घरचा हेर

रातराणी's picture
रातराणी in लेखमाला
29 Oct 2016 - 12:08 am

घरचा हेर

"किसना, किसना हे"

तिरिमिरीत चाललेल्या किसनानं आबांची हाक ऐकून मागं वळून पाह्यलं. पण गडी थांबला नाय. धुसफुसत तसाच चालत राह्यला.

वेग वाढवून आबांनी किसनला गाठलं.

"असं काय करता किसनराव? चला आता घरी. शांत व्हा."

"हं! ह्या!"

"किसनराव, चला म्हणतो ना. तथं सूनबाईच्या डोळ्यांचं पाणी राहीना किती वाडुळ. आन तुमी आसं ल्हान पोरावानी तरातरा उठून आलाय. आमी म्हातार्‍या माणसांनी आता तुमच्या मागं कुठंवर पळायचं... घ्या जरा शांततेत. संसार म्हणला की भांड्याला भांडं लागायचंच. "

"आबा, तुमी म्हणून म्या ह्या घरात थांबलोय. नायतर कवाच निगालू हुतो पंढरीला."

"आता कुठं जाताय आणि पंढरीला. झालं आता हिकडतिकडं महिनापंधरा दिस गेलं का सुगी आली. शेतात कामं हायेत."

"हं" म्हणून किसन आबांच्या मागं मागं चालू लागला.

महिना-दोन महिन्यांत हा कार्यक्रम ठरलेलाच असायचा. कशा न कशावरनं किसन आणि रखमाचं भांडण. त्याला काय कारण न्हाय का काळवेळ न्हाय. बरं, दोघंबी तशी शहाणीसुरती वागायला. लगीन झालं तवा आबा लय खूश. किसन आईविना वाढलेला. आता सून घरात आली की मायेच्या माणसाचा हात घरावर फिरंल आसं आबांच्या मनात. म्हणून आबांनी जरा लवकरच किसनचं लगीन लावून दिलं. रखमाबी तशीच, अगदी कोवळी पोर. आबांचा तर एक शबूद खाली पडू द्याची नाय. लै जीव लावला तिनं. सणासुदीला रखमा माहेरी गेली की हिकडं किसनला चैन पडाचा न्हाय. तर अशा ह्या सुखी संसारात वाद कशापायी असं तुमास्नी वाटलं असलं. त्याचं झालं असं - एक दिस किसन आपला शेतातनं आला. पायावर पाणी घेऊन सैपाकघरात आला. माठातलं तांब्याभर पाणी घटाघटा पिला न म्हणाला,

"रखमे, ऊनं उतरली बघ. चा केला न्हाय व्हय अजून?"

"करती. बसा जरा."

रोज शेतावनं आलं की सैपाकघराच्या दारात टावेल, पाणी घेऊन उभी राहणारी रखमा. आज काय बरंबिरं न्हाय का काय, म्हणून किसननं रखमाकडं पाह्यलं. चुलीशेजारी पाटावर बसलेल्या रखमाचं अजूनबी किसनकडं ध्यान नव्हतं. हनवटी गुडघ्यावर ठिवून विस्फारलेल्या डोळ्यांनी ती कसलंसं पुस्तक वाचीत बसली हुती.

"काय हाये ते? आता काय साळत जाणार हाय का पुन्यांदा?" हातातल्या तांब्यात तसंच हात घालून रखमावर चार थेंब टाकत किसन म्हणला, तवा मात्र रखमानं पुस्तक बंद करून बाजूला सारलं.

"काय व तुमीबी. आता कशाला साळत जातीया मी. गोष्टीच पुस्तक हाये ते." प्रसन्न हासत रखमानं चुलीतली लाकडं एकसारखी केली.

"बरं बरं. आता चा द्या लवकर."

रखमानं मग किसनचा, आबांचा, शेतातल्या गड्यांचा सार्‍यांचा चा बनिवला. किसनचा चा कपात वतला. वर तापवलेल्या दुधाची साय घातली न कप त्याच्याम्होरं ठेवला. किटलीत उरलेला चा गाळला. सोतासाठी एका कपात चा घेतला न पुना पुस्तकात डोकं घातलं.

"हं. आता काय सैपाकाचं बगा जरा. सारकं कसं घिऊन बसताय त्ये पुस्तक."

"आवं, चा तरी पिऊन घ्या. कुठं जातंय व्हय काम. ते चंद्रशील इन्स्पेकटरला खबर्‍या काय सांगतो तेवढं कळलं का घेतेच सैपाक कराय."

"कोण इन्स्पेकटर? तुमाला कशापाय पडल्यात नसत्या भानगडी?"

"आवं, त्यो ह्या पुस्तकात हाय. गोष्टीत."

"कशाची काय गोष्ट वाचीत बसलीस रखमे?"

"रक्ताची तहान." आधीच मोठं आसलेलं डोळ अजून मोठं करीत रखमा म्हणाली.

"काय डोस्कंबिस्कं फिरलं का काय?"

"आव त्या गोष्टीत एक माणूस हाये. चंद्रशील इन्स्पेकटरला डाउट हाये का ती बाई हाय, पर मला वाटतं माणूसच आसलं. त्यो का नाय लोकांच्या घरी जातोय काय बी काम काढून आन सम्द्यास्नी बेशुद करतो न का ना बराबर एक बाटली रगात घिऊन जातुया. काय करीत आसलं व एवढ्या रगताचं?"

"उगा कायतरी वाचीत बसू नका. डोस्क्याला ताप. सांच्याला देवळात भजन हाय. तिकडं जाऊन यितो जेवाय परत. सैपाक ठेवा करून. नायतर द्याल नुसतं रगात!"

"हं, जावा आता." लटक्या रागानं रखमा म्हणाली. उठून चहाची किटली किसनच्या हातात देत तिनं किसनला जवळ जवळ पिटाळलंच बाहेर.

वेणीफणी करून, टापटीप आवरून मग रखमान सैपाक करायला घेतला. रातच्याला आबा, किसन घरी आल्यावर तिनं चुलीवर गरम गरम भाकरी केल्या. सगळ्यांची जेवणं झाल्यावर झाकपाक करून रखमा माजघरात गेली. रखमाला येताना बघून किसन दिवा विझवाय लागला.

"आवं, थांबा थांबा." म्हणत रखमानं पुस्तक उघडलं न दिवा तिच्याजवळ घेत खाली लवंडली.

"व्हय, म्या काय म्हणतु, कुठनं आणलं कुठनं तुमी ह्ये आसलं पुस्तक?"

"आबांनी आणलंय."

"आबांनी? कवा? आन आसलं पुस्तक आबांना सांगितलंस व्हय आणाय?"

"आव सांगितलंबिंगितलं नाय. मागल्या आठवड्यात नाय का आबा तालुक्यासनं येता येता घरला गेलतं. तवा आण्णा म्हणालं बोलता बोलता, रखमाला लय वाचायचा नाद म्हणून. सारकी पुस्तक घिऊन बसायची. सैपाकपाणी सगळं करती न्हवं नीट? आबा म्हणलं, करती तर समदं झाक करती पोर. पर पुस्तक वाचीत नाय कवा. किसन आमचा सकाळी उठला की शेतात जातुया. त्याच्या डोक्यात आपलं शेताशिवाय काय नसतं. मी काय म्हणतु तुमी रखमाची काय पुस्तकं आसतील ती द्या माज्यासंगट. आता गेल्या गेल्या तिला दितु."

"आसं?

"व्हय तर. आबांनीच आणल्यात सगळी पुस्तकं. आता पुना तालुक्याला गेल्याव नवीन आणतो म्हनल्यात."

"बरं हाय" कौतुकभरल्या नजरेनं रखमाला जवळ घ्याचा प्रयत्न करत किसन म्हणला.

"उं. इन्स्पेकटर चंद्रशील आता पकडणार हाये त्या माणसाला."

काहीशा नाराजीनंच किसन दुसर्‍या कुशीवर वळला.

हा शीन रोजच हुया लागला. जवा बगाव तवा रखमा पुस्तक वाचीत. डोक्यातबी सारक पुस्तकातल्याच गोष्टी. इन्स्पेकटर चंद्रशील कसा हुशार, कसा धाडशी ऐकून ऐकून किसन तर हैराण हुन गेलावता. त्यात भरीस भर रखमा आता कुठं खुट्ट वाजलं की उठून बसायची. झोप, मांजरबिंजर आसलं म्हणून किसननं तिला सांगावं तर रखमा आवं चोरदरोडेखोर आला तर समद्यास्नी मारून टाकंल म्हणून किसनला घाबरून सोडणार. किसन काय दाद देत न्हाय म्हणता आता रखमा सोत्ताच जवळ काठी घिऊन झोपाय लागली हुती.

किसन तसा साधा सरळ माणूस. आपण भलं, आपलं काम भलं. आपण कुणाचं वाईट केलं नाय का आपल्याबर कुणी वाईट करत न्हाय, असा सादासोपा हिशेब त्याचा. गावात कुणाच्या अध्यात नाय का मध्यात नाय. रखमा सारकं पुस्तक वाचून त्याला गुन्हेगारांच्या गोष्टी सांगाय लागली का त्याला उगाच तिची काळजी वाटायची. कवा देवळात गेली तर तथंबी रखमाचं लक्ष देवापेक्षा आजूबाजूला कुणाचं काय चाललंय ह्यातच. देवळाभायेर माणसांच्या चपला किती, बायकांच्या किती, कुणाची पोरं भायेर खेळत हुती, कोण बिडी वडत हुबं हाय, देवाला कुठली कुठली फुलं घातलीत, पेढे हायेत का साखरफुटण्याचा निवद, ह्येच समदं तिच्या ध्यानात. किसन म्हंजी भोळा सांब जणू! रखमाच्या वागण्यानं पार वैतागून गेलावता. किसन दमूनभागून शेतावनं आला का झालीच रखमाची झडती सुरू.

"काय वं, आज कोण कोण आलवंतं शेताव?"

"त्यो शेजारचा बबन्या उगा तुमच्याशी बोलत हुबा राहून त्याची म्हस सोडतो बगा आपल्या बांधाव."

"आज जरा हरणीनं दूध कमी दिलंय. कोण काय देत नसंल न्हवं खायला?"

"ती शीतली आलीवती का रानात? मला इचारत हुती किसन दिसत न्हाय रानात म्हून?"

"तुमी नक्की रानातच गेला हुता ना?"

आधी उगा खोड काढीत आसल म्हून किसन काय म्हणत न्हवता. रोजचंच झाल्यावं मग किसनाचाबी आवाज वाडु लागला. आबास्नी तर काय कळंना असं का कराय लागली पोरं.

एक दिस येरवाळीच उठून किसन शेताकडं निघाला. आबा उठून गोठयात गाईम्हैशीना वैरण तोडत हुतं. किसनला जाताना बघून आबा म्हणालं,

"किसन, आरं एवढ्या घाईघाईत का म्हून निघाला? न्याहारी करूनच जा की."

"राहू द्या आबा. इन्स्पेकटर चंद्रशील आला तर दे म्हणावं त्यालाच न्याहारी."

आबांना काय कळंना हा काय म्हनतुय. कालपतुर तर नीट हुता. हातातली वैरण तशीच धरून आबा किसनला जाताना बघत हुतं, तवर मागनं रखमी आली.

"आवं, आवं, चा तरी पिऊन जावा"

किसननं काय माग वळून पाह्यलं नाय. गोठयाकडं लक्ष गेल्याव आबांना बघून रखमी आदुगर चपापली. आबांनी हातांनीच कुणास ठाऊक काय झालं म्हून खूण केली.

ऊनऊन पाण्यानं अंघोळपाणी उरकून, देवपूजा करून आबा सैपाक घरात आलं. रखमीनं चा न्याहारी करून ठिवली हुती. एका किटलीत गड्यामाणसांचा चा भरत हुती. चा पिता पिता आबांनी इचारलं,

"रखमे, आज कोण इन्स्पेकटर चंद्रशील येणार हाये. त्याला दे म्हणून सांगितल्या न्याहारी. कुठं काय भानगड केल्या कोण जाणे. पण तू काय काळजी करू नगं. मी बगतो."

आबांच बोलणं ऐकून रखमान पदर तोंडाव धरला न खुसूखुसू हासू लागली.

"काय तुमा दोगांचं वागणं काय कळत नाय मला म्हातार्‍याला." म्हणत आबांनी चाची किटली आणि न्याहारीचा डबा उचलला न शेताकडं निघालं.

शेतात किसननं आबांना इन्स्पेकटर चंद्रशील कोण ते सांगितलं. खरं काय कळल्याव आबांना हासू का रडू कळंना. किसनाचा उसना राग बघून आबा म्हणालं,

"आसू द्या किसनराव. तेवढाच विरंगुळा पोरीला. आपुन दोगं हिकडं आसं दिसभर शेतात. पोरगी घरात एकटी. जीव रमलाय न्हवं आता तिचा आपल्या घरात. मग झालं तर."

"हं. आता हिथून पुढं काय तसली पुस्तक दिऊ नगा आबा तिला. रहश्यकथा वाचती म्हणं."

"हां तेवढं मातुर सांगू नगसा किसनराव. आरं पोरीवानी माया लावल्या तिनं. तिचं मन न्हाय मोडायचा म्या."

"आन पोटच्या पोराचं मोडाल तर?"

"किसन बाबा, घ्याचं समजून आपुनबी जरा. ल्हानगं हुता तवापासुन तुमचा हर शबुद म्या झेलला. समदं तुमाला पायजे तसं केलं, केलं का न्हाय?"

"व्हय" खाली मान घालून किसन म्हणाला.

"मग माजं ऐका. सबुरीनं घ्या. पोरसवदा वय हाय अजून. कळता कळता कळंल म्हणायचं."

पण आधीचाच देवभोळा किसन. रखमाच्या कटकटींनं त्याचं संसारातनं ध्यान उठाय लागलं. सकाळी लवकर उठून शेताव याचं. मग सांच्याला शेतावच चा प्याचा. काम झालं की देवळात जायचं. आरती, भजन झालंच तर कधीमधी एखादा कीर्तनकार आला तर कीर्तन ऐकायचं आन घरी यून झोपायचं. घरदार शेत समदं काय सोडून निघून जावावं वाटाय लागलं त्याला. पण मग आबांना बगुन गप बसत हुता. तरीबी कधी मधी एखादा खटका उडलाच, तर किसन आसा घरातनं जातो म्हून भायेर पडायचा. धावतपळत जाऊन आबांनी मग त्याला परत आणायचं. रखमा तिच्या रहश्यकथांमधी गुंग अन हिकडं किसनाला बी नवा छंद लागला. नाय नाय, तसा काय तमाशा, दारूबिरूचं काय मनात आणू नगा. त्याचं काय झालं, गावात एक स्वामीजी आलं लांबच्या मठातनं. किसनला स्वामीजींचा मोठा आधार गावला. रोज रातच्याला स्वामीजी पर्वचन सांगत. भक्तिभावे किसन ऐकायचा. स्वामीजी बगत हुतं, रोज न चुकता एक तरुण आपल्या पर्वचनाला आसतोय. तसं पाह्यलं तर आधी म्हातार्‍या बायाबापड्या असायच्या, पर नवी शिरेल सुरू झाल्यापासन त्या काय दिसत नव्हत्या. चार म्हातारी माणसं असायची. बाकीची पोरं नुसतीच देवळाभायेर यिऊन टंगळमंगळ करायची. तर एक दिस न राहवून स्वामीजीनी किसनला पर्वचन झाल्यावं थांबाय लावलं.

"बाळ, मी पाहत आहे. तू रोज प्रवचनाला येतो न चुकता. तुझ्या वयाची इतर मुलं बाहेर टंगळमंगळ करत असताना तू मात्र शांत प्रवचन ऐकतोस. तुझं फार कौतुक वाटतं."

"काय करणार महाराज. घरी जाऊन बायकुची कटकट ऐकण्यापरीस तुमचं पर्वचन परवडलं."

"लग्न झालं आहे तुझं? वाटत नाही तुझ्याकडं बघून.."

"व्हय तर. केलं नसतं तर बरं झालं आसतं म्हाराज."

"अरेरे! असं बोलू नको बाळ. त्या देवीची असेल काही अडचण. करू आपण उपाय ह्यावर. सर्व ठीक होईल. जा बाळ. निश्चिंत मनाने घरी जा."

त्या दिवशी किसन खुशीतच घरी गेला. रोज आपला तो वाट बघायचा. स्वामीजी आता सांगतील उपाय, मग सांगतील पण स्वामीजी काय सांगत नव्हतं. एक दिस किसन जरा वैतागूनच देवळात गेला. त्या दिवशी पर्वचन झाल्यावं स्वामीजींनी किसनला जवळ बोलावलं.

"काय झालं किसन? आज फार उद्विग्न दिसतोयस तू."

"स्वामीजी, तुमी म्हणला उपाय सांगतो पर अजून काय तुमी उपाय दिला नाय. तुमी म्हणत आसला तर म्या तुमच्याबर सगळं सोडून यितो. पर कायतरी करा म्हाराज."

"अरे अरे. असं सोडून यायच्या गोष्टी करू नको. ह्या वाटेवर अनेक अडचणी आहेत. अनेक वर्षांच्या साधनेनंतर आता आम्ही या पदाला पोहोचलो आहोत. त्यासाठी किती कष्ट करावे लागले, ते तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. "

"मग काय करू म्हणता म्हाराज? मन पार उठलंय संसारातनं."

"सांगतो किसन. पण मी हा उपाय तुला सांगतोय हे या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. बोल, मान्य आहे का तुला?"

"तुमी काय म्हणाल त्ये करतो म्हाराज. पर उपाय सांगा."

"हे बघ तू सांगत होतास तुझी बायको फार रहस्यकथा वाचते."

"होय म्हाराज. वाचती तर वाचती. पर सोत्ताच इंस्पेकटर चंद्रशील असल्यावानी माझी तपासणी करत असती जवा बगाव तवा."

"तू ओळखतोस काय इन्स्पेकटर चंद्रशीलला?" नरम आवाजात स्वामीजी म्हणाले

"कुठलं काय म्हाराज. त्ये समदं पुस्तकात हाये वं. तुमी कशाला घाबरताय?"

"अरे, घाबरतोय कशाला! छे छे, खातरी केली फक्त. तर मला सांगायचं आहे की सारखं सारखं त्या रहस्यकथा वाचून तुझ्या बायकोचे मन दूषित झालं आहे. तिच्या आजूबाजूला वाईट शक्तींचा, वाईट विचारांचा प्रभाव वाढला आहे. त्या प्रभावाखाली या शक्ती तुमच्यामध्ये भांडण घडवून आणत आहेत."

"अस्स्सं? मग आता कसं करायचं म्हणता?"

"अरे, घाबरू नको. माझ्याजवळ यावर जालिम उपाय आहे. तू असं कर, तुझ्या बायकोचे जे काही दागिने असतील, ते सर्व मला आणून दे. या दागिन्यांची शुद्धी करून ते तिच्या शरीरावर घालून मग तिला या देवळात घेऊन ये."

"दागिने? तिला काय तसला नाद न्हाय वं. उगं आपलं अंगाव कायतरी असावं म्हून घालती. नायतर समदं डाग तसंच पडून हायेत."

"अरे, रोज नसेल घालत, तरी स्त्रीचं मन सर्वात जास्त तिच्या दागिन्यांमध्येच असतं. तू मनात शंका आणणार असशील तर राहू दे बाबा."

"नाय नाय म्हाराज. तसं काय मी म्हणत नाय. एकडाव माफी करा. आसं बगा, उद्या रातच्याला आणून दितो बगा."

"बरं. उद्या काही करून आण मात्र. आता अमावस्या जवळ आली आहे. वाईट शक्ती प्रबळ होतात या काळात. तेव्हाच त्यांच्यावर उपाय करायला हवा."

"व्हय म्हाराज. उद्या डाग घिऊनच येतो बगा."

"जा बाळ. तुझं कल्याण होवो!"

महाराजांना नमस्कार करून किसन निघाला खरा. पर त्याला येगळीच चिंता लागून राह्यली. एरवी बारीकसारीक गोष्टींवर नजर ठेवणार्‍या रखमाला चुकवून फडताळातनं दागिनं काडायचं म्हंजी लयच जोखमीचं काम. म्हाराजांनी त्यापरास वाघिणीचं दूध काढून आणाय सांगितलं आसत तर बरं झालं आसतं, असं किसनला राहून राहून वाटत हुतं. जन्मात कधी कुणाच्या वस्तूला हात न लावलेल्या माणसानं आता चोरी करायची आन ते बी आपल्याच घरात, म्हणताना कसं जमायचं? आता समदं देवाच्या हवाली म्हणून किसन घरी जाऊन झोपला. रखमाची आधीच झोप लागल्याली. देव पावला म्हणत किसन तसाच चुळबुळत पडून रहायला.

सगळीकडं सामसूम झाल्यावं किसन उठला. अंधारात चाचपडत देवघरात गेला. अंदाजानी फडताळातलं डबं चाचपून बघू लागला.

"कुठं दडवल्यात कुणास ठाऊक" मनातल्या मनात म्हणत तो उभा हुता, तवर मागनं काठीचा एक जोरदार तडाखा बसला.

"आयोव आयोव" कळवळून किसन वरडला. किसनचा आवाज ऐकताच रखमा घाबरली.

"आर देवा! तुमी हायेसा व्हय? मला वाटलं का चोर आला म्हणून."

"काय बायको हायेस का काय?"

त्यांचा दंगा ऐकून अंगणात झोपलेलं आबा उठून आत आलं.

"काय झालं ग रखमा? एवढ्या रातच्याला का भांडताय? काय रं किसन?"

"आबा, आवं, मला वाटलं ह्ये अजून आलंच न्हाईत देवळातनं. आन चोर आलाय का काय म्हून दिला एक काठीचा तडाखा."

"काय र किसन? एवढ्या रातच्याला तू हिथं काय करतोय?"

"बगा की आबा, सारखं आपलं देव देव देव. बायकुची काय पर्वाच नाय."

"शानी हैस. आन तू सारखं चंद्रशील चंद्रशील करती तवा...."

कपाळावर हात मारून घेत आबा म्हणालं,

"ए पोराहो. काय काळवेळ काय बगत जावा. आदी मला सोक्षमोक्ष लावू द्या. किसन तू कशाला आलावता हिथं?"

"काय नाय आबा. आसच आपलं जरा फडताळात काय हाये ते बघत हुतो."

"आता? ह्या येळेला?" एक हात कमरेवर आन एक आ वासलेल्या तोंडाव ठेवत रखमा म्हणाली.

"तुला काय करायचंय गं?"किसन चिडून म्हणाला.

"आं किसनराव. म्या हिथंच हाय अजून ध्यानात आसू द्या." आबांनी दरडावलं.

"आसू द्या आबा. मला ठाव हाय काय शोधत हुतं ते." फडताळाजवळ भिताडावर लावल्याला शंकरपार्वतीचा फोटू रखमान सरकवला. त्याच्या माग एक बारीक देवळी केल्याली न त्यात एक डबा ठिवलेला. आबा न किसन दोघं बघतंच राह्यलं हे आणि कवा केलं रखमानं म्हून. डबा उघडून किसनपुढं धरत रखमा म्हणली,

"बरोबर हाये ना? ह्येच पायजे हुतं का नाय?"

"दागिनं? कशाला रं किसन? आरं, तुझ्या आईचं न रखमाचं हायेत ते. तशी काय निकड हुती तर मला सांगायचं न्हाय व्हय."

किसन नुसता खाली मान घालून हुबा हुता. आपण पकडलं जाणार त्याला माहिती हुतंच, पर एवढ्या लगच्या लगी पकडलं जाऊ हे काय त्याला वाटलं नव्हतं.

"ते न्हाईती काय बोलायचं आबा. आता स्वामीजीच बोलत्याल."

"काय म्हणतीस रखमा. देवमाणसास्नी आस म्हणू नाय पोरी."

"तुमाला काय ठाव नाय आबा. आशीच फसवत्यात समदी भोळ्याभाबड्या माणसास्नी. हे तुमचं स्वामीजी लंपास करणार हुतं बगा आपलं समदं सोनंनाणं. "

"काय सांगतीस पोरी?"

"व्हय आबा. म्या परवा देवळात गेल्याली दुपारच्याला तवा आपल्या शेजारची आक्का त्या स्वामीजींच्या पायाशी बसून हात जोडून बसली हुती. म्या आपलं म्हणलं आसलं काय तिची समस्या. पर मला बगुन स्वामीजींनी तिच्या हातातनं घाईघाईनं एक रुमाल घेतला न मांडीखाली झाकून ठिवला. तवाच मला का नाय डाउट आला, आता एवढं मोठं स्वामीजी तर आसं लपून छपून काय करतात?"

"मग?" न राहवून किसन न आबा एकदमच म्हणालं.

"मग काय. तिथनं आल्याव ग्येली की आक्कीच्या घरी. नानीनं सांगितलं त्ये स्वामीजी काय शांती का शुद्धी करून देणार हायेत म्हणं, तवा आक्कीच समदं दागिनं त्येना निऊन दिल्यात."

"काय सांगती? पर आक्कीला कुणाला सांगू नगं म्हणून सांगितलं नव्हतं व्हय." किसन पार गोंधळला हुता. आपल्याला एवढी ताकीद दिली का कुणाला सांगू नगं म्हणून आन आक्कीला काय म्हणलं नाय स्वामीजी? आसं कसं?

"सांगितलं व्हतं तर. बायकांच्या पोटात काय राहत का? आक्कीनं कुणाला सांगू नगं म्हून नानीला सांगितलं. नानीनं कुणाला सांगू नगं म्हून मला सांगितलं."

"हा, म्हून काय म्हाराज फशीवत्यात व्हय? समद्यास्नीच मदत करीत आसत्याल. जगाच्या कल्याणासाठी तेनी जन्म घेतलाय." मनोभावे हात जोडत आकाशाकड बघत किसन म्हणाला.

"किसनराव, जगाच कल्याण करणारी माणसं कुणाला सोत्ताच्याच घरात चोरी कराय लावत न्हाईती. ह्याचा कायतरी सोक्षमोक्ष लावलाच पायजे. आताच्या आता जाऊ या देवळात आन त्याला जाब विचारू या." आबांनीच आसं म्हणल्याव मग किसन गप बसला.

"व्हय आबा. पर आपल्याला त्याच गुपित कळलंय. त्याला आता लगीच कळलं तर त्यो पसार हुणार. त्येला पकडून तुरुंगात धाडला पायजे."

"आता कसं करू या म्हणती पोरी?"

"आबा, आता आजची रात्र जाऊ द्या. सकाळी उठून म्या सांगती. आन तुमी आज आता पुना देवळाच्या आसपास पण फिरकू नगसा." किसनला नजरेनीच दम भरत रखमा माजघराकडं गेली.

सकाळी उजाडताच रखमानं आबांना तातडीनं तालुक्याला पाठिवलं. रात्रीच्या गडबडीनं किसन सकाळ उशीरपर्यंत झोपला हुता. सकाळ उठून त्यानं आबा कुठं हायेत इचारल्याव रखमान "हायेत हिथं, जरा गावात गेल्यात" म्हून तुटक उत्तर दिलं. आपली शपथ घालून झाला परकार कुणाला सांगू नका ह्या बोलीवर शेवटी तिनं किसनला शेतात जाऊ दिला. किसन निघताच ती तातडीनं आक्कीच्या घरी गेली.

"नानी, वं नानी, हाय का घरात?" खणखणीत आवाजात रखमानं हाक मारली.

तिचा आवाज ऐकून काठी टेकत नानी भायेर आली.

"काय ग रखमे? आज येरवाळी काय काम काढलंस?"

"काम लय महत्त्वाचं हाय नानी. आक्कीला बोलवा की जरा."

"बोलीवती की, बस."

आक्की आल्याव दोघी जणी खुसूफुसू बोलत व्हत्या. रखमानं सांगितल्यालं ऐकून आधी आक्कीनं डोळे विस्फारले. पुना आकाशाकडं बगत नमस्कार करून उजवा हात डाव्या गालाला न डावा हात उजव्या गालाला लावत चुकचुकल्यासारखं काही पुटपुटली. घाईघाईत आत जाऊन एक रुमाल घिऊन आली. त्या रुमालातला ऐवज बघता रखमाच डोळ पांढरफटक पडलं.

आता आबांना न किसनला काय तोंड द्यायचं ह्या इचारात रखमा घरी गेली, तवा अंगणातल्या खाटवं आबांसोबत एक पावना बसला हुता. आबांना बघताच रखमाच्या डोळ्यातनं घळाघळा पाण्याच्या धारा लागल्या. तशीच तोंड लपवून सैपाकघरात गेली. आबा आत यिऊन तिला काय झालं इचारू लागलं. त्यांच्या मनात किसन भांडण करून पुना निघून ग्येला का काय? आबांना रखमानं खरं काय सांगताच आबासुदिक घामाघूम झालं. भायेर यिऊन त्यांनी पावन्याला हात जोडले.

"आमच्याकडनं मोठी चूक झाली बगा सायेब."

"काय झालं मला कळेल का? ताई का रडत आहेत? सर्व ठीक आहे ना?"

"सायेब, आव आमी खर्‍या देवमाणसावं शंका घेतली. रखमा आव आक्कीच्या घरी गेली हुती. तवा आक्कीनं समदं दागिनं म्हाराजानी जसं हुत तसं परत दिल्यालं दाखिवलं रखमाला. माफ करा सायेब, ही पोर लै पुस्तक वाचून तिच्या मनात सौंशय आला."

तोपर्यंत रखमा सावरून भायेर आली.

"मी काय म्हणतो ताई, तुम्ही मला एकदा दाखवता का आक्कीचे दागिने?"

जित्याची खोड जाता जात नाय म्हणता रखमा पावण्याला निरखून बगु लागली.

"घाबरू नका, मी इन्स्पेकटर कुमार." म्हणत पावन्यानं खिशातनं ओळखपत्र काढून दावलं.

"पर तुमी नुसतं सांगून येणार हुता ना आबा?"

"होय. ते फक्त तक्रार करायला आले होते. पण झालं असं की मागच्या काही महिन्यांपासून आम्ही या इसमाच्या मागावर असूनही तो आमच्या हाती लागत नव्हता. प्रत्येक गावात नवी ओळख, नवी चलाखी. शिवाय पुरावा काहीच नाही मागे. तेव्हा आबासाहेब माझ्याकडे आल्याबरोबर मी स्वतः त्यांच्याबरोबर इकडे आलो. आधी सगळीकडे आम्हाला गुन्हा होऊन गेल्यावर बोलावलं गेलं. पण तुमच्या सजगपणामुळे आम्हाला या गावात मोठा गुन्हा व्हायच्या आधीच खबर मिळाली."

"पर सायेब, ते स्वामीजी तर खरे हायेत ना? आक्कीचं दागिनं परत केल्यात त्यांनी."

"हा तुमचा भ्रम आहे रखमाताई. तुम्ही पाहिले ते दागिने खरे नव्हेतच. त्यांच्या आधीच्या दागिन्यांसारखे दिसणारे ते खोटे दागिने ह्ये स्वामीजी करून आणतात. ते दागिने हे स्वामीजी लोकांना परत करतात. जोपर्यंत लोकांच्या लक्षात येतं, तोपर्यंत हे पसार झालेले असतात, कुठलाही माग न ठेवता."

"पर स्वामीजी तर एकटेच असतात. कुणी कधी दिसत न्हाय त्यांच्याबर."

"तुम्ही फार हुशार आहात ताई. पण तुमच्या लक्षात आलं का बरोबर अमावस्येच्या आधी स्वामीजी लोकांकडून दागिने घेतात. आणि अमावास्या झाली की शुद्धीकरण करून परत देतात. भोळ्याभाबड्या लोकांना वाटतं, याचा संबंध वाईट शक्तींशी आहे. पण खरं तर असं करण्याचं कारण फक्त रात्रीच्या अंधाराचा फायदा घेणं हा आहे. "

"असं? मग आता आपण पकडू या जाऊन त्या स्वामीजीला."

"नाही, आता लगेच नाही. आक्कीचे दागिने आपल्याला मिळतील का काही वेळासाठी?"

"मिळतील की. म्या बोलीवती तिला." मघाशी रडवेली झालेली रखमा पुन्हा खुलून जाऊन आक्कीला बोलावाय गेली.

आक्की तिचं दागिनं घिऊन आल्यावर इन्स्पेकटर कुमारनी दागिनं खोटं हायेत म्हून सांगितलं. खातरी करायला गावातला सोनार बोलिवला. तर त्यानंबी दागिनं खोटंच हायेत म्हणून सांगितलं. रडून रडून आक्कीचं डोळं लाल झालं.

रात्रीच्या झाल्याप्रकारानं किसनचं काय शेतात लक्ष लागना. आबांना न सांगता आपण काय दागिनं घ्यायला नाय हवं हुतं आसं त्याला वाटाय लागलं. त्या दिवशी त्यो जरा लवकरच शेतातनं परत आला. परत आल्याव बगतो तर आबांबर कुणी पावना बसल्याला. नानी, आक्की न अजून काय बाया अंगणात बसल्या हुत्या. रखमा कुठं दिसली न्हाय म्हणता किसन घाबरला. आबांबर आल्याला पावन्याला नमस्कार करून किसन पायरीवर बसला. किसन आल्याला दिसताच रखमानं पाण्याचा तांब्या आणून दिला. रखमाला बघून किसनच्या जीवात जीव आला. कुणाचं लक्ष न्हाय बघून किसननं तांब्या घेता घेता त्यात हात घालून चार थेंब रखमावर शिंपडलं. लाजून रखमा पुना सैपाकघरात पळाली.
आपल्या घरला कशापायी समदी जमल्यात म्हून किसनना न राहवून इचारलं,

"नानी, काय व हिकडं कसं काय आज?"

"काय करतुस बाळा. फसलू बघ आमी त्या स्वामीजीला. रखमा हाय म्हून तुमी वाचला बघा."

पाणी पिता पिता किसनला ठसका लागला. आबांनी न इन्स्पेकटर कुमारांनी मग किसनला झाला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितलेलं स्वामीजींचं प्रताप ऐकून किसनला घाम फुटला. घसा कोरडा पडला.

"किसन, आता स्वामीजींना पकडण्यात तुम्हीच मदत करू शकता."

"मी? मला जमंल?"

"होय, न जमायला काय झालं? मी सांगतो तेवढं करा. मी असेनच जवळपास."

"बरं. सांगा मला."

सांच्याला रोजच्यासारखा पर्वचन ऐकाय किसन गेला. इन्स्पेकटर कुमार, आबा, रखमा, नानी, आक्की वेगवेगळ्या वेळी त्याच्या माग देवळाजवळ गेलं. भायेर उभ्या पोरांबर इन्स्पेकटर कुमार बोलत हुतं, पर त्यांचं समदं ध्यान आत देवळात स्वामीजी न किसनवरच हुतं. पर्वचन संपलं तसं समदी लोकं घराकडं चालली. किसन उठून स्वामीजींजवळ गेला. घाबरत घाबरत त्यानं सदर्‍याच्या खिशातनं एक रुमाल काढला.

"म्हाराज, तुमी सांगितल्याप्रमाणं समदं दागिनं आणल्यात. कवा मिळत्यालं शुद्धी करून?"

"वा वा! उत्तम किसन. मला वाटलं नव्हतं तू इतक्या लगेच दागिने आणू शकशील."

"समदी तुमची किरपा." आसं म्हणून किसननं रुमाल उघडून स्वामीजींम्होरं धरला. त्ये बघताच स्वामीजी रागानं लाल झालं.

"मूर्ख मनुष्या! दुसर्‍याच कुणाचे खोटे दागिने तू आम्हाला तुझ्या बायकोचे म्हणून देणार आहेस का?"

"न्हाय न्हाय म्हाराज, हे अगदी खरं हायेत दागिनं. रखमाचंच हायेत. शप्पत सांगतु."

"मला फसवतोस? हे दागिने रखमाचे असूच शकत नाहीत."

आस म्हणून ताड्कन स्वामीजी उठून बसलं. किसननं आणल्यालं आक्कीचं खोटं दागिनं बघून काहीतरी गडबड दिसत्ये हे स्वामीजींनी हेरलं आन आता हिथं थांबाय नग असा विचार करून त्ये म्हणलं,

"जिथे आमच्यावर विश्वास नाही तिथे आम्ही राहू शकत नाही. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती केली किसन. आता बस आयुष्यभर बायकोची कटकट ऐकत."

इन्स्पेकटर कुमारांनी इशारा करताच झाडामागं लपून बसल्याल आबा, रखमा, नानी, आक्की समदी देवळाकडं निघाली. त्यांना येताना बगुन स्वामीजी आता पळायलाच पायजे म्हून तसंच तोंड फिरवून पळू लागलं, तवर किसनानं त्यांना धरून ठिवलं. सोड सोड म्हणून स्वामीजी वरडू लागलं. इन्स्पेकटर कुमारानी धावत जाऊन स्वामीजींना धरलं न त्याच्या हातात बेड्या घातल्या.

"शाबास किसन आणि रखमा. तुमच्यामुळं आज एक मुरलेला चोर आम्हाला सापडला."

अचानक झालेल्या गोंधळानं अर्ध्या वाटत पोहोचल्याली माणसं देवळाकडं धावली. घरातल्या बाया, पोरं काय झालं म्हून त्यांच्यामागं पळू लागली. काय झालं? काय झालं? असा गलका उठला. स्वामीजींना घातलेल्या बेड्या बघून बायांनी तोंडाला हात लावलं. किसन आन नानीसारकं अजून काय लोकांकडन दागिनं घेतलं हुतं ती लोक घाबरून पुढं जाऊन इन्स्पेकटर कुमारांना प्रश्न विचारू लागली. सर्वाना शांत रहायला सांगून इन्स्पेकटर कुमार म्हणाले,

"लोकहो, हा माणूस स्वामीजी नाही. स्वामीजींच्या वेषात एक चोर आहे. गावोगावी जाऊन लोकांना फसवून ह्यानं लाखोंचे दागिने गडप केले आहेत. तुमच्यापैकी ज्यांना ह्यानं दागिने परत केले ते दागिने खोटे आहेत. मी स्वतः ह्या गोष्टीची खातरी केली आहे."

"साहेब, साहेब मग आता आमचे खरे दागिने परत मिळणार का?"

"ह्या माणसाकडून खरं काय ते कळल्यावर निश्चित तुमचे दागिने परत मिळवायचे प्रयत्न करू."

"पर सायेब, अगदी आमच्या दागिन्यासारखं दिसणार दागिनं ह्या माणसानं आणलं कुठून? त्ये काय नाय आता त्याला जिता सोडता कामा नाय. देवाच्या नावाखाली फशीवतो." आस म्हणून चिडलेला जमाव हातात दगड, काठ्या काय घावलं त्ये घिऊन धावला. एवढ्या समद्या लोकांना बघून स्वामीजी इन्स्पेकटर कुमारच्या हाताला झटका दिऊन पळाय लागलं. इन्स्पेकटर कुमारांनी हवेत एक गोळी चालवली. त्या आवाजाला घाबरून लोक हुतं तिथंच थांबलं. इन्स्पेकटर कुमारांनी धावत जाऊन स्वामीजींना पकडलं. तेंच्या पायावर लोटांगण घेत स्वामीजी म्हणालं,

"सायेब, मी सगळं खरंखरं सांगतो. पर मला वाचवा नाहीतर ही माणसं मारून टाकतील मला."

"बरोबरच आहे त्यांचं. त्यांच्या भोळ्याभाबड्या भावनांशी खेळून तू फसवलंय त्यांना. आता त्यांचे दागिने परत केलेस तरच वाचशील तू."

"सांगतो, साहेब सांगतो. देवळाच्या गाभार्‍यातून एक चोरवाट केली आहे. ती सरळ गावकुसाबाहेर निघते. तिथे एका वडाच्या झाडाखालीच ठेवलेत सगळे खरे दागिने."

साहेबांनी तालुक्यावरून बोलावलेले दोन हवालदार गर्दीत मिसळल्यालं हुतं. त्यांना इशारा करताच त्ये देवळात गेलं न चोरवाट शोधून काढली.

"बरोबर आहे साहेब. चोरवाट सापडली."

इन्स्पेकटर कुमारांनी मग त्यांना त्या वाटेनं जाऊन वडाच्या झाडाखाली पुरलेले दागिने घेऊन यायला सांगितलं.

"पर मी म्हणते हे समदं स्वामीजी तुमी करत कसं हुता?" एवढ्या वेळ शांत हुभ्या रखमानं इचारलं.

"रोज रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर मी थोडं थोडं खोदत होतो. रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावर लगेच मी प्रत्येकाला काही न काही उपाय सांगून त्यांच्याकडून दागिने घ्यायला सुरुवात केली. शुद्धीकरण करायच्या नावाखाली मी अमावस्या आली की माझ्या खोलीत बंद असल्याचं नाटक करत होतो. पण खरं तर मी चोरवाटेनं गावाबाहेर जात होतो. तिथं वडाच्या झाडाखालीच माझे वेगळे कपडे घालून दोन तीन दिवस मी लांबच्या गावात जाऊन खोटे दागिने शोधून आणत होतो. परत आल्यावर ज्याचे त्याला दागिने परत दिले की कुणाला संशयही येत नव्हता."

"नाही कसा, आमच्या रखमानं बरोबर वळिकला हुता तुझा डाव." न राहवून कौतुकानं आबा म्हणालं.

"खरं आहे आबासाहेब तुमचं. रखमाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच आज कितीतरी लोकांचे दागिने परत मिळत आहेत."

गावातल्या म्हातार्‍या बायका रखमाला जवळ घिऊन तिच्या तोंडावर हात फिरवीत हुत्या. बोटं मोडीत हुत्या. किसनबी मान ताठ करून रखमाचं कौतुक बघत हुता.

वडाच्या झाडाखालून दोन हवालदार परत येताच लोकांनी एकच जल्लोश केला. पण आता सध्या ते पुरावा म्हणून न्यावं लागत्याल असं म्हणून इन्स्पेकटरनी ते त्यांच्याबरोबर नेलं. गावातली काही जाणती माणसं त्यांच्याबरोबर गेली. सगळ्या साक्षीपुराव्यांची नोंद झाल्यावर ज्या त्या माणसानं आपलं आपलं दागिनं घरी नेलं.

झाल्या गोष्टीनं किसनलाबी रखमाचं लय कौतुक वाटाय लागलं. आता त्योबी शेतात जरा टाइम भेटला की रहश्यकथांची पुस्तकं वाचीत आसतो. आता किसन रातच्याला नुसता देवळात जाऊन देवाला नमस्कार करून लगीच माघारी यितो. नवराबायकुच्या नात्यात पुन्यांदा गोडवा आला. रखमानबी तशीच गोड बातमी सांगितली. आबा न किसन रखमाला हिकडची काडी तिकडं करू दिली नाय. दिवस भरू लागताच माहेरची माणसं यिऊन रखमाला घिऊन गेली. बघता बघता नऊ महिनं भरलं न रखमा-किसनच्या बाळानं ट्यँह्या केलं. बाळाला बघाय गेल्याल्या आबा न किसनला व्याह्यांनी नाव काय ठेवायचं इचारलं. हसून आबा म्हणालं

"ह्ये काय इचारण झालं? ठेवा की चंद्रशील!"

घरातली समदी खो खो हासत हुती. किसन आन रखमा मातुर नुसतेच डोळ्यानं हासत हुते. आता खरा किसन आन रखमाचा संसार सुरू झाला!

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2016 - 2:41 pm | टवाळ कार्टा

ल्हान मूलांची गोश्ट

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 5:26 pm | यशोधरा

:)

प्राची अश्विनी's picture

1 Nov 2016 - 7:56 am | प्राची अश्विनी

गोड गोड गोष्ट.-:)

एस's picture

1 Nov 2016 - 11:20 pm | एस

मजेशीर आहे!

बॅटमॅन's picture

1 Nov 2016 - 11:52 pm | बॅटमॅन

चांदोबाची ग्रामीण एडिशन काढल्यास त्यात शोभेलशी गोष्ट. आवडली.

सस्नेह's picture

2 Nov 2016 - 4:09 pm | सस्नेह

गंमतशीर !

सिरुसेरि's picture

2 Nov 2016 - 4:19 pm | सिरुसेरि

मस्त . शंकर पाटिल , द. मा. मिरासदार यांच्या कथांची आठवण झाली .

आवल्डी.. भाषा सुरेख जमलीये, उगाच ग्रामीण बोलीचा आव आणला नाहिये.

मस्तच जमलीय स्टोरी. आवाडली.

रेवती's picture

2 Nov 2016 - 5:47 pm | रेवती

गोष्ट आवडली.

नाखु's picture

2 Nov 2016 - 5:53 pm | नाखु

आवडली.

किशोर आनंद वाचक नाखु

सोनुली's picture

2 Nov 2016 - 7:56 pm | सोनुली

ठकठक कथा आवडली

आतिवास's picture

2 Nov 2016 - 8:27 pm | आतिवास

मजेदार.

पिलीयन रायडर's picture

2 Nov 2016 - 10:05 pm | पिलीयन रायडर

आवडली. संवाद इतके मस्त लिहीलेत की माझ्या डोळ्यासमोर कायम अशोक सराफ आणि रंजनाच येत होते. आणि अशोक सराफ म्हणतो ना "ज्याची बायको सरपंच, त्याचा वार्‍यावर गेला परपंच" तसा आपला हिरो डोक्याला हात लावुन बसलाय असं वाटलं!

मस्तच!

नीलमोहर's picture

2 Nov 2016 - 11:14 pm | नीलमोहर

गंमतीशीर गोष्ट,

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2016 - 11:21 pm | बोका-ए-आझम

बाळाला बघाय गेल्याल्या आबा न किसनला व्याह्यांनी नाव काय ठेवायचं इचारलं. हसून आबा म्हणालं
"ह्ये काय इचारण झालं? ठेवा की चंद्रशील!"

हे लय भारी! कथा अप्रतिम खुलवलेली आहे.

रुपी's picture

2 Nov 2016 - 11:33 pm | रुपी

मजेशीर.. कथा आवडली!

"काय करीत आसलं व एवढ्या रगताचं?" >> =))

सतिश गावडे's picture

2 Nov 2016 - 11:46 pm | सतिश गावडे

गोग्गोड गोष्ट.

तिरिमिरीत चाललेल्या किसनानं आबांची हाक ऐकून मागं वळून पाह्यलं. पण गडी थांबला नाय. धुसफुसत तसाच चालत राह्यला.

हे खरं आहे. किसनाला तिरमिरी आली की तो अपने आपची पन सुनत नाय.

पैसा's picture

8 Nov 2016 - 10:32 am | पैसा

=)) =)) =)) =)) =))

यशोधरा's picture

9 Nov 2016 - 11:57 am | यशोधरा

=))

नाखु's picture

10 Nov 2016 - 4:48 pm | नाखु

सर्वांशी सहमत

नीलमोहर's picture

10 Nov 2016 - 8:07 pm | नीलमोहर

आहे ते आहे,

किसन शिंदे's picture

10 Nov 2016 - 5:03 pm | किसन शिंदे

हम्म. वरील सर्वांची नोंद घेण्यात आली आहे.

यशोधरा's picture

10 Nov 2016 - 5:07 pm | यशोधरा

बरं, मग?

स्रुजा's picture

3 Nov 2016 - 2:50 am | स्रुजा

:) :)

आवडली कथा... पात्रांचा साधेपणा विशेष आवडला.

पूर्वाविवेक's picture

5 Nov 2016 - 2:53 pm | पूर्वाविवेक

आवडली गोष्ट. साध्या माणसांची साधी गोष्ट. भाषेमुळे गोडवा आलाय.

मित्रहो's picture

6 Nov 2016 - 12:07 am | मित्रहो

मस्त खुलवली, भाषा पण सुंदर

पैसा's picture

8 Nov 2016 - 10:32 am | पैसा

मजेशीर!

अमृत's picture

8 Nov 2016 - 2:59 pm | अमृत

आवडली.

नरेश माने's picture

10 Nov 2016 - 12:20 pm | नरेश माने

प्रेडिक्टेबल आहे. पण ग्रामीण भाषेमुळे आणि साधेपणामुळे आवडली.

विअर्ड विक्स's picture

10 Nov 2016 - 4:30 pm | विअर्ड विक्स

कथा आवडली.
भग्न शरीरे ते घरचा हेर (बालकथा) !!!!! जबरदस्त range

=)) कथा आवडली.

रातराणी's picture

7 Dec 2016 - 12:28 pm | रातराणी

सर्वांना अनेक धन्यवाद =))