची म्हातारीची तयारी नाही.

ऊन भरून येतं. पालापाचोळा, गवत अंगणात सांडून जातं. रानोमाळच्या फुफाट्यात झाडं अंधुक दिसतात. वावटळी उत्तुंग जातात.
म्हातारी सुपातून जवारी उफाणत राहते. पालापाचोळा बाजूला सरून खाली मोती ठिबकत राहतात.

राणी शाळेत जाते. ती हुशार आहे. 'शिकून चांगली मोठी हो' असा म्हातारी तिला आशीर्वाद देते. शाळेत तर मय्यापण जाते. ती तितकी हुशार नाही. तिनं लिपस्टिक लावली तर म्हातारी तिला आजकाल बडवत नाही. म्हातारी बदलली आहे हे खरं.
कुडाचे पोपाडे उकरून खाणार्‍या ठकीला मात्र ती बदडते, हेही तेवढंच खरं. म्हणजे म्हातारी तितकीपण काही बदलली नाही.

बापूराव घरी येत नाही ही तिची तक्रार आहे. तसाही बापूराव घरी येऊन करतो तरी काय... त्यानं गांजा पुन्हा ओढणार नाही अशी शपथ घेतलीय खरं. पण बापूरावचा काही नेम नाही.

म्हातारी पुन्हा बदलली, जेव्हा सुमीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या लोण्याच्या गोळ्याला म्हातारीनं अगदी जिवापाड जपलं. म्हातारीची चाललेली धडपड त्या छपरानं कितव्यांदातरी अनुभवली. बाळाला न्हाऊ घालणं, टाळू भरणं म्हातारीनं अगदी जिवापाड केलं. त्यापायात राणीनं एक-दोनदा शिव्याही खाल्ल्या.

शिव्या तर सुमीनंही खाल्ल्या. ती बरंच अरबट चरबट तिखट खायची. मग त्याचा बाळाला त्रास.
अशा वेळी म्हातारी घर डोक्यावर घ्यायची. "आगं, किती वसा वसा खाशील" म्हणून सुमीच्या पाठीमागं हात धुऊन लागायची. शेवटी सुमीपण तिचीच नात.

म्हातारी बाळाला अगदी सहजरीत्या हाताळायची. त्याला खेळवायची. जाताना म्हातारीनं त्याला एक सोन्याचं बदामही करून दिलं. सुमीला दमात घेऊन बर्‍याच गोष्टी समजावून सांगितल्या.

सुमी गेली आणि म्हातारी पुन्हा एकली पडली.
खडं छप्पर तिच्या दु:खात सहभागी झालं.

हुशार राणीनं मात्र या संधीचा फायदा घेतला. तिनं म्हातारीला अगदीच बरोब्बर ओळखलं. म्हातारीचा आधार केवढा मोठा आहे याची तिला जाणीव झाली. आपसूकच ती म्हातारीच्या जवळ खेचली गेली. तिला लळा लागला. अगदी ठरवून केलं असलं तरी एक घट्ट वीण तयार झाली. म्हातारीचा तिच्यावर जीव जडला.

पण पोरी एवढ्या भराभर मोठ्या होत गेल्या की म्हातारी सैरभैर झाली.

राणी आणि मय्या एकाच मांडवात सौभाग्याचं लेणं लेवून सासरी निघून गेल्या आणि म्हातारी अगदीच ढेपाळून गेली. तिच्या उदास चेहर्‍यावर कितीतरी गहिरे भाव उतरले होते.

ओट्यावर बसून खापरपणतूंची टोपल्या, टकुचं विणताना गोजराबायला पोरींच्या आठवणी सांगताना म्हातारी गहिवरुन जायची.

छप्पर कान देऊन ऐकायचं.

एकेक पाखरू म्हातारीला सोडून जात होतं. आणि म्हातारी आतून तुटत होती.

संध्याकाळी काळवंडून गेलेल्या वाडीवर झाडाचं एक पान हलत नाही. दिवळीत एक दिवा जळतो आहे. छपराखाली शेवटची चिमणी उभी आहे. नाव तिचं ठकी.

अशा वेळी आळसावलेलं छप्पर एक मंद स्मित करतं.

ठकी पहिल्यापासूनंच म्हातारीला तिच्या अंदाजानं समजून घेत गेली. तिचं आणि म्हातारीचं खास असं नातं जुळलं. म्हातारीला अगदी दुसरं सोन्याचं पिल्लू घावल्यासारखं झालं.
म्हातारीनं दुसर्‍यांवर आपले विचार लादले. ठकीनं आपले विचार म्हातारीवर लादले. जीन्स-टॉप घालून ठकी अगदी आधुनिक राहायची. म्हातारीला त्याचं भलतंच अप्रूप.

ठकी एकदा "माझं नाव ठकी का ठेवलं?" म्हणून म्हातारीशी कडक भांडली होती. फारंच धुवाधार भांडण ते. अगदी आठवडाभर चाललं होतं.

ठकी पहिली मुलगी, जी त्या वाडीतून कॉम्प्युटर इंजीनियरिंग करायला बाहेर पडली. म्हातारीला आकाश ठेंगणं झालं. मुंबईला ती तिच्यासोबत बरेच दिवस राहिलीही होती. म्हातारीनं शहरालापण लगेच आपलंसं करुन टाकलं. तिथल्या बायकांच्या शुद्ध उच्चारांची टवाळी करणं हा म्हातारीचा आवडता खेळ होऊन बसला. म्हातारीला शुद्ध बोलताना ऐकल्यावर ठकी पोट धरुन हसायची.

परत गावी आल्यावरपण म्हातारीनं तिथल्या बायकांची टवाळी करणं सोडलं नाही.

म्हातारी बदलत्या काळाप्रमाणं बदलत गेली. ठकीचं बदलत गेलेलं आयुष्य तिला सर्वाधिक प्रिय आहे. बाकीच्या पोरी पुढे शिकत गेल्या नाहीत, याची बोच तिला आहे.

म्हातारीच्या चारही नाती दूरगावी गेल्या असल्या, तरी त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक खबरबात म्हातारीकडे असतेच. चारी नातींच्या सुखदु:खाचा केंद्रबिंदू म्हातारीच आहे.
ही म्हातारीनं खरं तर आयुष्यभर खाल्लेल्या खस्तांची कमाई आहे.

म्हातारी आता थकली आहे. रिकाम्या घरासारखं तिचं शरीरही कुरकुरतं. पण म्हातारी अंधरुणाला खिळून कधीच राहिली नाही. चार बायका जमवून कायम गप्पागोष्टी करत राहते.

छपराखाली आता छायडाबाई आणि म्हातारी दोघीच राहतात. म्हातारी आता समजून उमजून वागल्यासारखी वागते. रिकामं छप्पर तिला खायला उठतं. आता तिचा खास खमक्या आवाजही हरवल्यासारखा झालाय. पण म्हणून अशक्त कधी ती वाटली नाही.

दिवाळी-दसर्‍याला सगळ्या नाती एकत्र एका छपराखाली येतात. खापरपणतूंनी घर भरून जातं. पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी ते ओसंडून वाहू लागतं. पणतीला पणती लागून उजळून निघालेलं ते जगातलं सगळ्यात श्रीमंत घर असतं.

अशा वेळी म्हातारी कानोल्यात सारण नीट घातलं नाही म्हणून मय्यावर ओरडते. "जरा तरी पोरीसारखं वाग" म्हणून ठकीलाही झोडपते. पण फुल तयारीत असलेली ठकी म्हातारीला फाईट देते.

छप्पर खडबडून जागं होतं. ज्वलंत होऊन पेटायला बघतं. "च्यायला काय हे" हे म्हणून गालात बेरकी हसतं.

राणीचं थोरलं कारटं गोठ्यातल्या गाईसमोरच फटाकड्या फोडतं. जनावरं बिथरतात. मग अजून आत जाऊन दावणीतच ते अॅटमबॉम्ब लावतं. म्हातारी मागून येऊन त्याच्या बखोटीला धरते. "आसं कसं जलामलं ह्ये कारटं" म्हणून त्याच्या मुस्काडात दोन देते.

त्यांचं भोकाड ऐकूण छप्पर कावरंबावरं होतं.

राणी लेकाकडे पाहते.
जुनं काहीतरी आठवून तिच्या डोळ्यांतले अश्रू भळभळत बाहेर येऊन खाली ठिबकत राहतात. अगदी मोत्यांसारखे.

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

29 Oct 2016 - 12:36 pm | नूतन सावंत

अप्रतिम शब्दचित्र!

पणतीला पणती लागून उजळून निघालेलं ते जगातलं सगळ्यात श्रीमंत घर असतं.

_/\_

मोदक's picture

1 Nov 2016 - 3:07 pm | मोदक

+१११

अमितदादा's picture

3 Nov 2016 - 12:53 am | अमितदादा

अप्रतिम...

शलभ's picture

4 Nov 2016 - 2:37 pm | शलभ

+१११११

अनुप ढेरे's picture

29 Oct 2016 - 2:55 pm | अनुप ढेरे

सुंदर!

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 5:21 pm | यशोधरा

काय सुरेख!

नाखु's picture

31 Oct 2016 - 1:09 pm | नाखु

जव्हेरभाऊ लेखन उपवास सोडला हे बरं केलं !

दिवा पणती नाखु

नि३सोलपुरकर's picture

31 Oct 2016 - 3:18 pm | नि३सोलपुरकर

सुरेख! ___/\__.

ज्योति अळवणी's picture

1 Nov 2016 - 2:20 am | ज्योति अळवणी

अप्रतिम! खूपच प्रभावी लिहिता हो तुम्ही. म्हणूनच तुमचं लिखाण शांतपणे वाचायला आवडत

vikrammadhav's picture

1 Nov 2016 - 9:10 am | vikrammadhav

जव्हेरभाऊ अप्रतिम लिहिलंय !!!
_/\_

vikrammadhav's picture

1 Nov 2016 - 9:43 am | vikrammadhav

"चार पुरी हाईत, पाचवं पोरगं हु दी गं म्हासळाये"......याच्याबद्दल पुढे काही आलं नाही की जव्हेरभौ !!!

सुंदर जव्हेरभाऊ!! आवडेश...

तुषार काळभोर's picture

1 Nov 2016 - 10:48 am | तुषार काळभोर

डोळ्यातनं पानी आलं वाईच.

आमची आज्जी ह्याच्या एकदम दुसऱ्या टोकाला व्हती.
म्हणूनच तिची लई आठवन आली.

असंका's picture

1 Nov 2016 - 11:18 am | असंका

शब्द सुचत नैयेत .... !!

धन्यवाद या सुंदर कथेबद्दल...!

अभ्या..'s picture

1 Nov 2016 - 1:03 pm | अभ्या..

भारीच जव्हेरभौ.
.
एक उगी बारीक शंका: म्हासळाये की म्हाळसाये?

चांदणे संदीप's picture

1 Nov 2016 - 3:33 pm | चांदणे संदीप

स्लेपींग मिस्केट असू शकते! ;)

जव्हेरगंज's picture

1 Nov 2016 - 4:15 pm | जव्हेरगंज

मी तर 'म्हासळाई' असंच ऐकलंय. कदाचित चुकीचं ऐकलं असेल.

चांदणे संदीप's picture

1 Nov 2016 - 2:52 pm | चांदणे संदीप

शिरवाळ पडल बगा! :)

Sandy

सोत्रि's picture

1 Nov 2016 - 4:35 pm | सोत्रि

अफाट! सुंदर!!

-(अशीच म्हातारी आजी लाभलेला) सोकाजी

वरुण मोहिते's picture

1 Nov 2016 - 4:54 pm | वरुण मोहिते

+1

पद्मावति's picture

1 Nov 2016 - 5:04 pm | पद्मावति

कौतुक करायला शब्द नाहीत. खूप खूप आवडलं.

पुंबा's picture

1 Nov 2016 - 5:06 pm | पुंबा

जबरदस्त सर..

पूर्वाविवेक's picture

2 Nov 2016 - 6:09 pm | पूर्वाविवेक

सगळी पात्र डोळ्यासमोर उभी राहिली. सुरेख !

मनिमौ's picture

2 Nov 2016 - 9:40 pm | मनिमौ

खुप जिवंत ऊतरलय शब्दचित्र

सही रे सई's picture

3 Nov 2016 - 1:11 am | सही रे सई

सुन्दर शब्द चित्र रंगवलत.

"चार पुरी हाईत, पाचवं पोरगं हु दी गं म्हासळाये" >> याच्या पुढे काय झाल ते राहून गेलय.
पणतीला पणती लागून उजळून निघालेलं ते जगातलं सगळ्यात श्रीमंत घर असतं.>> हे वाक्य तर खासम खास.

पैसा's picture

4 Nov 2016 - 11:37 am | पैसा

खूप सुरेख!

बापू नारू's picture

4 Nov 2016 - 1:42 pm | बापू नारू

लय झाक जमलाय लेख....

कविता१९७८'s picture

4 Nov 2016 - 4:43 pm | कविता१९७८

मस्त

पियुशा's picture

5 Nov 2016 - 4:16 pm | पियुशा

ज्जे बात !!! अगदि समोर घडतय अस चित्र मान्डलय , लय ब्येस्ट जमलय :)