शेअरबाजार : सहजसोपी गुंतवणूक हीच यशाची गुरुकिल्ली!!!

Primary tabs

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in लेखमाला
29 Oct 2016 - 12:37 am

शेअरबाजार : सहजसोपी गुंतवणूक हीच यशाची गुरुकिल्ली!!!

...१९८०-९०च्या दशकातील रशिया आणि अमेरिका यांच्यामधील शीतयुद्ध संपल्यानंतरचा हा किस्सा आहे. या दोन बलाढ्य राष्ट्रांचे वैज्ञानिक काहीतरी कारणानिमित्त एकत्र भेटले. बर्‍याच विषयांवर चर्चा होत असताना चांद्रमोहिमेचा विषय निघाला, तेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की मोहिमेत बाकी विषेष तांत्रिक अडचणी नव्हत्या, पण शेवटच्या टप्प्यात चंद्रावर गुरुत्वाकर्षण नसल्याने तेथे चालू शकेल अशा 'स्पेस पेनातली' शाई तयार करण्यासाठी मात्र फार डोकेदुखी आणि अफाट खर्च झाला. (माहीत नसलेल्यांकरिता - आपण वापरीत असलेल्या पेनांतली शाई गुरुत्वाकर्षणामुळेच कागदावर उतरू शकते व आपणास लिहिता येते.) कुतूहल म्हणून त्यांच्यापैकी एकाने "ही जटिल अडचण तुम्ही (रशियनांनी) कशी बरे सोडविली??" असे विचारले, तेव्हा रशियन चमूतील एक जण शांतपणे उत्तरला ".......फार काही नाही, आम्ही पेन्सिल वापरली."

हा विनोदही असू शकेल, ते सोडा. सांगावयाचा मुद्दा हा की अनेक वेळा एखादा महत्त्वाचा परिणाम साधण्यासाठी अतिशय क्लिष्ट, अगम्य आणि खर्चीक मार्गच अवलंबावयास हवेत असे बिलकुलच नाही, बहुतेकदा याकरिता एखादी अगदी साधीसोपी पद्धतसुद्धा असते आणि ती तितकीच प्रभावीही ठरते. आपला गुंतवणुकीचा पोर्टफोलियो तयार करणे वा त्याचे व्यवस्थापन करणे या बाबतही जाणकार हेच सांगतात - ‘keep it simple.'

काही वर्षांपूर्वी केलेल्या जागतिक सर्वेक्षणाप्रमाणे पौरुषप्राप्ती, काळेपणा आणि टक्कल ह्या समस्त सुखवस्तू समाजास भेडसावणार्‍या तीव्रतम समस्या होत्या, असे वाचल्याचे आठवते. जागतिक नव्हे, पण आपल्या आजूबाजूचा विचार करता अगदी अलीकडे झालेल्या उच्च मध्यमवर्गाच्या (आणि अर्थातच 'मीडिया'च्या) उदयामुळे मला ‘गुंतवणूक व्यवस्थापन’ ह्या एका समस्येची भर या यादीत घालावीशी वाटते, आणि सहाजिकच मग त्यावर उतारा म्हणून 'पोर्टफोलियो मॅनेजर्स', 'वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस' अशा विविध नावांनी काही नवीन मंडळी आपल्याला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मदत करण्यासाठी सरसावलेली दिसतात. अशा व्यावसायिकांची मदत घेतल्याशिवाय कोणी गुंतवणुकीच्या महासागरात उतरूच नये काय?? किंवा उतरल्यास गुंतवणूक कशी करावी? असलेल्या फोलियोमध्ये किती वारंवारतेने बदल करावेत?? त्यासाठी कोणती पद्धती अवलंबावी?? असे अनेक प्रश्न तुमच्याप्रमाणेच कधीकाळी माझ्याही मनात होते आणि कै. सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे 'प्रश्न एक माझा. लाख येत उत्तरे, हे खरे की ते खरे, ते खरे की हे खरे..' अशी अवस्था झालेली असताना 'नक्की करावे काय?' या प्रश्नावर वाचनात आलेल्या काही ज्ञानकणांचा परामर्श या लेखात घेतला.

'Ordinary People, Extraordinary Wealth' या पुस्तकाचे लेखक रिक एडेलमॅन यांनी अमेरिकेतील ५००० कोट्यधीश गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक पद्धती, सवयी आणि मानसिकता यांचा अभ्यास करून महत्त्वाचे आठ निष्कर्ष (लेखकाच्याच शब्दांत 'सीक्रेट्स') काढले आहेत. त्यातील काही अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबधित (हाउसिंग मोर्गेज वा पेन्शन फंड वगैरे) असले, तरी बाकीचे - उदा. गुंतवणुकीची सवय लवकर... तरुणपणी लावून घेणे, मूळ गुंतवणुकीत एकसारखे बदल न करणे, गुंतवणूक वैविध्याच्या (diversificationच्या) नावाखाली गुंतवणुकींचा गुंता न करणे, निर्देशांकाचा बागुलबुवा न करता त्या व्यतिरिक्तही विचार करणे, मीडियाकडे दुर्लक्ष करणे यासारखे काही मुद्दे हे सार्वत्रिक महत्त्वाचे आहेत. एडेलमॅन यांना अशा यशस्वी लोकांच्या सर्वेक्षणात पुढे असे आढळून आले आहे की असे 'कोट्यधीश' असलेले बहुसंख्य गुंतवणूकदार आर्थिक मासिके वा वर्तमानपत्रे नित्यनेमाने वाचणे, वा तशी चॅनल्स पाहणे, ब्रोकर्स रिपोर्ट्स अभ्यासणे, निरनिराळ्या आलेखांचे (chartsचे) निरीक्षण करणे, बाजारासंबंधीच्या शिकवणी वर्गांमध्ये वा कार्यशाळांत भाग घेणे अशा कोणत्याही भानगडीत पडत नाहीत.!!! आपल्याला धक्कादायक वाटावी अशी माहिती देताना लेखकाने सांगितले आहे (सीक्रेट क्र. 06) की अशी महनीय मंडळी महिन्यातून सरासरी तीन ताससुद्धा त्यांच्या गुंतवणुकीच्या अभ्यासापोटी खर्च करीत नाहीत! विश्वास नाही ना बसत?? पण बहुधा तथ्य असावे यात, कारण गुंतवणूकदारांमधले ब्रॅडमन श्रीमान पीटर लिंच यांनी हाच विचार यापूर्वीच मांडला आहे. ते म्हणतात, “If you spend more than 15 minutes a year, worrying about the market, you’ve wasted 12 minutes.”

साधारणतः वीस-बावीस वर्षांपूर्वी, बाजाराशी माझी ओळख होण्याच्या सुमारास एका वयस्क आणि यशस्वी दलाल असलेल्या गुजराथी गृहस्थांच्या कार्यालयात मी नित्यनेमाने जात असे. त्यांच्याकडे आलेल्या अनेक अशीलांना ते देत असलेला कानमंत्र - जो मला स्वतःलाही मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरला आहे - आज परिस्थितीनुरूप थोडेसेच बदल करून मी आपल्याबरोबर आनंदाने शेअर करतो. या तोडग्याप्रमाणे (हा त्यांचाच खास शब्द बरं का) (१) वर्षभरात आपण करणार असलेली गुंतवणूक साधारणतः १४-१५ 'मुहूर्ताच्या' दिवसात समप्रमाणात विभागा. हे दिवस अगदी कोणतेही असू द्या - म्हणजे आपण मानतो ते साडेतीन शुभमुहूर्त, वा कुटुंबातल्या सदस्यांचे वाढदिवस, आपल्या वैयक्तिक आयुष्यांतील एखादा विशेष दिवस वा असेच काही.. सामान्यतः हे निवडक दिवस पूर्ण वर्षभर विखुरलेले असावेत इतकेच. म्हणजे अगदी एका आठ्वड्यात २-३ असे नसावेत. (२) आता आपले जीवन ज्या दैनंदिन व्यवहार्य गोष्टींशिवाय अपूर्ण आहे किंवा ज्या उत्पादनांशिवाय आपले जीणे मुश्कील होईल असे आपणास वाटते, अशी गुंतवणुकीची तितकीच (मुहूर्ताच्या दिवसांएवढी) मात्र निरनिराळी क्षेत्रे निवडा. उदा. औषधे, लोखंड, वाहने, वीज, बँकिंग इ. (३) मग अशा प्रत्येक क्षेत्रातली बाजारात असलेली 'अग्रगण्य' कंपनी निवडा. उदा. लोखंड म्ह्टल्यास टाटा स्टील, बँकिंगमधून स्टेट बँक (वा ICICI किंवा HDFC बँकही असू शकेल..) इ. शेवटी तुमची पसंती महत्त्वाची. (४) आणि आता प्रत्येक मुहूर्ताच्या दिवशी आपल्या निवडलेल्या टीममधला एक शेअर क्रमाक्रमाने विकत घ्या.. दॅट्स ऑल.!!!..., शेटजींच्या मते दिवस कोणतेही असोत आणि टीममधील प्लेयर्स कोणतेही, पैसा 'बनविण्यासाठी' यासारखी सोपी पद्धत नाही. मला सांगावयास हवे की मी व्यक्तिशः या प्रतिपादनाशी पूर्णतः सहमत आहे. अर्थात या पद्धतीत फक्त अग्रगण्य वा ब्ल्यू-चिप कंपन्यांचीच निवड टीममध्ये होऊ शकते, हे मी पुन्हा एकदा ठसवू इच्छितो. याशिवाय, तीन-चार वर्षांनी अगदी आवश्यकता वाट्ल्यास (२)प्रमाणे निश्चित केलेले मूळ प्रभाग किंवा टीममधील एखादा भिडू यांत संतुलन साधण्यासाठी एखादा बदल करणेही उचित ठरते.

हेज फंड व्यवस्थापक जोएल ग्रीनबाल्ट यांनी 'The Little Book That Beats the Market' या त्यांच्या पुस्तकात अशीच एक सोपी गुंतवणूक पद्धती सांगितली आहे. ती आणि मायकेल बी हिगिंग्ज यांनी लोकप्रिय केलेली 'Dogs of the Dow' थिअरी ह्या समभागांच्या निवडीत लाभांशाला सर्वाधिक महत्त्व देतात.

'गुंतवणूक' हेही आज अन्य कोणत्याही शास्त्राएवढेच एक विकसित शास्त्र आहे. त्यात घेतले जाणारे निर्णय अधिकाधिक यशस्वी व्हावेत म्हणून उपलब्ध माहितीचे प्रचंड प्रमाणावर विश्लेषण, पृथक्करण केले जाते. किचकट गणिती सूत्रे, संगणकीय प्रोग्रॅम्स मांडले जातात. त्याचमुळे जेथे एकीकडे जॉर्ज टेलर यांनी शोधलेल्या ठोकळेबाज 'स्कर्ट लेंग्थ थिअरी'सारखे अतिशय प्राथमिक, सामान्य ज्ञानावर आधारित तर्क अस्तित्वात आहेत, त्याच वेळी दुसरीकडे बेटिंगमधील धोका लक्षात घेऊन व्यवहाराचे प्रमाण निश्चित करणारा 'केली फॉर्म्युला' अथवा 'ऑप्शन्सचे रास्त मूल्य ठरविण्यासाठी उपयुक्त असणारी 'ब्लॅक-शोल्झ' यांची पद्धती, अशी अवघड गणिती सूत्रेही आहेत.. प्रथमदर्शनी असे संगणकीय वा शास्त्राधारित मार्ग अधिक सुरक्षित वाटत असले, तरी आध्यात्मिक दाखला द्यावयाचाच झाला तर प्रचंड कर्मकांडे करून केलेल्या भक्तीपेक्षा 'दोन हस्त(क) आणि एक मस्तक' एवढेच पुरेसे ठरते, असे म्हणतात तेच येथेही खरे आहे. एका नामांकित फंड व्यवस्थापकाने याच विषयावर मद्याच्या गुणवत्ता परीक्षणाचे सुरेख उदाहरण दिले आहे. त्याच्या मते आज शास्त्राच्या लक्षणीय प्रगतीनंतरही 'चव-वास’ घेऊन करावयाची पारंपरिक पद्धतच (sniff-swish--spit) ज्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ समजली जाते, तद्वत गुंतवणूक करतानाही ‘कॉमन सेन्स'वर आधारित निर्णयच अनेकदा अधिक फायदेशीर ठरतात.

अलीकडे High Frequency Trading हा मुद्दा थोडा प्रकाशझोतात असल्याने मी या मुद्द्याकडे वळतो. अलीकडील काळात वाढते संगणकीकरण वा दळणवळण यामुळे शेअर्सची खरेदी/विक्री करणे हे अक्षरशः बाजारातून भाजी आणण्यापेक्षा सोपे झाले आहे. अंगठ्याने मोबाइलवरील दोन-चार बटणे दाबा, दोन-चार-पाच लाखाची उलाढाल करा असा जमाना आला आहे. साहजिकच सामान्य गुंतवणूकदार करीत असलेल्या व्यवहाराची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. अर्थात, ट्रेडिंग हा पूर्णतः वेगळा विषय आहे, मी सध्या मध्यम/दीर्घकालीन गुंतवणुकीपुरतेच हे लेखन मर्यादित ठेवतो आहे. तर सांगावयाचे काय, की वर एडेलमॅन साहेबांच्या यशस्वी व्यक्तींच्या यादीत दुर्दैवाने नसलेली तुमच्या-माझ्यासारख्या गुंतवणूकदारांची जमात, केलेल्या गुंतवणुकीविषयी डोळ्यांत तेल घालून जागरूक (?) असते आणि प्रॉफिट-बुकिंग, अ‍ॅव्हरेजिंग वा सेलिंग अशा विविध कारणांनी व्यवहार करण्यात आघाडीवर असते. किंबहुना व्यवहारांत जेवढी चपळता अधिक, तेवढा फायदा जास्त अशी अनेकांची समजूत आहे. पण खरे तर हे म्हणजे जो अधिक पुरवण्या लावतो, तो विद्यार्थी हुशार... असे समजण्यासारखेच आहे. अवतरणे देण्याच्या माझ्या सवयीला अनुसरून एक संदर्भ देतो. प्रा. टेरी ओडीन आणि ब्रॅड बार्बर यानी अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील ६६,४०० गुंतवणूकदारांची खाती तपासली आणि निष्कर्ष काढला - 'the more you trade, the less you earn.'

'लाईव्ह मिंट' या आर्थिक वर्तमानपत्राने गेल्या वर्षी आपल्या लोकप्रिय अशा 'सेन्सेक्स' या निर्देशांकातील सामील तीस समभागांबाबत केलेल्या तपासणीनुसार आढळून आले आहे की त्यातील प्रत्येक समभाग हा सरासरी ५५ वेगवेगळ्या विश्लेषकांकडून पारखला जात होता आणि मागील बारा महिन्यांच्या कालावधीत अशा तीस समभागांप्रती या बाजारतज्ज्ञांनी एकूण ८४८ वेळा त्यांची मते बदलली. जर असे असेल, तर एवढे 'पोर्टफोलियो चर्निंग' आवश्यक आहे का? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे आणि निदान माझ्यापुरते तरी "नाही" असेच याचे उत्तर आहे.

फूटबॉलमधील पेनल्टी किकचे महत्त्व तर आपणा सर्वांनाच माहीत आहे, अशा किकला थोपविण्यासाठी गोलीला सामान्यतः एक सेकंदापेक्षाही कमी वेळ मिळतो. साहजिकच उजवीकडे झेप घ्यावयाची की डावीकडे, याचा आडाखा गोलीने आधीच बांधलेला असतो. सामन्याचा निकाल ठरविणारा तो क्षण असतो..... मायकल बर्ली एल यांनी सर्वोच्च दर्जाच्या स्पर्धेतील अशाच अनेक किक्सचा अभ्यास केला आणि त्यांना आढळले की गोली जर कोणत्याही दिशेला न झेपावता मध्यभागीच सावध असता, तर किक वाचविण्याची शक्यता जास्त होती. झेप घेण्याच्या कृतीपेक्षा सावधपणाची कृतिहीनता अधिक फायदेशीर ठरली असती. पण पुढे बर्ली अशा झेप घेण्यामागची मानसिकताही उलगडतात. नुसते उभे राहण्यापेक्षा आपण आपल्याकडून पूर्ण प्रयत्न केला ही वाटणारी मानसिक समाधानाची बाब गोलकीपरच्या दृष्टीने निर्णायक ठरते. आपण वा आपला फंड व्यवस्थापकही बहुतेकदा याच मानसिकतेचे शिकारी असतो. आपल्याला परिणामांपेक्षाही 'मी प्रयत्न तरी भरपूर केले' ही भावना महत्त्वाची वाटते.

मला वाटते, तूर्तास एवढे पुरे. 'दिसामाजी काहितरी घ्यावे/विकावे, प्रसंगी अखंडित ट्रेडीत जावे..' हा आपला खाक्या असल्यासयेथून पुढे तरी सोडावा, बफे साहेबांनी केलेला 'benign neglect & bordering on sloth, remains the hallmark of his investment process.' हा खुलासा जमल्यास आचरणात आणावा.

येते संवत २०७३ सर्व मिपाकरांस व त्यांच्या कुटुंबीयांस भरपूर सौख्याचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा!!!

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 12:03 pm | यशोधरा

इंटरेस्टींग!

पैसा's picture

31 Oct 2016 - 4:51 pm | पैसा

अर्थक्षेत्रावर अजून लिहा!

चौकटराजा's picture

31 Oct 2016 - 5:04 pm | चौकटराजा

मी स्वतः माझी एक थिअरी काढली होती ती अशी की साधारण पणे बिनडोक मुलगा कधी वर्गात पहिला येत नाही तर पहिल्या तीन मुलातच पहिला येण्याची चढओढ असते. त्याप्रमाणे समजा ऑटो क्षेत्र घेतले तर त्यात बजाज व हिरो यांचीच चढाओढ असणार सबब पाच सहा सनातनी क्षेत्रे निवडून त्यातील प्रत्येकी दोन हुशार कंपन्यांचे एकेक शेअर महिन्याच्या सात तारखेला जो भाव असेल त्याला खरेदी करायचे. रिलीजसली. झाला एस आय पी तयार. ज्या॑ क्षेत्रावर तांत्रिक प्रगतीने आमुलाग्र बदल घडतो त्याचे शेअर घ्यायचे नाहीत तर खाद्य, औषधे, पर्यटन ,यांचे घ्यायचे .

पगला गजोधर's picture

31 Oct 2016 - 5:15 pm | पगला गजोधर

सुंदर लेखं !

घरचा वरण भात, साजूक तूप, लिंबाची फोड, पापड, मेतकूट .... ज्याप्रमाणे दिसायला साधं सोपं सरळ असतो, आणि शरीर पोषक असतो.

त्याप्रमाणे तुमचा हा गुंतवणुकी संधर्भातील लेख, हेल्दी आहे ....

अजून नियमित पणे अशी गुंतवणुकी संधर्भातील सिक्रेट्स वाचायला आवडतील ....

अभिजीत अवलिया's picture

2 Nov 2016 - 8:05 am | अभिजीत अवलिया

आवडला लेख. मी स्वतः ह्या लेखात तुम्ही लिहिले आहे तसेच वागतो माझ्या गुंतवणुकीबाबत.

रायनची आई's picture

3 Nov 2016 - 3:07 pm | रायनची आई

फार्मा आणि बॅन्किन्ग सेक्टर इनवेस्ट करण्यास चान्गले आहे. डे ट्रेडिग च्या भानगडीत कधीहि पडू नये. अजून एक..स्टॉक इनवेस्टमेन्ट मधून जो डिवीड्न्ड येइल तो सुद्धा रि-इनवेस्ट करावा..आपल्या खर्चासाठि वापरू नये तरच पोर्टफोलिओ वाढेल.

श्रीगुरुजी's picture

3 Nov 2016 - 3:25 pm | श्रीगुरुजी

इन्फोसिसच्या समभागाची किंमत आता ९६६ इतकी कमी झाली आहे. खरेदीसाठी ही अत्यंत आकर्षक किंमत आहे. ९५० च्या आसपास घेतल्यास एप्रिलपर्यंत किमान ११५० पर्यंत नक्की जाईल.

रायगड's picture

18 Nov 2016 - 11:51 pm | रायगड

योग्य मांडले आहे.